Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गर्दीत आनंदउल्हास उसळे, टाळ्यांचा कडकडाट होई.
 २००४ च्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक यंत्रे आली. सकाळी ८ वाजता मतमोजणी चालू झाली. ९ वाजता निर्णय येऊ लागले. निकालाच्या बातम्यांचा असा धबधबा वाहू लागला, की सगळ्यांची दाद घेणे टेलिव्हिजनच्या वाहिन्यांच्या निवेदकांनाही शक्य होईना. प्रेक्षकांचीदेखील राज्यातला निर्णय पाहावा का एकूण गोळाबेरीज आकडे पाहावे अशी धांदल होऊन गेली. सुरुवाती सुरुवातीलाच काँग्रेसने आघाडी घेतली. मग, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या परिस्थितीत सुधारणा होत, काही काळ ती काँग्रेस आघाडीच्या पुढेही गेली. पण शेवटी, काँग्रेसने सरशी केली. निव्वळ भाजपने १२९ जागा जिंकल्या, रालोआने १६७; काँग्रेसला १३९ जागा मिळाल्या, काँग्रेस आघाडीला १८८.
 या दोघा प्रमुख आघाड्यांखेरीज एक तिसरी आघाडी होती, ती नामशेष झाली. याउलट, स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे इतके यश मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्षांना मिळाले. त्यांना ४३ जागा मिळाल्या. मार्क्सवादाचे नाव असणाऱ्या इतर प्रादेशिक डाव्या पक्षांचे खासदार धरले, तर हा आकडा ६० च्या वर जातो. याखेरीज, पक्षाच्या नावातच समाजवादाची आण घेणाऱ्या समाजवादी पक्षास ४० आणि बहुजन समाज पक्षाला १९ जागा मिळाल्या, म्हणजे त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली.
 मार्क्सवादी कम्युनिस्ट इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसशी जुळून आहेत. 'दिल्लीत येणारे नवे सरकार प्रामुख्याने काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे राहणार आहे. हे सरकार प्रामुख्याने निधार्मिक ताकदींचे असेल.' अशा ललकाऱ्या मारल्या जात आहेत. काँग्रेस पक्षाची अयोध्या विषयावरची धोरणे आणि शहाबानो प्रकरणातील मुस्लिम अनुनयाकरिता घटनादुरुस्ती करून, मुसलमान स्त्रियांवर अन्याय करणारे धोरण पाहिले आणि मुलायमसिंगांची मुस्लिम प्रश्नावरची भूमिका पाहिली म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी यांना निधार्मिक म्हणण्यापेक्षा 'अनुनयी निधार्मिक' असे म्हणणे अधिक योग्य होईल. यालट, राष्ट्रीय लोकशाही आघाडी टिकवून धरण्यासाठी का होईना, राममंदिर, ३७० वे कलम आणि समान नागरी कायदा हे मुद्दे संघ परिवार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना आदी अतिरेकी हिंदुत्ववाद्यांचा रोष पत्करूनही, मागे सारून सर्व धार्मिक तणाव तयार करणारे मुद्दे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अंतर्गत विवादाचे मुद्दे न बनवणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांना खरे तर निधार्मिक म्हटले जायचे. दुर्दैवाने, नरेंद्र मोदी, विनय कटियार, स्वामी सच्चिदानंद यांची विक्राळ प्रतिमाच जनमानसावर

पोशिंद्यांची लोकशाही / २६०