पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हार्द - जीवनकाल व विकारांचे


 संस्कृत ही सर्व भाषांची जननी व पाणिनी हा पहिला व्याकरणकार. पाणिनीने व्याकरण लिहिण्यापूर्वी संस्कृत भाषेला तशी नियमबद्धता नव्हती म्हणूनच तिला 'आर्ष' म्हणत असत. अत्यंत पुरातनकाळातील ऋषींची भाषा. असे असले तरी त्यात फार मोठे तत्त्वज्ञान साठवलेले आहे. संस्कृत भाषेत समानार्थी किंवा किंचित वेगळी छटा दर्शविणारे अनेक दुसरे शब्द सापडतात. त्यामुळे ज्यांचा संस्कृत भाषेशी पूर्वी संबंध नव्हता अशा माझ्यासारख्या व्यक्तींच्या मनात नेहमीच गोंधळ होऊ शकतो. आता ब्रह्मांड, विश्व आणि अवकाश हे तीन जवळ जवळचे शब्द आहेत. याला एकच इंग्रजी शब्द आहे तो म्हणजे 'स्पेस'. 'स्पेस' (Space) व टाइम (Time), यावर वैज्ञानिकांनी खूप संशोधन केले आहे. हे सर्व संशोधन आधिभौतिक आहे. परंतु त्यापलीकडे एक अफाट विश्व आहे ही आइन्स्टाईनसारख्या थोर वैज्ञानिकालाही झालेली जाणीव आहे. अर्थात असे अनेक थोर वैज्ञानिकही याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत. या आधिभौतिक गोष्टींची आणि आध्यात्मिक गोष्टींची सांगड घालता येईल का? वैद्यकशास्त्र संपूर्णपणे आधिभौतिक. याला अपवाद आयुर्वेद, ज्यात आधिभौतिक आध्यात्मिक व आधिदैविक गोष्टींचा सुरेख संगम झालेला आहे. पण हा प्रवाह खंडित झाला. त्याला आधुनिक विज्ञानाची संशोधनाची पाहिजे तेवढी जोड न मिळाल्यामुळे त्याला सन्मान मिळतो पण व्यवहारात आधुनिक वैद्यकाच्या खाली स्थान दिले जाते. १२३