सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत

प्रि. भाटे यांची प्रवासवृत्तमाला
पुष्प ४ थें
सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत
लेखक व प्रकाशक :
गोविंद चिमणाजी भाटे
पुणें, डे. ए. सोसायटीचे सेवानिवृत्त आजीव सभासद
( सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत )
किंमत १। रुपाया
मुद्रक :
रा. रा. अनंत विनायक पटवर्धन, बी. ए.
आर्यभूषण प्रेस, भांडी पेठ, घर नं. ९३६।३
पुणे, नं. ४
₪ ₪ ₪ ₪ ₪
₪ ₪ ₪ ₪ ₪
प्रकाशक :
गोविंद चिमणाजी भाटे,
महाड, जिल्हा कुलाबा.
श्रीमंत रामराव व्यंकटराव भावे
रामदुर्ग संस्थानचे अधिपति
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे
व्हाईस प्रेसिडेंट
यांना
विलिंग्डन कॉलेज सांगली या संस्थेवरील
त्यांच्या सक्रिय कृपादृष्टीबद्दल आदर-
बुद्धि बाळगणाऱ्या त्यांच्या स्नेहां-
कित लेखकानें 'सिंध प्रांताचें
वर्णन व वृत्तांत' हें पुस्तक
सप्रेम अर्पण
केलें आहे.
गो. चि. भाटे.
संकलित क्रमाप्रमाणे माझ्या प्रवासवृत्त मालेचे चवथें, पण लिहिण्याच्या व छापण्याच्या क्रमाप्रमाणे नववें पुष्प याची प्रस्तावना मी मुंबईमध्ये व मुलाच्या लग्नाच्या गडबडीत लिही आहे. अटकेपार प्रवास हे पुष्प सन १९३५च्या सपटंबरमध्यें प्रसिद्ध झालें. तव्हांपासून माझा आजार व तो बरा होण्याकरितां करावी लागलेली शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेची जखम या तापत्रयामध्ये माझे तीन महिने गेले. नंतर सिंध प्रांतांत मी सन १९३५ च्या नाताळच्या सुटीत माझे बंधूबरोबर पुन्हा एकदां प्रवास केला व नंतर प्रवासवृत्त लिहून छापण्याच्या कामास लागलों. पण काम लवकरच संपावें म्हणून शक्य ठिकाणी मला माझ्या मुलाची मदत घ्यावी लागली. तदनुरूप चि. प्रो. मनोहर गोविंद भाटे याने या पुष्पाची ऐतिहासिक प्रकरणे लिहिली व प्रुफे तपासण्याचे काम चि. डॉ. वसंत गोविंद भाटे यानें केलें. याप्रमाणे या पुष्पाच्या प्रकाशनाच्या कामांत आम्हां तिघांच्या श्रमाचा त्रिवेणी संगम घडून आलेला आहे. छापण्याची प्रत तयार झाली पण दोन महिने छापखान्याला निकडीच्या कामामुळे पुस्तक हातीं घेण्यास सवड झाली नाहीं. यामुळे प्रकाशनास उशीर झाला.
सिंध प्रांताचें वर्णन व माझ्या दशपुष्पात्मक प्रवासवृत्ताचे लवकरच प्रसिद्ध होणारें पुस्तक ही दोन्हीं वर्णनें मीं या मालेकरितां मुद्दाम व स्वतंत्रपणे लिहिलेलीं आहेत. दशयोजनात्मक लांबच्या लेखनरूपी प्रवासाचे शेवटचें बंदर दिसूं लागलें व आणखी तीनचार आठवड्यांमध्ये मी बंदरीं सुखरूप पोहोंचणार अशी मला खातरी वाटत असल्यामुळे मला मोठें समाधान वाटत आहे. पावणेदोन वर्षांपूर्वी केलेल्या योजनेनुरूप वाचकांच्या व ग्राहकांच्या ऋणांतून मी लवकर मुक्त होणार या आनंददायी मनःस्थितींत मी ही प्रस्तावना पुरी करतों व माझें सिंध प्रांताच्या वर्णनाचें पुष्प वाचकांच्या हातीं देतों तें पुष्प वाचकांस सुवासिक वाटेल अशी आशा आहे.
| महाड, जिल्हा कुलाबा, | ||
| गो. चि. भाटे. | ||
| ता. १२ मे सन १९३६. |
| प्रकरण | नांव | पान |
|---|---|---|
| १ | विषयप्रवेश | १-४ |
| २ | सिंधु नदी व सिंध प्रांत | ५-९ |
| ३ | कराची शहर व बंदर | १०-२९ |
| ४ | जुनीं तीन प्रख्यात शहरे | ३०-४८ |
| ५ | आर्य पूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष | ४९-६६ |
| ६ | सक्करचें धरण | ६७-८३ |
| ७ | सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र | ८४-९६ |
| ८ | हैद्राबाद - मिरपुरखास - उमरकोट | ९७-११४ |
| ९ | इतिहास पूर्वकाळापासून इ. स. ७१० पर्यंतची आर्य- बौद्ध कारकीर्द | ११५-१२४ |
| १० | मुसलमानी - हिंदु कारकीर्द | १२५-१४८ |
| ११ | ब्रिटिश अंमलाखालचा सिंध | १४९-१५७ |
| १२ | स्वतंत्र सिंध प्रांताची राज्यघटना व भावी स्थिति | १५८-१६८ |
| नंबर | नांव | पान |
|---|---|---|
| श्रीमंत रामराव व्यंकटराव भावे, संस्थान रामदुर्ग | दर्शनी | |
| १ | कराची : खालिकदिना हॉल | १८ |
| २ | कराची : म्युनिसिपल ऑफिस | १८ |
| ३ | लेडी लॉइड पियर, क्लिफ्टन | १९ |
| ४ | कराची : फ्रियर हॉल | १९ |
| ५ | कराची : मनोरा दीपगृह | २४ |
| ६ | मंगापीर | २४ |
| ७ | द्रिगरोड : आकाशयानाचा मनोरा | २५ |
| नंबर | नांव | पान |
| ८ | शिकारपूर : टाऊन हॉल | ४० |
| ९ | " : आगीन आखाडा | ४० |
| १० | " : स्काऊट गृह | ४१ |
| ११ | " : शाही बाग | ४१ |
| १२ | " : होपफुल ॲकॅडमी | ४२ |
| १३ | " : गोशाळा | ४२ |
| १४ | " : उद्धवदास ताराचंद इस्पितळ | ४३ |
| १५ | " : शीतगृह | ४३ |
| १६ | मोहंजोदारो : खोदलेले शहर | ५२ |
| १७ | " : स्तूप | ५२ |
| १८ | " : हलतें खेळणें | ५३ |
| १९ | " : रेड्याचें चित्र | ५३ |
| २० | सक्कर : साधुवेला तीर्थं | ७२ |
| २१ | " : बनखंडीजी स्वामी | ७२ |
| २२ | " : साधुबेला बेटाचा देखावा | ७३ |
| २३ | " : धरणाचा देखावा | ८२ |
| २४ | वायव्य कालव्याचा देखावा | ८२ |
| २५ | सक्कर : कालव्यांचीं मुखें | ८३ |
| २६ | रोहरी : दगडांची खाण | ८८ |
| २७ | संक्रद : पुसा तंबाखूचें झाड | ८८ |
| २८ | " : पुसा तंबाखू | ८८ |
| २९ | " : अमेरिकन कापसाचें झाड | ८९ |
| ३० | " : इजिप्शियन कापसाचें झाड | ९० |
| ३१ | " : तंबाखूचे झाड | ९१ |
| ३२ | " : सिंधमुधार | ९२ |
| ३३ | हैद्राबाद : जुनी मशीद | १०२ |
| ३४ | " : जुना बाजार | १०२ |
| ३५ | " : मशीद | १०३ |
| ३६ | " : कोट्री पूल | १०३ |
सन् १८९५ च्या जानेवारीमध्यें माझी एम. ए. ची परीक्षा पास होऊन माझी विद्यार्थीदशा संपली व मी लागलीच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा आजीव सभासद होऊन शिक्षणाच्या कामाला आपले आयुष्य वाहून घेतलें. तेव्हांपासून आजतागाईतच्या चाळीस वर्षांमध्यें मीं कधीं कामाकरितां, कधीं करमणुकीकरितां केव्हां मुलां- माणसांसकट तर केव्हां मित्रमंडळीसमवेत व कांहीं तर एकट्यानेंच हिंदुस्थानांतील दूरदूरच्या प्रांतांत व हिंदुस्थानाबाहेरील प्रदेशांत प्रवास केला आहे. सन १९१० पर्यंत माझ्या प्रवासाचे वृत्त लिहावें व तें प्रसिद्ध करावें अशी कल्पना किंवा वासना माझ्या मनांत उद्भूत झाली नाहीं. कारण तेथपर्यंत मनोरंजनाचे कर्ते कै. काशीनाथ रघुनाथ मित्र यांच्यासारखे मराठी वाङ्मयप्रोत्साहक मित्र मला मिळाले नव्हते. पण माझ्या पूर्ववयांतील प्रवास व त्यांत पाहिलेली प्रेक्षणीय स्थळें व सृष्टिसौंदर्य कमी मनोवेधक होते किंवा त्याचा ठसा माझ्या मनावर कमी कायमचा उठला होता असें मात्र नाहीं. माझ्या डोळ्यांसमोर अझूनसुद्धां त्या माझ्या पूर्ववयांतील प्रवासाचें मूर्तिमंत चित्र उभे रहात आहे. उ. पुणे-सातारा रस्त्यावरील पुण्यापासून बावीस मैलांवर असलेलें बनेश्वर हे ठिकाण घ्या. किती आश्चर्यकारक व आल्हाददायक तें स्थान आहे! अर्ध्या पाऊण मैलाचें तें रस्त्याच्या आजूबाजूचें दाट व गर्दछाय रान, नदीच्या दरडीला बांधलेलें तें काळ्या माठीव दगडाचे चिरेबंदी देऊळ, देवळापुढे काळ्याभोर दगडांनी बांधलेलीं तीं पाण्याचीं प्रशस्त कुंडें, गायमुखांतून पडणारा तो पाण्याचा पांढराशुभ्र झोत, कुंडांतील पाण्याचा तो सतेज हिरवटनीळसर रंग व त्यांत इतस्ततः पोहणारे लहानमोठ्या आकाराचे ते लालभडक मासे हा देखावा विलक्षण चित्ताकर्षक आहे व तो एकदां पाहिला म्हणजे त्याचा कायमचा ठसा मनःफलकावर उठतो. माझ्या मनाची तीच स्थिति आहे. तसेंच, अतिपरिचयात् अवज्ञा या नात्यानें लोणावळ्याच्या आसपासची वनश्री व प्रेक्षणीय स्थळें यांचेकडे दुर्लक्ष होतें खरें. पण मी माझ्या विद्यार्थीदशेमध्यें लोणावळ्या- नजीकचे लोहगड व विसापुर हे जोडकिल्ले, भाजेगांवचीं लेणीं व प्रख्यात ड्यूक्सनोझ हीं स्थळें पाहिलीं होतीं व त्यांचा वज्रलेप ठसा माझ्या मनावर अझूनही उमटलेला आहे. एकदां मला फर्ग्युसन कॉलेजच्या कामाकरितां मध्यप्रांतांत प्रवास करण्याचा प्रसंग आला होता, तेव्हां नुकत्याच तयार झालेल्या जबलपूर गादिया रेलवेरस्त्यानें मीं आगगाडीचा प्रवास केला. मध्य प्रांताचा हा सर्व भाग जंगलमय आहे. जिकडे पहावें तिकडे हिरवे हिरवे गार रानच रान व छोटी छोटीं पत्र्याच्या छपराची स्टेशनें लागत; पण त्या पत्र्यांवर सतेज व हिरव्यागार वेलीच वेली लावलेल्या असल्यामुळे व त्या वेलींच्या विलक्षण वाढीमुळे तिकडली स्टेशने म्हणजे वनदेवतांनीं आपल्या विहाराकरितां तयार केलेले सुंदर लतामंडपच आहेत की काय असें वाटे. नाना रंगांच्या रानफुलांनीं शोभायमान झालेल्या वृक्षवेली जिकडे तिकडे दृग्गोचर होत. यामुळे हा सर्व भूमिभाग म्हणजे एक विस्तीर्ण उपवनच आहे असें वाटे. या वनश्रीच्या सौंदर्याचा ठसाही माझ्या मनावर वज्रलेप उमटलेला आहे. असो.
पण सन १९१० पासून मनोरंजनकारांच्या आग्रहानें व प्रोत्साहनानें मी पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांची व केलेल्या प्रवासांची वर्णनें लिहूं लागलों व त्यांची व अलीकडच्या वर्षदोन वर्षांमध्यें केलेल्या प्रवासांची एकसाची आवृत्ति काढण्याची योजना मी केली व लिहिण्याच्या कालक्रमानें आतां शेवटलें पुष्प मी गुंफीत आहे.
मी सिंध प्रांतांत दोनचार वेळां जाऊन आलेला आहे. प्रथमतः मी कराचीस गेलों तेव्हां त्या शहराचा विस्तार व वाढ, तेथला तो रुंदच रुंद बंदर रोड, तेथल्या त्या सुंदर सुंदर सार्वजनिक इमारती, टोलेजंग दुकानें, मोठमोठ्या उंच बांधणीच्या पांढऱ्यासफेत चाळी व सुबक राहते बंगले, सर्व शहरामध्यें विखुरलेल्या छोट्या बालोद्यानयुक्त बागा (recreation grounds), शहराच्या दूरदूरच्या भागांत केलेली द्राक्षाच्या मळ्यांनीं व विविध वृक्षवेलींनी शोभायमान झालेलीं उपवनें (Parks) इत्यादि प्रेक्षणीय स्थळें पाहून मी तोंडांत बोटच घातलें ! कराची ही नवी राजधानी निर्माण करण्यांत आली आहे असें मला वाटलें. पण त्यावेळीं सिंधप्रांत व कराची हीं मुंबई इलाख्याच्या एका विभागांत मोडत होतीं. सिंध स्वतंत्र व वेगळा प्रांत करण्याची योजना व कल्पनाही जगजाहीर झालेली नव्हती. मात्र कराची पाहिल्यावर व तेथल्या मुंबई राजधानीला लाजविणाऱ्या इमारती पाहिल्यावर मला कराची ही राजधानीच आहे असा भास झाला. तेव्हां सरकारी अधिकाऱ्यांचा पूर्वीपासून सिंध स्वतंत्र करण्याचा गुप्त कट होता कीं काय न कळे. पण राजधानीला योग्य असें कराची शहर बनविण्यांत आलेले आहे असें कराचीस जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशास वाटल्याखेरीज रहाणार नाहीं हें खास. नंतर मी पुनः एकदां कराचीस गेलों तेव्हां सिंध स्वतंत्र व वेगळा करण्याची योजना जगजाहीर झाली होती. आतां तर सिंध स्वतंत्र व वेगळा करण्याची योजना हिंदुस्थानच्या सन १९३५ च्या नव्या राज्यघटना कायद्यांत अन्तर्भूत झाली आहे व एप्रिल सन १९३६ पासून हा प्रांत वेगळा व स्वतंत्र होणार हे निश्चित झालें आहे. तदनुरूप बादशहांचें आज्ञापत्रही जाहीर झालें आहे. तेव्हां पुष्कळ काळपर्यंत मुंबई इलाख्यांत अंतर्भूत असलेल्या व लवकरच मुंबई इलाख्यापासून वेगळा व स्वतंत्र होणाऱ्या प्रांताचें वर्णन व वृत्तांत या संधिकाळांत प्रसिद्ध करावें असें मीं मनांत आणले व तदनुरूप मी लिहिण्यास लेखणी हातीं घेतली. मात्र या गेल्या वर्ष दीड वर्षामध्यें जेव्हां जेव्हां मी कराचीस गेलों व सिंध प्रांत पाहिला तेव्हां तेव्हां मला हिंदु संयुक्त कुटुंबाची व त्यांत घडून येणाऱ्या दुःखद पण अपरिहार्य प्रसंगाची सारखी आठवण होत होती. हिंदु कुटुंबाच्या कर्त्या पुरुषानें आपल्या सर्व मुलांचें उत्तम प्रकारें संगोपन करावें, त्यांच्या राहण्या- जेवणाची, सुखसोयीची तजवीज करावी, त्यांना विद्यादान देऊन उद्योगधंद्यास लावावें; इतकी त्यांची उत्तम व्यवस्था केल्यानंतर व बऱ्याच काळपर्यंत सर्व मुलें गुण्यागोविंदानें एकत्र राहिल्यावर एका धाकट्या भावानें स्वतंत्र व वेगळा होण्याचा हट्ट धरावा व मग तो हट्ट संयुक्त कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला पुरविणें भाग पडावें, तशीच सध्यां मुंबई इलाख्याची स्थिति झाली आहे असें मला वाटलें. पण अशा गोष्टी कालेकरून होणारच असें मानून समाधान मानल्याखेरीज गत्यंतर नाहीं. येवढी प्रस्तावना करून मी माझ्या सिंध प्रांताच्या वर्णनास व वृत्तांतास सुरवात करतों. प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थळांच्या वर्णनास लागण्यापूर्वी ज्या सिंधू नदीनें सिंध प्रांताला जन्म व नांव दिलें त्या नदीचें व सिंध प्रांताचे सामान्य स्वरूप सांगणे इष्ट होईल. व तें एका स्वतंत्र प्रकरणांत करणें बरें.
सर्व हिंदुस्थानांत पंधराशें मैल लांबीच्या आंतबाहेर लांबी असलेल्या नद्या तीनच आहेत. त्या सर्व हिमालयाच्या कन्या असल्यामुळे बहिणीबहिणीच आहेत; मात्र दोघी बहिणी सख्या तर एक सावत्र म्हणतां येईल. त्या तीन नद्या म्हणजे अर्थात् गंगा, सिंधु व ब्रह्मपुत्रा या होत. हिमालयाच्या जवळजवळ मध्यावर असलेल्या व दहा हजार फूट उंच असलेल्या गंगोत्री या ठिकाणाच्या हिमगुहेंतून गंगानदी उगम पावते व सुफी येथें हिमालय फोडून खालीं सपाटीवर हरिद्वार येथें येते. तिला हिमालयाच्या दक्षिण पाणलोटापासून झालेल्या लहान- मोठ्या नद्या येऊन मिळतात. गंगानदी प्रथम दक्षिणवाहिनी असून सपाट प्रदेशांत आल्यावर जवळजवळ पूर्ववाहिनी होते व उगमापासून सुमारें सोळासतराशे मैल वाहिल्यावर बहुविध मुखांनी बंगालच्या उपसागरास मिळते. या नदीच्या कांठावर हिंदुस्थानांतील कितीतरी पुरातन व प्रख्यात शहरें वसलेलीं आहेत!
ब्रह्मपुत्रा व सिंधु या दोन नद्या हिमालयाच्या उत्तरेस असलेल्या कैलास पर्वताच्या पूर्व व पश्चिम पाणलोटापासून निघतात पण परस्पर विरुद्ध दिशेनें वहात जातात. ब्रह्मपुत्रा प्रथम कैलास पर्वताच्या पूर्व दिशेनें व हिमालय पर्वताच्या उत्तर उताराने वहात जाते व हिमालयाचें पूर्व टोंक गांठल्यावर मग दक्षिणेकडे वळून हिंदुस्थानच्या आसाम प्रांतांत वहात येते व शेवटीं गंगेशेजारींच नव्हे गंगेच्या पद्मा नांवाच्या पूर्वेकडील फाट्याशी संगत होऊन बंगालच्या उपसागरास मिळते. उगमापासून मुखापर्यंत या नदीची लांबी सुमारें अठराशें मैल आहे. या नदीचा बऱ्याच लांबीचा भाग तिबेट देशांतून वहातो. ब्रह्मपुत्रेच तिबेटी नांव नारीचु असें आहे. हिंदुस्थानांत ती बऱ्याच डोंगराळ भागांतून वहाते व यामुळे गंगेप्रमाणें या नदीवर पुरातन कालापासून प्रख्यात अशी फारशीं शहरें नाहींत.
सिंधू नदी ही कैलास, गारटंगचु व लँगचू या तीन हिमनगांपासून झिरपणाऱ्या झऱ्यांनीं बनते. ही नदी तिबेट, काश्मीर संस्थान, वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब व सिंध या पांच प्रदेशांतून वहात जाऊन बहुविध मुखांनी आरबी समुद्राला जाऊन मिळते. हिच्या सुमारें सतराशें आठराशें मैल लांबीच्या प्रवाहांतील पांचशे मैलांच्यावर लांबीचा व शेवटचा प्रवाह सिंध प्रांतामधून गेलेला आहे. तिबेटामध्यें ही नदी लहानच आहे. तिची त्या प्रांतांत तीनशें मैलांची लांबी आहे. नंतर ती काश्मीर संस्थानच्या लडक परगण्यांत शिरते. लडकचें मुख्य शहर लेह याचेनजीक सिंधुनदी इतकें विलक्षण वाकण घेते की ती एकदां वायव्य दिशेने वाहतांना दिसते तर एकदां नैर्ऋत्य दिशेनें वाहतांना दिसते. लेह शहराच्या जरा पुढे सिंधूला नैर्ऋत्येकडून हिमालयाच्या मुख्य पर्वतराजीकडून येणारी झसकर नदी येऊन मिळते व सिंधुनदी मोठे स्वरूप धारण करते; पण अझून ती पंधरा हजार फूट उंचीच्या भूमिभागांतून वहात असते. झसकरप्रमाणें दुसरी मोठी नदी शायाक काराकोरान पर्वतराजीपासून उगम पावून सिंधूला समांतर वहात जाऊन काश्मीरच्या बाल्टिस्थान नांवाच्या परगण्याचें मुख्य शहर स्कार्डु याचेनजीक सिंधूला येऊन मिळते. मग ही महानदी बनते व रकपोशी व नंगा पर्वत या दोन पंचवीस हजार फूट उंचीच्या पर्वतशिखरांच्या मधल्या दहा हजार फूट उंचीच्या खिंडींतून बाहेर पडून काश्मीर संस्थानच्या गिलजित परगण्यांत प्रवेश करते. तेथें तिला गिलजित नदी मिळते. येथें सिंधु नदी पांच हजार फूट उंचीच्या भूमिभागावर येते. उगमापासून गिलजित नदीच्या संगमापर्यंत सिंधू सारखी वायव्य दिशेनें वहात असते पण येथून ती दक्षिणेकडे वळते; वळल्यावर भुंज शहरानजीक येते व नंगापर्वताच्या पायथ्यापर्यंत दक्षिणवाहिनी रहाते. मग थोड्या अंतरापर्यंत पश्चिमवाहिनी बनते व वायव्य सरहद्द प्रांतांत प्रवेश करते. तेथपासून ती दक्षिणवाहिनी बनते व मुखापर्यंत त्याच दिशेनें वहात जाते. अटक शहराच्या जरा वर सिंधूनदीला काबूल नदी येऊन मिळते. अटकनजीक सिंधू समुद्रसपाटीपासून सारी नऊशें फूट उंचीच्या भूमिभागावर वहात येते. अटक येथें ती टेंकड्यांच्या चिळणींत शिरून तिचा प्रवाह अरुंद पण विलक्षण खोल होतो. अर्थात् नदीमध्यें मोठा थोरला डोह बनतो. या डोहाची खोली १८० फूट आहे. हा प्रचंड डोह काळाबाग या मिठाच्या टेंकड्यांवर वसलेल्या शहरापर्यंत पसरलेला आहे. पंजाबामधून वहात असतांना पंजाब प्रांताच्या दक्षिण भागामध्यें पंजाबांतल्या संगत पांच नद्यांनी बनलेली पंचनद नदी सिंधूला येऊन मिळते. मग किशमोर गांवानजीक सिंधू नदी सिंधप्रांतांत शिरते व ती समुद्राला मिळेपर्यंत सिंध प्रांतांतून वहाते.
याप्रमाणें सिंधू नदी कैलासपर्वतापासून निघून आठराशें मैल चालून- नव्हे वाहून- अरबी समुद्राला येऊन मिळते. तिच्यावर नानाविध पूल बांधण्यांत आलेले आहेत. पहिला पूल लेह शहरानजीक आहे तर शेवटला पूल हैदराबाद कोट्री येथे आहे. या नदीवर कोठें लाकडी, कोठें साखळदंडी, कोठें गलबताच्या रांगेनें बनलेले, तर कोठें दगडी खांब व लोखंडी तुळया यांनी केलेले असे नानाविध बांधणीचे पूल बांधलेले आहेत. सर्व हिंदुस्थानांतील मोठ्या नद्यांमध्यें सिंधूइतके पूल दुसऱ्या कोणत्याही नदीवर नाहींत असें सांगतात.
सिंध प्रांताला जन्म व नांव देणारी महानदी सिंधु हिला सिंधी लोक दर्या म्हणतात. येवढें सिंधूचें वर्णन पुरे. आतां सिंध प्रांताचे सामान्य स्वरूप पाहूं या.
सिंधप्रांत हा विलक्षण सपाट प्रांत आहे. तो उत्तरेकडे चिंचोळा असून दक्षिणेस रुंद होत गेला आहे. एकंदर प्रांताची लांबी पांचशे मैलांच्या वर आहे तर सर्वांत जास्त रुंदी अडीचतीनशें मैलांचे आंत आहे. या प्रांताचे सध्यां आठ जिल्हे आहेत ते येणेंप्रमाणे:- १ कराची, २ दादू, ३ लारखाना, ४ अप्परसिंध फ्रांटीयर, ५ सक्कर, ६ नबाबशाह, ७ हैदराबाद, ८ थर आणि पारकर.
या प्रांताचे पूर्वेस मारवाड, जेसलमीर व भावलपूर या संस्थानांचा मुलूख लागतो. उत्तरेस पंजाब प्रांताचा कोपरा व बलुचिस्थानमधील किलात संस्थानचा कच्ची नांवाचा वालुकामय प्रांत लागतो. पश्चिमेस त्याच संस्थानचा डोंगराळ प्रांत लागतो. सिंधप्रांताच्या पश्चिम हद्दीला किरथर पर्वताची राजी व हब नदी आहे. दक्षिणेस आरबी समुद्र व कच्छचे रण आहे. सिंधप्रांताच्या अशा स्वाभाविक मर्यादा आहेत. या प्रांताचे स्वाभाविकपणें तीन भाग पडतात; उत्तरसिंध किशमोर पासून लारखाना येथपर्यंत आहे. लारखान्यापासून हैदराबादपर्यंत मध्यसिंध समजतात व हैदराबादपासून सिंधूच्या नानामुखांपर्यंतचा प्रदेश हा दक्षिणसिंध होय. या प्रांतामध्ये एकच एक संस्थान आहे. तें खैरपूर हे होय. त्याचें क्षेत्रफळ सुमारें सहा हजार चौरस मैल आहे. हे क्षेत्रफळ धरून एकंदर सिंधप्रांताचें क्षेत्रफळ बावन हजार चौरस मैल आहे. सर्व प्रांत अगदीं सपाट असून तो गाळाची माती, मातींत मिसळून जाणारी अत्यंत बारीक वाळू, शाडू व चुना यांनीं मिश्रित आहे.
यामुळें साधारणतः सर्व भूमिभाग वाळवंटी पांढरट दिसतो. पूर्वेकडचा भाग जास्त वालुकामय आहे. कारण तो राजपुताना व कच्छचें रण याला लागून आहे. पश्चिमेकडे किरथर डोंगराची रांग असून भूमिभाग थोडाफार उंचसखल आहे. डोंगरांतील दगड पिवळसर चुनखडीचे आहेत. यामुळें भूमिभागही पिवळट तांबूस आहे. या भागांत वाळू कमी आहे व कठीण जमीन जास्त आहे. सिंधप्रांताच्या मधला भाग सिंधू नदीच्या गाळानें बनला आहे. येथे टेंकड्याचा किंवा डोंगराळ किंवा खडकाळ भाग मुळींच दृग्गोचर होत नाहीं. नाहीं म्हणायला सक्कर व बक्कर या ठिकाणीं चारपांचशे फूट उंचीच्या चुन्याच्या व शाडूच्या टेकड्या आहेत; तसेंच हैदराबाद शहरानजीक टेकाड भाग आहे व खुद्द हैदराबाद शहराचा एक भाग उंचवट्यावर वसलेला आहे. सिंधची जुनी राजधानी ठठ्ठा याच्या आसपास छोट्या कड्या आहेत. बाकी जिकडे तिकडे सपाट, सुपीक, पांदुरकी व काळसर रंगाची मातीच माती व वालुकामय मैदानेंच मैदानें दृग्गोचर होतात. प्रांतामध्ये मोठमोठीं रानें किंवा उंच उंच वृक्ष नाहीतच. वालुकायम भागांत व सिंधूनदीच्या तीरावर भुरटें रान पुष्कळ आहे. या रानाचा विशेष हा कीं, इकडल्या झाडांना लांबरुंद पाने क्वचित् असतात. येथल्या झाडांची पानें गवती पानासारखी बारीक व शेराच्या पानासारखीं शिरपुटीवजा असतात! मात्र जमीन सुपीक आहे. यामुळे जेथें जेथें पाटाने पाणी मिळण्याची व्यवस्था झाली आहे तेथें सर्व प्रकारची पिके होतात व तेथें झाडेही खूप वाढतात. कारण या प्रांतांत पाऊस फारच कमी पडतो. सर्व मुंबई इलाख्यांत सिंधमधील जाकोबाबाद हे सर्वांत अधिक उष्णतेचें व सर्वांत कमी पावसाचें ठिकाण आहे. पण या प्रांताची सुपीकता पावसावर अवलंबून नसून ती सिंधू नदीच्या पुरावर व त्या पुराच्या पाटबंधाऱ्यांवर अवलंबून आहे. पण नदीला येणारा पूर हा थोड्या काळाचा असून तो अनिश्चित असतो म्हणून सक्करचें प्रचंड धरण बांधून बारमाही पाणी पुरविणारे कालवे काढून सिंध प्रांताची संपत्ति व संपन्नता वाढविण्याची योजना निघाली व कोट्यावधि रुपये खर्च करून तिला मूर्तस्वरूप देण्यांत आलें. हे सर्व काम सिंधप्रांत मुंबई इलाख्याचा उत्तर विभाग असतांनाच संपूर्ण करण्यांत आलें. याप्रमाणे भावी स्वतंत्र सिंधप्रांताच्या सर्व सुखसोयी व संपन्नतेची साधनें यांची सिद्धता झाल्यावरच तो प्रांत वेगळा करण्यांत येत आहे. सिंधप्रांताचे लोक भाग्यशाली खरे!
इतकें सिंधप्रांताचें सामान्यस्वरूपवर्णन बस झालें. आतां प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळवर्णनास व प्रवासवर्णनास लागणें बरें.
आगगाडी होण्यापूर्वी सिंध प्रांताला जाण्याला एकच जलमार्ग होता. तो म्हणजे मुंबईहून कराची बंदरास गलबतानें जाणें. तेव्हां कराचीस पोहोंचण्यास दोनतीन आठवडे लागत. असा मोठ्या त्रासाचा, दगदगीचा व पुष्कळ वेळ लागणारा प्रवास केलेले व ऐशी वर्षांच्या वयानंतरही उत्तम प्रकृति असलेले क्वेटा शहरांतील रहिवाशी डॉ. रामजी खानोलकर हे गृहस्थ मला भेटले होते व त्यांचे तोंडून कराचीच्या त्यांच्या प्रथम गलबताच्या प्रवासाची हकीकत मीं ऐकिली होती. ते गृहस्थ धरणीकंपामध्यें वारले. पण ही हकीकत लिहितांना मला त्यांचें स्मरण होत आहे व त्यांची भव्य मूर्ति माझ्या डोळ्यासमोर उभी रहात आहे. पूर्वकाळीं कराची व सिंध हा दूरचा देश वाटे. पण हल्ली आगगाडी व आगबोट अशा दोन्ही साधनांनीं सिंधप्रांतांत जातां येतें. बाँबे बडोदा रेल्वेमार्गानें अमदाबादपर्यंत ब्रॉड गेझनें जावयाचें, अमदाबादपासून मारवाड जंक्शनपर्यंत मीटरगेज रस्त्यानें जावयाचें व मग मारवाडपासून हैदराबादपर्यंत जोधपूर बिकानेर मीटर गेज रेल्वेनें जावयाचें. हैदराबादपासून कराचीला पुन्हा नॉर्थ वेस्टर्न रेल्वेच्या ब्रॉडगेजनें जावयाचें. रेल्वेचा असा थोडा आडमार्ग आहे. मुंबईहून कराचीस पोहोंचावयास दोन दिवस लागतात व तिसऱ्या वर्गाचें भाडे सुमारें अठराएकोणीस रुपये पडतें. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनी व ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी अशा दोन कंपन्यांच्या आगबोटी कराचीस आठवड्यांतून दोनदा किंवा तीनदा जातात. या मार्गानेंही कराचीस पोहोंचण्यास सुमारें दोन दिवस लागतात व तिसऱ्या वर्गाचे भाडें तेरा रुपये पडतें. रिझर्व डेकचें भाडें चोवीस रुपये पडतें.
मागे सांगितल्याप्रमाणें मी सिंधप्रांतांत एकंदर चारपांच वेळां केव्हां जलमार्गानें तर केव्हां खुष्कीच्या मार्गाने गेलों होतों. वादळाचे दिवस नसले म्हणजे आगबोटीचा प्रवास फार सुखकर असतो. आगगाडीचा प्रवास उन्हाळ्यामध्ये फारच त्रासाचा वाटतो. विशेषतः मारवाड व सिंधच्या वाळवंटी प्रदेशांतून आगगाडी जात असतां डब्यांत कल्पनातीत वाळू लोटते व ऊष्माही फार होतो. पण थंडीच्या दिवसांत म्हणण्याइतका त्रास होत नाही. सिंधप्रांताचें वर्णन करण्याच्या उद्देशानें मीं सन १९३५ मध्ये दोनदां प्रवास केला. एकदां १९३५ च्या मे महिन्यामध्यें व दुसऱ्यांदा १९३५ च्या डिसेंबरच्या नाताळाच्या सुटीमध्ये. एका वेळीं माझ्याबरोबर माझा मुलगा होता तर दुसरे वेळीं माझे बंधु बरोबर होते. आम्ही जातांना बोटीने गेलों व येतांना आगगाडीनें आलों. असें दोन हप्त्यांनी माझें सिंघप्रांतदर्शन झालें. म्हणून कालक्रम न देतां स्थलक्रमानें मी प्रांताचें वर्णन देणार आहे व मग शेवटीं प्रांताचा पूर्व व अर्वाचीन इतिहास देणार आहे.
ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशनची आगबोट दर आठवड्यास सोमवारी सकाळी साडे नऊ दहा वाजतां बहुतेक प्रिन्सेस डॉकमधून सुटते. आम्ही विटा बोटीने गेलों. ही बोट बरीच मोठी आहे. या बोटीत एक गुजराथी खानावळ असते. तेथें जेवण व चहा फराळाचें मिळतें. पण बरोबर फराळाचें व फळफळावळ घेतल्यास व विशेषतः स्टोव्ह घेतल्यास खाण्याजेवणाची फार सोय होते. खटपट करण्याची ताकद व हौस पाहिजे. आमच्या एका प्रवासामध्यें आमच्या मित्राजवळ ही सर्व सामुग्री अगदीं सज्ज असल्यामुळे आम्हांला प्रवासाचे दोन्ही दिवस ऊन ऊन तूपखिचडी खाण्यास मिळाली व आमचा जलप्रवास मोठा मजेनें झाला. हा जलप्रवास फार मोठा किंवा त्रासाचा वाटतच नाहीं. मुंबई सोडली कीं कच्छमांडवी व ओखा बंदर हीं ठिकाण जवळ येईपर्यंत जमीन दिसत नाहीं. प्रथम आगबोट कच्छमांडवीस जाते. त्याला साधारणपणे चोवीस तास लागतात. कच्छ मांडवी हे कच्छच्या आखाताचे उत्तरेस आहे. कच्छमांडवी हे बंदर भर समुद्रावर असल्यामुळे व किनाऱ्याला पाणी उथळ असल्यामुळे आगबोट बंदरापासून खूप अंतरावर उभी राहते. येथें नेहेमीं बोट फार हलते. यामुळे या बंदरी उतरण्याचें मोठें हालाचें व त्रासाचे काम आहे. आगबोटींतून हेलकावे खाणाऱ्या गलबतांत उतरणे कठीण व धोक्याचे आहे. पण या बंदराला उतरणाऱ्या उतारूंची नेहेमीं फार गर्दी असते. कारण कच्छमांडवीस जाण्यास दुसरा मार्गच नाहीं. यामुळें येथें माल व माणसें उतरण्याची एकच घाई होते व त्यांतच गलबतांतून आलेल्या कच्छी हमालांची गर्दी व आरडा ओरड सुरू असते. यामुळे कच्छमांडवी बंदरांतून आगबोट बाहेर पडण्यास सहज तास दीड तास लागतो. मग आगबोट कच्छच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या ओखा बंदरास लागते. हें नवें बंदर बडोदा संस्थानचें आहे व येथें उत्तम धक्का बांधलेला आहे. या धक्क्याला मोठमोठ्या परदेशच्या आगबोटीसुद्धां लागतात. इतकें खोल पाणी धक्क्याशी आहे. तरी पण कराचीस जाणाऱ्या आगबोटी धक्क्याला न लागतां बंदरांत उभ्या राहतात व उतारूंस गलबतांनीं धक्क्याकडे जावें लागतें. सोय असून आगबोटी धक्क्याला कां लावीत नाहींत याचे मला आश्चर्य व नवल वाटलें. या कंपनीच्या आश्रयदात्या उतारूंनीं कंपनीकडे आपली दाद मागून ओखा बंदराची ही परिहार्य अडचण दूर करून घेतली पाहिजे असें ओखा बंदरामध्यें आम्ही थांबलों असतांना माझ्या मनांत आलें. पण मनांतले मांडे मनांत राहिले. आम्ही मुंबईहून निघाल्यापासून दुसरे दिवशीं सायंकाळीं तीन चार वाजतां ओखाबंदर सोडलें तो दुसरे दिवशीं सकाळी साडेआठ वाजतां कराचीस पोहोंचलों. कराचीस आगबोट थेट धक्क्याला लागते. मात्र येथला धक्का मुंबईसारखा दगडी बांधणीचा नाहीं. तो लांकडी बांधणीचा आहे. आगगाडीचा रस्ता थेट धक्क्यापर्यंत आला आहे व आगगाडीचे रूळ ओलांडूनच प्रवाशास व्हिक्टोरियाच्या अड्डयाकडे जावें लागतें. याप्रमाणें बरोबर दोन दिवसांच्या जलप्रवासानें प्रवासी सिंध प्रांताच्या राजधानींत- कराचीत प्रवेश करतो. कराचीमधील प्रेक्षणीय स्थळवर्णनास लागण्यापूर्वी या बंदराचें व शहराचें सामान्य स्वरूपवर्णन करणें बरें.
या शहराची पूर्वपीठिका फार दूरवर पोहचत नाहीं. कारण पूर्वकाळीं सिंधमधील मुख्य दळणवळणाचें साधन म्हणजे सिंधू नदीमधून जाणारी येणारीं गलबतें होत. यामुळें सिंधु नदीच्या मुखावरील शहरें हीं बंदरें असत. म्हणूनच सिंधूनदीच्या एका मुखावर असलेलें ठठ्ठाशहर ही सिंधची राजधानी व व्यापाराचें मुख्य बंदर होतें. तसेंच शहाबंदर, केटी बंदर इत्यादि शहरें होतीं. पण सिंधु नदीचा प्रवाह हा ऐतिहासिक काळांतसुद्धां बदललेला आहे. शिकंदर बादशहाच्या स्वारीचे वेळीं सिंधू नदी पुष्कळ पूर्वेकडे असून ती कच्छच्या आखाताला मिळत असावी व त्याच वेळीं कच्छचे रण हें क्षारसरोवर असावें. पण सिंधूचा प्रवाह नंतर बदलून पश्चिमेकडे वळला. सिंधूचा प्रवाह वारंवार बदलत आला आहे इतकेंच नव्हे तर सिंधु नदीच्या कांठची माती वारंवार कोसळते व म्हणून सिंधू नदीमधून गलबतांची वहातूक फार धोक्याची वाटत असे. म्हणून नदीच्या मुखाखेरीज स्वाभाविक बंदर असलेले ठिकाण हिंदी व्यापाऱ्यांना पाहिजे होतें. कराची हें ठिकाण असें स्वाभाविक आरबी समुद्रावरील बंदर आहे. पण दोनशें वर्षांपूर्वी त्याचा मागमूसही नव्हता. नंतर त्याचा शोध लागला व हिंदी व्यापारी कराची बंदराला आपला माल नेऊं लागले व मग तेथून उंटावरून प्रांतामध्यें मालाची नेआण होऊं लागली. पण सिंधमध्यें ब्रिटिश अंमल सुरू होईपर्यंत कराची हें मोठें शहर व प्रख्यात बंदर बनलें नव्हतें. कारण सन १८४७ मध्यें कराचीची वस्ती अवघी १४००० होती. तीच सन १९३३ मध्यें २६३५६५ झाली. इतकें हे शहर व बंदर अर्वाचीन काळचें आहे. मात्र कराची बंदर हे मुंबई, कोचीन, विजगापट्टम, त्रिंकोमाली इत्यादि बंदरांप्रमाणे एक स्वाभाविक, सोईस्कर व सुरक्षित असें बंदर आहे. कराची बंदर हें सिंधू नदीच्या मुखाच्या पलीकडे सिंध प्रांताच्या नैर्ऋत्य (दक्षिण पश्चिम) टोकाला आहे. तेथून थेट पश्चिमेकडे आठदहा मैलांवर केप माँझ म्हणून भुशीर आहे हेंच सिंधप्रांत व बलुचिस्थान यांच्या सरहद्दीवरील टोंक आहे. ज्याप्रमाणें मुंबई बेटाचा पायासारखा भूमिभाग समुद्रामध्ये घुसला आहे व त्यामुळे बेटाचे पूर्वेस समुद्राच्या लाटा व समुद्रावरील वारा यांचेपासून सुरक्षित असें मोठें खोल पाण्याचें बंदर बनवितां आलें त्याचप्रमाणें कराची बंदर मनोरा व त्याचे उत्तरेकडील दोन बेटें या बेटांच्या समुदायांनी बनलें आहे. या बेटांमुळे आरबी समुद्राच्या लाटा व समुद्रावरील वारा यांपासून बंदराचें संरक्षण झालें आहे. मनोरा हे बेटाचें टोंक रुंद असून बरेंच उंचवट्याचें आहे. येथें बंदराच्या संरक्षणाकरितां सिंधच्या व्यापाऱ्यांनी व अमिरांनी किल्ला बांधला होता. तो अझूनही चांगल्या स्थितींत आहे. या मनोरा बेटाच्या रुंदट टोंकाला लागून अर्वाचीन काळी लाटमोडी (breakwater) भिंत बांधण्यांत आली आहे. ती १५०० फूट लांब आहे. मनोरा बेटावरच कराचीचें दीपगृह बांधलेलें आहे. हें बेट व लाटमोडी भिंत डाव्या हाताला टाकून आगबोटी कराची बंदरामध्ये शिरतात. प्रथम पूर्वी केलेले लाकडी धक्के लागतात. हल्लीं पूर्व धक्का व पश्चिम धक्का नांवाचे दोन दगडी बांधणीचे धक्के थेट मुंबईच्या धक्क्यांप्रमाणे बांधण्यांत आले आहेत. मात्र ते अजून सररहा उपयोगांत येऊं लागले नाहींत. मुंबईच्या प्रमाणें कराची बंदर खोल पाण्याचे व विस्तीर्ण प्रमाणाचें आहे व यामुळें येथें शेंकडों गलबतें व आगबोटी आल्या तरी अडचण पडणार नाहीं इतकें बंदर मोठे आहे! कराची पोर्ट ट्रस्टनें अर्वाचीन काळच्या व्यापाराच्या सर्व सोयी केलेल्या आहेत. मालाची चढ उतार करण्याकरितां बंदरापर्यंत रेल्वे फाटा आणलेला असून बंदरावर फिरत्या प्रचंड याऱ्या ठेवल्या आहेत. मुंबईहून प्रथम कराची बंदरास येणाऱ्या प्रवाशास आपण प्रति मुंबई बंदरच पहात

रामदुर्ग संस्थानचे अधिपती
आहों असा भास होतो. मात्र येथें कराची शहर मनोरा बेटावर नसून मुख्य भूमिभागावर वसलेले आहे. मनोरा बेटावर थोडीशी वस्ती व एक लष्करी तुकडी मात्र आहे.
कराची बंदर सिंध प्रांताच्या नैर्ऋत्य टोंकाला [दक्षिण पश्चिम] आहे म्हणून वर सांगितले. या बंदरापासून शहर दोन अडीच मैलांवर सुरू होतें. शहराचा विस्तार साधारण चौकोनी आहे. त्याचे दक्षिणेस केमारी नांवाचें खेडें आहे. कराची बंदराला केमारी बंदरच म्हणतात. या खेड्याचे दक्षिणेस आरबी समुद्र आहे. नॉर्थ वेस्टर्न रेलवे या दक्षिण भागांतून थेट बंदराच्या धक्क्यापर्यंत गेली आहे. शहराच्या पर्व बाजूस कराचीचें कँटोन्मेंट आहे व तेथेंच कराची कँटोन्मेंट स्टेशन आहे, तर त्याचे पश्चिमेस कराची शहराचे स्टेशन आहे. शहराचे पश्चिम बाजूस लायरी नदी आहे. पूर्वी ही नदी शहरामधून व बंदरानजीक वहात असे. कराची शहर वाढत चाललें तसतशी अधिक जागेची वाण भासूं लागली. म्हणून लायरी नदीचा प्रवाह पश्चिमेकडे वळविण्यांत आला व ती सर्व जागा भरून काढून तेथें वाढत्या मजूरवर्गाकरितां नवीन वस्तीत घरे बांधण्यांत येत आहेत. पश्चिम व पूर्व धक्क्यांवरून एक नवाच एंबँकमेंट नांवाचा सरळ, सपाट, प्रशस्त रस्ता करण्यांत आला आहे. तो पुढें लॉरेन्स नांवाच्या रस्त्याला मिळाला आहे व तो थेट ईशान्य दिशेकडे शहराच्या उत्तर बाजूनें गेला आहे. पण कराची शहराचा अपूर्व अलंकार म्हणजे बंदराकडून नैर्ऋत्य [दक्षिण-पश्चिम] दिशेकडून- ईशान्य [उत्तर-पूर्व] दिशेकडे थेट नव्या तुरुंगापर्यंत व शहराच्या टोकापर्यंत जाणारा बंदर रस्ता हा होय. या रस्यानें चौकोनी शहराचे तिकोनी दोन भाग पडतात व शहरांतील सर्व रस्ते डावी-उजवीकडून या रस्त्याला येऊन मिळतात. हा सरळ, स्वच्छ, प्रशस्त निर्धूळ रस्ता आश्चर्यकारक आहे. बंदरापासून दीडदोन मैल या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस समुद्राचें निळसर हिरवट पाणीच पाणी दिसतें. यामुळे येथें धनुष्कोडीकडून रामेश्वराकडे येतांसारखा देखावा दिसतो. बंदराचा भाग जणूं कांहीं समुद्रांत घुसला आहे असें भासतें. या रस्त्यानें दीडदोन मैल चालल्यावर हार्डिंग पूल लागतो व मग तेथून शहरास सुरवात होते. डाव्या हातास पोर्ट ट्रस्ट व कस्टमहाऊस यांच्या पिवळसर रंगाच्या दगडी इमारती लागतात. या इमारतींवरून जो रस्ता जातो तो एंबँकमेंट रस्त्याला मिळतो व हा एबँकमेंट रस्ता व लॉरेन्स रस्ता बंदररस्त्याला जवळजवळ समांतर असा ईशान्य बाजूकडेच जातो. बंदर रस्त्यानें जरा पुढें आलें कीं, समोरच मेरीवेदर टॉवर नांवाचा उंच घड्याळबुरुज लागतो. येथें उजव्या हाताला मॅक्लीऑडरोड नांवाचा मोठा रस्ता लागतो. तो थेट रेल्वे रस्त्याचे बाजूनें सरकारी बंगल्यावर जातो. तेथें त्याचे दोन फाटे होऊन ते कँटोन्मेंटकडे जातात. बंदर रस्त्याच्या डाव्या बाजूस जुनें कराची शहर व बाजार आहे तर उजव्या बाजूस नवी वस्ती व सार्वजनिक संस्था आहेत. कराची शहरांत शिरणारा प्रवासी प्रथमतः याच रस्त्यानें जात असल्यामुळे, कराची शहराचा सर्वांत उत्तम भाग व शहरांतील मोठमोठ्या सार्वजनिक इमारती, टोलेजंग दुकानें हीं आपोआप व जातां जातांच दृष्टीस पडतात. कराची शहर अत्यंत सपाटीवर वसलेलें शहर आहे. शहरामधून उत्तरेकडून दक्षिणेकडे एकच नाला जातो पण तो सबंद नाला फरसबंदी केला असून त्याचे दोन्ही बाजूंस संरक्षक खुजा भिंती घातल्या असल्यामुळे तो नाला शहरांतील घाणीचें आगर न बनतां शहरांतील एक निपाणी पण स्वच्छ कालवाच बनला आहे.
कराची शहरांत प्रथम प्रवेश करणाऱ्या प्रवाशाच्या मनावर कराची शहराची स्वच्छता, त्याची आरोग्यवर्धक रचना, तेथले सरळ निर्धूळ रस्ते व त्याच्या बाजूच्या फरसबंदी पायवाटा व त्यांवरील वृक्षराजी, ठायीं ठायींच्या छोट्या बागा व उपवनें यांचा विशेष परिणाम होतो यांत शंका नाहीं. या शहराची व्यवस्था व स्वच्छता युरोपांतील सुधारलेल्या शहरांच्या तोडीची आहे असें वाटल्यावांचून रहात नाहीं. आधीं हें शहर अगदीं अर्वाचीन आहे हें त्याच्या शास्त्रीय रचनेचें एक कारण, तर दुसरें कारण जमशेद नसरवानजी मेहतासारखे स्वार्थत्यागी, नागरिक हिततत्पर व सुधारलेल्या शहराची माहिती असलेले प्रेसिडेंट व मेयर कराची शहर म्युनिसिपालिटीला कैक वर्षे लाभले हे होय.
कराची शहरामध्ये मुंबईच्याप्रमाणे ट्रॅमचें गुंतागुंतीचें जाळें नाहीं. येथली एक ट्रॅम लाईन बंदररस्त्याने जाऊन सदर बाजारापर्यंत जाते, तर दुसरी लाईन गांधीबाग येथपर्यंत जाते. भाडे दोन पैशांपासून सहा पैशांपर्यंत असतें. ट्रॅम सर्व्हिस फार स्वच्छ, सोईची व सरळ दोन मोठमोठ्या रस्त्यांनी- बंदररोड व लॉरेन्स रोड-जाते. त्याला एक पश्चिमेकडे नेपीयन रोड ते चाकीवाडा व दुसरी पूर्वेकडे एंप्रेस मार्केट ते कँटोनमेंट रेल्वे स्टेशन अशा दोन शाखा जातात. बाकी शहराच्या भागांत व शहराच्या आसपास बस सर्व्हिस आहे. हीं दोन स्वच्छ व सोयीचीं अशीं जलद दळणवळणाची साधनें आहेत. घोड्याच्या व्हिक्टोरिया व हल्लीं मोटार टॅक्सीही पुष्कळ झाल्या आहेत. पण कराचीच्या स्वच्छ निर्धूळ व पायवाटांनी युक्त अशा प्रशस्त रस्त्यानें पायींच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यांत मौज वाटते. अर्थात् ट्रॅमच्या लाईनीचा व बसचा मिळेल तेथपर्यंत उपयोग केल्याने वेळ वांचतो व त्रासही कमी होतो. मी कराची शहरांतील व आसपासचीं प्रेक्षणीय स्थळें या दुहेरी साधनांनी व पायपिटीने एका आठवड्यांत पाहिली. तरी आतां त्यांच्या वर्णनास दिनक्रमानें लागूं या.
