Jump to content

पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमलताई अनिल अवचट रंग, रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग, काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई यांसारख्या गाजलेल्या कथा-कादंबऱ्यांच्या लेखिका कमल देसाई हे मराठी साहित्यातील एक आदराने घेतले जाणारे नाव. प्रतिभावान पण तितक्याच फटकळ आणि मनस्वी. अनिल अवचट यांना त्या कशा दिसल्या आणि भावल्या? परवा मोबाइल वाजला आणि नाव बघतो, तर काय ? कमळी? म्हणजे? कमळी जिवंत आहे की काय? जगाला असा गुंगारा दिला होय ? पण फोनवर होती कमलताईंची सून. नंदू कमलताईंच्या मित्रमंडळींना येत्या रविवारी घरी एकत्र बोलावलंय, त्याचा फोन, पण मी तर लांब गडचिरोलीला येणं शक्यच नव्हतं. पण त्या फोनने हादरवलंच मला. कमळी जिवंत आहे की काय ? 'परलोकात गेले, पण आवडतच नाही मला तिथलं, मग आले पळून', असं म्हणून हसत सुटली असती कमळी, कमळीचं हसणं, म्हणजे भीती वाटायची. झेपेल का तिच्या जेमतेम तब्येतीला? पण हसत कोचावर अगदी आडवे होणे, पडणे हीच तिची रीत. हसण्याचा आवाजही एरवीच्या हळू आवाजापेक्षा दहा पटींनी मोठ्ठा. तिचं सगळंच उत्स्फूर्त आणि वय ? ऐशीच्या पुढं! तिच्या आधीच्या रास्ता पेठेतल्या खोलीवर जायचो. खिडकीला पडदा लावला होता. त्यावर चौकोनाचौकोनाचं डिझाईन. प्रत्येकात एक गणपती छापलेला, मी म्हटलं, 'कमळे, इथं गणपतींची जनरल बॉडी मीटिंग आहे की काय?' त्यावर असंच हसत सुटणं, थांबवता न येणं, आणि शेवटी आडवं होणं. कधी त्याचं दुसरं टोकही, उमाताईंनी पूर्णचंद्र तेजस्वींच्या 'चिदंबर रहस्य' या कन्नड कादंबरीचा मराठीत अनुवाद केलेला. त्याचं वाचन ऐकायला आम्ही जमलेलो, तसे त्यांचे अनेक अनुवाद आम्ही त्यांच्या तोंडून ऐकलेले. तर शेवटी अनेक अनिष्ट गोष्टींनी जंगल पेटतं, सगळे होरपळून मरतात, फक्त एक तरुण-तरुणी प्रेमिक वाचतात, असं आहे. कमळी आत उठून गेली आणि ओक्साबोक्शी रडत बसली. शांत झाल्यावर म्हणाली, त्यातला शह्मणा माणूस पाटील..... त्याला तेजस्वींनी का मारावं? शहाण्याचा नेहमीच पराभव जिथे तिथे का दाखवतात? ज्ञानाचा नेहमीच अपमान होतो. तो का सहन करायचा आम्ही ?' आता त्यांच्या शोकाकुलतेची जागा संतापाने घेतली होती. १९८ निवडक अंतर्नाद माझ्या पहिल्या भेटीचा अनुभव असाच. त्यावेळी त्या प्रसिद्ध लेखिका कमल देसाई होत्या. सांगलीच्या जुन्या घरातल्या माडीवर मी दबकतच गेलो होतो. त्यांनी माझी त्यावेळची 'माणसं', 'धागे आडवे उभे ही पुस्तकं वाचलेली. त्या आपल्या सगळ्या आदरणीय नेत्यांवरच घसरल्या, 'तुम्ही आम्हांला हे जे जग दाखवता, माणसं दाखवता, ते जग या मान्यवरांनी का नाही दाखवलं? का आम्हांला अंधारात ठेवलं?' मी घाबरत म्हणालो, 'अहो, हे माहीत नव्हतं त्यांना ' त्यावर उसळून म्हणाल्या, 'मग कशाला म्हणायचं यांना नेते?' तेव्हापासून मी त्यांच्या 'गुड बुक्स' मधे आहे, तो आजवर, अरेच्या, मी 'शेवटपर्यंत' असा शब्द का नाही लिहिला? आजवर? कमाल आहे. आणि ती किती साधी असावी ? सुनंदाच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईक मुलीला दाखल करायचं होतं. मी सुनंदाला सांगून ठेवलं होतं. त्या तिथं आल्या, पण वरच्या मजल्यावर सुनंदाला भेटायला नाही गेल्या. तिथल्या माहिती देणाऱ्या टेबलवर जाऊन ऐटीत सांगणं दूरच, की माझी सुनंदाची ओळख वगैरे, सुनंदा घरी जायला खाली येईपर्यंत त्या बसून राहिल्या. सुनंदा नंतर मला म्हणाली, 'अरे, त्या कुठं बसल्या होत्या, माहीत आहे का? तिथं समोर खुर्चीवर नाही बसल्या. संडास आहेत ना, त्याच्या शेजारी जमिनीवर मांडी घालून बसल्या होत्या. ' वा! वा! या 'काळा सूर्य आणि हॅट घालणाऱ्या बाई' या स्त्रीवादी युग निर्माण करणाऱ्या पुस्तकाच्या लेखिका, फक्त चार पुस्तके लिहिली; पण ज्यांनी प्रवाह निर्माण केला, त्या लेखिका, पण आता खेड्यातून आलेल्या पेशंटच्या नातेवाइकांसारख्या खुरमुंडी करून खाली बसलेल्या! नंतर सुनंदाची त्यांची चांगलीच गट्टी जमली. दुपारी घरी जाताना काही वेळा ती कमळीकडे जायची. त्या मस्त जिरेभात करून लोणच्याबरोबर खायच्या आणि नंतर 'पडून' गप्पा मारायच्या, मी विचारायचो, 'पडून का? बसून नाही मारता येत ?'