पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जी गुन्हेगारी चालू आहे, त्यातील अनेक गुन्हेगार अत्यंत गरिबीतून आलेले असून जे जीवन आहे ते अत्यंत चैनीत घालवणे हाच त्यांचा अंतिम उद्देश असतो. गुन्हेगार-सुद्धा सुधारतात हे किरण बेदीने तिहार तुरुंगात निरनिराळे प्रयोग करून सिद्ध केले आहे. तिने लिहिलेले ‘आय् डेअर' हे पुस्तक वाचनीय व चिंतनीय आहे.
अवधान व प्राणवायूचा निरोध :
 अवधान याचा अर्थ एकाग्रता (Concentration). आपले मन एखाद्या गोष्टीत गुंतले म्हणजे आपली श्वासोच्छ्वासाची क्रिया बंद पडते (म्हणजे नकळत रोखून धरली जाते). त्या वेळी आपण श्वास आत घेत नाही किंवा बाहेरही सोडत नाही (छां. १.३.३). काठ्या एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करत असतो तेव्हा, धनुष्य वाकवून दोरी लावत असताना अशी श्रमाची कामे करताना आपण श्वास- निरोध करतो (छां. १.३.५). म्हणजे अशा प्रसंगी आपले सर्व लक्ष त्या कार्यावर केंद्रित केलेले असते त्या क्षणी आपण श्वास कोंडून ठेवतो. याला कौषीतकी उपनिषदात 'आंतर अग्निहोत्र' असे म्हटलेले आहे. याचा शोध प्रातर्दन ऋषीने लावल्यामुळे त्यास 'प्रातर्दन अग्निहोत्र' असेही म्हटले आहे. बोलताना आपण श्वासोच्छ्वास करीत नाही व तो करताना आपल्याला बोलता येत नाही म्हणजे त्या वेळी मानव वाचेचे प्राणानीत हवन करत असतो. ही दोन हवने अनंत व अमर असून ती प्रत्येक मनुष्य जागृती व सुषुप्ती या दोन्ही वेळा करत असतो.
 हे आजही तितकेच प्रत्ययकारी आहे असे दिसते. 'आंतर अग्निहोत्र' म्हणजेच हठयोगातील 'आंतर कुंभक'. एखादा टेनिसपटू सर्व्हिस करताना श्वास कोंडून चेंडूला फटका मारल्यावर मग जोराने उच्छ्वास करतो. वजन उचलताना पूर्ण श्वास घेऊन मग झटक्याने वजन उचलताना श्वास पूर्ण कोंडून धरतो. धनुर्धारी बाण मारताना नेम धरल्यावर श्वास कोंडून, हात स्थिर करून मग बाण सोडतो.त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे कार्य असो, जेथे एकाग्रतेची जरुरी असते तेव्हा श्वास कोंडला जातो.
 भयाची मीमांसा :

 या ऋषींनी निरीक्षणाअंती भय म्हणजे काय याचे विवेचन केले आहे. दुजाभाव मनात आला की भय वाटते (नै. २.७). मूळ आत्मा एकटाच होता, म्हणून त्यास

६९