९७ पदे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

१)कल्याण स्वामी यांनी लिहलेले पद समर्थ रामदास स्वामीँबद्दल त्यांचे पट्टशिष्य योगीराज कल्याण स्वामी यांनी लिहलेले पद. .

सुखरूप जालो स्वामी तुमचीया पादसेवे। कल्याण माझे जालें रंगलो सोहंभावे॥ध्रु॥

चित्त हे वृत्ती माझी चैतन्यीँ मुराली। संतोषेँ स्वात्मसुखी अनुभव किल्ली दिली। निर्विकल्प वास जाला अनुभव केवळ बोली। विश्व हे नाहीँ अवघे श्रीराम स्वरूपी पाही॥१॥

पावलो धावलो देवा तुमचिया सेवाबळे। वेदांतश्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोले। ते मी स्वयंभ जालो हे शब्द मावळले। मीपण तूंपण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले॥२॥

रामावीण वृत्ती माझी आणिक न जाय कोठें। जिकडे पाहे तिकडे श्रीराम माझा भेटे। 'कल्याण' म्हणे सकळ द्वैतपण जेथे आटे। रामदासस्वामी जई आनंदुघन भेटे॥३॥२)योगीराज कल्याण स्वामीँनी समर्थ रामदास स्वामीँवर लिहलेले पद.यात त्यांनी जणू समर्थाँचे चरित्रच गायले आहे.

स्वामी माझा योगीराजा आवडतो ह्रदयी। दिवसरजनी न गमे जनी आवडे काही॥ध्रु॥

आदिशक्ती परमेश्वर षड्गुण ईश्वर। त्याचे अंतर परात्पर शुध्द विचार। योगेश्वर अपरंपार तो चि अवतार। हीन दीन जना करी पावन माझे माहेर॥१॥

अध्यात्मखाणी ग्रंथ वाणी वदोन गेली। न कळे महिमा न गणे सीमा काये बोलिली। भक्तमंडळी भूमंडळी कोणेँ मोजिली। उत्तम मूर्ति अपार कीर्ती विश्वीँ दुमदुमिली॥२॥

करूणानिधी करूणाकरेँ कृपेँ पाहिलेँ। बध्द मुमुक्षु साधक सिध्द होउनी ठेले। जडमूढ प्राणी चरणंस्पर्शे 'कल्याण' जाले। माया ममता विवरूनि पहातां निज पद लाधले॥३॥