Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३० । केसरीची त्रिमूर्ति

केला. आपण गेलात तरी चालेल, आम्ही हीं सूत्रे हातीं घेतों, असें म्हणण्याची धमक कोणी दाखविली नाही. रानडे, तेलंग यांसारखे सरकारी अधिकारी, त्यांनी राष्ट्रसभा वर्ज्यच केली. आणि इतर जे पुढारी होते ते सरकारी नोकर नसले तरी सरकारी नाराजी ओढवून घेण्याची हिंमत त्यांना नव्हती. काँग्रेसच्या पहिल्या तीन अधिवेशनांपर्यंत सरकार तिचें कौतुक करीत होतें; पण अलाहाबादच्या चौथ्या अधिवेशनानंतर सर्व चक्र उलटलें, ठिकठिकाणांहून येणाऱ्या प्रतिनिधींना प्रतिबंध करण्याचें धोरण सरकारने स्वीकारलें. राष्ट्रसभेच्या कार्यकर्त्यांकडून चांगल्या वर्तनाबद्दल हमी म्हणून जामीन मागण्यांत येऊं लागले, आणि राष्ट्रसभेला हजर राहणें हें दुर्वर्तन ठरविण्यांत येऊं लागलें. पंजाबमध्ये त्या वर्षी पांच-सहा हजार लोकांकडून जामीन घेण्यांत आले होते. तेव्हा अशा आगींत, इंग्रज सरकार हेंच आपले नाते, उद्धारकर्ते, सद्गुरु असे मानणारे, त्यांचें राज्य म्हणजे परमेश्वरी कृपा समजणारे, आपले संरक्षण केलें तर तेच करतील अशी श्रद्धा बाळगणारे नेते, कसें पाऊल टाकणार ?
ह्यूमसाहेबांचे पत्रक
 पण हें एवढ्यांवर भागले नाही. १८९२ सालीं हह्यूमसाहेबांनी यापुढे लोकांत चळवळ करण्याची कां व कशी आवश्यकता आहे, यासंबंधी चर्चा करणारें एक गुप्त परिपत्रक काढलें व तें राष्ट्रसभेच्या सभासदांकडे पाठविलें. आणि तें ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना पोचविण्याची विनंती त्यांनी केली. पण तेवढीहि हिमत काँग्रेस- कमिट्यांची होईना. या परिपत्रकाची भाषा कडक होती. "देशांत दरिद्रयामुळे लोक पिचून निघाले आहेत, त्यामुळे तुम्ही निष्काळजी राहिलांत तर त्यांतूनच भडका उडण्याचा संभव आहे, तेव्हा काँग्रेसने यापुढे लोकांत चळवळ केली पाहिजे", असें ह्यूमसाहेबांनी प्रतिपादन केलें होतें. असलें परिपत्रक प्रसिद्ध करण्यास तर राहोच, पण सभासदांना वांटण्यास सुद्धा राष्ट्रसभेच्या चालकांनी नकार दिला; आणि कांही लोक तर "ह्यूमसाहेब अतिशयोक्ति करीत आहेत, ते पराचा कावळा करीत आहेत, वार्धक्यामुळे त्यांना वेड लागल्यासारखें झालें आहे," असे म्हणूं लागले. ('आधुनिक भारत' प्रकरण ६ वें).
 मग या पत्रकाचें काय झाले ? आगरकर आणि टिळक यांनी तें वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केलें आणि ह्यूमसाहेबांविषयी तसे निरर्गल प्रलाप काढणाऱ्या लोकांवर कडक टीका केली. आगरकरांनी त्याआधीच लिहून टाकलें होतें की, "राष्ट्रसभा इंग्लंडमध्ये भरवावी असें ह्यूमसाहेबांनी म्हटले याचें कारण हेंच की, आमच्या कर्तृत्वाविषयी, देशाभिमानाविषयी व उद्योगपरायणतेविषयी ते अत्यंत निराश झाले होते." हें लिहून त्यांनी पुढे म्हटलें होतें, "अशा स्थितीत आम्हीं हातपाय हलविले नाहीत तर उत्तरोत्तर आमची स्थिति शोचनीय होत जाऊन अखेरीस पर्शियन, ग्रीक व रोमन लोकांप्रमाणे भारतीयांस नामशेष व्हावे लागेल." आणि ह्यूमसाहेबांनी काढलेल्या परिपत्रकाची राष्ट्रसभेच्या नेत्यांनी वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा संभावना केली