Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जेपींची संपूर्ण क्रांतीही एक राजकीय दिने इलाही होती. मी विचार करतो असं का व्हावं? जेपी स्वातंत्र्यचळवळीत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी राजकारणाचा संन्यास घेतला आणि ते विधायक कार्यात गेले. समाजवादी चळवळीची आपली परंपरा सोडून त्यांनी सर्वोदयाची वाट धरली. १९५३-५४ पासून ते थेट १९७३ पर्यंत जेपी राजकारणात नव्हते, लोकांच्या आठवणीत शिल्लक नव्हते. त्यांच्यासोबत काम करणारी माणसं, जुने समाजवादी वगैरेंनाच त्यांचं असणं माहीत होतं. १९७२ नंतर देशात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसची राजवट 'फेल' गेली होती आणि विरोधक पर्याय देऊ शकले नव्हते. १९६७ साली देशभर काँग्रेस-विरोधाची लाट उसळली आणि अनेक राज्यांत गैर काँग्रेसी सरकारं आली. त्या काळातले समाजवादी व जनसंघी त्या सरकारात होते. त्यांना वेळ फार मिळाला नसला तरी त्यांना काम जमत नाही, देशाचे प्रश्न सोडवणं त्यांना जमत नाही असं लोकांना वाटलं, काँग्रेस आणि विरोधक दोघंही सारखेच 'बेकार' आहेत अशी भावना लोकांमध्ये पसरली. देशात बेकारी वाढत होती. विषमता वाढत होती. खेड्यांची दैना होत होती, अडाणीपण वाढत होतं. आरोग्याची हेळसांड झाली होती. भ्रष्टाचारानं कळस गाठला होता. थोडक्यात असं की देश हलाखीत होता. परिस्थिती वाईट आहे आणि राजकीय पक्ष त्यातून वाट काढू शकत नाहीत ही भावना देशात, विशेषतः तरुणांत, बळावली, राजकारण, राजकीय पक्ष, पुढारी यांना लोक विटले होते. संतापलेली मुलं रस्त्यावर उतरली आणि गुजरातेत नवनिर्माण आंदोलन सुरू झालं. आंदोलनाचा राग सर्वच राजकीय पक्षांवर होता. अचानक जेपी या आंदोलनाच्या नेतृत्वपदी पोचले. तरुणांनी त्यांना ओढून नेतृत्वपदी बसवलं, जेपी तयार नव्हते, परंतु तरुणांची, देशाची दैना पाहवत नसल्यानं ते आंदोलनात पडले. देशातली परिस्थिती आमूलाग्र बदलली पाहिजे, संपूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे, किरकोळ बदलानं भागणार नाही, केवळ एका राजकीय पक्षाची किंवा व्यक्तीची सत्ता घालवून उपयोगाची नाही, मुळातून समाजात बदल केला पाहिजे असं ते म्हणाले, नवनिर्माण आंदोलनाचं रूपांतर त्यांनी संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात केलं. चिमणभाई पटेल आणि इंदिरा गांधींच्या सरकार विरोधातलं आंदोलन त्यांनी पक्षीय परिघाबाहेर नेऊन सर्वसमावशेक केलं. हलके हलके आंदोलन युवकापुरतंच मर्यादित न राहता त्यात राजकीय पक्षही उतरले. ते आंदोलन प्रत्यक्षात काँग्रेसविरोधाचं आंदोलन झालं. जेपींना जे नको होतं तेच झालं. यथावकाश जनता पार्टी झाली. सगळे बेकार पक्ष आणि त्यांचे निरुपयोगी बेकार व भंपक पुढारी जनता पार्टीत सामील झाले. जेपींना हे कळत नव्हतं काय? जरूर कळत होतं. त्याचं त्यांना दुःखही होत होतं, जेपींचा स्वभाव राजकारणी, सत्तेचं राजकारण खेळणारा नव्हता, सत्तेचा मोह त्यांना नव्हता. तरीही सत्तापिपासू लोकांना जवळ करून त्यांनी