Jump to content

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड)

विकिस्रोत कडून
विवेकानंद














विवेकानंद.


प्रथम खंड.




स्वामी विवेकानंद

यांचे

समग्र ग्रंथ.
प्रथम खंड.
१९१२



Printed and published by G. N. Kulkarni
at his Karnatak Press, No. 7, Girgaon
Back Road, Bombay.




आतां अवधारा कथा गहन ।
जे सकळ कौतुकां जन्मस्थान ।
की अभिनव उद्यान ।
विवेकतरूंचें ॥
ना तरी सकळ धर्मांचे माहेर ।
सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार ।
शारदेचें ॥

भगवान् ज्ञानेश्वर







प्रकाशकाची प्रस्तावना.
------♦------

 स्वामी विवेकानंद यांची ओळख आतां आमच्या वाचकांस नव्याने करून द्यावयास पाहिजे असे नाही. अर्वाचीन पाश्चात्य संस्कृतीचे केवळ माहेरघर अशी जी अमेरिका तेथे जाऊन ज्यांनी सनातनधर्माचे वर्चस्व स्थापिलें व थोड्याच वेळांत आपले नांव सर्वतोमुखी करून टाकलें, त्यांच्या कीर्तीत आमच्या स्तुतीने काही विशेष भर पडणार आहे असे नाही. त्यांनी बजावलेल्या कामगिरीचे खरें स्वरूप भगिनी निवेदिता यांनी आपल्या उपोद्घातांत स्पष्ट करून दाखविलेंच आहे; तेव्हां त्यासंबंधीहि कांही सांगण्याचे प्रयोजन आह्मांस उरले नाही.
 पाश्चात्य संस्कृतीच्या जबर धक्क्याने कित्येक शतकांच्या मोहनिद्रेतून आम्ही जागे झाल्यावर काही काळ आमची स्थिति फार चमत्कारिक झाली होती. गाढ अंधारांतून एकदम उजेडांत आलेल्या मनुष्याचे डोळे दिपून त्यास जसें कांहीं काळ यथार्थ वस्तुज्ञान होत नाही, तशीच आमची स्थिति झाली होती. जडवादाच्या अत्यंत मोहक स्वरूपामुळे विकृत झालेल्या आमच्या बुद्धीस 'पुराणे ह्मणजे शिमगा' वाटू लागली होती. 'अधर्म धर्ममिति या मन्यते तमसावृता। सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥' असें भगवंतांनी सांगितलेलें तामसी बुद्धीचे लक्षण आमच्या ठिकाणी पूर्णत्वाने प्रत्ययास येऊ लागले होतें. काही काळाने आमचे डोळे हळू हळू स्थिरावू लागले ही गोष्ट खरी; तथापि आमच्या बुद्धीची विकृति साफ बरी झाल्याचा प्रत्यय अद्यापिहि येत नाही. 'वेदांतानें आह्मी नेभळे झालों;' 'साधुसंतांनी आह्मांस धारकऱ्यांचे वारकरी केलें;' 'समाधि मणजे बेशुद्धि;' इत्यादि अनेक प्रकारचे जे उद्गार आह्मी काढतों, त्यांवरून आमच्या बुद्धीच्या शुद्ध स्थितीबद्दल सत्पुरुषांस शंका आली तर त्यांत नवल नाही. स्वतःच्या देहस्वाथ्याचाहि विचार न करतां ज्यांनी केवळ परोपकारार्थ आपले आयुष्य वेचलें, लोकांस सन्मार्गाचा उपदेश करणे हीच ज्यांची इतिकर्तव्यता, लोकसेवा हेच ज्यांचे ब्रीद, 'राहिलों उपकारा पुरता' हाच ज्यांचा जप, आणि 'बुडते हे जन न देखवे डोळां' ह्मणून आमचा कळवळा येऊन ज्यांनी आह्मांस मोक्षमार्ग दाखविला त्या सत्पुरुषांस अशी शेलकी फुले वाहून त्यांचा उपकार आह्मी चांगलाच फेडला ! परंतु संत दयासागर आहेत. आमच्या कृतघ्नपणाकडे लक्ष्य न देतां ते आह्मांस पुनःपुनः बोधामृत पाजीत आहेत. ते कधीं तुकारामादि रूपाने, तर कधी त्रैलोक्यविजयी विवेकानंदरामतीर्थादि रूपानें अवतरून आह्मांस सन्मार्गाचा उपदेश करतात. विवेकानंद ह्मणतात 'अनेक सद्गुरूंचा आजवर उपमर्द करून सांप्रतची कर्मदशा तुह्मी आपणांवर ओढवून घेतली आहे !' हे त्यांचे ह्मणणे अक्षरशः खरे आहे. आमच्या धर्मात काय सांगितले आहे याचे ज्ञान आम्हास आज इतरांपासून प्राप्त करून घ्यावे लागत आहे ! 'धर्म'धर्म' ह्मणून हजारों खुळसट गोष्टींस आह्मी मिठी मारून बसलों आहों. आमचा धर्म कशांत आहे, त्याचे स्वरूप काय, धर्म ह्मणजे काय, इत्यादि गोष्टी आम्हास आज कोड्यासारख्या होऊन बसल्या आहेत. आमचे जुने धर्मग्रंथ समजण्याजोगी आमची स्थिति राहिली नाही व खऱ्या धर्माचरणाच्या अभावी आह्मी एकसारखे अवनतीस जात आहों हे पाहून आमचे पूर्वकालीन ऋषि आणि संत विवेकानंदरामतीर्थादि रूपाने अवतरले व जुना सनातनधर्म नव्या रूपाने त्यांनी आह्मांस पुन्हां सांगितला.

