पान:पायवाट (Payvat).pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माणसे गोव्याच्या लढ्यात हसतहसत मेली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मेली. उद्या हिंदुस्थानच्या हितसंबंधांशी निगडित असणारा एखादा लढा झाला, तर त्यात पुन्हा मरतील. हे भारतीय माणसांचेच वैशिष्टय नाही, जगातील सर्वच माणसांचे हे वैशिष्टय आहे. केवळ निषेध व्यक्त करण्यासाठी कित्येक लोक जाहीररीत्या स्वतःला पेटवून घेतात आणि मरतात. ही घटना कोणत्यां प्राचीन अद्भुत युगातील नाही. ती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. हा प्रश्न नुसता सामाजिक ध्येयवादाचा नाही. माणसे राष्ट्रासाठी, धर्मासाठी, भाषेसाठी, आपल्या लहान व मोठ्या ध्येयांसाठी मेलेली आहेत. मरत आली आहेत. म्हशी प्रेम करीत नाहीत. आपल्या प्रियकरासाठी झुरत नाहीत. माणूस प्रेम करतो. प्रेमासाठी जीव देतो. स्त्रियांनी आपले पातिव्रत्य सांभाळण्यासाठी जीव दिलेले आहेत. आजही, समाज इतका आधुनिक झाल्यानंतर, या घटना घडतात. हे आश्चर्यजनक असले तरी सत्य आहे. स्त्रियांची अब्रू वाचविताना पुरुषांनी प्राणत्याग केलेला आहे; त्यात धन्यता मानली आहे.
 या साऱ्या घटनांचा अर्थ काय ? याचा अर्थ हा आहे की, माणूस संस्कृती निर्माण करतो ती कणावर उपकार म्हणून करीत नाही. जशी जनावरे निसर्गक्रमात जन्माला आली, तसाच माणूसही जन्माला आला.पशूंना संस्कृती निर्माण करण्याची गरज भासली नाही. माणसाला ती भासली. संस्कृतीची निर्मिती ही जणू माणसाची जीवशास्त्रीय गरज होती. तिच्या निर्मितीशिवाय माणसाच्या माणूसपणालाच आकार येत नव्हता. कलात्मक व्यवहाराची गरज माणसांनाच लागते, पशूंना लागत नाही. कारण कलात्मक व्यवहार हाही एक असाच सांस्कृतिक व्यवहार आहे. ही संस्कृती निर्माण करताकरताच माणसाने आपल्या जगण्याला अर्थ निर्माण केला आहे, आणि स्वतःच्या पशुत्वापासून सुटका करून घेऊन आपले माणूसपण निर्माण केले आहे. व्यक्तीचे जीवशास्त्रीय स्वार्थ आणि हितसंबंध समूहाच्या स्वार्थात आणि हितसंबंधात रूपान्तरित होण्याची काही प्रक्रिया प्राण्यांमध्ये दिसते. त्यापलीकडे जाऊन अमूर्त कल्पनांत आपले स्वार्थ आणि हितसंबंध विलीन करायला माणूस शिकला. या प्रक्रियेतच त्याच्या माणूसपणाचा आरंभ होतो.
 या आपल्या प्रवासात माणसाने कलांची निर्मिती केली. म्हणूनच कलांच्या बाबतीत त्या चांगल्या आणि वाईट ही चर्चा संभवू शकते. आपले माणूसपण जतन करण्यात जर कलांचा आणि वाङ्मयाचा माणसाला काही उपयोग नसता, तर इतके श्रम वाया घालून त्याने कलांची निर्मिती केली नसती, त्या जतनही केल्या नसत्या. या सगळ्याच सांस्कृतिक निर्मितीत भावनांना आवाहन करण्याचे प्रचंड सामर्थ्य गुंतलेले असते. पण सगळ्याच ठिकाणी व्यक्तींचा स्वार्थ गुंतलेला नसतो.

 माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचा विचार करताना आपणाला हे मानावे लागेल की, जेथे स्वार्थ गुंतलेले नसतात, तेथेही भावनांना आवाहन होते. आणि हे आवाहन कित्येकदा इतके तीव्र असते की, माणसे संस्कृतीच्या संरक्षणार्थ तिच्यावरून आपली प्रकृती ओवाळून फेकून देतात. जीव घेऊन माणसे पळत सुटतात, हे एकच सत्य नाही. माणसे

गेल्या दहा वर्षांतील मराठी समीक्षा १८९