ता. २६ मे १९३५ रविवार:- आज सकाळी आम्ही बंदररस्त्याच्या ट्रॅमनें बोल्टन मार्केटपर्यंत गेलों. बोल्टन मार्केट ही बरीच मोठी एक मजली पिवळ्या रंगाची इमारत आहे. त्यांत नाना फळभाज्या व फळफळावळ यांचीं दुकानें आहेत. इमारतीच्या आसपास पुष्कळ खुली जागा आहे. तेथें मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदीविक्री होते. येथें अफगाणिस्थानाकडून आलेलीं नाना तऱ्हेचीं सुकीं फळें उत्तम मिळतात. हे मार्केट पाहून झाल्यावर या मार्केटला लागूनच असलेलें कराचीचे जुने शहर पाहण्यास पायींच गेलों. अर्थात् या जुन्या शहराचे रस्ते अरुंद आहेत. पण ते सर्व फरसबंदी असफाल्टचे केलेले असल्यामुळे स्वच्छ व निर्धूळ दिसले. तसेंच घरें दाट पण नीटनेटकी व रंगसफेती केलेली दिसली. येथें दुकानें घाऊक किराण्या मालाचीं पुष्कळ आहेत. मालाची ने-आण करणाऱ्या गाड्या सर्व उंटाच्या व गाढवाच्या पाहून आम्हांला मोठें नवल वाटलें. हा जुन्या शहराचा भाग दाट वस्तीचा आहे. तरी येथेही एक मैनाबाई नांवाची बाग आहे. बागेंत खूप फुलझाडे, वेली, वृक्ष दिसले; एक उत्तम दगडी बांधणीचें कारंजेंही आहे. हे जुनें शहर पाहून झाल्यावर आम्ही परत बंदररस्त्याला आलों व बंदररस्त्यावरच असलेलें नारायण जगन्नाय हायस्कूल पाहिलें. हायस्कूलचे आसपास व मागें बरीच खुली जागा आहे व मुलांच्या खेळाच्या जागा सोडून बाकी जागेत बाग केली आहे. या हायस्कूलच्या कम्पाउंडाला लागूनच खालिकदिना सार्वजनिक वाचनालय व शहराचा सार्वजनिक मोठा हॉल आहे. ही इमारत व हा हॉल प्रेक्षणीय आहे. इमारतीसमोर टिळकांचा छोटासा संगमरवरी स्मारक पुतळा बसविला आहे. नंतर आम्ही बंदर रस्त्याच्या जरा दक्षिण बाजूस असलेली इस्लामी मद्रेसाची (हायस्कूल) इमारत पाहिली. या संस्थेचे आवारही फारच विस्तीर्ण आहे. येथें चारशें मुलांचें वसतीगृह असून मोठी हायस्कूलची इमारत आहे. या हायस्कूलला दरसाल साठ हजार रुपये ग्रँट मिळते हें ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालों. मुंबई इलाख्यांत इतकी मोठी ग्रँट कोणत्याच कॉलेजाला किंवा हायस्कूलला नसेल! सिंधचे मुसलमान भाग्यवान खरे असे मला वाटलें. याप्रमाणे आम्ही दोन प्रहरपर्यंत दृश्यदर्शन केलें. सायंकाळीं माझें महाराष्ट्र- मित्र-मंडळाच्या जागेंत 'रावणाची लंका' या विषयावर व्याख्यान झालें.
ता. २७ मे सन १९३५ सोमवार :- सकाळी आम्ही सदर बाजारापर्यंत ट्रॅमनें गेलों व मग पायीं बंदररोड एक्स्टेन्शन म्हणून जो नवा रस्ता व नवी वस्ती झाली आहे ती पायींच पाहिली. या बाजूला गेल्या दोनचार वर्षांत बंगलेच बंगले बांधले गेले आहेत व जात आहेत असें आमच्या




या बंदर रोड एक्स्टेन्शनच्या शेवटच्या टोकाला टेंकडीवजा जरा उंचवट्याची जागा आहे. त्यावर पाण्याच्या सांठ्याचा हौद केलेला आहे व येथे सार्वजनिक बाग करण्याचा बेत आहे. सध्यां येथें औषधालाही झाड नाहीं. पण बसण्याकरितां कांहीं बाके ठेविलीं आहेत. येथून सर्व कराची शहर स्पष्टपणें दृष्टीस पडतें.
दोन प्रहरी आम्ही कराची शहरांतील प्रेक्षणीय स्थळांचा मुकुटमणी कोठारी सहल- धक्का व लेडी लॉईड घाट पहाण्यास गेलों. बोल्टन मार्केटपर्यंत ट्रॅमने गेलों व तेथून बसनें धक्क्यापर्यंत गेलों. बसचे भाडें फक्त १ आणा पडतें; मार्केटपर्यंत ट्रॅमचा अर्धा आणा पडतो.
कराची शहराच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) टोंकाला क्लिफ्टन म्हणून लहानसे खेडें होतें. हे टेंकडीवजा उंचवट्यावर वसलेले आहे. आतां हा भाग मुंबईच्या मलबार हिलप्रमाणें किंवा कुलाब्याप्रमाणें श्रीमंत व युरोपियन वस्तीचा भाग झालेला आहे. शहर टाकल्यावर दक्षिणेस रेलवेवरील फारच प्रशस्त व लांबच लांब तांबड्या दगडाचा सुंदर पूल लागतो व मग सपाटच्या सपाट खुली जागा लागते. तेथें नेहमीं सारखा वारा वहात असतो. यामुळे सहल करण्यास व हवा खाण्यास या रस्त्याची मोठी सोय झाली आहे. ठिकठिकाणी बसण्यास व विश्रांति घेण्यास बाके ठेवलेलीं आहेत. क्लिफ्टन गांव डाव्या बाजूस टाकून उंचवट्याच्या माथ्यावर गेलें कीं प्रवाशी आश्चर्याने तोंडांत बोटेंच घालतो. इतकें या जहांगिर कोठारी धक्याचें व लेडी लॉईड घाटाचें काम अप्रतिम आहे.
कोठारी धक्का हा सुमारें पांच सहाशे फूट लांबीचा, वीस पंचवीस फूट रुंदीच्या पांढऱ्या दगडी फरशीचा, तांबड्या लाल दगडी कठड्याचा सहल- धक्का आहे. त्याचे पूर्व टोंकास मोठी थोरली तांबड्या दगडाची सुंदर दुमजली इमारत आहे व तेथें उच्च दर्जाचे चहापानगृह आहे. या धक्क्याचे पश्चिम टोकास एक वर्तुळाकार कमानीचा छोटासा घुमट बांधला आहे. धक्क्याचे मधोमध बसण्याकरितां व विश्रांतीकरितां चौकोनी चारी बाजूंनीं दगडी खांबांनीं व कमानींनीं शोभायमान झालेला सपाट छपराचा मंडप बांधला आहे. येथूनच लेडी लॉईड घाटाच्या पायऱ्यास सुरवात होते. हा घाट बारा तेरा छोट्या पायऱ्या व मग एक मोठी रुंदच रुंद पायरी असा उतरता बांधला असून दोन्ही बाजूंस सुंदर दगडी कठडा केला आहे. प्रत्येक रुंद पायरीवर बसण्यास बाके ठेविलीं आहेत व कठड्याचे मध्ये दगडी खांब केलेले असून त्यांवर विजेचे दिवे लावलेले आहेत. याप्रमाणे घाटाच्या पांच सहा मजग्या आहेत. ज्याप्रमाणे प्रारंभी दगडी मंडप आहे, त्याप्रमाणे घाटाचे शेवटी मोठा दगडी मंडप आहे. त्याच्या उजव्या हाताच्या भिंतीवर संगमरवरी शिलालेख आहे. त्यांत कोठारी धक्क्याला व लेडी लॉईड घाटाला साडेतीन लाख रुपये खर्च आला असून हा सर्व खर्च दानशूर जहांगिर कोठारी- कराचीचे एक प्रख्यात व्यापारी- यांनीं लेडी लॉईड यांच्या स्फूर्तीने बांधला आहे अशा अर्थाचा मजकूर आहे. या मंडपाच्या शेवटीं पांच सात पायऱ्यांचा जिना आहे. हा उतरून मनुष्य समुद्राच्या सपाट वाळवंटावरच येतो. येथून पूर्वेकडे हें वाळवंट सारखें पसरलेलें आहे. येथें मुंबईजवळच्या जुहू वाळवंटासारखा थेट देखावा दिसतो. समोर समुद्रांत मनोरा बेट, तेथलें दीपगृह. तेथल्या बराकी व इतर इमारती दृष्टीस पडतात. मनोरा बेटाच्या पुढच्या टोंकाला बांधलेली लाडमोडी भिंतही (breakwater) दिसते. येथें मऊ मऊ वाळवंटावर सहल करण्याची मोठी मौज वाटते. कराचीकरांचें दर शनवारी-रविवारी सहल करण्यास येण्याचें हें मोठें आवडते ठिकाण बनलें आहे यांत शंका नाहीं. ज्याप्रमाणं म्हैसूरनजीक कृष्णसागर बंधाऱ्याला लागून वृंदावन नांवाचा सुंदर बाग व सहलस्थान बनविण्यांत आले आहे त्याप्रमाणें कराचीचें हे ठिकाण केलें आहे. मी हे ठिकाण प्रथम पाहिलें तेव्हां येथें बाग वगैरे कांहीं एक नव्हते. फक्त टेंकडीच्या खालच्या गुहेसारख्या भागांत एक जुनें महादेवाचे देवालय होतें. पण त्याची स्थिति फारशी प्रेक्षणीय नव्हती. पण या खेपेला पाहातां दोन्ही बाजूंस पुष्कळच सुधारणा झाली आहे असें दिसून आलें. आधीं महादेवाच्या देवळाला जाणाऱ्या पायऱ्यांवर सुंदर कमान व विजेचे दिवे लावलेले दिसले, तसेंच देवळाचें आवार फरसबंदी व स्वच्छ ठेवण्यांत येऊन सर्वत्र विजेचे दिवे लावण्यांत आले आहेत. यामुळे हे देवळाचे ठिकाण हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थान बनले आहे. तसेच पश्चिमेच्या खुल्या व उतरत्या जागेत बागबगीचा केला आहे. त्या बागीचाला रूपचंद बिलाराम या ज्युडिशिअल कमिशनरच्या जागेपर्यंत वाढलेल्या सिंधी गृहस्थाचे नांव दिलें आहे. खरोखरी या ठिकाण आलें व सभोवारचा सर्व सुंदर देखावा पाहिला म्हणजे येथून हालूं नये असें वाटतें. हे ठिकाण निसर्ग व कला यांच्या मनोहर मिलाफानें विलक्षण चित्ताकर्षक झाले आहे यांत शंका नाही. येथें सायंकाळचा सूर्यास्त व नंतर रात्रीच्या विजेच्या दिव्यांची रोषणाई हीं दोन्हीं दृश्यें अत्यंत प्रेक्षणीय आहेत. म्हणून क्लिफ्टनला येऊन दीड दोन तास तरी तेथे घालविणें आवश्यक आहे. हल्लीं श्रीमंत लोकांनी मोटारकारमध्यें रेडियो घेतल्यामुळे येथें आल्यावर सायंकाळचे रेडियो गाणेही आम्हांस ऐकावयास सांपडलें. झालें. कोठारी धक्क्यावर याप्रमाणें दीड दोन तास मोठ्या मजेनें घालवून आम्ही प्रमुदित मनानें बिऱ्हाडीं आलों.
ता. २८ मे सन १९३५ मंगळवार:- आज आम्ही कराचीच्या सिव्हिल लाईन्स नांवाच्या वस्तीचा भाग पाहिला. या भागांतले रस्ते प्रशस्त असून दोन्ही बाजूंस पायवाटा आहेत व मोठमोठे वृक्ष दोन्ही बाजूंस आहेत. बंगल्यासभोवार मोठमोठ्या बागा व त्यांतही मोठमोठे वाढलेले वृक्ष एकंदरीत खूप आहेत. कराचीचा हा भाग त्यांतल्या त्यांत जुना असून फार सुबक रचनेचा आहे असे वाटल्यावांचून रहात नाहीं. एका प्रशस्त रस्त्याच्या टोकाशीं एदलजी नसरवानजी नांवाच्या दानशूर पारशी नागरिकाचा नवाच संगमरवरी पुतळा बसविला आहे. त्यामुळें या सरळ, स्वच्छ, सपाट रस्त्याला मोठी शोभा आली आहे. याच भागांत कराचीचा प्रख्यात फ्रिअर हॉल व वाचनालय आहे. ही इमारत दुमजली दगडी असून तिची बांधणी नवलाची आहे. तिला दोन टोकांना अगदी निमुळते झालेले लोखंडी मनोरे आहेत. एकावर वाऱ्याची दिशा दाखविणारा कोंबडा बसविला आहे. या इमारतीसभोंवार बंगलोरच्या लालबागेप्रमाणें बनविलेली बाग आहे व त्यांतील झाडांना व कुंपणाच्या वेलींना नाना आकार दिले आहेत. बागेत एका बाजूस व्हिक्टोरिया राणीचा तर दुसऱ्या बाजूस सातव्या एडवर्ड बादशहांचा असे संगमरवरी पुतळे संगमरवरी चबुतऱ्यावर बसविलेले आहत. ही बाग कराची शहराचा एक सुबक अलंकार आहे यांत शंका नाहीं.
दोन प्रहरी आम्ही लॉरेन्सरस्त्याच्या ट्रॅमनें गांधीबागेला गेलों व ती पाहिली. ही कराचीतील फारच विस्तीर्ण बाग आहे. येथें द्राक्षांचा मोठा मळा असून त्याचें म्युनिसिपालिटीला दरसाल सहा हजार रुपयांचें उत्पन्न येतें. बागेमध्यें मोठमोठे वृक्ष आहेत. लहानसा तलाव व एक कालवाही आहे. बागेत फिरण्याकरितां सुंदर पायवाटा ठेविल्या आहेत. बागेंत नाना जातीचे पशूपक्षी ठेविले आहेत. सारांश, ही बाग मुंबईच्या राणीच्या बागेप्रमाणे बनविलेली आहे. मात्र ही बाग राणीच्या बागेपेक्षां विस्तारानें पुष्कळ मोठी आहे व येथें पदार्थसंग्रहालय नाहीं. पण तें बर्नस नांवाच्या शहरानजीकच्या बागेंत आहे. ही बाग पाहून झाल्यावर आम्ही सिंसिनॅटस टाऊन नांवाचा शहराचा भाग पाहून सदर बाजारावरून बिऱ्हाडी परत आलों.
ता. २९ मे सन १९३५ बुधवार:- आज सकाळीं आम्ही लायरी नदीचा प्रवाह बदलून तयार केलेल्या नव्या वस्तीच्या भागांत फिरावयास गेलों. या भागांत गरीब लोकांची वस्ती आहे. आम्ही दूर नेलेल्या नदीच्या पात्रापर्यंत गेलों. नदीकांठीं एक मारुतीचें देऊळ आहे व नजीकच कोल्हापूरचे चिमासाहेब यांची छोटीशी छत्री व सभोवार बाग आहे. या ठिकाणाच्या दुरुस्तीस कोल्हापूर दरबारकडून ५०० रुपये दरसाल मिळतात असें कळलें. हा सर्व भाग नवा नवा दिसतो. अजून रस्ते व्हावयाचे आहेत. शहराच्या इतर भागांच्या मानानें हा भाग तितका नयनमनोहर वाटला नाहीं. दोन प्रहरीं आम्ही बाजारांत जाऊन देशीं नेण्याकरितां रंगीत चादरी, अभ्रे व सुकीं फळें विकत घेतलीं व नंतर ब्राह्मणसभेच्या पानसुपारीस गेलों.
ता. ३० मे सन १९३५ गुरुवार:- आज सकाळी आम्ही स्पेशल मोटारकार करून कराचीपासून दहा मैलांवर असलेलें मंगापीर नांवाचें ठिकाण पहाण्यास गेलों. कराचीच्या पश्चिमेस जी खिरथर डोंगराची रांग आहे त्या रांगेमध्यें हे ठिकाण आहे. शहरांतून बाहेर पडलें म्हणजे पांच सहा मैल सपाट पण खडकाळ व नापीक भूमिभाग लागतो व मग खिरथर डोंगराची रांग सुरू होते. त्या रांगेच्या बाजूनें जरासें उंचवट्ट्याच्या भूमिभागांत आल्यावर मंगापीर हे ठिकाण येतें. हा भूमिभाग बराच उंच-सखल व खडकाळ असल्यामुळे महाराष्ट्रांतील माझ्यासारख्या प्रवाशाला हा भाग चिरपरिचित मित्राप्रमाणे वाटला. या भागांत पुष्कळच थडगीं आहेत. मंगापीर हे एका मुसलमान साधूचें थडगेंच आहे. तें टेंकडीसारख्या एका खडकावर बांधलेलें आहे. त्याला खडकांत खोदलेल्या दहा वीस दगडी पायऱ्या आहेत. सर्व ठिकाणाला मुसलमानी पद्धतीप्रमाणें पांढराशुभ्र रंग दिलेला आहे. येथून सभोवारचा खडकाळ व टेंकड्यांनीं व्याप्त असा भाग दृग्गोचर होतो. येथून बलुचिस्थानची हद्द लागते. या पिराच्या खडकानजीक ऊन पाण्याचे झरे व त्याकरितां बांधलेले टाके आहे. येथें आसपास धर्मशाळा पुष्कळ आहेत. एका छोट्याशा तळ्यामध्यें मगरीच मगरी आहेत! मंगापीर हे पिराचें नांव या मगरीवरून पडलें आहे असे कळलें.
शहरापेक्षां निराळ्या प्रकारच्या भूमिभागांतील हे ठिकाण पाहून येण्यास दोन अडीच तास लागतात. पण कराचीच्या आसपासचें हे प्रेक्षणीय स्थळ आहे व तें पाहिल्यानें मनाला आनंद व करमणूक होते असा माझा अनुभव आहे.
दोन प्रहरा आम्ही केमारी बंदरास ट्रॅमनें आलों व मग होडी करून मनोरा बेटावर गेलों. येथें पोर्टट्रस्टच्या नोकरांची थोडीशी वस्ती आहे.



मनोरा बेटाच्या साधारण मध्यावरच्या उंचवट्याच्या भागांत दीपगृहाचा मनोरा आहे. या मनोऱ्यावर जाण्यास परवानगी लागते. या खेपेस आम्हांला परवानगी काढतां आली नाहीं. पण मी प्रथम कराची पाहिली त्यावेळीं परवानगी काढून मी दीपगृहाच्या मनोऱ्यावर गेलों होतों. हा मनोरा दीडशे फूट उंच आहे व येथली टेंकडी समुद्रसपाटीपासून १०० फूट उंच आहे. येथल्या दिव्याच्या कांचा विलक्षण मोठ्या आहेत; दिव्याची रचना अगदीं अर्वाचीन शास्त्रीय पद्धतीवर केलेली आहे. दीपगृहाच्या या फिरत्या दिव्याची प्रकाशशक्ति ११ लाख मेणबत्यांची आहे असें कळून मला आश्चर्य वाटलें. या दीपगृहाचे पलीकडे मनोरा बेटाचें टेकडीवजा रुंदट टोंक येतें. मी कराची पहिल्यांदा पाहिली त्यावेळीं आम्ही या टोकाला प्रदक्षिणा घालून लाटमोड्या भिंतीवर आलों होतों. या टेंकडीच्या निमुळत्या पाऊलवाटेनें जातांना फार भीति वाटली होती. एकीकडे पर्वतप्राय प्रचंड लाटा थाडथाड आवाज करून टेंकडीवर आपटत होत्या व लाटांचे तुषार माझ्या अंगावर येत होते. जर का पाऊलवाटेत पाय घसरला तर एका क्षणांत "समुद्रास्तृप्यंतु" व्हावयाची पाळी यायची अशी पदोपदीं भीति वाटत होती. लाटमोड्या भिंतीशीं तर लाटा थयमान करीत होत्या. या लाटमोड्या भिंतीवरून पडून मागे दोन चार माणसांना जलसमाधी मिळाल्याच्या हृदयद्रावक हकीकतीची मला आठवण झाली व आमची भीति द्विगुणित झाली. पण हल्लीं ती टेंकडी सभोवारची पाऊलवाट पडल्यामुळे आतां लाटमोड्या भिंतीचे पलीकडे जाण्याची बंदी करण्यांत आली आहे. म्हणून या खेपेस आम्ही लाटमोड्या भिंतीच्या सुरवातीपर्यंत गेलों. तेथें खडकामध्यें लाटमोड्या भिंतीच्या बांधकामाबद्दल शिलालेख खोदलेला आहे. कराचीचें मनोरा बेट हे मोठे आश्चर्यकारक पण चित्ताकर्षक ठिकाण आहे, व कराची शहराचा तो एक अपूर्व अलंकार आहे यांत शंका नाहीं. सायंकाळ झाल्यावर आम्ही प्रमुदित मनानें होडींतून परत बंदरावर आलों व मग ट्रॅमनें बिऱ्हाडीं आलों.
ता. ३१ मे सन १९३५ शुक्रवार:- आज सकाळी आम्ही पायीं फिरत आमचे दृश्यदर्शन केलें. प्रथम आम्ही आरसीनल मैदानाचे मधोमध बांधलेली नवीच न्यायकचेरी पाहिली. ही नवी तांबड्या दगडाची इमारत खुल्या मैदानामुळे फारच उठावांत दिसते. मुंबईच्या हायकोर्टाच्या इमारतीपेक्षां ही इमारत जास्त भव्य व प्रशस्त दिसते. तिच्या प्रवेशद्वाराला एलफिन्स्टन हायस्कूलच्या इमारतीप्रमाणें मोठमोठ्या दगडी पायऱ्यांचा प्रशस्त जिना आहे. त्या तांबड्या लाल पायऱ्या, त्यांचे बाजूचा तो लालभडक कठडा व समोरचा तो लोखंडी दरवाजा हा देखावा विलक्षण चित्ताकर्षक आहे. एकंदर इमारतीचा फारच अनुकूल परिणाम मनावर होतो यांत शंका नाहीं. नंतर आम्ही कराचीचें आर्टस कॉलेज व एंजिनियरिंग कॉलेज पाहिलें. ह्रीं कॉलेजें एकाच आवारांत शेजारी शेजारीच आहेत. आर्टस कॉलेजची ती पिवळसर भव्य रंगाची. माठीव दगडाची घुमटानें शोभायमान झालेली सुंदर इमारत कोठें! तर एंजिनियारंग कॉलेजची खडबडी व रबल बांधणीची साधी इमारत कोठें! या इमारती पाहून वरील प्रकारची विरोधात्मक भावना मनांत येत. एंजिनियरिंग कॉलेज बांधतांना उपयुक्तता व काटकसर या दोन गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यांत आलें होतें तर आर्टस कॉलेज बांधतांना भव्यता व चिरस्थायीपणा या गोष्टींकडे लक्ष दिलें गेलें होतें असें दिसलें. इमारत साधी व साधारण पण कॉलेजांत दिले जाणारें शिक्षण संपूर्ण व सर्वांगीण घडवून आणण्याचें श्रेय एंजिनियरिंग कॉलेजच्या महाराष्ट्रीय प्रिन्सिपॉल गोखल्यांना आहे हें पाहून माझ्या मनाला एकप्रकारचा अभिमान वाटला. आर्ट्स-कॉलेज- वसतीगृहाच्या इमारतीही मोठ्या प्रशस्त व भव्य आहेत. दोन प्रहरीं आम्ही मोटारबसनें बारातेरा मैलांवर असलेलें मलिर गांव पहाण्यास गेलो. बसला माणशी फक्त तीन आणे पडतात. हे गांव मलिर नदीच्या कांठीं आहे. नदीमध्ये पाण्याचा थेंबही नव्हता; मात्र केशरी रंगी सुंदर वाळू सर्व पात्रभर पसरलेली होती. नदीचे पात्र पुष्कळ रुंद पण अत्यंत उथळं आहे. या नदींत विहिरी खणून त्यांतून पंप करून कराची शहराला पाणीपुरवठा करण्यांत आला आहे. या नदीला वर दिसणारे पाणी नाहीं खरें तरी पण येथे जमिनीच्या खालीं विपूल पाणी आहे. यामुळे या गांवांत जिकडे तिकडे बागाच बागा झाल्या आहेत. आम्ही एका मोठ्या बागेंत विहीर पाहिली. तिला चार इंची पंप लावलेला होता व त्यांतून पाटामध्यें धोधो पाणी पडत होतें. कितीही वेळ पंप चालविला तरी विहिरींतील पाणी कमी होत नाहीं, इतका मोठा झरा विहिरीला आहे असें पाहून आम्हांला आश्चर्य वाटलें. या बागेत आम्ही पुष्कळ वेळ हिंडलों. येथें नाना जातीचीं फळझाडे लावलेली दिसली. मलीर हे गांव कराचीचें नजीकचें शीतलनिवासस्थान झालें आहे. यामुळें येथें कितीतरी बंगले व धर्मशाळा बांधण्यांत आल्या आहेत व मध्यम वर्गातील लोक उन्हाळ्यामध्ये या ठिकाणीं राहण्यास येतात असे कळले.
मलीर गांवाचे अलीकडे द्रुग म्हणून खेडें लागतें. तेंच कराचीच हवा- बंदर (air port) होय. येथें हल्लीं केवढी तरी मोठी वस्ती वाढली आहे. येथें विमानें उतरण्याकरितां प्रचंड खुलें मैदान आहे, जागा कळण्याकरितां उंच लोखंडी मनोरा आहे, विमान ठेवण्याकरितां प्रचंड विमानगृह बांधण्यांत आलें आहे. मालिरला जातां येतां हा सर्व देखावा अनायासें पहाण्यास मिळतो. मलीरपर्यंत सर्व रस्ता डामरी केला असल्यामुळे धुरळा मुळींच उडत नांहीं व मालीरचें दृश्यदर्शन मोठ्या मौजेचें वाटतें. या दृश्यदर्शनास तीन चार तास लागतात.
झालें. आमचा कराचीचा मुक्काम आजरोजी मे अखेर सरला व त्याबरोबर आमचें कराचीचें दृश्यदर्शनही संपलें. आज सायंकाळीं क्वेट्टाच्या भयंकर धरणीकंपाची व त्या धरणीकंपामध्यें पन्नास हजार माणसांची आहुती पडल्याची भयंकर बातमी आम्हांला कळली. आम्ही क्वेट्टास सहा दिवसांपूर्वीच जाऊन आलों होतों. तेव्हां तेथें अधिक न राहिल्यामुळे आम्ही जिवानिशी परत आलों असा समाधानाचा विचार मनांत आला. पण आपले हजारों देशबांधव मृत्युमुखी पडले या दुःखद विचारांत आम्ही कराची शहर सोडलें.
१ जन १९३५ रोजीं कराचीहून निघून आम्ही स्वदेशीं व स्वगृहीं परत येऊन एक आठवडा झाला नाहीं तोंच क्वेट्टा शहराच्याप्रमाणें आमच्या घरावर आकाशाची भयंकर कुऱ्हाड कोसळली. ती म्हणजे माझ्या बंधूंच्या एकुलत्या एक मुलाचा आकस्मिक मृत्यु ही होय! दुःखं दुःखानुबंधी या म्हणीप्रमाणें माझ्या बंधूंचा एक जांवईही वारला. या कौटुंबिक दुर्दैवानें माझें वाङ्मयकाम दिरंगाईवर पडलें. पण वाईटांतून चांगलें निष्पन्न होतें या न्यायानें सन १९३५ च्या नाताळांत माझ्या बंधूंच्या समागमें मला सिंघप्रांत पाहण्याची पुन्हां एकदां संधि आली.
या खेपेस आम्ही कराचीस दीड दिवसच होतों व अमेरिकन प्रवासी पद्धतीप्रमाणें आम्ही मोटारीनें कराचींतील पूर्वीच वर्णन केलेल्या प्रेक्षणीय स्थळांचें पुनर्दर्शन घेतलें. तेव्हां त्या वर्णनाची पुनरावृत्ति न करतां मी कराचीची थोडीशी मोजमापी माहिती देऊन हे कराची पुराण संपवितों.
कराचीची सध्यांची लोकसंख्या २६३५६२ आहे हें मागे सांगितलेंच आहे. सिंघप्रांतांत जरी मुसलमान वस्ती हिंदूंच्यापेक्षां पुष्कळ पटीनें अधिक आहे तरी कराचीच्या वस्तीची एक विलक्षण गोष्ट म्हणजे शीख व हिंदू एकत्र धरले असतां हिंदु-मुसलमानांची संख्या बरोबर निम्मेनिम होते. हिंदू वस्ती १२२८४९ भरते तर मुसलमानांची संख्या १२२८४७ भरते.
कराची बंदराचा आयात निर्गत व्यापार सन १८४३ साली अवघा ११ लाख रुपयांचा होता तोच सन १९३० मध्ये ५७ कोटी रुपयांचा झाला! सन १८६० मध्यें कराची बंदरांत गलबतें व आगबोटी मिळून ७५ हजार टनांचीं जलयानें आलीं, तर सन १९३३ मध्ये २२ लाख टनांचीं गलबतें व आगबोटी मिळून एकंदर जलयानें आलीं. सन १८६० मध्ये मुंबई विश्वविद्यालयाच्या मॅट्रिक परीक्षेस कराचीहून तीन विद्यार्थी बसले होते तर सन १९३५ च्या मॅट्रिक परीक्षेस कराची केन्द्राला १९२७ विद्यार्थी मॅट्रिकला बसले. येवढी मोजमापी माहिती पुरे झाली. यावरून कराची शहराची व बंदराची गेल्या सुमारे ७५ वर्षांत कल्पनातीत वाढ झाली आहे ही निःसंशय गोष्ट आहे.
सिंधप्रांतांत वहातुकीचे बांधलेले रस्ते कमी आहेत. पूर्वकाळी पुष्कळसा प्रवास उंटावरून करावा लागे असें सांगतात. पण हल्लीं
रेल्वे रस्त्यांचें जाळें प्रांतभर पसरलेलें आहे. आधीं सिंधु नदी प्रांतांच्या मधोमध वहात गेली असल्यामुळे त्या नदीच्या पश्चिम व पूर्व बाजूंना रेल्वेरस्त केलेले आहेत व ते नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना समांतर जाणारे "रेल्वे रस्ते, कोट्री व हैद्राबाद यांच दरम्यान एक मोठा सिंधूवरील पूल करून आणि सक्कर व रोहरी यांचे दरम्यान तसाच प्रचंड पूल करून, जोडलेले आहेत. कराचीपासून कोट्रीपर्यंत एकच रस्ता आहे. कोट्री- हैद्राबाद- रोहरी हा रेल्वेरस्ता मुख्य समजतात व तो दुहेरी रेल्वेरस्ता आहे. हा रेल्वेरस्ता दिल्ली-आग्रा व लाहोर-पेशावरकडे जातो. दुसरा फाटा रोहरीपासून क्वेट्टाचमनकडे जातो. कोट्री ते रुक हा रेल्वेरस्ता मुख्य रस्त्यांना जोडणारा रस्ता समजला जातो. क्वेट्टाचमन व दिल्ली-लाहोरकडे जाणारे रेल्वे रस्ते ब्रॉडगेजचे आहेत; बाकी बरेच रेल्वेरस्ते केलेले आहेत; पण ते मीटरगेजचे रस्ते आहेत. हैद्राबादपासून मारवाड अमदाबादपर्यंतचा रस्ताही मीटर गेजचा आहे. मुंबईहून कराचीस रेल्वेरस्त्याने जातांना या भिन्न गेजच्या रेल्वेरस्त्यांची थोडीशी अडचण व त्रास भासतो. म्हणून विरमगांवाहून बाडिन- हैद्राबादच्या दक्षिणेस असलेल्या शहरापर्यंतचा ब्रॉडगेज फाट्यापर्यंत ब्रॉडगेज रेल्वे करून मुंबई ते कराची असा एकसंधि थेट ब्रॉडगेज रेल्वेरस्ता करण्याची योजना वारंवार पुढें येते. पण फाजील खर्चाच्या दृष्टीनें ती अंमलांत येत नाहीं. या प्रांतांत कालव्यांच्या पाण्यावर जसजशी जमिनीची लागवड वाढत जाईल तसतशी दळणवळणसाधनांची व विशेषतः बांधलेल्या रस्त्यांची जरूरी जास्त जास्त भासत जाईल. हल्लींसुद्धां नवे रस्ते करण्याचे व जुने रस्ते सुधारण्याचं काम जारीनें चालू आहे. म्हणून रेल्वे नसलेल्या ठिकाणी हल्लीं मोटारबसेस व लॉरीज यांची रहदारी चालू झाली आहे. यामुळे जरी सिंधप्रांत बराच लांबरुंद आहे तरीपण प्रांतांतील कानाकोपऱ्याला जाण्यास जलदप्रवाससाधनें उपलब्ध झाली आहेत. म्हणून सिंधप्रांत आठ दहा दिवसांत पाहून होणें शक्य झाले आहे. पूर्वकाळचा उंटावरचा किंवा सिंधु नदीमधून गलबतांवरील पुष्कळ वेळांचा व पुष्कळ त्रासाचा प्रवास करण्याचें कारण राहिलें नाहीं. हीं नवीं जलदप्रवासाची साधनें उपलब्ध झालेल्या दिवसांत मी प्रवास करीत असतां मला पूर्वकाळच्या या प्रांतांतील आमच्या महाराष्ट्रीय अंमलदारांच्या कंटकपणाची व धाडसाची आठवण झाली व या लोकांचें मी मनांतल्या मनांत कौतुक केलें. असो.
या छोट्या प्रकरणांत मी सिंधु नदीच्या पश्चिम बाजूकडील मुसलमानी अंमलापासून प्रख्यात असलेल्या तीन शहरांचीं वर्णनें देण्याचा बेत केला आहे. त्यांपैकीं एकच शहर रेल्वेपासून किंचित् दूर आहे. पण तेथें हल्ली मोटरबससर्व्हिस चालू असल्यामुळे व आगगाड्या सोयीच्या असल्यामुळे दोन चार तासांत तें शहर आम्हांला पहातां आलें. तें शहर म्हणजे ठठ्ठा शहर होय. कित्येक शतकेंपर्यंत हे शहर सिंधप्रांताची राजधानी व सिंधप्रांताचें मुख्य बंदर होतें. आम्ही कराचीहून दोन प्रहरच्या सव्वाबारा वाजतांच्या क्वेट्टामेलगाडीनें निघालों ते जंगशाही स्टेशनला दोन वाजतां उतरलों. कराचीपासून जंगशाही चौपन मैल आहे. कराची शहर व कँटोनमेंट स्टेशन टाकलें कीं सिंधप्रांताचा सपाट, खडकाळ व भुरट्या रानानें व्याप्त असा भूमिभाग लागतो. नऊ मैलांवर असलेलें द्रुग स्टेशन हें हल्ली विमानबंदर झाल्यामुळे तेथे वस्ती वाढत आहे. जिकडे तिकडे सुंदर रस्ते व नवे नवे बंगले व इमारती दृष्टीस पडतात व विमानें उतरण्याच्या त्या राक्षसी इमारती व मनोरे पाहून मन आश्चर्याने थक्क होतें. यापुढचे स्टेशन मलिर चारच मैल आहे. पण विपूल पाण्यामुळे हा भाग शेती व बागायती यांनी हिरवा हिरवागार दिसतो व म्हणून मोठा नयनमनोहर वाटतो. हें स्टेशन टाकलें कीं, रुक्ष, खडकाळ, भुरट्या रानाने व निवडुंगानें व्याप्त असा दुर्दर्शन भूमिभाग एकसारखा लागत राहतो. आम्ही वर म्हटल्याप्रमाणें जंगशाहा xशनला दोन वाजतां उतरलों. तेथून ठठ्ठा शहर तेरा मैल आहे. मोटारटॅक्सी तयार होती. मोटारचें भाडें माणशी बारा आणे पडलें. मोटारटॅक्सी लागलीच निघाली. हा भाग अगदीं नापीक व रुक्ष वाटला. टॅक्सीमध्ये एक मुसलमान जमीनदार भेटले. ते म्हणाले, पूर्वी या भागाला नदीच्या पुराच्या कालव्याचं पाणी मिळत असे. पण सक्करबॅरेजचे नवे व बारमाही कालवे झाल्यापासून पुराचे जुने कालवे बंद झाले. म्हणून या भागांतील पूर्वीची भातशेती पार बुडाली व आम्हां जमीनदारांचे अतोनात नुकसान झालें. हें ऐकून मला वाटले कोणतीच नवी सुधारणा ही सर्वस्वी कल्याणकारक नसते. सक्कर-बॅरेजच्या कायमच्या व बारमाही कालव्यानें लाखों एकर नवी जमीन लागवडीस आली असेल व कालेकरून येणार असेल; पण त्यानें कांहीं जुना भाग नापीक झाला यांत शंका नाहीं. ज्याप्रमाणें मोटारींची वहातूक वाढल्यामुळे बैलगाडीचा धंदा करणाऱ्यांचा धंदा बुडाला त्याप्रमाणं नव्या कालव्यांनी जुन्या शेतजमिनी ओसाड पडल्या असें त्या मुसलमान जमीनदाराच्या बोलण्यावरून कळून आलें. उद्यां ठठ्ठ्यास ईदची जगांत पहावयास न सापडणारी अशी मोठी मिरवणूक निघावयाची आहे, तरी तुम्ही उद्यां ठठ्ठ्यास अवश्य रहा असा त्यानें आम्हांला आग्रह केला. थोड्या वेळानें जरा उंचवट्याचा टेंकडीसारखा भाग आला व त्यावर जिकडे तिकडे मोडक्यातोडक्या इमारती व विशेषतः थडग्यांचे घुमट दिसूं लागले. ही मकली टेंकडी होय व पूर्वीचें ठठ्ठा शहर या टेकडीपर्यंत पसरलेलें होतें असें त्या गृहस्थानें सांगितलें. अथणीकडून मोटारीनें विजापूर शहराकडे जाऊं लागलें म्हणजे ज्याप्रमाणे मोडक्या तोडक्या इमारती व थडगीं जागोजाग दिसतात तसाच या ठठ्ठा शहराच्या मकली टेंकडीचा देखावा दिसतो. मकली टेकडी ही टेकडी कसची! पण म्हणतात ना निरस्तपादपे देशे एरंडोपिद्रुमायते त्याप्रमाणें निरस्त पर्वते देशे शिल्लोचयो पर्वतायते असें नवें सुभाषित माझ्या तोंडून सहज बाहेर पडलें! ही क्षुद्र टेंकडी- नव्हे टेंकडीवजा उंचवठा टाकल्यावर डाव्या हातास एक उथळे व गवताळ पाण्याचा तलाव लागला. आणखी एक मैलभर आमची मोटरटॅक्सी पुढे गेली तरी शहराचा मागमूस लागेना. मात्र हा भाग सखल व थोडाफार हिरवागार दिसला. तेव्हां पूर्वी या भागाला नदीच्या पुराचे पाणी मिळत असावें असें वाटलें. शेवटी एकदां गांव लागले व आम्ही मोटारगाडीच्या अड्ड्याशी येऊन पोहोंचलों.
ठठ्ठा हे एका काळीं राजधानीचे शहर व महत्त्वाचें बंदर म्हणून आम्ही मोठ्या उत्सुकतेनें पहाण्यास आलों. पण प्रत्यक्ष पाहतां तें एक खेडेगांववजा गांव दिसलें व आमची मोठी निराशा झाली. उगाच या गांव येण्याच्या भरीस पडलों असें मला वाटलें. त्यांतल्या त्यांत गांव पहाण्याकरितां केलेल्या तजवीजी फुकट गेल्या. आम्ही ठठ्ठाच्या दोन लोकांना दोन पत्रे आणली होतीं. एक तेथल्या पब्लिकवर्क्सच्या सुपरवायझरला व दुसरें मराठी भाषा जाणणाऱ्या एका दुकानदाराला. आम्ही जंगशाही स्टेशनवर आमचें सामान ठेवण्याची तजवीज केली होती म्हणून बरें झालें. तेव्हां मोटारस्टँडवर आल्यावर आम्ही लागलीच ओव्हरसीयरच्या घराची चवकशी केली. दोनचार ठिकाणीं विचारल्यावर त्यांच्या घराचा पत्ता लागला. पण घराला कुलूप असल्यामुळें ते बाहेर गेले असावे असें समजून आम्ही दुकानदाराची चौकशी करीत गांव बरेंच हिंडलों. या गांवांतील बहुतेक घरें पांढऱ्या मातीचीं व कच्या विटांची दिसलीं व जरा बऱ्यांपैकी घरे तांबड्या भाजलेल्या विटांची दिसली. पण एकही घर किंवा इमारत दगडी बांधणीची दिसली नाहीं. गांवांतील रस्ते बोळवजा असून निवळ धुळीचे व वाळूचे दिसले. बाजारपेठ बरीच लांबवर पसरलेली दिसली. पण त्या पेठेचा रस्ता अरुंद बोळवजाच होता. पूर्वकाळच्या राजधानीचे चिन्ह किंवा स्मारक कोठेही दृष्टीस पडलें नाहीं. शेवटीं एकदां त्या दुकानदाराचें दुकान सांपडलें. त्यांना मराठी येत होतें. कारण ते मुंबईकडे आठ दहा वर्षे राहिलेले होत. दोघे भाऊ व एक नोकर असे तीन इसम तीन समोरासमोरच्या दुकानांवर विक्रीस बसले होते. तो मुसलमानांच्या बकरईदच्या आदला दिवस होता. यामुळे दुकानदारबंधु विक्रीच्या कामांत फार गुंतलेले दिसले. तेव्हां त्यांनी आम्हांला एक पोऱ्या दिला व मग गांवांतील प्रेक्षणीय स्थळ, जुम्मामशीद पाहण्यास आम्ही गेलों. मशीद विटांची बांधलेली असून तिच्या सभोंवतीं तटवजा भिंत होती व आंत खूप मोठा खुला चौक होता. विटांच्या भिंतीला चुन्याचा गिलावा केलेला असून त्यावर रंगाचें नक्षीकाम केलेलें होतें. हे काम श्रीरंगपट्टणामधील टिपूच्या दर्या- दौलतीच्या धर्तीचें आहे असें वाटलें. पण एकंदर मशीदीची बांधणी मनावर परिणाम करणारी वाटली नाहीं. दोन चार शतकें राजधानी असलेल्या शहरांतील प्रेक्षणीय स्थळांची व एकंदर गांवाची दुर्दशा पाहून मला काळाचा महिमा दर्शविणाऱ्या खालील सुभाषिताची आठवण झाली.
"भ्रातः कष्ट महो महान्सनृपतिः सामन्तचक्रंच तत् ।
पार्श्वसाच विदग्ध राजपरिषत्ताश्चन्द बिंबाननाः ॥
उद्वृत्तः सच राजपुत्र निवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ।
सर्वे यस्य यशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥
या देखरेख रस्त्याने देखावा अद्वितीय वाटला. आडीचशे फूट रुंदीचा दुथडी पाण्यानें तुडुंब भरलेला व संथपणे वाहणारा तो कालवा, कालव्याचे बाजूच्या बांधावर उगवलेले हिरवे हिरवें गवत व लहान झुडपें, अलीकडच्या बंधाऱ्यावरील तो सरळ, सपाट, पांढरा शुभ्र व मऊ मऊ बिनखडीचा एक मोटार जाणारा रस्ता, त्या रस्त्याच्या भूमिभागाचे बाजूस हारीनें लावलेलीं टवटवीत पानांचीं नानाविध जातीचीं सुंदर झाडे हा सर्व देखावा विलक्षण चित्ताकर्षक आहे यांत शंका नाहीं. आमच्या मोटारला कोठेही धक्का बसत नव्हता. जणूं कांहीं मोटारकारला पायघड्या घातल्या आहेत! इतका रस्ता मऊ, गुळगुळीत व बिनखड्याचा होता! माझे लक्ष या अद्वितीय देखाव्यावर खिळलेलें असतांना मैलांवर मैल येऊन जात होते याचे भान राहिलें नाहीं व आम्ही लारखान्यांत चाफेकर यांचे बंगल्यावर केव्हां आलों हे कळलें नाहीं. आमचें जेवणखाण आटपेपर्यंत चारपांच वाजले. या सर्व वेळामध्यें आमची फार करमणूक झाली व आम्हांला फार कौतुक वाटलें तें रा. चाफेकरांच्या पांचसहा वर्षांच्या मुलाचें. इतका विलक्षण बोलका मुलगा आमच्या सर्व प्रवासांत आम्हांला क्वचित् भेटला असेल. या मुलाचें मन जणूं कांहीं खुलें करून ठेवलेलें होतें. मुलाला वयाच्या मानानें पुष्कळ माहिती दिसली व तो चवकसही फार होता. तो आम्हांला निरनिराळे प्रश्न करून माहिती करून घेत होता. मी प्रवासाचीं पुष्कळ पुस्तकें लिहिलीं आहेत हें कळल्यावर तीं मला वाचावयाचीं आहेत व म्हणून तीं मला पाठवून द्या अशी आग्रहाची विनंति त्या मुलानें केली. कराचीस परत आल्यावर मी त्याला माझीं प्रवास- पुस्तकें पाठवून दिलीं. ज्याप्रमाणें तो मुलगा नानाविध विषयांवर प्रश्न विचारी त्याप्रमाणे आपणही माहिती सांगत असे. त्यामध्यें त्यानें आम्हांला सांगितलें कीं सिंधूनदी आपला प्रवाह बदलणार आहे व मग सक्करधरण व सर्व कालवे फुकट कोरडे पडणार आहेत. सक्करच्या धरणाविरुद्ध अशा प्रकारचा आक्षेप मुलानें कोणाच्या तरी तोंडून एकला असला पाहिजे व तोच आक्षेप तो आम्हांला माहितीच्या रूपानें सांगत आहे असें मला वाटलें. मी त्या मुलाला थट्टेनें म्हटलें "अरे, असें झालें तर तुझ्या वडिलांची नोकरी व काम नाहींसें होईलना!" मुलगा खरोखरीच फार कौतुक करण्यासारखा आहे यांत शंका नाहीं. यामुळे आमचा सर्व वेळ मौजेंत व करमणुकींत गेला. सायंकाळी आम्ही लारखाना गांव पहाण्यास मोटारीनें निघालों. ठठ्ठा व हें गांव यांमधील विरोध माझ्या मनापुढे सारखा उभा रहात होता. ठठ्ठा हे मोडकळीस आलेलें व भिकार खेड्यावजा गांव दिसलें तर लारखाना हे मोठ्या भरभराटीच्या शहराप्रमाणे सुधारलेलें गांव दिसलें. येथले रस्ते प्रशस्त व निर्धूळ डामरी होते. येथल्या सार्वजनिक इमारती व राहते बंगले सुबक व नव्या बांधणीचे दिसले. गांवांतील बाजारपेठे मोठी प्रशस्त व नवीच बांधलेली दिसली व त्यांत मोठमोठीं दुकानें दृष्टीस पडली. मुंबई सरकारचे सध्यांचे एक मंत्री नामदार भूतो हे लारखाना जिल्ह्यांतील एक मोठे जमीनदार आहेत हे लारखाना शहर पाहतांना सहज कळून आलें. खा. ब. "भूतो वसाहत" नांवाची भली मोठी पाटी एका प्रचंड कमानीवर दिसली. ही सर्व इस्टेट भूतोची असून त्यांत भाड्याकरितां बांधलेले बंगले व चाळी पुष्कळ आहेत असें कळलें. याप्रमाणें आम्ही मोटारींतून सर्व शहर फिरलों.
शहराच्या जुन्या भागांतूनही आम्ही जाऊन आलो. येथले रस्ते अर्थात् अरुंद होते व घरेंही जुन्या पद्धतीचीं व गलिच्छ दिसली. नंतर आम्ही शहराबाहेर आलों.
या शहरांत व शहराबाहेर जिकडे तिकडे खूप झाडी आहे. कारण या शहराला लागून नव्हे शहरांतून जुना कालवा गेलेला होता. नवा कालवा जरा दुरून गेला आहे. सध्यां जुना कालवा किल्ल्याच्या खंदकासारखा पाण्याने भरलेला दिसला. वाहतें पाणी नसल्यामुळे तें हिरवट रंगाचे दिसत होतें. आम्ही लारखान्याच्या एका मोठ्या व्यापाऱ्याची खासगी बाग पाहिली. बाग बरीच विस्तीर्ण असून त्यामध्यें नानाविध फुलझाडांचे ताटवे केलेले होते. बागेची एकंदर रचना मोठी मनोहर होती. नंतर आम्ही कालव्याच्या देखरेख रस्त्यानें पांच सात मैल गेलों व मग दुसऱ्याच एका रस्त्यानें परतें शहरांत आलों. आमचें लारखाना शहराचें दृश्यदर्शन संपलें. लारखाना जिल्हा हा सिंधमधील फार सुपीक जिल्ह्यांपैकी एक असून तो फार पुरातन काळापासून तांदुळाकरितां प्रख्यात आहे. सिंधमधला सर्वांत सुवासिक व सुंदर भात व तांदूळ. या जिल्ह्यांत होतो, असें कळलें. आतां बारमाही कालवा आल्यामुळे भाताशिवाय कापूस, गहूं, ज्वारी इत्यादि पिकेही मोठ्या प्रमाणावर होऊं लागलीं आहेत. म्हणून या जिल्ह्याची व अर्थात् जिल्ह्यांतील मुख्य शहराची भरभराट असून जसजशी कालव्याखालची जमीन जास्त लागवडीस येईल तसतशी या जिल्ह्यांची व शहराची आर्थिक स्थिति सुधारतच जाईल असें आम्हांला कळून आलें. रा. चाफेकरांचे आभार मानून आम्ही पुढील प्रवासास मार्गस्थ झालों.
लारखान्याहून शिकारपूर हे तिसरें प्रख्यात शहर पंचेचाळीस मैल आहे. पण लारखान्याहून शिकारपुरास जाण्यास स्वतंत्र आगगाडी नाहीं. लारखान्याहून ३४ मैलांवर असलेल्या रूक जंक्शन स्टेशनवर आगगाडी बदलावी लागते व मग रोहरी जंक्शन स्टेशनकडून क्वेट्टाला जाणाऱ्या आगगाडीत बसावें लागतें. रूकपासून शिकारपूर फक्त ११ मैलच आहे. पण आगगाड्या सोयीच्या आहेत. यामुळे रुक येथे जास्त वेळ थांबावे लागत नाहीं. फक्त एका आगगाडींतून दुसऱ्या पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरील आगगाडींत जाऊन बसावें लागतें. लारखान्याहून आगगाडी सुमारे दोन प्रहरी तीन वाजतां निघते, ती शिकारपुरास पांच वाजतां पोहोंचते. सिंधप्रांतांतील हा सर्व भाग दाट जंगलानें भरलेला आहे. जंगल फार उंच किंवा फार मोठें नाहीं तर आंखुड व भुरटें आहे व त्यांत मोठमोठीं जाड देठाचीं गवतें पुष्कळ आहेत. झाडेंसुद्धां बारीक शेराच्या पानासारख्या पानाचीं आहेत. पण जंगल मात्र खूपच दाट आहे यांत शंका नाहीं. यामुळे हा भूमिभाग रुक्ष किंवा ओसाड असा वाटत नाहीं. शिकारपूरच्या म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसर रा. जोशी यांचेकडे आम्ही उतरण्याची व्यवस्था केली होती. त्याप्रमाणें रा. जोशी हे स्टेशनवर आले होते व त्यांचे मोटारींतून आम्ही त्यांचे बंगल्यावर आलो. चहापाणी झाल्याबरोबर आम्ही शिकारपुरच्या दृश्यदर्शनास निघालों.