 अत्यंत तीव्र अशा विवेचकबुद्धीच्या साहाय्याने ज्यांना धर्मशास्त्राचा अभ्यास करावयाचा असेल, त्यांनी विवेकानंदांच्या ग्रंथांचा सतत अभ्यास केला पाहिजे. त्यांचा अभ्यास मनःपूर्वक केला तर आपले प्राचीन ग्रंथहि समजण्यास सुलभ होतील. विवेकानंदांच्या विचारमौक्तिकांचा लाभ निवळ मराठी वाचकांसहि करून द्यावा, या हेतूने आम्ही हा प्रस्तुतचा उद्योग आरंभिला आहे. परमेश्वराच्या कृपेने व आमच्या मराठी वाचकवर्गाच्या साहाय्याने हे काम तडीस गेले तर अशाच प्रकारचे इतर आचार्यांचे ग्रंथ व कांहीं स्वतंत्र ग्रंथहि मराठी वाचकांस अर्पण करण्याची प्रस्तुत लेखकास उमेद आहे. ही त्याची उमेद योग्य आहे की नाही हे ठरविणे मराठी वाचकवर्गाचे काम आहे. त्यांनी योग्य प्रोत्साहन दिले तर पुढील कामगिरीस तो हात घालील; न दिले तर आपली तितकी योग्यताच नाही असे समजून तो स्वस्थ बसेल.

 स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ अजमासें दहा खंडांत पूर्ण होतील असे वाटते. प्रत्येक वर्षी तीन किंवा चार खंड प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. अशा व्यवस्थेनें ग्रंथांचा संग्रह करण्यास ग्राहकांस द्रव्यदृष्ट्या सुलभ होईल.

 स्वामी विवेकानंद यांचे चरित्र प्रथम खंडांत प्रसिद्ध करण्याविषयी कित्येकांनी पत्रद्वारा सूचना केली होती, परंतु स्वामीजींचे चांगले जीवनचरित्र आह्मांस उपलब्ध झाले नसल्यामुळे तें प्रसिद्ध करता आले नाही, त्यास आमचा नाइलाज आहे. स्वामीजींचे चरित्र मिळविण्याची आह्मी खटपट करीत आहों व ती यशस्वी झाल्यास तें आह्मी शेवटच्या खंडाच्या वेळी प्रसिद्ध करूं.

 पुस्तकप्रकाशनाच्या बाबतीत हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. आमच्या वाचकवर्गाने मनापासून साहाय्य केले तर त्यांच्या द्रव्याचा मोबदला त्यांस चांगल्या पुस्तकांच्याद्वारे देण्याची आह्मी शक्य तितकी खबरदारी घेऊ. मराठी वाङ्मयांत चांगल्या ग्रंथांची भर पडण्यासाठी कायावाचामनाने झटण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही असे आश्वासन देतो. अनेक कारणांमुळे प्रसिद्ध केलेल्या मुदतींत हा खंड वाचकांच्या हाती आह्मांस देतां आला नाही, याबद्दल आझी दिलगिर आहों. तथापि अनेक अपरिहार्य अडचणींची शिळी झालेली सबब पुढे न करतां प्रांजलपणे वाचकांची क्षमा मागून यापुढे अधिक नियमितपणा दाखवावा हे बरें. पुढील खंड जानेवारीच्या पहिल्या आठवड्यांत वाचकांस मिळेल.

 प्रस्तुत पुस्तक फार घाईने छापावें लागल्यामुळे त्याच्या छपाईत व बांधणीत काही दोष असतील ते पुढे राहूं नयेत याबद्दल शक्य तितकी खबरदारी आह्मी घेऊ.

 आमच्या या यत्नांत उदारबुद्धीने साहाय्य करण्यास व मनोभावें आह्मीं केलेली सेवा गोड करून घेण्यास आमच्या प्रिय वाचकवर्गास विनंति करून त्यांची सध्या रजा घेतो.

 मुंबई, ता. १५ सप्टेंबर     प्रकाशक.
१९१२.


भगिनी निवेदिता यांचा उपोद्धात.
------♦------

 स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या व्याख्यानांच्या योगें साऱ्या जगाला धर्ममार्गाचा खरा बोध होईलच; पण खुद्द भरतभूमीच्या लेकरांनाहि स्वतःच्या धर्माचें खरें स्वरूप कळण्यास त्यांचा आदर्शवत् उपयोग होईल. नवयुगाघाताने भरतभूमि शतधा विदीर्ण झाली आहे अशा वेळी तिच्या धर्माचें तारूंहि कोणीकडच्याकोणीकडे भडकावें यांत नवल नाही. प्रचंड वादळांत सांपडून इतस्ततः भडकणाऱ्या नौकेला चांगल्या बंदराच्या आश्रयाची अत्यंत जरूर असते. त्याच प्रमाणे हिंदुधर्मरूपी नौकेलाहि सध्याच्या काळी अशाच प्रकारच्या बंदराची अत्यंत आवश्यकता होती; ती उणीव स्वामी विवेकानंदांनी पूर्णपणे भरून काढली आहे. हिंदुधर्माचें वास्तविक स्वरूप काय आहे याचा बोध या व्याख्यानांत उत्तम रीतीने होईल.

