पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येतील. हे माझे प्रत्यक्ष अनुभव आहेत. होमिओपॅथी, आहार, योगसाधना या सर्व विषयांचे माझे ज्ञान फार नाही. परंतु त्या त्या विषयातील किंवा आधुनिक वैद्यकातील तज्ज्ञांना बऱ्या न झालेल्या जीर्ण केसेस ईश्वरकृपेमुळे बऱ्या होतात. सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांचे 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' हे गाणे प्रत्येक वेळी माझ्या मनात येते. नकळत हे श्रेय ईश्वरकृपा असे मी मानतो. रुग्णांची श्रद्धा व आपली श्रद्धा यांचा प्रीतिसंगम झाला की अशक्य गोष्टी शक्य होतात. येथे अनुभवाने एक गोष्ट अतिशय सुस्पष्ट होते की देह आणि मन यांच्या कार्यकक्षा फारच वेगळ्या आहेत. देहाची कार्यकक्षा अतिशय परिमित आहे. यामुळे बुद्धिद्वारा निर्मित विज्ञानाच्या कक्षाही अपुऱ्या आहेत व त्यापलीकडे ज्ञानभांडार व सिद्धी यांचा अफाट समुद्र आहे. पण हे जाणून घेण्यासाठी विज्ञानाचा विकास, बुद्धीचा सुयोग्य वापर व मनःशक्तीचे उन्नयन ह्या त्रयीचा वापर आपणाला अजून जरूर आहे. याद्वाराच आपण " साधक अध्यात्मवादी व आधुनिक वैज्ञानिक या गोष्टींना बौद्धिक पातळीवर समजावून घेऊ शकतो" असे डॉ. लीशान याने लिहून ठेवले आहे. डॉ. लीशानसारखे आधुनिक वैज्ञानिक अध्यात्माला शास्त्राचा आधार देऊ शकतात.
  प्रेम व माया यांची शक्ती :

  मनाची शक्ती सुप्तावस्थेतून कार्यरत करणाऱ्या साधनेला अनंत पैलू आहेत. श्रद्धा आणि भक्ती यांच्या कार्यशक्तीचा आपण थोडासा आढावा घेतला. आता आणखी एक पैलू म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे निरपेक्ष सेवा, त्याग आदी सद्गुणांचा समुच्चय. यात शारीरिक ओढ किंवा केल्या सेवेचे बक्षीस आदी काहीही नाही. आजच्या युगात प्रेम आणि माया हे समानार्थी शब्द पण थोड्या फरकाने समजण्यास हरकत नाही. माया हा शब्द पूर्वी भास या अर्थी वापरला जात असे. हे जग, हा संसार, हे सर्व माया आहे असे म्हटले जावयाचे. आज आईची मुलावरील माया म्हणजे मुलावरील अत्यंत निरपेक्ष प्रेम, ज्यातून त्याच्या कल्याणाचा विचार होतो असा अर्थ आपण घेतो. असे प्रेम दोन मित्र, बहीण-भावंडे अशा व्यक्तींमध्ये असू शकते. तसेच ते पति-पत्नीमध्येही असू शकते, पण ते ज्या वेळी शारीरिक ओढीतून सेवा, त्याग यामध्ये त्याचे रूपांतर होते तेव्हा. नाहीतर शारीरिक आकर्षण संपले की मतभेद, राग, चीड उफाळून वर येते. पण आईची माया ही सर्वश्रेष्ठ

१११