प्रथमतः आम्ही नवी कोरीकरकरीत अशी इस्पितळाची इमारत पाहिली. इमारत उत्तम बांधणीची असून अर्वाचीन काळच्या वैद्यकीय सोयीनीं व शस्त्रक्रियेच्या शास्त्रीय उपकरणांनी युक्त अशी बांधण्यांत आली आहे. इस्पितळांत ४० रोग्यांची रहाण्याची सोय असून अर्वाचीन पद्धतीचें पांढऱ्या शुभ्र विटांनी मढविलेले शस्त्रक्रियागृह आहे. या इस्पितळांतील एक्सरेजची औषधीयोजना करण्याची यंत्रसामुग्री आम्ही पाहिली. इस्पितळाची एकंदर टापटीप, स्वच्छता व रोग्यांकरितां केलेल्या सुख




सोई व इस्पितळाचे आसपास राखलेली खुली जागा हीं सर्व वाखाणण्यासारखीं आहेत असें मला वाटलें. या सर्व इमारतीची योजना, बांधणी व व्यवस्था रा. जोशी यांचे हातची आहे हें कळून आम्ही रा. जोशी यांच्या कौशल्याचे व कामगिरीचें कौतुक केलें. हे इस्पितळ उद्धवमल ताराचंद या व्यापाऱ्याच्या उदार देणगीचें मूर्तस्वरूप आहे. त्यानें स्वतः एक लाख रुपयांची देणगी देऊन दुसऱ्या व्यापाऱ्यांकडून आणखी दोन लाख रुपये जमवून दिले. सर्व देणग्या देणारांचीं नांवें इस्पितळाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर एका सुंदर संगमरवरी दगडावर कोरलेली दिसली. या नव्या व उपयुक्त संस्थेचा लाभ गांवकऱ्यांना करून दिल्याबद्दल उद्धवमल ताराचंद यांचें मनांतल्या मनांत कौतुक करीत आम्ही इस्पितळांतून बाहेर पडलों. नंतर शेजारींच असलेले बॉयस्काउटचें व्यायामगृह पाहिलें. ही छोटीशी इमारत नवीच बांधलेली दिसली. दोन पिंगपाँग टेबलें राहतील इतका मोठा दिवाणखाना व्यायामगृहामध्यें आहे. गृहासमोर टेनीस कोर्टे आहेत व बँडस्टँडनें अलंकृत अशी सुंदर फुलबाग आहे. या व्यायामगृहाचा विशेष म्हणजे येथें ग्रीक गोलनाटकगृहाच्या आकाराचा आगीन-आखाडा (camp-fire place) बांधलेला आहे. हा अर्थात् वरती खुला व बिनछपरी आहे. मात्र सभोवार वर्तुळाकार काँक्रीटच्या नाटकगृहाप्रमाणें बसण्यास चढत्या तीन चार पायऱ्या बांधल्या आहेत. हे कामही वाखाणण्यासारखे आहे. हेही काम रा. जोशी यांच्या हातचें आहे असें कळलें. नंतर आम्ही गांवापासून मैल दीड मैलांवर असलेली एक गोशाळा पाहण्यास गेलों. केवढी प्रचंड ती गोशाळा! येथें एकंदर २००० गुरे पाळली जातात असे कळले. येथें आम्ही दुभती गुरें व त्यांची वासरें पाहिली. येथें म्हाताऱ्या, आंधळ्या, लंगड्या अशा नाना व्यंगांनीं गांजलेल्या गाई आहेत. त्या प्रत्येक जातीच्या गाईंना निराळें गोगृह बांधलेले आहे. त्यांत हीं गुरें मोकळी सोडलेली दिसली. येथें गुरांचें खाण्याचें गवत तयार करण्याचें मोठें यंत्र पाहिलें. या यंत्रानें कडब्याचा बारीक भुगा करतात व मग त्याला थोडेसें मिठाचे पाणी मारून त्या भुग्यामध्यें कोंडा घालतात. याप्रमाणें सर्व कडबा व गवत गुरांना घालावयाच्या खाण्याप्रमाणें तयार करतात व मग असें खाणें गुरांना घालतात. यामुळे कडब्याची किंवा गवताची एक काडीसुद्धां फुकट जात नाहीं. यामुळे कडब्याची किंवा गवताची पुष्कळ बचत होते. गोठ्यांमध्यें फुकट गेलेल्या चाऱ्याची व गवताची घाण व कचरा मुळींच पडत नाहीं. यामुळे येथले गोठे घरांतल्या खोल्यांप्रमाणे दिसले. येथे खाणीतील मिठाचे मोठमोठे खडे जागोजाग ठेवलेले आहेत. ते खडे गुरें येतां जातां चाटतात. येथें पदवीधर पशु-डॉक्टर ठेवलेला आहे. येथल्या गुरांची सर्व व्यवस्था शास्त्रीय पद्धतीवर चाललेली आहे. या गोशाळेच्या मालकीचें १००० एकरांचे कुरण आहे. तेथून गवत व कडबा आणतात. दुभत्या गुरांचें तीन चार मण दूध दरवेळेस निघतें तें गांवांत विकलें जातें येथल्या गोशाळेतील नुकत्याच व्यालेल्या गाई व म्हशी लोकांना ८ रुपये व १५ रुपये ठेव ठेवून घेऊन दुधाकरितां दिल्या जातात व त्या भाकड झाल्या. म्हणजे परत गोशाळेत घेतात व मग रुपयांची ठेव परत करतात. गाय म्हैस नेणाऱ्या मनुष्याने गुरांची आबाळ करूं नये व त्यांची निगा योग्य राखावी म्हणून ही ठेव हमीवजा घेतली जाते. जर गुरांची आबाळ झाली असेल किंवा निगा बरोबर राखली नसेल तर ठेव दंडादाखल गोशाळेला घेतली जाते. अशा रीतीनें पुष्कळ लोक गाई पाळण्यास नेतात असे कळलें. आम्ही सर्व गोशाळा पाहून आश्चर्याने थक्क झालों. आमच्या महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणीं पांजरपोळ असतात. पण तेथें गुरांची किती अव्यवस्था व अनास्था असते! वाईच्या चौंडेबोवांनी ही शिकारपूरची गोशाळा पहावी म्हणजे त्यांना त्यापासून पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असें कळून येईल असें मला. वाटलें. गोशाळेच्या प्रेक्षक- पुस्तकांत (Visitor's Book) अभिप्राय व नांव लिहून ठेवून व गोशाळेच्या व्यवस्थापकाचे आभार मानन आम्ही आश्चर्यचकित मनानें नवीन होत असलेल्या आस




फाल्ट रस्त्यानें पांच सहा मैल मोटारीतून सहल करून सभोवारचा भूमिभाग पाहिला. हा भाग फार सपाट असून फार सुपीक आहे असें हिरव्यागार बागांवरून व शेतांवरून दिसून आलें. या भागाला सक्करबॅरेजच्या नव्या कालव्याचें पाणी मिळत नाहीं खरें पण सिंधु नदीच्या वरच्या प्रवाहांतून पुराचे पाणी हंगामी मिळतें व मग या भागांत जिकडे तिकडे पाणीच पाणी होतें. केव्हां केव्हां गांवांतही पुराचे पाणी येतें; पूर ओसरल्यावर लोक पिकेँ पेरतात व मग पुराच्या ओलीवर सर्व पिके तयार होतात. फळझाडांना बुडखींतून (छोट्या विहिरीमधून) उक्तीनें पाणी दिलें जातें. हें सर्व पाहून झाल्यावर आम्ही शहराकडे परत आलों व म्युनिसिपालिटीची शाहीबाग नांवाची सुमारें चाळीस एकरांची सुंदर बाग पाहिली. बागेंतील रचना सुबक व सौंदर्य- पोषक आहे असें दिसलें. नंतर आम्ही एका गृहस्थाची खासगी बाग पाहिली. तीही प्रेक्षणीय वाटली. हें पाहून होईतों रात्र झाली. पण शहरांत विजेच्या दिव्यांचा पुरवठा केलेला असल्यामुळे जिकडे तिकडे प्रकाश प्रकाश दिसत होता. अशा प्रकाशांतच आम्ही शिकारपूरची प्रशस्त बाजारपेठ पाहिली.
येथपर्यंत आमचें दृश्यदर्शन मोटारींतून व अमेरिकन प्रवाशी पद्धतीनें झालें. नंतर रा. जोशी यांचेबरोबर आम्ही पायी चालत शहराचा जुना भाग पाहिला. शहरांतील रस्ते ॲस्फाल्टचे करण्याचें काम चालू असलेले दिसलें. शहराला ड्रेनेज व ॲस्फाल्टचे रस्ते करण्याकरितां सात लाख रुपये खर्च व्हावयाचे आहेत व तें काम दोन वर्षांत पुरें होईल असें रा. जोशी यांनी सांगितलें. शेवटीं रा. जोशी यांचेबरोबर आम्ही एका अरुंद बोळांतून गेलों. दोन्ही बाजूंस ठेंगण्या पडव्या असलेलीं दुकानें, व घरें सारखी लागत होती. बोळही छपरानें आच्छादिलेला होता! बोळ इतका लहान होता कीं, त्यामधून गाड्या किंवा पायगाड्यासुद्धां जाण्याची परवानगी नव्हती! बोळ बराच लांब होता. शेवटी एकदांचे आम्ही बोळाचे तोंडाला आलों व प्रशस्त रस्ता लागल्यामुळे मनाला खुलास वाटलें. सर्व बोळ वलांडून झाल्यावर रा. जोशी यांनी मला विचारले "या बोळांतल्या लोकांची स्थिति तुम्हांला कशी काय वाटते?" मी म्हटले "साधारण दर्जाचे हे व्यापारी असावेत व अर्थात् हे खाऊन पिऊन सुखी असावेत." रा. जोशी म्हणाले या बोळांतील प्रत्येक व्यापारी कमीत कमी लक्षाधीश तरी आहेच! येथले व्यापारी सर्व जगभर पसरलेले आहेत; त्यांच्यापैकी पुष्कळ व्यापारी मोठमोठ्या पैशांच्या पेढ्या चालवितात व इतर सर्व तऱ्हेचा व्यापार करतात! हे ऐकून मी आश्चर्यानें थक्कच झालों. शिकारपूर हे पाऊण लाख वस्तीचें मोठें शहर असून उत्तर सिंधप्रांताचें तें व्यापाराचें केन्द्र आहे असें कळलें. शेवटीं रा. जोशी यांनी आम्हांला एका मिठाईवाल्या दुकानदाराकडे नेलें. शिकारपूर मेवामिठाईकरितां फार प्रसिद्ध आहे. शिकारपुरी व्यापारी जगभर पसरलेले असल्यामुळे येथून सर्व जगभर मेवा मिठाई पाठविली जाते; अशा उत्तम मेवामिठाईचे मासले म्हणून त्यांनी मिठाईवाल्याकडून एक डबा घेतला व मग आम्ही मोठ्या प्रमुदित मनानें रात्री नऊ वाजतां परत जोश्यांच्या बंगल्यांत आलों.
आतां या तीन शहरांच्या पूर्वपीठिकेकडे थोडे लक्ष देऊ या. यांपैकीं सर्वात पुरातन व प्रख्यात शहर म्हणजे ठठ्ठा होय. पुरातन काळीं सिंधु नदीचा एक प्रमुख फाटा ठठ्ठा शहराच्या उत्तर दिशेने घरो गांवावरून घारो खाडीनें समुद्रास मिळत असे. त्या काळीं ठठ्ठा हें सिंधु नदीच्या दुआब (नदीच्या दोन फांट्यांमधील सपाट सुपीक प्रदेश) मध्यें मोडत असे. तेव्हां ठठ्ठा हेंच सिंधप्रांताचें व सिंधु नदीतील जलमार्गाचे मुख्य बंदर होते. येथें मुंबई इलाख्याकडून जलमार्गानें माल येई व मग तो इराणच्या आखातामधून पूर्व आशिया व अरबस्थानकडे जाई व तिकडला माल ठठ्ठाला येऊन मग तो मुंबई इलाख्याकडे जाई. यामुळे ठठ्ठा शहराला बहुत काळपर्यंत फार महत्त्व होतें. लारखाना व शिकारपूर हीं शहरें नदीकांठावर नव्हतीं खरी. पण हिंदुस्थान व सिंध प्रांत यांचें बलुचिस्थान, अफगाणिस्थान, इराण व आरबस्थान इत्यादि देशांशीं खुष्कीच्या बोलन घाटानें जें दळणवळण चालू होतें, त्या हमरस्त्यावरील हीं दोन शहरें असल्यामुळे ती शहरे व्यापाराची मोठीं केन्द्रे होती.
ठठ्ठा शहराचा सिंधच्या इतिहासांत पहिला उल्लेख सन १०२६ मधला आहे. त्या वर्षी गिझनीच्या महंमदाचा वझीर अबदूल रझक यानें सेहबान व ठठ्ठा हीं शहरे काबीज केलीं व आरब अधिकाऱ्यांना काढून टाकलें. पुढे दोन शतकेंपर्यंत दक्षिण सिंध प्रांत व ठठ्ठा हीं दिल्लीच्या बादशाहांच्या अमलाखालीं होतीं. पण हा अंमल फारसा जाचक नव्हता. कारण खरी सत्ता व अधिकार जाट व रजपूत नामधारी मुसलमानी धर्माच्या सरदारांच्या हातांतच होता. पुढे सन १३२१ पासून ठठ्ठा येथे सुमरास नांवाच्या शूर रजपूत जातीच्या राजघराण्याचें अधिपत्य सुरू झालें. याची सत्ता व अधिकार सन १३५१ पर्यंत चालू होता. तेव्हांपासून समा नांवाच्या रजपूत राजघराण्याचा अंमल व अधिकार चालू झाला. हें घराणंही नामधारी मुसलमानी धर्माचें होतें. ठठ्ठा येथील या रजपूत राजांना जाम म्हणत. यावरूनच त्यांची मूळची कुळी कळून येते. असे १७ जाम ठठ्ठा येथे राज्यकर्ते झाले. त्यांपैकी कांहीं मोठे कर्तबगार होऊन गेले. त्यांच्या कबरी मकली टेंकडीवर दृष्टोत्पत्तीस येतात. या जाम राज्यकर्त्यांमध्यें जाम संजर नांवाचा प्रख्यात व प्रजाहिततत्पर राजा होऊन गेला. बक्करचा (सक्करनजीकचें सिंधुनदीतील एक बेट) काझी लांच खातो अशी तक्रार संजरचे कानावर आली. तेव्हां त्यानें काझीस बोलावून आणलें व विचारपूस केली. काझीनें उत्तर दिले "मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत न्याय करण्यांत घालवितों. माझा पगार तर इतका थोडा कीं, माझीं बायकामुले घरी उपाशी मरतात. म्हणून मी पक्षकाराकडून पैसे घेतों." संजरला काझीचें म्हणणें पटलें व त्यानें काझीस क्षमा करून तत्काळ राज्यांतील सर्व नोकरां च्या पगारांत वाढ केली. यानंतर जामनिंडो नांवाचा राजा झाला. तोही जामसंजरप्रमाणें मोठा प्रख्यात प्रजाहिततत्पर निघाला. त्यानें पन्नास वर्षे राज्य केलें. या दोन कारकीर्दीच्या काळांत सिंध प्रांताची व ठठ्ठा राजधानीची भरभराटीची स्थिति होती. परंतु या जामसाहेबाच्या कारकीर्दीच्या अखेरीस सिंधवर कंदाहारच्या शहावेग अर्घण नांवाच्या आरब राजाचा डोळा फिरला व निंडोचा पुत्र फिरोज जाम हा चैनी व विलासी निघाला. त्यामुळे शहाबेगला उत्तम संधि मिळाली व त्यानें ठठ्ठा काबीज केलें व दक्षिण सिंघभर आपला अंमल बसविला. ही गोष्ट सन १५२१ च्या सुमारास घडली. पण तेव्हां दिल्लीस मोंगलांचा अंमल सुरू झाला. त्या बादशहानी सिंधप्रांत काबीज करून तो आपल्या साम्राज्यांचा एक सुभा केला. यामुळेच हुमायून बादशाह आश्रयाकरितां सिंधमध्ये आला व उमरकोट येथे अकबराचा जन्म झाला.
सन १५५५ मध्ये वसईकडील पोर्तुगीझ लोकांना मदतीकरितां बोलाविण्यांत आलें पण इतक्यांत तंटा मिटला. पोर्तुगीझ आरमाराच्या कप्तानाला स्वारीचा खर्च न मिळाल्यामुळे त्यानें ठठ्ठा शहर लुटून अलोट संपत्ति वसईस नेली. अकबरानें सिंध पूर्णपणे काबीज केला व तेथें सुभेदार नेमून प्रांताची चांगली व्यवस्था केली. यामुळे जेव्हां जहांगिरापासून भांडून शहाजहानानें दिल्ली सोडली तेव्हां तो ठठ्ठा येथें कांहीं काळ राहिला. बादशहा झाल्यावर आपल्याला ठठ्ठा शहरानें आश्रय दिला ही गोष्ट स्मरून शहाजहानानें ठठ्ठा येथें अजून शाबूत असलेली मोठी जुम्मा मशीद बांधली. औरंगजेबाचे कारकीर्दीनंतर मोंगल साम्राज्य मोडकळीस आलें. सिंधचे सुभेदार स्वतंत्र झाले व ते आपल्याला अमीर अथवा मीर म्हणवू लागले व निरनिराळ्या घराण्यांतील पुरुष राज्यावर आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनें गुलामशहा काल्होरा या मिराचे परवानगीनें ठट्ठा येथें सन १७५८ मध्ये आपली फॅक्टरी उघडली. परंतु गुलाम हुसेनचा मुलगा सरफराज याच्याशी कंपनीचें पटलें नाहीं. म्हणून सन १७७५ मध्ये ठठ्ठा येथील फॅक्टरी कंपनीने उठविली. पण याच सुमारास ठठ्ठा शहराजवळून जाणारा सिंधुनदीचा फाटा बंद झाला व त्यामुळे ठठ्ठा बंदरच बंद झालें व ठठ्ठा शहराचें वैभव नष्ट झालें. "गत वैभव झालों मी" अशा तऱ्हेचे खेदोद्गार शहराला काढण्याची पाळी आली. बदलणाऱ्या नदीच्या प्रवाहावरील बंदराऐवजीं आरबी समुद्राच्या कांठावर असलेलें सुरक्षित व खोल पाण्याचें कराची बंदर हिंदु व्यापाऱ्यांनी याच सुमारास शोधून काढून तेथें आपला व्यापार सुरू केला. यामुळे ठठ्ठा शहराचें सर्व महत्त्व नाहींसें होऊन त्याला सध्यांची मागासलेल्या व मोडकळीस आलेल्या गांवाची स्थिति आली. असो. लारखाना शहराचा उदय कधीं झाला हे कळत नाहीं. पण पुरातन काळापासून त्याची व्यापाराचें केन्द्र व भाताचें आगर म्हणून प्रख्याती होती व ती आजतागाईत कायम आहे. जिल्ह्याच्या सुपीकतेमुळे व नव्या बारमाही कालव्यांच्या योगानें लारखाना शहराच्या भरभराटीत भरच पडली आहे व कालेकरून अधिक अधिक भर पडणार यांत शंका नाहीं.
या प्रकरणांत वर्णिलेलें तिसरें शहर शिकारपूर ठठ्ठाइतकें पुरातन नाहीं. या भागांत पूर्वी मोठें जंगल होतें व सक्कर येथील राजे व सुभेदार त्या जंगलांत शिकारीस येत असत. या भागांत राहणारा दाऊद म्हणून एक पुरुष मोठा कर्तबगार निघाला. त्याच्या घराण्यांतील पुरुषांनी दाऊद पोत्र (दाऊदाचे पुत्र) असें नांव धारण केलें. या घराण्यांतील बहाद्दरखान नांवाच्या पुरुषानें बक्करच्या सुभेदाराकडून शिकारपूरनजीकचा जंगलचा भाग इनाम करून घेतला व सन १६१७ मध्ये त्यानें शिकारपूर नांवाचें शहर वसविलें. सिंधमधून बलुचिस्थान वगैरे देशांकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर हे शहर वसविलें गेल्यामुळे या शहराला ताबडतोब व्यापारी महत्त्व आलें. शिवाय दाऊदपोत्र घराण्याच्या राजधानीचा मान त्या शहरास मिळाला. यामुळे या शहराची विलक्षण वाढ झाली. येथे मोठमोठे व्यापारी उदयास आले. पुढें दाऊदपोत्र घराण्याचा पाडाव होऊन शिकारपूरचें राजकीय महत्त्व कमी झालें. तरी त्या शहराचे व्यापारी केन्द्र व हमरस्त्यावरील शहर या नात्यानें मान व महत्त्व सारखे वाढतच गेलें व ब्रिटिश अमदानीमध्ये तर त्या शहराची जास्तच भरभराट होत गेली व कालेकरून त्याची जास्तच भरभराट होणार असें तें शहर ओझरतें पहाणाराससुद्धां वाटल्यावांचून रहात नाहीं. झालें. येथें शहर व त्याची पूर्वपीठिका पुरी झाली.
काल व स्थल या दोन्ही बाबतीत एकमेकांपासून दूर असलेल्या संस्कृतींची हकीकत वाचकांस या एकाच प्रकरणांत वाचण्यास सांपडणार आहे. सिंधप्रांताचा कझीन या इंग्रज पुराणसंशोधकानें लिहिलेला पुराणसंशोधनाचा इतिहास मी वाचला तेव्हां मला दिसून आलें कीं, सिंधप्रांतांतील पुराण-प्रसिद्ध स्थानें व संस्कृतीचे अवशेष पाहावयाचे व त्याबद्दल हकीकत लिहावयाची तर तो एक स्वतंत्र ग्रंथच होईल. पण सिंधच्या सर्वसामान्य वर्णनवृत्तांतपर पुस्तकामध्ये एका प्रकरणापेक्षां जास्त या विषयाला जागा देणे शक्य नाहीं असें पाहून मासलेवजा जीं दोन पुरातन संस्कृती स्थळे मी पाहिलीं, त्यांची वर्णनें एके ठिकाणी व एकाच प्रकरणांत करण्याचा मी बेत केला. तदनुरूप मी प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थलवर्णनास लागतो.
मी पाहिलेल्या पुरातन स्थळांपैकी पहिले स्थळ मोहनजोदारो हे होय. या पुरातन स्थळाचा शोध गेल्या बारातेरा वर्षांतला आहे. या शोधाचें श्रेय बानर्जी या पुराणसंशोधनखात्यांतील अंमलदारास आहे. सन १९२२ साली इ. सन १५० ते ३०० च्या सुमाराचा बौद्ध स्तूप व विहार खोदीत असतांना फारच पुरातन काळच्या विटा व वस्तू त्यांना आढळून आल्या. म्हणून सर जॉन मार्शल-पुराणवस्तु- संशोधनखात्याचे डायरेक्टर जनरल यांनीं सन १९२३-२४ सालीं रा. दिक्षीत यांना खोदकामावर नेमिलें. रा. दिक्षितांना पुष्कळ पुरातन वस्तू, अवशेष व एक शहरच्या शहर सांपडलें. तेव्हां सर जॉन मार्शलसाहब यांनी स्वतःच्या देखरेखीखालीं पांच चार वर्षे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून सर्व शहर व त्यांतील इमारती, रस्ते व गाळामध्ये गडदलेल्या हजारों वस्तू यांचा शोध लावला. त्यांनी या ठिकाणाचे व तेथें सांपडलेल्या नानाविध वस्तूंचे व अवशेषांचे फोटो घेतले. मग त्यांनी मोहनजोदारो या स्थळाबद्दल वेबस्टरच्या कोशाच्या आकाराचा तीन भागांचा सचित्र ग्रंथ प्रसिद्ध केला व आपल्या सिंधूतीर संस्कृतीच्या या नव्या शोधानें जगभर कीर्ति मिळविली. हा प्रचंड ग्रंथ दुर्मिळ आहे, व इतका मोठा ग्रंथ वाचण्याची चिकाटी व सहन शीलता अधिकच दुर्मिळ आहे. पण सामान्य वाचकांची सोय रा. अर्नेस्ट मॅके- पांच चार वर्षे मोहनजोदारो येथील संशोधनकामांत प्रत्यक्ष भाग घेतलेले एक मोठे संशोधक- यांनी लिहिलेल्या पुस्तकानें झाली आहे. "सिंधु संस्कृति" (Indus Civilization) नांवाच्या आपल्या सचित्र, सुबक व सुटसुटीत दोनशे पानांच्या क्राऊन साची पुस्तकांत मॅकेसाहेबांनी मोहनजोदारो येथें सांपडलेल्या हजारों वस्तूंचें व अवशेषांचं व त्यांवरून दिसून येणाऱ्या सिंधुसंस्कृतीच्या स्वरूपाचें व पुरातनत्वाचें सुबोध व संकलित वर्णन केलें आहे. मोहनजोदारो हे ठिकाण पहातांना व त्याचें या प्रकरणांत वर्णन करतांना मॅकेसाहेबांच्या सुंदर पुस्तकाचा मी उपयोग केला आहें हें सांगावयास नको. असो.
मोहनजोदारो हे सिंधुसंस्कृतीचें संशोधित स्थळ कराचीपासून २७५ मैल दूर आहे. तें सिंधु नदीच्या पूर्वतीरावर आहे. मोहनजोदारो या सिंधी शब्दाचा अर्थ 'मृतांचे स्थळ' (place of the dead) असा आहे. हें नांव कां पडलें असावें हें कळणे कठीण आहे. पण कदाचित् मोहनजोदारो येथल्या बाह्य देखाव्यावरून व मातीच्या जागोजागच्या ढिगांवरून पुरलेल्या प्रेतांचें तें ठिकाण असावें असा आसपासच्या लोकांचा समज झाला असावा. मोहनजोदारो हे ठिकाण डोक्री स्टेशनच्या पूर्वेस साडेआठ मैलांवर आहे. कराचीपासून डोक्री हे स्टेशन २६७ मैल दूर आहे. डोक्री हे स्टेशन रूक- लारखाना- कोट्री या रेल्वे रस्त्यावर आहे. डोक्रीस जायला सोयीची गाडी कराचीहून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निघते, ती डोक्रीस सकाळी साडेपांच वाजतां पोहोंचते. थोड्या तासांच्या अवधींत वाटेवरील ठठ्ठा शहर पहावयाचें असल्यास दिवसा साडेबारा वाजतां निघून जंगशाही स्टेशनला उतरून ठठ्ठा पाहून रात्रीं जंगशाही स्टेशनला येऊन कराचीची सायंकाळची साडेसहाची गाडी गाठतां येते. आम्ही त्याप्रमाणें डोक्रीस सकाळी साडेपांच वाजतां पोहोंचलों. स्टेशनवर रा. मोहिते दादू कालव्याच्या डोक्री सबडिव्हिजनचे एंजीनियर- आम्हांला घेण्यास आले होते. त्यांचे मोटारीनें आम्ही दोन मैलांवर असलेल्या त्यांच्या बंगल्यावर गेलों. हा बंगला मोहनजोदारोच्या रस्त्यावरच असल्यामुळे बंगल्यापासून तें ठिकाण फक्त साडेसहा मैल दूर होतें. चहाचिवडा झाल्यावर सवासात वाजतां आम्ही मोहनजोदारोस जाण्यास निघालों. वाटेने आम्हांला सिंधच्या रस्त्यांचा पहिला चमत्कार पहाण्यास मिळाला. सिंधचे बरेचसे रस्ते निवळ मातीचे व वाळूचे आहेत. सपाट प्रदेशामध्यें रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या मर्यादा आँखल्या म्हणजे रस्ता तयार होतो. पण या रस्त्यावर रहदारी अधिक असल्यास धुरळा फार होतो व गाड्या मातींत व वाळूंत रुतण्याचा फार संभव असतो. म्हणून इकडल्या अशा मातीच्या व वाळूच्या रस्त्यावर जाड काडीचें लांब गवत सारखें रस्त्याभर पसरतात म्हणजे त्याचा खडीसारखाच उपयोग होतो. या जाड व राठ गवताचा चुराडा होण्यास पुष्कळ वेळ लागतो. नव्या टाकलेल्या गवतावरून मोटार जाऊं लागली म्हणजे चुरचुर असा श्रुतिमनोहर आवाज निघतो. युरोपमध्यें बर्फावरून मोटार जातांना असाच आवाज होतो, त्याची मला आठवण झाली व निरनिराळ्या परिस्थितींत केव्हां केव्हां एकाच प्रकारचा अनुभव येतो हें पाहून मनाला मोठें नवल वाटलें. डोक्रीपासून मोहनजोदारोपर्यंत सर्व प्रदेश जंगलमय आहे. जंगल फार मोठें नाहीं. तें भुरट्या रानाच्या जातीचे असून त्यांत जाडे व उंच गवत खूप वाढलेले दिसलें. या वाटोवाट मिळणाऱ्या गवताचाच रस्त्याकरितां खडीसारखा उपयोग करतात असें कळून आलें. आम्ही मोहनजोदारोस आठ वाजतां पोहोंचलो. तेथें आतां पुराणवस्तु संशोधन खात्याच्या चार दोन इमारती झाल्या आहेत. शिवाय पुराणवस्तुसंग्रहालयाची सोप्यासारखी लांबचलांब इमारत आहे. या सर्व इमारती येथें विपुल असलेल्या विटामातीच्या बांधलेल्या आहेत. संग्रहालयाचे क्यूरेटर बाहेरगांवी गेले होते. आम्ही प्रथम मोहनजोदारो हें जुनें शहर पाहण्याचें व शेवटीं संग्रहालय पाहून मग डोक्रीस परत जावयाचें असें ठरविलें. तदनुरूप मोटार पुराणसंशोधनकचेरीच्या आवारांत ठेवून आम्ही पाय चालत पुरातन शहराच्या ठिकाणीं गेलों.
या संशोधित शहराचा परीघ एक मैलाच्यावरच असावा. सर्व इमारती भाजलेल्या तांबड्या विटांच्या व पांढऱ्या मातीच्या दिसल्या. इमारतींच्या पंधरा वीस फुटी भिंती मात्र शाबूत आहेत. घरें दुमजली असावी असें वाटतें. कांहीं ठिकाण जिने व जिन्याच्या पायऱ्या शाबूत होत्या. तेव्हां दुमजलीं घरें होतीं हे स्पष्टच झालें. मात्र कोणत्याही घराचें छप्पर दृष्टीस पडलें नाहीं. या शहरांतील घरांच्या छपरांना कौलें नसावी, कारण कौलें कोठेंच दृष्टीस पडली नाहींत. तेव्हां अजूनही हिंदुस्थानच्या कमी पावसाच्या भागांत ज्याप्रमाणें घरांना धाबी- मातीचा जाड थर- असतात तशींच मोहनजोदारो येथील घरांना सर्वत्र धाबी असावी व तीं शहर नष्ट झाल्यावर कोसळून पडली असावी. येथल्या विटा मात्र पक्क्या भाजणीच्या, तांबड्या लाल व ठोकळ्या जातीच्या (table-bricks) आहेत. येथल्या भिंतीचें गवंडीकाम वाखाणण्यासारखें आहे. आधीं उत्तम प्रकारची सांधमोड साधलेली आहे. तसेंच जरी विटांचे थर चुन्याऐवजी पांढऱ्या मातीतच बसविले आहेत तरी भिंतीचे काम फार मजबूत व सुतांत केलेलें आहे. मात्र या सर्व घरांना खिडक्या कोठेही दिसल्या नाहींत. धाब्याची छपरें असल्यामुळे उजेड आकाश खिडक्यांनी (Sky-lights) घेण्याची पद्धति असावी. तसेच भिंतींमध्यें कमानी किंवा नक्षीकाम कोठेही दिसलें नाहीं. मात्र कांहीं ठिकाणी मूर्ति ठेवण्याकरतां कोनाडेवजा बांधकाम केल्यासारखे दिसत होतें. भिंतींमध्यें येवढेंच तुरळक तुरळक कलाकुसरीचें काम दृग्गोचर झालें




बहुतेक प्रत्येक घरामध्यें विटांच्या पायऱ्या व विटांचीच सपाट व पाणी न मुरणारी (water-proof) फरशी असलेले सुंदर स्नानगृह होतें. पण एके ठिकाणीं एक फारच मोठें सार्वजनिक स्नानकुंड आहे. या कुंडाचा शोध खुद्द सर जॉन मार्शलसाहेबांना लागला हें स्नानकुंड सुमारे ४० फूट लांब व २३ फूट रुंद आहे. या स्नानकुंडांत शिरण्यास दोन बाजूनें पायऱ्या केलेल्या आहेत. पायऱ्यांवर पूर्वी लाकडाच्या फळ्या घातलेल्या असाव्या. शेवटच्या पायरीला लागून सवाफूट खोल व चार फूट रुंद अशी ४० फूट लांबीची एक पट्टीच्या पट्टी निराळी बांधलेली आहे. स्नानकुंडाची ही उथळ पट्टी लहान मुलांना सुलभपणें व सुरक्षितपणे स्नान घालण्याकरितां केलेली असावी असा तर्क केलेला आहे. सर्व स्नानकुंडाच्या सभोवार पंधरा फूट रुंदीची फरसबंदी पाऊलवाट ठेवलेली असून मग उंच भिंत बांधलेली असावी. ही भिंत सध्या मोडक्या पडक्या स्थितींत आहे. भिंतीचे पलीकडे निरनिराळ्या आकाराच्या खोल्या आहेत. या स्नानकुंडाच्या पूर्वेस एक उत्तम बांधणीची विहीर आहे. त्या विहिरीचे पाणी स्नानकुंडामध्ये आणण्याची व्यवस्था असावी.
पण या स्नानकुंडाच्या पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेपेक्षांही आश्चर्यकारक व आरोग्यशास्त्रसंमत अशी सांडपाण्याची व्यवस्था पाहून तर आम्ही अगदीं थक्क झालों. या स्नानकुंडाच्या नैर्ऋत्य (South west) टोकाला एक चौकोनी भोंक आहे. त्यांतून स्नानकुंडाच्या सर्व पाण्याचा निचरा करण्याची सोय केली आहे. त्या भोंकांतून कुंडांतले पाणी एका विटांच्या बांधलेल्या बंदमोरीनें इमारतीबाहेर जाण्याची सोय केली आहे. साधारण उंचीचा मनुष्य उभा राहील इतकी मोरी मोठी असून ती खाली रस्त्याच्या गटाराला जोडलेली आहे. गाळ काढण्याकरितां मोरीला वरच्या अंगास तोंड (manhole) ठेवलेलें आहे.
इतक्या पुरातन काळी स्नानकुंडाची व सांडपाणी मोरीवाटेनें मुख्य गटारास मिळविण्याची उत्तम व शास्त्रसंमत सोय केलेली पाहून त्या काळच्या सिंधुतीरवासी लोकांच्या उच्च संस्कृतीबद्दल आम्ही आश्चर्यानें तोंडांत बोटे घातलीं हे खास! अर्वाचीन काळच्या सुधारलेल्या शहराप्रमाणें रस्त्याच्या मधोमध उत्तम विटांचें बंदगटार बांधलेलें व गटार शहराबाहेर गेलेलें मोहनजोदारों या शहरी दिसून येतें. मॅकेसाहेबांचे खालील उद्वार उद्धृत केल्यावांचून मोहनजोदारो येथल्या सांडपाण्याच्या उत्कृष्ट व्यवस्थेची बरोबर कल्पना येणार नाहीं. म्हणून ते उद्गार त्यांच्याच शब्दांत येथे देतों.
"Their very fine masonry and clever workmanship make these culverts exellent excamples of sanitary engineering, and they show to what a high degree of civilization their builders must have attained." मोहनजोदारो येथील मुख्य शहर आम्ही बारकाईनें पाहिलें तो शहररचनेच्या व आरोग्यशास्त्रसंमत अशा कितीतरी गोष्टी आमच्या नजरेस पडल्या. आधीं मागें सांगितल्याप्रमाणे शहरामध्ये विहिरी व त्यांचे अवशेष जागोजाग दृष्टीस पडले. एक विहीर तर विटांच्या उत्तम व भक्कम बांधणीची पूर्ण शाबूत स्थितींत आहे असें दिसून आलें. किती सुबक व कौशल्याची तिची बांधणी आहे! त्या विहिरींतून दोरांनी पाणी काढीत असावें हें निश्चित. कारण विहिरीच्या विटांच्या बेंडाला दोऱ्यांनी घासून घासून करकोचे पडलेले स्पष्ट दिसत होते! अरुंद रस्त्यावरील वळणाच्या ठिकाणच्या इमारतीच्या भिंतींना कोपरे न आणतां त्या अर्धवर्तुळाकार बांकाच्या बांधलेल्या आहेत. अर्थात् त्या अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना व सामानास इमारतीचा कोपरा लागूं नये व इमारतीचें किंवा गाडीचे व सामानाचें नुकसान होऊं नये. म्हणून इमारत बांधतांना इतकी दक्षता ठेवलेली दिसली! शहररचनेची अशी दक्षता अर्वाचीन काळच्या सुधारलेल्या शहरांतही दृष्टीस पडत नाहीं हे खास. सिंधुतीरवासी त्या पुरातन काळच्या लोकांचें कितीही कौतुक केलें तरी तें कमी होय यांत शंका नाही.
याप्रमाणें शहररचनेचें कौतुक करीत आम्ही मोहनजोदारोच्या मुख्य शहराबाहेर पडलों व मग त्या शहराच्या पश्चिम दिशेस असलेल्या साठ फूट उंचीच्या टेंकडीकडे गेलों. याच टेकडीवर मोहनजोदारो शहराच्या मानानें अर्वाचीन काळचा बौद्ध स्तूप व विहार आहे. हा स्तूप व विहार बौद्धधर्मी इतर इमारतींप्रमाणेच आहे. मात्र स्तूप व विहार बऱ्याच पडक्या स्थितीत असल्यामुळे हिंदुस्थानांतील इतर ठिकाणच्या बौद्धधर्मी स्तूपविहारांप्रमाणे येथला स्तूप व विहार मनांत भरण्यासारखा नाहीं. या स्तूपाचे व विहाराचे खाली मोहनजोदारो शहराच्या काळच्या आणखी इमारती असल्या पाहिजेत असा तर्क केलेला आहे. पण स्तूप व विहार पार पाडून जमिनीपर्यंत खोदीत गेल्याखेरीज तर्काचा पडताळा पाहणें शक्य नाहीं. बौद्धधर्मी अवशेष नाहींसे करणें श्रेयस्कर नाहीं म्हणून व काटकसरीची कातरी मोहनजोदारो येथील पुराणवस्तुसंशोधन कामाला लागल्यामुळे मोहनजोदारो येथें या टेंकडीवर व जवळपासच्या लहान लहान टेंकड्यांवर व्हावयास पाहिजे तितकें खोदकाम झालेलें नाहीं. असें काम झालें असतें तर मोहनजोदारो येथें हिंदुस्थानच्या इतिहासपूर्व इतिहासावर प्रकाश पाडणाऱ्या आणखी किती तरी वस्तू व अवशेष सांपडल्या असत्या यांत शंका नाहीं. पण सध्यांच सांपडलेल्या वस्तू व अवशेष लाखांनीं मोजण्याइतके आहेत. सांपडलेल्या वस्तू व अवशेषांपैकी पुष्कळ महत्त्वाच्या वस्तू व अवशेष सर जॉन मार्शलसाहेबांनी ब्रिटिश, युरोपियन व अमेरिकन पुराणवस्तुसंग्रहालयांना देऊन टाकल्या असें म्हणतात. राहिलेल्या व कमी महत्त्वाच्या वस्तू व अवशेष मोहनजोदारो येथेंच पुराणवस्तुसंग्रहालयांत ठेवल्या आहेत. मोहनजोदारो शहराचे आमचें दर्शन आटोपल्यावर आम्ही त्या संग्रहालयाकडे आमचा मोर्चा फिरविला. तरी आतां त्या संग्रहालयांतील संग्रहाकडे वळू या.
संग्रहालयाची इमारत साधी, सरळ, सोप्यासारखी लांबच लांब आहे. या दृष्टीनं सारनाथ किंवा मथुरा येथे बांधलेली संग्रहालये बांधकलेच्या दृष्टीनें कितीतरी वरच्या दर्जाचीं आहेत. सिंध प्रांताच्या साध्या एकतानी (monotonous) बाह्य देखाव्याला अनुरूप अशी ही संग्रहालयाची इमारत आहे असे मला वाटलें. इमारतीमध्ये निरनिराळी दालनें पाडली असून त्यांत मोहनजोदारो येथें सांपडलेल्या अक्षरशः हजारों वस्तू व अवशेष व्यवस्थित रीतीनें व नांवनिशीवार ठेविले आहेत. या संग्रहाची यथार्थ कल्पना येण्याकरितांव मोहनजोदारो येथील लोकांच्या संस्कृतीचें स्वरूप ध्यानांत येण्याकरितां संग्रहांतील वस्तूंचें व अवशेषांचें वर्गीकरणपद्धतीनें वर्णन करण सोयीचें व सुगम होईल. पहिला वर्ग धार्मिक व पवित्र मानलेल्या वस्तूंचा पडतो. मोहनजोदारो येथे मोठमोठीं देवळें व त्यांमध्यें बसविलेल्या मोठमोठ्या मूर्ति कोठेही सांपडल्या नाहींत. यावरून अजून अशी देवळांची व त्यांतील देवांच्या पूजाअर्चेची पद्धति अस्तित्वांत आली नसावी. पण मोहनजोदारो येथें देवांच्या व पवित्र वस्तूंच्या लहान लहान मूर्ति व विशेषतः अर्वाचीन “मंत्रसिद्ध ताईता" प्रमाणे अंगावर घालावयाचे चौकोनी शिक्क्यासारखे ताईत पुष्कळच सांपडलेले आहेत. हे शिक्के (seal-amulets) भाजलेल्या मातीचे, निरनिराळ्या धातूंच, हस्तिदंत, शंख व दगड इत्यादि नाना जातीच्या कठीण द्रव्यांचे बनविलेले आहेत! त्यांवर काल्पनिक जनावरांचीं, काल्पनिक देवादिकांचीं, कांहीं पशूंचीं व वनस्पतींचीं चित्र कोरलेलीं किंवा दाबानें उठवलेलीं आहेत! एक दगडाची छोटी पण विलक्षण वेषाची देवतेची मूर्ति सांपडली आहे. ती भूदेवी किंवा मातृदेवीची असावी असा तर्क केलेला आहे; तसेंच एक तीन तोंडांचीं शिंगे असलेल्या देवाची मूर्ति सांपडली आहे. तिच्या सभोंवार वनांतील नानाविध पशू यांचीं चित्र काढली आहेत. ही मूर्ति हिंदू धर्मामध्यें शिव म्हणून पुढे प्रख्यात झालेल्या देवाचें पूर्वरूप असावें व मोहनजोदारो येथील लोक त्याला पशुपति म्हणत असावें असा तर्क केलेला आहे. तसेंच कांहीं काल्पनिक पशूंचीं चित्रे कांहीं शिक्यांवर काढलेलीं आहेत. उदा. हत्ती व बकरा या दोन जनावरांच्या अवयवांची जोड करून एक चित्र काढले आहे. म्हणजे या जनावराला हत्तीप्रमाणें सोंड आहे तर त्याला बकऱ्याप्रमाणें शिंगें आहत! पिंपळ, निंब, व ज्याची जात ठरवितां येत नाहीं असें एक झाड अशा तीन प्रकारच्या झाडांची चित्रें या शिक्क्यावजा ताईतावर काढलेलीं आहेत. त्याचप्रमाणें वाघ, बैल, इत्यादि जनावरांची चित्रेही ताईतावर दृष्टीस पडतात. तेव्हां हीं झाडें व हे पशू पवित्र मानीत असत असें दिसतें. सारांश, संग्रहांतील हा वस्तूंचा वर्ग फारच आश्चर्यकारक आहे व त्यावरून सिंधुतीरवासी लोकांच्या धर्मसमजुतींची बरीच स्पष्ट कल्पना येते यांत शंका नाहीं.
संग्रहांतील वस्तूंचा दुसरा वर्ग मोहनजोदारो येथील लोकांच्या पोशाखाच्या निदर्शक वस्तूंचा, अवशेषांचा व आंगावर घालण्याच्या दागदागिन्यांचा होय. प्रत्यक्ष पोशाखाचे अवशेष अगर नमुने सांपडणें अशक्यच आहे. पण चित्रांवरून पोशाखाचें अनुमान करतां येतें. बायकांच्या चित्रांवरून असें दिसतें कीं, दक्षिण हिंदुस्थानांतील बायकांच्या चालीप्रमाणें आखूडसे वस्त्र कमरेभोवती गुंडाळीत असाव्या पण छाती उघडीच ठेवण्याची रीत दिसते. तसेंच, पंख्यासारखी कापडाची ताठ टोपी डोक्यांत घालीत असाव्या. पुरुषांचा पोशाखही कमरेभोंवतीं वस्त्र नेसत असत व उपरण्यासारखें वस्त्र खांद्यावरून टाकीत असत असें दिसतें. हीं वस्त्रे कापसाची असावीं. कारण जरी कापडाचीं वस्त्रें सांपडली नाहींत तरी सूत काढण्याचे चरके व विणण्याचे माग यांचे अवशेष सांपडलेले आहेत. मात्र नाना तऱ्हेचे दागदागिने घालण्याचा फार प्रघात असावा असें दिसतें. सोन्यारुप्याचे, तांब्या पितळेचे, शंख, दगडी मणी व मातीचे. भाजून केलेले नाना आकाराचे व नाना जातीचे दागदागिने मोहनजोदारों येथें किती तरी सांपडले आहेत. हे दागिने चांगल्या मजबूत पेट्यांमधून ठेवलेले होते. संशोधकांना पेटया फोडल्यावर ते सांपडले. आंगठ्या, वाळे, हातांतल्या पाटल्या व बांगड्या, डोक्यांतील फुलें व मुदा, नाकाकानांतील नथा व बाळ्या, गळ्यांत घालावयाचे हार व माळा, केसांत व खोप्यांत घालावयाच्या टांचण्या (hairpins) वगैरे बरेच दागिने आहेत. संग्रहांतील एक हार तर आश्चर्य करण्यासारखा व अर्वाचीन हारालाही लाजविणारा आहे! हा हार सहा पदरी असून त्याचे सात विभाग केलेले आहेत. गळ्यांत आडकविण्याचीं हाराचीं टोंकें सोन्याने मढविलेल्या पितळेच्या एकसंधी टोपणाचीं असून त्याला सहा पदरांच्या तारा अडकविण्यास भोकें केलेलीं आहेत; तसेंच सहा सहा भोकें असलेल्या सहा सोनेरी मुलाम्याच्या पट्ट्या आहेत व हाराचे साही पदर तांबड्या लोलकाच्या पांच इंच लांबीच्या कांड्याचे व पट्टीला लागून सहा सहा सोनेरी मुलाम्याचे मणी गुंफून बनविलेले आहेत! खरोखर हा हार इतक्या पुरातन काळी कसा तयार केला असेल याचें आम्हांला राहून राहून आश्चर्य वाटत होतें. त्या काळी कलाकौशल्याची किती कमालीची प्रगति झाली होती हे या एका हारावरूनही दिसून येण्यासारखे आहे. बाकी आणखीही किती तरी निराळ्या प्रकारचे हार व मण्यांच्या माळा या संग्रहालयांत दृष्टीस पडतात! मागे सांगितल्याप्रमाणें आंगठ्या, बांगड्या, ताईत इत्यादि लहान दागिन्यांची तर गणतीच नाहीं. इतक्या विपुल या वस्तू मोहनजोदारो येथें सांपडल्या आहेत.
संग्रहांतील वस्तूंचा व अवशेषांचा तिसरा वर्ग हत्यारें व उपकरणें यांचा होय.
मोहनजोदारो येथील लोकांना तांबें व पितळ या धातू मुबलक मिळत असें दिसतें. त्या मानानें लोखंड व शिसें या दुर्मिळ धात असाव्या. फावडी टिकाव, तलवारी, भाले इत्यादि हत्यारेंसुद्धां तांब्या पितळेचीं करीत. यावरून तांब्या पितळेची विपुलता व लोखंड, शिसें यांची दुर्मिळता यांचे सहज अनुमान करतां येतें.
एकपाती व दुपाती चाकू करीत असत असें दिसतें. पुष्कळसे चाकू धातूचे केलेले आहेत; पण कांहीं गारेसारख्या कठीण दगडाचेही बनविलेले आहेत. बाणाच्या टोकाला लावावयाचीं तीक्ष्ण अग्रे संग्रहामध्यें पुष्कळ आहेत.
सिंधूसारख्या मोठ्या नदीतीरावर राहणारे मोहनजोदारो येथील लोक मत्स्याहारी असावे हे स्वाभाविक आहे व म्हणून मासे धरण्याचा स्वतंत्र धंदा असला पाहिजे इतकेंच नाहीं तर मासे धरणें हे एक फावल्या वेळचे करमणुकीचे साधन असले पाहिजे हे उघड आहे. तदनुरूप मासे पकडण्याचे गळ पुष्कळ सांपडलेले आहेत. चार प्रकारचे वस्तरे मोहनजोदारो येथें सांपडलेले आहेत. निरनिराळ्या आकाराचीं किंकरी (सुताराचें एक हत्यार) संग्रहालयांत आहेत. दोनचार पितळी आरसे सांपडले आहेत व थोडी फार जेवण करण्याची भांडीं सांपडली आहेत.
संग्रहांतील चवथा वर्ग म्हणजे कला व उद्योगधंदे यांच्या निदर्शक वस्तू व अवशेष यांचा होय. मोहनजोदारो येथील कलांमध्ये उच्च दर्जाला पोहोंचलेली कला म्हणजे कुंभाराची कला होय यांत शंका नाहीं. सिंधुनदीच्या तीरावर राहणारे मोहनजोदारो शहराचे लोक, सिंधुनदींतून आलेली बिनखड्याची गाळाची मऊ माती, नदीचं मुबलक पाणी सांठवून ठेवून बारीक गाळ खालीं बसल्यावर पिण्याचें पाणी तयार करण्याची जरूरी व उष्ण हवा इतक्या अनुकूल गोष्टी असतांना कुंभाराची कला मोहनजोदारो येथें उदयास व पूर्णावस्थेस न येती तर तें आश्चर्य! पण अशा अनुकूल परिस्थितीमध्यें त्या शहरी व त्या लोकांमध्ये कुंभाराची कला व मातीच्या भांड्यांवर चित्रे काढण्याची कला अत्यंत उच्च दर्जाला पोहोंचावी हे स्वाभाविक आहे.
मोहनजोदारो येथील संग्रहालयांत प्रवेश करणाऱ्या प्रवाशाच्या मनांत जर कोणत्या वस्तूंचा व अवशेषांचा वज्रलेप ठसा उमटत असेल तर तो मातीच्या सुबक सचित्र भांड्यांचा होय यांत शंका नाहीं.
मोठमोठ्या डेऱ्या रांजणापासून तो छोट्या छोट्या खेळणी बुडकुल्यापर्यंत नाना आकाराचीं, नाना रंगाचीं व नाना तऱ्हेचीं हजारों मातीची भांडीं मोहनजोदारो येथें सांपडली आहेत. धातूच्या भांड्यांपेक्षां मातीच्या भांड्यांचाच विशेष उपयोग त्या शहरांत करीत असें दिसतें. मोठमोठे डेरे व रांजण पाणी भरून ठेवण्याकरितां उपयोगांत आणीत हे स्वाभाविक आहे. पण असे रांजण व डेरे सामान साठवण्याकरितां उपयोग करीत असें दिसतें. तसेंच मोठ्या रांजणांचा उपयोग पेट्यांसारखा मौल्यवान वस्तू ठेवण्याकडे करीत असत. जेव्हां मोहनजोदारो या शहरी पुरातनवस्तुसंशोधनाकरितां खणण्याचे काम करण्यांत आलें तेव्हां पुष्कळसे मौल्यवान् दागिने व पदार्थ डेऱ्यांत व रांजणांत पुरलेले सांपडले.
लहान माताची भांडीं पाणी पिण्याकरितां व पातळ पदार्थ खाण्या- पिण्याकरितां उपयोगांत आणीत असत. पाणी गार करण्याकरितां मातीचे खुजे वापरीत हें सांगावयास नकोच. पण कांहीं बारिक बारिक भोकांची चिंचोळी मातीची भांडीं सांपडली आहेत. प्रथमतः त्यांचा काय उपयोग असावा याचीसुद्धां कल्पना करतां आली नाहीं. पण मागाहून या भांड्यांचा उपयोग समजून आला. हिवाळ्यांत फार थंडीच्या दिवसांत या भांड्यांत विस्तव घालून तीं मनुष्याच्या शेजारी ठेवीत म्हणजे त्याला ऊब येई. अर्थात् या भोकांच्या भांड्यांचा अर्वाचीन शेगड्यांसारखा उपयोग करीत. परळीसारख्या उथळ व पसरट मातीच्या बशा मोहनजोदारो येथें सांपडल्या आहेत. अर्थात् त्यांचा घनपदार्थ खाण्याकरितां ताटांसारखा उपयोग करीत. सारांश, मोहनजोदारो येथील लोकांच्या संसारोपयोगी पुष्कळशी भांडीकुंडी मातीचीं होतीं. हीं भांडीं उत्तम भाजलेली असून मजबूत असत. त्या भांड्यांना तांबडा, पिवळसर व काळसर असे सुबक स्वाभाविक रंग असून शिवाय शोभेकरितां भांड्यांवर पशूंची रंगीत चित्रे, वेलबुट्ट्या, तिकोनी, चौकोनी, वर्तुळाकार अशा नाना प्रकारच्या आकृति, वृक्षांची चित्रे इत्यादि काढण्याची कलाही मोहनजोदारो येथील लोकांमध्ये उच्च दर्जास पोहोंचली होती हे संग्रहांतील सुंदर सुंदर रंगीत व चित्रित भांडीं पाहून प्रवाशास सहज दिसून येतें. एका भांड्याची घडण तर आश्चर्य करण्यासारखी आहे. हे भांडे बारिक बुडी व लहान तोंडी खुजाच्या आकाराचें आहे. पण त्याच्या मधल्या बाहेरच्या भागाला वाटोळे भोवऱ्याच्या आकाराचे सुबक गोळे हारीनें चिकटविले आहेत. गोळ्यांच्या अशा पांच रांगा आहेत. या भांड्यावर जिलई व तकाकीही केलेली आहे. गोळ्यांनी अलंकृत भांड्याचा भाग दुरून थेट पिकलेल्या फणसासारखा दिसतो. अशी विलक्षण व नवलाची त्या भांड्याची घडण पाहून सिंधुतीरवासी लोकांच्या संस्कृतीबद्दल मला महदाश्चर्य वाटलें! पण या भांड्यानें मोहनजोदारो येथील लोकांचें कलाकौशल्य प्रगट केलें इतकेंच नाहीं तर त्यानें त्यांच्या संस्कृतीचें पुरातनत्व व निश्चित कालमर्यादाही दाखवून दिली याचे विवेचन पुढे येणार आहे. संग्रहांतील वस्तूंचा व अवशेषांचा पांचवा व शेवटचा वर्ग म्हणजे खेळणी व करमणुकीची साधनें यांचा होय. मोहनजोदारो येथील लोकांची या बाबतींतील प्रगति कल्पनातीत आहे. मुलांचीं खेळणीं किती तरी सांपडली आहेत. त्यांमध्यें निरनिराळ्या प्राण्यांची चित्रें, खेळांतल्या गाड्या, खेळांतल्या तागड्या, बुडकुलीं व बाहुल्या या तर आहेतच, पण कांहीं कांहीं खेळणीं कल्पकतेचीं निदर्शक आहेत. दोरीने हलणारी चित्रें सांपडलेली आहेत. डोकें हालविणाऱ्या बैलाचे व हात हालविणाऱ्या वानराचें हीं चित्र फार मौजेचीं आहेत. हुबेहूबपणामध्ये एका रेड्याची धातूची मूर्ति अर्वाचीन मूर्तिकारालाही मान खालीं चालण्यास लावील अशी आहे! याप्रमाणे नानातऱ्हेचीं मुलांचीं खेळणीं सांपडली आहेत, तर मोठ्या मनुष्यांचीं नानाविध करमणुकीचीं साधनेही सांपडली आहेत. आधीं मोहनजोदारो येथील लोकांमध्यें फाशाच्या साधनानें खेळण्याचे प्रकार पुष्कळ असावे असें दिसतें. कारण चार बाजूंवर आंकडे असलेले लांबट फासे व साहा बाजूंवर आंकडे असलेले चौरस (cube) फासे सांपडले आहेत; तसेंच, निरनिराळ्या प्रकारचे पट सांपडले आहेत. त्याप्रमाणें बुद्धिबळासारखा कांहीं तरी खेळ प्रचलित असावा असें सांपडलेल्या नाना आकाराच्या मोहऱ्यांवरून दिसून येतें. तसेच, फऱ्यामऱ्यासारखा व गोट्यांनी खेळावयासारखाही एखादा दुसरा खेळाचा प्रकार मोहनजोदारो येथें प्रचलित असावा असें वाटतें.
