Jump to content

पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एकतर देशाचे संरक्षण आणि प्रशासन ह्यांव्यतिरिक्त कुठल्याही बाबींत सरकारने हस्तक्षेप करू नये, सरकार जितके कमी तितके अधिक चांगले अशीच त्यांची भूमिका होती. सरकारने हाती घेतलेल्या कापूस खरेदी योजनेपासून बाजार समित्यांपर्यंत असंख्य उपक्रम कसे भ्रष्ट झाले व डबघाईला आले ह्याचे अनेक पूर्वानुभव समोर दिसत होते. 'सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार यही समस्या है' ही त्यांची कायम धारणा होती.
 दुसरी बाब म्हणजे स्वयंसेवी संस्थांमार्फत समाजाचे भले होण्यापेक्षा या संस्थांचेच भले होण्याची शक्यता जोशींना अधिक दिसत होती. साहजिकच बीजिंग परिषदेतील ठरावांना त्यांचा विरोध होता.
 बीजिंग परिषदेमध्ये आणखी एक विचित्र प्रकार घडला व त्याची अन्यत्र कोणी काहीच चर्चा केली नाही, तरी जोशींनी त्याबद्दल आवर्जून लिहिले आहे, कारण अशा आंतरराष्ट्रीय परिषदांची एक फार जाचक अशी मर्यादा त्यातून अधोरेखित होते. तो प्रकार म्हणजे ह्या परिषदेतील जवळजवळ सर्वच कॅथॉलिक आणि मुस्लिम देशांच्या महिलांनी घेतलेली अगदी वेगळी भूमिका.
 उदाहरणार्थ, अनेक प्रॉटेस्टंट व पाश्चात्त्य देशांच्या महिला प्रतिनिधींना आपण कुठला वेष परिधान करायचा, संमिश्र समाजात कसे वावरायचे हे ठरवायचा अधिकार फक्त स्वतःलाच हवा होता; त्यावर समाजाची बंधने त्यांना नको होती. कॅथॉलिक आणि मुस्लिम देशांच्या महिलांची भूमिका मात्र तशी नव्हती. घटस्फोट, गर्भपात, समलिंगीसंबंध अशा अनेक बाबींवरही हे मतभेद पराकोटीचे होते. गंमत म्हणजे कॅथॉलिक आणि मुस्लिम देशांच्या महिलांची मते त्यांच्या देशांतील पुरुषांच्या मतांशी तंतोतंत जुळणारी होती. मुसलमान स्त्रियांनी शरियतची तरफदारी केली, कॅथॉलिक स्त्रियांची मते त्यांच्या पोपने व्यक्त केलेल्या धोरणांना पाठिंबा देणारी होती. आपापल्या धर्माच्या परंपरा आणि तत्त्वज्ञान कसे श्रेष्ठ आहे हेच त्या सांगत बसल्या. त्यात कुठलाही मूलभूत बदल करावा अशी त्यांची मागणी नव्हती. उलट तशा बदलाला त्यांचा संपूर्ण विरोधच होता. आफ्रिकन देशांतील महिलांचे प्रश्न पुन्हा अगदी वेगळे होते. तिथली उपासमार. मागासलेपण. वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये सतत चालू असलेला हिंसाचार वगैरे मुद्दे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आपल्या देशातील पुरुष किंवा धर्म किंवा सरकार यांच्या विरोधात एकही वाक्य यांपैकी कुणाही प्रतिनिधीने उच्चारले नाही. या सगळ्यातून महिलांच्या प्रश्नांचे स्वरूप हे वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे आहे व त्यावर सरसकट लागू पडेल अशी कुठलीही आंतरराष्ट्रीय नीती असू शकत नाही, हेच सिद्ध होत होते. त्यामुळे जगातील सर्व महिला म्हणजे जणू एक वर्ग आहे, त्यांचे स्वतःचे असे एक धोरण आहे, वगैरे सगळा 'आंतरराष्ट्रीयपणा' हा एक भ्रमच होता, असे जोशींचे म्हणणे होते.

 या परिषदेतील भारतीय प्रतिनिधींच्या मांडणीत स्त्री व पुरुष हे जणू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दोन वर्ग आहेत, त्यांच्यात कायम संघर्षच असतो अशा गृहीतकावर भर होता व हे गृहीतक मूलतः जोशींना अमान्य होते. त्यांच्या मते स्त्री व पुरुष हे परस्परपूरक भूमिकाच बजावत असतात.

३१०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा