पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाब असे संपूर्ण वर्षभर चालत असे. कालौघात या जुन्या रीतिरिवाजांना आपल्या आयुष्यात फारसे धार्मिक स्थान उरले नसले तरीही ते दिवस आपण साजरे करतोच. निरनिराळ्या देवांच्या जत्रा पूर्वीप्रमाणेच चालू असल्या तरी ते नुसते कर्मकांड व तो दिवस मजा करावयाचा आनंद लुटावयाचा म्हणून आपण साजरा करतो. यातही नवीन भर पडली आहे. आजचे मंत्री भूमिपूजन, उद्घाटन असे समारंभ साजरे करतात. निरनिराळ्या मृत्यू पावलेल्या पुढाऱ्यांच्या जयंत्या व जिवंत माणसांच्या वाढदिवसांचे समारंभ साजरे होतात की. पूर्वीचे सणवार, पूजाअर्चा आदी गोष्टी ह्या निरर्थक गोष्टी आहेत व त्या काही केल्याच पाहिजेत असे नाही. तसेच हे जयंत्या, वाढदिवस किंवा पुढाऱ्यांच्या मृत्यूनंतर समाध्या बांधून त्यावर दरवर्षी सर्वांनी जाऊन फुले वाहणे, त्या दिवशी भजन-कीर्तन, धार्मिक पाठांचे वाचन ह्या गोष्टींनी त्यांचे स्थान घेतले आहेच. परंतु हेही कर्मकांडच झालेले आहे. कारण त्यात कोणतीही उच्च भावना आहे, असे दिसत नाही. पूर्वीचा जुना, धार्मिक आचार असला तर त्याचेच रूप म्हणजे आजचा धार्मिक आचार. गांधीजयंतीचेच उदाहरण घ्या ना. विसाव्या शतकातील हा सर्वश्रेष्ठ पुरुष. त्याची जयंती फक्त एक सण म्हणूनच साजरी होते. तो दिवस त्यांच्या आठवणींचा. पण त्यांनी शिकवलेल्या व स्वतः आयुष्यभर आचरणात आणलेल्या दया, क्षमा शांती, मानव, सेवा यापैकी निदान एकतरी गोष्ट त्या दिवशी अमलात येते का ? उलट तो दिवस सुट्टीचा म्हणून गांभीर्याने साजरा करण्याऐवजी मजा करण्याचा झाला आहे.
  पूर्वीच्या धार्मिक आचारामागे काही मूलभूत संकल्पना होत्या का? आता काय आहेत? ह्याचा आढावा घेणे इष्ट ठरेल. धर्म याचा अर्थ आपण जो घेतो त्याचा संबंध ईश्वरनिष्ठेशी येतो. यात प्रत्येक पंथ आपापल्या कल्पनेप्रमाणे किंवा श्रद्धेप्रमाणे धर्माचरण करत असतो. पण मूळ धर्म याची व्याख्या काय? ती आपल्या तत्त्वज्ञानात आढळते आणि ती सर्व धर्मांनाही तितकीच लागू पडते.
  "धारयति इति धर्मः । धारणात् धर्मः ॥

 सर्वांना जोडणारा, सर्वांना एकत्र ठेवणारा तो धर्म. प्रत्येक धर्मसंस्थापकाचे सांगणे हेच आहे. याशिवाय दहा धर्मलक्षणे सांगितलेली आहेत ती अशी -

२३१