पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक करपलेला झंझावात राम शेवाळकर 'आपल्या खऱ्याखोट्या दुःखावर जीव टाकणे, जिवाभावाचा सोबती म्हणून त्याला कुरवाळत राहणे, हाच त्याचा हळूहळू स्वभाव बनत गेला. हळूहळू याचे व्यक्तिसीमित किरटे दुःख विश्वव्यापक होत गेले.” कविवर्य सुरेश भट ह्यांना विदर्भ साहित्य संघाचा 'जीवनव्रती' हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्या निमित्ताने... खूप दिवसांनी त्याला मी त्या दिवशी पाहिला. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. रविभवनमध्ये माझ्या अगोदरच तो येऊन बसलेला दिसला. गेल्या गेल्या मी त्याला नमस्कार केला. त्याने उलट नमस्कार करून मान वळवली. मी त्याच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसलो. काय करावे ते न सुचून शेजारच्या मुलीशी तो हास्यविनोद करीत बसला, विनोद नेहमीसारखेच स्फोटक असावेत, कारण त्या मुलीला अशा विनोदांवर चारचौघांत हसण्याचा संकोच वाटत होता. त्याच वेळी हसणे आवरताही येत नव्हते. अलीकडे त्याची भेट होत नाही. कधीतरी रस्त्याने कुणाच्या तरी स्कूटरवर डबलसीट जाताना दिसतो. अलीकडे त्याचे कार्यक्रमही होताना दिसत नाहीत, कविताही फारशा वाचायला मिळत नाहीत. एकूणच सृजनशीलता मंदावलेली दिसते. पूर्वपुण्याईंवरच जगणे चालू असावेसे वाटते. एकेकाळी त्याच्या कवितांनी जो आनंद दिला, एकेकाळच्या त्या कवितांनी आजही जो आनंद मिळतो त्याची किंमत ऐहिक स्वरूपात वसूल करण्यातच आयुष्य व्यतीत होत आहे की काय कोण जाणे! एवढ्यात त्याला जिवाभावाचे कोणी मित्र असावेत, असे दिसत नाही. कवितेने जोडलेले सगळे जिव्हाळे आपल्या वागण्याने तो कापून टाकीत आला. त्यामुळे कवितेवर प्रेम असूनही त्यांच्यापैकी कुणाला त्याच्या जवळ जावेसे वाटत नाही. त्याला जवळ करावेसेही वाटत नाही. सध्या तो विलक्षण एकाकी असावा, असे वाटते. आता त्याच्या भोवती त्याच्या आडदांड वागणुकीला वचकून असणाऱ्या बोटचेप्या व खुशामतखोर लोकांच्या गराड्यात तो असतो. हा गराडाही त्याने प्रयत्नपूर्वक जमवला आहे, पण निरुपायाने टिकवला आहे. चहा पाजणे, चटकदार पदार्थांनी भूक भागवणे वा तंबाखू आणून देणे, यांसारख्या लहानसहान कामांच्या बाबतीत हा गराडा त्याच्या उपयोगी पडतो. हरकामाच्या बाबतीतले त्याचे परावलंबन आपल्याला समजावून घेता येते. त्या त्या प्रासंगिक गरजा भागवणे, हा त्याचा गौण उद्देश असावा. आपल्यापेक्षा अधिक शिकलेले लोक आपल्यासाठी लहानसहान कामे करण्यात कमीपणा मानीत नाहीत, हे इतरांच्या निदर्शनास आणण्यात वाटणारा अभिमान चाखत राहण्याचे त्याला समाधान असते. त्यामुळे तो गर्दीत असूनही एकटाच आहे. १८२ निवडक अंतर्नाद तसा लहानपणापासूनच भरल्या घरातही तो एकाच होता. जन्मजात उणेपणामुळे आलेल्या न्यूनगंडापोटी तो सर्वांवर सूड उगवल्यासारखा वागत आला. त्याच्या विक्षिप्त वागण्यापायी घरच्यांनी त्याला वाळीत टाकले. त्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याला मन:पूत वागण्यासाठी करता आला. पण तो वाहवला नाही. काही वावगे वर्तनही त्याच्याकडून घडले नाही. पण कोणालाही कशासाठीही न जुमानण्याची प्रवृत्ती या स्वातंत्र्यामुळेच बळावत गेली. या काळात घरातील सौहार्दाची उणीव त्याला बाहेरच्या जगातील गराड्यातून वेळोवेळी भरून काढता आली. त्याचा गराडा बराच व्यापक होता. त्यापैकी बरेच जण त्याच्यावर मनापासून प्रेम करीत असत. हे प्रेम त्याच्या काव्यगुणांवर होते. त्याच्या लोकसंग्रहाच्या वृत्तीवर होते. मैत्री टिकवून ठेवण्याच्या मनोधर्मावर होते. त्याच्या कलंदरपणावर होते आणि कुणाची पत्रास न ठेवणाऱ्या उर्मटपणावरही होते. पण तेव्हापासूनच त्याला खरी सोबत फक्त त्याच्या दुःखाचीच होती. यापैकी काही दुःख खरे होते. काही उबवलेलेही असेल, पण आपल्या खऱ्याखोट्या दुःखावर जीव टाकणे, जिवाभावाचा सोबती म्हणून त्याला कुरवाळत राहणे, हाच त्याचा हळूहळू स्वभाव बनत गेला. दे दुःख माझे माझियापाशी असू ते बिचारे एकटे जाईल कोठे? दुःखाला जवळ करण्याच्या या वृत्तीतूनच अतीतातील व विद्यमानातील दुःखितांशी त्याचे नाते जुळले. त्यांचे कण्हणे त्याच्या अंत:करणात प्रतिध्वनित होऊ लागले. त्यांची दुःखे तो स्वतः नव्याने सोसू लागला. हळूहळू याचे व्यक्तिसीमित किरटे दुःख विश्वव्यापक होत गेले. त्यानंतर याला अविचलित सोबत मिळाली ती कवितेची. अविश्वासामुळे इतरांजवळ व्यक्त करता न येणारी सुखदुःखे अत्यंत सलगीने सांगता येण्यासारखे एक विश्वसनीय स्थळ त्याला उपलब्ध झाले. इतरत्र माजलेल्या अनुकरणप्रियतेच्या गर्दीत याच्या कवितेचे वेगळेपण अस्सल अनुभवाच्या बावनकशीपणामुळे