Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझे लेखन : जीवनमूल्यांचा आविष्कार नागनाथ कोत्तापल्ले अंतर्नादच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात 'मी आणि माझे लेखन हा एक विशेष विभाग होता. त्यात राजेन्द्र बनहट्टी, नागनाथ कोत्तापल्ले, आशा बगे, अरुण साधू, रंगनाथ पठारे, भारत सासणे, नीरजा, सदानंद देशमुख, अरुणा ढेरे, आनंद यादव, विजय पांढरीपांडे, विश्वास पाटील, इंद्रजित भालेराव, मोनिका गजेंद्रगडकर आणि कविता महाजन या मराठीतील काही आघाडीच्या लेखकांचे लेख प्रसिद्ध झाले होते. त्या विशेष विभागाची ही एक झलक. आपण काहीतरी लिहावे किंवा लिहिलेच पाहिजे असे तीव्रतेने वाटून मी एक कविता लिहिली. त्याच्या पाठोपाठच एक लेखही लिहिला. कविता कुठेतरी वाचलेल्या कवितेचा प्रतिध्वनी होती, मात्र लेख स्वतःचा असावा, असे वाटते. 'इतिहासाकडे पुन्हा वळावे लागेल', असे काहीसे त्या लेखाचे शीर्षक होते. म्हणजे भोवती जे काही पाहत होतो, ते मला रुचत नव्हते. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पुन्हा इतिहासाकडे वळले पाहिजे, इतिहासातील आदर्श व्यक्तींचा आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे, असा काहीसा आशय त्या लेखाचा होता. मुखेडला - माझ्या गावी - माझ्या अगदीच छोट्या घरात बसून मी तो लेख झपाटल्यासारखा लिहिला होता. लेख लिहून झाला, तेव्हा मला विलक्षण आनंद झाला होता. तेव्हा मी इयत्ता नववीमध्ये ह्येतो. ते वर्ष असावे १९६३ किंवा १९६४. अभ्यासात मी नावाजलेला विद्यार्थी होतो. तेव्हा अभ्यास सोडून मी हा लेख का लिहिला असावा, हा प्रश्न आहे वाचन तर मी तिसरी - चौथीपासूनच करत होतो. परंतु एकाएकी एक मोठा लेख मी लिहून काढला. मित्रांना वाचून दाखवला. शाळेतला लेखकच झालो म्हणा ना! मग हे का घडले? घरात लेखनाची वाचनाची परंपरा नव्हती, परंतु असे सांगितले जात होते, की माझ्या आजोबांना नाटकांचा फार शौक होता. ते स्वतः नाटकात काम करीत असत. एवढेच नाही, तर गडकऱ्यांचे ●अपूर्ण नाटक 'राजसंन्यास' त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण केले होते व त्याचा प्रयोग केला होता. माझ्या जन्माआधी काही महिने त्यांचे निधन झाले होते. मी त्यांना पाहिलेही नव्हते. फक्त कोठेतरी एका ग्रुपफोटोमध्ये त्यांना पाहू शकलो होतो. त्यावेळी गडकरी, 'राजसंन्यास हे काही माहीत नव्हते. त्यामुळे तो फोटो मागून घ्यावा, माहिती जमवावी असे काही कळण्याचे माझे वय नव्हते, परंतु आपले आजोबा नाटकात काम करीत होते, ही माहिती मिळून आनंद झाला होता. मग माझ्या या लेखाचा आजोबांच्या ऐकीव माहितीशी काही संबंध आहे का ? सांगता येत नाही. परंतु प्रत्यक्ष लिहावेसे वाटणे याला दोन कारणे होती, असे मला वाटते. एक म्हणजे, आमच्या शाळेमध्ये तेव्हा श्री. धरणीधरराव इनामदार हे शिक्षक होते. ते फार मारकुटे व संतापी होते. परंतु त्याकाळात त्यांच्या कथा 'प्रसाद' मासिकात छापून येत. तेव्हा आपणही लिहावे, असे मला वाटत असणार. दुसरे म्हणजे, २०२ • निवडक अंतर्नाद भोवती जी काही परिस्थिती होती, ती काही चांगली नव्हती. आमच्या घरी मी व आजी असे दोघे राहात होतो. वडील प्राथमिक शिक्षक. त्यामुळे ते व सारे कुटुंब बदलीच्या गावी असत. आजी तिची शेतातली कामे सांभाळून माझी काळजी घेई. तरीही परिस्थिती ओढगस्तीचीच होती. घरात काही ताणही होते. त्यातून पुढे वाटण्या झाल्या. कौटुंबिक पातळीवरचे हे तणाव होतेच, पण त्याकाळात भोवती समाजात जे काही चालू होते, त्याबद्दलही मी असमाधानी असणार, फार काही कळण्याचे वय नव्हेच ते. पण मी वर्तमानपत्र वाचत असे. त्यातूनही एक असमाधान मनात साचत असणार, या साऱ्या असमाधानातून सुटका करून घेण्याचा किंवा या असमाधानावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मला तो लेख लिहावासा वाटला असणार, मला वाटते, कुठल्याही लेखकाच्या लेखनाची मुख्य प्रेरणा त्याचे असमाधान हीच असावी. मी दहावीची परीक्षा पास झालो आणि नुकत्याच उघडलेल्या देगलूर महाविद्यालयात मी प्रवेश घेतला. नांदेडमध्ये दोन महाविद्यालये होती. नावाजलेली होती. परंतु नांदेडमध्ये राहून शिक्षण घेणे परवडणारे नव्हते. (तसेच विज्ञानाकडे माझा ओढा नव्हताच.) मी देगलूर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ते फारच चांगले झाले, असे आता वाटते. एक तर तेथे विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे शिक्षकांना शक्य होते. प्राचार्य धर्माधिकारी यांनी तर मला घरी बोलावून एकट्यासाठी काही वर्ग घेतले होते राज्यशास्त्राचे, माझ्या आयुष्यात प्राचार्य हेमचंद्र धर्माधिकारी यांचे स्थान फार मोठे आहे. ते प्रयोगशील वृत्तीचे आणि सामाजिक बांधिलकी मानणारे निर्भीड शिक्षक होते. त्यांनी आम्हां काही विद्यार्थ्यांना सोमनाथ येथे झालेल्या पहिल्या 'श्रमसंस्कार छावणी' मध्ये पाठवलेले होते. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या कार्यामुळे आणि व्यक्तित्वामुळे आम्ही विद्यार्थी भारावून गेलो होतो. या श्रमसंस्कार छावणीचे आणि आम्हांला तेथे पाठविणाऱ्या प्राचार्य धर्माधिकारी यांच्या संस्काराचे ठसे माझ्या जीवनात तरी अमीट असेच राहिले आहेत. एकूण जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन महाविद्यालयात तयार होत गेला, असे म्हणता येईल. पुढील आयुष्यात तो अधिक विकसित होत गेला. कुठल्याही लेखकाचे-व्यक्तीचे