मोहनजोदारो हे शहर व तेथल्या पदार्थसंग्रहांतील नाना वर्गाच्या वस्तू व अवशेष पाहिले म्हणजे या सिंधुतीरवासी लोकांची संस्कृति अत्यंत उच्चतेला पोहोंचलेली होती व ही संस्कृति वेदकालीन आर्यलोकांच्या संस्कृतीपेक्षां पुष्कळ वरच्या पायरीची आहे असें वाटतें. असा प्रश्न मनांत उभा राहतो कीं, हे सिंधुतीरवासी लोक कोण व त्यांचा काल कोणता. मोहनजोदारो येथील संशोधकांना हेच कित्येक दिवस कोडे पडलेलें होतें. पण तें एका लहानशा खुणेवरून अचानकपणे सुटलें. ज्याप्रमाणें पातंजल व्याकरण महाभाष्यांतील अरुणत् यवनः साकेतम् (ग्रीकराजा मिनांडर यानें साकेत नगरीला वेढा दिला आहे) या एका वाक्यावरून पतंजलीचा काल निश्चित करतां आला, तसेंच शांकरब्रह्मसूत्रमहाभाष्यांतील (एकवंध्यापुत्र पूर्णवर्म्याच्या राज्यारोहणापूर्वी राजा होता) या एका वाक्यावरून शंकराचार्यांचा काळ निश्चित करतां येतो, त्याप्रमाणें मेसापोटेमियामध्यें सांपडलेल्या एका शिक्याच्या ताईतावरून मोहनजोदारो येथील संस्कृतीचा काळ निश्चित करतां आला. डॉ. फ्रँकफर्ट या पुराणवस्तुसंशोधकास तेल असमार येथें एक शिक्क्यासारखा ताईत सांपडला. त्या ताईताची घडण, आकार व त्यावरील चित्रे मोहनजोदारो येथें सांपडलेल्या ताईताशीं हुबेहूब जुळतात. कारण हत्ती, गेंडा, gharial व मासे खाणारा मगर हे सिंधुतीरावरील प्राणी असून या प्राण्यांची चित्रे मेसापोटेमियांतील सुमेरियन किंवा अकेडियन ताईतांवर केव्हाही काढलेली दिसून आलेलीं नाहींत. अर्थात् तेल असमार येथें सांपडलला ताईत सिंधुतीरवासी लोकांच्या हस्तकौशल्याचा मासला आहे हे स्पष्ट होतें. आतां तेलअसमार येथें जें खोदकाम झाले व तेथें ज्या इतर वस्तू, अवशेष व शिलालेख सांपडले त्यांवरून सांपडलेल्या वस्तू ख्रिस्ती शकापूर्वी २५०० वर्षांखालच्या आहेत असे सिद्ध झाले आहे. अर्थात् मोहनजोदारो हे शहर, तेथले लोक व सिंधुतीर- संस्कृति ही सुमारे साडेचार पांच हजार वर्षांच्या पूर्वीची आहे असें सिद्ध झालें. अर्थात् मेसापोटेमियांतील सुमेरियन लोकांची संस्कृति व मोहनजोदारोच्या सिंधुतीरवासी लोकांची संस्कृति या समकालीन ठरतात!
मोहनजोदारो येथील संग्रहालयांत एक विलक्षण घडणीचें पिकलेल्या पळसाच्या फळासारखे भांडे आहे म्हणून सांगितलें. तशाच घडणीचें व तसेच दिसणारे भांडें मेसापोटेमियामध्येही सांपडलें आहे. यावरूनही या दोन्ही संस्कृती समकालीन आहेत असें म्हणावें लागतें. याप्रमाणें मोहनजोदारो येथल्या शोधामुळे सिंधुतीरावर आर्यपूर्वसंस्कृति होती ही आश्चर्यकारक माहिती मिळाली आहे. सिंधप्रांतांत जेव्हां मोठ्या प्रमाणावर पुराणवस्तुसंशोधन होईल तेव्हां या सिंधु संस्कृतीचें स्वरूप व काळ यांवर अधिक किंवा नवाच प्रकाश पडेल. पण सध्यां जें संशोधन झालें आहे तें आश्चर्यकारक आहे यांत शंका नाहीं. अशा प्रकारच्या आश्चर्यचकित मनानें आम्ही मोहनजोदारो हे ठिकाण सोडलें व मग मोटारनें परत डोक्री स्टेशनला आलों व लगेच पुढील प्रवासाकरितां मार्गस्थ झालों.
सिंध प्रांतांत बौद्धकालीन अवशेष पुष्कळ ठिकाणीं व पुष्कळच आहेत. त्यांपैकीं मी एकाच ठिकाणचे स्तूप व विहार यांचे अवशेष पाहिले. सिंधप्रांताचा पूर्वेकडील जिल्हा थरपारकर याचें मुख्य ठिकाण मिरपुरखास गांव. ह्या स्टेशनपासून तीन चार मैलांच्या आंतच हे अवशेष आहेत. ता. ३१ डिसेंबर सन १९३५ रोजी सकाळींच मोटारीने आम्ही बौद्धकालीन अवशेष पाहण्यास गेलों. हा भाग अगदीं सपाट आहे. पण स्तूपाचें व विहाराचें ठिकाण जरा उंचवट्याचे दिसलें. स्तूप हा सर्वांत उंचवठ्याच्या ठिकाणी बांधलेला होता. त्याला चढावयास भाजलेल्या विटांच्या पडक्या झटक्या पायऱ्या होत्या. हल्ली हा स्तूप अर्धवट पाडलेला आहे. कारण या स्तूपामध्यें बुद्धाच्या हाडाचा एक तुकडा आहे असा समज असल्यामुळे स्तूप उघडा करण्यांत आला, तो खरोखरीच एक हाडांचा तुकडा पेटीत ठेवलेला मिळाला. हा तुकडा संशोधनखात्याकडून हिंदुस्थान सरकारच्या परवानगीनें कलकत्त्याच्या महाबोधी सभेस देण्यांत आला. स्तूपाखेरीज येथे मोठा विहार असावा असें दिसून आलें. पण हल्लीं हा सर्व भाग पडकाच आहे. धड इमारत अशी एकही नाहीं. फक्त पडक्या भिंती, पायऱ्या, इमारतींचे चवथरे, खांबाची विटांची उथळी व अर्धवट खांब इतक्याच गोष्टी येथे दृष्टीस पडतात. सर्व बांधकाम भाजलेल्या विटांचेंच आहे असे दिसलें. हल्लीं येथें पाहण्यासारखे फारसें कांहीं एक नाहीं. पण बौद्धकाली हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. येथें पुष्कळ भिक्षू रहात असत व हें बौद्धविद्येचें व बौद्धवाङ्मयाचें एक प्रख्यात ठिकाण असावें म्हणून चिनी प्रवासी हुएन सँग हा सिंधमधील हें व दुसरीं ठिकाणें पाहून गेला होता. तेव्हां हुएन सँगनें आपल्या प्रवासवृत्तामध्यें सिंधसंबंधीं व या बौद्ध ठिकाणासंबंधी लिहून ठेवलेल्या खालील मनोरंजक माहितीचा उतारा देऊन हे प्रकरण संपवितों.
"The pilgrim... proceeded north again through a wild rugged region for 1900 li and crossing the Sin-tu (Sindh) river reached the country with the same name. Yuan Chuang describes Sindh as being above 7000 li in circuit and its capital...as above 30 li in circuit. The products of the country were early wheat, gold, silver, and it had oxen, and sheep, and dromedanes and mules, it yielded also various kinds of salt, red, white and black, and a white red salt; the people of various foreign countries used the salt as medicine. The inhabitants were quick- tempered but upright, quarrelsome and vituperative and of superficial learning; they were thorough believers in Buddhism. There were several hundreds of monasteries and above 10,000 Brethren all of the Hinayānist Sammatiya school. Most of these were indolent worthless persons; of the superior Brethren who, leading lives of lonely seclusion, never relaxed in perseverance, many attained Arhatship. There were above thirty Deva- Temples and the various sectaries lived pell-mell. The king, who was of the Sudra caste, was a sincere man and a believer in Buddhism. Buddha while in this world had travelled in this country, and Asoka had erected some tens of topes as memorials of his visits; there were also monasteries or topes erected where the great and Arhat Upagupta, who often visited this country, had preached and taught. Among the low marshes near the sin-tu (Sindhu or Indus) for above 1000 li were settled some myriads of families of ferocious disposition, who made the taking of life their occupation, supported themselves by rearing cattle; they had no social distinctions and no Government; they shave off their hair and wore the bhikshu garb, looking like bhikshus yet living in the world; they were bigoted in their narrow views and reviled the "Great Vehicle". According to local accounts the ancestors of this people were originally cruel and wicked and were converted by a compassionate arhat who received them into the Buddhist communion; they thereupon ceased to take life, shave their heads and assumed the dress of Buddhist mendicants; in the course of time, however, the descendents of these men had gone back to their old ways, but they still remained outwardly bhikshus."
ज्याने चहाचा मळा प्रत्यक्ष पाहिला नाहीं त्यानें चहाचा मळा हे नांव ऐकलें म्हणजे त्याची त्याबद्दल हटकून चुकीची कल्पना होते. कारण मळा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्या मनासमोर जें चित्र उभे राहतें तें म्हणजे कुंपणीनें कुडलेली, उक्ती, रहाट, मोट व पंप इत्यादि लहानमोठ्या पाणी काढण्याच्या साधनांनीं सज्ज अशा विहिरीनें युक्त अशी सपाट, सुपीक बागाईत जमीन हें होय व चहाचा मळा अशाच बागाईती जमिनीचा असला पाहिजे अशी माणसाची कल्पना होते. पण तो मनुष्य चहाचा मळा प्रत्यक्ष पाहतो तेव्हां त्याला विलक्षण आश्चर्य वाटतें. कारण त्याला प्रत्यक्ष दिसून येतें कीं, चहाच्या मळ्याला पाणी देण्याची व्यवस्था लागत नाहीं; त्याला कुंपणाची जरूरी नसते! त्या मळ्याला सपाट बागाईती जमीन पाहिजे असें नाहीं; चहाचीं झाडे उंच सखल, खडकाळ मुरमाड, डोंगराळ पण तांबड्या मातीच्या कोणत्याही भूमिभागांत पोसतात व वाढतात. फक्त चहाचा मळा हा दीडशेंपासून दोनशे एकरांचा भूमिभाग असावा लागतो व या सर्व भागावर हजारों चहाचीं झाडे लावलेलीं असतात. कारण झाडांच्या डिक्शा, चहा तयार करण्याच्या कारखान्याला पुरतील, इतका तरी मळ्याचा विस्तार असावा लागतो. म्हणून tea garden (चहाचा मळा किंवा बाग) या पेक्षां tea estate (चहाची शेती किंवा मिळकत) हा शब्द जास्त अन्वर्थक व यथार्थ कल्पना देणारा आहे.
प्रवाशाच्या मनांत प्रारंभीं सक्कर धरणाबद्दलची चुकीची कल्पना असल्यामुळे सक्कर धरणाच्या प्रथम दर्शनानें मनाची फसगत होते व 'हा काय आपल्याला चिरपरिचित पुलांसारखा पूलच आहे' असा विस्मयविहीन विचार मनांत येतो खरा. पण धरण पुरें पाहून झाल्यावर व त्याचा तो प्रचंड विस्तार, त्याचे अजस्त्र दरवाजे, एक अंकापासून साहासष्ट अंकापर्यंत अंकालंकृत ती पांढऱ्या शुभ्र दगडांच्या कमानींची रांगची रांग व नदीच्या दोन्ही तीरांना काढलेल्या कालव्यांची कमानदार मुखे हा सर्व देखावा पाहिला म्हणजे प्रवाशाचें मन थक्क होऊन जातें यांत शंका नाहीं. या प्रचंड कामाची कल्पना, योजना च परिपूर्तता यांचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. पण प्रथमतः सक्करचा पूल व सक्कर शहराच्या आसपासच्या इतर प्रेक्षणीय गोष्टी यांच्या दृश्यदर्शनाची हकीकत देऊन मग ऐतिहासिक भागाकडे वळणें बरें.
मीं सक्कर शहर व सक्करचें धरण सन १९३५ च्या मे महिन्यामध्यें व नंतर त्याच सालच्या दिजंबर महिन्यामध्यें पाहिलें. अर्थात् उन्हाळा व हिवाळा या दोन्ही ऋतूंतील सिंधुनदीच्या स्थितीत काय फरक होतो, तसेंच आसपासच्या वनश्रीमध्यें कसा फेरफार होतो हे मला पाहतां आलें. दोन्ही खेपांमिळून पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन एकदम करीत आहे.
सक्कर- रोहरी- बक्कर हे सिंध प्रांतांतील शहरांचे एक प्रख्यात त्रिकूट आहे. सक्कर हे सिंधूनदीच्या पश्चिम तीरावर आहे, रोहरी हे सिंधूनदीच्या पूर्वतीरावर आहे, तर बक्कर हे बेट सिंधूनदीच्या प्रवाहामध्यें आहे. सक्कर, रोहरी व बक्कर हीं एक एक मैलाच्या अंतरावर वसलेलीं गांवें आहेत. खरोखरी हें गांवांचें त्रिकूट एकमेकाला लागूनच आहे. मात्र सिंधूनदीच्या दोन फाट्यांनी एका सलग प्रदेशाचे तीन भाग पडून तेथे तीन शहरें वसली आहेत. ज्याप्रमाणें श्रीरंगपट्टण हें शहर व किल्ला कावेरी नदीच्या फाट्यांनी बनलेल्या बेटावर आहे, त्याचप्रमाणे हुबेहुब बक्कर बेटाची स्थिति आहे. तेथेंही पूर्वकाळीं किल्ला बांधलेला होता व त्याचे तट अजून थोडे फार शाबूत आहेत. श्रीरंगपट्टणप्रमाणें हा किल्ला पूर्वकाळी अजिंक्य जरी नव्हे तरी दुर्जिंक्य समजला जात असे.
कराचीपासून सक्करला हल्लीं दोन रेलवे रस्त्यांनीं जातां येतें. पश्चिम तीराच्या रेलवे फाट्यानें सक्कर कराचीहून ३३० मैल लांब पडतें. कारण कराची- कोट्री- रुक् असा रेलवे फाटाच ३१५ मैल आहे व रुक् स्टेशनपासून पूर्वेकडे सक्कर १५ मैल आहे. कराची- कोट्री- रोहरी या पूर्व तीरावरील मुख्य रेलवे रस्त्यानें कराचीहून सक्कर २९८ मैलच पडतें. मी सक्करला दोन्ही रेलवे रस्त्यांनीं गेलों आहें. मुख्य रेलवे रस्त्यानें गेल्यास कराचीहून सक्करला जाण्यास दहा आकरा तास लागतात, तर कोद्री-रुक रेलवे फाट्याने गेल्यास बारा तेरा तास लागतात. रात्रीं सात आठ वाजतां निघून पहांटेस सहा साडेसहापर्यंत सक्करला पोहोंचतां येतें. दिवसा बाराच्या सुमारास निघाल्यास रात्रीं आकराच्या सुमारास सक्करला जातां येतें. यामुळे कराची ते सक्कर हा प्रवास केव्हांही केला तरी सुखाचा व सोयीचा होतो.
सक्कर- रोहरी- बक्कर हे शहरांचें त्रिकूट ज्याप्रमाणें ऐतिहासिक दृष्ट्या प्रख्यात आहे, त्याप्रमाणें तें भौगोलिक दृष्ट्याही विस्मयजनक आहे. आधी संबंध सपाट सिंध प्रांतांत हाच भाग डोंगराळ व टेंकड्यांनीं व्याप्त असा आहे. शिवाय या टेंकड्या शाडूच्या व पांढऱ्या मातीच्या असल्यामुळे शहराच्या शोभेत भर पडते. कारण हिरवीगार झाडी व शेती, त्या पांढऱ्या शुभ्र टेकड्या व शहरांतील तांबड्यालाल विटांच्या व कौलांच्या इमारती हा तिरंगी मिलाफ नयनमनोहर दिसतो. खेरीज या शहरानजीक सिंधु नदीचा प्रवाह व पात्र विलक्षण वळण घेऊन परत आपला पूर्व मार्ग स्वीकारतात.
सिंधु नदी पंजाब प्रांतांत शिरल्यावर सामान्यतः दक्षिण दिशेनें वहात सिंध प्रांतांत किशमार या गांवानजिक शिरते, ती रोहरी शहरापर्यंत सुमारे ७२ मैल दक्षिण दिशेनें वहात असते. सिंधचा हा सत्तर बहात्तर मैलांचा भाग सपाट व बिन डोंगराळ आहे. पण रोहरी गांवानजीक टेकड्यांची रांग आडवी आल्यामुळे सिंधु नदी पूर्वेकडे वळते व टेंकड्यांच्या मधल्या दरींतून पांचचार मैल थेट पश्चिम दिशेकडे वहात जाते. या दरीला sukkur gorge म्हणतात. या पांचचार मैलांच्या पश्चिमवाहिनी प्रवाहामध्येंच बक्कर व साधुवेला हीं बेटें बनली आहेत. यामुळे सिंधूचा प्रवाह येथें पुष्कळ संथ बनला आहे. या बेटांच्या दोनतीन मैल खालींच सक्करचा विस्मयकारक कालवी पूल बांधण्यांत आला आहे त्याचे नजीकच नगरशास्त्रानुरूप नवें सुंदर सक्कर शहर वसविण्यांत आलें आहे.
याप्रमाणें सिंधुनदीवरील हें स्थान सृष्टिकृत चमत्कृतीनें व मनुष्यकृत कारागिरीनें सिंध प्रांतांतील 'प्रेक्षणीयांमधील प्रेक्षणीय' दृश्य बनले आहे. सक्करच्या असामान्य स्वरूपाचें येवढें स्पष्टीकरण पुरें आहे. आतां आमच्या एका दिवसाच्या भरगच्च दृश्यदर्शनाच्या वर्णनास लागणें बरें.
आम्ही ता. २७ दिजंबर १९३५ रोजी रात्रीं मुख्य रेलवे रस्त्याच्या आगगाडीने निघून ता. २८ दिजंबर रोजी सकाळी साडेसहा वाजतां सक्कर स्टेशनला आलों. रा. मोतिराम आडवानी (प्राप्तीवरील कराचे सक्कर भागाचे अधिकारी) हे आम्हांला स्टेशनवर घेण्यास आले होते. त्यांचेबरोबर आम्ही त्यांचे बिऱ्हाडीं गेलों. हे घर नव्या शहरांतील उंचवट्याच्या भागावर बांधलेलें आहे. चहापाणी झाल्यावर व साफ उजाडल्यावर आम्ही प्रथम साधुबेला हे सिंधु नदीमधील बेट पहाण्यास पायी पायीं चालत गेलों.
पायी चालत जाण्यानें सक्कर शहर हे टेंकडीवर कसें वसलेलें आहे हें स्पष्टपणें दिसलें. कारण आम्हांला नदीतीराच्या रस्त्याला येण्यास खूप खालीं चालत यावें लागलें. पुढें रेल्वे रस्ता लागला व तो ओलांडल्यावर सिंधुनदीच्या तीरावरील प्रशस्त गर्दछाय रस्ता लागला व नदीकांठाला दीड दोन फूट उंच व आठ दहा फूट रुंद अशी पांढऱ्या फरशीची व पांढऱ्या काँक्रीटची सहलवाट लागली. या वाटेला वड, पिंपळ यांसारख्या गर्दछाय व अति विस्तीर्ण अशा झाडांची रांगचरांग लागली. ही सहलवाट दोनतीन मैल असून रेलवे व गाडी यांच्या दुहेरी रहदारीच्या पुलापर्यंत एकसारखी गेलेली आहे. उजव्या हातास सहलवाटेच्या धक्क्याला लागून संथपणे वाहणारा व धूसर रंगाचा तो सिंधूचा प्रचंड प्रवाह, वृक्षराजीनें शोभायमान झालेली स्वच्छ, सरळ, शीतलस्पर्श सहलवाट, सहलवाटेच्या धक्क्याला लागून डाव्या हातास असलेला तो प्रशस्त रस्ता व रस्त्याचे पलीकडे तांबड्यालाल विटांच्या पांढऱ्या शुभ्र उंचवट्याच्या जागेवर बांधलेल्या इमारती व दुकानें हा देखावा एकसमयावच्छेदेंकरून दृष्टीस पडून आम्हांला आनंदाश्चर्याचें भरतें आलें. मला तर लंडनच्या जगविख्यात व्हिक्टोरिया एम्बँकमेंटची आठवण झाली च मला वाटलें, "सक्करची ही सहलवाट लंडनच्या एम्बँकमेंटपेक्षां कोणत्याही दृष्टीनें कमी नाहीं; उलट ती कांकणभर सरसच ठरेल; मात्र लंडनच्या एम्बँकमेंटचे गोडवे गाणारे हजारों प्रवासी लंडनला दरवर्षी जातात व ते आपले अनुभव आपल्या प्रवासवृत्तांत नमूद करतात. पण सिंधप्रांतांतील सक्कर शहर पाहणारे आधीं प्रवासी कमी व त्यांत आपले अनुभव लिहून ठेवून प्रसिद्ध करणारे तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके! अशा स्थितींत जरी सक्करची ही सहलवाट जगविख्यात होण्यालायक आहे तरी, तिचें नांव कधीं कोणाच्या कानी पडत नाहीं."
थोड्याच वेळाने आम्ही साधुबेला बेटाला जाणाऱ्या होडीच्या अड्ड्याशीं आलों व लगेच होडींत बसून साधुबेला बेटाच्या राजघाटाला येऊन पोहोंचलों. घाटाच्या तीनचार पांढऱ्या शुभ्र पायऱ्या चढून आम्ही दोन मोठ्या विस्तीर्ण वृक्षांच्या शाखांनीं व पानांनीं स्वाभाविक सभामंडप बनलेल्या व फरसबंदी केलेल्या आंगणांत आलों तोंच डावीकडे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाचें नक्षीदार कमानींनीं सुशोभित केलेलें मंदिर दिसलें. हे शीख धर्माच्या उदासी पंथाचे गुरू श्रीचंद महाराज यांचें समाधी मंदिर आहे. मंदिर एक मजलीच आहे. पण त्याचे नक्षीकाम फार सुबक व बारकाव्याचें आहे. आमचे बरोबर रा. मोतिराम आडवानी हे सिंधी गृहस्थ असल्यामुळे आम्हांला हें मंदिर आंत जाऊन स्वस्थपणे पहातां आलें, इतकेंच नाहीं तर या साधुबेला बेटाच्या उदासी मठाचे सध्याचे मठाधिकारी स्वामी हरिनामदासजी यांचें दर्शन घडलें. रा. मोतीराम आडवानी यांनीं एक रुपया गुरुदक्षिणा मठाधिपतीस दिली. त्यांचे अनुकरण करून आम्हीही एक रुपयाची गुरुदक्षिणा त्यांना दिली. मठाधिपतीनीं आमची थोडी विचारपूस करून आपल्या मठाची माहिती सांगितली. उदासी पंथी मठामध्ये सुमारें चारशे वर्षांपूर्वी बालब्रह्मचारी गुरु श्रीचंड योगीराज नांवाचे मोठे आचार्य होऊन गेले. त्यांनी पुष्कळ मठ स्थापन केले. त्यांत या बेटावर एक मठ स्थापन



आम्हांला यावेळीं काश्मीरच्या प्रवासांत श्रीनगर येथे भेटलेल्या माजी काश्मीरच्या महाराजांच्या गुरुमहाराजांची आठवण झाली. कारण ते गुरुमहाराजही आम्हांला मोठे समयज्ञ व व्यवहारचतुर आहेत असें वाटलें होतें. शेवटी मठाधिपतीनीं आम्हांला नारळ, केळीं व एक दोन्ही टोकांना पिवळा रंग दिलेलें शुभ्र वस्त्र (दोन तीन हात पंचा) व साधुबेला तीर्थाचें छोटें सचित्र इंग्रजी पत्रक, प्रसाद म्हणून दिलें. आम्ही मठाधिपतींचा निरोप घेऊन बेटाचा बाकीचा भाग पाहण्यास गेलों, हें बेट बरेंच मोठें आहे. त्याची रुंदी फार नाहीं; पण लांबी बरीच आहे. हल्लीं बेटाच्या चारही बाजू सीमेंट-काँक्रीटच्या मजबूत भिंतीनें बांधून काढल्या आहेत व मधून मधून स्नानाकरितां सुंदर दगडी पायऱ्यांचे घाट बांधले आहेत. बेटामधील मोकळ्या जागेत नाना प्रकारची झाडें लाविलीं आहेत व मधून मधून फुलझाडांचे ताटवे केले आहेत व मध्ये एक छोटी पाऊलवाट ठेविली आहे. बेटाचे दुसऱ्या टोंकास कैलास नांवाचें एक महादेवाचे देवालय आहे. देऊळ छोटेसें पण सुबक आहे. या देवळाचे दुसऱ्या मजल्यावर एक समाधीसारखी जागा व त्याचेहीवर गच्ची आहे. या गच्चीवरून दिसणारा देखावा अद्वितीय आहे, यांत शंका नाहीं. येथून सक्कर व रोहरी हीं दोन्हीं हिरव्यागार झाडांनी शोभायमान झालेलीं पण दाट वस्तीची शहरें एकसमयावच्छेदेकरून दिसतात व तीं सिंधू नदीच्या प्रचंड पुराने वाहून जाऊं नयेत म्हणूनच जणूं कांहीं मुद्दाम निर्माण केलेल्या टेकड्यांवर वसलेलीं पाहून आश्चर्य वाटलें. नदीच्या वरच्या बाजूस लांबच लांब पसरलेलें बक्कर बेट दृग्गोचर झालें व सिंधु नदीच्या दोन फाट्यांवरील ते रेलवे रस्त्याचे अजस्त्र दोन पूल पाहून तर मन थक्क झालें. प्रवाहाच्या खालच्या अंगास सक्करचा तो पांढराशुभ्र ६६ कमानींचा प्रचंड कालव्यांचा पूल (सक्करचें धरण) या गच्चीवरून मोठा मनोहर दिसला; कैलास देवालयाच्या गच्चीवरून दिसणारा अद्वितीय देखावा कितीही वेळ पाहिला तरी, मनाचें समाधान होत नाहीं, असा माझा अनुभव आहे.
ज्याप्रमाणें सक्करच्या सिंधुतीरावरील सहलवाटेनें मला लंडनच्या एम्बँकमेंटची आठवण करून दिली व दोन्हींमधील तरतमभाव नकळत मनांत आला, त्याप्रमाणें साधुबेला बेट पाहून मला जीनीव्हा शहरांतील रूसो बेटाची आठवण झाली व दोन्ही बेटांमधला तरतमभाव मनांत उभा राहिला. साधुबेला बेट रूसो बेटापेक्षां दिढी दुपटीनें मोठें आहे. बाकी दोन्ही बेटांच्या बाजू सारख्याच बांधून काढलेल्या आहेत. रूसो बेटाला जायला छोटासा पूल केलेला आहे, तसा साधुबेला बेटाला नाहीं; याप्रमाणे तुलनात्मक विचार मनांत येत असतांना, आम्ही होडींत येऊन बसलों व मग तीरावर पोहोंचल्याबरोबर आल्यावाटेनें तडक बिऱ्हाडीं आलो. नंतर स्नान, न्याहारी आटोपल्यावर आम्ही मोटारकारने सक्करच्या मुख्य दृश्यदर्शनास निघालों. सक्करच्या नव्या वस्तीच्या सरळ रस्त्यानें आम्ही चाललों. रस्त्याचे दोन्ही बाजूंस एका जातीच्या विलायती वृक्षांची रांगचीरांग लावलेली होती. सरकारी बंगले व सरकारी कचेऱ्या रस्त्याचे डाव्या बाजूस एकामागून एक अशा सारख्या लागत होत्या. बंगल्याच्या सभोवती नानारंगी फुलझाडांचे ताटवे दिसत होते. ही सक्करची नवी वस्ती सुंदर दिसते खरी, पण एकंदरीत या भागांत धूळ जरा जास्त आहे असे दिसलें. हा रस्ता चढावाचा आहे. वास्तविक आम्ही नदीच्या पात्राकडे चाललो होतों. तरी पण रस्ता चढावाचा होता, कारण सिंधु नदीचा विशेष हा कीं, नदीचे पात्र आधीं फार खोल नाहीं व नदी प्रांताच्या उंचवटयाच्या भागांतून वहात जाते. यामुळे आपल्या इकडल्या नद्यांप्रमाणें सिंधू नदीच्या आसपासचा देखावा दिसत नाहीं. याप्रमाणें नवी वस्ती पहात पहात आम्ही चढत्या रस्त्याच्या माथ्याशीं आलों, तोंच सक्करचा प्रचंड कालव्यांचा पूल दृष्टिपथांत आला. लागलीच उजव्या हाताला तुडुंब पाण्याने भरलेले व संथपणे वाहणारे कालवे दिसले, तर डाव्या हाताल समुद्रासारखी भासणारी सिंधू नदी, पांढऱ्याशुभ्र दगडांच्या मजबूत भिंतीनें बांधून काढलेली तिची दरा व त्या भिंतीमधील कमानींतून कालव्यांत मोजकें पाणी देण्याची केलेली विलक्षण सोय, या गोष्टी दृष्टीस पडून माझें मन आश्चर्यचकित झालें. नदीच्या या उत्तर बाजूला (कारण मागे सांगितल्याप्रमाणें येथें सिंधू- नदीचा प्रवाह पूर्वपश्चिम वहात आहे व म्हणून सक्कर हे प्रवाहाच्या उत्तरेस आहे तर रोहरी हे दक्षिणेस आहे) तीन नवे कालवे काढले आहेत. पहिल्या दृष्टीस पडणाऱ्या कालव्याचें नांव वायव्य कालवा असे आहे. हा दीडशें फूट रुंदीचा कालवा आहे; दुसरा कालवा अडीचशे फूट रुंदीचा असून त्याचे नांव 'भाताचा कालवा' असें आहे; तिसरा कालवा सुमारें पंचाण्णव फूट रुंद असून त्याचे नांव दादू कालवा असें आहे. हे तीन कालवे एकाला एक लागून असल्यासारखे आहेत; मधल्या बांधाच्या जागेवर फुलझाडें व गवत लावलेलें आहे. हा कालव्यांचा देखावा विस्मयकारक वाटतो. हे तीन कालवे टाकले की, प्रेक्षक सक्करच्या धरणाच्या जमिनीवरील प्रचंड कमानीखाली येतो. याचे उजव्या अंगास तांबड्या दगडाची एक- मजली पण फार मोठी इमारत लागते. येथें सक्करच्या धरणाची कचेरी आहे. उजव्या अंगास मोठ्या कमानीखालीं छोटें जकात नाके आहे. या भव्य व विस्तीर्ण कमानीखालून गेलें कीं, सक्करच्या धरणास सुरवात होते. हे धरण म्हणजे एकाला एक चिकटलेला जोडपूल आहे. सरकारी खात्यानें केलेल्या नामाभिधानाप्रमाणें सखल पुलाचें नांव 'रस्त्याचा पूल' (Road Bridge) असें आहे, तर उंच पुलाचें नांव 'दरवाज्यांचा पूल' (Gate Bridge) असें आहे. हा दरवाज्यांचा पूल रस्त्याच्या पुलाच्या वर अठरा फूट उंच आहे. या दरवाज्यांच्या पुलावरून ५० टन वजनाचे लोखंडी दरवाजे यारीनें वर- खाली करण्याची सोय केली आहे. हा पूल म्हणजेच सक्करचें धरण होय. दोन्ही पुलांच्या कमानी सारख्या साठ फूट रुंदीच्या असून दोन्ही पुलांच्या कमानींचे खांब एकच आहेत; मात्र दरवाज्यांच्या पुलाच्या खांबांच्या भागाची थोडी उंची वाढवून मग त्यांवर कमानी बांधल्या आहेत. पुलांचें व नदीच्या दरांच्या भिंतींचें सर्व काम पांढऱ्याशुभ्र रंगाच्या चुन्याच्या दगडांचें आहे. कमानी मात्र पांढऱ्याशुभ्र काँक्रीट दगडांनी बांधल्या आहेत. मोटार, टांगा किंवा पादचार अशा कोणत्याही साधनानें रस्त्याच्या पुलावरून चाललें म्हणजे उजवीकडे समुद्रासारखी सिंधू नदी, तर डावीकडे एक दोन तीन अशा मोठ्या काळ्या रंगाच्या आकड्यांनीं निर्दिष्ट केलेल्या पांढऱ्याशुभ्र भव्य कमानी व त्यांचेमध्यें बसविलेले ते लोखंडी प्रचंड दरवाजे, खालीं नदीमध्यें लांबवर बांधीत नेलेल्या भिंतीमुळे नदीच्या प्रवाहाचे पडलेले तीन भाग हा देखावा विलक्षण विस्मयकारक वाटला यांत शंका नाहीं. जगांतील पाटबंधाऱ्यांच्या कामांमध्यें पहिला नंबर पटकावणारें अजस्त्र पाटबंधाऱ्याचें काम मुंबई इलाख्याच्या हिंदी व युरोपीयन एंजिनीयरांच्या श्रमानें व कौशल्यानें निर्माण झालें आहे, हें पाहून, मी त्या सर्व एंजिनीयरांचें मनांतल्या मनांत सादर कौतुक केलें. एकामागून एक अशा सारख्या कमानी लागत होत्या. अशा ६६ कमानी लागल्या व मग पुन्हा पुलाच्या प्रारंभीं लागली तशी जमिनीवरील भव्य व प्रचंड कमान आली. हा जोड-पूल सुमारें एक मैल लांब आहे. त्या भव्य व प्रचंड कमानीखालून आम्ही गेलों व डाव्या हातच्या रस्त्याला वळलों तोंच उजवीकडे कालवे व डावीकडे नदीच्या दरेची कालव्यांच्या मुखांची भिंत दिसली. या रोहरीकडच्या दक्षिण बाजूला चार नवे कालवे काढलेले आहेत. यांपैकी पहिला कालवा २५० फूट रुंद असून त्याचें नांव रोहरी कालवा असें आहे. दुसरा व तिसरा हे लहान कालवे आहेत. त्यांची रुंदी सुमारें ८० फूटच आहे व हे कालवे खैरपूर संस्थानाकरितां काढलेले असून त्यांना खैरपूर पश्चिम कालवा व खैरपूर पूर्व कालवा अशीं नांवें दिलीं आहेत. चवथा कालवा पुन्हा फार मोठा असून त्याची रुंदी सुमारें ३५० फूट आहे व त्याचें नांव पूर्वनारा कालवा असें आहे.
याप्रमाणें सिंधू नदीच्या दोन्ही तीरांकडील लाखों एकर जमिनीला पाणी पुरविण्याकरितां सक्करच्या धरणानें नव्या सात नद्या निर्माण केल्या आहेत! या सात नद्या पाहून मला जुन्या सप्तसिंधु या नांवाची आठवण झाली. फार पुरातन काळीं आर्य लोक हिंदुकुश पर्वत ओलांडून खैबर घाटानें प्रथम पंजाब प्रांतांत आले व स्थाईक झाले, तेव्हां त्यांना निसर्गकृत सात नद्या- काबूल, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज- पंजाब प्रांतांत आहेत असें दिसून आलें. म्हणून त्यांनीं या सर्व भागाला सप्तसिंधू असें नांव दिले व हें नांव वैदिक वाङ्मयांत वारंवार येतें. पण अर्वाचीन काळी सिंधप्रांतांत निसर्गानें एक नदी निर्माण केली असतां मनुष्यानें आपल्या कल्पकतेनें त्या एका नदीपासून सात नद्या निर्माण केल्या! तेव्हां सिंधप्रांताला अष्टसिंधु हें नांव अधिक शोभेल व तें अन्वर्थकही होईल, असें मला वाटलें.
सक्करचा जोडपूल व त्यापासून काढलेले सात कालवे यांच्या दर्शनाने माझ्या मनांत वर नमूद केलेली कल्पना उद्भूत झाली. पण ती मनःचक्षूपुढे फार वेळ टिकली नाहीं. कारण चार कालवे टाकून आमची मोटार रोहरी गांवाकडे चालली तोंच हिरव्यागार ताडामाडांच्या राईनें आमचें मन आकर्षित केलें. समुद्रकांठचीं हीं झाडें रोहरीस पाहून आम्हांला सानंदाश्चर्य वाटलें. नंतर आम्ही रोहरीच्या बाजार पेठेवर ओझरती नजर टाकून रोहरी शहरांत स्वदेशीच्या स्फूर्तीनें निघालेले एंजीनच्या शक्तीनें चालणारे रेशमी कापडाच्या हातमागांचे दोन कारखाने पाहिले. या कारखान्यांमध्यें नानारंगांचें, नानानक्षीचें, नाना चौकटीचें शर्टचे व कोटाचें रेशमी कापड होतें. कापड फार सफाईदार व मोहोरेदार काढतात व कापडाच्या रंगाच्या छटाही नयनमनोहर बनवितात हे पाहून, आम्ही कारखानदारांचे व त्यांच्या कामकऱ्यांचे अभिनंदन केलें. रोहरी शहरांत दुसरें कांहीं एक पाहण्यासारखें नाहीं असें कळल्यावर आम्ही शहराच्या वरच्या अंगास व टेंकडीच्या भागापासून सुरु झालेल्या रस्ता व रेलवे यांच्या दुहेरी उपयोगाच्या सिंधूवरील पुलाकडे गेलों.
मागे दिग्दर्शित केल्याप्रमाणें सिंधू नदीचे या ठिकाणीं दोन फाटे बनले असून, मध्यें बक्कर नांवाचें लांबट बेट आहे. यामुळे येथें सिंधूवरील पूल श्रीरंगपट्टण येथील कावेरीवरील पुलाच्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या तुकड्यांनी बनलेला आहे; किंवा येथें सिंधूच्या दोन फाट्यांवर दोन पूल आहेत असें म्हटलें तरी चालेल. पहिला रोहरी बाजूचा पूल व दुसरा सक्कर बाजूचा पूल. रोहरी ते बक्कर बेटापर्यंतचा पूल हा ८२० फूट लांबीच्या कँटीलिव्हर तत्त्वाप्रमाणे बांधलेला पूल आहे. रोहरीच्या बाजूच्या तीरावर बांधकाम केलें आहे व बक्कर बेटाच्या तीरावर बांधकाम केलें आहे आणि दोन्ही बाजूंनी ३१० फूट लांबीचीं बहालें बसवून तीं मध्ये २०० फूट लांबीच्या बहालानें जोडली आहेत. अर्थात् ८२० फूट नदीच्या प्रवाहांत कोठेही खांब नाहीं; शिवाय मधलें दोनशे फूट लांबीचें बहाल वर उचलतां येण्याची सोय केलेली आहे. यामुळे हा पूल हवा तेव्हां मोडतां येतो. हें काम विलक्षण आश्चर्यकारक वाटलें व मला स्कॉटलंडांतील फोर्थ खाडीवरील पुलाची आठवण झाली. सिंधचें ग्याझीटीयर उघडून पहातां हा सिंधूवरील पूल खुला करण्याचा समारंभ मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांचे हस्ते सन १८९९ मध्ये झाला; याला लँड्सडाऊन पूल असें नांव देण्यांत आलें. हा पूल फोर्थ पुलाच्या बांधणीच्या सुमारास बांधण्यांत आला व म्हणून दोन्ही पुलांची बांधणी एकाच कँटीलिव्हर तत्त्वावर व एकसारखीच झाली आहे असें कळलें. हा पूल टाकल्यावर बक्कर बेट लागलें. सध्यां येथे रेल्वेसंबंधीच्या बऱ्याच इमारती बांधलेल्या दिसल्या व बेटाचे टोंकाकडे पूर्वीच्या किल्ल्याच्या तटाच्या भिंती दिसल्या. नंतर पुन्हा सक्कर बाजूकडचा पूल लागला. हा नेहेमींच्या लोखंडी पुलाप्रमाणे दगडी खांबावर लोखंडी तुळया घालून केलेला पूल आहे. या बाजूला नदीमध्ये दोन दगडी खांब बांधले असून बक्कर बेटाचे बाजूला व सक्करच्या दरेला जमिनीवर बांधकाम केलें आहे. मग त्यावर लोखंडी बहालें टाकलीं आहेत. अर्थात् हा पूल तीन कमानी पुलासारखा आहे व तीन कमानी- मधील अंतर अनुक्रमे २७८, २३८ व ९५ फूट आहे. म्हणजे हा पूल सुमारें सातशे फूट लांब आहे. सिंधूवरील हा पूल हिंदुस्थानांतील पहिल्या प्रतीच्या प्रेक्षणीयांपैकी एक आहे, यांत शंका नाहीं. या पुलाला पादचारी लोकांकरितां ग्यालरीप्रमाणें पायवाटा ठेवल्या आहेत. आगगाडी येण्याच्या वेळीं पूल बंद करतात; बाकी वेळेस तो गाड्या मोटारींच्या रहदारीला खुला असतो. हा पूल ओलांडल्यावर आम्ही जुन्या सक्कर शहरांत आलों. मग नव्या वस्तींतील रा. आडवानी यांचे बंगल्यावर पोहोंचलों व दोन प्रहरचा फराळ केला. नंतर दोन तीन तास विश्रांति घेतली. सायंकाळी आम्ही सक्करमधील मंघाराम नांवाच्या कारखानदाराचा बिस्किटें व इंग्रजी तऱ्हेची मेवामिठाई तयार करण्याचा कारखाना व एका मुसलमान व्यापाऱ्याचा सिगारेटचा कारखाना पाहण्यास गेलों. हे दोन्ही कारखाने हिंदुस्थानांतील अलीकडील औद्योगिक जागृतीचीं दृश्य फळें आहेत असें कारखाने पाहून आम्हांला वाटलें. दोन्ही कारखान्यांमध्यें सुबक माल निघू लागला आहे. युरोपीयन चहाच्या दुकानांत, रेल्वेच्या रिफ्रेशमेंट रूम्समध्यें व युरोपीयन लोकांना दिलेल्या चहापार्टीच्या ठिकाणीं मंघाराम बिस्किटें व विलायती मेवामिठाई दिसूं लागलीं आहेत, हें ऐकून आम्ही मंघारामचें अभिनंदन केलें. झालें. आमचें सक्कर रोहरीचें दृश्यदर्शन संपलें. आतां सक्करच्या धरणाच्या योजनेचा व पूर्ततेचा इतिहास व त्याबद्दलची मोजमापी माहिती देऊन या स्थळाचा निरोप घेऊं.
सक्करच्या धरणाचे स्वरूप व विस्तार हा सिंधप्रांत प्रथम पाहाणारास जरी थक्क करून टाकणारा असला तरी, सिंधी लोकांना सिंधू नदीच्या पुराचे पाणी पाटबंधाऱ्यांनी शेतीला घेण्याची कल्पना अपूर्व नाहीं. उलट ही कल्पना प्रत्येक सिंधी माणसाच्या षष्ठीला जणूं कांहीं पुजलेली असते. कारण हिंदुस्थानच्या इतर भागांना मिळणारा नियमित पावसाळा सिंध प्रांताला पारखा आहे. सिंधप्रांताची शेती व तिची सुपीकताही सिंधुनदीच्या पुरावर अवलंबून असल्यामुळे स्मरणातीत काळापासून सिंधूच्या पुराच्या पाण्याचे कालवे काढून त्यायोगे शेतांना पाणी देऊन पिके काढण्याची पद्धती सिंधी लोकांना अवगत आहे. यामुळे सिंधप्रांतांत सक्कर धरणापूर्वीसुद्धां सिंधूनदींतून शेकडोंशे लहान मोठे कालवे काढलेले दृष्टीस पडतात. अजूनसुद्धां सक्करच्या धरणाच्या वरच्या अंगास जुने तीन कालवे- डेझर्ट, उनबार व बेगारी नांवाचे- चालू आहेत; तसेंच सिंधच्या अगदीं दक्षिणेकडच्या भागाला सक्करच्या धरणाचे कालवे जात नाहींत; तेथें जुनेच कालवे चालू आहेत.
पण सिंध प्रांतांतील जुने कालवे बहुधा हंगामी असत; कारण सिंधू नदीला पूर येऊन तिची उंची १३।१४ फूट वाढेल, तेव्हांच कालव्यांना पाणी मिळणार. पण सिंधूच्या पुरामध्यें अनिश्चितता फार आहे; कधीं पूर लवकर येतो तर कधीं उशीरा येतो; कधीं पुराची उंची कमी राहते तर कधीं उंची फारच फाजील होते; तसेंच पुराचा हंगामही कमी अधिक दिवसांचा होतो; तसेंच कालव्यांना ढाळ बरोबर दिला गेला नसल्यामुळे, कांहीं शेतजमिनीला पाणी मिळत नसे तर कांहीं जमिनींना फाजील पाणी मिळे; खेरीज कालव्यांच्या अशास्त्रीय बांधणीमुळे कालव्यांत गाळ सांचून ते बुजून बिनकामी होत. या सर्व कारणांमुळें सिंधची शेती करणें मोठें तवकलीचें काम होतें. मेहनत केल्यास हटकून पीक येईल, असें सांगतां येत नसे. अशा स्थितीत सिंधच्या शेतीची सुधारणा व वाढ होणें दुरापास्त होतें.
सिंधच्या कालव्यांचे हे दोष नाहींसे करण्याकरितां व तेथल्या शेतीला बारमाही पाणी मिळण्याकरितां सिंधू नदीला धरण बांधण्याची कल्पना प्रथम सन १८४६ मध्यें सर वॉल्टर स्कॉट या एंजिनीयरनें काढली. पण त्याची कल्पना इतर नद्यांना ज्याप्रमाणें बंधारा घालून पाणी आडवितात त्याप्रमाणे सिंधूला बंधारा घालून पाणी आडविण्याची होती. पण ती कल्पना अव्यवहार्य ठरली. कारण त्यायोगें नदीचा प्रवाह बदलण्याचा संभव होता. पुढे फाईफ या एंजिनीयरने सिंधच्या पाटबंधाऱ्यांसंबंधी एक उत्तम रिपोर्ट लिहून त्यामध्ये सहा नव्या कालव्यांची योजना सुचविली. पण फाईफच्या योजनेमध्यें पुराच्या हंगामी पाण्याचा जास्त चांगला उपयोग करण्यापेक्षां जास्त सोय नव्हती. सन १९०४ मध्यें डॉ. समर्स या एंजिनीयरनें बारमाही कालव्यांची योजना तयार केली व तदनुरूप एक दोन मोठे कालवे तयार करण्यांत आले.
पण सन १९१२ पर्यंत सिंधू नदीच्या पुराचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याची योजना पुढे आली नव्हती. पण त्या साली मुंबई सरकारनें दहाबारा कोटी रुपये खर्चाची व सक्करच्या वरच्या बाजूस दरवाज्यांचा पूल बांधून हिंवाळ्यांतसुद्धां कालव्यांना पाणी मिळण्याची मोठी योजना स्टेट सेक्रेटरीकडे पाठविली. त्यानें लंडनमधील एंजिनीयरांची एक कमिटी योजनेचा विचार करण्याकरितां नेमिली. त्या कमिटीने सक्करला पूल बांधण्याची कल्पना नापसंत करून सक्करच्या खालीं तीन मैलांवर पूल बांधण्याची सूचना केली व त्या दृष्टीनें योजनेचा फेरविचार व्हावा असे सुचविलें. पण महायुद्धामुळे सर्वच गोष्टी मागे पडल्या, त्याप्रमाणे सक्करच्या धरणाचीही योजना मागे पडली. पण महायुद्धाच्या समाप्तीनंतर मुंबई सरकारनें मस्टो या एंजिनीयरकडून लंडन कमिटीच्या सूचनेप्रमाणें नवीन दोषरहित अशी योजना तयार केली. याच सुमारास प्रांतांना नव्या सुधारणा मिळाल्या. तदनुरूप सिंध विभागाला एकंदर १८ प्रतिनिधी मुंबई कौन्सिलमध्यें धाडण्याचा अधिकार मिळाला व सिंधच्या प्रतिनिधींनीं सक्करच्या धरणाचा प्रश्न जोरानें पुढे आणला. सन १९२१ मध्यें सिंधच्या प्रतिनिधींनी सक्करच्या धरणाच्या योजनेबद्दल एक ठराव कौन्सिलपुढें आणून तो पसार करून घेतला. त्यावेळची कौन्सिलची प्रोसीडिंग्ज वाचण्यासारखीं आहेत. पुढे सन १९२३ मध्ये स्टेट सेक्रेटरीनें सक्करच्या धरणाच्या योजनेला मंजुरी दिली. त्याच सालीं मुंबई कौन्सिलनें योजनेच्या १८ कोट रुपये खर्चाला मंजुरी देऊन योजना ताबडतोब हाती घेण्याबद्दल सरकारला आग्रहाची विनंति केली. सिंधच्या प्रतिनिधींना कायमचे सरकारच्या गोटांत घेण्याच्या राजकीय धोरणानुरूप येवढ्या मोठ्या खर्चाची योजना मुंबई सरकारनें ताबडतोब हाती घेतली व ती दहा वर्षांमध्ये म्हणजे सन १९३३ मध्यें पुरी केली. असा थोडक्यांत या योजनेचा इतिहास आहे. आतां या योजनेच्या अवाढव्यपणाबद्दलची मोजमापी माहिती देऊन या विषयाची रजा घेऊं.
| १ | सक्करच्या धरणाला लागलेला खर्च | २० कोट रुपये |
| २ | एकंदर कालव्यांची लांबी | २० हजार मैल |
| ३ | धरणामुळे लागवडीस येण्यासारखी जमीन | ७० लक्ष एकर |




| ४ | दर वर्षी लागवड होणारी जमीन | ५० लक्ष एकर |
| ५ | निरनिराळ्या जातीची पिकें:- | |
| गहूं कापूस तांदूळ ज्वारी, बाजरी गळिताची धान्यें |
२५ लक्ष एकर ८ लक्ष एकर ६ लक्ष एकर ७ लक्ष एकर ५ लक्ष एकर |
मानवी कृती किंवा कामें केवळ कल्याणकारी कधीही असूं शकत नाहींत; त्यांमध्ये चांगल्याचें व वाईटाचें कमीअधिक प्रमाणांत मिश्रण झालेलें असतें. ज्याप्रमाणे माणूस डोळस आहे किंवा नाही ह्याची परीक्षा पहाण्याकरितां मिसळ धान्य त्या माणसापुढे ठेवून त्याला त्यांतून निरनिराळीं धान्यें वेगवेगळीं करण्यास सांगतात त्याप्रमाणेच जणूं कांहीं परमेश्वरानें जगांतील सर्व गोष्टींमध्ये चांगल्या वाईटाचे मिश्रण करून ठेवलें व मानवी प्राण्याला बुद्धि, कल्पकता व विवेकीपणा या तीन शक्ति दिल्या. या शक्तींच्या उपयोगानें त्यानें चांगल्यावाईटाच्या मिश्रणाने बनलेल्या जगांतील गोष्टींमधून चांगल्या वाईटाची पारख करावी व आपल्या कृतींमधून किंवा कामामधून चांगलेवाईट ही जरी अगदीं वेगवेगळीं करतां आलीं नाहींत तरी वाईटाचा अंश जितका कमी करतां येईल तितका करावा व मग त्या कृती किंवा कामे सुरू ठेवावीं; अशा प्रकारेंच मनुष्यांची व समाजाची सारखी प्रगति होत राहावी असा परमेश्वरी संकेत दिसतो. मनुष्यांना दिलेल्या दैवी शक्तींचा हाच खरा उद्देश व उपयोग आहे.
सिंध प्रांतांतील कालव्यांचीं कामें व विशेषतः सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र पहात असतांना वर नमूद केलेल्या तत्त्वाची सत्यता माझ्या पदोपदीं प्रत्ययास येत होती.
सिंध प्रांतांतील सर्वांत मोठे पाटबंधाऱ्याचे काम महाराष्ट्रांतील अशा प्रकारच्या पांचचार कामानंतर हातीं घेऊन पुरें करण्यांत आलें, संघ प्रांताचें भाग्य होय असे मला वाटलें. कारण पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायानें महाराष्ट्रामध्ये या मोठमोठ्या पाटबंधाऱ्यांच्या कल्याणकारक कामांबरोबर ज्या वाईट गोष्टी घडून आल्या त्या सिंध प्रांताला आगाऊ टाळतां आल्या. सक्रंदचें प्रयोगक्षेत्र म्हणजे पाटबंधाऱ्यापासून उत्पन्न होणाऱ्या अनुषंगिक वाईट गोष्टी टाळण्याचे एक मोठें साधन होय असे म्हणण्यास हरकत नाहीं.
महाराष्ट्रामध्यें प्रथमतः पाटबंधाऱ्याची मोठमोठीं कामें तयार होऊन जेव्हां अवर्षणी भागांना बारमाही कालव्याचें पाणी मिळू लागलें, तेव्हां शेतकऱ्यांनीं आपल्या शेतांतून उसासारखी अत्यंत किफायतीचीं पिके काढण्यास सुरवात केली. आपल्या शेतीच्या जितक्या मोठ्या भागांत ऊस लावतां येईल तितका ऊस लाव, त्याला खूप खत घाल, बिन त्रासाचे व ठराविक दराचें पाटाचें पाणी शेतांमध्ये पाण्याची उपळ फुटेइतकें मुबलक लाव, तेजीच्या भावाचा गूळ बनव, व एकरी तीनशे पासून पांचशे रुपये नफा मिळव, असा शेतकऱ्यांनीं सपाटा लावला. पाटबंधाऱ्याच्या खात्यानें किंवा शेतकीखात्यानेही कमालीची कृषीपद्धति (Intensive cultivation) सारखी चालू दिली. पाटबंधाऱ्याच्या पाण्याचे दर भारी असल्यामुळे व असे दरसुद्धां गुळाच्या तेजीच्या भावामुळे शेतकऱ्यास परवडत असल्यामुळे सरकारनें किंवा शेतकऱ्यांनीं या कमालीकृषीपद्धतीच्या व जमिनीला फाजील पाणी दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाकडे कित्येक वर्षे मुळींच लक्ष दिलें नाहीं. याचा परिणाम असा झाला कीं, जमिनीच्या खालीं असलेले क्षार पृष्ठभागावर येऊन त्यांचा पांढरा थर जमिनीवर सांचला व अत्यंत सुपीक जमिनी अत्यंत नापीक बनल्या! इतक्या कीं या जमिनीवर गवतसुद्धां उगवत नाहींसें झालें. शिवाय गुळाचा भावही भयंकर उतरला. कारण परदेशी साखर स्वस्त मिळू लागली. पाटबंधाऱ्याच्या विपुल व बिन त्रासाच्या पाणीपुरवठ्याचा हा अनर्थ व गुळाचा स्वस्त दर इतक्या थराला पोहोंचला कीं, शेतकऱ्यांना कमालीकृषी सोडावी लागली व त्यांनी भराभर पाटबंधाऱ्याचे पाणी घेण्याचें बंद केलें!
