Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सहकाऱ्यांच्या सवयी आपण लोकांबरोबर एकत्र काम करतो, तेव्हा त्यांच्या काही साध्यासुध्या सवयींचा आपल्याला विलक्षण त्रास होतो. माझ्या शेजारच्या टेबलवर नायर बसतो. त्याच्या दोन गोष्टींचा मला वैताग येतो. एक म्हणजे तो विलक्षण उग्र असा सेंट लावतो, ज्यानं माझं डोकंच उठतं आणि दुसरं म्हणजे हिशेब टॅली झाला की मोठमोठ्यानं शिटी वाजवत टेबलावरची कागदपत्रं आणि फायली तो अशा आपटतो की वाटतं सरळ उठून त्याच्या कानाखाली वाजवावी. मात्र तसं मी कधी केलं नाही आणि कदाचित करणारही नाही. तरीसुद्धा मला केव्हा तरी त्याला हे सांगायचं आहे, त्याला वाईट वाटणार नाही अशा पद्धतीनं त्याच्या गळी मला माझं म्हणणं, माझी कैफियत मांडायची आहे. तसं माझं आणि नायरचं मुळीच भांडण नाही. तो माझा एक चांगला सहकारी आहे. त्याच्या कामात तो निष्णात आहे. मी असं ठरवलं आहे की, दर महिन्याच्या शेवटी आम्ही जेव्हा हिशेब लावायला बसतो, तेव्हा एका मोकळ्या, हलक्या क्षणी गमतीत, पण त्याला राग येणार नाही अशा भाषेत त्याला त्याच्या या सवयींविषयी हळूच सांगणार आहे. बघू या काय होतं ते. २१ । कार्यसंस्कृती