पान:कबुतरखाना.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोऽहम् ?

'कोऽहम् ?'
प्रश्न अचानक
उल्का पड़ावी चांदणभरल्या आभाळातून... तसा

पुन्हा काही घडलंच नसल्यासारख्या
सगळ्याच चांदण्या चमचमत राहतात
त्यांच्या चमचमण्यालाही तसा नसतोच अर्थ बऱ्याचदा
आमचं जगणं... नेहमीचंच.... तसंच त्यांचं चमचमणं !
त्यांना कुठून तरी गुरुत्वाकर्षण
आमचीही तशीच वणवण

'कोऽहम् ?'
होत राहतो उल्कापात... अधूनमधून
....एखादा संपवतो आपली इहयात्रा...
संदर्भ टाकून गुरुत्वाकर्षण आपोआपच गळून पडतं चहूबाजूला
भक्क पिवळ्या गप्पांच्या कोंडाळ्यात
चितेवर कुणी जळत जातं
आणि चाळवत जातात भलभलत्या 'भुका' ज्याच्या त्याच्या
त्याचवेळी पुन्हा एकदा अचानकच, ज्याच्या त्याच्या अंधारावर
एक ओरखडा उमटत विझत जातो... 'कोऽहम ?'

हळूहळू वाढत जातं वय
वाढत जातो गोतावळा... टकलाचा परिघ वाढवत
तसा अंधारही वाढत जातो ज्याचा त्याचा ...
अंधारात टिमटिमणाऱ्या प्रश्नांच्या चांदण टिकल्याही
...कधीतरी ...एकांडं चालताना
त्यातल्या 'कोऽहम् ?' च्या टिकल्याच पटकन् पडत असतात
म्हणूनच, ‘उल्का पडताना पाहिल्याचं', सांगायचं नसावं कुणाला.

६० / कबुतरखाना