यामुळे पाणीपट्टीचें उत्पन्न संपुष्टांत येऊं लागलें. तेव्हां कोठें सरकार जागें झालें व अनर्थाच्या दोन कारणांपैकी एक कारण परदेशी साखरेची आयात, साखरेवरील कर वाढवून कमी केली; देशी साखरेच्या कारखान्यांस उत्तेजन दिलें व उसाच्या जमिनींना फाजील पाणी न देण्याबद्दलच्या व जमिनीत मुरलेलें फाजील पाणी गटारांनी काढून टाकण्याच्या तजविजीस सरकार लागूं लागलें. याप्रमाणे मोठमोठ्या पाटबंधाऱ्याच्या चांगल्या कामामध्यें वाईटाचा प्रवेश होऊन कसें नुकसान होतें याचा अनुभव महाराष्ट्रांतील सरकारी खात्याला आला होता. हीच महाराष्ट्राला ठेच लागली होती व त्यामुळे सिंधच्या पाणीपुरवठ्याच्या बाबतींत शेतकीखातें प्रथमपासून जागरूक राहून शहाणे बनले.
सक्करच्या धरणाची योजना सन १९२३ साली कौन्सिलमध्यें पास होऊन लगेच कामाच्या पूर्व तयारीस सुरवात झाली आणि धरणाचें व कालवे काढण्याचें प्रत्यक्ष काम वर्ष दीड वर्षांनी सुरू झालें. सन १९३२ मध्यें धरणाचें व कालव्यांचे काम पुरें होऊन हजारों- नव्हे लाखों– एकरांच्या शेतजमिनींना पाणीपुरवठा करण्याचें मुक्रर झालें. धरणाच्या कामाबरोबर सिंधमध्ये सोयीच्या ठिकाणीं प्रयोगक्षेत्र सुरू करून सिंध प्रांतांतील जमिनींत कोणती पिके चांगली होतील, जमिनीची सुपीकता कमी न होण्याकरितां पिकांची परंपरा कशी व कोणती असावी, पिकांना नेमके पाणी कसें द्यावें, जमिनीमध्यें मुरणारें पाणी मोऱ्यांच्या द्वारे जमिनीमधून कसें काढून टाकावें इत्यादि बाबी शास्त्रीय प्रयोगांनीं निश्चित करण्याची अत्यंत जरूर आहे; नाहीं तर जमिनीतील क्षार वर येऊन जमिनी लवकरच नापीक होतील; तेव्हां महाराष्ट्रांत झालेली चूक सिंध प्रांतानें करूं नये अशाबद्दल पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्रख्यात प्रिन्सिपॉल व नंतर शेतकीखात्याच्या डायरेक्टराचे जागीं अधिष्ठित झालेले डॉक्टर मॅनसाहेब यांनी सरकारांत जोरानें हाकाटी केली व कौन्सिलमध्यें प्रयोगक्षेत्र ताबडतोब स्थापन करण्याबद्दल सूचना आणली. त्या दिवशीं कौन्सिलच्या बैठकीमध्यें डॉक्टर मॅन यांनी माहिती पूर्ण व कळकळीचीं अशीं भाषणे केलीं व वादविवादामध्ये प्रामुख्याने भाग घेतला. डॉक्टर मॅनची त्या दिवशींची कामगिरी इतक्या प्रामुख्यानें जनतेपुढें व कौन्सिलपुढे आली कीं, त्या दिवसाच्या कौन्सिलच्या बैठकीला 'डॉक्टर मॅनचा दिवस' (Dr. Mann's day) असें नांव पडलें. डॉक्टर मॅनच्या कळकळीच्या भाषणानें व वादविवादाने प्रयोगक्षेत्राची आवश्यकता कौन्सिलला पटली व कौन्सिलने प्रयोगक्षेत्र सुरू करण्यास लागणाऱ्या खर्चाला मंजुरी दिली. प्रयोगक्षेत्र सुरू करण्याचे काम अर्थात् डॉक्टर मॅनकडेच सोपविण्यांत आलें.
डॉक्टर मॅन यांनीं सक्रंद या ठिकाणची तीनशे एकर जमीन प्रयोगक्षेत्राला पसंत केली. सक्रंद हे ठिकाण पसंत करण्याचं मुख्य कारण सक्रंदनजीक जुना मोठा तलाव होता, तेव्हां सक्करच्या पाटबंधाऱ्याचे बारमाही कालव्याचें पाणी सुरू होण्यापूर्वी प्रयोगक्षेत्राला लागणारें पाणी सक्रंदच्या तलावांतून मिळण्याजोगें होतें. शिवाय सक्रंदची जमीन सिंध प्रांतांतील जमिनीचा उत्तम नमुना होता. तेव्हां प्रयोग करण्यास हे ठिकाण फार सोयीचें होतें. याप्रमाणें डॉक्टर मॅन यांनीं ठिकाण पसंत केलें, तेथें त्यांनी ताबडतोब कच्च्या व कमी खर्चाच्या इमारती बांधल्या, प्रयोगक्षेत्राला लागणाऱ्या सर्व उपकरणांची जुळवा-जुळव केली. आपल्या हाताखाली काम केलेले व आपल्या विश्वासांतील प्रो. ताम्हाने यांची प्रयोगक्षेत्राचे मुख्य अंमलदार म्हणून नेमणूक केली. प्रयोगक्षेत्राच्या प्रत्यक्ष कामाला सन १९२६ मध्ये सुरवात झाली. गेली दहा वर्षे या प्रयोगक्षेत्राचे काम चालू असून बहुतेक सर्व काम प्रो. ताम्हाने यांचेच देखरेखीखाली झाले आहे. प्रो. ताम्हाने यांचे काम सरकारांत पसंत पडलें आहे याचे प्रत्यंतर सन १९३६ च्या नव्या वर्षाच्या पदवीदानप्रसंगी प्रो. ताम्हाने यांना सरकारने 'रावबहादूर' ही मानाची पदवी बहाल केली. सक्रंदच्या प्रयोगक्षेत्राची पूर्वपीठिका मोठी मनोरंजक असल्यामुळें प्रकरणाचे प्रारंभीं दिली. आतां सक्रंदच्या आमच्या दृश्यदर्शनाच्या वर्णनास लागणें बरें.
सक्कर येथे ता. २८ डिसेंबर १९३५ या सबंध दिवसभर आमचें दृश्यदर्शन चाललें व रात्रीचे आकरा वाजेपर्यंत रा. आडवानी यांच्याशीं नानाविध विषयांवर संभाषण करण्यांत आमचा वेळ गेला. नंतर आम्ही त्यांचा निरोप घेऊन सक्कर स्टेशनला आलों व तेथें वाटपाही खोलीमध्यें पहाटेच्या चार वाजेपर्यंत झोंपलों. मी तर नांवाला निजलों. आधीं वाटपाही खोलीमध्ये उतारूंची सारखी जा-ये चालू होती; शिवाय ते दिवस हिंवाळ्याचे असल्यामुळे वाटपाही खोलीमध्यें फार थंडी वाजत होती, म्हणून मला मुळीच झोप आली नाहीं. तेव्हां आगगाडी प्लॅटफॉर्मवर येण्याचे आधींच आम्ही सामानाची बांधाबांध करून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालीत बसलों. अर्थात् अशा पहांटेच्या थंडीच्या वेळीं चहावाल्याकडून चहा तयार झाल्याबरोबर पहिला गरम पेला आम्ही घेतला हें सांगावयास नकोच.
पहांटे पावणे पांच वाजतां क्वेटा मेल सक्कर स्टेशनला आली व आम्ही लागलीच इंटर क्लासच्या डब्यांत जाऊन बसलो. आमच्या सुदैवानें गाडींत गर्दी नव्हती. सक्करपासून नबाबशाहा हें शहर ११४ मैल आहे. आम्ही नबाबशाहा स्टेशनला सकाळी नऊ वाजतां पोहोंचलों. येथें सुमारें दीड तास थांबावे लागलें. येथून सक्रंद १४ मैल असून आगगाडीचा एक छोटा फाटा तेथपर्यंत नेला आहे. त्या छोट्या आगगाडीत आम्ही जाऊन बसलों. सव्वा दहा वाजता गाडी निघाली ती सक्रंद स्टेशनला आकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचली. प्रो. ताम्हाने यांचेकडे आम्ही उतरण्यास जाणार होतो व त्याप्रमाणे त्यांना सक्करहून आगाऊ कळविलें होतें. तदनुरूप त्यांची मोटार स्टेशनवर आली होती. स्टेशनपासून सक्रंद प्रयोगक्षेत्र दोनअडीच मैल दूर असावें. आम्ही प्रो. ताम्हाने यांचे बंगल्यावर साडेआकरा वाजतां येऊन पोहोचलों. स्नान- भोजनादि विधि उरकल्यावर आम्ही तास दीड तास विश्रांति घेतली. इतक्यांत प्रो. ताम्हाने यांनीं त्यांच्या जवळपास राहणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून आणून आमच्याशीं त्यांची ओळख करून दिली. नंतर आम्ही सक्रंदचें प्रयोगक्षेत्र पाहण्यास बंगल्याबाहेर पडलों.



प्रथम आम्ही कापसासंबंधीं प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळेत शिरलों. या विभागाच्या खर्चाला सेंट्रल कॉटन कमिटीनें कांहीं मुदतीची पैशाची देणगी दिलेली आहे असें कळलें.
लांब धाग्याचा, मध्यम धाग्याचा व खुद्द सिंधदेशी अशा निरनिराळ्या जातींच्या कापसासंबंधीं या प्रयोगशाळेत शोध केले जातात. एक अमेरिकन व एक इजिप्शियन अशा लांब धाग्याच्या कापसाच्या दोन जाती सिंधी जमिनीला व हवापाण्याला योग्य व चांगलें पीक देणाऱ्या आहेत असें प्रयोगांती ठरल्यावर शेतकी खात्यानें या दोन जातींचे बीं सकंद येथे मोठ्या प्रमाणावर तयार करून त्याचा प्रसार शेतकरी लोकांमध्ये करण्याची खटपट चालविली आहे; हल्लीं या दोन जातींच्या लांब धाग्याच्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊं लागली आहे असें आम्हांला सांगण्यांत आलें.
तसेंच सिंधमध्यें स्वाभाविकपणें पिकणाऱ्या कापसाच्या जातींची सुधारणा करण्याचे प्रयोग करून या शाखेनें एक सिंधसुधार नांवाची कापसाची नवी जात निर्माण केली आहे. अर्वाचीन वनस्पतीशास्त्रज्ञ हे ब्रह्मदेवाचें काम कसें करतात याची मजेदार माहिती व प्रत्यक्ष नमुने कापूस शाखेच्या तज्ज्ञानें आम्हांला दाखविले. सिंधमधील स्वाभाविक पिकणाऱ्या कापसामध्यें गुणावगुण असतात. त्या तज्ज्ञाने आम्हांला कापसाचीं तीन बोंडे दाखविली; एकांत कापूस पुष्कळ होता पण तो पिंगट रंगाचा होता; दुसऱ्या बोंडामध्यें कापूस पांढराशुभ्र होता, पण कापूस फार कमी होता; तिसऱ्या बोंडामधील कापूस लांब धाग्याचा पण त्यांतील सरकी फार मोठी होती. तज्ज्ञ म्हणाले, "या सिंधमधील मूळच्या तीन जातींमध्यें गुणावगुणांचे मिश्रण आहे. पिंगट रंगाच्या बोंडामध्यें पुष्कळ कापूस देण्याचा गुण आहे. पण पिंगट रंगाचा अवगुण आहे. दुसऱ्या बोंडामध्यें पांढरेपणाचा गुण आहे पण कमी कापूस पैदाशीचा अवगुण आहे. तिसऱ्या बोंडामध्यें लांब धाग्याचा गुण आहे, पण जाड्या सरकीचा अवगुण आहे. तेव्हां देशी कापूस सुधारण्याचा आमचा प्रयत्न हा कीं, या तीन जातींमधील गुण एकत्र आणून व त्यांतील अवगुण नाहींसे करून लांब धाग्याच्या, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या व पुष्कळ कापूस देणाऱ्या कापसाची नवी जात निर्माण करणें. याकरितां आम्ही आम्हांला पाहिजेत त्या गुणांच्या कापसाच्या जातींच्या फुलांतील पुंकेसर व स्त्रीकेसर यांचा संयोग घडवून आणतो व त्यापासून जें बी तयार होतें तें जमिनीत लावून त्यापासून कशा प्रकारचा कापूस पिकतो हे पाहतों व मग त्यांतलें त्रिगुणसमुच्चययुक्त बीं निवडून त्याची लागवड करतो. अशी निवड पिढ्यानुपिढ्या करीत आलें कीं आपल्याला पाहिजे तशा गुणांच्या कापसाची जात तयार होते. अशा रीतीनें 'सिंधसुधार' नांवाची जात आम्ही तयार केली आहे व त्या जातीच्या कापसाची लागवड वाढत्या प्रमाणावर होऊं लागली आहे." तज्ज्ञांचें हें म्हणणे ऐकून व त्यांनीं प्रत्यक्ष दाखविलेल्या कापसाच्या मूळ जाती व त्यांनी तयार केलेली नवी जात यांमधील विलक्षण फरक पाहून मला मौज वाटली व मनांत म्हटलें, 'अर्वाचीन वनस्पतीशास्त्रज्ञ' प्रति ब्रह्मदेव बनत चालले आहेत. त्यांना विशिष्ट गुणांनी युक्त अशा नव्या वनस्पती व वृक्ष निर्माण करतां येऊ लागले आहेत; हा मानवी शास्त्रांचा व मानवी बुद्धीचा केवढा आश्चर्यकारक प्रभाव!
या कापसाच्या बाबतीत आणखी कित्येक तऱ्हेचे प्रयोग शाळेत चालू असून त्या सर्वांचा सिंध प्रांतांतील कापसाच्या लागवडीच्या वाढीकडे उपयोग आहे असें कळलें.


ही प्रयोगशाळा पाहून आम्ही वनस्पती प्रयोगशाळेंत (Botanical Section) गेलों. तेथें नाना प्रकारच्या धान्यपिकांसंबंधी प्रयोग चालू असून त्यांचा उद्देश सिंधच्या हवापाण्याला व जमिनीला कोणतीं धान्य-पिकें व त्यांच्या कोणत्या जाती विशेष सोयीच्या व उपयुक्त आहेत हे ठरविण्याचा आहे.
नव्या कालव्याखालीं कापसाच्या बरोबरीने किंवा थोड्या जास्त प्रमाणांत गव्हाची लागवड वाढविण्याचा बेत असल्यामुळे या प्रयोगशाळेत गव्हाच्या पिकासंबंधी प्रयोग चालू असावेत हे स्वाभाविक आहे. गव्हाच्या नाना जातींपैकी दोन तीन जातींचें सिंधच्या जमिनीमध्यें उत्तम उत्पन्न देणारें पीक होईल असें प्रयोगांती ठरविलें आहे. या जातींचें बीं शेतकऱ्यांना देऊन त्या जातींच्या गव्हाच्या लागवडीचा प्रसार करण्याचा प्रयत्न शेतकी खात्यामार्फत चालू आहे.
भाताच्या नाना जातींसंबंधीं येथें प्रयोग चालू आहेत. पण लारखाना जिल्ह्यांत भाताचें पीक फार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे व सिंध प्रांतांतील त्या भागाकरितां स्वतंत्र 'भाताचा कालवा' काढल्यामुळे भातासंबंधीं अधिक व सतत प्रयोग चालू ठेवण्याकरितां लारखाना येथें एक छोटेंसें प्रयोगक्षेत्र चालू केलें असल्यामुळे भातासंबंधींचे प्रयोग येथें हल्लीं फारसे करण्यांत येत नाहींत असें तज्ज्ञानें सांगितलें. गहूं, भात या धान्यपिकांप्रमाणें ज्वारी, बाजरी, गळिताचीं धान्यें इत्यादि नानाप्रकारच्या पिकांच्या सुधारणेसंबंधीं व लागवडीसंबंधीं शोध व प्रयोग या प्रयोगशाळेंत चालू असतात. निरनिराळ्या धान्यपिकांना कोणती खतें मानवतात व लागतात, त्यांना पाटाचे पाणी किती व किती दिवसांच्या अंतरानें देणे चांगलें, बीं केव्हां किती अंतरावर व कशा प्रकारानें पेरावें, पिकांवर पडणाऱ्या रोगावर काय उपाय करावे इत्यादि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधीं या वनस्पतीशाखेत शोध व संशोधन केलें जातें.
नंतर आम्ही रासायनिक प्रयोगशाळेत गेलों. या शाखेमध्यें खालील- सारखे प्रश्न सोडविले जातात असें आम्हांला सांगण्यांत आलें. सिंध प्रांतासारख्या नदीच्या गाळानें झालेल्या जमिनीमध्यें पाटाच्या पाण्यावर गव्हादि धान्यपिकांची सारखी व वार्षिक लागवड केल्यास जमिनीची सुपीकता भराभर कमी होत जाते याचे कारण काय? जमिनीवर मिळणाऱ्या स्वाभाविक खतांची कमतरता कृत्रिम खतांनीं कितपत भरून काढतां येईल?
सिंधप्रांतामध्यें हजारों एकर सपाट, बिनखड्याची, निर्वृक्ष व बाह्यतः सुपीक वाटणारी जमीन पांढऱ्या क्षाराच्या थरामुळे लागवडीला निरुपयोगी झालेली आहे. अशा जमिनीस सिंधमध्यें कालर जमीन म्हणतात किंवा या क्षारथराला कालर म्हणतात. अशा जमिनींतील व जमिनीवरील क्षार नाहींसा किंवा कमी करण्याकरितां कोणते उपाय योजावे व अशा जमिनी कोणत्या तऱ्हेने लागवडीस आणतां येतील व त्यामध्यें कोणती पिके होतील? शेवटीं पाटाच्या फाजील पाण्यानें किंवा जमिनीमध्यें मुरणाऱ्या पाण्यानें क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात, तेव्हां या भावी अनर्थाचा प्रतिकार कोणत्या उपायांनी करावयाचा?
सिंधच्या शेतकीच्या वाढीसंबंधांत व सुधारणेसंबंधांत वरील प्रश्न फार महत्त्वाचे आहेत असें आम्हांला वाटलें व अशा प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा व योग्य उपाययोजना ठरविण्याचा प्रयत्न ही रासायनिक प्रयोगशाळा करीत आहे हें पाहून या विभागाचें महत्त्व आमच्या ध्यानांत आलें.
शेवटीं आम्ही कृषिप्रयोगशाळेत आलों. रसायनशाखेप्रमाणें ही शाखाही फार महत्त्वाची आहे असें आम्हांला दिसून आलें. कारण या शाखेने हातीं घेतलेलें संशोधन शेतकऱ्यांच्या तात्कालिक फायद्याचे आहे असें त्या शाखेनें हातीं घेतलेल्या प्रश्नांवरून दिसून येईल.
बारमाही पाणीपुरवठ्याच्या पद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता सतत कायम राखण्यास काय केलें पाहिजे? बारमाही पाणीपुरवठ्याच्या पद्धतीमध्यें पिकाची कोणती परंपरा स्वीकारली पाहिजे म्हणजे जमीन कांहीं काळ ओसाड टाकण्याची जरूरी राहणार नाहीं? नव्या प्रकारच्या



बारमाही कालव्याचें पाणी मिळणाऱ्या जमिनीमध्यें कापूस, गहूं, ज्वारी इत्यादि पिके खरीप पिके म्हणून दरवर्षी काढू लागल्यास जमिनीची सुपीकता कमी होते व कालर क्षार पृष्ठभागावर जमत जातात असा कटु अनुभव नाईल नदीच्या पाण्यावर होणाऱ्या पिकांसंबंधी इजिप्तमध्यें आलेला होता. त्यावर उपाय म्हणून तेथे पिकाची एक परंपरा शोधून काढण्यांत आली, ती म्हणजे खरिपाचें पीक काढून घेतल्यावर हिंवाळ्यांत रबीचें पीक म्हणून बरसीम नांवाच्या गवताचें पीक पाटाचे पाण्यावर करावयाचें. या गवतावर गुरें फार चांगली पोसली जातात. यामुळे शेतकऱ्यांना गुरें बाळगणें फार सोयीचें व स्वस्ताईचें होतें व शेतीला हा गुराढोरांचा व गवळ्याचा किफायतशीर असा दुय्यम धंदा होतो. शिवाय शेतीला उत्तम खत बिनखर्चानें मिळतें. बरसीम या गवतामध्यें विलक्षण गुण आहेत. हें गवत हवेंतून नायट्रोजन वायू घेऊन जमिनीमध्ये साठवितें. म्हणजे जमिनीला व खरीप पिकांना लागणारा नायट्रोजन आपोआप बिनखर्चानें मिळतो. शिवाय बरसीम गवताचीं मुळें फार तंतुमय असतात. या मुळांमुळे जमीन घट्ट गोळा न बनतां सछिद्र व खुली राहते व या योगानें पाटाचें पाणी जमिनीमध्यें मुरून रहात नाहीं. शिवाय बरसीम गवताला खूप पाणी लागत असल्यामुळे जमिनींतील क्षार खाली खोल लोटले जातात व क्षार पृष्ठभागावर येण्याचा अर्थात् कालर अनर्थाचा उत्तम प्रतिबंध होतो.
सक्रंद येथील कृषिप्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून असें ठरविण्यांत आले आहे की, ईजिप्तमधील पद्धति सिंध प्रांतांतील शेतलागवडीस अत्यंत उपयागी व फायदेशीर आहे. तदनुरूप शेतकरी करू लागले आहेत व त्यांना पिकांची परंपरा पसंत पडली व पडत चालली आहे. वरील वर्णनावरून सक्रंदच्या प्रयोगशाळांमधून कशा प्रकारचें व किती महत्त्वाचें संशोधनकार्य चालू आहे याची बरीच चांगली कल्पना वाचकांस येईल अशी आशा आहे.
सर्व प्रयोगशाळा पाहून झाल्यावर आम्ही प्रयोगक्षेत्राकडे वळलो. प्रथमतः आम्हांला सक्रंद येथील तलावाच्या काठावर खोदलेल्या विहिरींतून पूर्वीची पंपाने पाणी काढण्याची व्यवस्था दाखविण्यांत आली. हल्ली प्रयोगक्षेत्राला नव्या कालव्याचे पाणी मिळण्याची सोय झाली आहे. नंतर आम्ही बहुतेक सर्व प्रयोगक्षेत्र हिंडलों. निरनिराळ्या शेतांमध्यें व लहान लहान ताटव्यांमध्ये आम्ही नाना तऱ्हेची पिके पाहिली. त्यांचें वर्णन किती करणार? ज्याप्रमाणे एखादें पदार्थसंग्रहालय किंवा एखादी विस्तीर्ण बाग पहाण्यास गेलें म्हणजे काय पाहूं व काय न पाहूं असें प्रवाशास होतें व सिनेमांतील चलच्चित्रपटाच्या गतीनें नानाविध पदार्थ व नाना जातीच्या वृक्षवेली यांचे ओझरतें दर्शन घेत पदार्थसंग्रहालयाचें व बागेचें दृश्यदर्शन संपवावें लागतें त्याप्रमाणें या प्रयोगक्षेत्रामधील असंख्य पिकांवर ओझरती नजर टाकण्याखेरीज गत्यंतर नव्हते. पण या प्रयोगक्षेत्रामधील कांहीं कांहीं पिके आश्चर्यकारक वाटली.
या प्रयोगक्षेत्रामध्ये लांब धाग्याच्या कापसाच्या सिंध- अमेरिकन, सिंध- इजिप्शियन व देशी सुधार अशा तिन्ही जातींच्या कापसाच्या लागवडीची शेते आम्ही पाहिली. या कापसांच्या झाडांची वाढ पाहून मी तर थक्क झालों. जवळ जवळ छातीभर उंच अशीं हीं झाडे वाढतात! त्यांना किंचित् तांबूस रंगाचीं सतेज पाने असतात व पिवळी व पांढरीं अशीं फुलें येतात! बोंडे मोठीं व पांढऱ्या शुभ्र कापसानें भरलेलीं अशीं असतात! हीं शेतें पाहिल्याबरोबर सिंध प्रांत इजिप्तप्रमाणे लांब धाग्याच्या कापसाचे आगर बनणार ही गोष्ट पहाणाराच्या मनाला पटल्याखेरीज रहात नाहीं. सिंधची जमीन व हवापाणी या जातीच्या कापसाच्या संवर्धनास फार योग्य आहे ही गोष्ट तीं सुंदर, सतेज, सकस कापसाची झाडें पाहून माझ्या मनाला पटली.
कापसाच्या शेताप्रमाणें आम्ही एक तंबाखूचें शेत पाहिलें, तेंही आश्चर्य करण्यासारखे आहे. तंबाखूचीं झाडे जवळ जवळ पुरुषभर उंचीचीं असून त्यांचीं पाने कासाळूच्या पानाप्रमाणें विलक्षण लांबरुंद होतीं! मला वाटलें तंबाखूच्या पिकाची काय ही विलक्षण वाढ! त्या मानानें महाराष्ट्रांतील तंबाखूची झाडें व पाने किती तरी लहान व खुजी!
याप्रमाणे नानाविध पिकांची व त्यांच्या विलक्षण वाढीची पहाणी करीत आम्ही सर्व प्रयोगक्षेत्र पालथें घातलें. शेवटी येथे असलेल्या छोट्याशा वेधशाळेत आलों. तेथे, थंडी, उष्णता, पाऊस, वारा, हवेचा दाब इत्यादि सृष्टिचमत्कार मोजण्याची यंत्रें ठेवलेलीं आहेत. हीं पाहिल्यावर येथल्या सुंदर व स्वच्छ वाळूनें सुशोभित केलेल्या खुल्या अंगणांत आम्ही थोडा वेळ विश्रांति घेतली. मग प्रो. ताम्हाने यांचे बंगल्याशीं आलों व तेथे आमच्याबरोबर आलेल्या तज्ज्ञ मंडळींचा आम्ही आभारपूर्वक निरोप घेतला. आतां सायंकाळ झाल्यामुळे प्रो. ताम्हाने यांचे बंगल्यासमोरच्या सुंदर बागेंत आम्ही बसलों व भोजनाची वेळ होईपर्यंत आम्ही ताम्हाने यांचेजवळ सिंधमधील शेतकीच्या भावी स्थितीबद्दल विचारपूस करीत होतो. सक्कर धरणाच्या बारमाही पाणीपुरवठ्यानें सिंध प्रांताच्या कृषिपद्धतीमध्यें क्रांति घडून येणार व कालेकरून सिंध प्रांताची संपन्नता वाढणार यांत शंका नाहीं असें मला वाटलें. सक्करच्या धरणानें सिंधच्या शेतीमध्यें व लोकस्थितीमध्यें केवढी क्रांति झाली आहे व होऊं घातली आहे याचें दिग्दर्शन करणारा खालील उतारा देऊन हे प्रकरण संपवितों.
"Sind is at the threshold of a great fundamental change in the character of its agriculture. So far, the caprice of the Indus has governed the country like an absolute despot. For the first time in the history of Sind the Indus is to be harnessed. In future, it will serve, not rule. Hence one may rightly infer that the new system will confer unlimited benefits upon the country; for, agriculture will no longer be a gamble and the irrigation facilities will be secure and stable. But it must be remembered that perennial irrigation demands a much higher standard of intelligence and a much greater outflow of physical energy than do the present haphazard conditions. The inevitable result will be that the lazy man will soon become supplanted by his more vigorous neighbour."
सिंधप्रांताच्या पश्चिम भागांतील तीन शहरे मी एकामागून एक व लागोपाठ पाहिली व त्यांचे वर्णनही मागल्या एका प्रकरणांत केलें. त्याप्रमाणें सिंध प्रांताच्या पूर्व भागांतील मथळ्यावर निर्दिष्ट केलेलीं तीन शहरें मी माझ्या नाताळांतील प्रवासाचे अखेरीस तशींच पाहिलीं; व त्यांचें वर्णन या एकाच प्रकरणांत करण्याचा विचार आहे. यांपैकीं हैद्राबाद हे ब्रिटिशपूर्व अमदानीतील प्रांताच्या राजधानीचे शहर होतें; मिरपुरखास हे नवें शहर थर व पारकर नांवाच्या सिंधप्रांताच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) टोंकाला असलेल्या जिल्ह्याचें मुख्य शहर आहे. तर उमरकोट हे त्या जिल्ह्यांतील तालुक्याचें मुख्य गांव आहे. उमरकोट हे गांव सिंधप्रांताच्या पूर्वहद्दीवर आहे. येथपर्यंतच सिंधमधील नव्या जुन्या कालव्यांची सीमा आहे. थर व पारकर जिल्ह्याचा पुढील सर्व भाग उजाड वाळवंटाचा आहे. फक्त उजाड वाळवंटामध्यें हिरवीगार शेत जमीन (oasis in a desert) या म्हणीप्रमाणे नगरपारकर नांवाचें सुंदर बागायती गांव सिंध प्रांतांच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व ) सरहद्दीवर आहे. या गांवाला जायला उंटाच्या वाहनाखेरीज दुसरें साधन नाहीं; सिंधप्रांतांत असून त्याचें दळणवळण सिंधप्रांताशीं कमीच आहे. पण पालनपूर या संस्थानी गांवाहून नगरपारकरला दररोज मोटारची रहदारी चालू आहे. सिंध प्रांतांतील नगरपारकर ही वाळवंटांतील बाग वाळवंटाच्या गलबतांमधून जाऊन (उंटावरून प्रवास करून) पहावी असें माझ्या मनांत आलें. पण काळाच्या अभावी तो बेत मनचे मांडे झाला. पण जेवढे प्रत्यक्ष पाहिलें तेवढ्याच्या वर्णनास लागणें बरें.
कराची व हैदराबाद हीं सिंधप्रांतांतील सर्वांत मोठी शहरें होत. कराची व हैदराबाद यांचा संबंध मुंबई इलाख्यांतील मुंबई व पुणे किंवा लंका बेटांतील कोलंबो व कँडी या शहरांसारखा आहे. या तीन दुकली मधील पहिलीं शहरें समुद्रकाठचीं मोठीं बंदरें आहेत; तर दुसरीं शहरें समुद्रसपाटीपासून थोड्याफार उंचीच्या जमिनीच्या भागावर असून समुद्रापासून शेंपाऊणशे मैल आंत आहेत. पहिलीं ब्रिटिश अमदानीमध्यें उदयास येऊन राजधानी पदाप्रत पावलीं आहेत; तर दुसरीं ब्रिटिशपूर्व अमदानीतील राजधानीपदापासून च्युत झालेलीं आहेत; पहिलीं व्यापाराचीं व उद्योगधंद्याचीं केन्द्रे बनलीं आहेत; तर दुसरी खानदानीच्या व सुखवस्तू लोकांचीं वसतीस्थानें बनली आहेत; पहिलीं अर्वाचीन पद्धतीच्या इमारतींनीं व दुकानांनी नटलेलीं आहेत; तर दुसरीं पूर्वसंस्कृतीचें स्मरण देणाऱ्या वाड्यांनीं व बागांनीं सुशोभित झालेलीं आहेत; पहिलीं पाश्चिमात्य विद्येचीं आगरें बनली आहेत; तर दुसरीं जुन्यानव्या संस्कृतीच्या मिलाफाचीं स्थानें बनलीं आहेत; सारांश या तीन प्रांतांतील शहरांच्या दुकली पहाणाऱ्या प्रवाशाला त्या दुकलींमधील विरोध विस्मयकारक वाटल्याखेरीज रहात नाहीं. असो.
कराचीपासून हैदराबाद रेल्वेमार्गानें १११ मैल दूर आहे. सिंधप्रांतांत जलमार्गानें गेलें तर प्रवाशी प्रथम कराची बंदरीं जातो; पण आगगाडीनें त्या प्रांताचा प्रवास केल्यास आधी हैदराबाद शहर लागतें व मुंबईकडून जाणाऱ्या माणसाला हैदराबाद स्टेशनवर आगगाडी बदलावी लागते. कारण अहमदाबाद ते हैदराबाद हा आगगाडीचा रस्ता मिटरगेजचा आहे व सिंघप्रांतांतील मुख्य आगगाडीचा रस्ता ब्रॉडगेजचा आहे.
प्रथम प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें मीं सिंधप्रांतांत चार पांच वेळ व निरनिराळ्या मार्गानें गेल्यामुळे हैदराबाद शहर जातां येतां दोन तीनदां पाहिलेलें आहे. मात्र ज्या सन १९३५ च्या नाताळांतील प्रवासवर्णन या पुस्तकांत केलें आहें व करीत आहे त्या प्रवासक्रमानुरूप मागच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे आम्ही सक्रंद स्टेशनहून रात्री नऊ वाजतां निघालों तों नबाबशाह स्टेशनला दहा वाजतां पोहोंचलों व हैदराबाद स्टेशनला ता. ३० रोजी रात्रीं दोन वाजतां आलों. सक्रंदहून हैदराबाद ८५ मैल आहे. दोन्हीं शहरें सिंधू तीराचे पूर्वेस असल्यामुळे सिंधूवरील पूल लागत नाहीं. अशा अपरात्री आमचें ठरलेलें उतरावयाचें ठिकाण सांपडणें दुरापास्त; शिवाय आमच्या मित्रांना व त्याचे मंडळींना अपरात्रींच्या अमानुष वेळेला (unearthly hour) उठवून त्रास देणें बरोबर नाहीं हें जाणून आम्हीं हमालाचे डोक्यावर सामान देऊन एखाया मुशाफरखान्याकडे घेऊन चल अस त्याला सांगितलें. त्यानें स्टेशनच्या नजीक असलेल्या एका चहाच्या दुकानाशीं आणलें. आम्हांला आश्चर्य वाटलें. पण येथेंच मुशाफरखाना आहे असें हमाल म्हणाला व चहाच्या दुकानाला एक लांबच लांब सोपा असून तो सर्व सोपा मुलांच्या वसतीगृहाच्या निद्रागृहा (dormitory) प्रमाणे खाटाच खाटांनी भरलेला व त्या प्रत्येक खाटेवर एक एक माणूस निजलेला दिसला. ह्या सर्व घोळक्यांत कसें व कोठें उतरावयाचें अशा पंचाईतींत आम्हीं पडलों व तेथल्या व्यवस्थापकाला निराळी स्वतंत्र खोली नाहीं काय म्हणून आम्हीं विचारलें. आम्ही दूर देशाचे असून अशा धर्मशाळेवजा खुल्या व दाटीच्या झोंपण्याच्या व्यवस्थेला अनभ्यस्त आहोंत असें जाणून दोन खाटा राहाणाऱ्या एका खोलीवजा निराळ्या जागेत त्यानें आमची सोय केली. थंडी खूच वाजत होती. म्हणून आम्ही खाटेवर आमच्या पथाऱ्या पसरून खूब गरम गरम पांघरुण अंगावर घेऊन सकाळी सहापर्यंत स्वस्थपणें निजलों व दिवसाच्या श्रमानें रात्रीच्या प्रवासाच्या त्रासाने शरीराला विश्रांतीची खरी जरूरी असल्यामुळे आम्हांला चार तास स्वस्थ झोप लागली व आम्ही सकाळीं सहा वाजतां ताजेतवाने होऊन जागे झालों व मग लगेच टांगा करून रा. गुर्जर इंजिनियर यांचे बंगल्यावर गेलों.
हैदराबादचें आमचें सर्व दृश्यदर्शन मोटारकारने व अमेरिकन झटपट पद्धतीनें झालें. पण तें करण्यापूर्वी या शहराची पूर्वपीठिका व सामान्य रचना याची थोडक्यांत वाचकांना कल्पना दिल्यास वावगे होणार नाहीं.
या शहराची पूर्वपीठिका फार दूरवर जात नाहीं. मात्र हल्लींचें हैदराबाद ज्या ठिकाणीं वसविण्यांत आलें त्या ठिकाणी बऱ्याच जुन्या काळीं एक किल्ला होता व त्याला निरून किल्ला असें नांव होतें. आरबस्थानांतून येऊन सिंधप्रांतावर स्वारी करणारा विजेता महमद बिन कासिम यानें निरून किल्ला सन ७१० मध्ये काबीज केला असा उल्लेख आहे. पण पुढें हजार वर्षेपर्यंत हे ठिकाण अप्रसिद्ध व नगररहितच होतें.
हैदराबाद शहर स्थापन करण्याचा मान दाऊद पोत्रा नांवाच्या घराण्यापैकी काल्होरा शाखेतील गुलामशहा काल्होरा या नबाबास आहे. या शाखेचा हा शेवटचा नबाब होता. याच्याच कारकीर्दीमध्यें अफगाणीस्थानचे प्रख्यात विजेते नादीरशहा व अहमदशाह यांनी सिंधप्रांतावर व हिंदुस्थानावर वारंवार स्वाऱ्या केल्या. लव्हाळ्याप्रमाणें गुलामशहा काल्होरा याला या विजेत्यापुढे नेमावें लागे. पण गुलामशहा काल्होरा हा मोठा कर्तबगार नबाब होता व त्यानें सर्व सिंध आपल्या ताब्यांत आणला. त्याची सिंधवरील खरी सत्ता व अधिकार ओळखून अहमदशहा दुराणी यानें शहावर्दीखान असा नवा किताब देऊन गुलामशहा काल्होरा याला सिंधप्रांतावर सर्वाधिकारी म्हणून नेमिलें व गुलामशहानें अहमदशहास वार्षिक खंडणी द्यावी असें ठरलें.
ही गोष्ट सन १७६२ मध्यें घडली. तेव्हांपासून गुलामशहा काल्होरा याचा सर्व सिंधवर सुरळीत अंमल चालू झाला. यानें सिंधूच्या मुखाशीं शहा बंदर नांवाचें नवें बंदर तयार केलें. यानेंच ईस्ट इंडिया कंपनीला सवलती कबूल करून ठठ्ठा येथे फॅक्टरी बांधण्यास परवानगी दिली. सबंध सिंध प्रांताच्या दृष्टीनें ठठ्ठा हें राजधानीचे शहर फार टोंकाला व गैरसोयीचें आहे असें जाणून गुलामशहा काल्होरा यानें नवीन राजधानी करिता जुनें निरूनकोट हे ठिकाण पसंत केलें व तेथें सन १७६८ मध्ये किल्ला व शहर वसविलें व त्याचें हैदराबाद असें नांव ठेवलें. गुलामशहा काल्होरा हा शहरस्थापनेनंतर चारच वर्षे जगला. पण त्यानें राजधानीकरितां पसंत केलेले ठिकाण योग्य असल्यामुळे तेव्हांपासून हैदराबाद शहराची सारखी भरभराट होत गेली व ती सर्व मुसलमान हिंदू कारकीर्दीमध्यें चालू राहिली. ब्रिटिश अमलापासून कराचीला जास्त महत्त्व आलें व त्या शहराला राजधानीचा मान मिळाला खरा. तरीपण हैदराबाद दुय्यम राजधानीचे शहर व सिंधी संस्कृतीचें केन्द्र म्हणून त्याचें महत्त्व कमी झालें नाहीं व हल्लीं सुद्धां कराची व हैदराबाद हीं शहरचें सिंधप्रांताचीं मुख्य व महत्त्वाची ठिकाणे आहेत व मुंबई इलाख्याच्या पुण्यामुंबईप्रमाणें त्यांचा संबंध सिंध स्वतंत्र झाल्यावर सुद्धां राहील असें दिसतें. ही झाली हैदराबादची पूर्वपीठिका. आतां त्याच्या रचनेकडे व सामान्य स्वरूपाकडे नजर टाकू या.
हैदराबाद शहर सिंधू नदीच्या पूर्वेस सुमारें पांच मैलांवर बसलेलें आहे. शहाराचा मुख्य मूळचा भाग हा एका टेकडीच्या रांगेच्या पठारावर वसविलेला आहे. ही टेकड्यांची रांग दक्षिणोत्तर आहे.
या टेकडीच्या एका एकाकी खडकासारख्या टोकावर हैदराबादचा किल्ला बांधलेला आहे. जसजशी वस्ती वाढत चालली तसतशी ती टेकडीच्या पायथ्याच्या सपाटीवर व किल्ल्याच्या खालच्या बाजूस वाढत चालली व ब्रिटिश अमदानींत रेल्वेरस्ता झाल्यानें या खालच्या भागांत अधिकच वस्ती वाढून नवी बाजारपेठही भरभराटली. विलाययेस जाऊन आलेल्या लोकांस मी देणार असलेली उपमा मोठ्या गोष्टीची लहान गोष्टीशीं तुलना करण्यासारखी उपहासास्पद वाटेल; पण हैदराबाद शहराची रचना थेट स्कॉटलंडांतील एडिंबरो शहरासारखी आहे. एडिंबरोमध्यें इतिहासप्रसिद्ध किल्ला आहे; तसा हैदराबादमध्यें आहे; एडिंबरोमध्यें जुनें शहर टेकडीवर वसलेलें आहे तसेंच जुनें हैदराबाद आहे. एडिंबरोची नवी वस्ती सखल व सपाट जागेवर झाली आहे; हैदराबादच्या नव्या वस्तीची जागा तशीच आहे. सारांश, भौगोलिक दृष्ट्या या दोन शहरांमध्यें पुष्कळ साम्य आहे. बाकीं स्वछता, विचित्रता (picturesqueness) भव्यता व संपन्नता वगैरे बाबतीत या दोन शहरांमध्यें जमीनअस्मानचें अंतर आहे. तेव्हां एडिंबरो शहराची हैदराबादशीं तुलना केल्यास सकृत्दर्शनीं कोठें इंद्राचा ऐरावत व कोठें शामभटाची तट्टाणी असे उद्गार तोंडावाटे बाहेर येतील. पण या दोन शहरांमध्ये भौगोलिक दृष्ट्या व शहररचना दृष्ट्या पुष्कळच साम्य आहे यांत शंका नाहीं. हैदराबाद शहर अतिशय दाट वस्तीचें शहर आहे व उंच व सखल असे दोन भाग सोडले म्हणजे त्याचा विस्तारही फारसा नाहीं. या शहराची वस्ती पाऊण लाखाचे वरच आहे.
मागें सांगितलेच आहे कीं, नाताळामध्यें आम्हीं हैदराबादचे दृश्यदर्शन अमेरिकन पद्धतीनें मोटारकारद्वारां केलें. बाकी मी हैदराबाद पूर्वी एक दोनदां पाहिलें असल्यामुळे पायीपायींही शहराचा पुष्कळ भाग मी पाहिलेला आहे. जुनें शहर टेकड्यांच्या रांगेवर वसलेलें असल्यामुळें व नवी वस्ती सखल व सपाटीवर झालेली असल्यामुळे या शहरामध्यें टेकड्या वरच्या भागामध्यें दक्षिणोत्तर जाणारा असा एक लांबच लांब रस्ता आहे; तसेंच नव्या सपाट व सखल भागांतही तसाच एक रस्ता आहे व या दोन सरासरी समांतर जाणाऱ्या रस्त्यांना जोडणारे छोटेछोटे व उताराचे रस्ते कितीतरी आहेत. त्यांना उतारी रस्ते (Inclines) म्हणतात. या छोट्या उतारी रस्त्यांची मला मोठी मौज वाटली. खालून वर जाऊं लागलें म्हणजे वरच्या इमारतीची उंचच्या उंच रांग मोठी, भव्य व विचित्र (picturesque) दिसे तर वरून खालीं येऊं लागलें म्हणजे याला उलट भास होई. हैदराबादचा किल्ला या सखल सपाट वस्तीमधील दक्षिणोत्तर रस्त्याला अगदी लागूनच आहे. सध्यां या किल्ल्यामध्यें म्युनिसिपालिटीच्या पाणी सांठविण्याच्या मोठमोठ्या टाक्यांखेरीज पहाण्यासारखें कांहींएक नाहीं. म्हणून मी हा किल्ला पहाण्याच्या फंदांत कधींच पडलों नाहीं. किल्ला फारच लहान आहे. त्याचे आंत फक्त ३६


ज्याप्रमाणें ह्रीं कबरस्थानें मी एका खेपेला पायीपायी पाहिलीं होतीं त्याप्रमाणें मी दुसऱ्या एका खेपेला टांग्यानें हैदराबाद शहरांतील विजेच्या दिव्यांना वीज पुरविणारा कारखाना पहाण्यास गेलों होतों. हा कारखाना शहराबाहेर फुलेली नावाच्या कालव्याच्या कांठावर आहे. विजेच्या कारखान्याला लागणारें पाणी कालव्यांतून पंपानें घेतलें असून त्यांच्याकरितां मोठें टाकें बांधलें आहे. येथून फुलेली कालव्याचा प्रेक्षणीय देखावा दिसतो. हैदराबाद शहराला वीज पुरविणारा कारखाना बराच मोठा आहे. या कारखान्याचे मुख्य चालक भिसे नांवाचे कायस्थ प्रभू जातीचे महाराष्ट्रीयन गृहस्थ आहेत. ते चार पांच भाऊ असून सर्वजण विजेच्या उद्योगधंद्यांत प्रवीण असून निरनिराळ्या ठिकाणचे कारखाने चालवीत आहेत हे ऐकून मला या महाराष्ट्रीयन बंधूंच्या कर्तबगारीचें कौतुक वाटलें.
पायीपायी किंवा टांग्यानें एखाद्या शहराचे दृश्यदर्शन करणें हें काम बऱ्याच कालक्षेपाचें व त्रासाचें आहे यांत शंका नाहीं. मोटार कारच्या जलद व सुखद साधनाच्या योगानें शहराचा व शहराबाहेरचा कितीतरी भाग एकदम व लीलेनें पहातां येतो. नाताळांतील आमच्या दृश्यदर्शनाची गोष्ट ध्याना. आम्हीं रा. गुर्जर यांचे मोटारींतून आडीच- तीन तासांत सर्व हैदराबाद शहर व कोट्री शहर व सिंधूचा पूल हीं सर्व पाहिलीं. प्रथम आम्हीं जुन्या शहराच्या बाजारपेठेमधून जाऊन कबरस्थानांवर व कबरीवर ओझरती नजर टाकून मग शहराच्या सखल भागांतून शहराबाहेर आलों व फुलेली कालवा वलांडून हैदराबाद कॉलेजच्या ठिकाणीं आलों. हैदराबाद कॉलेज व त्याच्या इमारती फारशा मनांत भरण्यासारख्या नाहीत; पण कॉलेजाच्या आवारांत फुलेली कालव्याला लागून छोटिशा बाग आहे. ती मला फार आवडली. येथें आम्ही थोडा वेळ थांबलो. येथून फुलेली कालव्याचा सुंदर देखावा दिसत हाता. शिवाय कालव्याच्या पलीकडे उंचवट्यावर हैदराबाद शहराची दाट वस्ती दिसत होती. येथून हैदराबाद शहर म्हणजे एक घरांचें दाट जंगल आहे असा भास होतो. हैदराबादच्या घरांचा एक विशेष तर प्रथम पहाणाराला फारच आश्चर्यकारक वाटतो. हैदराबाद शहर हें समुद्रतीरापासून पुष्कळच आंत असल्यामुळे येथें उन्हाळा फार होतो व दाट वस्तीच्या शहरांत वारा मिळणे कठीण पडते; म्हणून येथल्या प्रत्येक घरांच्या धाब्यावर अगर गच्चीवर (येथलीं बहुतेक घरें बिनछपरीं धाब्याचीं व गच्चीचीं असतात.) एक लाकडी चौकोनी पांचसहा फूट उंचीची पेटी असते व तिला वाऱ्याच्या दिशेला खुलें तोंड असतें. या साध्या व सोप्या साधनानें घरांतील तळमजल्यापर्यंत वरचा वारा पोहोचू शकतों. आगबोटीमध्यें खालच्या मजल्यास हवा मिळण्याकरितां जशीं वाटोळीं फनेल्स असतात त्याप्रमाणें हैदराबादेतील प्रत्येक घराला ही साध्या व सोप्या फनेलची सोय केलेली असते. सिंधीभाषेमध्यें या फनेलला मंघ म्हणतात. ही मंघवती गृहें किती विलक्षण व अपूर्व वाटतात! जणू कांहीं प्रत्येक घर हवा खाण्याकरितां आ पसरून बसलें आहे असें वाटतें.
याप्रमाणे हैदराबाद शहराचा दुरूनचा देखावा आम्हीं थोडा वेळ पाहिला व त्या देखाव्याची राहून राहून आठवण करीत व त्याची मनांतल्या मनांत वाखाणणी करीत आम्हीं कॉलेजच्या बागेतून बाहेर आलों व मग मोटारींतून कोट्री गांवाच्या रस्त्यानें सिंधूनदीच्या प्रचंड लोखंडी पुलाशी आलो. सक्कर-रोहरी येथला सिंधुनदीवरील पूल आम्ही नुकतांच पाहिला होता. दोन्ही पुलांची लांबी, प्रचंडपणा, बोगद्यासारखें खालीवर व दोन्ही बाजूस पसरलेली लोखंडी बहालें, खांब व पट्ट्या यांचें हजारों खिळ्यांनीं जखडून केलेलें जाळें या बाबतीत विलक्षण साम्य आहे खरें; पण दोन्ही पुलांमध्यें पुष्कळ बाबतींत तितकाच विलक्षण फरक आहे असें दिसून आलें. आधी सक्कर- रोहरी येथील सिंधुनदीवरील पूल दोन निरनिराळ्या विभागां मिळून झालेला आहे; कारण नदीमधील बक्कर बेटाच्या खडकाळ व घट्ट जमिनीचा फायदा घेतलेला आहे, व एक विभाग सबंध लोखंडी व दुसरा विभाग लोखंडी दगडी आहे. काट्री येथें सिंधुनदीवर एकच सलग व एकजात लोखंडी दगडी पूल आहे. सक्कररोहरीचा पूल नदीकाठच्या टेकड्या फोडून बांधलेला आहे तरी तो नदीच्या पात्रापासून पुष्कळच उंच आहे. कोट्री येथील पूल जमीन सपाट असून नदीच्या पात्रापासून फारसा उंच नाहीं; सक्कर- रोहरीच्या रेलवे पुलावरूनच गाड्या-मोटारी जाण्याची सोय केलेली आहे व दोन्ही बाजूंना फक्त पादचारी लोकांकरितां ग्यालरीची पायवाट केलेली आहे, कोट्री येथील रेलवेरस्त्याच्या दोन्ही बाजूंस जावयाचे व यावयाचे असे नवेच गाडीमोटारकरितां रुंद रस्ते केले आहेत. याप्रमाणें सिंधप्रांतांतील सिंधुनदीवरील या दोन पुलांमधील साम्यवैषम्य दोन्ही पूल पहाणाराच्या ध्यानांत आल्यावांचून राहत नाहीं. बाकी सिंधप्रांतामधले सिंधुनदीवरील हे दोन पूल एकंदरीत मोठे भव्य व अजस्त्र वाटतात यांत शंका नाहीं. आम्हीं सावकाश पूल वलांडून कोट्री गांवांत आलों व गांवांतल्या बाजारपेठेतून जाऊन शहराला वळसा घातला. कोट्री गांवही बरेंच मोठें आहे असे दिसून आलें. तें शहरही दाट वस्तीचेच शहर आहे असें वाटतें. हैदराबादच्या जवळून फुलेली नांवाचा मोठा नदीसारखा कालवा बारमाही वहात असल्यामुळे हैदराबाद शहराच्या आसपास पुष्कळ सदापिकी शेती (Intensive cultivation) व बागा आहेत. यामुळें मोटारींतून जातांना भूमिभाग हिरवा हिरवागार व म्हणूनच नयनमनोहर दिसतो. अशा प्रकारची चित्ताकर्षक सृष्टिशोभा पहात पहात आम्हीं हैदराबाद शहराच्या म्युनिसिपल बागेत आलों. तेथून दिसणारें सिंधूनदीच विस्तीर्ण पात्र आश्चर्यकारक वाटलें.
याप्रमाणें दोन तीन तासांच्या मोटारकार सहलीमध्यें आम्ही हैदराबादचे आमचें दृश्यदर्शन संपविलें व गुर्जर यांचे बंगल्यांत आलों. मग दोन तीन तास विश्रांतींत व संभाषणांत घालविले. सायंकाळीं पांच वाजतां आम्हीं स्टेशनवर आलों व अमदाबादच्या आगमाडीत बसलों. माझे बंधू तडक मुंबईस गेले व सायंकाळी सात वाजतां मी मिरपुरखास या स्टेशनला उतरलों. रावसाहेब गोरे एंजिनियर यांचेकडे मला जावयाचें होतें. स्टेशनवर त्यांच्या वतीनें माझ्या जुन्या ओळखीचे गृहस्थ मला नेण्यास आले होते. त्यांची आकस्मिकपणें गांठ पडल्यामुळे मला आनंद झाला व मी त्यांचेबरोबर गोरे यांचे बंगल्यावर आलो. माझी व गोरे यांची जरी प्रत्यक्ष गांठ झालेली नव्हती तरी माझा डॉक्टर मुलगा वसंतराव व गोरे मंडळीं हीं कराचीस एकाच वाड्यांत रहात असत व यामुळे माझी त्यांना पूर्णपणे माहिती आहे असें दिसले. यामुळे मला परक्या ठिकाणी आल्यासारखें वाटलें नाहीं. मी मिरपुरखासला तीन दिवस राहिलों; तेव्हां माझ्या दृश्यदर्शनाची पुढील हकीकत रोजनिशीवार देणेच सोयीचे होईल.
