Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लॉग-इन आयडी आणि पासवर्ड विसरलेली सुवर्णभूमी दत्तप्रसाद दाभोळकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांनी विपुल लेखन अंतर्नादसाठी केले. पाण्याचे योग्य नियोजन हा आपल्या विकासाचा लॉग-इन आयडी आहे व ऊर्जा हा समृद्धीचा पासवर्ड आहे आणि या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज आपला देश गरीब, विकसनशील देश राहिला आहे असे मांडणारा त्यांचा लेख. अनेक शतके आपला देश जगभर 'सुवर्णभूमी' म्हणून ओळखला जायचा. आज जसे जगभरचे कर्तृत्ववान साहसी तरुण अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायची स्वप्ने पाहतात आणि त्यासाठी अथक परिश्रम करतात त्याप्रमाणे अनेक शतके जगातील कर्तृत्ववान, साहसी माणसांचे थवे या देशात येत राहिले. आज अमेरिकेची समृद्धी जशी भारतातील व जगभरचे तरुण वाढवतात, त्याप्रमाणे या देशात येणाऱ्या माणसांनी याच देशातील बनून येथील समृद्धीत अधिकाधिक भर घातली. ते आश्रित म्हणून आले, पोटार्थी म्हणून आले, की जेते म्हणून, यामुळे काही फरक पडला नाही. पण ते येथेच राहिले. आज काही वेगळेच होतेय. या देशातील आपण सारेच जण आज एक तसा गरीब, विकसनशील देश म्हणूनच धडपडतोय. हे असे का झाले? खरेतर सुरुवात आपण 'सुवर्णभूमी' म्हणून का ओळखले गेलो येथपासून करावयास हवी. खरे तर या देशात सोन्याची एकही खाण नाही. नाही म्हणायला अपवाद म्हणून, म्हणजे नियम अपवादाने सिद्ध व्हावा म्हणून, आपल्याकडे कोलारची खाण आहे. पण 'नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा' ही म्हण या खाणीवरून आली असे वाटावे, एवढे नगण्य सोने तिथे मिळायचे. मात्र आपण सुवर्णभूमी बनलो त्याचे कारण जगभराचे सोने या देशात येत होते. हे सोने सर्व जगातून इकडे ओढले जात होते, कारण समृद्धी कशातून निर्माण होते हे या आपल्या हुरहुन्नरी कल्पक पूर्वजांनी ओळखले होते. उत्पादन प्रक्रिया, व्यवस्थापन आणि वितरण या क्षेत्रांत आपण आज विसरूनही गेलोय असे कल्पक मानदंड या देशाने निर्माण केले होते. फक्त दोन गोष्टी लक्षात घेऊ. चीनचे रेशीम जगभर जायचे. तो रेशीम मार्ग म्हणजे 'सिल्क रूट' भारतातून जातो. कौसानीच्या जवळ आल्यावर वाटेत एक अतिशय अवघड, उंच, तिरका निसरडा असा हिमालयाचा एक भाग येतो. या कड्याच्या दोन्ही बाजूला विस्तीर्ण अशी मैदाने आहेत. म्हणजे आलेला माल एका बाजूला उतरायचा हा कडा पार करून दुसऱ्या बाजूला जायचा. माणसे सामान न घेतासुद्धा हा कडा पार करू शकणार नाहीत ३८६ निवडक अंतर्नाद घोडे, खेचरे, गाढव सारे या कड्यापुढे हतबल, आपण हे सामान या बाजूने त्या बाजूला कसे न्यायचे? त्या मैदानातील मातीचे पृथक्करण केले त्यावेळी लक्षात आले; त्यात मेंढ्या- बकऱ्यांच्या लेंड्यांचे अवशेष आहेत. मग लक्षात आले, आपले कल्पक पूर्वज दोन्ही बाजूंना मेंढ्या बकऱ्यांचे कळप ठेवायचे. त्यांच्या पोटाला खाली पिशव्या लावून त्यात सामान भरलेले. उपाशी शेळ्यांना आपण तिकडे गेलो, की छान खायला मिळते हे माहीत झपाट्याने दोन्ही बाजूंनी माल सहजपणे इकडून तिकडे जात होता. दुसरी गोष्ट घेऊ, व्यवस्थापन हे या देशात खेड्यापाड्यांत रुजलेले असणार, गवयाचे पोर जसे तालात रडते तसे ते आपल्या रक्तात आले असणार किंवा प्रत्येक पिढीतून बोलण्या-चालण्यातून कमी कमी होत का होईना ते संस्काराच्या रूपात पुढे आले असणार नाहीतर एका अनाम खेड्यातून जपानमधील व्यवस्थापन गुरुजींनी अवाक होऊन पाहावी आणि तिचा अभ्यास करावा अशी एका महानगरात कुठल्याही कोपऱ्यातून ठरलेल्या वेळी डबा उचलून, अनेक मार्ग बदलून, महानगरात दुसऱ्या टोकाला, नेमक्या ठिकाणी डबा पोचविण्याची यंत्रणा खेड्यात राहणाऱ्या अर्धशिक्षित लोकांनी कशी काय तयार केली असती? पण व्यवस्थापन आणि वितरण यांच्याआधी निर्मिती आणि प्रक्रिया या गोष्टी येतात. माणसाला समजलेली निर्मितीची पहिली गोष्ट म्हणजे निसर्ग एका दाण्याचे शंभर दाण्यांत रूपांतर करतो. दुसरे म्हणजे या उत्पन्नावर किंवा इतरही कशावर काही उद्योग करावयाचे असतील तर ऊर्जा लागते. ती ऊर्जा वापरूनच तर लोहार, सोनार, पाथरवट यांची अवजारे बनतात, अग्नी हे ऊर्जेचे अनेक शतके एकमेव साधन होते आणि अग्नीची निर्मिती संवर्धन, रक्षण, उपयोग यांबाबतची एक अभ्यासपूर्ण रचना या देशाने केली होती. मात्र ऊर्जा, व्यवस्थापन, वितरण या सर्व पुढच्या पायऱ्या आहेत. सुरुवात निर्मितीपासून होते. एका दाण्यापासून शंभर दाणे चांगले आणि हमखास कसे बनवायचे हे समजावे लागते, ते