Jump to content

पान:पाकिस्तानचे संकट.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५५. आंबेडकरांना कांहीं सवाल राष्ट्रसंघ व हिंदुस्थानचे तेथील स्थान या गोष्टी विचारांत घेतल्या पाहिजेत. हिंदुस्थानचा राष्ट्रसंघांत प्रवेश झाला तो राष्ट्रसंघाच्या कॉव्हेनँटच्या पहिल्या कलमाच्या आधारे झाला नाहीं; इंग्लंडच्या कृपेमुळे झाला, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. हिंदुस्थानचे इतर राष्ट्रांशी संबंध कसे राहावे व हिंदुस्थानच्या सैनिक शक्ती नियंत्रण कोणी करावें या प्रश्नांचा विचार निघाला की, हिंदुस्थानची राजकीय प्रगति कुंठित झाल्यासारखी दिसते, ती अनेक कारणांमुळे होय. हिंदुस्थानचा राष्ट्रसंघांतला दुय्यम दर्जा व हा प्रश्न यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. या दृष्टीने हिंदुस्थानचा दर्जा दुय्यम असला तरी, राष्ट्रसंघांत हिंदुस्थानचे अखंडत्व मान्य व सिद्ध झालेले आहे ही गोष्ट विसरून कां चालावें? मुसलमान दांडगाईने हिंदुस्थानचे तुकडे करूं पाहतील अगर ब्रिटिश सरकार आपल्या स्वार्थासाठी हिंदुस्थानची शकले होऊ देण्याला मान्यता देईल तर त्या प्रकाराविरुद्ध जगभर डांगोरा पिटण्याचे, मोडकेंतोडकें का होईना, एक साधन हिंदूंच्या हातांत आहे; तें हिंदूंनी स्वेच्छेने कां गमवावें? राष्ट्रसंघाची एकंदर घडण कशी आहे, तेथें खरा न्याय कितीसा मिळेल वगैरे प्रश्न दुर्लक्ष करण्यासारखे नसले तरी, हाती असलेले तोकडेंसें हत्यार तरी हिंदूंनी कां गमवावें? मनुष्य कल्पक असला आणि त्याची बुद्धि चौफेर खेळत असली म्हणजे अशा तोकड्या बोथट शस्त्राचाहि उपयोग करण्याला तो कसा प्रवृत्त होतो हे बॅ०सावरकर यांच्या चरित्रांतल्या 'मार्सेल्स' प्रकरणाचें ज्यांना स्मरण आहे त्यांना तरी नव्याने सांगावयाला नको. आंवळ्याभोपळयांची मोट हेच ज्याचे स्वरूप आहे असा राष्ट्रसंघहि बॅ० सावरकरांच्या त्या साहसाच्या वेळी अस्तित्वात नव्हता; नुसत्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा फायदा घेण्याच्या बुद्धीने त्यांनी साहस केलें ! हे जर खरें, तर, आजच्या हिंदूंनी राष्ट्रसंघांतला हिंदुस्थानचा दर्जा 'अखंड हिंदुस्थान' हे ध्येय टिकविण्याच्या कामी जास्तीत जास्त उपयोगांत आणण्याचे ठरविले तर ते चुकीचे कां ठरावें ? राज्य कसे चालेल ही गोष्ट ज्याप्रमाणे राज्य करणारावरच मुख्यतः अवलंबून असते तद्वत्च शस्त्र व साधन यांचा उपयोग कसा होईल हेंहि त्यांचा उपयोग करणारावरच प्रायः अवलंबून असतें! हिंदुस्थानची शकले होण्याला संमति देऊन हे शस्त्र स्वखुषीने हातचें गमाविण्याला आम्ही हिंदु तयार नाहीं;