ता. ३१ डिसेंबर सन १९३५ मंगळवार आम्हीं न्याहारीनंतर मिरपुरखासपासून चार पांच मैलांवर असलेल्या बौद्धकालीन स्तूपाचे व विहाराच्या अवशेषांचें ठिकाण पाहून आलों. त्याचें वर्णन प्रकरण चारमध्ये अन्तर्भूत झाले आहे. तरी येथें पुनरुक्ति करण्याचें कारण नाहीं. रोजनिशीच्या नोंदीकरितांच फक्त त्याचा येथें उल्लेख केला आहे. तिसऱ्या प्रहरच्या चहानंतर आम्हीं मिरपुरखासमधील सरकारी वृक्षसंवर्धन बाग (Harticultural garden) पाहण्यास चालत गेलों व म्हणून मिरपुरखास सहज पाहतां आलें. हें गांव अगदीं अर्वाचीन आहे. येथून. चार मैलांवर मिरपूर म्हणून एक जुनें खेडें आहे. जेव्हां हैदराबाद ते अमदाबाद हा मिटरगेजचा रेलवेरस्ता बांधण्यांत आला तेव्हां रेलवेरस्त्यावरील एक स्टेशन येथें करण्यांत आलें. त्यामुळें येथें वस्ती, दुकानें व व्यापार वाढला व या गांवास मिरपुरखास असें नांव पडलें. रेलवेच्या वाढत्या दळणवळणानें गांव सारखें वाढतच गेलें. थर व पारकर या जिल्ह्याचें जुनें मुख्य शहर उमरकोट हें रेल्वेरस्त्यापासून पन्नास मैल दूर राहिल्यामुळे व उमरकोटचा गाडीरस्ताही चांगला नसल्यामुळें उमरकोट येथून जिल्ह्याच्या कचेऱ्या, कोर्टें व पाणीपुरवठ्याच्या खात्याच्या कचेऱ्या मिरपुरखास येथे आणण्यांत आल्या. यामुळें मिरपुरखासचें महत्त्व जास्तच वाढलें व गांवाचें मोठें जिल्हाचें मुख्य शहर बनलें. पण शहर अगदी नव्या व रेल्वेच्या सोयीमुळे मोठेपणाचा मान मिळालेलें आहे इतकेंच. येथें ऐतिहासिक किंवा कलाविषयक प्रेक्षणीय स्थळें नाहींतच. एक नवी मोठी मशीद मात्र पाहण्यासारखी वाटली. याप्रमाणें यदृच्छया शहराचें निरक्षिण करीत आम्हीं सरकारी बागेंत गेलों. ज्याप्रमाणें सक्रंद येथें सर्व प्रकारच्या धान्यपिकांचे व पैसा पैदाशीच्या पिकांचे (money crops) प्रयोग व संशोधन चालू आहे त्याप्रमाणें या बागेंत नाना जातीच्या फळझाडांबद्दल प्रयोग व संशोधन चालू आहे असें मला दिसून आलें. तेथें प्रयोगादाखल द्राक्षाचे मळे केले आहेत; निरनिराळ्या ठिकाणच्या कलमी आंब्यांची आंबराई केली आहे; मोसंबी, नारिंगें, लिंबें, पपनस, महाळुंगे इत्यादि आंबट, गोड फळझाडांची लागवड केली आहे. नारळी, केळी, पोफळी इत्यादि पुष्कळ व सारखे पाणी लागणारी झाडे तयार केली आहेत. अर्थात् नानाप्रकारच्या वृक्षसंवर्धनाचा मुख्य उद्देश हा आहे कीं, सिंधप्रांतांतील जमिनीला, हवापाण्याला नव्या आलेल्या बारमाही कालव्याच्या मदतीनें कोणत्या प्रकारचीं फळझाडें चांगलीं वाढू शकतात.
याप्रमाणें नानाप्रकारचीं झाडे व त्यांची लागवड मी येथें पाहिली. सिंध प्रांताच्या शेतकीसुधारणेला अशा प्रकारच्या वृक्षसंवर्धनबागांची जरूर आहे हे उघड आहे.
ता. १ जानेवारी सन १९३६ आज इंग्रजी वर्षाचा पाडवा किंवा पहिला दिवस होता. दरवर्षी असे दिवस येतात व जातात. पण माझ्या आयुष्यांतील चिरस्मरणीय असे दिवस यांची मला आज आठवण झाली. सन १९३० सालच्या नव्या वर्षाच्या दिवशीं मी विलायतेस लंडन शहरांत होतों व तेथें मिसेस बॉट या इंग्रजबाईच्या येथें मी व माझा मुलगा मनोहर मिळून आम्हीं हा सणाचा दिवस मोठ्या मजेनें घालविला होता. त्या आनंददायी दिवसाचें स्मरण होऊन विलायतेंतील माझ्या सव अनुभवांचें चित्र माझ्या स्मृतिपटलावर उभे राहिलें व मला पुनरानंद वाटला. सन १९३४ च्या १ जानेवारी रोजी मी कोडैकनाल या सुंदर व निसर्गरमणीय शीतल निवासस्थानीं एका बंगल्यामध्ये होतों. त्या प्रवासाचे प्रसंगी मी एकटाच होतों खरा. तरी पण कोडैकनालला जातांना एक सीरीयन क्रिसचन जातीचे एंजिनियर मला भेटले होते व समान शीलं व्यसनेषु सख्यं या नात्यानें आम्हां दोघांचा तेथला निवास सुखाचा झाला. त्या दिवशींच्या माझ्या अनुभवाचें व तेथल्या सृष्टिसौंदर्याचें चित्र माझ्या स्मृतिपटलावर उभे राहिलें व मला कोडैकनाल पुन्हः पहात आहे की काय असा भास झाला. असो.
मिरपुरखासला उतरण्यांत व तेथें एक दोन दिवस थांबण्यांत माझा उद्देश अकबर बादशहाचे जन्मस्थान उमरकोट हे पहावें असा होता. मिरपुरखासहून हल्लीं मोटरची रहदारी सुरू झाली आहे तेव्हां सकाळीं निघून सायंकाळला उमरकोट पाहून परत येतां येईल असे मला कळलें होतं. त्याप्रमाणें मी जाऊन येण्याचा मनाशी बेत केला होता. पण वर सांगितल्याप्रमाणें गोरे यांची मंडळी माझ्या मुलाच्या घरोब्याची निघाल्यामुळें उमरकोट येथे जाऊन येण्याचा माझा प्रवास एकाकी व केवळ कामाचा न होतां तो प्रवास चिरस्मरणीय झाला. कारण रावसाहेब गोरे यांनीं व त्यांच्या मुलांमाणसांनीं इंग्रजी वर्षाच्या पाडव्याचा सण साजरा करण्याकरितां स्वतःच्या मोटारीनें जाऊन सर्व मंडळींनी मिळून उमरकोटचें सुखपर्यटन (pleasure excursion) करावयाचें व तेथें वनभोजन नव्हें पण उपवनोपहार (picnic) करावयाचा असा बेत केला व रा. गोरे यांनी नव्या वर्षाच्या दिवशीं सकाळीं मला 'सुप्रभात' (good morning) करतांना तो बेत सांगितला. 'देवाजवळ मागावा एक डोळा व त्यानें द्यावे दोन डोळे' अशा प्रकारचा मला आनंद झाला. सौ. गोरेबाईंनीं केळीची पानें, फळफळावळ व खूपसें फराळाचें सामान बरोबर घेतलें व आम्हीं न्याहारी (breackfast) करून साडेआठ वाजतां मोठ्या प्रमुदित मनानें आमच्या सुखपर्यटनाकरिता बंगल्याबाहेर पडलो.
मिरपुरखास गांव टाकून आम्ही चार मैल आलों नाहीं तोंच मिरपुर गांव आलें. आमचा रस्ता थेट गांवाच्या मधूनच गेला होता. घरें पांढऱ्या मातीचीं व कच्च्या विटांचीं दिसली. गांवाला संरक्षक भिंत व गांवकुसू असावें असें वाटलें. हें गांव टाकल्यावर लवकरच आम्हांला जामराव कालवा लागला. नदीसारखा तो कालवा दुथडी भरून चालला होता. रावसाहेब गोरे हे जामराव कालव्यावरील अधिकारी होते. त्यांनी सांगितले "कालव्याच्या व त्याच्या असंख्य शाखांच्या दुरुस्तीकरितां वर्षांतून दोनदां मार्च व दिजंबर या महिन्यामध्यें सर्व कालवे बंद ठेवतात. हा व आसपासचे कालवे नाताळांत बंद होतात. ते सर्व नव्या वर्षाच्या आदले रात्रीं खुले करतात. त्याप्रमाणें आतां सर्व कालवे व त्यांच्या शाखा तुडुंब वहात असलेल्या आपल्याला वाटोवाट दिसतील." त्याप्रमाणेंच आम्हांला अनुभव आला. आम्हांला वाटोवाट कालव्यांचे पाट व शाखा दृष्टीस पडल्या. सर्व प्रदेशभर कालव्याचें जणूं कांहीं जाळेच पसरलें आहे असा भास होत होता. यामुळे जिकडे तिकडे हिरवीगार पिके दृष्टीस पडत होती. पहिल्या पंधरावीस मैलांचा रस्ता बऱ्यापैकी होता. पण पुढे खांचखळग्यांचा रस्ता लागला. कांहीं ठिकाणी रस्त्यावर गवत टाकलेले दिसलें; तर कांहीं ठिकाणी रस्त्याच्या बाजूनें वहात जाणाऱ्या कालव्यामधून रस्त्यावर पाणी टाकण्याचे काम चालू होतें. कालव्याचें पाणी नियमितपणे शेतांना देण्याकरितां पाणीपुरवठाखात्याचीं माणसें सर्व कालव्याच्या भागांत असल्यामुळे व सर्वत्र मुबलक पाणी मिळण्याची सोय असल्यामुळें मैलचे मैल पाण्याने शिंपण्याची सिंधमधील व्यवस्था मला नवलाची वाटली. बाकी या भागांत धूळ मात्र फार व म्हणून शक्य असेल तेथें सर्व रस्त्यावर पाणी शिंपडणें आवश्यक आहे यांत शंका नाहीं. पुढे पुढे रस्ता पुष्कळच वाईट लागला. पण मोटारवाला जपून व बेताच्या वेगानें मोटार हाकीत होता. मिरपुरखासपासून उमरकोटचें बरोबर अंतर कोणासच ठाऊक नव्हतें. पसतीस मैलांपासून बेचाळीस पंचेचाळीस मैलांपर्यंत अंदाज केलेला होता. त्याप्रमाणें पंचेचाळीसावा मैल येऊन गेला तरी उमरकोटचा पत्ता नाहीं. मोटारचालीचे तीन तास होऊन गेले. पण आणखी दोन तीन मैल चालल्यावर एकदांचें उमरकोट जवळ आलें असें कळलें; व आमच्या त्रासाचें व कंटाळवाणे होत चाललेलें सुखपर्यटन (excursion) संपलें व आम्हीं आमच्या उद्दिष्ट स्थळी येऊन पोहोंचलों म्हणून आम्हांला आनंद झाला. लवकरच आम्हीं रहदारीबंगल्यावर आलों व तेथें आमचें उपवनोपहाराचे सामान काढून ठेवून आधीं अकबराचे जन्मस्थान व उमरकोट गांव पाहून येण्याचा बेत केला. गांवाच्या पलीकडे दोन मैलांवर जन्मस्थान आहे असे रहदारी बंगल्याच्या व्यवस्थापकानें सांगितलें. तेव्हां त्याला बरोबर येऊन आम्हीं गांवाच्या बाहेरच्या रस्त्यानें दोनएक मैल गेलों. हा रस्ता कसचा सर्व जंगलमय भूमिभाग होता! कशीबशी आमची मोटार एका गवताळ शेतजमिनीपाशी आली. तेथें विटांचा एक मोडका तोडका चवथरा असून त्यावर छोटासा कमानदार घुमट होता व त्या घुमटावर 'येथें अकबर बादशहा सन १५४२ मध्यें जन्मला' अशा अर्थाचा नवाच शिलालेख होता. आम्हांला हेच खरें जन्मस्थान काय, किंवा पूर्वकाळीं उमरकोट गांव येथपर्यंत पसरलेला असून येथें एखादा वाडा होता व त्यामध्यें अकबराचा जन्म झाला, किंवा हुमायून हा उमरकोटाच्या राण्यांच्या आश्रयास आला असतांना शहराबाहेर तंबूंत सर्व लवाजम्यासकट रहात असतां तेथेंच हुमायुनाची राणी बाळंत झाली अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनापुढे उभे राहिले. मल्हारराव होळकरांचे जन्मस्थान पाहण्यास गेलों असतांना ज्या प्रकारची आश्चर्याची व अचंब्याची भावना मनांत उद्भुत झाली तशीच भावना अकबराचें हें रानांतलें जन्मस्थान पाहून माझ्या मनांत उद्भूत झाली. दिगंत किर्ती केलेल्या विभूतीचें जन्मस्थान अशा रानावनाच्या स्थितीत असलेले पाहून मनाला फार आश्चर्य व अचंबा वाटला. पण ज्याकरितां मी इतक्या लांबचा व त्रासाचा प्रवास केला तें कार्य झालें म्हणून मला एकप्रकारचे समाधान वाटलें. व आम्हीं परत गांवाशीं आलों व मग पायींच गांव पाहिलें. उमरकोट हें किल्ल्याचे ठिकाण आहे. किल्ला बऱ्याच उंचवठ्याच्या व खडकाळ जागेवर बांधलेला आहे. किल्यामध्यें निशाण उभारण्याचा बालेकिल्यासारखा भाग आहे. तेथें आम्हीं पायऱ्यांनीं चढत गेलो. येथून चारी बाजूंचा क्षितीजापर्यंत भूमिभाग दिसत होता. उमरकोट हे ठिकाण खोलगट भागांत वसलेलें असून सभोवारचा सर्व भाग उंचवट्याचा आहे. असें दिसलें. जुन्या नारानदीची ही दरीच आहे असें कळलें. हा भाग पूवा पुराने भरून जात असे म्हणून नारानदीला बचावबंधारा बांधण्यांत आला. हल्लीं नारानदीचा कालवाच केल्यामुळें व सर्व कालव्यांची दुरुस्ती केल्यामुळे पुराची भीति राहिली नाहीं. हा गांव खोलांत व दरीत वसला असल्यामुळे गांवांत व त्याचे सभोंवार झाडझाडोरा पुष्कळच दिसला.
सिंध प्रांतांतील कालव्यानें भिजणाऱ्या भागाची ही शेवटची मर्यादा आहे व त्याचें दक्षिणेस व आग्नेय (South-east) दिशेकडे नगरपारकर या सिंधमधील कच्छप्रातांच्या सरहद्दीवर असलेल्या गांवांखेरीज गांव नाहीं व हा सर्व प्रांतांचा भूमिभाग वालुकामय, निर्वृक्ष व निर्जल, ओसाड मैदानाचा आहे व या भागांत जाण्यास उंटाखेरीज दुसरें वाहन मिळत नाहीं असें कळलें. किल्ल्याच्या भव्य व पिवळसर दगडी दरवाज्यांतून आम्हीं बाहेर पडलों व मग रहदारीबंगल्यांत आलों. नंतर आम्हीं सर्वांनी बरोबर आणलेल्या फराळाचा व फळफळावळीचा व विशेषतः उसांच्या कांड्यांचा चांगलाच समाचार घेतला व तास दीडतास विश्रांति घेतल्यावर आम्ही आल्या वाटेने परत बंगल्यावर आलो.
याप्रमाणे इंग्रजी नव्या वर्षाचा सण आम्हीं चिरस्मरणीय सुखपर्यटनानें साजरा केला. या सुखपर्यटनामध्यें माझें काम व करमणूक असा दुहेरी उद्देश साध्य झाला. अकबर बादशहाचें जन्मस्थान सध्यां जरी अगदीं क्षुद्र व अनाकर्षक भासलें तरी अकबराची जन्मकथा व त्याच्या पित्याची प्रेमकथा या मात्र विलक्षण व आकर्षक आहेत यांत शंका नाहीं. तरी त्या येथें देणे रास्त आहे.
बाबर बादशहाचा मुलगा हुमायून बादशहा याला अफगाण शीरशहानें दिल्लीमधून सन १५४० मध्यें हाकून लावलें व हुमायून हा तेव्हांपासून सन १५५५ पर्यंत वनवास भोगीत होता. सिंधप्रांतांत भटकत असतां हिंडाल नांवाच्या हुमायुनाच्या गुरूची तरुण मुलगी हमीदा बानू बेगम ही हुमायूनाच्या दृष्टीस पडली व तिच्यावर राजाचें प्रेम बसलें. जरी हुमायून पदच्युत व पळपुटा बनला होता तरी हमीदानें हुमायुनाशीं लग्न केलें. हें लग्न सन १५४१ मध्ये झालें. राजाबरोबर हमीदा आश्रयाकरितां सिंधमध्ये भटकत असतां सन १५४२ मध्ये केवळ सात हुजऱ्यांसकट हुमायून हमीदा बेगमेस घेऊन उमरकोट येथें आला. उमरकोटच्या राण्यानें हुमायुनास आश्रय दिला व हुमायुनास लष्करी मदत करण्याचें कबूल केलें. उमरकोट येथें असतांना २३ नवंबर सन १५४२ या दिवशीं हमीदा बेगम बाळंत झाली व पुत्ररत्न प्रसवली. २३ नवंबर हा पौर्णिमेचा दिवस होता. कष्टमय स्थितीत सुद्धां राजाला फार आनंद झाला व त्यानें मुलाचें नांव बद्रुदिन महमद अकबर असें ठेविलें. बद्रुद्दिन म्हणजे पौर्णिमेचा चंद्र व अकबर म्हणजे मोठा. आपला मुलगा धर्माचा मोठा पौर्णिमेचा चंद्र व्हावा अशी राजाची इच्छा होती. पुत्रजन्माचा उत्सव साजरा करण्यास हुमायुनाजवळ पैसे नव्हते. पण बहुमोल कस्तुरीची एक पेटी त्याचेजवळ होती. ती पेटी फोडून हुमायुनानें कस्तुरी सर्वांस दिली. व तो म्हणाला, "पुत्रजन्मोत्सवाबद्दल ही कायती देणगी मी देऊं शकतो. या कस्तूरीच्या सुगंधानें ज्याप्रमाणें हें ठिकाण भरून गेलें आहे त्याप्रमाणें या मुलाची कीर्ति जगभर पसरेल अशी मला आशा आहे." हुमायुनाची ही भविष्यवाणी अक्षरशः खरी झाली! अकबराची सुंता सन १५४५ मध्ये झाली व तेव्हां त्याचें नांव व जन्मदिवस बदलला गेला असें दिसतें. कारण पुढील मुसलमानी इतिहासामध्यें अकबराचें नांव जलालाऊद्दीन महमद अकबर असें दिलें आहे. याचा अर्थ धर्माचें वैभव असा आहे. अकबराचें बालपण वनवासांत व कंदाहारांत गेलें व हुमायुनानें राज्य परत मिळवून थोडे दिवस झाले नाहींत तोंच हुमायून एकाएकी अपघातानें वारला व अकबर १५ वर्षांचा असतांनाच गादीवर आला.
येथेंच अकबराची जन्मकथा संपली व माझा सिंधचा प्रवासही संपल्यासारखाच झाला. कारण दुसरे दिवशीं सकाळीं आम्हीं सिंद्री नांवाचा मिथ्राव कालव्यावरील सुमारें तीस मैलांवर असलेला बंगला पहाण्यास गेलों. हा बंगला सिंधच्या विलासी चीफ इंजीनीयराचा मोठा आवडता बंगला होता. या बंगल्यासभोंवार विस्तीर्ण बाग असून तिची रचना फार चित्ताकर्षक होती. या बागेत आंबराई होती; येथें खजूरीची बाग होती; येथे द्राक्षमंडप होता; येथें गुलाबवेलीनें वेष्टिलेले शीतगृह होतें; येथें हिरवळीची हिरवी हिरवीगार मैदानें होतीं; सारांश या बागेत काय नव्हतें हें सांगणें कठीण खरें. सिंधमधील पुष्कळसे सरकारी बंगले पाहून मला असें वाटलें कीं, मुंबई इलाख्यांतील सरकारी बंगले म्हणजे निवळ धर्मशाळा होत; सिंधमधील बंगले म्हणजे राजवाडे होत. पण उजाळ व निर्वृक्ष प्रांतामध्यें नेहेमी फिरावे लागणाऱ्या अंमलदारांना आपले बंगले 'वाळवंटामध्ये हिरवीगार शेतें' बनविण्याची इच्छा व्हावी हें स्वाभाविक आहे व अशा बंगल्यांना लागणारा जादा खर्च व्यर्थ नव्हे असे मला वाटलें.
या सिन्द्री बंगल्यास जातांना सिंधमधील जुने मोठमोठे कालवे आम्हांला लागले व कालव्याचें केवढे विस्तीर्ण जाळे सर्व प्रांतभर पसरलें आहे हें सहज कळून आलें. कारण आम्हीं जामराव, मिथ्राव, हिराल वगैरे कालवे व त्यांच्या कितीतरी शाखा व उपशाखा वलांडल्या. झालें येथें माझ्या सिंधप्रांताच्या प्रवासवृत्ताचा दृश्यदर्शनभाग संपला. पुढील प्रकरणांपासून सिंधच्या ऐतिहासिक वृत्तांतास सुरवात करावयाची आहे.
हिंदुस्थानच्या काय किंवा त्यांतील विशिष्ट प्रांतांच्या काय पूर्व- इतिहासाकडे नजर टाकली म्हणजे सर्वत्र एकच अंधारी अंधार दृष्टीला पडतो. मुसलमानी व ब्रिटिश या अर्वाचीन काळच्या कारकीर्दींचा सविस्तर व संगतवार इतिहास सर्वत्र मिळतो. पण त्यापूर्वीच्या आर्य लोकांच्या वसाहतीचा व नंतरच्या बौद्धधर्माच्या प्रसाराचा इतिहास मात्र संक्षिप्त व त्रोटक असाच मिळतो. तीच सिंधप्रांताच्या इतिहासाची स्थिति आहे. त्या इतिहासाचे साधारणपणे तीन प्रमुख विभाग पडतात. आर्य लोक पंजाबांत प्रथम येऊन नंतर गंगा, यमुना, सिंधू या नद्यांच्या कांठच्या सुपीक प्रदेशांत येऊन त्यांनी तेथे कायमची वसाहत केली व मोठमोठी राज्य स्थापन केली. हा इतिहासपूर्व किंवा महाभारत काळ होय. नंतर बौद्धधर्म उदयास आला. तो धर्म आर्य- राजांनी स्वीकारला व मग सर्व हिंदुस्थानभर व हिंदुस्थानाबाहेर त्याचा प्रसार झाला.
तेव्हां सिंधप्रांतांतही बौद्धधर्मी राजे झाले व बौद्ध विहार व स्तूप प्रांतभर बांधण्यांत आले. सातव्या शतकांत हुएन सँग हिंदुस्थानांत आला तेव्हां तो सिंधप्रांतांत आला होता. त्यावेळीं पुष्कळ विहार व स्तूप सिंधप्रांतांत असल्याचे त्यानें वर्णन केलें आहे. इसवी सन ७१० मध्ये मुसलमानी धर्मी बनलेल्या आरब लोकांनीं जलमार्गानें येऊन सिंधप्रांत काबीज केला व तेथें मुसलमानी धर्माचा प्रसार केला. तेव्हां इतिहास पूर्वकाळापासून या आरबी स्वारीपर्यंत दोन हजार वर्षांचा कालखंड पडतो व या काळांत प्रथमतः आर्य (अजून हिंदू हा शब्द अस्तित्वांत आला नव्हता) व मग बौद्धधर्मी राजे सिंध प्रांतांवर अंमल करीत असल्यामुळे या कालविभागास आर्यबौद्ध असें जोडनांव अन्वर्थक आहे.
सिंध प्रांताच्या इतिहासाचा दुसरा कालखंड इ. सन १७१० पासून इ. सन १८४० पर्यंत पडतो. या सर्व काळांत, आरबी बलुची, मोंगल इत्यादि मुसलमानी धर्माच्या राजांचा अंमल चालू होता. पण मुसलमानी धर्म स्वीकारलेले राजे मूळचे जाट व रजपूत जातीचे होते व त्यांनी पुष्कळ बाबतीत आपला हिंदुधर्म सोडला नव्हता. विशेषतः ते बेटीव्यवहार हिंदु घराण्यांतील कन्यांशी करीत. यामुळे हे राजे कडवे मुसलमान कधीही बनले नाहींत. खुद्द आरब, बलुची किंवा मोंगल जातीचे राजेअधिराजे झाले तरी प्रांताचा कारभार हिंदु अंमलदार व दिवाण यांचेच हाती असे. म्हणून या कालखंडास मुसलमान हिंदू कारकीर्द हे नांव अन्वर्थक आहे. सिंध प्रांताच्या इतिहासाचा तिसरा कालखंड म्हणजे अगदीं अर्वाचीन काळचा होय व त्याचें अन्वर्थक नांव ब्रिटिश कारकीर्द हे होय. सिंधप्रांताचा संक्षिप्त इतिहास अशा तीन कालखंडांनुरूप तीन प्रकरणांत देण्याचा बेत आहे. व तदनुरूप या प्रकरणांत आर्यबौद्ध काळाची माहिती देतो.
महाभारतकाळीं सिंधप्रांतांत आर्यांची वसाहत व राज्ये होतीं. सिंधूपति, सिंधुराज असे शब्द महाभारतांत आलेले आहेत. सैंधव हा शब्दही सिंधू देशाच्या राजाला लावलेला आहे व सिंधुनदीकाठचे घोडे प्रख्यात असल्यामुळे सैंधव शब्दाचा घोडा असा अर्थ अभिजात संस्कृत भाषेंत झाला. भारतीय कौरवपांडवांच्या महायुद्धाच्या काळी जयद्रथ नांवाचा सिंधप्रांताचा राजा होता. महाभारतांत जयद्रथाची कथा महशूर आहे. जयद्रथ हा सिंधु देशाच्या वृद्धक्षत्र नांवाच्या राजाचा पुत्र होय. वृद्धक्षत्राला बहुत काळानें हा पुत्र झाला. हा मोठा पराक्रमी निघाला. याला धृतराष्ट्र व गांधारी यांची दुःशीला नांवाची मुलगी दिली होती. वृद्धक्षत्र वृद्ध झाल्यावर त्यानें जयद्रथाला सिंध देशाच्या राज्यावर बसविलें व तो स्वतः वनामध्यें तपश्चर्येस गेला. पांडव आपल्या वनवासाच्या काळांत काम्यक वनांत रहात असतांना जयद्रथ त्या वनांत शिकारीस गेला. पांचही पांडव दौपदीला आश्रमांत एकटी ठेवून मृगयेकरितां रानांत गेले होते. द्रौपदी आश्रमाबाहेर एका वृक्षाला टेकून उभी होती. जयद्रथ त्या आश्रमावरून जातांना ती सुंदर द्रौपदी त्याचे दृष्टीस पडली व तो तिच्या सौंदर्यानें मोहित झाला. आपल्या हुजऱ्या करवीं त्यानें द्रौपदीची विचारपूस केली. मग तो समक्ष आश्रमाशीं आला; व द्रौपदीस म्हणाला, "राज्यविहीन व वनवासी बनलेल्या पांडवांना सोडून माझ्या सारख्या वैभवशाली राजाची राणी होण्यास तूं योग्य आहेस. तरी माझ्या म्हणण्यास रुकार दे व माझ्याबरोबर रथामध्यें चल, म्हणजे आपण आपल्या राजधानीस जाऊं." जयद्रथाच्या या म्हणण्याचा साध्वी द्रौपदीस अर्थात् राग आला व तिनें जयद्रथाची खूप निर्भर्त्सना केली. तेव्हां जयद्रथानें बलात्कारानें तिला रथांत घालून तो आपल्या नगराकडे चालता झाला. पांडव परत आश्रमाला येतात तो तेथें द्रौपदी नाहीं. दासीकडून कळलें कीं जयद्रथानें तिला पळवून नेली. तेव्हां भीमार्जुन जयद्रथाचा पाठलाग करीत गेले व त्यांनीं जयद्रथाला गाठून त्याच्या बरोबरच्या सैन्याचा पराभव करून जयद्रथाला व द्रौपदीला घेऊन ते आश्रमास आले. भीमानें जयद्रथाला ठार मारून टाकण्याचा आपला निर्धार युधिष्ठिरास सांगितला. पण युधिष्ठिरानें सांगितलें "जयद्रथ हा आपल्या चुलत बहिणीचा- दुःशीलेचा- पति आहे, तेव्हां त्याचा प्राण घेऊं नका. त्याच्या पापी कृत्याबद्दल शिक्षा म्हणून त्याच्या डोक्याचे पांच पाट काढून त्याला सोडून द्या." अशा सल्ल्यापुढे भीमार्जुनाचा नाइलाज झाला. जयद्रथाकडून अपराधाची कबुली करून घेऊन व त्याच्या डोक्याचे पांच पाट काढून भीमार्जुनांनी जयद्रथाला आपल्या देशी पाठवून दिलें. भारती- युद्धामध्यें जयद्रथ अर्थात् कौरवांच्या बाजूनें व पांडवांविरुद्ध लढला. डोक्याचे पांचपाट काढल्याच्या अपमानाचे शल्य त्याच्या हृदयांत सारखे सलत असल्यामुळे त्याला संधि मिळतांच त्यानें चक्रव्यूहांत सांपडलेल्या अर्जुनाच्या अभिमन्यू नांवाच्या पुत्राला ठार मारून पांडवांचा सूड घेतला. दुसरे दिवशीं सूर्य अस्तास जाण्याचे आधीं जयद्रथाचा वध करीन, नाहीं तर अग्निप्रवेश करून प्राणत्याग करीन अशी घनघोर प्रतिज्ञा पुत्रशोकानें विव्हळ झालेल्या अर्जुनानें केली. कौरवांना या प्रतिज्ञेमुळें आनंद झाला व जयद्रथाचें नखसुद्धां सबंध दिवसांत अर्जुनाच्या दृष्टीस पडूं नये अशी सैन्याची रचना कौरवांनी केली. अर्जुनानें दुसऱ्या दिवशीं आपल्या शौर्याची शिकस्त केली; पण सैन्याची फळी फोडून जयद्रथाला गांठण्याचा व त्याचा वध करण्याचा अर्जुनाचा बेत सिद्धीस जात नाहीं असें दिसूं लागलें. तेव्हां अर्जुनाचा सखा कृष्ण यानें एक अजब युक्ति योजली. त्यानें आपल्या चक्रानें सूर्य अस्तास जाण्यापूर्वीच सूर्यास्ताचा आभास उत्पन्न केला.
सूर्य खराच अस्तास गेला असें कौरवांना व अर्जुनालाहि वाटलें व प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुनानें अग्निकुंड तयार केलें. जयद्रथाला आपण आतां निर्धास्त झालों असें वाटून तो मोठ्या प्रमुदित मनानें अर्जुनाचा अग्निप्रवेश पहाण्यास अग्निकुंडाजवळ आला, तोंच श्रीकृष्णानें आपलें चक्र काढून घेतलें. हा सूर्य व हा जयद्रथ असे एकदम उद्गार निघाले व अर्जुनानें तात्काळ बाणानें जयद्रथाचा वध केला.
सिंधु देशाच्या राजाची अशी अद्भुत कथा महाभारतांत आली आहे. यावरून सिंधु देश आर्यांनी पूर्णपणे वसाहत केलेला असून तेथें आर्यसंस्कृति प्रचलित झाली होती. रामायणांत सिंधु देशाचा कोठें संबंध आलेला नाहीं. कालिदासानें मात्र रघूच्या दिग्विजयवर्णनामध्ये सिंधुदेशाचा व सिंधुनदीच्या तीरावर रघूच्या सैन्यानें विश्रांति घेतल्याच ओझरता उल्लेख केला आहे. त्यावेळीं हूण राजे सिंध देशावर राज्य करीत होते असें विधान कालिदासानें केलें आहे. पण सिंधुदेशाचे हे सर्व उल्लेख दंतकथात्मक व म्हणून इतिहास पूर्वकाळचे होत असें दिसतें. इराणचा राजा डरायस यानें हिंदुस्थानावर केलेल्या स्वारीची हकीकत हा पहिला ऐतिहासिक उल्लेख होय. या स्वारीमध्यें डरायसच्या स्कायलॅक्झ या सेनापतीनें पुष्कळशीं गलबतें तयार करून त्यानें आपलें सैन्य अटकपेशावरपासून सिंधुनदी- मधून सिंधप्रांतांत आणले व सिंधप्रांत इराणच्या राज्यांत सामील केला. त्यावेळी सुद्धां सिंधप्रांत सुपीक व संपन्न समजला जात असे व इराणच्या राजास या प्रांतांतून बरीच मोठी खंडणी मिळे.
आणखी दोनशे वर्षांनीं प्रख्यात शिकंदर बादशहानें हिंदुस्थानावर स्वारी केली व त्यानें झेलमनदीपर्यंत पंजाबचा मुलूख काबीज केला. पण पुढें जाण्याचें त्याचे सैन्यानें नाकारलें. तेव्हां दोन हजार गलबतें तयार करून तो पंजाबातून सिंधुनदीमधून सिंधप्रांतांत आला व तेथली मोठ-मोठी शहरें काबीज करून व तेथल्या राजांना आपले मांडलिक बनवून शिकंदर बादशहा मकरान (बलुचिस्थानचा दक्षिण भाग) व इराण- मधून आपल्या नव्या राजधानीस गेला व लवकरच मृत्यु पावला. त्याचे पश्चात् त्याचें प्रचंड साम्राज्य मोडकळीस आलें व हिंदुस्थानांत मौर्य साम्राज्य प्रस्थापित झालें. पुढें गौतमबुद्धानें बौद्धधर्माची स्थापना केली. या धर्माच्या उदार व उदात्त तत्वांचा तात्काळ फैलाव झाला व मौर्य घराण्यांतील अशोक राजानें तो धर्म स्वीकारला व त्याचा सर्व हिंदुस्थानभर व हिंदुस्थानाबाहेरही प्रसार केला. या वेळेपासून सिंधप्रांतांत व सिंधप्रांताचे पश्चिमेकडील बलुचिस्थान व अफगाणिस्थान या देशांमध्यें बौद्ध धर्माचा पुष्कळच प्रसार झाला. म्हणून या सर्व विस्तीर्ण प्रदेशांत बौद्ध धर्माचे स्तूप, विहार व इतर स्मारक अवशेष कितीतरी सांपडतात. पुराणसंशोधनखात्यानें व पुराणवस्तु संशोधकांनीं खटपट केल्यास व जागोजाग खोदून पाहिल्यास आणखी कितीतरी अवशेष सांपडतील यांत शंका नाहीं. प्रसिद्ध प्रवासी हुएन सँग यानें सिंध प्रांतांतील बौद्ध धर्माचीं प्रख्यात ठिकाणं पाहिलीं व त्यांचे वर्णन त्यानें आपल्या प्रवासवृत्तांत केलेलें आहे. प्रख्यात बौद्धधर्मी राजा कनिष्क याचा अंमल सिंध प्रांतांत चालू होता. कनिष्कानंतर बुद्धधर्माचं वर्चस्व कमी झाले व पुन्हां सिंधप्रांतांतील हिंदु राजघराणीं स्वतंत्र झाली. हल्लींच्या रोहरी गांवानजीक असलेल्या व आतां नामशेष झालेल्या अलोर राजधानीमध्यें एक हिंदु राजघराणें उदयास आलें व या घराण्याचा अंमल मुलतान पासून अरबी समुद्र व राजपुतान्यापासून बलुचिस्थान येवढ्या मोठ्या प्रदेशभर पसरला होता. या विस्तीर्ण राज्याच्या व्यवस्थेकरितां त्याचे चार विभाग करण्यांत आले होते. या विभागांचीं ब्राह्मणाबाद, सेहवान, ईशकंद किंवा ऊच व मुलतान हीं अनुक्रमें मुख्य शहरें होती.
इसवी सनाच्या सहाव्या व सातव्या शतकांत एका क्षत्रिय राजघराण्याचा सिंधप्रांतांत अंमल चालू होता. त्या घराण्याच्या मूळ पुरुषाचें नांव राय साहसी असें होतें. त्याचा मुलगा सहिरस नांवाचा होता असे दिसतें. हा मोठा बलाढ्य राजा होता. त्याचे कारकीर्दीमध्ये प्रजा फार सुखी व संपन्न होती. त्याची राजधानी अलोर येथें होती. या राजधानीमध्ये मोठमोठे राजवाडे, सुंदर बागा व हिरवीगार मैदानें होतीं. इराणमधील एका प्रांताच्या निमरुझ नांवाच्या अधिपतीनं सहिरसच्या राज्याच्या सरहद्दीवरील एका शहरावर स्वारी केली. म्हणून सहिरस लगबगीनें सैन्यानिशीं सरहद्दीवरील शहराकडे गेला. तेथें निमरुझ व सहिरस यांचेमध्यें तुमुल युद्ध झालें. त्यांत दुर्दैवानें सहिरस धारातीर्थी पडला!
सहिरसच्या मागून दुसरा रायसाहसी गादीवर आला. हा राजा फार चांगला होता. त्याचें धोरण प्रजाहितपर असें होतें व म्हणून त्याची प्रजा सुखी व संपन्न होती. त्याचा राम नांवाचा मोठा शहाणा व मुत्सद्दी मंत्री होता. त्याच्यावर राजाचा पूर्ण भरंवसा होता. या राम मंत्र्यानें सेलजी नांवाच्या एका ब्राह्मणाच्या विद्वान व वक्त्या तरुण मुलाला आपला मदतगार म्हणून नोकरीस ठेविलें. या तरुणाचें नांव चच असें होतें. रायसाहसी राजाची राणी सुहंडी नांवाची होती. एकदां हुशार व सुंदर चच तरुण तिच्या दृष्टीस पडला व तिचें मन त्याच्यावर जडलें. त्यामुळे दिवसेंदिवस राजदरबारी चचची सत्ता व वजन वाढत चाललें. जरी राणीचें प्रेम चचवर जडलें होतें, तरी राजाच्या हयातीत तिने आपले पातिव्रत्य राखलें व राजाशी बेइमानपणा केला नाहीं. राजा मृत्यूच्या दारांत पडला असतां राणीनें चचला राजाचा प्रतिनिधि निवडविलें. यामुळे राजाच्या मृत्यूनंतर चचला राज्याधिकार मिळाले व मग राणीनें चचशीं विवाह केला व चच सिंधचा राजा बनला.
चचची कारकीर्द फार यशस्वी व वैभवशाली झाली. चचनें आपला भाऊ चंदर याचे हातीं राज्यकारभार दिला. तो स्वतः आपल्या राज्यांतील बंडखोरी मोडण्याकरितां व राज्याचा विस्तार करण्याकरितां स्वारीवर गेला. बुद्धिमन नांवाचा चचचा एक शहाणा मंत्री होता. त्याच्या योग्य सल्ल्याप्रमाणें चचनें बियास नदीच्या बाजूकडील इस्कंदाह व पंजाबांतील प्रख्यात मुलतान शहर येथें आपला अंमल स्थिर केला व बंडवाल्यावर जरब बसविली. दुसरे वर्षी त्यानें दक्षिणेकडील सिविस्तान व ब्राह्मणाबाद येथल्या लोकांना चांगलें कबजांत आणले. ब्राह्मणाबाद येथें जाट, लोहाणा व बौद्ध लोकांची वस्ती होती. सामनी नांवाचा एक बौद्ध भिक्षु तेथें होता. त्याच्या धार्मिकपणाबद्दल व यौगिक शक्तीबद्दल लोकांमध्ये फार आदर व पूज्यबुद्धि होती. म्हणून ब्राह्मणाबाद घेतल्यावर चचनें सामनीची भेट घेतली व त्याला मोठी जागा व मान देऊ केला. पण सामनीनें त्याचा स्वीकार केला नाहीं. तेव्हां "तुमच्याकरितां व माझ्या पारमार्थिक कल्याणाकरितां मीं काय करावें" अशी सामनीजवळ चचनें पृच्छा केली. तेव्हां सामनीनें चचला आपल्या खासगी मिळकतींतून नवहार येथील बुद्धविहाराचा जीर्णोद्धार करण्यास सांगितलें. ती गोष्ट चचनें मोठ्या खुषीनें कबूल केली. पुढे चचने आपला मोर्चा पश्चिमेकडे वळविला व बलुचिस्थानांतील लासवेला येथल्या बौद्ध राजाला त्यानें आपला मांडलिक बनविला. बलुचिस्थानांतील मकरान प्रांत व आपल्या राज्याची सरहद्द यावर त्यानें खजुरीचीं झाडें लाविलीं व खजुरीचें मोठें रान बनविलें. चचनें शेवटची स्वारी अफगाणीस्थानांतील कंदाहारपर्यंत केली. मग तो आपल्या अलोर राजधानीस परत आला. याप्रमाणे चचची कारकीर्द फार वैभवशाली झाली. त्यानें चाळीस वर्षे राज्य केलें. त्याला दोन मुलगे डाहर व डहरसिंह नांवाचे होते, पण ते अज्ञान असल्यामुळे चचच्या पश्चात् त्याचा भाऊ चंदर गादीवर बसला. चंदर हा धार्मिक वृत्तीचा होता. तो भट व भिक्षू यांचे संगतीत व धार्मिक अभ्यासांत काळ घालवी. त्याचा बौद्ध धर्माकडे ओढा होता. अशा स्थितींत चचनें पराजित केलेले राजे व मांडलिक चंदरच्या विरुद्ध उठले. इतक्यांत कनोजच्या राजानें सिंधवर स्वारी केली. पण चंदर मोठ्या शौर्याने लढला व त्याने राज्यावर आलेलें काहूर परतविलें. पण चंदर फार दिवस जगला नाहीं. त्याने फक्त सात वर्षेच राज्य केलें.
चंदर नंतर चचचा थोरला मुलगा डाहर हा राज्यावर आला. चंदरचा मुलगा दुरज यांजकडे ब्राह्मणाबादचा कारभार सोपविण्यांत आला. पण दुरज एका वर्षांतच वारला. म्हणून ब्राम्हणाबादचा कारभार चचचा दुसरा मुलगा डहरसिंह याचे हातीं देण्यांत आला. तो ब्राह्मणाबाद येथें पांच वर्षे राहिला व तेथें असतांना त्यानें ब्राह्मणाबादच्या पदच्युत राजाच्या मुलीशी लग्न केलें. डाहर व डाहरसिंह यांना बाई नांवाची एक बहिण होती. त्यांच्या मनांत तिचा विवाह पंजाबांतील भटियाच्या राजाशी करावयाचा होता. पण एका ब्राह्मण ज्योतिषानें डाहरला सांगितलें. "जो कोणी बाईशी लग्न करील तोच अलोरचा राजा होईल. व जर तुम्हीं बाईशी लग्न केलें नाहीं तर तुमचें राज्यपद नष्ट होईल." डाहरला या भविष्यानें हुरहूर लागली. व त्यानें आपल्या विश्वासू मंत्र्याचा सल्ला घेतला. "राजानें बाईशीं धार्मिक संस्कारानें विवाह करावा. पण असिधाराव्रत पाळून Incest करूं नये म्हणजे झालें" या मंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणें डाहरने बाईशी लग्न केलें. ही गोष्ट डाहरसिंह याला आवडली नाहीं. म्हणून तो अलोरवर स्वारी करण्याच्या उद्देशानें ब्राह्मणाबादेहून आला. पण डाहरनें त्याची समजूत घातली; व त्याच्याशी समेट केला. नंतर डाहरसिंह हा देवीने आजारी पडला व त्यांतच त्यांचा अंत झाला व ब्राह्मणाबादचें राज्य डाहरकडे आलें. पण डाहरनें डहरसिंहाचा मुलगा चच याच्याशी सलोखा करून त्याला ब्राह्मणाबादचें राज्य परत दिलें.
चचच्या प्रमाणे डाहरची कारकीर्द पुष्कळ काळ व मोठी यशस्वी झाली. डाहरनें आपला दिवाण बुद्धिमन याचे सल्ल्यानें मोठ्या शहाणपणानें व प्रजाहिततत्परतेनें राज्य केलें. पण डाहरच्या कारकीर्दींच्या अखेरीस सिंधप्रांतावर एक मोठें संकट आलें. हे संकट अरबस्थानांत नुकत्याच सुरू झालेल्या मुसलमानी धर्माच्या विलक्षण प्रसारानें व अरब लोकांमध्यें उत्पन्न झालेल्या विलक्षण महत्त्वाकांक्षेनें उत्पन्न झालें. सिलोनच्या राजानें उदयास आलेल्या मुसलमानी धर्माच्या खलिफास (मुसलमानी धर्माचा व मुसलमानी राज्याचा अधिकारी) कांहीं गुलाम व कांहीं देणगीदाखल वस्तू अरबस्थानांत पाठविण्याकरितां गलबतांतून पाठविल्या. अरबस्थानाकडे जातांना वाटेंत तें गलबत सिंधच्या ठठ्ठा बंदरीं आलें. तेथें चाचे लोकांनीं गलबतावर हल्ला केला, गुलाम व वस्तू चोरल्या व गलबतावरील खलाशांना बंदीमध्ये टाकलें. ही बातमी खलिफाच्या कानावर गेली. व त्यानें ही आयती आलेली संधिसाधून महमद बिन कासिम या तरुण व शूर सेनापतीचे हवालीं मोठें सैन्य देऊन सिंध काबीज करण्याकरितां त्याला सिंधप्रांताच्या स्वारीवर पाठविलें. ही गोष्ट इ. स. ७१० मध्ये घडली. येथपासून दोन हजार वर्षे चाललेली सिंधप्रांतावरील आर्य बौद्ध कारकीर्द संपली. व पुढे हजार वर्षे चाललेल्या मुसलमान हिंदु कारकीर्दीस सुरुवात झाली. तरी या दुसऱ्या कारकीर्दीची हकीकत पुढील प्रकरणी देणें योग्य आहे व आर्य बौद्ध कारकीर्दीची येथेंच समाप्ति करणें प्राप्त आहे.
महंमद पैगंबरानें इस्लामी धर्म स्थापन केल्यानंतर लवकरच इस्लाम धर्मीयांच्या स्वाऱ्या चौफेर होऊं लागल्या. अशाच एका स्वारीमुळे सिंधांतील हिंदू राजवट नाहींशीं होऊन सिंध मुसलमानी अमलाखालीं गेला. इ. स. ७१० मध्ये सीलोनच्या राजानें इराकचा सुभेदार हज्जाज याजकडे गुलाम व नजराणा भरून एक जहाज पाठविलें. तें जहाज सिंधाच्या किनाऱ्याशीं असतांना चांचे लोकांनीं तें लुटलें, व त्यावर असलेल्या अरब लोकांना ठार मारले. हज्जाजने याबद्दल दाहर राजाकडे दाद मागितली पण कांहीं उपयोग झाला नाहीं. तेव्हां चिडून जाऊन त्यानें बगदादच्या खलीफाची अनुमति घेऊन आपला जावई महमद कासीम याला मोठ्या सैन्यानिशीं पाठविलें. महमद हा वीस वर्षांचा तरणाबांड होता व त्याच्याबरोबर घोडदळ व सांडणीदळ मिळून १२००० फौज होती. अशा अननुभवी पोरसवदा माणसाने अवघ्या सहा महिन्यांत सबंध सिंधप्रांत पादाक्रांत करावा ही अद्भुतच गोष्ट वाटते. पण या घटनेचें एक ढोबळ कारण हे कीं, सिंधवासीयांत जूट नव्हती. राजा दाहर हिंदुधर्मी होता, तर किल्ल्यावरील अधिकारी बुद्धधर्मी होते. शेहवान हे प्रसिद्ध शहर दाहरचा मुलगा बज्रा याच्या ताब्यात होतें. पण शहरातील बुद्ध नागरिक त्याच्या वतीनें लढण्यास तयार नव्हते. अशा धार्मिक फुटीमुळे महमद कासीमचे काम सोपें झालें. महमद प्रथम देबाल येथें जाऊन तेथें कैदेत असलेल्या मुसलमान लोकांना त्यानें सोडविलें व चाच्यांच्या कृत्याबद्दल सूड म्हणून देबाल शहर जाळून टाकलें. मग त्यानें शेहवान, सिसम, नीरन हीं शहरें एकामागून एक घेतलीं, नीरन येथें तर त्याला लढावें लागलेंच नाहीं. कारण तेथील सर्वाधिकारी बुद्धभिक्षूनें त्याला सन्मानानें आंत येऊ दिलें. नीरन येथें महमदानें आपला अधिकारी नेमला व तेथल्या हिंदु देवालयाच्या जागीं एक मशीद बांधली. मग तो दाहर राजाची राजधानी अलोर हिच्यावर चाल करून गेला. चार दिवस चाललेल्या त्या लढाईचें रसभरित वर्णन एका अरबी इतिहास लेखकानें केलें आहे. दाहरजवळ ५००० घोडदळ, ६० हत्ती व २०००० पायदळ होतें, पण शेवटी त्याचा पुरता पराभव झाला व तो मारला गेला. दाहरचे मुंडकें बगदादच्या खलीफाकडे पाठविण्यांत आलें. अलोर ताब्यांत घेतल्यावर महमदानें ब्राह्मणाबादेकडे मोर्चा वळविला. सहा महिने शहराला वेढा दिल्यानंतर ते महमदाच्या ताब्यांत आलें. त्यानंतर लवकरच दाहरची राणी लादी व त्याच्या दोन मुली या अरबांच्या हातांत सांपडल्या. त्या मुलींना महमदानें बगदादच्या खलीफाकडे नजराणा म्हणून पाठविलें. इ. स. ७१२ च्या अखेरीस तो मुलतानकडे वळला व निकराच्या लढाईनंतर त्यानें मुलतान जिंकलें. तेथेंही त्यानें एक भव्य मशीद बांधली व लोकांकडून पुष्कळ खंडणी घेऊन ती खलीफाकडे पाठवून दिली.
महमदाची वागणूक त्या काळच्या युद्धनीतीच्या व राजनीतीच्या मानानें पुष्कळ चांगली होती असेच म्हटले पाहिजे. त्यानें सबंध प्रांत जिंकला, पण शरण आलेल्यांना कधींही जाचलें नाहीं. जे शरण आले त्यांना त्यानें त्रास दिला नाहीं. जे शरण येइनात त्यांना मात्र त्या काळच्या पद्धतीप्रमाणे तो कापून काढी. शरण आलेल्या हिंदूजवळून तो ठरवलेला कारभार घेई, पण त्यानंतर मात्र त्यांना धर्मस्वातंत्र्य व इतर हक्क यांचा उपभोग घेऊं देई. व्यापारी व कसबी लोक यांच्या उद्योगधंद्यांत त्यानें कधींच व्यत्यय आणला नाहीं. महमदाच्या अशा धोरणी राज्यकारभारामुळे सिंधवासीयांना आपसांतील दुही विसरून त्याच्या विरुद्ध एकवटण्याचे कधींच कारण पडलें नाहीं. देशाभिमान या भावनेचा जवळ जवळ अभावच असल्यामुळे सिंधप्रांत सहजच महमदाच्या आहारी गेला.
तीन वर्षे सिंधप्रांतावर राज्य केल्यावर महमदाची सद्दी संपली. वर सांगितलेंच आहे कीं, त्यानें दाहर राजाच्या दोन मुली बगदादच्या खलीफाकडे नजराणा म्हणून पाठविल्या. या मुलींनीं खलीफाजवळ महमदाच्या शीलावर फार शिंतोडे उडविले. त्यामुळे खलीफा चिडून गेला व त्यानें आज्ञा केली कीं महंमदाला ठार करून त्याचें प्रेत कातड्याच्या पिशवीत शिवून बगदादला आणावे. त्याप्रमाणें महंमदाला मारण्यांत आलें, तेव्हां दाहरच्या मुलींनीं आपण त्याच्यावर खोटाच आरोप केल्याचें कबूल केलें. हे ऐकून खलीफाला फार दुःख झाले व त्यानें त्या मुलींना ठार मारण्याचा हुकूम दिला. अशा तऱ्हेनें तरुण, पराक्रमी व धोरणी महमद कासीमचा अंत झाला.
महमदाच्या नंतर खलीफानें नेमलेले सरदार सिंधप्रांतावर अंमल चालवूं लागले.मुसलमान नसलेल्या प्रजेवर जिझिया सारखे कर असल्यामुळे व इस्लाम हा राज्यकर्त्यांचा धर्म असल्या कारणानें कित्येक हिंदूंनीं मुसलमानी धर्म स्वीकारला. हा क्रम बरींच शतकें चालू असल्यामुळे सिंध हा हळूहळूं मुसलमानी प्रांत बनला. पण त्याचबरोबर कांहीं जुन्या रजपूत घराण्यांची सुस्थिति व सत्ता कायमची स्थापित झालेली दिसते. दालुराई भांभोरिया, हीं घराणी या बाबतींत प्रसिद्धच आहेत.