 हिंदुस्थानांत जन्मलेल्या आणि हिंदुधर्माने दर्शविलेल्या अत्युच्च पदावर आरूढ झालेल्या एका हिंदु महात्म्याने हिंदुधर्माचा प्रसार करीत साऱ्या जगभर फिरावें ही गोष्ट इतिहासकालानंतर तरी प्रथमच घडून आली आहे. आपल्या धर्मात काय सांगितले आहे याचे ज्ञान करून घेण्याची इच्छा कोणाहि हिंदूस झाली, आपल्या मुलांस धर्मज्ञान देण्याची इच्छा कोणा मातेस झाली, तर अशी स्त्रीपुरुष विवेकानंदांच्या ग्रंथांकडे वळतील यांत संशय नाही. इंग्रजी भाषा हिंदुस्थानांतून समूळ नष्ट होण्याची वेळ कधी काळी आलीच तर त्यावेळींहि त्या भाषेतून स्वामीजींनी केलेलें ज्ञानदान शिल्लक राहून साऱ्या जगास फलद्रूप होईल यांत तिळमात्र संदेह नाही. सांप्रतकाळी विस्कळित झालेली हिंदुधर्मतत्वमौक्तिकें एका सूत्रांत गुंफून त्यांचा पक्का हार बनविण्याची अत्यंत आवश्यकता उत्पन्न झाली होती; तसेंच भौतिकशास्त्रांच्या प्रखर भट्टीतहि टिकून राहणारा धर्म जगाला सध्या हवा होता. ही दोन्ही कामें स्वामीजींनी आपल्या अमोघ सामर्थ्याने तडीस नेली. सनातनधर्मात जे चिरंतन सामर्थ्य वास करीत आहे, त्याचीहि साक्ष आपणांस येथे पटते. अत्यंत बिकट परिस्थितीतहि स्वामीजीसारखें नररत्न उदयास येऊन सनातनधर्माचा जिवटपणा जगास पटवितें, यावरून त्या धर्मातील चिरकाल टिकणाऱ्या सामर्थ्याचा पूर्ण प्रत्यय येतो.

 मानवी जीविताचे रहस्य इतरांस कथन करण्यांत स्वतःचेंहि हित आहे, ही गोष्ट आर्यभूमीस आजच प्रथम समजली असें नाही. आपणांस जें ज्ञान प्राप्त झालें आहे ते इतर देशांतील लोकांस सांगून त्यांसहि सुखाचा मार्ग खुला करून द्यावयाचा हे आर्यभूमीचे ब्रीदच आहे.

 जगांतील इतर देश अज्ञाननिद्रेत घोरत पडले असतां भगवान् बुद्धाने आपल्या शिष्यांच्याद्वारे त्यांस जागृति आणिली. आपले ज्ञान, इतरांस दिल्याने दुणावतें, ही गोष्ट आर्यभूमीच्या लक्ष्यांत आल्यास पुष्कळ काळ लोटून गेला आहे. आपल्या ज्ञानाचा देशोदेशी प्रसार केल्यामुळे हिंदुधर्मास अभेद्यरूप प्राप्त झाले आहे. पाश्चात्य देशांतील एका व्याख्यानांत स्वामी विवेकानंद ह्मणाले 'जर एक धर्म खरा असेल तर इतर धर्महि खरे असलेच पाहिजेत. सर्व धर्माचें साध्य एकच असल्यामुळे सर्व जग वस्तुतः एकधर्मीच आहे. याकरितां हिंदुधर्म जितका माझा ह्मणतां येईल तितकाच तो तुह्मां सर्वांचाहि आहे.' आपले शिष्य इतर देशांत पाठविण्यांत भगवान् बुद्धाच्या मनांत एकंदर मानवजातीबद्दल जे प्रेम वसत होते, त्याचीच पुनरावृत्ति स्वामीजींच्या या उद्गारांत आपणांस आढळून येते. दुसऱ्या एका व्याख्यानांत स्वामीजी ह्मणतात 'आह्मी हिंदुलोक इतर धर्माशी विरोध तर करीत नाहींच; पण नुसते उदासीनहि न राहतां त्यांच्या मूलतत्वांशी एकजीव जाऊन राहतो. धर्म ह्मटला की तो महंमदाने सांगितलेला असो, जरदुष्ट्राने सांगितलेला असो अथवा येशु ख्रिस्ताने सांगितलेला असो; त्यांतील सार ग्रहण करण्यास आह्मी नेहमी तयार असतो. अगदी रानटी देशांतल्या धर्मापासून तो अत्युच्च धर्मापर्यंत सर्व धर्म, हे परमेश्वरप्राप्तीचे-अनंताशी एकरूप होण्याचे मार्ग आहेत, ही गोष्ट आजपर्यंत आमच्या लक्ष्यांतून कधींहि गेली नाही. याकरितां सर्व धर्मरूप पुष्पे प्रेमसूत्राने एकत्र करून अनंताच्या चरणी अर्पण करणे हाच आमचा पूजाविधि आहे.' अमुक मनुष्य परका अथवा परदेशचा असा भाव स्वामीजींच्या चित्तास कधी शिवलाहि नाही. एकंदर मनुष्यजातीबद्दल त्यांच्या चित्तांत आपलेपणा वसत होता. सत्यमार्गाचा उपदेश त्यांनी सर्वाना एकसारखाच केला.

