Jump to content

पान:कबुतरखाना.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पद्मगंधा प्रकाशन 'कबुतरखाना' हा महेश कराडकर यांच्या सकस कवितांचा ि संग्रह आहे. या संग्रहाचे शीर्षक जात, धर्म, लिंगभाव आणि तथाकथित सामाजिक जाणीव या व्यवस्थेच्या नजरकैदेत कप्पेबंद झाल्याचे सूचन करते. ही कविता मैत्री, स्नेहभाव, सग्यासोयऱ्यांचे सुखदुःख अधोरेखित करताना कुठेही हळवी अथवा भावविवश होत नाही. उलट या प्रकारच्या सर्वच मूल्यभावांना भिडून रोकडे प्रश्न उपस्थित करते. खोटेपणा किती दाखवावा, किती मिरवावा याची काही सीमा राहिलेली नाही. उलट अशाच प्रवृत्तींना बेरकीपणाने उचलून धरले जाते आहे, याची जोरकस खंत कवीला आहे. म्हणूनच कवी 'तुकोबाच्या धोतराला ग्लोबल चेन' लावून देशीपणा मिरवणाऱ्या दांभिकांची हजेरी घेतो, परंतु यातूनच कवीला वास्तविकता तपासून पाहण्याची निकड वाटते. सगळीच मूल्ये उलटीसुलटी गुंडाळून खोटा मोठेपणा मिरवणाऱ्या संधीसाधूंच्या गर्दीत कवीला अजिबात रस नाही. यामध्येच कवीची स्वत:ची स्वतंत्र, स्वच्छंद आणि ठाम भूमिका असल्याचे कविता वाचताना आढळून येईल. 'स्वीस बँकवाले चित्रगुप्ताच्या बापालाही बँक अकौंट दाखवणार नाहीत' हे नागडे सत्य कविता वाचताना स्वीकारावे लागते. आर्थिक उदारीकरण, भ्रष्टाचार, फसवणूक, हिंसा याने ग्रस्त झालेल्या समाजाची लाज झाकायला गांधीजींच्या 'माकडांचे' सहा हातही पुरेसे पडणार नाहीत, असे कवी ठामपणे मांडतो. एका अस्वस्थ मनाने उद्याच्या स्वस्थ, सुरक्षित, निर्भय अवकाशात झेप घेण्यासाठी 'खुला केलेला हा 'कबुतरखाना' खरोखरीच चिंतनीय आहे. - प्रा. डॉ. मोहन पाटील