पान:कार्यसंस्कृती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणसं घडवण्यासाठी आपल्याकडे सध्या पुरस्कारांची आतषबाजी चालू आहे. वर्तमानपत्रातून रोज दोन-तीन बातम्या येत असतात, एक दोन फोटो असतात. सगळीकडे पुरस्कारांचं पेव फुटलं आहे, असंच वाटायला लागलं आहे. पुरस्कार मिळतात असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्यांना त्या त्या क्षेत्रातल्या दिग्गजांना, नेत्यांना आणि मोठ्या माणसांना खूप संस्था, वेगवेगळी प्रतिष्ठानं असे पुरस्कार नित्यनेमानं देत असतात, त्यासाठी मोठमोठे समारंभ घडवत असतात. मात्र, यातल्या किती संस्था माणसांना 'मोठं' करण्याची कामं करतात? आपण मोठ्यांचा सत्कार आवर्जून करतो; परंतु आपण किती वेळ आणि शक्ती नवं टॅलंट शोधण्यात आणि ते जोपासण्यात, घडवण्यात खर्च करत असतो? नेतृत्व आपोआप उमलत नाही, त्याला खतपाणी घालायला हवं असतं, वाढायला आणि फुलायला योग्य वातावरण असणं आवश्यक असतं. आपल्या कंपनीत, ऑफिसात किंवा कामाच्या ठिकाणी माणसं घडवण्याचे अव्याहत प्रयत्न होत राहण्याची गरज आहे. पुरस्कारांच्या आतषबाजीपेक्षा नेतृत्ववाढीला खतपाणी हवं. . २३ । कार्यसंस्कृती