Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३७ )

की, रखवालदार भय्या कांहींसा घाबरल्यासारखा सुद्धा दिसतो ! हे सर्व पराक्रम हिंदूंपैकी अस्पृश्येतरांनीच केलेले आहेत. या पराक्रमाचे वांटेकरी होण्याइतपत परिस्थिति त्यांना इतरांनी अनुकूल ठेविली असती तर अस्पृश्यांनीहि कांहीं कार्यभार शिरावर घेतला असता यांत संशय नाही. पण आपला प्रस्तुतचा मुद्दा इतकाच आहे की,अस्पृश्यांची तदितरांशी कसल्या प्रकारची नाती आहेत हे पहावें.अस्पृश्यांची कड घेऊन जे काय यथामति लिहिता येण्यासारखे होतें तें थोडक्यांत पण स्वच्छपणे लिहिल्यावर इतर समाजाकडे कोणत्या लागेबांध्याच्या दृष्टीने त्याला पाहतां येईल हे पाहण्याचा यत्न केला आहे. त्रैवर्णिक झगडत असले तरी त्या झगड्याकडे आपलेपणाची दृष्टी ठेवून सुद्धा अस्पृश्याने दक्ष राहिले पाहिचे हे उघड आहे.
 अस्पृश्यांनी आपल्या वैगुण्यांकडेही नीट लक्ष पोचविले पाहिजे. उठल्यासुटल्या सरकाराला शिव्या देतांना थोडें आत्मनिरीक्षण करीत जा म्हणून जे गांधींनी लोकांना बजाविलें तें अस्पृश्यांनी आत्मशुद्धीच्या दृष्टीने ध्यानात ठेवावे. अस्पृश्यास्पृश्यांत बारीकसारीक किती तरी भेद आहेत. सर्व अस्पृश्यांचा मिळून एक गठ्ठा मानणे चूक आहे. इतरांकडून न शिवले जाणे ही एकच काय ती बाब त्यांना सामान्य आहे. लग्नसंबंध तर दूरच राहो, पण त्यांच्या त्यांच्यांत अन्नोदकव्यवहारहि होत नाहीत. महार आपल्याला सर्वांहून श्रेष्ठ समजतो. कांही काही ठिकाणी महाराचा वरचष्मा उगाच आहे असें चांभार समजतात, पण स्वतःला मात्र ते ढोराहून वरचे धरतात. मांग हा एकादे वेळी महारापेक्षा कमी असल्याची कबुली जरा कुरकुरतच देतो. गुरे ओढणे, ती फाडणे, कातडी धुणे, कमावणे, जोडे शिवणे इत्यादि धंद्यांचे कमीअधिक महत्त्व, स्वच्छतेचे मान, तसेंच मेलेल्या गुरांच्या मांसाचा खाण्याकडे उपयोग करणे न करणे या बाबी लक्षांत घेतल्या म्हणजे या निरनिराळ्या लोकांच्या उच्चनीचपणाचा हिशेब