Jump to content

पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता जी आपल्या नातवंडांची पिढी आहे, त्यांच्या हातात आपण मोबाईल दिला. मोबाईलवर आपण त्यांना गेम डाऊनलोड करून देतो. पण याच मोबाईल्समध्ये पुस्तके पण डाऊनलोड करता येतात. याच मोबाईलवर टॉकिंग बुक्स देता येतात. याच मोबाईलवर परिकथा देता येतात, चांदोबा वाचायला देता येतो. आपण तसा द्रष्टा वापर नाही करत मोबाईल्सचा दृष्टी ठेवून साधनांचा वापर याचा अभाव आपल्याकडे आहे. ती प्रगल्भता आपण जोपासायला हवी.

प्रश्न - म्हणजे सुसंस्कृतपणा वाढवायचा असेल तर वाचनाच्या संस्काराकडे महत्त्वा देण्याची गरज आहे, असेच तुम्हाला सुचवायचे, सांगायचे आहे ना?

उत्तर - वाचन हे मुळात अनुकरणाने मुलांमध्ये रुजते. मोठ्या लोकांचे वाचन बंद झाले आहे. त्यामुळे लहान लोकांचं वाचन आखूड झाले आहे. मोठ्यांनी परत एकदा वाचनाचा परिपाठ सुरू केला पाहिजे.

उत्तर - सर, तर निश्चितपणे वाचताना चालना मिळेल अशी आपण आशा करूया. आपण इथे आला. “भारतीय भाषा आणि साहित्य' जास्तीत जास्त किंवा इतर भाषांमधील साहित्य सर्वाच्यापर्यंत पोहोचावे. अनुवादित साहित्याचं महत्त्व तुम्ही इथे सांगितलेत. ख-या अर्थाने वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रत्येकाने प्रत्येक स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. निश्चितपणे आपणास असे म्हणता येईल की भाषा आणि साहित्य याची सांगड या पद्धतीने आपल्याला घालता येईल. सर, तुम्ही एक पुस्तक नुकतेच त्या दृष्टीने लिहीले आहे - ‘भारतीय भाषा व साहित्य' नावाने लिहिलं आहे. त्यात आपण हाच दृष्टिकोन मांडला आहे का?

उत्तर' - भारतीय घटनेने ज्या २२ भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिली आहे, त्या भाषा, साहित्य नि लिपींचा परिचय यात करून देण्यात आला आहे. या पुस्तकात यांचा परिचय अशा अंगाने करून देण्यात आला आहे की त्यातला कोणत्याही भाषेवरील लेख तुम्ही वाचाल तर तुम्हास त्या भाषेची सर्वांगीण माहिती, उत्कृष्ट साहित्य मिळेल व तुम्हाला नवी जिज्ञासा निर्माण होईल.

आकाश संवाद/१२८