Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अत्युच्च गुणवत्तेचा माल निघेल, तर आमच्या दरिद्री शेतीत हे प्रमाण २० % चे असेल. सर्वोत्तम गुणवत्तेची फळे १/५, त्याखालच्या गटातील १/५, मध्यम १/ ५, बऱ्यापैकी १/५ व कनिष्ठ दर्जाची १/५ अशी आपणाकडील फळांची वर्गवारी निसर्गाच्या प्रभावानेच होते. यांतील २० % आम्ही करू शकू; पण उरलेली ८० % देशात खपवायची सोय झाली तरच हा धंदा किफायतशीर होईल.
 ग्राहक हाच राजा
 परदेशी खरेदीदार आपल्या गिऱ्हाइकांचे कल्याण बघतात. त्यांना माल खपविण्यासाठी वेगवेगळ्या देशांतील शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. त्यांना एकमेकांविरुद्ध खेळवून जास्तीच जास्त चांगला माल कमीत कमी किमतीत संपादन करणे हे त्यांचे कामच आहे. हिंदुस्थानातही मोठे कारखानदार सुटे भाग पुरवणाऱ्या कारखानदारांत एकमेकांत लढत लावून फायदा मिळवतात, त्यातलाच हा प्रकार
 उसने तंत्रज्ञान, अपयशाचे कारण
 आपल्याला डावलून दुसऱ्या देशाचा माल परदेशी खरेदीदार भरू लागले, तर त्यातील मोठा भाग तरी देशातील बाजारपेठेत रिचवण्याची शक्यता तयार केली पाहिजे.

 भारतात प्रक्रिया करणारे कारखानदार क्वचितच लागवडीवर ताबा ठेवतात. ते बहुधा बाजारात जो काही कच्चा माल मिळेल, तो खरेदी करतात. अशा प्रक्रिया कारखानदारीतून नामवंत माल तयार होण्याची काही शक्यता नाही. उत्पादन करायच्या मालाचे स्वरूप काय असावे? आपल्या परंपरेत स्वादिष्ट, रुचकर आणि दिसायला आकर्षक असे पदार्थ नाहीत असे नाही; पण विजेत्यांच्या परंपरांनाच काय खाद्यपदार्थांनाही प्रतिष्ठा येते व जितांचे सर्व काही कुचेष्टेचा विषय होतो. या नियमानुसार बिस्किटे महद्पदाला चढली, चिरोटी गावंढळ ठरली: केकचा बडेजाव वाढला, अनारशांना कोणी विचारेनासे झाले. प्रक्रिया उद्योजकांमध्ये, काही किरकोळ अपवाद सोडल्यास, विलायती तोंडवळ्याचे पदार्थ करण्याचीच विशेष घाई दिसते. त्यासाठी लागणारी माहिती, तंत्रज्ञान सारे काही तयार विकण्यासाठी मोठ्या नामवंत कंपन्याही उभ्या ठाकल्या आहेत. आजपर्यंतचा उद्योजकांचा अनुभव असा आहे, की त्यांच्या सल्ल्याने चालले तर कारखाना कदाचित चालेल ना चालेल, फायदा कदाचित मिळेल ना मिळेल; पण शेवटी तंत्रज्ञान व यंत्रसामग्री पुरवणारांचेच उखळ पांढरे होते. कारखानदार तसेच कोरडे राहून जातात. दुसरा कोणी येईल, आपला कारखाना बांधून देईल

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ६१