Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शरीराचा प्रतिसाद पूर्ण नकारात्मकच येईल. आणि आश्चर्य असे की संमोहित अवस्थेत मनाने ठरवले तेच घडले. चाचणीला प्रतिसाद मिळाला तो नकारात्मक. याचा अर्थच असा की विज्ञानाने सिद्ध केलेल्या व मान्य संकल्पनांपलीकडेही काही विश्व आहे, हे मनःशक्तीचे. ही शक्ती योग्य तपश्चर्येद्वारा कोणीही मिळवू शकेल. पण तेवढी दीर्घ तपः साधना केली पाहिजे. पातंजल योगसूत्रांत हेच सिद्धीविषयी लिहिलेले आहे.
  मेरीच्या कथेचा अर्थ काय व कसा लावावयाचा? विज्ञान किंवा वैद्यकशास्त्राचा प्रस्थापित सिद्धान्त असा की यात आश्चर्य करण्याचे काहीही कारण नाही. हे सर्व कार्य शरीरांतर्गत रचनेमुळेच होत असते. 'न्यूरोट्रॅन्समीटर्स' (Neurotransmitters), 'रिसेप्टर साईटस्' (Receptor Sites ), न्यूरॉन्स (Neurons) व सिनॅप्सेस (Synapses) यांच्या कार्यामुळे हे होत असते. विचारामुळे त्याला अनुसरून निरनिराळ्या हार्मोन्सची निर्मिती होते व ते रक्तात सोडले जातात, किंवा इलेक्ट्रिकल संदेश निर्माण होऊन मेंदूवाटे नसाद्वारा शरीरात सर्वत्र हे संदेश पोहोचवले जातात. आणि ज्याला आपण प्रतिक्षिप्तक्रिया म्हणतो त्यासाठी तर विचारांचीही जरुरी नसते. तेव्हा विकारमुक्ती करणाऱ्या शक्ती असे काही नसतेच. मेंदूची रासायनिक शक्ती व मनाच्या कार्यकक्षा यांचे दृढ नाते आहे, हे विज्ञानाने सिद्ध केलेलेच आहे. काही कारणांनी जर मेंदूवरच आघात झाला तर विचारशक्तीच नष्ट होऊन त्या रुग्णांची मानसिक अवस्थाही बदलत असते. हे जर शंभर टक्के सत्य असेल तर मेरी जे करू शकत होती ते इतरांना म्हणजे सर्वांनाच का करता येऊ नये? तेव्हा हे वैज्ञानिक ज्ञान अपुरे आहे व त्यापलीकडे काही आहे हे आपणास मान्य करावेच लागते. मेरी कित्येक वर्षे योगसाधना करत होती. ध्यानात गेल्यावर तिचा सर्व इंद्रियांवर पूर्ण ताबा असे. प्रत्याहाराशिवाय हे शक्य नाही. जो कोणी मेरीप्रमाणे योगसाधना करेल त्यालाच ह्या शक्ती प्राप्त होतील हा निष्कर्ष आहे. प्रदीर्घ साधनेतून मेरी अक्षरशः काही मिनिटांत पूर्ण ध्यानात जाऊ शकत असे.

  विज्ञानाने मनाचे स्थान मेंदूमध्ये दिले आहे. मेंदूच्या प्रत्येक अणुरेणूला भौतिक स्थान आहे व ते सहज दाखवता येते. मनाला असे भौतिक रूपच नसल्यामुळे ते मेंदूमध्ये आहे हे सिद्ध करणे अशक्य आहे. ज्यांना आपण षड्रिपू म्हणतो ते काम, क्रोध, लोभ यांना तसे भौतिक स्थान नाही, पण त्यांचा शरीरावर दुष्परिणाम होतो

९२