Jump to content

पान:अभिवादन (Abhivadan).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ८१


ती म्हणजे, माडखोलकर आपले आहेत. आमच्या मराठवाड्याच्या पद्धतीनुसार सांगायचे, तर आम्हाला माहीत असलेले आणि नसलेले त्यांचे सर्व गुणदोष लक्षात घेऊन, आम्ही त्यांना आपले मानतो. हळूहळ या आपुलकीची कारणे मला समजू लागली. आज वयाने खूपच मोठा झाल्यानंतर माझे हे मत आहे की, आमच्या ज्येष्ठांचा हा निर्णय बरोवर होता. आम्ही माडखोलकरांशी भांड, त्यांच्या कादंबन्या एकदम रद्दी आहेत असा निर्णय देऊ, त्यांच्या सर्व विचारांचे खंडन करू, पण ते आमचे आहेत हे विसरू शकणार नाही. उलट, त्यांच्या खंडनाच्या लिखाणाला त्यांनीच आशीर्वाद द्यावा, असा आग्रह धरू. कारण ते आमचे आहेत. या ममत्वसबंधाला वैचारिक मतभेदांचा अडथळा येण्याचा संभव अजिबात नाही. कारण या ममत्वाचा उगग इतरत्र कुठे तरी आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ माडखोलकरांना कसा ओळखतो, ते त्यांनी सांगावे. आम्ही कसे ओळखतो, ते आम्ही सांगू.
 एक दिवस असा होता,-ज्या दिवशी मराठवाड्यावर निझामाचे राज्य होते. या ठिकाणी चौथीच्यापुढे मराठी माध्यम नव्हते. सगळा राज्यकारभार उर्दूतून चालत होता. सर्व शासन आक्रमक मुस्लिम जातीयवादाने संपूर्णपणे भरलेले होते. अशा त्या अंधाऱ्या वातावरणात जेव्हा मराठवाड्यात अस्मितेची ज्योत जागी झाली, त्या काळी ही सगळी अस्मिता दोन-तीन मार्गांनी प्रकट होत होती. एक तर महाराष्ट्र परिषदांच्या रूपाने राजकीय जागृती चालू होती आणि आमच्याजवळ महत्त्वाचे कोणतेही वर्तमानपत्र नव्हते. इथे काय चालू आहे, हे बाहेर कळतच नव्हते. आम्हाला बाहेर कुणी कौतुक करणारा, धीर देणारा, प्रोत्साहन देणारा नव्हता. आमच्याकडे काही फार महत्त्वाचे घडत होते, अशातला भाग नाही. कुठे चार माणसे जमत, एखादे वाचनालय उघडीत. कुठे एखाद्या शाळेच्या स्नेहसंमेलनासारखा कार्यक्रम होई. एखादा नवोदित वक्ता कुठे निबंध वाची, एखादे व्याख्यान देई. या साऱ्यांच्या प्रसिद्धीची काही सोयच नव्हती. अशा त्या अंधारयुगात जे दोनतीन तुरळक आधार आम्हाला होते, त्यांत माडखोलकर एक होते. माडखोलकरांच्या नियतकालिकात मराठवाड्यातील बातम्यांना- मग त्या कितीही सामान्य असोत- आवर्जून प्रसिद्धी मिळे. मराठवाड्यातील लेखकांना मधून मधून लेख लिहिण्याची संधी मिळे. मराठवाड्यात फार मोठे, महाराष्ट्र दिपवून टाकणारे लेखक त्याही वेळी फारसे नव्हते. पण, कुठे थोडेही चांगले दिसले, तर त्यावर माडखोलकरांच्या नियतकालिकात निश्चित अभिप्राय येई. मराठवाड्यातील सर्व साहित्यप्रेमीयांना, पोलिस अॅक्शन होईपावेतो, माडखोलकर हा आधार होता.
 आणि माडखोलकरांनी कधीही या साऱ्या उपेक्षित भागातील साहित्यिकांना अवहेलनेने वागविले नाही. माडखोलकर आपल्यावर दया करीत आहेत, आपल्याला उत्तेजन आणि प्रोत्साहन देत आहेत, अशी न्यूनगंडाची भावनाही त्यांनी जाणवू