Jump to content

पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतो. तिथून अमेरिकेला गेलो. जरा बरं वाटत नव्हतं. तर डॉक्टरांना दाखवावं म्हणून गेलो, तिथं कळलं की, अमेरिकेत अनेक नाणावलेले डॉक्टर हे हिंदुस्थानरी आहेत. आपल्या देशात डॉक्टर झालेले विद्यार्थी सगळे भेटायला मिळतात ते अमेरिकेत मिळतात किंवा इंग्लंडमध्ये मिळतात आणि माझ्या गावामध्ये जर का बाळंतीण अडली तर तिला पाहायला एकसुद्धा भारतीय डॉक्टर उपलब्ध नसतो. ही शिक्षण पद्धतीची चूक झाली. ही चूक का झाली? जर आपण स्वातंत्र्य मिळालं म्हणतो, आपल्या देशाचं सरकार आलं असं म्हणतो तर इथे शिक्षणाची पद्धत अशी झाली कशी की ज्यामुळे डॉक्टर आणि इंजिनिअर या गरीब देशामधल्या गरीबांच्या पैशांनी शिकले आणि नंतर पैसे कमवण्याकरिता परदेशात निघून गेले आणि आमच्या देशातल्या मायबापड्या जर बाळंतपणात अडल्या तर त्यांना उपचार द्यायला एक हिंदी डॉक्टर येथे नाही?

 मी काय म्हणतो ते अधिक स्पष्ट व्हावे म्हणून एक उदाहरण सांगतो, समजा, आपण मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा यासारख्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये काढतीच नसती किंवा घाई न करता सावकाशीने काढली असती आणि सुरुवातीला जर हिदुस्थानचा पंतप्रधान हा हिंदुस्थानातल्या गोरगरीबांचे, मायबापड्यांचं दुःख जाणणारा असता तर तो म्हणाला असता, "सध्या कॅन्सरवर ट्रीटमेंट नाही मिळाली तरी चालेल, सध्या हार्ट पेशंट मेले तरी चालतील-मी हार्ट पेशंट आहे तरी मी हे म्हणतो आहे; पण पहिल्यांदा औषधोपचाराची अशी योजना करू या की ९० टक्के लोकांच्या आजारांवर उपचार करता यावेत. ९० टक्के लोकांचे काय आजार आहेत? प्यायला शुद्ध पाणी नाही म्हणून पोटाचे आजार, खरूज, नारू आणि ग्रामिण भागातला अभ्यास असं सांगतो की, एकही स्त्रीरोग झालेला नाही अशी एकही स्त्री ग्रामिण भागात जवळजवळ नाही. या आजारांचे उपचार करायला कोणी नाही म्हणून मी असं म्हटलं असतं की बारावीमध्ये ९० टक्के आणि १०३ टक्के मार्क कोणाला मिळाले ते बाजूला राहू द्या, गावातली दाई, गावातली जी म्हातारी बाई एखाद्या बाईचं बाळंतपण जवळ आलं म्हटल्यावर धावत जाते तिला मी वैद्यकीय शिक्षण देणार आहे; तिला मी फक्त तीन महिन्यांचा कोर्स देतो, जास्त खर्चसुद्धा नको. गावामध्ये एखादी बाळंतीण अडली तर तिचं बाळंतपण त्यातल्या त्यात सुखरूप कसं होईल याचं शिक्षण जर तिला दिलं असतं तर हिंदुस्थानातल्या लोकांचं दुःख, वेदना कितीतरी कमी झाल्या असत्या. तुम्ही शहरांमध्ये कॉलेज का काढली? जोतिबा फुल्यांनी सांगितल्याप्रमाणे, याचा अर्थ असा की तुमच्या नावाचा, तुमच्या देशाचा म्हणून

भारतासाठी । १८२