Jump to content

पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेवटी जोशीला राहवलं नाही. आजूबाजूला सेक्रेटरी देशमुख नाही आहे असं बघून तो म्हणाला. "आता बस् झालं. आपण आपलं त्या हरिभटाकडं जाऊन काय म्हणतो ते करून टाकू. उगाच विषाची परीक्षा नको बघायला?"

 सगळ्यांनी माना डोलावल्या. पण तसं कुणाच्याच फारसं मनात नसावं. कारण नियतीनं आपला 'बळी' निवडलाय. आता साठेला वाचवायचं म्हणजे पुन्हा त्याच्या 'जागी' दुसऱ्या कुणाला तरी जावं लागणारंच आणि तो दुसरा कुणी म्हणजे 'मीच' निघालो तर?

 प्रत्येकाच्या मनात तीच शंका होती!

∗∗∗


 हॉस्पिटलमध्ये साठेची 'लोकप्रियता' वाढत चालली होती. "इजा, बिजा' ची कथा एव्हाना षटकर्णी झाली होती. त्यामुळे हॉस्पिटलमधील वर्दळ वाढू लागली होती. सेक्रेटरी देशमुख साठे कुटुंबियांना धीर देत होता. एक दोन दिवस जरा काळजीचे गेले पण तिसऱ्या दिवसापासून ताप पूर्णपणे आटोक्यात आला. देशमुख सारखा हॉस्पिटलच्या फेऱ्या करत होताच. पण सोसायटीच्या लोकांना त्याने व्यवस्थित कामे लावून दिली होती. साठेसाठी चहा कुणी आणायचा, जेवणाचा डबा कुणी आणायचा हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित आखूनच दिला होता. सगळी सोसायटी उभी करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. जमीन खरेदीपासून बिल्डिंग उभी करण्यापर्यंतची सगळी मेहनत त्याचीच होती. बाकीचे सगळे आळशी होते. हा साठे मात्र देशमुखाच्या विश्वासातला होता. त्याचं इंग्रजी-मराठी ड्राफ्टिंग सुरेख होतं. म्हणून देशमुख कॉरस्पॉंडन्सच्या बाबतीत पूर्ण निर्धास्त होता. आपल्या जे मनात आहे ते शब्दात नेमके साठे लिहायचा. त्यामुळे या साठेवर देशमुखाचा जीव होता. ऑफिस सांभाळून रात्री हॉस्पिटलमध्ये झोपायला तो स्वतःच यायचा. नेहमी नकारात्मक बोलून दुसऱ्याला निरूत्साही करणाऱ्या महाजनला त्या मुद्दामच दूर ठेवलं होतं. साठे मनानं भित्रा होता. ह्या "इजा, बिजाच्या" पार्श्वभूमीने तो आणि त्याचे कुटुंबीय हादरलेत याची देशमुखला कल्पना होती.

 पण इतकी काळजी घेऊनही वशा खांदेकरच्या अनपेक्षित आगमनानं निर्माण होणाऱ्या कटकटीची देशमुखलाही कल्पना नव्हती. वशा खांदेकरचं खरं नांव वसंत खांदेपारकर असं होतं; पण लोकांना 'खांदा' देण्यात त्याचा प्रचंड उत्साह बघून त्याचा लौकिक “वशा" 'खांदे कर असा झाला होता. सोसायटीमधले रास्ते, कुलकर्णी गेले तेव्हा सगळी ‘व्यवस्था' त्याचीच होती. एरवी सुस्त असणाऱ्या या वशाचे खांदे कुणी

निखळलेलं मोरपीस / ९९