पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून त्याची नक्कल करणे यातून निराशाच पदरी पडते. कारण त्याचे हार्दच आपणास समजलेले नसते. मला स्वतःला मुक्तीची किती आच आहे, त्यासाठी मी काय करणार आहे हे प्रश्न स्वतःला पडणे, त्याची ओढ लागणे ही ज्ञानपिपासा, जी निश्चित यश देईल. संत कबीरांचा एक दोहा प्रसिद्ध आहे -
 "चली धुंडने रही किनारे बैठी ।
 जिन चाहा तिन पाया - गहरे पानी पैठी ।"
 "मी निघाले परमेश्वराला भेटायला. परंतु तो आज येईल, उद्या येईल म्हणून किनाऱ्यावर बसून राहिले. मात्र ज्यांना खरी आच होती. त्यांनी सतत खोल पाण्यात जाऊन त्याचा शोध घेतला आणि परमेश्वर त्यांना भेटला." भोगवाद सुटत नाही, नैसर्गिक जीवन घडत नाही, मग समस्या संपत नाहीत व मनःशांती भेटत नाही. ओंजळीत उरते फक्त कर्मकांड.
भारतीय तत्त्वज्ञान - एक विहंगावलोकन :
 भारतीय तत्त्वज्ञान म्हणून जे ओळखले जाते त्याचा उगम वेदामध्ये आढळतो. याचमुळे या विषयाचे अभ्यासू वेदाभ्यासापासून त्याचा 'श्रीगणेशा' करत असावेत. वेद हे अतिप्राचीन वाङ्मय आहे. त्याचा कालखंडही निश्चित नाही. याबाबत संशोधकांतही एकवाक्यता आढळत नाही. काहीजण हा कालखंड ख्रि. पूर्व ३००० वर्षे तर काही ख्रि. पूर्व १५०० असा धरतात. अर्थात हे काही जगातील प्राचीनतम वाङ्मय नाही. याआधीचे इजिप्शिअन व बाबिलोनिअन लोकांचे वाङ्मय उपलब्ध आहे. इतक्या कालखंडानंतरही या आपल्या वाङ्मयात काडीचाही फरक झालेला नाही. कारण ते गुरूकडून शिष्याकडे संथेद्वारा व उच्चारा - आघातासह असे पिढ्यान्पिढ्या चालत आले आहे. ही परंपरा ऐकून म्हणजे श्रवणावर आधारित असल्यामुळे त्यांना श्रुती असे संबोधन दिले गेलेले आहे.
 वेद चार आहेत ते असे :
 (१) ऋग्वेद ( २ ) अथर्ववेद (३) सामवेद (४) यजुर्वेद

 या चार वेदांचे चार उपवेद आहेत.

५२