Jump to content

पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०: पानसे घराण्याचा इतिहास. आणखी कांहीं मराठे, ऐसी सात आठ हजार फौज जमा झाली. ते सामील करून घ्यावी याजकरितां मोंगल चालिला. तो श्रीमंत भाऊसाहेब, दादासाहेब, यांणी मनसुबा केला जे, दहा कोस धारूर राहिले. धारूरास ( निझाम ) गेला, मराठे मिळाले म्हणजे विचार पडेल, हे उत्तम नाहीं. तो ( मनसुबा ) करार झाला. माघ वद्य द्वितीयेस रविवारी मोंगलाचे कूच आहे. युद्ध उत्तम करावे; मरेल तो मरो. याप्रमाणे मातवर सरदार होते; त्यांशी सर्वांहीं करार याजप्रमाणे केला. त्याप्रमाणे प्रातःकाळीं कूच जहालें. दोन प्रहरां मुकामास न येतां, तळावर अर्ध कोसावर मोंगल आवळून राहिला. आम्हांकडील तोफ लागली. त्याजवर दोन प्रहां युद्ध जाहले. त्याजकडील चंडाल ( पिछाडीची फौज ) अगदी बुडविला. दहा अकरा हत्ती ( व ) पंधरा पावेतों तोफा आणिल्या. त्याजकडील, याजखेरीज सात आठ मातबर सरदार मारले गेले. गाडदी प्यादे यांस मत नाही. याजप्रमाणे आम्हांकडील पांच सात जण, केशवराव पानसे तोफखाने याचे दरोगे, याजप्रमाणे पांच सात ( सरदार ) ठार ( झाले )...याजमुळे दहशत मोंगलाने फार खादिली. मोंगलाने सल्लयावर घातले. " (पृष्ठ २५६, २५७). याप्रमाणे या लढाईत शके १६८१ फाल्गुन शुद्ध चतुर्थीस केशवराव हे स्वर्गवासी झाले. यास राधाबाई व काशीबाई अशा दोन बायका होत्या. दामोदरराव गणेश यांनी लिहिलेल्या कैफियतींत ( कैफियत यादी वाडकृत ) असे म्हटले आहे की, “ केशवराव ( हे ) खुद्द नबाबा ( निझामचे ) चे हौद्यावर जातीने चढले, तेव्हां खवासनीष याने जोडगोळी मारली, ती कपाळास लागून सरकारच्या कामांत अखेर जाहले. सबब मोठे सरदारीची खिळत ( सन्मानाचा पोषाक ) यशवंतराव ( केशवरावाचे वडील बंधु) यांस सरकारांतून दिल्ही " ( वाड कैफियती यादी वगैरे पृ. १२३ ). केशवरावास व्यंकटराव या नांवाचा एक पुत्र होता. या व्यंकटरावाला केशवराव नांवाचा मुलगा झाला. या केशवरावास संतति न झाल्यामुळे या शाखेचा पुढे निर्वंश झाला. हे केशवराव शके १७१२ त वारले.