Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भान

अज्ञानात सुख असतं
आणि आंधळ्या माणसाच्या चेहऱ्यावरचा
चौकस भाबडेपणाही.
हा भाबडेपणाही चौकशी करत असतो
अज्ञानाची करंगळी घट्ट पकडूनच.

...मग कधीतरी त्याला
न कळावं ते अचानक कळून जातं
आंधळ्याच्या खाचांत क्षणार्धात बुबळं फुटतात. पण
त्यानं आजवर कुरवाळलेली, उरात खोल जपलेली
प्रत्येक गोष्ट अविश्वसनीय, किळसवाणी, हिडीस
असल्याचं त्यांच्या लक्षात येतं...
आंधळेपणी या प्रत्येक गोष्टीवर त्यानं जीव तोडून
प्रेम केलेलं असतं...

मग त्याच्या डोळ्यांच्या खाचांत
कल्पना आणि वास्तवातली भेग रुंदावत जाते
घुसमटणारा काळोख गिळायला सरसावतो
गर्भगळित गात्रांसह तो सारेच पुन्हा स्वीकारतो
सर्वज्ञानी योग्याच्या चेहऱ्यावरचं म्लान आणि प्रसन्न हसू
त्याच्या चेहऱ्यावर खेळत राहतं
डोळसपणे पाहिलेल्या किळसवाण्या अंधाराला
सोबत घेऊन त्याची प्रत्येक पेशी मग
आत्मविश्वासाने आणि शांतपणे परिवर्तनाच्या
दिशेने कूच करत असल्याचं भान
त्याच्या डोळ्यात आपसूक उगवलेलं.


९० / कबुतरखाना