पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तंत्रज्ञानाने एकूणच कुठल्याही चळवळीपेक्षा मानवी जीवनावर जास्त प्रभाव टाकलेला आहे, जास्त आनंद निर्माण केलेला आहे. आज महाराष्ट्रातील द्राक्षे लंडन- पॅरीसमधील डायनिंग टेबलवर पोचली आहेत व त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या घराततरी समृद्धी यायची शक्यता निर्माण झाली आहे, याचे एक कारण मालाची वाहतूक विमानाने करण्याची तंत्रज्ञानाने केलेली सोय. आणि याचे दुसरे कारण म्हणजे ही द्राक्षे खरेदी करणारी 'मार्क्स अॅण्ड स्पेन्सर' यांसारखी सुपर मार्केट्स. "गरिबांसाठी मार्क्स आणि एंगल्स यांच्यापेक्षा कितीतरी जास्त कामगिरी मार्क्स अॅण्ड स्पेन्सर या सुपर मार्केटने केली" अशी टिप्पणी प्रख्यात व्यंगकार जॉर्ज मिकेश यांनी केली आहे. साहित्यक्षेत्रातही थोडेफार स्वयंस्फूर्त कार्य सुरू असते. या क्षेत्राकडे बघितले तरी एकूण परिस्थिती केविलवाणीच असल्याचे दिसते. मी आत्तापर्यंत अठरा-वीस पुस्तके लिहिली आहेत. मराठीबरोबर इंग्रजीतही लिहिली आहेत. माझ्या काही पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. आमच्या शेतकरी संघटनेच्या कामामध्ये अक्षरशः लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतात. शेतकरी आंदोलनात जितकी माणसे तुरुंगात गेली तितकी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य- आंदोलनातही गेली नव्हती. असे असूनही मराठी साहित्यामध्ये शेतकरी आंदोलनाला काही ही स्थान मिळालेले नाही, एकेक दिवस, बी पेरल्यानंतर हाती पीक येईपर्यंत, किंवा न येईपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्याच्या मनाला ज्या सहस्र इंगळ्या डसतात त्याचे चित्र साहित्यात मला कुठेही दिसत नाही. साहित्यात आणि सिनेमातही नाही. सिनेमात तर काय, शेतकरी दाखवायचा म्हणजे एकदाच नांगर घालताना दाखवायचा. आणि लगेच सगळी पिके लहलहरती. मग पुढे दहा मुली इकडे नाचत जाणार अन् दहा मुली तिकडे नाचत जाणार! शेतकऱ्याच्या आयुष्याचे चित्रण हे असे होऊन गेलेय. तुम्ही शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये बारकाईने का पाहत नाही ? डाव्यांच्या त्यांच्यामागे शेपाचशे चळवळीमध्ये, माणसेसुद्धा नसली तरी, त्यांची कवने गाणाऱ्यांचा सुंदर ताफा त्यांच्यापुढे असतो. ज्यांच्या आंदोलनात आंदोलकांची संख्या कमी, पोलिसांची जास्त त्या आंदोलनात प्रतिभेचा हा झरा खळाळून वाहताना दिसतो आणि प्रचंड आंदोलने करणाऱ्या शेतकरी संघटनेत, काही अपवाद वगळल्यास, साहित्य, कला, संगीत, शाहिरी, पोवाडे अशी मार्गांनी प्रतिभा दाखविणारे निपजले नाहीत, असे का झाले? एकदा एका कार्यकर्त्याने नानासाहेब गोऱ्यांना प्रश्न विचारला, "शेतकरी संघटना ही अशी रुक्ष, काव्य नसलेली का झाली?" ते म्हणाले, "शरद जोशी हा माणूसच गद्य आहे. त्यांनी जो अर्थशास्त्रीय विषय मांडला, तोच रुक्ष आणि गद्य आहे. आंदोलनाचे साहित्य हे कधी अशा गद्य