 अमेरिकेतील सर्व धर्माच्या परिषदेपुढे त्यांनी 'हिंदुधर्म कल्पना' या विषयावर व्याख्यान दिले, तेव्हां हिंदुधर्मतत्वांचे सामान्य निरूपण करावयाचे इतकाच त्यांचा उद्देश होता; पण त्यांच्या अमोघ वाणीचा प्रवाह सुरू झाल्याबरोबर सामान्य निरूपणाचे स्वरूप बदलत जाऊन शेवटी हिंदुधर्म आपल्या संपूर्ण तेजानें प्रकाशमान् झाल्याचे आढळून आले ! तो प्रसंगच तसा होता ! मिचिगन सरोवराच्या काठी वसलेल्या त्या शिकागो शहरांत पाश्चात्य संस्कृतीचे स्वरूप जणुं एकवटून दिसत होते. या स्वरूपांत जसा कांहीं मनोहर भाग आहे त्याचप्रमाणे कांही विषादोत्पादकभागहि आहे. यच्चयावत् पाश्चात्य देशांतील संस्कृतीतील उत्तमोत्तम तत्वांचा ज्याप्रमाणे अमेरिकेने संग्रह केला आहे त्याचप्रमाणे त्या संस्कृतीतील काही विषादकारक तत्वांचा संग्रहहि तिने केला आहे. विशेषतः शिकागो शहरांत युरोपियन संस्कृतीचे संकलित स्वरूप जितक्या उत्तम रीतीने दिसतें तितक्या रीतीने तें अमेरिकेंत इतर ठिकाणी आढळत नाही. एखादा नवखा मनुष्य प्रथमच शिकागो शहरी आला तर तेथील जनसंमर्द आणि अविरत गडबड पाहून तो गोंधळून जातो. साऱ्या जगांतले बाजारबुणगे जणुं काय एकत्र झाले आहेत असें त्यास वाटते. पण ही उथळ दृष्टि बाजूस ठेवली, तर या प्रचंड घोटाळ्यांतहि अत्यंत अंतवर्ती अशी एकतानता असून एकंदर जगास बंधुभावाचा धडा याच शहराने घालून द्यावा असा परमात्म्याचा स्पष्ट उद्देश दिसतो.

 स्वामी विवेकानंद भाषण करण्यास उभे राहिले तेव्हां त्यांजपुढे असलेला श्रोतृसमूह कोणत्या प्रकारच्या विचारांनी भरलेला असावा याचा अंदाज वरील वर्णनावरून होण्याजोगा आहे. आपल्या धर्माहून उच्च धर्म नाही आणि आपल्या संस्कृतीहून उच्च संस्कृतीहि जगांत दुसऱ्या कोठे नाही ही कल्पना त्यांस एका बाजूस ओढीत असतां कुतूहल त्यांस दुसऱ्या बाजूस ओढीत होते. स्वामीजी आपणांस नवीन असे काय सांगणार तें ऐकण्यास त्यांच्या पुढील श्रोतृगण अत्यंत उत्सुक झालेला दिसत होता. स्वामीजीसमोर अशा प्रकारचा श्रोतृसमूह असतां त्याच वेळी त्यांच्या पाठीमागे अत्यंत शांत व ज्ञानाने तृप्त झालेला असा प्राचीन ऋषिसमूह होता. हा समूह केवळ चैतन्यरूप असल्यामुळे अर्थातच बाह्यनेत्रांस गोचर होत नव्हता. हा चैतन्यसागर अत्यंत प्राचीन आहे; इतका की त्याच्या तुलनेने बौद्धधर्महि परवांचा असें ह्मणतां येईल. या सागरस्वरूप सनातनधर्मात अनेक शाखा आणि पंथ यांचा समावेश झाला आहे. थोडक्यांत इतकेंच सांगावयाचें की स्वामीजींच्या पाठीमागें हजारों वर्षांचा ज्ञानवृद्ध आणि तपोवद्ध असा भारतीय राष्ट्रपुरुष उभा होता.

