Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जास्त उपयोगी - परिणामकारक व समाधानदायक आहे - हे समजते. यामुळे विसोबांची कहाणी मोठी समर्पक ठरते. ते आपले पाय सांबाच्या पिंडीवर ठेवून झोपले होते. त्यांच्या शिष्याला तो परमेश्वराचा अपमान वाटला व त्याने पाय बाजूला करण्याची विनंती केली. विसोबा म्हणाले, "तूच माझे पाय उचल व अशा ठिकाणी ठेव की जेथे परमेश्वर नाही. " शिष्याने खूप वेळा पावलांची जागा बदलली पण प्रत्येक वेळी तेथे पिंडी निर्माण व्हावयाची. तेव्हा विसोबा म्हणाले, "अरे या विश्वात एक कणभरही जागा अशी नाही की जेथे परमेश्वर नाही. तो तुझ्यात आहे, माझ्यात आहे, मुंगीत आहे आणि हत्तीतही आहे. या विश्वातील अगदी दगडधोंड्यांपासून प्रत्येक घटकात परमेश्वर आहे. फक्त त्याला जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आल्डस हस्कले सारखा थोर लेखक व चिंतक म्हणतो की, मानवाची आध्यात्मिक जन्मजात बैठक व सुप्त शक्ती ही अनंत व अमर आहे. यामुळे तिला व्यक्तिविशेष किंवा स्थानविशेष समजणे बरोबर नाही. तिच्यात वाढही होत नाही किंवा कमतरताही निर्माण होऊ शकत नाही. यालाच आपण अनादी व अनंत म्हणतो. परमेश्वर असा आहे. त्याला काळ व स्थान याचे काहीही बंधन नाही. विज्ञानाच्या चौकटीत हे बसत नाही पण ते सत्य असल्यामुळे विज्ञानाच्या आजच्या सीमेपलीकडील या गोष्टी आहेत. मानववंशशास्त्रज्ञ पॉल राडिन म्हणतो, "मानववंशशास्त्र म्हणजे डार्विनचा उत्क्रांतिवाद लावून नवीन शोधण्याचा प्रयत्न आहे. हे शास्त्रज्ञ गृहीत धरतात की प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे आणि तो जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इतिहास म्हणजे कालाच्या चौकटीत असलेल्या घटना, ज्या विश्वाच्या विस्तारातच बद्ध आहेत. परंतु शरीरशास्त्र व जीवशास्त्राच्या पलीकडे काही निश्चित आणि अंतिम स्वरूपाची सत्ये आहेत." हे आपण प्रथम जाणून घेतले पाहिजे. म्हणजे प्रार्थना रुग्णाच्या शय्येशेजारीच करावयास पाहिजे ही ख्रिश्चन धर्मकल्पना आधार रहित ठरते. तुम्ही ज्याच्यासाठी प्रार्थना करावयाची त्याच्यापासून दोन फुटांवर आहात का दोनशे मैलांवर आहात, हा मुद्दाच उपस्थित होत नाही. आपल्याकडे पूर्वी देवाला अभिषेक, निरनिराळ्या पोथ्यांची पारायणे, अथर्वशीर्षासारख्या स्तोत्राची पारायणे हे सर्व प्रार्थनेचेच रूप होते. पण आपण विज्ञानवादी मात्र याला निरर्थक कर्मकांड म्हणतो. मुलगा हरवला आहे, तो सापडत म्हणून देव पाण्यात घालून, मुखात पाण्याचा थेंबही न घालता देवाची आळवणी

१०२