भाषेत तयार होत नाही. आंदोलनात काहीतरी डोक्यात मस्ती चढवणारी, झिंग आणणारी गोष्ट असावी लागते. रामाच्या देवळाचे नाव घ्यावे लागते, नसलेल्या गोष्टी तयार कराव्या लागतात, सामान्य माणसांचेसुद्धा पुतळे जागोजागी उभे करून त्यांना देवता बनवावे लागते. समाजाच्या हितसंबंधांबरोबरच काही एक पागलपणा केल्याखेरीज आजकाल खरे आंदोलन बनतच नाही. आणि शरद जोशींना पागलपणा दाखवता येत नाही. " ३५६ निवडक अंतर्नाद साहित्यिक क्षेत्रातील चळवळी मंडळी वेगवेगळी संमेलने भरवतील, आपापले मंच उभे करतील, निधी जमवतील, पण जर त्यांना असे वाटत असेल, की त्यांतून मराठी भाषा जगणार आहे, तर तो त्यांचा भ्रम आहे. अशा प्रयत्नांतून मराठी भाषा जगणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे, की लहान माणसांची भाषा ही मोठी असूच शकत नाही. मराठी भाषा मोठी व समृद्ध करायची असेल तर त्यासाठी आधी मराठी माणसाने सर्वार्थाने समृद्ध व्हावे लागेल. स्त्रियांचे जीवन सुखकर करण्यामध्ये सगळ्या चळवळींपेक्षा कितीतरी जास्त वाटा हा आधुनिक तंत्रज्ञानाने उचलला आहे. शिवणयंत्र, पिठाची गिरणी, मिक्सर, वॉशिंग मशीन यांमुळे सर्वसामान्य स्त्रीचे जीवन जितके सुखकर झाले, तितके कुठल्याही चळवळीमुळे कधीच झाले नसते. या संदर्भात फ्रान्समधला माझा अनुभव बोलका आहे. मी जेव्हा फ्रान्सला प्रथम गेलो, त्यावेळी फ्रेंच माणसे इंग्रजीत बोलत नसत. आपल्या मातृभाषेचाच त्यांना अभिमान होता. परंतु त्यानंतर काही वर्षांनी मी जेव्हा फ्रान्समध्ये गेलो त्यावेळी फ्रेंच माणसे सर्रास इंग्रजी बोलताना मला आढळली. काहीशा आश्चर्याने त्यांना मी विचारले, "तुम्ही तुमच्या भाषेचे इतके अभिमानी होता, मग आता इंग्रजी कसे काय बोलायला लागलात?" तेव्हा ते म्हणाले, "आम्ही जी बोलतो ती इंग्लिश भाषा नाही, ती अमेरिकी भाषा आहे! आम्ही ही परकी भाषा शिकलो याचे कारण काय? अमेरिकेत आर्थिक वैभव आहे, सुखसंपन्नता आहे, साधनांची विपुलता आहे. त्यामुळे अमेरिकी भाषा खऱ्या अर्थाने संपन्न झाली आहे. आणि ज्याला जगाच्या सरहद्दीवर, इतिहासाच्या सरहद्दीवर, संशोधनाच्या सरहद्दीवर जायचे आहे त्यांना अमेरिकी भाषा शिकण्याखेरीज गत्यंतर नाही. " तात्पर्य म्हणजे मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध व्हायला हवे असेल, तर त्यासाठी चळवळी करून काही होईल असे मला वाटत नाही, त्यासाठी मराठी माणूस समृद्ध व्हावा लागेल. आणि मग त्याच्या भाषेला आपोआपच महत्ता प्राप्त होईल. थोडेसे विषयांतर होते आहे, पण एका नामवंत समाजसेवकाचा एक अनुभव या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. यांच्या 'आदर्श गावाला मी गेलो. "गावात कोणीही चित्रहार बघत नाही.” गावकरी मला सांगू लागले. "का बरं?" मी विचारले. "नटनट्यांचे ते घाणेरडे चाळे काय बघायचे!” “पण एखाद्याला चित्रहार बघायची इच्छा असेल तर?" "तसा काही प्रश्नच उद्भवत नाही. चित्रहार पाहायचा नाही असा आदेशच आहे आम्हांला.” हे