पान:कबुतरखाना.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हत्येपूर्वी

तुमच्या कु-हाडी परजणाऱ्या आवाजलहरींचा संदेश
कधीचाच मुरलाय माझ्या पाळामुळात

आता फार तटस्थतेनं ऐकतोय मी
माझ्या मृत्युगीतापूर्वीचं शोकसंगीत...

कायदे करणाऱ्या समूहभिरू उध्दट प्राण्यांनो,
तुमच्यासाठी थंडपणे ठोस कायदेशीर इलाज करणारा
तुमचा बाप... या डोंगरदऱ्यातून, नदी-नाले, अफाट
जलाशये आणि आसमंतातून नजर लावून बसलाय
...तुम्ही करू पाहत असलेल्या माझ्या निर्घृण हत्येकडे,
एखाद्या चिरंजीवी साक्षीदारासारखा
याची तुम्हाला तसूभरही जाण नसावी
याची मला राहून राहून खंत वाटते.

माझ्या हत्येनंतर तुम्हाला चुकवावे लागतील
सगळेच हिशेब... त्याच्या न्यायासनासमोर
...तुम्हाला सुनावल्या जातील सामूहिक शिक्षा
प्रदेशाप्रदेशानुरूप...
प्रलयंकारी पुरात बुडून मरण्याच्या,
एअर पोल्युशनच्या गॅसचेंबरमध्ये मरेपर्यंत घुसमटण्याच्या
भयाण वाळवंटात अथवा अवर्षणात
अन्नपाण्यावाचून टाचा घासून मरण्याच्या

पहा, पुन्हा एकदा विचार करा ...
तुम्ही परवाच तोडलेल्या माझ्या एका फांदीवर
नव्यानेच कोवळा अंकुर फुटलाय
म्हणून म्हणतोय...
पहा, पुन्हा एकदा विचार करा.

कबुतरखाना / ३७