जनता पार्टी नावाची एक बंडल पार्टी स्थापन करायला परवानगी दिली. का? त्यांचं म्हणणं ह्येतं की त्यांचा इलाज नव्हता, जनता पार्टीत सामील झालेल्या लोकांचा इंदिरा गांधींवर राग होता कारण त्यांना स्वतः इंदिरा गांधी होणं जमलं नव्हतं, त्यांच्याइतका भ्रष्टाचार करण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती. त्यांचा फॅसिझम व हुकूमशाहीला विरोध होता कारण त्यांना स्वत:ला फॅसिस्ट होणं, हुकूमशहा होणं जमलं नव्हतं. आज अडवाणी व फर्नांडिसांची भाषा पाहा. थेट इंदिरा गांधीच बोलत आहेत, असा भास होतो. वृत्तपत्रांनी त्यांच्या विरोधात कट केला आहे, विरोधी पक्षांनी (काँग्रेसनं) कट केला आहे, आंतरराष्ट्रीय शक्ती त्यांना अपदस्थ करण्याचा खटाटोप करत आहेत, पाच वर्षांसाठी जनतेनं निवडून दिलं असतानाही असंतुष्ट राजकीय आत्मे त्यांना सत्तेतून हुसकून लावत आहेत असं हे लोक म्हणत आहेत, आणि याच लोकांना जेपींनी जवळ करून जनता पार्टी स्थापन करायला परवानगी दिली होती. - त्या काळातल्या राजकीय पक्षांनी, त्यातल्या पुढाऱ्यांनी जेपींचा वापर करून घेतला, स्वतंत्रपणे सत्ता हस्तगत करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांच्यावर लोकांचा राग होता, अविश्वास होता. जेपींची ढाल वापरून लोकांच्या रागापासून त्यांनी स्वतःचा बचाव करून घेतला, सत्ता मिळवली, जेपींनी हे सारं होऊ दिलं. नाइलाजानं का होईना, वाईट वाटत असताना का होईना, पण जेपींनी स्वतःचा वापर होऊ दिला. हा उद्योग करण्यात जेपींचा स्वार्थ नव्हता. त्यांच्यात एक भाबडा, आंधळा ध्येयवाद होता. प्रयत्न तर करायला काय हरकत आहे, असा कळकळीचा विचार त्यांनी केला असेल. पण नवनिर्माण आंदोलन सुरू झाल्यापासून तीनेक वर्षांत आणीबाणी, निवडणुका व जनता पार्टीचं सरकार अशी स्थित्यंतरं येऊन गेली. जेपी संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाचे नेते झाले. कशाच्या जोरावर? विचारांच्या जोरावर? - संपूर्ण क्रांतीचा जो काही विचार होता तो नवा नव्हता. अनेक अर्धवट विचारांचं ते एक भाबडं मिश्रण होतं. त्यात गांधी होते, समाजवाद होता, मिश्र अर्थव्यवस्था होती, आंबेडकर होते, फुले होते, उदारमतवादही होता. अकबरानं दिने इलाही काढला, जगभरची सर्व चांगली तत्त्वं गोळा करून दिने इलाही नावाचा धर्म त्यानं सांगितला काय झालं त्या धर्माचं? - जेपींची संपूर्ण क्रांतीही एक राजकीय दिने इलाही होती. एका सज्जन माणसाची एक कळकळीची भाबडी इच्छा यापलीकडे त्या कार्यक्रमात काय होतं? त्यांनी सांगितलेले कार्यक्रम इतर अनेक पुढाऱ्यांनी मांडलेले होते, ते विचार अमलात आणणं कोणालाही जमलेलं नव्हतं. - काँग्रेसचे कार्यक्रम, संपूर्ण क्रांती, जनता पार्टीचे कार्यक्रम यांत काय फरक होता ? - समाजवाद, गरिबांचं कल्याण, विषमता दूर करणं, दलित-आदिवासी-मुसलमानांचं कल्याण, अंत्योदय, विकेंद्रित अर्थव्यवस्था, तटस्थतेचं परदेश धोरण या सगळ्या गोष्टी सगळेच राजकीय पक्ष मांडतात. वांधा होता ते निवडक अंतर्नाद ३४१