Jump to content

पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वगळून, ती रिती करून त्यात नवा भावार्थ, नवी अनुभूती ललित साहित्यिकाला भरावयाची असते. ही नवी ( भावार्थाने युक्त ) निर्मिती करण्याकडे वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, रणजित देसाई यांचा कल आहे. पण गो. नी. दांडेकरांचे वेगळेपण हे आहे की ते कर्णाचीही पुराणकथा महाभारतातील तपशिलासह यथाक्रम घटनाप्रसंगासह देतात. संक्षेपविस्ताराचे मोरोपंती धोरण स्वीकारतात. त्यामुळे कलाकृतीला बाधक असा अनावश्यक रूक्ष तपशील येऊ लागतो. एखाद्या पुराणिकाच्या निवेदनशैलीची येथे जाणीव होते. त्यामुळे निर्माण होऊ पाहणारे महाभारताचे हे नवे रूप एकात्म परिणाम साधण्यास तोकडे ठरते. 'मग काही काळ गोंधळ झाला, तो सांगता पुरवत नाही' (पांन. ११० ) 'पळस फुलांनी शोभावा तसे राजे रक्तांनी नाहाले', जरासंध एक कौतुकाचा भाग म्हणून मालिनी नगरी देतो, चित्रांगदकन्यास्वयंवर प्रसंग इत्यादी स्थळांचा या संदर्भात उदाहरण म्हणून निर्देश करता येतो. कर्णाचा चांगुलपणा :- गो. नी. दांडेकरांचा कर्ण महत्त्वाकांक्षी आहे. सूतकन्यांपेक्षा द्रौपदीसारखी स्त्री त्याला हवी होती. गो. नी. दांडेकर अज्ञात वेदना आणि न्यूनगंडाचे दु:ख कर्णाच्या मनामध्ये सलत असल्याचे सांगतात. 'आपणाभोवती जो सूत परिवार वावरत असतो त्यातले आपण नव्हे.' काही तरी वेगळे, उंच आहोत, केवळ सौजन्यामुळेच तो हे स्पष्टपणे बोलू शकत नव्हता. पण बदकामध्ये वावरणाऱ्या राजहंस पक्ष्याप्रमाणे त्याची गलबल होत होती.' (पृ. ११३) रणजित देसाईंच्या 'राधेय' मधील 'कर्ण' सूतकुलाचा सदोदित अभिमान बाळगणारा आहे. तर दांडेकरांचा कर्ण त्यातून बाहेर पडू इच्छितो. 'राधेय' मधील कर्णाप्रमाणे केवळ दुर्योधनाच्या आग्रहासाठी, प्रिय वृषालीची संमती घेऊन द्रौपदी स्वयंवराला गो. नी. दांडेकरांचा कर्ण जात नाही तर दांडेकरांचा कर्ण द्रौपदीच्या रूपगुणांनी संमोहित होऊन स्वयंवरास जातो, पण तो सच्छीलही आहे. उदाहरणार्थ 'म्हणजे पांचाली न मिळाली, तर निदान सुवास तरी....' अशा दुःशासनाच्या लोचट उद्गारानंतर कर्ण म्हणतो....' अपरिणीतेविषयी असे बोलू नये दुःशासना . ' (पृ. ११४) कर्णाच्या सच्छील मनाचा हा नवा आकार दांडेकर फार काळ टिकवीत नाहीत. दुर्वासांच्या या मानसपुत्राची 'मी सूत कुळीची स्नुषा होऊ इच्छीत नाही.' (पृ. १२२ ) असे म्हणून द्रौपदीने केलेली अवहेलना कर्णाला असह्य होते. याचा सूड द्यूताच्या कपटकारस्थानाच्यावेळी आणि द्रौपदीला सभेत आणण्याची वेळी तो घेतो. 'कुलटा!' जे शरीर पाचांनी पाहिले ते सर्वांना पाहू दे' कर्णाच्या या उद्गाराचे समर्थन करण्याचा प्रयत्न दांडेकर करतात. द्रौपदीने स्वयंवरप्रसंगी अपमान केला ..... म्हणूनच कर्णाच्या मुखी द्यूतंसभेत द्रौपदीला उद्देशून कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ १५