Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रक्तवाहिन्या पूर्ण चोंदलेल्या होत्या. हे कसे? याचे कारण शोधता शोधता असे आढळून आले की सशांचे दोन गट केलेले होते, त्यातील एका गटाच्या बाबत काळजी घेणारा सहायक त्या सशांशी अत्यंत प्रेमाने वागावयाचा. त्यांना आंजारून गोंजारून, स्पर्शामधून आपले प्रेमच जणू सांगत असे. सर्वच प्राण्यांना ही भाषा उत्तम कळते. याचा अनुभव कुत्री व मांजरे या घरात वावरणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत आपणास नेहमीच येतो. किंबहुना ती प्रेमाने कुरवाळले नाही तर मालकापाशी येऊन 'माझ्याकडे पाहाना' असेच जणू सांगतात किंवा केविलवाणा सूर काढून मालकाचे लक्ष वेधून घेतात. हीच हकीकत त्या सशांचे बाबतही घडलेली होती. याचा अर्थ त्यांना माया समजल्यामुळे त्यांचे मन या कामी उपयोगी पडले होते. हा काही 'कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडली' असा किस्सा नव्हता. सर्व सशांच्याच रक्तवाहिन्यांत कोलेस्टरॉलचे थर जमा झाल्याचे आढळण्याची अपेक्षा होती, कारण अनेक शवचिकित्सेत हा अनुभव आलेला होताच. प्रत्यक्ष अनुभवच आता वेगळा आला होता, नाहीतर त्या जीवशास्त्रज्ञांना ही गोष्ट कोणी सांगितली असती तर त्याची टिंगलच त्यांनी केली असती.
 परंतु ही घटना अपवादात्मक होती का नव्हती हे ठरविण्यासाठी परत हा प्रयोग करण्यात आला. परत सशांचे दोन गट करण्यात आले. त्यातील एका गटाची देखरेख एक ठराविक सहायक करत असे. दिवसात त्या सशांना अनेक वेळा पिंजऱ्यातून बाहेर काढून तो सशांच्या बरोबर खेळत असे, त्यांना आंजारत गोंजारत असे, त्यांच्याशी लाडालाडाने बोलत असे. परत या दोन गटांची तपासणी केली असता ज्या सशांना मायेने वागवले होते, त्यांच्याबाबत रक्तवाहिन्यांत कोलेस्टरॉल साठण्याचे प्रमाण दुसऱ्या गटापेक्षा ६०% कमी होते. तेव्हा 'ॲथेरोस्केरॉसिस' ह्या रोगाचे बाबत मनाचा सहभाग निःसंशयपणे सिद्ध झाला होता. अर्थात सशांचे बाबत जे घडले ते मानवांचे बाबतही घडेल असे काही छातीवर हात ठेवून सांगता येणार नाही. परंतु हा एक दिशादर्शक अनुभव असतो आणि तो सत्य असल्याचे सिद्ध झाले असून त्याला पूर्णपणे विश्वमान्यता मिळाली आहे.
 इ.स. १९७३ मध्ये मॅसेच्युसेट्समध्ये एका खास पथकाला त्यासंबंधी परत संशोधन करून रिपोर्ट देण्यास सांगण्यात आले. त्यांना असे आढळून आले की धूम्रपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातील कोलेस्टरॉल या घटकांपेक्षा नोकरी १४९