 अशा रीतीने दोन चैतन्यसागर तेथे एकमेकांस भेदूं पाहत होते. अत्यंत प्राचीन आणि अत्यंत अर्वाचीन संस्कृतींचा संयोग होण्याची ही वेळ होती आणि तें कार्य स्वामीजींच्या हस्ते व्हावयाचे या ईश्वरी संकेताची तेथें पूर्तता होत होती. अशा रीतीने हा संधि होतांच त्यांतून सर्व जगास मान्य अशा नव्या स्वरूपाचा सनातनधर्म तेथें उत्पन्न झाला हे योग्यच झाले. स्वामीजींनी तेथे स्वतःचे असें कांहीच सांगितले नाही; इतकेच नव्हे तर आपल्या गुरूसंबंधीहि कांही सांगितले नाही. मागे उभ्या असलेल्या राष्ट्रपुरुषाच्या प्रेरणेस अनुसरून पासिफिक समुद्राच्या तीरावरील घोरत पडलेल्या जनतेस त्यांनी जागे केलें. कित्येक सहस्रकांचे आपले अनुभवजन्य ज्ञान भारतीय राष्ट्रपुरुष, जणुं काय, त्यांच्या मुखाने बोलत होता ! आणि तरुण असा पाश्चात्त्य पुरुष तें दिव्य ज्ञान, मोठ्या औत्सुक्याने आपल्या हृदयसंपुटांत सांठवीत होता. आपलें खरें मोठेपण आणि सामर्थ्य कशांत आहे, याचे रहस्य समजण्यास हा तरुण पुरुष अत्यंत उत्सुक झाला होता.

 स्वामीजी ज्या उच्चासनावर उभे होते, तेथेच दुसरेहि अनेक पंथांचे आणि धर्माचे आचार्य विराजमान झाले होते; परंतु विश्वव्यापी धर्मरहस्य कथन करण्याचा अधिकार एकट्या स्वामीजीसच प्राप्त झाला होता. स्वामीजींनी सांगितलेला धर्म एखाद्या महासागरासारखा असून इतर आचार्यांचे पंथ, हे त्या महासागरास मिळू पाहणाऱ्या लहान मोठ्या नद्यांसारखे होते. 'अनेक धर्म आणि अनेक पंथ हे मजकडे येण्याचेच अनेक मार्ग आहेत.' 'मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।' हा भगवान् श्रीकृष्णांचा निरोप स्वामीजींनी तेथे कथन केला. 'यद्यद्विभूतिमत्सर्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥' हे भगवंताचे वचन कथन करून, अनेक पंथांची आणि धर्माची स्वामीजींनी जणुं एकवाक्यताच केली. 'मनुष्य पापांतून पुण्याकडे प्रवास करीत नाही; दुःखांतून सुखाकडे जात नाही; अथवा असत्यांतून सत्यांत प्रवेश करीत नाही; तर कमी पुण्यांतून अधिक पुण्यांत, कमी सुखांतून अधिक सुखांत व अंधुक सत्यांतून पूर्ण प्रकाशमान् सत्यांत प्रवेश करतो. चैतन्याचा अनुभव घेऊन तो स्वतः पूर्ण चैतन्यस्वरूप होतो. ज्या दिवशी मनुष्य प्राणी स्वतः सच्चिदानंदरूप होईल त्या दिवशीच त्याच्या धर्मजीवनाचा शेवट झाला असें ह्मणतां येईल. सकल विश्वांत मृत्यूचे साम्राज्य असतां अविनाशी स्वरूप सांपडणे, विश्वाच्या स्वरूपात दरक्षणी बदल होत असतां त्याच्या स्थिर अधिष्ठानावर आपण आरूढ होणे व अनेकतेने भासमान होणाऱ्या विश्वचैतन्याची एकतानता अनुभविणे ही जीविताची इतिकर्तव्यता आहे;' असा निरोप त्या दिवशी भारतीय राष्ट्रपुरुषाने तरुण पाश्चात्य राष्ट्रपुरुषास स्वामीजींच्या मुखाने कथन केला.

 सर्व जगाला धर्मज्ञान सांगण्याचा जो हक्क भरतभूमीला आहे त्याचा जणुं ताम्रपटच स्वामींच्या हस्ते कोरला गेला आहे. स्वामींनी उभारलेली धर्माची इमारत वेदांच्या पायावर आहे; पण खुद्द 'वेद' या शब्दाची व्याख्याहि त्यांनी धार्मिकस्वरूपाची केली आहे. ते ह्मणतात 'वेद ह्मणजे पुस्तकें नव्हत. निरनिराळ्या ऋषींनी जे धार्मिक सिद्धांत ठरविले, त्या सर्वांस समुच्चयेंकरून वेद अशी संज्ञा आहे. जें कांहीं सत्य असेल तें सर्व वेद या संज्ञेस पात्र आहे.' सनातनधर्माचे स्वरूप सांगतांना ते ह्मणाले 'वेदांताच्या अत्युच्च तत्वांपासून तों पौराणिक स्वरूपाच्या मूर्तिपूजेपर्यंतचे सर्व पंथ, तसेंच बुद्धाचा शून्यवाद व जैनांचे निरीश्वरमत या सर्वांचा सनातन धर्मात अंतर्भाव होतो. हिंदूंतील अनेक मतें व मूर्तिपूजादिकांचे प्रकार इतरांच्या दृष्टीने वेडगळपणाचे दिसले तरी ती परिस्थित्यनुरूप झालेली एकाच सनातनधर्माची अनेक रूपे आहेत. प्रत्येकाची इष्ट देवता वेगळी असली ह्मणून त्याचा धर्म वेगळा होत नाही असें स्वामींचें मत होते. किंबहुना स्वतःची स्वतंत्र इष्टदेवता व इष्टमार्ग असणे हा प्रत्येकाचा हक्कच आहे असे ते ह्मणत. सनातनधर्माची ही व्याख्या मान्य केली ह्मणजे हिंदुधर्माइतकें विस्तृत साम्राज्य दुसऱ्या कोणत्याहि धर्माचें नाहीं असें दिसून येईल. किंबहुना तें विश्वव्यापी साम्राज्यच होय. खुद्द ब्रह्माची भेट होईपर्यंत सनातनधर्माचा मार्ग संपत नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे परमात्म्याची भेट कोणत्या मार्गाने घ्यावी हे ज्याचे त्याने ठरवावें. धर्मस्वातंत्र्याचे हे अत्यंत परिणत रूप आहे.

