पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-६-

इंग्रजी विद्येचें वज्र


आत्मनिरीक्षण
 इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज पंडित, पाश्चात्त्य मिशनरी, यांच्यावर विष्णुशास्त्री यांनी अत्यंत प्रखर व जहरी टीका केलेली असल्यामुळे हे राज्यकर्ते, त्यांची विद्या, त्यांची संस्कृति, यांत त्यांना कसलाहि ग्राह्यांश दिसत नाही, त्या संस्कृतींत भारताला हितकर व म्हणूनच अनुकरणीय असें त्यांना कांहीच आढळत नाही, असा एक गैरसमज त्यांच्याबद्दल झालेला आढळतो. त्यांत आणखी "आमच्या देशाला कांहीहि झालेलें नाही, त्याची नाडी अगदी साफ आहे, त्याला आलेली विपन्नावस्था चक्रनेमिक्रमाने आलेली आहे" असें दोन-तीन ठिकाणी त्यांनी लिहून ठेविलें असल्यामुळे हा गैरसमज जास्त बळावलेला आहे; पण हा समज अगदी निराधार आहे. 'आमच्या देशाला काहीहि झालेले नाही' ह्या त्यांच्या विधानाचा आपल्याला पुढे विचार करावयाचा आहे. या त्यांच्या विधानाचा अर्थ, भारताच्या प्राचीन इतिहासांत, परंपरेंत, आक्षेपार्ह, दूषणास्पद असें त्यांना कांहीच दिसत नाही, असा होतो. यामुळे विष्णुशास्त्री प्राचीन भारतीय संस्कृतीचे अंध अभिमानी आहेत, अंतर्मुख होऊन ते आत्मपरीक्षण करूं शकत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप येतो. हा आरोप सर्वस्वीं खरा नाही. अंतर्मुख होऊन अनेक वेळा ते कठोरपणें आत्मपरीक्षण करतात, असें दिसतें. तरीहि त्या आक्षेपांत बरेंच तथ्य आहे, हें नाकारता येणार नाही. इंग्रज पंडित, मिशनरी व राज्यकर्ते यांनी या देशाची अस्मिताच नष्ट करण्याचा जो डाव रचलेला त्यांना दिसत होता त्यामुळे त्यांचा भयंकर संताप होत असे; आणि स्वकीयांचा तेजोभंग होऊ द्यावयाचा नाही अशी प्रतिज्ञा करून ते लेखणी उचलीत असत. अशा वेळी अनेक ठिकाणी मिशनरी एका टोकाला ले, तर ते दुसऱ्या टोकाला जात. त्यामुळे त्यांचें आत्मनिरीक्षणाचें सामर्थ्य लुप्त