पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६ । केसरीची त्रिमूर्ति

त्याच थोर पुरुषाची, पन्नास वर्षांनंतरहि ब्रिटिश हेच हिंदुस्थानचें कल्याण करतील, ही श्रद्धा कायम होती.
 या पार्श्वभूमीवरून विष्णुशास्त्री यांच्या निबंधमालेचा विचार आपण केला पाहिजे. पण त्याआधी वर उल्लेखिलेल्या इतर थोर नेत्यांच्या कार्याचा विचार करूं.
ईश्वरी वरदान
 न्या. मू. रानडे हे गेल्या शतकांतील नेत्यांचे अग्रणी होत, हें आता सर्वमान्य झालें आहे. लोकमान्यांनी त्यांच्या मृत्यंनूतर त्यांच्या कार्याचें मूल्यमापन केलें तें अगदी यथार्थ आहे. "थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला त्यांनीच प्रथम ऊब दिली; आणि त्याला सजीव करण्याचें दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जिवापाड मेहनत केली. आमच्या मतें हेंच त्यांच्या थोरवीचें व असामान्य मोठेपणाचें मुख्य चिन्ह होय," असें टिळकांनी म्हटलें आहे व 'सर्वज्ञः स हि माधवः' या वचनाने विजयनगरच्या माधवाचार्यांशी त्यांची तुलना करून त्यांचा गौरव केला आहे. हा गौरव यथायोग्य म्हणावा इतकें न्यायमूर्तीचें कार्य असामान्य होतें यांत शंकाच नाही; पण ब्रिटिश राज्यकर्त्यांविषयी बोलतांना मात्र माधवराव दादाभाईंच्या इतकी सुद्धा टीका करण्यास तयार नसत. इंग्रजी राज्य म्हणजे ईश्वरी वरदानच होय, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. हिंदुस्थानांतून इंग्लंडला जाणारी प्रत्येक पै ही लूटच आहे, असें दादाभाई म्हणत. माधवरावांना हें मान्य नव्हतें. ब्रिटिश लोक भारताला भांडवल पुरवितात व तें हलक्या व्याजाने देतात, यासाठी हिंदी जनतेने त्यांचे आभार मानले पाहिजेत, असे ते म्हणत. दादाभाई- पक्षाचें म्हणणे असे की, हिंदुस्थानची लूट करून ब्रिटिशांनी हा पैसा मिळविलेला असतो व तोच भांडवल म्हणून ते आम्हांला परत देतात, यांत उपकार कसले ?
 ब्रिटिश भांडवलदार व ब्रिटिश राज्यकर्ते यांची न्यायमूर्ति जी तरफदारी करीत तिची राष्ट्रीय पक्षांतल्या लोकांना अत्यंत चीड येई. ती इतकी की, ज्या टिळकांनी पुढे त्यांचा मोठा गौरव केला त्यांनीच या वेळीं "परदेशी भांडवलाचे गोडवे गाणारे भाधवराव देशद्रोही आहेत" अशी त्यांच्यावर ध्वन्यार्थाने टीका केली. ('रानडे चरित्र'- फाटक, पृ. ४६९) आगरकरांनीहि न्यायमूर्तीच्यावर याच प्रकारे, पण सौम्य भाषेंत टीका केली आहे; आणि पुढे म्हटलें आहे की, "इंग्लिश लोकांच्या मनोधर्मांत एकाएकी प्रचंड क्रान्ति झाल्याशिवाय त्यांच्या अंतःकरणांत आमच्या व्यापारवृद्धीविषयी कळकळ उत्पन्न होईल, अशी आशा करणें व्यर्थ आहे." ('आधुनिक भारत', पृ. १२८).
 येथेच मूळ मेख आहे. रानडे, लोकहितवादी, तेलंग यांची अशी दृढ श्रद्धा होती की, ब्रिटिश राज्यकर्ते भारताचे हितच चिंतितात. त्यांच्या मनांत भारताच्या उद्धाराची तळमळ आहे. त्यांची सत्ता भारताला कल्याणकारक आहे. म्हणून त्यांच्या आश्रयानेच आपण सर्व उद्योग केले पाहिजेत. उलट या राज्यामुळे भारताची