पान:कबुतरखाना.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उंच इमारतीच्या टॉवरवर
मी कधीचा डोळे लावून बसलोय
तेखाली येईल म्हणून...
मग मी त्याला बंद करीन माझ्या कबुतरखान्यातल्या
खास गुलाबी कप्प्यात.
आणखी एक कबुतर आहे गिर्रेबाज
सारखं आभाळातच झेपावायचं
कालच मी त्याचे पंख छाटले
त्याला जमिनीवर चालायचा सराव व्हावा म्हणून

आणखीही एक आहे... पण जाऊ द्या...
....काय आहे, अशी कितीतरी कबुतरं आहेत
माझ्या कबुतरखान्यात... शौकच !
ही कबुतरं कधी कधी भांडतातही खूप एकमेकांशी
एकमेकांशी लगट करत कधी कधी दिवसेंदिवस
एकमेकांच्या मागे मागेही फिरत असतात...

कधी कधी ही सगळीच कबुतरं मी आकाशात उडवतो
उंच उंच जातात बेटी...
ती अशी उंच भरारत असतात ना, तेव्हा
खूप हलकं हलकं वाटतं...
मी नुसताच त्यांच्याकडे बघत असतो परकेपणानं
सगळं भान विसरून...

...पण नंतर बेटी हळूच एक एक उतरतात
अलगद फडफडत... पिसं उचकवत
मग पुन्हा भरतो कबुतरखाना
मनाच्या प्रत्येक कप्प्यात रात्रंदिन आम्हा
गुटुर घूं ऽऽऽ गुटुर घूं ऽऽऽ गुटुर घूं ऽऽऽ !

५४ / कबुतरखाना