पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीही संबंध नाही ही आपली पक्की धारणा झालेली असते, भले ते आपण मान्य करू वा न करूया. आपले शरीर सतत बदलत असते. जवळ जवळ दररोज त्याचे- त्याच्या भागांचे नूतनीकरण होत असते. यासाठी निसर्गातून अनेक रासायनिक घटक निरनिराळ्या प्रकारे शरीरात जात असतात. काही वर्षांतच संपूर्ण शरीराचे नूतनीकरण होत असते. ही प्रक्रिया पूर्वी होऊन गेलेल्या व आता अस्तित्वात असलेल्या सर्व जीवांचे बाबत चालू होती व आजही आहे. शरीर म्हणजे त्वचेने झाकलेले, त्वचा हीच त्याची सीमा आहे ही कल्पनाच अनैसर्गिक आहे. कारण प्रत्येक वस्तुमनाचे काही नातेसंबंध असतात, काही देवाणघेवाण सतत चालू असते.
 यामुळेच तात्त्विकदृष्ट्या उपचार ही वैयक्तिक विकारापुरती बाब न उरता ती सर्वांगीण होणे जरुरीचे असते. उपचार म्हणजे फक्त विकारमुक्ती नव्हे तर आरोग्याची पुनः प्राप्ती हा अर्थ त्यात गृहीत धरावयास पाहिजे. यामुळे औषधे घेऊन कसेबसे जगणे, कोणीकडून तरी मृत्यू पुढे ढकलणे म्हणजे जीवन नव्हे. नैसर्गिक जीवनाला एक ताल आहे, आनंद भरलेला आहे व त्यात काळाचा विचारच नाही. मी जन्माला आलो तो विश्वातून काही रसायने, काही अणुरेणू घेऊन. इतर मानवही अगदी तसेच आहेत, प्राण्यांचीही तीच स्थिती. मग ही प्रतिबिंबे वा प्रतिमा म्हणजे मीच आहे हे सत्य नाही का? आपल्याकडे असे सांगितले जावयाचे की आपण आपल्या मुलांच्या रूपाने जगत असतो. याचा अर्थ मीच माझा खापरपणजोबा होतो व पुढील पिढ्याही मीच राहणार आहे. येथे भूतकाळाला अस्तित्वच उरलेले नसते. अखंड वाहणारा हा कालखंड म्हणजे प्रवाहात जसे काल वाहत होते तेच पाणी आज आहे व उद्याही राहणार आहे असा आहे.

 मग जे नैसर्गिक आहे त्याची खंत का करावयाची? त्या घड्याळाप्रमाणे -हास हा अखंड चालूच असतो. हे चक्र उलट फिरवणे केवळ अशक्य आहे. कलप लावून तरुण होता येत नाही. ह्यावर असा प्रश्न उपस्थित होईल की मग वैद्यकशास्त्राची मदत का घ्यावयाची? विकार म्हणजे मानवाच्या कालप्रवाहातील अडथळा. तो कालप्रवाह संथपणे व नैसर्गिक वाहता राहिला पाहिजे. यासाठी वैद्यकशास्त्राची जरुरी. कोणीकडून तरी मृत्यू पुढे ढकलण्यासाठी नव्हे. आपण मृत्यूची भीती बाळगतो व तो कसा पुढे ढकलता येईल याचीच ओढ असते व तिच्यामुळे अनंत ताण निर्माण होतात. इतर सर्व म्हणजेच मी, ही धारणा मानवतेची उच्च पायरी मिळवून देते.

१४३