Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ॐ म्हणजे त्यामागे प्रकाशवलयाची कल्पना करून तो प्रकाश हळूहळू तेजस्वी होत आहे त्याची अनंत किरणे आपल्याकडे येत आहेत, आपल्या शरीरात शिरत आहेत, शरीर हळूहळू हलके व गरम होत आहे असे चित्र डोळ्यांसमोर आणावयाचे. हे सहज जमत नाही व असे चित्र फार काळ सुरुवातीस टिकत नाही. पण सवयीने असे शवासन १५ ते २० मिनिटे करता आले पाहिजे. प्रतिदिन अशी दोन आवर्तने सकाळ व सायंकाळ करणे इष्ट ठरेल. या वेळी ते प्रकाशकिरण रक्तवाहिन्यांत शिरताहेत व तेथील कोलेस्टरॉल पातळ होऊन गुठळ्या नाहिशा होत आहेत असे पूर्ण मानसचित्र उभे करणे ही स्थिती सहज व्हावयास पाहिजे. कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिमंदिरात एक ध्यानमंदिर आहे. तेथे प्रकाश अतिशय मंद आहे व समोर तेजस्वी ॐ काराची आकृती आहे. तेथे ॐकारावर दृष्टी एकाग्र करून बसले तर मन किती प्रसन्न होते व मनःशांती मिळते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. ते वातावरण जर आपण घरी निर्माण करू शकलो तर ती स्थिती आपण अनुभवू शकू.
हृदयविकार व मायेची शुश्रुषा :
 हृदयविकाराच्या सर्व प्रकारामध्ये झोपून हालचाल न करणे हे श्रेयस्कर असते. ह्या स्थितीत शवासनात ध्यान, प्रार्थना, जप यांचा उत्तम उपयोग होईल. 'रेस्टिल ०.२५' ही गोळी घेऊन जेवढा मनावरील ताण कमी होतो तेवढाच फायदा यामुळे होऊ शकेल. याव्यतिरिक्त भोवतालच्या मायेच्या माणसांनी स्वतःच घाबरून जाऊन आपल्या वर्तणुकीने रुग्णाच्या मनावरील ताण वाढवणारे वर्तन, भाषा न करता त्याला मायेचा स्पर्श, शब्द, आंजारणे, गोंजारणे या साध्या साध्या गोष्टींनी रुग्णाचा ताण कमी करावा. असा रुग्ण हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंतचा काळ बराच शांत राहतो व औषधांनाही उत्तम प्रतिसाद देतो. आपल्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत, त्यांना आपण हवेहवेसे वाटतो ही भावना, ही खात्री सर्व प्रकारचे ताण कमी करते.

 हॉस्पिटलमध्येही तेथील नर्सेस व इतर सेवकवर्गाने त्यांच्याशी वर्तणूक अत्यंत सेवाभावी, आश्वासक ठेवली तर रुग्णाला सुद्धा खूप बरे वाटते. नाहीतर बहुधा असे दिसते की यांची वागणूक यांत्रिक, फक्त नोकरी म्हणून नोकरीचे तास पूर्ण करण्याची, अशी असेल तर 'नर्सिंग' या शब्दाला, त्यातील गृहीत भावनाशील

२८६