पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुस्तके प्रकाशित व्हावीत असे वाटत होते. परंतु ती कशी प्रकाशित होणार? खरे तर, त्यासाठी प्रकाशकांशी संपर्क करायला हवा होता. कवितासंग्रह छापणारे प्रकाशक थोडे तरीही का कुणास ठाऊक, त्यांच्याकडे जावे असे वाटले नाही. परंतु कवितासंग्रह प्रकाशित झाला पाहिजे, असे तीव्रतेने वाटत होते. याच काळात भालचंद्र नेमाडे औरंगाबादला होते. त्यांनी स्वतःची आणि त्यांच्या वर्तुळातील कवींची पुस्तके काढावयास सुरुवात केली. इतर प्रकाशकांची मनधरणी करण्यापेक्षा आपण आपले कवितासंग्रह काढावेत, अशी त्यांची भूमिका होती. भालचंद्र नेमाडे यांच्या 'वाचा' प्रकाशनाच्या प्रेरणेने अनेक कवींनी आपले संग्रह स्वतःच काढले. हे एक उदाहरण समोर होते. तेव्हा डॉ. प्रभाकर मांडे आणि महावीर जोंधळे यांनी पुढाकार घेऊन 'साहित्य सहकार' या नावाची प्रकाशन संस्था सुरू केली. वितरणाची जबाबदारी ना. वि. देशपांडे यांनी स्वीकारली. त्यांचे औरंगपुऱ्यात पुस्तकांचे मोठे दुकान होते. कल्पना अशी होती, की लेखकांनी निर्मिती खर्च द्यावा, विक्रीनंतर त्याचे मूळ भांडवल केले जाईल. या योजनेत सात-आठ पुस्तके निघाली, महावीर जोंधळे यांच्या पुढाकाराने माझा 'मुड्स' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. छोटासा होता. पन्नासेक पानांचा. त्याचा प्रकाशन समारंभही झाला. परंतु त्याला मला उपस्थित राहता आले नाही. यानंतर माझ्या कुठल्याही पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला नाही. या संग्रहाच्या निर्मितीसाठी मी रुपये ६०० दिले. ते कधीच परत आले नाहीत, तशी अपेक्षाही नव्हती. पुढे प्रकाशन संस्थेचे कामकाज थांबलेच. कवितासंग्रह प्रकाशित झाला आणि त्याला त्या काळात खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या एका मित्राला तर संपूर्ण कवितासंग्रहच पाठ होता. परीक्षणेही तीन-चार आली. मुख्य म्हणजे, त्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तो क्षण अतिशय आनंदाचा होता. पण खरा आनंद पुढे समारंभाच्या वेळी झाला. सुप्रसिद्ध समीक्षक आणि कादंबरीकार त्र्यं. वि. सरदेशमुख हे तज्ज्ञ समितीत होते. त्यांनी कविता विलक्षण आवडल्याचे सांगितले. मला अतिशय आनंद झाला. परंतु येथून पुढे मात्र हळूहळू कवितालेखन कमी होत गेले. साधारणत: १९९० पर्यंत थोड्या कविता मी लिहिल्या. त्यात काही वेगळ्या कविता होत्या. 'विदूषिका' या नावाने त्या प्रकाशित झाल्या. समाजातील खोटेपणाचा उपहासाच्या अंगाने या कवितांमधून आविष्कार होत होता, तरीही या कविता संख्येने फारशा नव्हत्या. (आता २०१२ साली 'मुड्स आणि नंतरच्या कविता' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यात साधरणत: १९९० पर्यंतच्या कविता एकत्रित केल्या आहेत.) पुढे मला कविता सुचेनाशी झाली, आणि मीही सहज सुचत नसेल तर अट्टहासाने कविता लिहिण्याचा / पाडण्याचा उपद्व्याप केला नाही. आता मागील वर्षापासून म्हणजे २०११ पासून मला पुन्हा कविता सुचू लागल्या आहेत. त्यांतील काही प्रकाशित झाल्या आणि अनेक रसिकांचे फोन आले. बरे वाटले. आता शंभर सव्वाशे कविता प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहेत. येथे एक प्रश्न असा, की माझे कवितालेखन मध्येच का बंद झाले असावे? त्याचे निश्चित उत्तर देता आले नाही, तरी दोन-तीन कारणे सांगता येतील. मी माझ्या प्रबंध लेखनात व इतर समीक्षालेखनात गुंतलो होतो. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे, माझ्यामध्ये बदल होत २०४ निवडक अंतर्नाद होता. विद्यापीठात शिकत असताना मोईन शाकीर यांच्याशी मैत्री झाली. ते कडवे मार्क्सवादी होते. त्यांना साहित्याची आवड होतीच. त्यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चा मला अधिक डोळस करीत होत्या. त्यातून नुसतेच भ्रमनिरासाने व्याकूळ होणे पुरेसे नाही, त्याच्यापुढे जाता आले पाहिजे, असे अंतर्मनात कोठेतरी वाटत असणार, याच काळात साहित्यक्षेत्रात साहित्यचळवळींचे वारेही जोरदार वाहत होते. विशेषत: दलित साहित्याची चळवळ सुरू झालेली होती. भारतीय समाजातील बहुसंख्याकांच्या दुःखाचे मूळ हे भारतीय जातिव्यवस्थेमध्ये आहे, हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी सांगितलेलेच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जगन्मान्य विद्वानालाही जातीयतेच्या विषारी इंगळ्यांनी दंश केला होता. हा सगळा इतिहास दलित साहित्याच्या चळवळीतून मुखर होत होता. एखाद्या झंझावातासारखे दलित साहित्य आले. पुढे ग्रामिणांच्या दुःखाला वाचा फुटू लागली. १९७४नंतर स्त्रियांच्या घुसमटीला अंकुर फुटू लागले. असा सगळा हा चळवळींचा होता. जाणिवांचा काळ होता. साऱ्याच गोष्टींचा परिणाम माझ्यावर झालेला आहे तरीही मला वाटते, की मी या सर्व चळवळींशी समांतर राहून लेखन केले. सर्व चळवळींविषयी सहानुभूती, आपलेपणा असूनही मी त्यांना समांतर आहे, असे मला वाटते. माझी कविता का थांबली असावी, असा विचार करताना मला वाटते, की भोवतीच्या वाङ्मयीन पर्यावरणाचा परिणाम माझ्यावर झाला असणार आणि आपण अधिक शोधक होणे आवश्यक आहे, असे माझ्या अंतर्मनाला वाटले असणार, कुठल्या कारणाने नक्की सांगता यायचे नाही, परंतु मधली वीस-पंचवीस वर्षे कविता मला सोडून गेली होती, ही मात्र वस्तुस्थिती आहे. या मधल्या वर्षांत मला कविता सुचत नाही, याची विलक्षण खंत वाटत असे. माझे कथालेखन चालूच होते. अर्थात वर्षाला तीन-चार कथा असे माझे कथालेखनाचे प्रमाण होते. साधारणत: १९८० पर्यंत तीस- पस्तीस कथा लिहून झाल्या होत्या. (त्यांतल्या काही आज माझ्याकडे नाहीत.) कथासंग्रह यावा, असे वाटत होते. प्रतिष्ठित प्रकाशकांना विचारले पाहिजे, असे काही माझ्या डोक्यात आले नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून 'रा. ज. देशमुख आणि कंपनी' ला पत्र पाठविले. अर्थात त्यांचा नकार आला. दरम्यानच्या काळात नांदेडला माझे मित्र प्रा. मामीडवार यांनी प्रकाशन संस्था काढली. त्यांनी मला स्वतः होऊन विचारले. विशेष म्हणजे रु. ५०००/- मानधन दिले. 'काफिला' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. याच दरम्यान प्राचार्य गजमल माळी यांच्या 'पृथक प्रकाशना'च्या वतीने माझा 'कर्फ्यू आणि इतर कथा' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. या प्रकाशनाच्या वतीने त्यांचा कवितासंग्रह व माझा कथासंग्रह प्रकाशित झाला. पुढे हे प्रकाशन काही उभे राहिले नाही. 'मौज प्रिंटिंग प्रेस मधून पुस्तकांची छपाई झाली. परंतु माझा कथासंग्रह मात्र फारसा वितरित झालाच नाही. उत्तम कथा असणारा हा कथासंग्रह पडून राहावा, ही विलक्षण दुःखकारक गोष्ट होती. परंतु काही इलाज नव्हता. १९८४च्या दरम्यान कोल्हापूरच्या 'प्रचार प्रकाशना'च्या वतीने माझा 'संघर्ष' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला. थोडीबहुत दखल घेतली गेली. परंतु पहिले दोन संग्रह लोकांपर्यंत नीट पोचलेच नाहीत.