खलीफानें नेमलेल्या आरबी सरदारांची राजवट सुमारे ३०० वर्षे टिकली. इ. स. १०२६ मध्यें गझनीच्या महमदानें मुलतान काबीज केले व आपला सेनापती अबदुल रझाक याला सिंध प्रांत जिंकण्यासाठी पाठविलें. रझाकनें शेहवान व ठठ्ठा हीं शहरें घेतली व आरबी अंमलदारांना सिंधांतून हांकून लाविलें. यानंतर तेराव्या शतकाच्या सुरवातीला शहाबुद्दिन व कुतुबुद्दिन घोरी यांनी सिंधप्रांत जिंकून दिल्लीचें सार्वभौमत्व स्थापिलें. १२०६ मध्यें कुतुबुद्दिन दिल्लीच्या तक्तावर बसला तेव्हां सिंध व मुलतान येथील अमलदार नाझिरुद्दिन कबचा यानें कुतुबला बादशहा म्हणून मानले. पण १२१० मध्ये कुतुब वारल्यावर नाझीर स्वतःला स्वतंत्र मानूं लागला. याच सुमारास चंगीझखानाच्या नेतृत्वाखालीं तार्तर किंवा मोंगल लोकांची टोळधाड हिंदुस्थानांत आली. तिनें पंजाबांत धुमाकूळ घातला व हजारों लोकांना कापून काढलें. नाझीरउद्दिन त्यावेळी मुलतानच्या बंदिस्त किल्ल्यांत होता व त्यानें मोंगलांना दाद दिली नाहीं. पण मोंगल परत फिरतात न फिरतात तोंच दिल्लीचा बादशहा अल्तमश यानें नाझीरवर हल्ला केला व पुन्हा एकवार दिल्लीचें वर्चस्व सिंधप्रांतावर स्थापन केलें. तेव्हांपासून सिंधचे अमलदार कमीअधिक प्रमाणांत दिल्लीच्या बादशहाचे ताबेदार बनले. मोगलांच्या स्वाऱ्या वरचेवर होऊं लागल्यामुळे इ. स. १२५० च्या सुमारास पंजाबात मुलतान येथे एक व सिंधप्रांतांत शेहवान किंवा ठठ्ठा येथें एक याप्रमाणे दोन स्वतंत्र अंमलदार नेमण्यांत येऊं लागले. खिलजी घराणे दिल्लीच्या तक्तावर आलें तेव्हां सिंधप्रांतावर करडा अंमल चालू झाला. पण १३२१ च्या सुमारास खिलजी घराणें पडल्या बरोबर ठठ्ठा येथील सुम्रा या जातीच्या मुख्यांनीं आपलें स्वातंत्र्य पुकारलें. हे सुम्रा सरदार कित्येक शतकें सिंधात स्थायिक झाले होते, व जरी ते इस्लामधर्मी असल्यामुळे आपल्याला अरबांचे वंशज समजत, तरी वास्तविक ते रजपूत होते. या सुम्रा सरदारांचे पराक्रम व त्यांच्या प्रेमकथा कित्येक सिंधी कवींनीं गायल्या आहेत. बादशहा ग्यासुद्दिन याचा मुलगा महमदशहा व फिरोझ तघलख यांनीं सुम्रा सरदारांना आपल्या ताब्याखाली आणले. पण फिरोझ तघलखच्या कारकीर्दीत इ. स. १३५१ च्या सुमारास सिंधमधील सम्मा राजघराण्यानें आपलें प्रभुत्व स्थापिलें व दिल्लीची सत्ता झुगारून दिली.
सम्मा जातीचे राजे हे देखील मूळचे रजपूत असून नंतर मुसलमान बनलेले होते. त्यांची रजपूत व हिंदु संस्कृति बरीचशी कायम होती. कच्छकाठेवाडांतील रजपूत राजांप्रमाणे ते आपल्याला 'जाम' म्हणत. त्यांची कारकीर्द १३५१ पासून १५१९ झाली व इतक्या काळांत १७ जाम झाले. त्यांपैकीं कांही राजे लोकांच्या कल्याणाची काळजी बाळगणारे झाले. दुसरा तमाची या जामनें इंग्रजी वाङ्मयांतील प्रसिद्ध कॉफेच्युआ राजाप्रमाणें एका मासेविक्या, कोळ्याच्या मुलीशी लग्न करून तिला आपली पट्टराणी केली. त्या प्रेमळ जोडप्याचें कबरस्थान ठठ्ठा येथील मकली टेकडीवर अयापीही पहायला मिळतें. जाम संजर हा धर्मशील व प्रजाहितदक्ष असा राजा होता. त्याच्याबद्दल खालील गोष्ट सांगतात. बक्करमधील एक काजी त्याच्याकडे कज्जे तोडण्यासाठी आलेल्या लोकांकडून पैसे उकळत असे. हे ऐकल्यावर संजरनें त्या काजीला बोलावून आणले त्याच्या लांचलुचपतीविषयीं चवकशी केली. काजी तसा सरळ मनुष्य होता. तो म्हणाला 'होय महाराज, मी वादीकडूनही पैसे घेतों आणि प्रतिवादीकडूनही घेतों; साक्षीदारांकडूनही मी अवश्य पैसे घेतले असते पण ते बेटे कज्जा संपण्याच्या आधींच निघून जातात. महाराज मी दिवसभर कोर्टामध्यें मरमर काम करतों आणि माझी बायकामुलें घरीं उपाशी मरतात.' हे ऐकून जाम संजरनें सर्व कमी पगाराच्या नोकरांचा पगार वाढविण्याचा हुकूम दिला.
जाम संजरच्या नंतर जाम निजामुद्दिन ऊर्फ जाम निंदो हा गादीवर आला. जाम निंदो हा देखील मोठा धर्मनिष्ठ व चांगला राजा झाला. त्याच्या राज्यांत प्रार्थनेच्या वेळीं मशीदी कधींही रिकाम्या नसत असें सांगतात. देशांत बंदोबस्त इतका असे कीं, प्रवाशांना आपल्या जिवाची व धनाची कधींच काळजी पडत नसे. राज्यांत शांतता व समृद्धि नांदत असल्यामुळे जाम निंदोनें एक नवी राजधानी बांधण्याचें ठरविलें. राजधानीची जागा कायम झाली. ब्राह्मणांच्या सांगण्यावरून एक मंगल दिवस मुकर झाला व त्या दिवशीं प्रसिद्ध ठठ्ठा शहराचा पाया घातला गेला. जाम निदानें ५० वर्षे राज्य केलें. त्याच्या कारकीदींच्या अखेरीस कंदाहारचा राजा शहाबेग अर्घन यानें सिंधावर स्वारी केली, पण निंदोचा सेनापति दर्याखान यानें त्याचा पराभव केला. निंदोच्या मागून त्याचा मुलगा फिरोझ हा गादीवर आला. त्याच्या काळांत शहाबेग अर्घन याचें कंदाहारचें राज्य बाबरनें जिंकल्यामुळें तो सिंधावर पुन्हां आपल्या मोंगल सैन्यानिशीं आला. दर्याखान त्याच्याशी निकराने लढला पण सिंधी सैन्याचा पराभव झाला व दर्याखान मारला गेला. तेव्हां जाम फिरोझ हा गळ्यामध्ये तलवार अडकवून शहाबेगला शरण आला. शहाबेगनें उदारपणे त्याला त्याच्या राज्याचा कांहीं भाग परत दिला. शहाबेग अर्घन यानें १५ वर्षे राज्य केलें. त्यानें बक्कर व शेहवान येथील किल्ले दुरुस्त केले. त्यावेळीं बलुची टोळ्या वारंवार सिंधामध्यें येऊन लुटालूट करीत. शहाबेगनें त्यांचे ४२ गांव उध्वस्त करून त्यांच्या वर चांगली जरब बसविली. शहाबेगनंतर त्याचा मुलगा मिर्झा शहा हुसेन हा राजा झाला. शहा हुसेन हा आपल्या बापाबरोबर भांडून दिल्लीचा बादशहा बाबर याच्याजवळ राहिला होता, व तेथें त्यानें राज्यकारभाराची उत्तम माहिती करून घेतली. बापाच्या पश्चात् सिंधचें राज्य जेव्हां त्याच्याकडे आलें तेव्हां त्यानें बाबरला आपला बादशहा म्हणून मानले. शहा हुसेन गादीवर आल्याबरोबर जाम फिरोजनें आपले पूर्वीचें राज्य मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्याची ५०००० फौज अगदीं कमकुवत ठरली व फिरोज गुजराथेंत पळून गेला. यानंतर शहा हुसेननें बलुची टोळ्यांचा बंदोबस्त केला व उत्तरेकडे जात जात मुलतान काबीज करून तें बाबर बादशहाला अर्पण केलें. इ. स. १५४० मध्ये शेरशहानें हुमायून बादशहाचा पराभव करून दिल्लीचें राज्य मिळविल्यानंतर हुमायून मदतीच्या आशेनें सिंध प्रांतांत आला. त्यानें शहा हुसेनला बाबरच्या वेळची आठवण दिली. शहा हुसेनने त्याला मदत करण्याचे व स्वतः भेटीस येण्याचे कबूल केलें. पण पांच महिने हुमायून रोहरी येथें राहिला तरी मदत मिळण्याचें लक्षण दिसेना. बक्करचा अंमलदार सुलतान महंमद यानेही कांहीं मदत केली नाहीं. तेव्हां निराशेनें हुमायून शेहवान घेण्याच्या इराद्यानें दक्षिणेकडे चालला. पण सुलतान महंमदाच्या करामतीनें शेहवानचा अमलदारही तयारीत होता. त्यामुळे हुमायुनाला तें शहर घेतां आलें नाहीं. या सुमारास जोधपूरच्या राजानें त्याला मदतीचे आश्वासन देऊन बोलाविलें. म्हणून हुमायून तिकडे वळला. पण वाटेंत त्याला कळलें कीं, जोधपूरचा राजा शेरशहाच्या मसलतींत असून हुमायुनाला पकडण्याच्या प्रयत्नांत होता. ताबडतोब हुमायून परत वळला. त्याचे पुष्कळ हाल झाले व तो उमरकोट येथे अवघ्या सात लोकांनिशीं आला. तेथल्या राण्यानें मात्र त्याला फार सन्मानानें वागविलें व तेथेंच बादशहा अकबराचा जन्म १५४२ मध्ये झाला. पुढें बहरामखानाच्या मध्यस्थीनें मिर्झा शहाहुसेनकडून थोडीशी कुमक हुमायुनाला मिळाली व तो कंदाहारकडे निघून गेला. शहा हुसेननें एकंदर ३४ वर्षे राज्य केलें. पण अखेरीस तो खुषमस्कऱ्यांच्या आहारीं गेला व जुलमानें राज्य करूं लागला. त्यामुळे अर्घन सरदार नाखुष झाले व त्यांनीं तर्खान जातींतील मिर्झा इसा तर्खान याला आपला राजा म्हणून निवडलें. हे ऐकून शहा हुसेन ठठ्ठा येथें आला; बक्करचा अंमलदार सुलतान महंमद यांच्या मध्यस्थीनें असें ठरलें की शहा हुसेनच्या मृत्यूपर्यंत त्यानेंच राज्य करावे व त्याच्या पश्चात सुलतान महमद व मिर्झा इसा तर्खान यांच्यामध्ये राज्याची वांटणी व्हावी.
यानंतर लवकरच शहा हुसेन वारला व अर्घन कारकीर्द संपली. एकंदरीनें अर्घन कारकीर्द सिंध प्रांताला सुखावह झाली.
मिर्झा इसा तर्खन व सुलतान महमद यांनी आपसांतला करार नीटपणे पाळला नाहीं. तर्खान ठठ्ठा येथें राज्य करी व महमद बक्कर येथें उत्तर सिंधावर अधिकार गाजवी. पण दोघांच्याही मधोमध असलेल्या शेहवानबद्दल त्यांचा झगडा चालला. मिर्झा इसा यानें वसईच्या पोर्तुगीज अंमलदाराला आपण सिंधचा राजा आहों व एका उपटसुंभाचा पाडाव करण्यासाठी पोर्तुगीजांनीं आपल्याला मदत करावी अशी विनंति केली. त्याप्रमाणें १५५५ सालीं २८ पोर्तुगीज जहाजे व ९०० लोक ठठ्ठा येथे आले. पण मिर्झा इसानें महमदाशी तह केला असल्यामुळे त्याला पोर्तुगीजांची गरज नव्हती. तो त्यांना त्यांच्या प्रवासाचा खर्चही देईना. तेव्हां पोर्तुगीज सरदार पीडो यानें ठठ्ठा शहरांत जाळपोळ करून ८०० लोकांना ठार मारिलें व अगणित लूट घेऊन तो परत गेला.
अठरा वर्षे राज्य केल्यावर मिर्झा इसा १५७२ मध्ये मरण पावला. त्याच्या मुलांत राज्याबद्दल तंटेभांडणे होऊन शेवटीं सर्वांत क्रूर मुलगा जो महमद बाकी तोच राजा झाला. हा बाकी शुद्ध सैतान होता. लोकांचे नाककान कापणें, त्यांना फाशी देणें, हत्तीच्या पायाखालीं तुडवणें, हे त्याचे रोजचे खेळ होते. परदेशच्या प्रवाशांना त्यानें कधीं जिवानिशीं सोडलें नाहीं, कारण ते परत गेल्यावर सिंध प्रांताच्या संपन्नतेच्या गोष्टी सांगतील, व लुटीच्या लोभानें परकी लोक सिंधावर स्वाऱ्या करतील अशी त्याला भीति वाटे. या सिंधी नीरोनें शेवटीं १५८४ मध्ये आत्महत्त्या करून घेतली व सिंधवासीयांना हायसे वाटलें.
बाकीनंतर मिर्झा जानी बेग हा ठठ्ठा येथल्या गादीवर बसला. या सुमारास बक्करचा अंमलदार सुलतान महमद यानें अकबर बादशहाचें सार्वभौमत्व कबूल केलें व स्वतःला तो अकबराचा मांडलीक समजूं लागला. जानी बेग यानें मात्र अकबराचें वर्चस्व कबूल केलें नाहीं व अकबराच्या सैन्याला मोठ्या शौर्यानें तोंड दिलें. अगदी निरुपाय झाला तेव्हां त्यानें स्वतःच ठठ्ठा शहर पाडून टाकलें व कलानकोटच्या दुर्गम किल्ल्यांत ठाणें दिलें. पण शेवटीं त्याला शरण जावेंच लागले व अकबराच्या पायाची धूळ माथीं लावावी लागली. अकबरानें त्याला सन्मानानें वागविलें व ठठ्ठा येथें सुभेदार म्हणून नेमले. यानंतर लवकरच जानीबेग मरण पावला. त्याचा मुलगा मिर्झा गाझी बेग याला सुभेदार करण्यांत आलें व पुढें तर शेहवान, मुलतान व कंदाहार हीं त्याच्या ताब्यांत देण्यांत आली. पण यामुळे ठठ्ठा येथील त्याचा अधिकारी खुस्रो खान हा जवळजवळ स्वतंत्रच झाला. त्याला वठणीवर आणण्यासाठीं गाझी बेग यानें हिंदूखान हे धेडगुजरी नांव धारण करणाऱ्या एका सरदाराला पाठविलें. त्या काळीं दक्षिण सिंधांत दोन्ही धर्माचं फार मिश्रण झालें होतें हे उघड आहे. कित्येक तर्खान जातींतील लोकांचे विवाहसंबंध समेजा रजपुतांशी होत असत. खुद्द गाझी बेग यानें जाम दाउदच्या मुलीशीं लग्न केलें. इ. स. १६१२ मध्यें मिर्झा जानी बेग याचा खून झाला व त्याला ठठ्ठा येथील मकली टेकडीवर त्याच्या बापाच्याच कबरस्थानांत पुरण्यांत आलें. दोघेही पितापुत्र कवी व प्रख्यात संगीतज्ञ होते. त्यामुळे पुत्ररत्नाची इच्छा असणारे भाविक लोक या कबरस्थानाशी जाऊन गाणी म्हणत व वाद्ये वाजवीत.
जानी बेगच्या मरणानंतर जरी खुस्रो खान यानें ठठ्ठा येथें सत्ता बळकावली व कित्येक विहिरी, मशिदी व पूल बांधले तरी जहांगीर बादशहानें त्याची सत्ता मानली नाहीं व स्वतःचे वेगळे सुभेदार नेमले. तर्खानांचें राज्य संपुष्टांत येऊन दिल्लीच्या सुभेदारांची सत्ता चालू झाली. नादीरशहाची हिंदुस्थानावर इ. स. १७३९ मध्यें स्वारी झाली, तोपर्यंत निदान ४० सुभेदार तरी नेमले गेले असें दिसतें. या काळांतच बापाशीं भांडलेल्या शहाजहानानें कांहीं दिवस ठठ्ठा शहरांत आपला तळ दिला व पुढे स्वतः बादशहा झाल्यावर तेथें भव्य जुम्मा मशीद बांधली. दिल्लीचे सुभेदार नांवाचे सत्ताधारी असले तरी ठिकठिकाणचे हिंदुमुसलमान सरदार व राजे यांच्याच हातांत खरी सत्ता होती. याच काळांत उत्तर सिंधामध्यें दाऊद पुत्र या घराण्याचा उदय झाला. त्यांचा मूळ पुरुष दाऊद हा २०० वर्षे जगला म्हणातत! त्याच्या वंशजांना दाऊदपुत्र म्हणून ओळखूं लागले. या वंशांतला एक पुरुष बहादरखान याला शिकारीचा फार शोक होता. त्यावरून त्याचें व माहर जातीचा पुढारी शेरखान याचे भांडण झालें. त्या दोन जातींत झालेल्या लढाईमध्यें दाऊदपुत्रांचा विजय झाला. त्यांनी जंगलाचा काही भाग तोडून साफ केला व तेथें इ. स. १६१७ मध्ये शिकारपूर शहराची स्थापना केली. यानंतर दाऊदपुत्रांनी पुष्कळ बरेवाईट दिवस पाहिले व शेवटीं उदयोन्मुख कल्होरा घराण्याचा पुढारी नूर महमद यानें त्यांना सिंधामधून घालवून दिलें.
हें कल्होरा घराणें खरोखरी दाऊदपुत्रांचीच एक शाखा होय. या घराण्यांतील पुरुषांच्या साधुवृत्तीमुळे त्यांना मियां असें अभिधान मिळालें. कित्येक पिढ्या या घराण्याचे लोक लारखाना येथे रहात असत. या घराण्यांतील यार महमद खान याला इ. स. १७०१ मध्ये दिल्लीच्या बादशहानें शिबी व शिकारपूर येथील सुभेदार केलें. त्याच्या नंतर त्याचा मुलगा मिया नूर महमद हा सुभेदार झाला. यानेंच दाऊद पुत्रांना सिंधमधून घालवून दिलें व सबंध प्रांतावर आपला अंमल बसविला. पण इ. स. १७३९मध्ये इराणचा राजा नादीरशहा याची हिंदुस्थानवर स्वारी झाली. त्यानें दिल्लीत प्रवेश केला व तेथील बादशहा महमदशहा याला तह करण्यास भाग पाडलें. त्या तहाप्रमाणें सिंधू नदीच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत नादीरशहाला मिळाला. नूर महमदानें नादीरशहाचें वर्चस्व न मानण्याचा निश्चय केला व तो उमरकोट येथें जाऊन राहिला. हें ऐकल्यावर नादीरशहानें अचानकपणें उमरकोटवर चाल केली व नूरमहमदाला कैद करून आपल्याबरोबर लारखाना येथे आणले. तेथें एक कोट रुपये खंडणी घेऊन नादीरशहानें त्याला ठठ्ठाचें राज्य दिलें. शिकारपूरचें राज्य दाऊदपुत्रांना मिळाले व शिबीचें आधिपत्य एका अफगाण सरदाराला देण्यांत आलें.
अशा रीतीनें दाऊदपुत्रांना पुन्हां एकदां सिंधप्रांतांत थारा मिळाला पण तो फार दिवस टिकला नाहीं. नादीरशहाचा खून झाल्यानंतर कंदाहारचा राजा अहमदशहा दुराणी हा स्वतंत्र झाला. त्याच्या सैन्याशी झालेल्या लढाईत दाऊदपुत्र जिवावर उदार होऊन लढले. पण त्यांचा पार पराभव झाला व त्यांचा नेता सादीक महंमद मारला गेला. इकडे कल्होराच्या नूरमहंमदाकडे अहमदशहा दुराणी यानें खंडणीची मागणी केली व नूर महंमद तिकडे लक्ष देईना असें पाहून अहंमदशहा सैन्यानिशीं सिंधात दत्त म्हणून उभा राहिला. नूर महंमदानें आपला हिंदु दिवाण गिडुमल याला नौशारो येथें अहंमदशहाचा राग शमविण्यास पाठविलें. त्याचें पुढें काय झालें हें माहीत नाहीं. पण १७५५ मध्यें नूर महंमद जेसलमेर येथें पळून गेला व तेथेंच वारला. त्याच्यानंतर दिवाण गिडुमल याच्या खटपटीने त्याचा मुलगा महंमद मुराद यारखान हा सुभेदार झाला. पण तो फार जुलमी निघाल्यामुळे सरदारांनी त्याला पदच्युत करून मुलाम महंमद कल्होरा याला सुभेदार नेमलें. हा जरी गणिकेचा मुलगा असून अक्षरशत्रु होता तरी तो कर्तबगार होता व तलवारीच्या जोरावर त्यानें आपलें राज्य मिळविलें व टिकविलें. त्यानें आपली सत्ता दक्षिणेकडे समुद्रापर्यंत नेली व शहा बंदर हे नवें बंदर वसविलें. याच्याच कारकीर्दीत ईस्ट इंडिया कंपनीनें ठठ्ठा येथें आपली वखार उघडली. १७६८ मध्ये गुलामशहानें नेरनकोट येथें नवी राजधानी वसविण्याचा निश्चय करून एक किल्ला बांधला व त्याला हैदराबाद हे नांव दिलें. चार वर्षे या नव्या राजधानीत राहिल्यावर तो मरण पावला. त्याचें कबरस्थान तेथेंच आहे.
त्याच्यानंतर त्याचा मुलगा सर्फराझखान हा गादीवर आला. कल्होरांच्या राज्यांत तालपूरचें मीर घराणें फार प्रबळ व तितकेंच नेकदार म्हणून प्रसिद्ध होतें. पण कोणी तरी सर्फराझखानाच्या मनांत त्यांच्याबद्दल किल्मिष उत्पन्न केलें. त्यामुळे १७७४ मध्ये सर्फराझखानानें मिरांचा वृद्ध मुख्य पुरुष बहराम व त्याचा मुलगा यांचा विश्वासघातानें आपल्या समक्ष खून करविला. बहरामाचा दुसरा मुलगा मीर बिजार हा मक्केहून परत येत असतां त्याला हें भयंकर वृत्त कळले. तेव्हां त्यानें बलुची सैन्य जमा करून कल्होरांचा नवा राजा गुलाम नबी याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव केला. गुलाम नबी लढाईत मरण पावल्यामुळें त्याचा भाऊ अबदुल नबी हा गादीवर आला. यानें गोड बोलून मीर बिजारला आपल्या अंकित ठेवलें. पण शूर मीर बिजार डोईजड होतो असे वाटल्याबरोबर अबदुल नबीनें विश्वासघातानें त्याचा खून करविला. पण तालपूरच्या मीरांचा नवा प्रमुख मीर अबदुल्ला हाही बिजारप्रमाणेंच शूर असल्यामुळे अबदुल नबीला शेवटीं शेवटीं पळून जावें लागलें. त्यानें कलातच्या खानाच्या मदतीने राज्य परत मिळविण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ झाला. व त्याला तालपूर मीरांच्या पुढेच नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. दिलदार मीरांनी त्याला पुन्हा राज्य दिलें पण तो इतका नीच कीं, त्यानें संधि सांपडतांच मीर अबदुल्ला व मीर फत्तेखान यांचा वध करविला. आतां मात्र त्याच्या पापाचे शंभर घडे भरले. मीर व बलुची लोकांनीं मोठें सैन्य उभारून त्याचा पुरता पराभव केला व तो जोधपूरच्या राजाकडे जिवानिशीं पळाला.
कल्होरा राजवट एकूण ८२ वर्षे टिकली. त्या काळांत सिंधप्रांताच्या राजकीय घटनेत मोठा फरक घडून आला. कित्येक शतकें सिंधमध्यें दोन स्वाभाविक राजकीय सत्तेचीं केंद्रे असत. दक्षिणेमध्यें ठठ्ठा व उत्तरेकडे बक्करचा किल्ला; यांपैकीं ठठ्ठा हे परचक्रापासून बहुधा अलिप्त असे. उमकरकोट वगैरे ठिकाणीं हिंदु राजे असत व त्यांच्या हातांत सत्ताही पुष्कळ असे. बऱ्याचशा मुसलमान सरदारांचा विवाहसंबंध रजपुतांशी झाल्यामुळे हिंदू व मुसलमान यांची पुष्कळच एकी झालेली होती. पण कल्होरा अमलदारांचा सक्कर व शिकारपूर या उत्तरेकडील शहरांशी संबंध सुटल्यापासून ते सिंधाच्या दक्षिण व पूर्व भागाकडे जास्त लक्ष घालूं लागले व त्यामुळे हिंदु राजांची सत्ता त्यांनी हलके हलके आत्मसात केली. शिवाय हैदराबादला महत्त्व आल्यामुळे ठठ्ठा, शेहवान हीं गांवें मागे पडली. हिंदूंचा छळ फार होऊं लागल्यामुळे जुन्या व्यापारी व औद्योगिक शहरांना उतरती कळा लागली. लेफ्टनंट पॉटिंजर यानें असें लिहिलें आहे कीं 'अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे नादिरशहा दिल्लीहून ठठ्ठा येथें आला तेव्हां ठठ्ठा शहरांत ४०००० कोष्टी, २०००० इतर कसबी हरहुन्नरी लोक आणि ६०००० पेढीवाले, दुकानदार, धान्याचे व्यापारी, इतकी प्रचंड वस्ती होती. पण आतां मात्र पुरती २०००० माणसें तेथें नाहींत' हिंदूंचा छळ होण्याचे एक मोठें कारण म्हणजे बलुची लोकांचें वाढतें प्राबल्य हे होय. बलुची शूर लढवय्ये व कडवे धर्माभिमानी असल्यामुळे हिंदूंना ते लष्करी पेशा द्यावयास तयार नव्हते व व्यापारांतही हिंदूंच्या मार्गांत अडचणी आणीत. पण कारकुनीचें काम बलुच्यांना मुळींच साधत नसे व त्यासाठी त्यांना या बाबतींत निष्णात असलेल्या हिंदूंचीच मदत घ्यावी लागे. मात्र त्यांचा पदोपदीं मानभंग करण्याची संधी बलुची लोकांनी कधींच दवडली नाहीं. अशा अपमानास्पद परिस्थितींत हिंदू लोक सिंध प्रांतांत राहिले कसे याचेंच आश्चर्य वाटतें. मीर अल्ली मुदार याला औषधोपचार करण्यासाठी हैदराबादेस १८३० सालीं गेलेला डॉ. बर्न्स म्हणतो: "माणसाची आपल्या जन्मभूमीबद्दलची प्रीति हेच हिंदूंच्या सिंधमधील वास्तव्याचें कारण दिसतें. त्यांची फार चीड येण्यासारखी मानहानि होत असे. त्यांना मुसलमानांप्रमाणें दाढ्या ठेवाव्या लागत. त्यांना घोड्यावर बसण्याची मनाई असे. कोणीही दोन मुसलमानांनीं साक्ष दिली कीं अमुक हिंदूनें कुराणांतील वाक्य म्हटलें कीं त्याची सुंता करणें कायदेशीर मानण्यांत येई" यामुळे कित्येक हिंदू कुटुंबें सिंध प्रांत सोडून गेलीं तर कित्येकांनी मुसलमानी धर्म स्वीकारला.
तालपूरच्या मीरांपैकी पहिला राजा मीर फत्ते अल्लीखान हा होता. पण कांहीं इतर तालपुरांनीं आपलीं स्वतंत्र राज्य स्थापिली. फत्तेअल्लीचा भाचा मीर सोराब हा खैरपूर येथें राज्य करूं लागला व मीर तारा यानें मिरपुरखास ही आपली राजधानी केली. कंदाहारच्या राजाकडून बरेच दिवस सुभेदाराची सनद फत्तेअल्लीला मिळाली नाही. पण पुष्कळ खटपट केल्यावर व २४ लाख रुपये दिल्यावर कंदाहाराच्या राजानें त्याला सनद पाठविली व मग फत्तेअल्ली हैद्राबादच्या तक्तावर चढला. त्यानें आपले तिघे बंधू गुलामअली, करमअल्ली व मुरादअल्ली यांना राज्यकारभारांत भाग दिला व हे चौघे मित्र किंवा 'चार यार' गुण्यागोविंदानें सिंधावर राज्य करूं लागले. फत्तेअल्ली १८०२ मध्ये मरण पावला व दुसरा भाऊ गुलामअल्ली हा शिकार करीत असतां काळवीटाची शिंगे लागून १८१४ मध्ये वारला. या मीरांचें राज्य कल्होरांपेक्षां पुष्कळच सुव्यवस्थित व लोकहिताला जपणारें असें झालें. १७९५ साली मीरांनी कराचीबंदर आपल्या ताब्यांत घेतलें. कल्होरा राजांनी कराची कलातच्या खानाला देऊन टाकलें होतें. पण आतां तें सिंधातील सर्वांत मोठे व भरभराटलेलें बंदर झाले व तेथील हिंदू व्यापाऱ्यांनी शहराला चांगली तटबंदी करून शहरावर झालेले दोन हल्ले परतवून दिले. तिसऱ्या खेपेला मात्र त्यांचा निभाव लागेना म्हणून व्यापाऱ्यांनी आपला मान संभाळून कराची शहर तालपूर मीरांच्या हवाली केलें.
इ. स. १८०३ मध्यें अफगाणिस्थानचा राजा सुजा उल्मुल्क यानें सिंधावर स्वारी केली पण वार्षिक खंडणी देण्याचें मीरांनीं कबूल केल्यावर तो परत गेला. १८१३ मध्ये पूर्वेकडील भाग पुन्हां मीरांच्या ताब्यांत आला. त्यांनीं उमरकोट घेतलें व थरपारकरच्या लोकांवर जरब बसविण्यासाठीं इसलामकोट व फत्तेगड हे किल्ले बांधले. १८२४ मध्ये त्यांनीं शिकारपूर घेतलें. हे शहर हिंदुस्थानांतून मध्य आशियांत जाणाऱ्या व्यापारी हमरस्त्यावर असल्यामुळे तें आतां मध्य आशियांतील प्रसिद्ध व संपन्न अशा व्यापारी पेठांपैकी एक झालें होतें. त्यांत येणाऱ्या मालावरील जकातीचें उत्पन्न आपल्याला मिळावें अंशी मीरांची कित्येक दिवस इच्छा होती. शेवटीं शीखांची शिकारपूरवर स्वारी होणार या हुलीचा फायदा घेऊन मीरांनी शहराचं संरक्षण करण्यासाठीं म्हणून सैन्य जमविलें व एकदां शिकारपूर हातांत आल्यावर त्यांनी तें सोडलें नाहीं. तेथील जकातीचें उत्पन्न खैरपूर व हैदराबादच्या मीरांना आपआपसांत वांटून घेतलें.
पूर्वी आपण पाहिलेच आहे कीं, गुलामशहा काल्होराच्या कारकीर्दीत १७५८ साली ईस्ट इंडिया कंपनीनें आपल्या वखारी ठठ्ठा व औरंग बंदर येथें उभारल्या. पण सर्फराझ खानाच्या जाचक राज्यामुळे १७७५ सालीं कंपनीनें आपल्या वखारी उठविल्या. १७९९ मध्ये मीर फत्ते अल्लीखान राज्यावर असतांना पुन्हां ईस्ट इंडिया कंपनीशी वाटाघाटी सुरू झाल्या व क्रो या कंपनीच्या इसमाला त्यानें कराची येथें घर बांधून रहाण्यास परवानगी दिली. पण कांहीं कारणानें त्यानें आपले मत बदलले व क्रोला कराची सोडावी लागली. यामुळें कंपनीला एक लाख रुपयांची खोट बसली. पण याच वेळीं नेपोलियन बोनापार्टाच्या इराणांतील राजकारणाला शह देण्यासाठी कंपनीनें मागील नुकसानीबद्दल ब्र न काढतां मीराशी १८०९ मध्ये तह केला. पण पहिल्यापासूनच मीरांच्या मनांत कंपनीच्या हेतूंबद्दल साशंकता होती. या तहाप्रमाणें फ्रेंच लोकांना सिंध प्रांतांत येण्याची बंदी करण्यांत आली व मुंबई आणि हैदराबाद येथें एकमेकांचे वकील राहू लागले. त्यामुळे कंपनीचा व्यापार सिंध प्रांतांत सुरू झाला. १८२० मध्ये पुन्हा तह झाला त्याप्रमाणें सर्व युरोपियन व अमेरिकन लोकांना सिंधात येण्याची मनाई करण्यांत आली. मीर व कंपनी यांच्या प्रजाजनांना एकमेकांच्या प्रांतांत राहाण्याची मुभा मिळाली व मीरांनी बलुची लोकांचा बंदोबस्त करून त्यांना कच्छवर स्वारी करण्यास सवड देऊं नये असें ठरलें. पुढें सिंधु नदीची पाहणी करण्यास येणाऱ्या इंग्रज लोकांना त्रास पोहोंचू नये अशीही जबाबदारी मीरांच्यावर घालण्यांत आली. महत्त्वाची सवलतही कंपनीला देण्यांत आली ती अशी की, इंग्रज कंपनीचा पास जवळ असलेल्या व्यापाऱ्यांवर मीरांनी जकाती बसवूं नयेत. यामुळे मुंबईहून परदेशी माल सिंध प्रांतांत मोठ्या प्रमाणावर जाऊं लागला व परदेशी जिनसा हैदराबाद व शिकारपूरच्या बाजारांत विकल्या जाऊं लागल्या. मीर करीम अल्लीच्या कारकीर्दीत लढाया किंवा दंगेधोपे कांहींच न झाल्यामुळे राज्यांत शांतता व समृद्धता नांदूं लागली. तालपूरचे मीर हे ललितकलांचे भोक्ते होते. त्यामुळे त्यांनीं सर्व तऱ्हेच्या कसबी व कलाकुसरीचें काम करणाऱ्या लोकांना हैदराबादेस आसरा दिला. इराणचा शहा व मीर यांचे परस्पर संबंध सलोख्याचे होते व इराणचा वकील हैदराबादेस येऊन राहिला. साबीत अल्लीसारखे प्रख्यात कवी आणि सय्यद महंमद रशीद सारखे साधु पुरुष त्यांच्या वास्तव्यानें हैदराबादेला फार सुसंस्कृत असें स्वरूप आलें. मीर करीमअल्ली व मुंबई सरकार यांची फार दोस्ती जमली. सर जॉन माल्कम व माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनीं मीरांना सन्मानानें वागविलें. कंदाहारचा राजा शहा सुजा हा जेव्हां आपलें राज्य गमावून हैदराबादला पळून आला तेव्हां मीरांनी त्याला आदरानें व अगत्यानें वागविले व त्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाण सैन्याला १२ लाख रुपये देऊन परतविलें. पंजाबचा सिंह रणजितसिंग याचा सिंधावर स्वारी करण्याचा बेत दिसतांच इंग्रज कंपनीच्या मध्यस्थीनें मीरानीं त्याला शांत केलें. डॉ. बर्न्स (ज्याचें कल्होरा राजवटीबद्दलचे मत नुकतेच उद्धृत केलें आहे) हा मीर मुरादअल्लीला औषधोपचार करण्यास आला व त्यानें मीराला बरें केलें. यामुळेही मीर व कंपनी यांची दोस्ती जास्त निकट झाली.
मीर करीमअल्ली १८२८ मध्ये वारला. त्याच्या मागून चार मीरांतला शेवटला भाऊ मीर मुरादअल्ली हा हैदराबादच्या गादीवर बसला. त्यानें पांचच वर्षे राज्य केलें,पण तीं वर्षे अत्यंत शांततेचीं व भरभराटीचीं अशीं गेलीं. या सुमाराला सिंधप्रांताला आंतरराष्ट्रीय महत्त्व आलें होतें. इराणचा शहा फत्तेअल्ली याच्याशीं मीर मुरादचे संबंध इतक्या सलोख्याचे झाले की शहानें मुरादला आपली मुलगी देऊ केली, पण मुरादनें आपला वृद्धापकाळ आला असल्यामुळे तिचा स्वीकार केला नाहीं. अफगाणिस्थानशीं सिंधाची यावेळीं मैत्री झाली होती व इंग्रजांशीही तितकीच दाट मैत्री झाली. सर जॉन माल्कम व माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मीराशीं सलोख्यानें व आदरानें वागत. पंजाबचा रणजितसिंग, कच्छ व जेरुलमीरचे राणे, मस्कतचा इमाम व मक्केचा शरीफ यांचे वकील हैदराबादेस येऊन मीरांच्या दरबारीं राहिले होते. मीर मुराद अल्लीने स्वतःच्या नांवानें नाणे पाडलें व त्यामुळे त्याला स्वतंत्र राजाचा मान प्राप्त झाला. १८३२ साली इंग्रजांशी तह झाला त्याच्या कलमांप्रमाणें हिंदुस्थानांतील व्यापारी यांना जकाती देऊन सिंधू नदीचा व सिंधप्रांतांतील रस्त्यांचा उपयोग करण्याची सवलत मिळाली; पण सिंधुनदीतून युद्धसामुग्री पाठविण्यास मनाई करण्यांत आली व इंग्रज व्यापाऱ्यांनीं सिंधात कायम वस्ती करून राहूं नये असे ठरले. याच नमुन्याचा तह इंग्रज कंपनी व खैरपूरचे मीर यांच्यामध्येही झाला.
मीर मुराद अल्लीच्या मृत्यूनंतर त्याचे दोघे मुलगे व दोघे पुतणे. असे चौघेजण पुन्हां कारभार पाहूं लागले. त्या सर्वांत वडील मीर नूरमहंमद याला ते आपला पुढारी मानीत. नूर महमद हा बापाप्रमाणेंच कर्तृत्ववान् होता, पण स्वार्थी व पैशाचा लोभी होता. या शेवटल्या चार मीरांच्या कारकीर्दीतील पहिली मुख्य गोष्ट म्हणजे इंग्रज सैन्याचा सिंध प्रांतांत प्रवेश ही होय. १८३५-३६ च्या सुमारास अफगाणिस्थानच्या दुराणी राज्याचीं छकलें झालीं व शहासुजा उल्मुल्क हा पळून हिंदुस्थानांत आला. रणजितसिंगानें या संधीचा फायदा घेऊन काश्मीर व मुलतान जिंकून घेतलें व १८३६ मध्ये सिंधवर स्वारी करून शिकारपूर घेण्याचा घाट घातला. मीरांनी इंग्रजांकडून रदबदली केली पण त्यामुळे त्यांना एक इंग्रज अधिकारी हैदराबाद येथें ठेवून घ्यावा लागला. पुढे रशियाचा अफगाणिस्थानावर डोळा आहे. अशी भीति लॉर्ड ॲकलंड याला वाटल्यामुळे त्यानें शहा सुजा याला अफगाणिस्थानच्या गादीवर बसविण्याचें ठरविलें. त्या बाबतींत शहा सुजा, रणजितसिंग व इंग्रज कंपनी यांचा करार झाला; त्याप्रमाणं शहासुजानें सिंधावरील आपला सगळा ताबा सोडून दिला व मीरांनी इंग्रज सांगतील ती खंडणी त्यांना द्यावी असें कबूल केलें. पण सुजानें ही गोष्ट मात्र लपवून ठेवली की, मीरांनीं त्याची खंडणी आधींच भागवली असल्यामुळे त्याचा आतां सिंधावर कोणत्याही प्रकारचा ताबा राहिला नव्हता, आणि तसें त्यानें शिकारपूर येथें कुराणावर लिहून दिलें होतें! त्यामुळे इंग्रजांनी आतां ज्या मागण्या केल्या त्या साहाजीकच मीरांना अन्यायाच्या वाटल्या; तरीपण इतर मीरांच्या मताविरुद्ध व १८३२ च्या तहांच्या अटीविरुद्ध मीर नूरमहंमद यानें इंग्रज सैन्य व युद्धसामुग्री सिंधू नदींतून उत्तर सिंधांत आणूं दिली व शिकारपूर तात्पुरतें इंग्रज सैन्याच्या हवाली केलें. पण यामुळे बलुची लोक बिथरले व त्यांनीं या इंग्रज सैन्याच्या हालचालीला अडथळा करण्याचे निष्फळ प्रयत्न केले. जर जॉन कीन हा काबूलला जाण्यासाठी जहाजांतून कराची येथें आला तेव्हां मनोऱ्यातील बलुची सैन्यानें तोफा उडविल्या. याचा परिणाम इतकाच झाला की मीरांना इंग्रजांची माफी मागावी लागली व नव्या तहाप्रमाणे २३ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून इंग्रजांना द्यावे लागले. खेरीज ३०० इंग्रज फौजेला कराची येथें राहूं यावें लागलें व तीन लाखांची वार्षिक खंडणी राज्यावर बसली. अशा तऱ्हेनें मीरांच्या स्वातंत्र्याला हळूहळू ग्रहण लागत चाललें.
१८४० साली मीर नूरमहमद मरण पावला व सर्व बलुची सरदारांनी त्याचा भाऊ नशीरखान याला मुख्य मीर म्हणून नेमलें. आतांपर्यंत इंग्रजांनी मिळविलेलें प्राबल्य जरी मीरांना मनांतून आवडत नव्हतें तरी बाहेरून तरी त्यांच व इंग्रजांचे संबंध मित्रत्वाचे होते. याचें बरेचसें श्रेय मेजर औटरॅम या इंग्रज अंमलदाराच्या सौजन्याला दिले पाहिजे. १८३२ मध्यें लॉर्ड एलनबरो यानें सर चार्लस नेपियर याला सिंधांत कंपनीचा सर्वाधिकारी म्हणून नेमलें. नेपियरने सिंधांतील परिस्थिति लक्षांत आणून इंग्रजांचे धोरण स्पष्टपणे सांगितलें 'सिंध ताब्यांत घेण्याचा आम्हांला हक्क नाहीं, पण आम्ही सिंध घेऊंच व ही बदमाषगिरी खरोखरी अत्यंत फायदेशीर, उपयुक्त आणि परोपकारी अशी होईल' "We have no right to seize sind, and yet we shall do so, and a very advantageous, humane and useful piece of rascality it will be" नेपियर १० सप्टेंबर १८४२ रोजी कराची येथे उतरला व लागलीच सक्करच्या रोखाने निघाला. वाटेंत हैद्रराबाद येथे थांबून त्यानें मीरांची गांठ घेतली व त्यांना दम दिला की पूर्वीचीं धरसोडीचीं धोरणें आतां चालणार नाहींत. मेजर औटरामच्या काळांत मीरांशीं नेहेमीं आदबीनें व दरबारी थाटानें इंग्रजांच्या मुलाखती होत. पण नेपियरची लष्करी व हडेलहप्पी पद्धत पाहून मीर बिथरले व इंग्रजांच्या हेतूंबद्दल त्यांचा संशय दुणावला. इकडे नेपियरनें सक्करला पोहोंचल्याबरोबर आपल्या सैन्याची लढाईच्या दृष्टीनें उत्तम तयारी करण्यास सुरवात केली. हे चालूं असतां खैरपूरचा मीर मुरादअल्ली हा नेपियरकडे आला. आपला चुलता मीर रुस्तूम हा आपला हिस्सा आपल्याला न मिळू देण्याच्या खटपटीत आहे अशी त्यानें नेपियरकडे तक्रार केली. तेव्हां नेपियरनें त्याला आश्वासन दिलें कीं, मीर रुस्तुमच्या मृत्यूनंतर त्यालाच मुख्य मीर म्हणून इंग्रज कंपनी मानील. यानंतर मीर अल्लीमुराद हा इंग्रजांचा पक्का दोस्त बनला.
डिसेंबर १८४२ मध्यें नेपियरने नव्या तहाचा मसुदा तयार केला व तो खैरपूर व हैदराबाद येथील मीरांकडे एकाच वेळी पाठवून दिला; या मसुद्याप्रमाणें मीरांनीं कराची, ठठ्ठा, सक्कर, बक्कर आणि रोहरी हीं शहरें कायमची इंग्रजांना देऊन टाकावीं व रोहरीच्या उत्तरेचा बराच मोठा प्रदेश इंग्रजांचा दोस्त भावलपूरचा नबाब याला यावा असें ठरविलें होतें. असल्या कडक अटींना मीरांकडून विरोध व्हावा हें स्वाभाविक होतें. डिसेंबर ७ रोजी खैरपूरच्या मीरांनी मोठ्या नाखुषीनें तहाला संमति दिली. त्याबरोबर नेपियरनें जाहिरनामा काढून रोहरीच्या उत्तरेच्या प्रांतांवर आतां मीरांचा कांहीं हक्क नाहीं असें जाहीर केलें व स्वतः आपल्या सैन्यानिशी सिंधू नदी उतरून खैरपूरकडे येऊ लागला. यामुळे खैरपूरचा वृद्ध मीर रुस्तुम हा घाबरला व आपला भाऊ अल्ली मुराद आणि इंग्रज यांचा आपल्याला मारण्याचा बेत आहे अशा भीतीनें थरच्या वाळवंटांत पळून गेला. अल्ली मुरादनें ताबडतोब खैरपूरचा ताबा घेतला. यामुळे त्याच्यावर नाराज असलेले बलुची सरदार बिथरले व अल्ली मुरादला पदच्युत करण्याचा त्यांनीं निश्चय केला. उलट अल्ली मुरादलाच मीर म्हणून कायम करण्याचा नेपियरनें निश्चय केला.
इकडे मेजर औटरॅम हा आपले वजन खर्च करून तहाच्या अटी हैदराबाद मीरांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करीत होता. पण नेपियरनें युद्धाची तयारी चालविल्याबद्दल व वृद्ध मीर रुस्तुमला हाकून दिल्याबद्दलच्या बातम्या हैदराबादेस सारख्या थडकत असल्यामुळे मीरांना इंग्रजांच्या हेतूंबद्दल विश्वास वाटेना. शेवटीं मोठ्या मिनतवारीनें त्यांनी औटरॅमवर विश्वास ठेऊन फेब्रुवारी १२, १८४३ रोजी तहाच्या मसुद्यावर मोहोर केली. पण हें बलुची सरदारांना कळल्याबरोबर ते खवळले व ८०० बलुच्यांनी हैदराबाद येथील इंग्रज वकिलातीवर हल्ला केला. औटरॅम वगैरे मंडळी मोठ्या शर्तीनें वांचली व बोटींत बसून नेपियरच्या सैन्याकडे गेली.
आतां लढाईवर काम आलें व नेपियर आपल्या २८०० लोकांच्या सैन्यानिशीं दक्षिणेकडे निघाला. मीरांनीं आपली २२००० फौज हैदराबादपासून ९ मैलांवर मियानी येथें फुलेली कालव्याच्या कांठी सज्ज केली होती. आणखी कुमक येण्यासाठीं थांबलें तर मीरांचा आत्मविश्वास बळावेल व त्यांचे सैन्यही फुगेल ही भीति असल्यामुळे नेपियरनें १७ फेब्रुवारीला सकाळीं शत्रुसैन्यावर चाल केली. बलूची लोक शौर्यानें लढलें पण त्याच्या तलवारी व तोड्यांच्या बंदुका यांचा इंग्रज सैनिकांच्या संगिनी व नव्या बंदुका यांच्यापुढे काय निभाव लागणार? त्यांचा पुरता धुव्वा उडाला व त्यांचा सर्व दारूगोळा, निशाणें व सामुग्री इंग्रजांच्या ताब्यांत सांपडली. ५००० बलुची कामास आले व २५७ इंग्रज मृत्युमुखी पडले. लढाईनंतर खैरपूर व हैदराबादचे सगळे प्रमुख मीर नेपियरला शरण आले. नेपियर लागलींच हैदराबादेकडे निघाला व १९ फेब्रुवारीला त्यानें हैदराबाद ताब्यांत घेतलें. मीरांना त्यानें कैदेत ठेऊन क्रूरपणें वागविलें ('treated them rather brutally'). पण अद्याप मिरपूरचा मीर शेर महंमद यानें तहाच्या अटी मान्य केल्या नव्हत्या. तो २०००० सैन्यानिशीं आतां नेपियरला लढाई देण्यासाठी आला. लढाईच्या अगोदर त्याचा जासूद नेपियरकडे आला व त्यानें शेर महंमदाचा निरोप सांगितला, "इंग्रजानी घेतलेला सर्व मुलख परत दिला तर त्यांना जिवानिशीं परत जाण्यास परवानगी देऊ." जासूद हा निरोप सांगत असतांना संध्याकाळची तोफ उडाली. त्याबरोबर नेपियर म्हणाला, "हा तोफेचा आवाज ऐकलात ना? हेंच माझें तुमच्या धन्याला उत्तर!" २२ मार्च रोजी दोन्ही सैन्यांची नरेजा खेड्याजवळ गांठ पडली. बलुची सैन्य अत्यंत निकटानें व शौर्यानें लढलें. पण इंग्रजांचीं सुधारलेली शस्त्रास्त्रें व लष्करी शिस्त यांचाच शेवटीं विजय झाला.
या लढाईच्या अगोदरच १२ मार्च रोजी लॉर्ड एलनबरो यानें सिंधप्रांत खालसा केल्याचा जाहीरनामा काढला व मीरांना कैद करून मुंबईस आणावें असा हुकूम सोडला. शेर महंमदाचा अजून पुरा मोड झाला नव्हता व त्यानें १३ जून रोजी इंग्रजांना पुन्हा एकदां तोंड दिलें. पण त्यांतही त्याला अपयश येऊन तो नदीपार उतरून देश सोडून पळाला. पुढ़ें कांहीं वर्षांनीं तो इंग्रजांच्या स्वाधीन झाला व त्याला वर्षासन देण्यांत आलें. हैदराबाद व खैरपूरच्या मीरांना राजकीय कैदी म्हणून प्रथम पुणे येथें व मग कलकत्ता आणि हजारीबाग येथे ठेवण्यांत आलें. पण सिंधप्रांत जिंकल्यापासून १० वर्षांत सर्वत्र इतके स्थिरस्थावर झालें कीं मीरांना परत सिंधांत येऊन राहण्याची परवानगी देण्यांत मुळींच धोका राहिला नाहीं म्हणून १८५४ सालीं मीरांना सिंधांत परत येऊं दिलें व त्यांना चांगलीं वर्षासने देण्यांत आली.
तालपूरच्या मीरांचें राज्य एकंदर ६० वर्षे टिकलें, त्यांची राज्यपद्धति युरोपांतील 'फ्यूडल' म्हणजे सरंजामी राज्यपद्धतिसारखी होती. त्यांनी एखादा मुलख मिळविला म्हणजे ज्या बलुची सरदारांनी मुलख मिळविण्यांत मोठी कामगिरी केली त्यांना तो जहागीर म्हणून देण्यांत येई. त्याचा मोबदला म्हणून सरदारांनी ठराविक फौजफाटा जरूर तेव्हां मीरांच्या दिमतीला द्यावा असा करार होई. यामुळे मीरांच्या जवळ स्वतःची अशी खडी फौज फार थोडी असे व सरदाराची अनुमति असल्याखेरीज त्यांना लढाईचें धोरण स्वीकारतां येत नसे. सगळ्या सरदारांची फौज जमा झाली म्हणजे ५०००० सैन्य उभारतां येई खरें, पण प्रत्येक शिपायाला रोज २ आणे व घोडेस्वाराला ४ आणे वेतन मीरांनीं यावें असा शिरस्ता असल्यामुळे अगदीं जरूरच पडल्याशिवाय मीर या सैन्याला बोलावत नसत व त्यामुळे चढाईच्या व लढाईच्या धोरणाला आपोआपच आळा बसत असे. जमीनमहसूल जमीनदारी पद्धतीचा होता. दरसाल जमीन जमीनदारांना करण्यासाठी देण्यांत येई. त्यांनी नदीकाठच्या जमिनीबद्दल सरकारला उत्पन्नाचा दोनपंचमांश इतका हिस्सा द्यावा व कालव्यावरील जमिनीबद्दल एक तृतीयांश हिस्सा यावा असे कांहीं ठोकळ नियम होते. धान्याखेरीज इतर पिकांचा वसूल पिकांच्याच रूपाने घेतला जाई. उत्पन्न किती झालें आहे वगैरे ठरविण्यासाठी कित्येक हिंदू अधिकारी नेमण्यांत येत. पुष्कळदां असें होई कीं, एक ठराविक रक्कम जमीनवसूल म्हणून देण्याच्या करारानें जमीन 'मक्तेदार' (Contractors or revenue farmers) यांना देण्यांत येई पण हे मक्तेदार गरीब रयतेकडून वाटेल तसा पिळून पैसा काढीत. मीरांना कराराप्रमाणें ठराविक वसूल येत असल्यामुळे ते या जुलमाकडे कानाडोळा करीत. देशाचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे असे. त्यांना 'कारदार' म्हणत व त्यांच्याकडे जमीनमहसूल व न्यायदान अशीं दोन्हीं कामें असत. कुराण हाच कायदा समजला जाई व त्याच्याप्रमाणें न्याय दिला जाई. मीर हे स्वार्थी व लोभी असले तरी क्रूर नव्हते. त्यामुळें राजकीय खून किंवा देहांत शिक्षा हे प्रकार त्यांच्या कारकीर्दीत फारसे झाले नाहींत. दंड, तुरुंगवास, फार तर शारीरिक अवयव तोडणे अशा त्यांच्या शिक्षा असत. दिव्य करून आपला निरपराधीपणा सिद्ध करण्याची मुभा (trial by ordeal) आरोपींना होती. कांहीं मुख्य शहरें सोडून दिल्यास पोलिसखातें अस्तित्वांतच नव्हतें. खेड्यापाड्यांत गुन्हे झाले तर गुन्हेगारांला पकडून देण्याची जबाबदारी गुन्हा झाला त्या खेड्यांतील लोकांवर असे. यामुळे ग्रामस्थ लोक या बाबतींत नेहेमी जागरूक असत.
