Jump to content

पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिशोबातील अचूकता

 शशीताईंचा हिशोब अचूक असे. “संस्था चिरकाल टिकण्याच्या दृष्टीने हिशोबामधील अचूकता खूप महत्वाची आहे.” असे त्या नेहमी म्हणत. सर्व हिशोब अद्ययावत आणि काटेकोर असण्यावर त्यांचा आग्रह असे. आम्हाला रु. २,३००/- बँकेचे व्याज मिळाले होते. ते उत्पन्नात न घेता व्याज फंडात जमा करून घेतल्याने हिशोब जुळत नव्हते. जेव्हा शशीताईच्या पुढे मी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा ती रक्कम इतर उत्पन्नात लिहिली, हिशोब लिहिण्यातली चूक दुरुस्त केली आहे ह्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी महासंघाच्या वार्षिक सभेसाठी वेळ दिला. आम्ही सभेचे आयोजन केले. १९९५ साली गटाच्या नोंदणीनंतर प्रत्येक गटाचे पैसे त्यांना परत करण्यात आले. लेखापरीक्षकाने पैसे प्रत्येक गटात वाटप केले, तेव्हा आमच्या गटात १०,००० ची तूट दिसत होती. जेव्हा आम्हाला ते पैसे भरायला सांगितले तेव्हा आम्ही ते नाकारले. शशीताईच्या समोर हा प्रश्न मांडला गेला तेव्हा त्यांनी आमचे म्हणणे समजून घेतले.

 हिशोब तपासले आणि आम्हाला ते समजावून सांगितले. मग आमच्या लक्षात आले की ती खरीच चूक आहे आणि आम्ही ती रक्कम भरण्याचे मान्य केले. शशीताईंनी लगेच गटाच्या नावाने तेवढे कर्ज लिहिले आणि समितीला तो चेक दिला.

रचनात्मक कामाचा मजबूत पाया

 समाजपरिवर्तनामध्ये आणि समाजाच्या, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासात, विशेषत: महिलांच्या विकासामध्ये सहविकास (सी.डी.एफ.चे तिथले स्थानिक नाव) महत्त्वाची भूमिका वठवू शकते. यासाठी पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूतपणे उभी राहू शकते याची शशीताईंनी जाणीव करून दिली. सहविकास संस्थांच्या उभारणीमुळे, महिलांमध्ये शिस्त, वक्तशीरपणा, आत्मविश्वास, बांधिलकी, इच्छाशक्ती, हिंमत, सातत्य, जिद्द, न्याय ही मूल्ये रुजविली जाऊ शकतात. स्वयंसहाय्य गटांनी प्रतिभावान, सक्षम, तज्ञ आणि कणखर नेतृत्वासोबत काम केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.

 सहविकासने घातलेल्या पायामुळे आज स्वयंसहाय्य गटाची चळवळ यशस्वी झाली आहे.

२१
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन