Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गणवेश हवा जगातले संघटनाशास्त्रज्ञ एक निष्कर्ष अत्यंत आवर्जून सांगतात. ते म्हणतात की, ज्या संघटनांना गणवेश आहे अशाच संघटना वर्षानुवर्षे आणि बराच काळ टिकतात, प्रभावशाली राहतात. त्यामुळे कार्यसंस्कृतीत गणवेशाचं महत्त्व वादातीत आहे. गणवेशामुळे कामाला एक गांभीर्य बहाल होतं. मी माझं काम अत्यंत निष्ठेनं करत आहे अशी बांधिलकीही त्यातून प्रकट होते. गणवेश घालणाऱ्यालाही तो घातल्यावर जबाबदारीची जाणीव होते, तिचं किंवा त्याचं मन एकाग्र व्हायला मदत होते. एकापेक्षा अधिक लोक काम करत असतील तर एकीची, संघभावनेची जाणीवही निर्माण होते. डॉक्टर्स, वकील, पोलिस, लष्कर, अग्निशमन विभाग, चर्चसारख्या धर्मसंस्था या सगळ्या त्यांच्या त्यांच्या गणवेशानं ओळखल्या जातात, समजल्या जातात. जगप्रसिद्ध मॅकडोनाल्डसारख्या दुकानांमध्ये गणवेशाचा आग्रह आहे. जी गोष्ट मॅकडोनाल्डची, तीच पिझ्झा हट किंवा केंटुकी फ्राइड चिकनची. आपल्या कामाला शिस्तीचं गांभीर्याचं आणि बांधिलकीचं परिमाण द्यायचं असेल, तर गणवेश हवा. नसेल तर तो शोधायला हवा. ९३८ कार्यसंस्कृती