मीरांची राजवट अनियंत्रित राजसत्ता (despotic rule) अशा स्वरूपाची होती खरी पण त्यामुळे जीवित व वित्त यांची सुरक्षितता सिंधवासीयांना अनुभविण्यास मिळाली. लेफ्टनंट जेम्स यानें चंदूका जिल्ह्याबद्दल लिहितांना असे नमूद केलें आहे. "मीराच्या काळी चोऱ्या फार क्वचित् होत. इंग्रज सरकारच्या अंमलाखालीं देखील त्याहून अधिक चोऱ्या होत आहेत." परराष्ट्रामध्यें सिंधप्रांताबद्दल चांगलाच वचक होता, पण मीरांनी महाराष्ट्रीय राजकारणांत कधींच ढवळाढवळ केली नाहीं. त्यांची खासगी राहाणी अत्यंत साधी व धार्मिक होती. हुक्का, अफू वगैरे व्यसनांपासून ते अलिप्त असत. त्यांचा पोषाख साधा पण स्वच्छ असे व एकंदरीनें स्वच्छतेवर त्यांचा फार कटाक्ष असे. ते जितके मानी होते तितकेच आतिथ्य धर्माचे पुरस्कर्ते होते. बहुमोल व रत्नखचित तलवारी, खंजीर वगैरे जमविण्याचा त्यांना फार शोक असे व तेवढ्यासाठीं त्यांनी कित्येक कसबी लोकांना हैदराबादेस आणून आश्रय दिला होता. पण त्यांना शिकारीचा इतका नाद होता की, मोठमोठे सुपीक प्रदेश शेतीखालून त्यांनी काढले व त्यांचे 'शिकारगे' केले. ते फार श्रीमंत असल्याबद्दल ख्याती होती, पण सिंध प्रांत खालसा होण्यापूर्वी त्यांचें वार्षिक उत्पन्न फक्त ३५ लाख असल्याचे आढळून आलें.
पण सिंध प्रांत इंग्रजांना इतक्या सहज रीतीनें मिळवितां आला व त्यांत स्थिरस्थावरता आणता आली याचे एक कारण हे कीं, मीर व त्याचे सरदार बलुची होते, तर सिंधची एकंदर प्रजा मुळची हिंदु व रजपूत, पण धर्मांतरानें मुसलमान झालेली अशी होती, त्यामुळे बलुची लोकांची अरेरावी वृत्ति त्यांना पसंत पडण्यासारखी नव्हती. इंग्रज सिंधमध्ये आले तेव्हां प्रजेनें त्यांना कधींच त्रास दिला नाहीं. उलट शक्य ती मदतच केली. प्रजेला मीरांबद्दल फारसा आपलेपणा वाटत नसल्यामुळें: त्यांची सत्ता नाहींशी झाली तरी देशांत कोणत्याही प्रकारची बंडाळी झाली नाहीं. मीरांच्या राज्यवृक्षाचीं मुळे सिंधात खोल गेलेली नसल्यामुळे तो वृक्ष उलथून पडला तरी जमीन दुभंगली नाहीं.
सिंध प्रांत खालसा झाल्यावर सर चार्लस नेपियर याला दरमहा आठ हजार रुपये पगारावर त्या प्रांताचा गव्हर्नर नेमण्यांत आलें. सेनापती या नात्यानें तडफ, कठोरपणा, दांडगा आत्मविश्वास वगैरे त्याचे जे सद्गुण होते, तेच प्रांताधिकारी या नव्या कामांत अवगुण ठरले. इंग्रजी इतिहासांत ड्यूक ऑफ वेलिंग्टन हा मुत्सद्याच्या भूमिकेत जसा अगदी निस्तेज पडला तसेंच कांहींसें नेपियरच्या बाबतींत झालें. नेपियरनंतर प्रांताधिकारी झालेला फ्रियर यानें सिंधात आल्याबरोबर लिहिलें आहे की, "सिंधांत एक मैलभरही कोठें खडीचा रस्ता नाहीं. दगडविटांनीं बांधलेला एकही पूल नाहीं. डाक बंगले, सराया, धर्मशाळा, कचेऱ्या, यांचें तर नांवच नको. मार्केट असे एकाच ठिकाणी बांधलेले आहे. पण न्यायकोर्टाला इमारत नाहीं; तुरुंग व पोलीस ठाणीं यांचा पत्ता नाहीं व ऑफिसांना इमारती लागतात याचीही जाणीव असलेली दिसत नाहीं." जॉन जेकब यानेंही म्हटलें आहे कीं, "कराची बंदरांतल्या धक्क्याशिवाय दुसरें एकही सार्वजनिक उपयोगाचे काम नेपियरच्या कारकीर्दीत झालें नाहीं." या गोष्टीचें मुख्य कारण असें दिसतें कीं, नेपियरला आपल्या खालच्या लोकांवर- ज्यांना प्रांताची खडान्खडा माहिती अशावर सुद्धां- विश्वास टाकतां येत नसे व त्यांच्याकडून गोडीनें काम करून घेतां येत नसे. स्वतः शिपाईगडी असल्यामुळे त्यांचे व राजकीय खात्यांतील अंमलदारांचें मुळींच सूत नव्हतें. एतद्देशीय हिंदी लोकांबद्दल तर त्याने एका निमसरकारी पत्रांत असें म्हटलें आहे, "हे लोक साऱ्या मुलखांतले लुच्चे असून पैसा हा त्यांचा देव आहे. राज्यकारभारखात्यांतील (Civil Administration) तरुण अधिकाऱ्यांविषयीं पहावें तर 'हे लोक मोठे उमदे प्राणी आहेत, डुकरांची शिकार करतात, शर्यती लावतात, दारू पितात आणि अशुद्ध हिंदुस्थानीमध्यें नेटिव्ह कारकुनांना हुकूम फर्मावतात!” तेव्हां राहातां राहिला नेपियर स्वतः व त्याचे लष्करी अधिकारी व त्यांच्याकडूनच सर्व कारभार उरकण्याचा त्यानें निश्चय केला. त्यामुळे कारभाराचा सगळा विचका झाला. ज्यांना त्या विषयांत काडीइतकेंही कळत नव्हतें अशा लष्करी अंमलदारांकडे कालवे व जंगल यांसारखीं महत्त्वाचीं खातीं देण्यांत आली. शिवाय नेपियरला स्वतः सगळ्या कामांत ढवळाढवळ करण्याची व हुकूम सोडण्याची सुलतानी खोड असल्यामुळे अधिकारीवर्गाला आपली बुद्धि चालविण्यास वावच मिळेना.
नेपियरनें सिंधचे कराची, हैदराबाद व शिकारपूर असे तीन जिल्हे केले. प्रत्येक जिल्ह्यावर कलेक्टर व दुय्यम कलेक्टर असे अधिकारी नेमले. यांच्या खालीं मीरांच्या वेळच्या 'कारदारांची' पूर्वीच्या निम्या पगारावर नेमणूक झाली! कलेक्टर व दुय्यम कलेक्टर यांना जमीनवसुलीच्या कामाबरोबरच न्यायदानाचाही अधिकार देण्यांत आला होता. पण त्यांनी दिलेला निकाल फिरविण्याचा अधिकार नेपियरनें आपल्याकडे ठेवला होता व वेळीअवेळीं तो आपली सत्ता उपयोगांत आणी. मियानीच्या जयानंतर जे जहागिरदार शरण आले, त्यांच्या जमिनी त्यांच्याकडेच ठेवण्यांत आल्या. ज्या जमिनी जप्त झाल्या त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच खंडानें देण्यांत आल्या. कांहीं जकाती वगैरे नेपियरनें काढून टाकल्या व जमिनीवरील खंड कमी केला. गुलामगिरी व बलुची रूढीप्रमाणें नवऱ्याला बदचालीबद्दल बायकोचा खून करण्याचा हक्क हीं दोन्हीं नेपियरनें गैरकायदा ठरवून या बाबतींत गुन्हे करणारांना जबर शिक्षा ठोठावल्या. दररोजच्या 'शांतता व सुव्यवस्था' राखण्याच्या कामाकरितां लष्कराचा उपयोग केल्यास लष्कराचा दरारा कमी होईल, म्हणून नेपियरनें २४०० शिपायांची नवी पोलिसफौज निर्माण केली. पण या पोलिसांवर अधिकार कलेक्टरचा नसून लष्करी अमलदारांचा असे. त्यामुळे लष्करी खातें व राज्यकारभार खातें यांच्यांत सारखीं झक्काझक्की होई. त्याचा सुपरिणाम नेपियरनेच लिहून ठेविला आहे. "एकीकडे पोलीस अधिकारी आमच्याकडे काटदार, लंबरदार व जमीनदार यांच्या फसवेगिरीच्या कागाळ्या आणतात, तर दुसरीकडे ही काटदार वगैरे मंडळी पोलिसांच्या हडेलहप्पीबद्दल तक्रारी करतात. यामुळे दोघांचा एकमेकांवर दाब राहातो व प्रत्येक जण दुसऱ्याची नाचक्की करण्यासाठीं गरीब रयतेचा कड घेतो."
नेपियरच्या अमदानींत एक मात्र लोकोपयोगी काम झालें तें म्हणजे कराची बंदरांतील नेपियर मोल हा धक्का होय. कराची बंदराच्या सुधराईबद्दल त्याच्या पुष्कळ योजना होत्या. पण त्यांपैकी कोणत्याच सिद्धीस गेल्या नाहींत. तो गव्हर्नर असतांना मलेरिया व कॉलरा या साथी सिंधप्रांतांत आल्या. एका वर्षी टोळधाडीने पिकांची नासाडी झाली, तर दुसऱ्या वर्षी महापुरानें पिकें वाहून जाण्याची पाळी आली. पण इतक्या आपत्ती आल्या, तरी नेपियरची बेडर वृत्ति कायमच राहिली.
सिंधप्रांत नेपियर नें जिंकला पण स्थिरस्थावर करण्यासाठीं त्याला थोडी फार खटपट पडलीच. त्याच्याजवळ १५००० फौज असल्यामुळे बलुची टोळ्यांचा बंदोबस्त करणें त्याला जड गेलें नाहीं. बलुच्यांचा उपद्रव बराच होऊं लागला असें पाहून जानेवारी १८४५ मध्ये नेपियरनें ६००० सैन्य त्यांचा पाडाव करण्यासाठी पाठविलें. मीर अल्ली मुराद यानेंही आपल्या ४००० फौजेनिशी मदत केली. या सैन्यानें जखराणी व डोंबकी या जातींना जेरीस आणलें; नेपियरनें बायबलमधल्या नेबुशॅडनझार राजाची युक्ति योजून या टोळ्यांना त्यांच्या मूळस्थानाहून उठविलें. मग उत्तर सिंध सरहद्द जिल्ह्यांत त्यांची वसाहत केली. अशा तऱ्हेनें या टोळ्यांची व्यवस्था झाली. पण बुगटी जातीच्या लोकांची पुंडाई चालूच होती. नेपियरनें त्यांच्यावर कॉटन जेकब व मेरीवेदर या अधिकाऱ्यांना पाठविलें व त्यांनी ६०० बुगटी लोकांना कापून काढले व १०० लोकांना कैद केलें. अशा तऱ्हेनें बुगटी टोळ्याही नरम आल्या व लवकरच उत्तर सिंध दक्षिण सिंधाइतकाच सुरक्षित व सुधारलेला असा झाला.
१८४५ च्या अखेर पहिले शीख युद्ध सुरू झालें. तेव्हां नेपियर नें १२००० फौजेनिशीं भावलपूरकडे कूच केलें. पुढील सालीं त्याला आपल्या जागेचा राजिनामा द्यावा लागला. त्यापूर्वी त्यानें आपले स्वतःचें मत म्हणून लिहून ठेवलें कीं, सिंधचा कारभार जर मुलकी अधिकाऱ्यांच्या हातांत गेला तर उधळपट्टी फार होईल, बेबंदशाही माजेल आणि इंग्रजी सत्तेचे बारा वाजतील!
पण नेपियरच्या बजावण्याचा कंपनी सरकारवर कांहींच परिणाम न होतां मुंबई सरकारच्या मुलकी खात्यांतील प्रिंगल या अधिकाऱ्याला सिंधचा कमिशनर म्हणून नेमण्यांत आलें. त्यानंतर लवकरच मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क हे सिंधांत गेले व त्यांनीं सर्व चवकशी व पहाणी करून सिंधच्या राज्यकारभारासंबंधीं एक महत्त्वाचा रिपोर्ट लिहिला. ह्यावरून नेपियरच्या वेळीं कारभारांत कशी अंदाधुंदी होती तें कळून येतें. उत्पन्नाचा बरोबर अंदाजच करतां येत नव्हता. पण खर्च मात्र अवाच्या सव्वा होत असे. जमिनीचा वसूल सर्वस्वी कारभाऱ्यांच्या ताब्यांत असे व त्यांनी जुलमानें अधिक वसूल उकळल्यास त्यांना फैलावर घेण्याची कांहींच व्यवस्था नव्हती. लांच देणें, घेणें, सैन्याच्या मक्तेदारांची लुच्चेगिरी वगैरे प्रकार फार होते. फौजदारी कोर्टाची व्यवस्था चांगली नव्हती. कालवे व जंगले यांची अगदीं गैरव्यवस्था होती. प्रिंगल यांच्या नेमणुकीनंतर लवकरच पुष्कळ सुधारणा करण्यांत आल्या. न्यायदानाची पद्धत चांगली शिस्तवार झाली व सात वर्षाकरतां जमिनीच्या धाऱ्याची रक्कम ठरविण्यांत आली. १८५१ सालीं फ्रियर (पुढें जो सर बार्टल फ्रियर झाला) याची कमिशनर म्हणून नेमणूक झाली. फ्रियर हा अगदीं तरुण म्हणजे ३५ वर्षीचा असल्यामुळे त्याच्या नेमणुकीबद्दल बराच गवगवा झाला व इंग्लंडांतही तक्रार नेण्यांत आली. पण मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांना साताऱ्याचें राज्य खालसा केल्यानंतरच्या बिकट परिस्थितींत फ्रियरचा फार उपयोग झाला होता. त्यामुळे त्यांनीं जोर धरला व त्याची नेमणूक कायम करून घेतली. फ्रियरची कारकीर्द १८५१ पासून १८५९ पर्यंत झाली व त्या अवधीत त्यानें सिंधची कितीतरी सुधारणा व प्रगति करून दाखविली. आपल्या हाताखालील कर्तबगार माणसाच्या करामतीला योग्य प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून काम करून घ्यावयाचें, पण आपला तर बोज राखायचा ही हातोटी फ्रियरला चांगली साधली होती. हिच्याच अभावामुळे नेपियरची कारकीर्द फिकी पडली. फ्रियरमधला आणखी एक मोठा गुण म्हणजे त्याला आपल्या योजनांच्या पूर्ततेसाठी पैसा कसा व कोठून काढावा हें चांगलें माहीत असे.
फ्रियरने पहिल्यांदा कराची बंदर सुधारण्याचे काम हातांत घेतलें. हें बंदर इतके वाईट होतें कीं, पावसाळ्यांत तेथें जहाजे येतच नसत. मग टपालसुद्धां खुष्कीच्या मार्गानें पुष्कळदां दलदलीतून आणि चिखलांतून मुंबईकडे पाठवावें लागे. पण फ्रियरच्या मार्गांत अनेक अडचणी होत्या. त्यानें स्वतःच लिहून ठेवलें आहे की, "आधींच आमच्याजवळ कांहीं साधनें नाहींत. त्यांत आमचे अंमलदार आमच्या योजनेला हास्यास्पद ठरविणारे आणि व्यापारी पाहिले तर ५०० मैलांवर असलेल्या मुंबई बंदरांतील व्यापार कमी होईल अशा कल्पनेनें आमच्या योजनेला नाके मुरडणारें! अशा स्थितींत काम व्हावें कसें!" त्यानें सर्व गोष्टी खुलासेवार रीतीनें गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना कळविल्या. डलहौसीला योजना फार पसंत पडली व मग मात्र सरकारी चक्रे फिरूं लागून फ्रियरची योजना अमलात येऊ लागली. कराची बंदराची सुधारणा झाली. त्याचप्रमाणे कराचीहून कोट्रीपर्यंत आगगाडी रस्ता करण्याचेंही ठरलें. सिंधमध्यें कालवे फार त्यामुळे रस्ते करण्याचा प्रश्न म्हणजे खरोखरी या कालव्यांवरून जागोजाग पूल बांधण्याचाच प्रश्न होता. फ्रियरनें पक्क्या विटांचे पूल बांधण्याचा सपाटा चालविला, व हे सगळे गोऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय. डाकबंगलेही ठिकठिकाणीं बांधण्यांत आले. फ्रियरनें सिंध प्रांतासाठीं वेगळीं पोस्टाचीं तिकिटें छापली व तीं विकायला ठेवलीं. हीं तिकिटें लावलेलीं पत्रें कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याजवळ अगर सरकारी कचेरींत दिली म्हणजे त्यांनीं तीं आपल्या सरकारी कागदपत्रांबरोबर योग्य ठिकाणी पाठवावीं अशी सोय केली. त्यामुळे प्रत्येक सरकारी कचेरी म्हणजे एक टपालघरच झालें. फ्रियरनें कारभार हातांत घेतला त्यावेळी अवघ्या दोन गोऱ्या अधिकाऱ्यांना सिंधी भाषा समजत असे. शिवाय त्या भाषेला स्वतःची अशी लिपी नव्हती. फ्रियरनें एक अरबी लिपीसारखी लिपी सिंधी भाषेची म्हणून ठरविली. शाळा स्थापून त्यांतून तिचा प्रसार केला व दरबारी भाषा सिंधी असें ठरवून टाकलें. त्यामुळे पुष्कळ अधिकाऱ्यांना ती भाषा शिकणें भागच पडलें. १८५३ साली कराची येथें पहिली इंग्रजी शाळा उघडण्यांत आली.
१८५७ च्या बंडाची बातमी फ्रियरला कळतांच त्यानें अगदीं थोडें सैन्य सिंधांत ठेवून बाकीचें मुलतानकडे पाठवून दिलें. हैदराबाद, कराची व जाकोबाबाद येथें सप्टेंबर महिन्यांत हिंदी सैनिकांच्या कांहीं टोळ्यांनी गडबड केली व बंड करण्याचे प्रयत्न केले. पण ठिकठिकाणच्या युरोपियन अधिकाऱ्यांनी सावधपणा बाळगून बंडवाल्यांना कडक शिक्षा ठोठावल्या, त्यामुळे सगळीकडे सामसूम झालें. सिंधांतील प्रजेची बंडवाल्यांकडे केव्हांच सहानुभूति असल्याचें दिसलें नाहीं. या सर्व बिकट व धोक्याच्या प्रसंगीं जनरल जॉन जेकब- जाकोबाबादचा नामहेतु- याचा फारच उपयोग झाला. सर्व लष्करी जबाबदारी त्याच्यावर पडल्यामुळे १८५८ मध्ये त्याची प्रकृति अगदी खालावली, व कसेबसें त्याला जाकोबाबाद येथें आणलें. तेथेंच ५ डिसेंबर रोजी तो मरण पावला. बलुची लोकांचाही त्याच्यावर इतका जीव होता कीं, ते ढळढळा रडले. त्याच्या इच्छेप्रमाणें कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करतां त्याचें प्रेत जाकोबाबाद येथेंच पुरण्यांत आलें.
१८५९ साली फ्रियरला व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळाचा सभासद करण्यांत आले. त्यानें कराची सोडण्यापूर्वी तेथें एक नागरिकांची मोठी सभा भरली व त्याचे स्मारक करण्याची योजना ठरली. कराची येथें ऑक्टोबर १८६६ मध्ये उघडलेला फ्रियर हॉल हे त्या योजनेचें मूर्त स्वरूप आहे.
फ्रियरच्या नंतर इन्हरॅरिटी याला कमिशनर नेमण्यांत आलें. याच्याच काळांत मिथ्राव कालवा सुरू झाला; कराची- कोट्री आगगाडी चालू झाली; व कराची व्यापारी मंडळ उघडण्यांत आलें. त्यानंतरचे कमिशनर मॅन्सफील्ड व मेरिवेदर हे होत. मेरिवेदर यानें जनरल जेकबच्या बरोबरीनें बलुची टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी केली होती. तो १८७७ पर्यंत कमिशनर होता. त्याचें स्मारक म्हणून कराची येथील मेरिवेदर घड्याळ बुरूज बांधण्यांत आला. अर्स्किन हा कमिशनर असतां ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी सिंध प्रांताला भेट दिली. त्याच्याच कारकीर्दीत मुंबईचे तीन गव्हर्नर सिंध प्रांतांत आले. १८८७ साली लॉर्ड रे यांनी कराची येथे दयाराम जेठमल कॉलेज उघडलें. अर्स्किन यानें सर्व निरनिराळ्या खात्यांची नीट घडी बसवून दिली. त्याच्यानंतरचा कमिशनर सर चार्लस प्रिचर्ड यानें अबकारी खात्यांत सुधारणा केली. त्याच्याच कारकीर्दीत १८८९ मध्ये सक्कर येथील सिंधू नदीवरील लॅन्सडाऊन पूल तयार झाला. सर एव्हन जेम्स यानें इंग्रजी व सिंधी शाळांचा पुष्कळ प्रसार केला आणि मुसलमान व मागासलेले वर्ग यांच्या शिक्षणाकडे त्यानें जास्त लक्ष पुरविलें. कराची येथील मुसलमानी शाळा मद्रसा हिचा तो मोठा पुरस्कर्ता होता. दुर्दैवानें याच्या अमदानीत १८९६ मध्ये कराचीत प्रथम प्लेगची साथ आली व हजारों लोक मृत्युमुखी पडले. १९०५ ते १९१२ या सालांत फॅन्सिस यंग हजबंड हा कमिशनर होता. याच्याच कारकीर्दीत मरहूम बादशहा पांचवे जॉर्ज व राणी मेरी यांचे आगमन झालें व त्यांच्या हस्तें कराची येथील फ्रियर हॉल जवळ व्हिक्टोरिया राणीचा पुतळा उभारण्यांत आला. आगगाड्या व कालवे यांच्या सोयी अधिक प्रमाणांत करण्यांत आल्या. कराचीचा व्यापार वाढू लागला; व यंग हजबंड १९१२ मध्यें सिंध सोडून गेला तेव्हां सिंधची अनेक बाबतींत प्रगति व सुधारणा झाली होती. सिंधची राज्यव्यवस्था ब्रिटिश हिंदुस्थानातील इतर प्रांताप्रमाणेच करण्यांत आली.
१९०४ सालापासून किंवा त्याच्याही आधींपासून ज्या सक्कर बराज योजनेच्या वाटाघाटी सुरू होत्या ती योजना शेवटीं १९२३ सालीं मुंबई कायदे कौन्सिलानें पास केली व त्या वेळपासून डिसेंबर १९३१ पर्यंत सिंध प्रांताच्या अधिकाऱ्यांचें सारें लक्ष ह्या प्रचंड धरणाच्या व पाटबंधाऱ्याच्या कामांत गुंतून राहिलें होतें. ज्या योजनेवर एकंदर वीस कोटी रुपयांच्यावर खर्च झाला व जिच्यामुळे ५० लाख एकर जमिनीला प्रमाणशीर व निश्चित असें पाणी मिळून शेतकीतला अनिश्चितपणा बराचसा कमी होणार आहे अशा या मोठ्या सार्वजनिक कामाकडे अधिकाऱ्यांचे व लोकांचें सारखे लक्ष असावें हें अगदीं साहजिक आहे. त्यामुळे या काळांतील सिंधचा इतिहास म्हणजे सक्कर बंधारा योजनेचाच इतिहास होय. डिसेंबर १९३१ मध्ये हा बंधारा पुरा झाला व १९३२ पासून कालव्यांच्या मार्गे शेतीला पाणी देण्यास सुरवात झाली. लाखों एकर नवीन जमीन लागवडीस येत आहे व त्यामुळे सिंध प्रांताची संपत्ति व उत्पन्न पुष्कळच वाढले आहे.
हिंदुस्थानच्या भावी संयुक्त किंवा फेडरल राज्यघटनेमध्यें सिंध हा एक घटक व्हावा अशी सिंधवासीयांची इच्छा असल्यामुळे नवीन हिंदुस्थान राज्यकारभार कायद्याप्रमाणें सिंध प्रांत मुंबई इलाख्यापासून अलग करण्यांत आला असून एप्रिल १ सन १९३६ पासून सिंध प्रांताचे वेगळेच अंदाजपत्रक करण्यांत आलें आहे. सिंध आतां केवळ मुंबई इलाख्यांतला एक भाग नसून स्वतंत्र गव्हर्नरच्या हाताखालचा प्रांत झाला आहे व त्यामुळे सिंध प्रांताचा राजकीय दर्जा इतर प्रमुख प्रांतांच्या बरोबरीचा झाला आहे.
ब्रिटिश अमदानींतील सिंधची मीरांच्या वेळच्या सिंधश तुलना केल्यास अर्थात् सिंध प्रांताची पुष्कळच प्रगति झाली आहे असें कोणालाही कबूल करावें लागेल. सिंध प्रांताची लोकसंख्या आतां पूर्वीच्या चौपट किंवा त्याहूनही अधिक झाली आहे. जेथें पूर्वी जंगल किंवा 'शिकारगे' होते तेथे आतां उत्तम भात शेती किंवा गव्हाची लागवड होत आहे. त्यामुळे शेतकी पैदास पूर्वीच्या दसपट तर सहज होत आहे. पूर्वीच्या खेड्यांची वाढ होऊन त्यांचे शहरांत रूपांतर झालें. ठिकठिकाणी कालव्यांवरून पूल व रस्ते बांधण्यांत आले. सराया, डाकबंगले, तार व पोस्ट ऑफिसें, आगगाड्या, वगैरे सुधारलेल्या देशांतील आवश्यक गोष्टी सिंध प्रांतांतही करण्यांत आल्या. कराचीची लोकसंख्या लाखांनी मोजतां येऊं लागली व तेथला व्यापार कोट्यावधी रुपयांचा होऊं लागला. कांहीं जुने धंदे बुडाले पण नवे यंत्रसामुग्रीवर चालणारे धंदे उभारले गेले. आर्थिक बाजूनें काय किंवा स्थानिक स्वराज्याच्या दृष्टीनें काय, किंवा राज्यव्यवस्थेच्या दृष्टीनें काय सिंध प्रांताची आज सर्वांगीण सुधारणा झाली आहे व उद्यांचा नवा सिंध या सर्व बाबतीत आणखीही प्रगति करून दाखवील अशी बळकट आशा करण्यास कांहींच हरकत नाहीं.
सिंध प्रांत ब्रिटिश अंमलाखाली आल्यास आज जवळ जवळ शंभर वर्षे झाली. सिंध प्रांत काबीज केल्यावर त्याचा स्वतंत्र प्रांत बनवावा किंवा तो पंजाबला जोडावा अथवा त्याचा मुंबई इलाख्यांत अन्तर्भाव करावा असे प्रश्न ब्रिटिश मुत्सद्यांपुढे त्यावेळी उभे राहिले. पण शेवटीं शेवटची योजना मुक्रर ठरून सिंध प्रांत मुंबई इलाख्यास जोडण्यांत आला. प्रथम कांहीं काळ वऱ्हाडप्रमाणें सिंधची राज्यव्यवस्था कांहींशी निराळी व वेगळी ठेवण्यांत आली होती खरी, पण लवकरच सिंध प्रांत हा मुंबई इलाख्याचा चवथा विभाग म्हणून समजण्यांत आला व सर्व राज्यव्यवस्था मुंबई इलाख्याप्रमाणेच चालू झाली.
सिंध प्रांत प्रथम काबीज केल्यावर व मुंबई इलाख्यास तो जोडल्यावर जे मुंबई इलाख्यांतील अंमलदार सिंध प्रांतांत पाठविण्यांत आले त्यापैकी पुष्कळ अंमलदार महाराष्ट्रीय असल्यामुळे सिंध प्रांताला सुधारलेली सुराज्य व्यवस्था देण्याचें पुष्कळसें श्रेय महाराष्ट्रीय लोकांना आहे ही गोष्ट सिंध प्रांतांत प्रवास करतांना प्रवाशाच्या ध्यानांत आल्यावांचून रहात नाहीं. ही सिंध प्रांताच्या सेवेची परंपरा प्रि. गोखले यांनीं उत्तम तऱ्हेनें राखली व अगदी अर्वाचीन काळी त्यांनी कराचीस एंजीनीयरिंग कॉलेजची स्थापना करून त्याला ऊर्जितावस्था आणली व आतां ते निवृत्त होऊन अधिक व्यापक दर्जाची जनसेवा करण्याकरितां काशीस गेले.
महाराष्ट्रीयांच्या सिंध मधील सेवापरंपरेमुळे सिंध प्रांतांत व विशेषतः कराचींत हजारो महाराष्ट्रीयन लोक दृष्टीस पडतात. एकट्या कराची शहरांत मराठी भाषा बोलणारे सुमारे वीस हजार लोक आहेत. यामुळे सिंध प्रांत महाराष्ट्रापासून पुष्कळच दूर असतांना नजीक असलेल्या काठेवाड प्रांताच्यापेक्षां सिंधबद्दल महाराष्ट्रीयांना अधिक आपलेपणा वाटतो. असो.
पहिल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे सुमारें शंभर वर्षे एकत्र कुटुंबांत राहिल्यावर ता. १ एप्रिल सन १९३६ पासून सिंध प्रांत आतां स्वतंत्र प्रांत बनला आहे. तरी त्याच्या स्वतंत्र राज्यव्यवस्थेची रूपरेखा येथें देणें उचित आहे.
हिंदुस्थानच्या सन १९३५ च्या सुधारणा कायद्यान्वयें हिंदी संयुक्त राज्यघटनेचे आकरा प्रांत गव्हर्नरांचे प्रांत म्हणून करण्यांत आले आहेत. त्यांमध्यें सन १९३५ च्या कायद्यान्वयें दोन नवे प्रांत बनविण्यांत आले ते सिंध व ओरिसा हे होत. पहिल्या गोलमेज परिषदेच्या सुमारास वायव्य सरहद्द प्रांत गव्हर्नरांचा प्रांत करण्यांत आला. या प्रांतांची व हिंदी संयुक्त राज्यघटनेत नसलेल्या पण हिंदुस्थानाला फार नजीक असलेल्या सिलोन या राज्याच्या वसाहतीची अशा चारी प्रांतांच्या राज्यशकटाची रूपरेखा खालील कोष्टकावरून सहज समजून येईल म्हणून ते कोष्टक येथे देत आहे:-
| प्रांताचें नांव व क्षेत्रफळ चौ. मैल | अस्पृश्यांसह साधारण मतदारसंघ | मुसलमान मतदारसंघ | ख्रिश्चनधर्मी मतदारसंघ | विशिष्ट हिताचे मतदारसंघ | बायकांचे मतदारसंघ | एकंदर लोकसंख्या व प्रतिनिधी |
|---|---|---|---|---|---|---|
| वायव्य सरहद्द प्रांत १३ हजार चौ. मैल |
१॥ ल. लोक ९+३ (शीख) |
२२ ल. ३६ प्रतिनिधी |
१२ हजार | २ प्रतिनिधी | २४ ल. ५० प्रतिनिधी | |
| ओरिसा ३२ हजार चौ. मैल |
८० ल. ४४ प्रतिनिधी |
१। ल. ४ प्रतिनिधी |
३८ हजार १ प्रतिनिधी |
९ प्रतिनिधी | २ प्रतिनिधी | ८२ ल. ६० प्रतिनिधी |
| सिंध ४६ हजार चौ. मैल |
१० ल. १८ प्रतिनिधी |
२८ ल. ३३ प्रतिनिधी |
१५ हजार २ प्रतिनिधी |
५ प्रतिनिधी | २ प्रतिनिधी | ३८ ल. ६० प्रतिनिधी |
| सिलोन २६ हजार चौ. मैल |
३५ल.बौ.लो. १४ ला हिं.लो |
मुसलमानधर्मी लोक ३॥ ल |
४२ हजार | ५० ल. लो. ५७ प्रतिनिधि |
सीलोनच्या राज्यकारभाराची सर्व जबाबदारी गव्हर्नर व त्यांचे मंत्रिमंडळ यांजवर सोपविलेली आहे. मंत्रिमंडळ दहा सभासदांचे आहे. त्यामध्यें तीन सभासद मुख्य चिटणीस (Chief Secretary), कायदे पंडित चिटणीस (Legal Secretary) व जमाखर्ची चिटणीस (Financial Secretary) हे कलोनियल सर्व्हिसमधील सरकारनियुक्त सभासद आहेत. गव्हर्नराच्या खालोखाल यांना अधिकार व सत्ता दिलेली आहे. बाकीचे सात मंत्री लोकप्रतिनिधीमधून गव्हर्नरानें निवडलेले असतात. राज्यकारभाराच्या सर्व खात्यांचें वर्गीकरण सात विभागांत करून प्रत्येक विभाग एकएका मंत्र्याच्या स्वाधीन केलेला आहे. मंत्रिमंडळामध्यें सरकारी तीन चिटणीसांना मतांचा अधिकार नाहीं. त्यांनीं मंत्रिमंडळाला राज्यकारभाराची माहिती व सल्ला द्यावयाचा आहे. अर्थात् जरी या चिटणीसांना प्रत्यक्ष मताचा अधिकार नाहीं तरी त्यांच्या म्हणण्याचें व सल्ल्याचें वजन मंत्रिमंडळावर पडणें साहजिक आहे. मंत्र्यांचा पगार मात्र बेताचा ठरविलेला आहे. तो दरमहा १००० रुपये आहे. सर्व सज्ञान स्त्री- पुरुषांना मताधिकार दिलेला आहे. लष्करी खर्च कमी आहे. कारण संरक्षक सैन्य सिंहली लोकामधूनच तयार केलेलें आहे. सिलोनमधील या पद्धती हिंदुस्थानांतील छोट्या व मोठ्या प्रांतांनी लक्षांत ठेवून स्वीकारण्यासारख्या आहेत असे मला वाटतें. म्हणूनच त्याचा येथें मुद्दाम उल्लेख केला आहे. आतां आपल्या देशांतील छोट्या प्रांतांच्या व विशेषतः सिंध प्रांताच्या राज्यघटनेकडे वळणें बरें.
सिंधच्या गव्हर्नराचा वार्षिक पगार ६६००० रुपये किंवा दरमहा ५५०० रुपये ठरविला आहे. शिवाय त्याच्या इतमामाप्रमाणें सर्व कच्चा खर्चाकरितां निराळा भत्ता मिळावयाचा आहे. या गव्हर्नराला मोठ्या प्रांताच्या गव्हर्नरांचे सर्व जादा अधिकार व सत्ता देण्यांत आली आहे. प्रांताच्या शांततेची व सुरक्षिततेची राखण, फंदफितुरीचा बंदोबस्त, वरिष्ठ नोकर वर्गाचा परामर्ष, अल्पसंख्याकांचे संगोपन, ब्रिटिश व्यापाराचे हितसंरक्षण इत्यादि विशेष जबाबदाऱ्या गव्हर्नरावर सोपविण्यांत आल्या आहेत व या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरितां कायदेमंडळाच्या परवानगीवांचून कांहीं काळची आज्ञापत्रे काढण्याचा व अस्मानी सुलतानी झाल्यास कायदेसुद्धां करण्याचा अधिकार व सत्ता गव्हर्नराला दिलेली आहे. अशा वेळी व अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरितां स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा गव्हर्नरला अधिकार ठेवला आहे व या अधिकाऱ्याला लोकसभेमध्ये बोलण्याचा व त्या सभेला सल्ला देण्याचा हक्क देण्यांत यावयाचा आहे. मात्र त्याला सभेमध्यें मत देण्याचा हक्क नाहीं. तसेंच प्रांताकरितां एक कायदेपंडित ॲडव्होकेट जनरल म्हणून नेमण्याचा अधिकार गव्हर्नराला आहे. म्हणजे ही व्यवस्था सामान्यतः सिलोनच्या व्यवस्थेसारखीच आहे. बाकी सर्व राज्यकारभार व राज्यकारभाराचीं खातीं मंत्रिमंडळाच्या हाती जावयाचीं आहेत. मंत्रिमंडळ लोकसभेतील बहुमतवाल्या पक्षांतील प्रतिनिधीमधून व त्यांच्या सल्ल्यानें गव्हर्नराने निवडावयाचें आहे. मंत्र्यांची संख्या किती असावी, खात्यांची वांटणी कशी करावी, मंत्र्यांचा पगार काय असावा, सभासदांना भत्ता काय यावा इत्यादि गोष्टी कायद्यानें न ठरवितां त्या लोकसभेच्या निर्णयावर व निर्णय होईपर्यंत गव्हर्नराच्या इच्छेवर अवलंबून ठेवल्या आहेत; हैं एक परीनें बरें केलें आहे.
वरील तीन्ही छोटे प्रांत स्वतंत्र करण्यांत आले आहेत. कारण वायव्य सरहद्द प्रांत व सिंध प्रांत या दोन प्रांतांमध्यें मुसलमानांचे बहुसंख्यात्क आहे व या लोकांची स्वतंत्र राज्यव्यवस्थेबद्दल फार जोराची मागणी होती. तीस लक्षांपेक्षा कमी असलेल्या लोकांची मागणी स्वीकारल्यावर ८० लक्ष हिंदू लोकांची ओरिसा प्रांत स्वतंत्र करण्याबद्दलची मागणी नाकारणें अशक्य होतें. म्हणून हा तिसरा प्रांतही स्वतंत्र करण्यांत आला. पण या तिन्ही प्रांतांची स्वतंत्र राज्यव्यवस्था आतबट्याची असून मुसलमानी प्रांतांना एक एक कोटीची वार्षिक तूट आहे तर ओरिसा प्रांताची तूट सत्तर लक्षांच्या आंत बाहेर आहे. तेव्हां या प्रांतांच्या गव्हर्नरांनी व लोकप्रतिनिधी सभानीं आपली राज्यव्यवस्था जितकी काटकसरीची करणें शक्य आहे तितकी करण्याची प्रथमपासूनच खटपट केली पाहिजे. याच दृष्टीनें सिलोनच्या मंत्रिमंडळाच्या पगाराचे आकारमान या नव्या प्रांतांना मार्गदर्शक व अनुकरणीय आहे. यांत शंका नाहीं.
सन १९३५ चा हिंदुस्थानच्या संयुक्तराज्यघटनेचा कायदा वाचूं लागले म्हणजे गव्हर्नर व गव्हर्नर जनरल यांच्या विशिष्ट जबाबदाऱ्या व त्या पार पाडण्याकरितां मंत्रिमंडळाचा सल्ला न घेतां स्वतःची निर्णायक शक्ति (individual judgment) व स्वतःची विवेक शक्ति (own discretion) यांचा सारखा उपयोग करण्याची त्यांना दिलेली सत्ता कलमोकलमी दृष्टीस पडते व हा राज्यघटनेचा कायदा प्रजेबद्दलच्या संशयग्रस्त व अविश्वासपर मनोवृत्तीनें प्रेरित होऊन ब्रिटिश पार्लमेंटानें पसार केला असें पदोपदी वाढल्याखेरीज रहात नाहीं. म्हणून कायदा वाचतांना या गव्हर्नराच्या सत्तेचा व अधिकाराचा बाऊ वाटतो व हे अधिकार बलवत्तर दिसतात. पण प्रत्यक्ष राज्ययंत्र सुरू झाल्यावर व मंत्रिमंडळाशीं रोजरोज गाठी पडूं लागल्यावर गव्हर्नरांना कायद्यानुरूप दिलेला सडेतोडपणा व तुसडेपणा राखतां येईल किंवा नाहीं ही शंकास्पद गोष्ट आहे. गव्हर्नरवर आपले वजन पाडून होतांहोईलतों लोकमतानुवर्ती राज्यकारभार चालविण्याचे काम मंत्रिमंडळाच्या कर्तच- गारीवर व कर्तव्यदक्षतेवर अवलंबून आहे हे उघड आहे.
कर्तबगार व कर्तव्यदक्ष असे प्रतिनिधी निवडून देणें हें मतदारांच्या हातीं आहे. ही गोष्ट कितपत घडून येते हे प्रत्यक्ष अनुभवानें कळून येणार आहे.
नव्या कायद्याप्रमाणे मताचा अधिकार पुष्कळ वाढविण्यांत आला आहे यांत शंका नाहीं. सिंध प्रांतापुरतें पहातां मताचा अधिकार खालील गोष्टीवर अवलंबून आहे.
१ सिंधच्या शहरांत किंवा खेडेगांवांत वर्षांतून निदान १८० दिवस तरी वस्ती असणें.
२ आठ रुपये साऱ्याची जमीन मालक म्हणून धारण करणें किंवा १६ रुपये धान्याची जमीन कूळ म्हणून करणें.
३ कराची शहरांत वार्षिक तीस रुपये भाडे, दुसऱ्या शहरांत वार्षिक १८ रुपये भाडे देणें किंवा ७५० रुपये किमतीचं स्वतःच्या मालकीचें घर असणें.
४ मॅट्रिकुलेशन किंवा तत्सम परीक्षा पास झाल्याचे सर्टिफिकीट असणें.
५ लष्करामध्ये शिपाई असणें किंवा लष्करी नोकरी झाल्यावर पेन्शन मिळत असणें.
नव्या राज्यघटनेमध्ये बायकांना मताधिकार देण्यांत आला आहे व त्यासंबंधाच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
१ प्रत्येक साक्षर बाईला मत आहे. पण तिनें आपण साक्षर असल्याबद्दलच्या सर्टिफिकीटसकट आपले नांव नोंदून घेण्याबद्दल अर्ज केला पाहिजे.
२ लष्करी नात्यानें मताचा अधिकार असलेल्या इसमाच्या बायकोला मताधिकार आहे.
३ पुरुषांना जितक्या मिळकतीच्या मालकीनें किंवा जितक्या रकमेचा सरकार सारा भरण्यानें अगर भाडे देण्यानें मताचा अधिकार मिळतो त्याच्या दुपटीनें या सर्व गोष्टी असणाऱ्या इसमाच्या बायकोला मताचा अधिकार आहे.
याप्रमाणें मताधिकारचें क्षेत्र पुष्कळच वाढविण्यांत आलें आहे. या योगानें सिंधमध्ये दहा लाख हिंदू लोकांपैकीं सवालाख हिंदू मतदार बनणार आहेत; तर २८ लाख मुसलमानांपैकी ४ लाख मुसलमान मतदार होणार आहेत.
सामान्य किंवा हिंदू मतदारांनी १८ एकंदर प्रतिनिधी निवडून द्यावयाचे आहेत. त्यांपैकी दोन कराची व एक हैदराबाद असे तीन शहरवासी सभासद शहरांतील मतदारांनी निवडून द्यावयाचे आहेत तर बाकीचे १५ आठ जिल्ह्याच्या पंधरा विभागामधून एक एक प्रतिनिधी असे निवडून यावयाचे आहे. मुसलमान समाजाचे ३३ प्रतिनिधी आहेत. त्यांपैकी दोन कराची शहराच्या मुसलमान मतदारांनी निवडून द्यावयाचे व बाकीचे ३१ आठ जिल्ह्याच्या ३१ विभागांनी प्रत्येक विभागानें एक एक प्रतिनिधी असे निवडून द्यावयाचे आहेत.
मागे सांगितल्याप्रमाणें छोट्या प्रांतांना एकच लोक-प्रतिनिधी सभा दिलेली आहे. या प्रांतांच्या गळ्यांत दुसऱ्या वरिष्ठ प्रतिनिधी सभेचें लोढणे बांधलेलें नाहीं ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे.
हिंदुस्थानच्या फिडरल असेंब्लीमध्यें सिंध प्रांतातर्फे एकंदर पांच सभासद पाठवावयाचे आहेत; त्यांपैकीं एक सामान्य सभासद, तीन मुसलमान सभासद व एक युरोपीयन असे पांच सभासद सिंध लोकप्रतिनिधींनी निवडून यावयाचे आहेत. हिंदुस्थानच्या कौन्सिल ऑफ स्टेटमध्यें पांच सभासद निवडून यावयाचे आहे. त्यांपैकी दोन सामान्य मतदार संघांनी निवडावयाचे आहेत व तीन मुसलमान मतदारांनी निवडावयाचे आहेत.
याप्रमाणे सिंध प्रांताची नवी राज्यघटना आहे. या घटनेमध्यें मुसलमानांचे कायमचें बहुमत आहे. म्हणून अल्पसंख्याक हिंदू सिंधच्या राज्यघटनेविरुद्ध ओरड करीत आहेत व बहुसंख्याक हिंदू प्रांतामध्यें ज्याप्रमाणें मुसलमानांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणापेक्षां जास्त जागा (weightage) दिल्या आहेत त्याप्रमाणे सिंध प्रांतांत हिंदूंना अधिक जागा मिळाव्या अशी मागणी करीत आहेत. अर्थात् ही मागणी सध्या अरण्यरुदितवत् आहे. पण दूरदर्शी हिंदूंना सिंधच्या राज्यघटनेपासून हिंदूंचें हटकून नुकसान होणारच असें वाटत नाहीं. कारण सिंधची स्वतंत्र राज्यव्यवस्था चालू झाली व नवीन लोकसभा स्थापन झाली म्हणजे त्या सभेतील ३३ मुसलमान प्रतिनिधी सदासर्वदा एकसारख्या विचाराचे असणें किंवा राहणें शक्य नाहीं. त्यांच्यामध्यें स्वाभाविकपणे दोन पक्ष होणारच होणार. मुसलमानामध्ये असे दोन पक्ष झाले म्हणजे राज्यकारभाराला लागणारें बहुमत मिळविण्याकरितां हिंदू सभासदाशी संगनमत करणें मुसलमान पक्षाला जरूर आहे. शिवाय सिंध प्रांतामध्ये हिंदू व मुसलमान या दोन समाजामध्यें म्हणण्यासारखी तेढ नाहीं. तेव्हां कालें करून हिंदू व मुसलमान असे जातिनिविष्ट गट न पडतां सार्वजनिक हितवर्धनाच्या पद्धतीवरून राजकीय गट किंवा पक्ष पडतील अशी आशा आहे. सिंध प्रांताची भावी भरभराट या भरवंशावर अवलंबून आहे.
सिंध प्रांतांच्या भावी भरभराटीची गुरुकिल्ली ज्याप्रमाणें हें नवें राज्ययंत्र सुव्यवस्थितपणे चालण्यावर अवलंबून आहे त्याप्रमाणेंच ती भरभराट सक्करच्या धरणामुळे घडून येणाऱ्या शेतीच्या क्रांतीवर अवलंबून आहे. सक्करच्या धरणानें सिंधमधील पावसाचा व सिंधूच्या पुराचा अनिश्चितपणा पार नाहींसा झाला आहे. लक्षावधी एकर जमिनीला मुबलक पण ठराविक वेळीं व ठराविक प्रमाणांत पाणी मिळण्याची सोय झाली आहे; कोणत्या जमिनीमध्ये कोणती पिके व केव्हां पेरावीं याबद्दलची शास्त्रीय माहिती शेतकी खात्यामार्फत मिळण्याची सोय झाली आहे; तेव्हां या सर्व सोईचा फायदा जमीनदार, शेतकरी व कुळें यांनी करून घेतला पाहिजे. अर्थात् या वर्गातील प्रत्येक इसमामध्यें नियमितपणा, कर्तव्यदक्षता, श्रमसहिष्णुता व आपली सांपत्तिक स्थिति सुधारण्याची उत्सुकता हे गुण बाणले पाहिजेत व हल्लीं समाजांत दिसून येणारा आळस, दैवाधीनपणा व हीनदीन स्थितीबद्दल समाधानीपणा हे दुर्गुण नाहींसे झाले पाहिजेत.
सिंधमधील पुढारी व दूरदर्शी मुत्सद्दी जनमनाची अशा प्रकारची सुधारणा घडवून आणतील तरच सिंधची भावी स्थिति स्पृहणीय होईल. अशी स्पृहणीय स्थिति सिंध प्रांताला लवकरच लाभो अशी प्रार्थना करून हें सिंध प्रांताच्या वर्णनाचें व वृत्तांताचें पुष्प माझ्या प्रवास-वृत्तमालेत गुंफून मी वाचकांची रजा घेतों.
| अटक ७ | गंगानदी ५ |
| अर्धन १३० | गारटंगचु ६ |
| अष्ट सिंधु ७८ | गांधीबाग २३ |
| उमरकोट ९७, १०७, १०९ | गुलामशहा काल्होरा १०० |
| एडिंबरो १०१ | गोखले प्रि. - १५० |
| एल्फिन्स्टन जॉ. स्टु. १४० | चच १२१-१२३ |
| ओखा १२ | चहाचा मळा ६७ |
| औटरॅम १४२-३-४ | जयद्रथ ११६ ११८ |
| कच्छमांडवी १२ | जाकोबाबाद ९ |
| कझीन ४९ | जामराव ११० |
| कनिष्क १२० | झसकर ६ |
| कमाली कृषिपद्धत ८५ | ठठ्ठा ९,१३,३१,१००,१२७,१२९ |
| कराची ३,१२-१७ | - इतिहास ४५-६ |
| कँडी ९८ | डरायस ११९ |
| काबूल ७ | डोक्री ६४ |
| कालर ९२ | ड्यूक्सनोझ २ |
| कालिदास ११८ | तमाची १२९ |
| किशमोर ७० | ताम्हाने प्रो. ८७ |
| कैलास ६ | तेल असमार ६३ |
| कोट्री १०४, १०५, १०६ | दरवाज्यांचा पूल ७६ |
| कोठारी सहल धक्का २०-२२ | दर्या ७ |
| कोडैकनाल १०९ | दाऊद पुत्र १३३ |
| कोलंबो ९८ | देखरेख रस्ता ३७ |
| क्वेट्टा १० | द्रुग २७ |
| खालिकदिना वाचनालय १८ | नगरपारकर ९७, ११२ |
| खेरपूर ८ – कालवा ७७ | नबाबशहा ८८ |
| नारायण जगन्नाथ हायस्कूल १८ | मलिर २७ |
| नारीचु ६ | मल्हारराव होळकर १११ |
| निरून १०० | मस्टो ८२ |
| निंदो १२९ | महंमद गझनी १२७ |
| नेपियर, १४२- १४५, १४९-५१ | महंमद बिन कासिम १००, १२४ |
| पंचनद ७ | गंगापीर २४ |
| पद्मा ५ | मंघाराम ८० |
| पालनपुर ९७ | मॉल्कम, जॉन १४० |
| पॉटिंजर १३७ | मिनांडर ६३ |
| पूर्वनारा ७७ | मिरपूरखास ६४,९७,१०६-७ |
| प्रिंगल १५२ | मैनाबाई बाग १८ |
| फ्रँकफर्ट ६३ | मोतिराम अडवाणी ७१ - ७३ |
| फाइफ ८१ | मोहनजोदारो ४९ - रस्ता ५१, घरें |
| फुलेली १०४,१०६,१४४ | ५२, -स्नानकुंड ५४, संग्रहालय |
| फोर्थ ७९ | ५६-६२. |
| फ्रियर १५७ - सुधारणा १५४ | रस्त्याचा पूल ७६ |
| - हॉल १५५ | रायसाहसी १२० |
| बक्कर ६९, ७०, ७८, १०५, १३० | रूसोबेट ७४ |
| बनेश्वर १ | रे. लॉर्ड ७९ |
| बरसीम ९३ | रोहरी ६९, ७७ |
| बंदररोड 3 | लंगचू ६ |
| बर्न्स डॉ. १३७, १४० | लँडस डाउन ७९ |
| ब्रह्मपुत्रा ५ | लारखाना ३८,९१,१३४ |
| बाकी १३२ | लेडी लॉइड घाट २० |
| बोल्टन मार्केट १७ | लोहगड २ |
| भाताचा कालवा ९१ | विसापूर २ |
| मकली टेकडी 33 | व्हिक्टोरिया एम्बँकमेंट ७२ |
| मॅके ५० | शहाबंदर १०० |
| मनोरा बेट २४-२६ | शायार्क ६, |
| मॅन डॉ. ८६-८७ | शिकारपूर ४०,१३४ -गोशाळा ४१ ४२, |
| - इतिहास ४७ | सिंद्री ११४ |
| शिकंदर ११९ | सिंध सुधार ८९, प्रवाससाधनें ३० |
| शेहवान १२५, १२७,१३० | जिल्हे ८,--ह्यूएन संगचें मत ६५-६६ |
| श्रीचंद महाराज ७२ | मताधिकार, १६४..५ - राज्य- |
| श्रीरंगपट्टण ६९, ७८ | व्यवस्था १६०..२. |
| सक्रंद ८४,८७,८९.९३,९९ * - कापूस | सिंधुनदी ५-७ |
| ९४ -सक्करचें धरण ६७-६८, ७६-७७, | सीलोन- राज्यघटना १६१ |
| १५६ - कालवे ७५ ७७ – कांहीं | सुफी ५ |
| आंकडे ८२-८३. | सैंधव ११६ |
| संजर १२९ | स्कॉट, सर वाल्टर ८१ |
| सप्तसिंधु ७७ | हरद्वार ५ |
| समर्स डॉ. ८१ | हार्डिंगपूल १६ |
| सहिरस १२० | हुएन सँग ६५, ११५, १२० |
| साकेत ६३ | हुमायून ११३,१३०-१ |
| साधुबेला ७०,७१,७३-७४, | हूण ११९ |
| सामनी १२१ | हैद्राबाद ९७,९८,१०१ - १०५, १३५. |
| * कापूस ९४ |
६८९ सदाशिव पेठ, पुणे.