 पण सनातनधर्माची प्रौढी केवळ इतक्यानेच संपते असे नाही. प्रत्येक व्यक्तीस धर्माचे पूर्ण स्वातंत्र्य त्याने ठेविलें आहे; इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यक्ति पूर्ण स्वतंत्र-मुक्त-आहे, मृत्यूच्या पलीकडे आहे आणि केवळ आनंदरूप आहे. असें तो उच्चघोषाने सांगत आहे. 'सच्चिदानंद' या एका शब्दांत अनेक धर्माचा आणि अनेक पंथांचा अंतर्भाव होतो. या एका शब्दाच्या अनुभवाकरितांच हे अनेक धर्म आणि अनेक पंथ इतका काल खटपट करीत आहेत. एका व्याख्यानांत स्वामी ह्मणाले, 'देवळाची एक नवी इमारत बांधण्याचे काम सध्या आपणा सर्वांस करावयाचे आहे. त्या ठिकाणी येण्यास प्रत्येक व्यक्तीस पूर्ण अधिकार असावा. त्याच्या गाभाऱ्यांत फक्त ॐ या एका अक्षराचीच स्थापना करावयाची. या कामी आपणा सर्वांच्या मदतीची मी याचना करतो.' स्वामीजींचे हे शब्द ऐकून आह्मांपैकी कित्येकांच्या मनांत भरतभूमिरूपी विश्वदेवालयाची कल्पना उभी राहिली. जगांतील सर्व धर्माचे लोक या प्रचंड देवालयांत एकवटले आहेत. नामरूपातीत अशा स्वरूपाची भेट घ्यावयाची हाच त्यांचा उद्देश आहे. आह्मी अनंत मार्गानी चालत असलो, तरी सर्वांच्या भेटीचे ठिकाण सनातनधर्मातच आहे. दृश्यांतून अदृश्यांत प्रवेश करणे, आकारांतून निघून निराकारांत जाणे आणि अनंतत्वांत एकत्व अनुभविणे हाच सर्वाचा उद्देश आहे. याविरुद्ध कोणीहि मार्ग आक्रमण करीत नाही, असे सांगणाऱ्या धर्माची इतर सर्व उच्च धर्माशी एकवाक्यता असली तर त्यांत नवल काय ? इतर मोठ्या धर्मात आणि सनातनधर्मात फरक असला तर तो इतकाच की स्वतःस पवित्र व इष्ट वाटणाऱ्या मार्गाने जाण्याची त्याने प्रत्येकास पूर्ण परवानगी दिली आहे.

 स्वामीजींनी निवळ आपल्या पदरचें असें कांहीसुद्धा सांगितले नाही. भगवान् श्रीकृष्णाप्रमाणे, अथवा भगवान् श्रीशंकराचार्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक वाक्य श्रुति आणि उपनिषदें यांच्या आधारानेच उच्चारले आहे. सनातनधर्म नव्या परिस्थितीस अनुकूल अशा स्वरूपाने सांगावयाचा इतकीच कामगिरी त्यांनी केली. स्वामीमहाराज जन्मास आले नसते तरी त्या प्रमेयांस कांही उणीव आली असती असें नाहीं. फरक इतकाच की, नव्या परिस्थितीमुळे त्यांचे स्पष्ट स्वरूप आह्मांस समजले नसते. त्यांतील विरोधाभासाने आमचा गोंधळ झाला असता. आह्मासारख्या आर्तांस मोक्षमार्ग आज पूर्ण उघडला गेला आहे, तो स्वामीजींच्या अभावी बंद राहिला असता. सनातनधर्माचे प्रवचन स्वामींनी पूर्ण अधिकारयुक्त वाणीने केले आहे; पण तें केवळ वाक्पटु पंडिताप्रमाणे नसून अनुभवी ब्रह्मनिष्ठाप्रमाणे केलें आहे. स्वामी श्रोत्रीय असून ब्रह्मनिष्ठहि होते. चैतन्यरत्नाकराच्या तळापर्यंत बुडी मारून तेथील संपूर्ण कोश त्यांनी प्रथम हस्तगत केला आणि नंतर आह्मां पामरांच्या करुणेस्तव तो मार्ग त्यांनी प्रकट केला. हा आप्त, हा परका, हा ब्राह्मण आणि हा चांडाळ असा भेद मनांतहि न आणतां त्यांनी हे गुह्य सर्वांस सारखेंच प्रकट केले.

