पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



त्याचे अपयश समोर दिसत असतानाही लढताना, तिला साफल्य वाटत असते. पहिले प्रेम वैचारिक मतभेदामुळे विफल झाले तरी विल्यम्सशी गाठ पडल्यावर ती त्याच्यावर अपार प्रेम करू लागते. विल्यम्स तिच्यापेक्षा अनेक बाबतीत उणा असला तरी दोघे अखेर लग्न करतात. परंतु तालिबानला शरीयतशिवाय अन्य कायदा मान्य नसतो. ते सिव्हिल मॅरेजला मान्यता देत नाहीत आणि म्हणून विल्यम्स व जमिला यांना प्रथम फटके आणि नंतर दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात येते. जमिला निर्भयपणे शिक्षा सोसते, अखेर दगडांच्या वर्षावामुळे तिची शुद्ध हरपते. ती मरते तेव्हा अन्वर आणि इलियास 'ती कम्युनिस्ट विचारासाठी शहीद झाली' असे म्हणतात आणि करिमुल्लाही म्हणतात की जमिला औरत जातीच्या सन्मानासाठी आणि देशासाठी शहीद झाली. जमिलाच्या मृत्यूमध्ये उदात्तता, भव्यता - ट्रॅजिक पूँजर आहे.
 या कादंबरीत स्त्री-पुरुषांच्या संबंधाचे जे वर्णन आहे ते काही ठिकाणी मला अनावश्यक आणि अप्रस्तुतही वाटले. वासना हा मानवी जीवनाचा एक भाग आहे हे नाकारता येत नसले तरी कथानकाच्या मुख्य सूत्रापासून ढळणाऱ्या काही घटना कलादृष्ट्याही मला अयोग्य वाटतात.

 अफगाणिस्थानच्या इतिहासातील एका प्रदीर्घ कालखंडातील मुख्य प्रवाहाचे आणि त्या प्रवाहामुळे होणाऱ्या प्रचंड उलथा-पालथींचे चित्रण या कादंबरीत आहे आणि लेखकाने ते सुयोग्य रीतीने केलेले आहे. सुरुवातीस जहीर शहांच्या राजवटीत दाऊदखान हे पंतप्रधान म्हणून हळूहळू सर्वसत्ताधीश होतात. आणि जाहीर शहांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येते. दाऊद खान यांनी सत्ता हातात ठेवताना अफगाणिस्थानमधील गरीब जनतेच्या जीवनात काही सुधारणा केल्या. मात्र ते रशियाकडे फार झुकले नाहीत. नंतर कटकारस्थानांचे राजकारण सुरू होते. तराकीच्या प्रेरणेने मशिनगनधारी सैनिकांनी राजवाड्यावर हल्ला करून दाऊद खान आणि त्यांचे सहकारी यांना ठार मारले. ही जनक्रांती नसते. फ्रेंचमध्ये ज्याला 'कू दे ता' म्हणतात त्याप्रमाणे मूठभरांनी शस्त्राच्या जोरावर घडवून आणलेले हे सत्तांतर असते. नूरमहंमद तराकी आणि त्यांचे कम्युनिस्ट सहकारी रशियाच्या मदतीने हे करतात. नंतर तराकींची हुकूमशाही काही काळ चालल्यावर त्यांनाही खतम करून अमीन हे काही काळ सत्ता घेतात. त्यानंतर रशियाचा प्रभाव अधिकाधिक वाढत जातो आणि रशियन सत्ताधारी अमीन यांना संपवून बाबरक करमाल यांच्याकडे सत्ता सोपवितात. तराकींच्यापासून करमाल यांच्या राजवटीपर्यंत अफगाणिस्थान रशियाच्या पूर्णपणे अंकित होतो. अफगाण जनता रशियन सैन्यामुळे दबली असली तरी इस्लामी राजवट आली पाहिजे हा प्रवाह प्रबळ असतोच, या प्रवाहाला मुख्यत: पाकिस्तानकडून बळ मिळते. गुलमहंमद हिकमतयार आणि रब्बानी यांची

१८८ □ अन्वयार्थ