Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण अत्यंत कठीण काम आहे. याची उत्तरे काही प्रमाणात तत्त्वज्ञानात मिळू शकतात. ही शक्ती जर सुप्तावस्थेतच असेल तर तिचा फायदा काहीच मिळणार नाही. तेव्हा ती जागृत करणे हा पुढला महत्त्वाचा भाग उरतो.
 हा तिसरा भाग शक्य करणे आपलेच हाती आहे. निसर्गाचे एक चक्र आहे. ‘नेमेची येतो मग पावसाळा' हे जसे चक्र आहे तसेच, प्रत्येक क्षण, तास, दिवस व साल यानुसार माणसाच्या आयुष्याचेही चक्र आहे. जन्म, जीवन व मृत्यू. परत जन्म, जीवन, मृत्यू हेही चक्र आहे. जीवन निरोगी, सुखी, ताणरहित जावे व मृत्यू योग्य समयी शांत चित्ताने यावा हेही निसर्गाचेच एक चक्र. या कालबद्ध चक्रात ढवळाढवळ म्हणजे समस्यांना आवाहन. यासाठी मूलभूत जरुरी म्हणजे नैसर्गिक जीवनशैली. याचे रूप म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या. आजच्या कालखंडानुसार यात बदल झालेले आहेत व होणार आहेत. परंतु त्या घड्याळानुसार आपण दिनचर्या आखून नियमितपणा पाळावयास पाहिजे. यात आहार, व्यायाम, व योगसाधना यांचा अंतर्भाव अटळ आहे. पुढील चर्चेत हेच सांगितलेले आहे. तेव्हा नुसत्या वैद्यकशास्त्राने आरोग्य सोडा परंतु विकारमुक्तीसुद्धा मिळण्याची निश्चिती नाही. याला जोड़ पाहिजे ती अध्यात्माची.
 अध्यात्म हा विषय तसा अफाट आहे. परंतु नदीचे पाणी अगदी ओंजळभर घेतले तरी एका अर्थी ती नदीच आपल्या ओंजळीत असते. तसे या अफाट अध्यात्म विषयाचे आपल्याला पाहिजे तेवढे पाणी आपण ओंजळीत घेऊ या. आपला विषय आहे विकारमुक्ती. वेध म्हणजे 'पूर्वकाळ'. ग्रहणाचे वेध लागले आहेत असे म्हटले जाते, तोच हा शब्द आहे. आरोग्याला लागलेले ग्रहण म्हणजे विकार. त्याच्या मुक्तीसाठी आपल्या जीवनाचा अर्थ जाणून घेणे, जीवनशैली अंगीकारणे व उन्नत मनप्राप्तीसाठी अनुभवसिद्ध पथ नीट जाणून घेणे हेच महत्त्वाचे. यासाठी ना वैद्यकाचे, ना तत्त्वज्ञानाचे खोलवर ज्ञान जरुरी आहे. आपल्या जरुरीपुरते ओंजळभर ज्ञान मात्र आपण मिळवले पाहिजे. माझे स्वतःचे ज्ञानही इतपतच आहे. पण त्याचा व्यावहारिक अर्थ जाणून अनेक रुग्णांचे बाबत त्याचा वापर करून मला माझ्या लायकीपेक्षा खूप यश मिळाले आहे, ही ईश्वरी कृपा!

 ज्या अनेक सुहृदांनी मला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे आभार. मला मिळणाऱ्या यशात मोठा वाटा माझ्या रुग्णांचा आहे. त्यांची श्रद्धा व मी

१२