 त्यांनी नवें असें कांहींच सांगितले नाही असें ह्मटले, तथापि तसें ह्मणणेहि थोडेंसें अयुक्त आहे. अद्वैतसिद्धांत हा यच्चयावत् धर्ममार्गाचा मुकुटमणि आहे, असे सांगतांना त्यांनी द्वैत आणि विशिष्टाद्वैत या अद्वैतसिद्धांताच्या पायऱ्या आहेत असेंही सांगितले, हे विसरता कामा नये. परमेश्वर साकार आहे आणि निराकारहि आहे, असें भगवान् श्रीरामकृष्ण ह्मणत असत. एकाच ब्रह्माची व्यक्त आणि अव्यक्त अशी दोन स्वरूपें असून निरनिराळ्या दर्जाच्या भावनेनुरूप त्यांचा अनुभव होतो, आणि सर्वत्र एकरूपच पाहणे 'एकमेवाद्वितीयम्' असा अनुभव होणे ही अत्युच्च अनुभवाची भावना आहे, असें श्रीरामकृष्ण यांचे मत होते. त्याचाच अनुवाद सशास्त्र पद्धतीने करून स्वामींनी या परस्परविरोधी दिसणाऱ्या मतांची एकवाक्यता केली हे विसरता कामा नये. स्वामींच्या प्रवचनांत जो नवीनपणा आहे, तो हाच.

 अशा रीतीने पौर्वात्य व पाश्चात्य आणि जुनें व नवें यांचा पूर्ण संधि करून भांडणाचें बीजच ज्यांनी दग्ध करून टाकले ते माझे सद्गुरु धन्य होत! धर्ममंदिरावर हा कळसच त्यांनी उभारला असें कोण ह्मणणार नाही? जर 'एकमेवा द्वितीयम्' हे खरे आहे तर पूजनाचे सर्व मार्ग खरे आहेत, एवढेच नव्हे तर सर्व प्रकारची कर्मे आणि एकंदर जीवनक्रम हे सर्व पूजाविधिच आहेत असें ह्मणावयास काय हरकत आहे? याकरितां अमुक कृत्य ऐहिक आणि अमुक पारलौकिक हा भेदसुद्धा खोटाच ह्मटला पाहिजे. कर्म करणे हा सुद्धा पूजाविधीच आहे. मनोजय हाच त्याग. सर्व मानवी जीवनक्रमच धर्मरूप आहे. सदैव कार्यमग्न राहणे हे जितके कठीण आहे, तितकेंच संन्यस्त होणें हेंहि आहे. दोहोंचेंहि अंतिम पर्यवसान एकच.

 ज्ञान आणि भक्ति यांपासून कर्म वेगळे नाही असें विवेकानंदांनी सांगितले त्याचे रहस्य हेच होय. परमेश्वराची भेट मठांत अथवा देवळांतच होते असें नाही; तर ती एखाद्या कारखान्यांत अथवा शेतांतील झोंपडीतहि होऊ शकते. परमेश्वराच्या सेवेत राहून जसा परमेश्वर भेटतो, तसाच तो मनुष्याच्या सेवेनेहि भेटतो. जनतेची सेवा तीच परमात्म्याचीहि सेवा होय. जनतेच्या सेवेकरितां लढणारा वीर आणि कोणाच्या स्तुतीचीहि अपेक्षा न करितां आपल्या उद्दिष्ट सिद्धीकरितां खटपट करणारा सामान्य मनुष्य यांची योग्यता स्वामींच्या दृष्टीने सारखीच आहे. आपणांस धार्मिक न ह्मणवितां खऱ्या सन्मार्गाने चालणारा मनुष्य आणि अत्यंत धार्मिक मनुष्य यांत योग्यतेच्या दृष्टीने फरक नाही, असें ते ह्मणत. 'सर्व भौतिकशास्त्रे, विद्या व धर्मशास्त्रे एकाच सत्याचा शोध करीत आहेत; पण हे बरोबर समजण्यास आपणांस अद्वैतसिद्धांत प्रथम नीट कळला पाहिजे, असें स्वामींनी एके ठिकाणी ह्मटले आहे. त्यांच्या एक लेखांत व व्याख्यानांत याच तत्वाचा त्यांनी सर्वत्र अनुवाद केला आहे; किंबहुना त्यांचे सर्व लेख व व्याख्याने या एकाच तत्वाच्या प्रतिपादनार्थ केलेल्या टीकाच आहेत असें ह्मणण्यास प्रत्यवाय नाही.

 स्वामी विवेकानंद यांनी संस्कृत आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचे चांगले अध्ययन केले होते. या दोन्ही संस्कृतींचा परिणाम स्वामीजींच्या मनावर एकदम झाल्यामुळे त्यांच्या परस्परविरोधी स्वरूपाकडे त्यांचे चित्त वेधले. परस्परविरुद्ध अशा या संस्कृतीत सत्य कोणती याचा विचार मनांत आल्यावर त्यांची बुद्धि आपोआप जागृत होऊन विचारमालिकेस सुरवात झाली. विवेचकबुद्धीचे पूर्ण समाधान होईपर्यंत मध्यंतरी कोठेहि विसावा न घेतां सशास्त्र पद्धतीने या दोन्ही संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला. या मार्गाचें अंतिम पर्यवसान अद्वैतमतांत झाले. पूर्वकालीन ऋषींना तरी अद्वैतसिद्धांत कांही अगम्य रीतीने अथवा केवळ दैववशात् प्राप्त झाला होता असे नाही. त्याकरितां त्यांनाहि आपल्या बुद्धीस आटोकाट ताण द्यावा लागला होता.

