पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चेतना आहे, मनही चेतना आहे, तर अन्न जसे त्रिविध आहे तशी आपल्या अंतरीची चेतनाही त्रिविध आहे असे म्हणण्यास काय हरकत आहे? यामुळेच या तिन्ही तत्त्वांचा एकत्र विचार केला तर आपणा सामान्य माणसांचा गोंधळ संपतो. आपल्या विषयाशी संबंधित आपली गरज एवढीच.
 ,आधुनिक विज्ञान मात्र देहाचे जसे वेगवेगळे भाग यंत्रवत समजून त्याचा विशेष विचार करते, तसेच मानसशास्त्राचा व्यावहारिक स्तरावर वेगळा विचार केला जातो. पण देह आणि मन यांचा एकत्रित व सर्वांगीण विचार कधीच होत नाही. तात्त्विक दृष्ट्या असे व्हावयास पाहिजे हे सर्वजण कबूल करतात. पण विचार व आचार यांत खूप अंतर पडते. मग जरुरी भासू लागते अध्यात्माच्या साहाय्याची. संकट आल्यावरच ईश्वराची आठवण येते तशीच जरुरी मनुष्य गंभीर विकाराने ग्रस्त झाला किंवा संध्याछाया हृदयाला भिववू लागल्यावर त्याला भासते. गीता, ज्ञानेश्वरी, पातंजल योगसूत्रे, देवदर्शन यांची त्या वेळी आठवण झाली तरी ती मनाने एकरूप होऊन होतेच असे नाही. परमेश्वराला आपण निराकार, निर्गुण व सर्वत्र सामावून उरलेला आहे असे म्हणतो. हे निर्गुण रूप जाणणे कठीण असल्यामुळे आपण त्याला सोयीसाठी सगुण रूप देतो. तसेच मन, चित्त, आत्मा ही एकाच मूलभूत तत्त्वाची रूपे असतील तर मनच ते सर्व आहे असे समजून उन्नत मन- प्राप्तीसाठी कष्ट घेणे अटळ होते. परमेश्वराची आपण उपासना करतो. या उपासनेची विविध रूपे आहेत. उन्नत मनप्राप्तीसाठी घ्यावयाचे कष्ट, सतत त्याची ओढ म्हणजे सुद्धा उपासनाच होईल. उपनिषदांतील आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानातच, मनोविज्ञान हे खऱ्या अर्थाने समाविष्ट आहे. तत्त्ववेत्ते व विज्ञानवादी यांत हा विचारसरणीचा फरक आहे. अर्थात हे जाणून घेतले म्हणजे विज्ञानाच्या सीमारेषा कळतात व अध्यात्माला सीमा नाहीत हीही गोष्ट समजते
मन - तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन :  भारतीय तत्त्वज्ञानात जी जी दर्शने आली आहेत त्या प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. वेदांची (आर्ष) संस्कृत, बौद्ध, जैन वगैरेंच्या त्या जुन्या भाषा या कालानुरूप होत्या. पण आपण या सर्वांचा नीट विचार केला तर यात प्रामुख्याने उन्नत मनाचा विचार आहे, असे म्हणावयास हरकत नाही. त्यातील तत्त्वांचे आजच्या काळाशी

८१