पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संकटांमुळे जशी इतरांची परीक्षा होते, तशी ती आपल्यासाठीसुद्धा परीक्षाच असते. ही परीक्षा परमेश्वर घेत असतो. परमेश्वराने आपल्या सर्वांना चांगल्या रीतीने हाताळण्यासाठी दिलेले हे जीवन जगताना जर आपल्या वाट्याला फक्त सुख, चैन, ऐषआराम असे सारे मिळाले तर बऱ्याचदा हे जीवन देणाऱ्या परमेश्वराला आपण विसरून जातो. परमेश्वराचे अस्तित्व आपण विसरू नये म्हणून कदाचित त्याने संकटांची निर्मिती केली असावी. जीवनाचा अर्थ चैनीत राहून समजत नसतो. जसे चैन म्हणजे आनंद नव्हे, तसेच कष्ट-परीश्रम म्हणजे दुःख नव्हे. चैन करणारा माणूस हा बहुधा संकुचित विचारांचा असतो; तर कष्ट करणारा माणूस हा विशाल, उदात्त विचारांचा असतो. कारण कष्ट करणारा माणूस संकटांना तोंड देत असतो. त्याला सुखाचा खरा अर्थ समजलेला असतो. आपल्या जीवनात जर संकट आले नाही, तर प्रगतीचे चाक थांबेल, आयुष्यात थंडपणा येईल आणि विचारशक्तीच नष्ट होईल. म्हणून जसे पांढऱ्या कागदाचे अस्तित्व काळ्या ठिपक्याशिवाय लक्षात येत नाही, सावलीचे महत्त्व उन्हाचे चटके बसल्याशिवाय समजत नाही, उजेडाचे महत्त्व गडद अंधाराच्या अनुभवाशिवाय कळत नाही, तसेच सुखाच्या आनंदाच्या क्षणांचे महत्त्व लहान-मोठ्या दुःखदायक, त्रासदायक घटनांशिवाय, संकटांशिवाय कळत नाही. म्हणून वाटते, आयुष्यात संकटे यावीत. आयुष्यात संकटे यावीत । १७