Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जॉन्सनचं शहाणपण एकटा माणूस चमत्कार करू शकतो आणि अद्वितीय अशी कामगिरी करू शकतो हे जवळजवळ अशक्य आहे. प्रत्येक चांगलं काम करू इच्छिणाऱ्याला उत्तम टीम असण्याची नितांत गरज आहे. एकटा सचिन तेंडुलकर फक्त एकट्याच्या बळावर फारच थोड्या वेळा संपूर्ण मॅच फिरवू शकतो. एखादं हॉस्पिटल फक्त एका सर्जनच्या हिमतीवर आणि कौशल्यावर चालत नाही. सर्जनला नर्सेसची, सहकारी डॉक्टरांची अप्रतिम साथ लागते. उत्तम सिनेमा दिग्दर्शकाला चांगला संकलक लागतो. संगीत दिग्दर्शक उत्तम लागतो. सर्व टीमच उत्तम लागते. छान काम करायला चांगली टीम लागतेच लागते. अशी टीम अर्थातच आपसूक मिळत नाही. ती बांधावी लागते. घडवावी लागते. प्रचंड मेहनतीचं, अफाट संयमाचं आणि सजग धोरणीपणाचं ते फळ असतं. लिंडन जॉन्सननं एके ठिकाणी म्हटलं आहे, "आपण सर्व जण मिळून सोडवू शकणार नाही असे कुठलेच प्रश्न नाहीत आणि असे खूपच कमी प्रश्न आहेत, की जे आपण एकट्यानं सोडवू शकू." जॉन्सननं फार महत्त्वाची शिकवण आपल्याला दिली आहे. उत्तम टीमवर्कशिवाय उत्तम कार्यसंस्कृती नाही ही गोष्ट खरीच आहे. ३५ कार्यसंस्कृती -