 ज्या अद्वैताची सिद्धि बुद्धीने केली होती, त्याचेच प्रत्यक्ष स्वरूप नरेंद्रास (विवेकानंदाचें पूर्वाश्रमीचें नांव) दक्षिणेश्वराच्या देवालयांतील उद्यानांत दिसले. पूर्वकालीन ऋषींनी सांगितलेलें व बुद्धीनें कबूल केलेलें रूप भगवान् श्रीरामकृष्ण या विभूतींत अवतरलें आहे, अशी नरेंद्राची खात्री झाली. ज्याचें परोक्ष वर्णन ग्रंथांनी केलें तें रूप त्यांस प्रत्यक्षच दिसले. समाधि हाच ज्यांचा ज्ञानाजनांचा मार्ग व ज्यांचे भाषण ह्मणजे प्रत्यक्ष ज्ञानाचें व्यक्तरूप अशा श्रीरामकृष्णांचे त्यांस दर्शन झाले. त्यांच्या दर्शनाबरोबर परमात्मदर्शनाची उत्कंठा उद्भवली. क्षणक्षणा वाढणाऱ्या तापाप्रमाणे ती इच्छा बळावत गेली. ग्रंथांनांहि ज्याचे पूर्ण वर्णन करतां आले नाही त्या स्वरूपांत निमग्न असणाऱ्या श्रीरामकृष्णांस ग्रंथांत काय सांगितले आहे याची खबरहि नव्हती! श्रीरामकृष्णांच्या प्रसादाने मानवी जीविताचें रहस्य विवेकानंदांनी हस्तगत केले.

 पण इतक्यानेच त्यांच्या कार्याची पूर्वतयारी संपली नाही. यानंतर त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करून अनेक संतमहंत आणि श्रोत्रीय यांच्या भेटी घेतल्या. सामान्य मनुष्यांशीहि स्वामीजी अगदी बरोबरीच्या नात्याने वागत. सामान्य मनुष्यापासूनहि जे घेण्यासारखे दिसले, त्याचा त्यांनी संग्रह केला. परमहंस श्रीरामकृष्ण आणि इतर संत यांच्यापासून ज्याप्रमाणे भरतभूमीच्या प्राचीन स्वरूपाची माहिती त्यांस मिळाली त्याप्रमाणे सध्याच्या भरतभूमीची माहिती त्यांनी सामान्य जनांपासून मिळविली.

 अशा रीतीनें जें ज्ञान त्यांनी, शास्त्रे, सद्गुरु आणि प्रवास यांच्यायोगें प्राप्त करून घेतलें, तेंच त्यांनी जगास परत दिले. ज्ञानाच्या या त्रिविधरूपाची छाया त्यांच्या सर्व भाषणांत स्पष्ट उमटलेली आहे. या त्रिविधज्ञानापासून सर्व जगाचा ताप हरण करणारी दिव्य औषधि त्यांनी निर्माण केली. या तीन वातींनी जो ज्ञानदीप भरतभूमीने त्यांच्या हस्तें लाविला आहे, त्याच्या योगाने तिच्या मुलांचाच नव्हे तर सर्व सृष्टीचा मोक्षमार्ग प्रकाशित झाला आहे. ता. १९ सप्टेंबर १८९३ पासून ता. ४ जुलै १९०२ पर्यंतच्या कालांत हे सर्व काम त्यांनी केले. ज्या भूमीनें हे नररत्न आह्मांस दिले तिचा सदा विजय असो! ज्यांच्या प्रेरणेने तें प्रकट झाले ते विजयी असोत! त्यांनी केलेल्या कार्याचा अंतिम हेतु जाणण्याची बुद्धि आह्मांस नाही.

रामकृष्ण-विवेकानंदशिष्या,

निवेदिता.

अनुक्रमणिका.


भगिनी निवेदिता यांची प्रस्तावना . . . . १

सर्व धर्मांच्या परिषदेपुढील व्याख्याने . . . १

आत्मा, परमेश्वर आणि धर्म . . . . . २४

हिंदुधर्म . . . . . . . . ३९

कर्मयोग . . . . .४७

धर्म म्हणजे काय? . . . १६३

अनुभवाचा मार्ग . . . . . १८२

विवेचकबुद्धि आणि धर्म . . . . १९९

आर्यज्ञानमंदिराची सोपानपंक्ति . . . . . २२४

वेदांतमताचे जगावर घडलेले सुपरिणाम . . २३५

खासगी पत्रे . . . . . . . २४५

भगवान् श्रीरामकृष्ण परमहंस.



स्वामी विवेकानंद.


ब्रह्मस्वरूप ब्रह्मज्ञ ब्रह्मभावे च तत्पर ।
ब्रह्मबीजस्वरूपेण ब्रह्मबीज नमोस्तुते ॥