सज्जनगड व समर्थ रामदास
२७७ नारायण पेठ, पुणे शहर.
जगद्धितेच्छु प्रेस, घर नं. ४३२ शनवार पेठ, पुणे.
चि. रा. गोपाळ चिमणाजी भाटे,
वकील,
कोर्ट रोहें, जिल्हा कुलाबा
यांस
हे लहानसें पुस्तक
बंधुप्रेमाची खूण म्हणून
लेखकाने
अर्पण केले असे.
| १ | पुण्याहून सज्जनगडचा प्रवास. | १ |
| २ | सज्जनगडाचे सद्यःकालीन व पूर्वकालीन स्वरूप. | १४ |
| ३ | रामदासांच्या महातीबद्दलची भिन्न मतें | २२ |
| ४ | दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश व त्यातील वाचनीय वाचनें | २६ |
| ५ | आठवा ज्ञानदशक | ३७ |
| ६ | दशक ९ ते १५ | ३९ |
| ७ | दशक १६ ते २० | ५९ |
| ८ | समग्र दासंबोधाचे सिंहावलोकन | ७३ |
| ९ | रामदासांचे संक्षिप्त चरित्र | ८० |
| १० | रामदास व शिवाजी यांचा संबंध | ९७ |
| ११ | परिशिष्ट | १२० |
हे पुस्तक लिहिण्याचा योगायोग विलक्षण तऱ्हेने जमून आलेला आहे. रामदासाचा प्रसिद्ध ग्रंथ दासबोध याचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याची माझी मनीषा फार दिवसांपासून होती. पण इतर व्यवसायांमुळे ती अलीकडे तडीस गेली नव्हती. माझ्या पायगाडीच्या प्रवासप्रियतेमुळें परळीस पायगाडीनें जाण्याचा योग आला. त्या निमित्तानें मी दासबोधाचा अभ्यास सुरू केला होता. त्या वेळीं मुंबईच्या हेमंत व्याख्यानमालेच्या चिटणीसाचें व्याख्यानासंबंधीं विनंतिपत्र आलें. तेव्हां 'रामदासांची शिकवण' याच विषयावर मी व्याख्यान देण्याचा बेत केला. यामुळे दासबोधाचा अभ्यास जलदीने करावा लागला. याच सुमारास उद्यानकर्ते रा. कुळकर्णी यांनी आपल्या मासिकाच्या संक्रांतीच्या अंकाकरितां एक प्रवासवृत्तपर लेख मागितला. म्हणून मी माझ्या परळीच्या प्रवासाचे वृत्त त्या अंकाकरितां लिहिलें. पुढें दासबोधाच्या अभ्यासानें रामदासांच्या शिकवणीबद्दल आपलीं बनलेलीं मतें प्रसिद्ध करण्याच्या बुद्धीनें 'रामदासांच्या दासबोधांतील उपदेशा' संबंधानें एक लेखमाला मी उद्यानांत सुरू केली व त्यांत कांहीं लेख लिहिले.
रामदासांच्या शिकवणीबद्दल महाराष्ट्रांत बराच मतभेद आहे. तेव्हां स्वतंत्रपणें व कोणताही पूर्वग्रह मनांत न धरतां झालेलीं माझीं मतें मासिकाच्या रकान्यांत न राहू देतां त्यांना पुस्तकरूपाचें जास्त कायमचें स्वरूप द्यावें अशी माझ्या कांहीं मित्रांनी प्रेमळपणे केलेली सूचना मला पसंत पडली व पुढले लेख मासिकांत न लिहितां सर्व विचार एका लहानचा पुस्तकाच्या रूपानें प्रxxx करण्याचा निश्चय केला. याप्रमाणें या पुस्तक प्रकाशनाचा योगायोग आलेला आहे.
या पुस्तकांतील कांहीं भाग फार वादग्रस्त आहे तरी पण पुढें आलेल्या पुराव्यावरून जीं प्रामाणिकपणें माझीं मतें बनलीं तीं मीं या पुस्तकांत दिली आहेत. तीं पक्षाभिमानानें किंवा वर्णाभिमानानें प्रेरित झालेलीं नाहींत इतकें सांगून ही अल्प प्रस्तावना संपवितों.
| पुणें. | ||
| लेखक. | ||
| ता. २५/७/१८. |
आ स्त्रियाच्या बोसनिया प्रांतांतील सराजोव्ह या गांवीं आस्त्रियाचा युवराज व युवराज्ञी यांचा खून होतो काय, व त्रिखंड पसरलेलें व अप्रत्यक्ष रीतीनें सर्व खंडांस भोवणारे विलक्षण युरोपीय युद्ध सुरू होतें काय ? वर वर पहाणाऱ्यास या गोष्टी किती आकस्मिक वाटतात; पण युरोपच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईनें पाहिलें म्हणजे युवराजाचा खून हे या युद्धाचें निवळ निमित्त होते. खरी कारणें निराळींच होतीं असें कळून आल्याखेरीज रहात नाहीं, व ज्या गोष्टी घडून आल्या त्या आकस्मिक नाहींत, असें समजून येतें.
हल्लींच्या युद्धाचें मूळ फार लांबवर पोंचलेलें आहे. त्याचा धागा १८७०।७१ मधल्या जर्मनीच्या फ्रान्सवरील अद्वितीय विजयापर्यंत पोचतो. या जयानें जर्मन जनतेला आत्मविश्वास व आत्मप्रत्यय पटला. असा विश्वास जर्मनीच्या धोरणी मुत्सद्यांमध्ये होताच; पण तो जनतेला पटला नव्हता; व तो जनतेला पटावा, जर्मनीचें सावकाश व नकळत वाढलेलें सामर्थ्य जगाच्या निदर्शनास यावें, या हेतूनेंच हें युद्ध सुरू करण्यांत आलें. या आत्मप्रत्ययानें जर्मनीचें ताबडतोब एकीकरण होऊन जर्मनीचें साम्राज्य बनलें. जर्मन लोक म्हणजे कल्पनासृष्टीत व तत्त्वज्ञानांत गढून जाणारे बिनलढवय्ये लोक असा जो युरोपांत वृथा समज पसरला होता, तो पार नाहींसा झाला. कारण, १८७०/७१ मध्यें ज्या राष्ट्रांत अलेक्झंडर व सीझर यांसारख्या पूर्वकालीन जगज्जेत्यांच्या व जगद्वीरांच्या तोडीचा- नव्हे थोडासा वरचढ असा- जगजेता व जगद्वीर उदयास आला, त्या फ्रान्स राष्ट्राचा सपशेल पराभव करून जर्मनीनें त्या राष्ट्राकडून अपूर्व खंडणी घेतली. या पराभवानें फ्रान्सला मरणप्राय दुःख झालें. व फ्रान्सचे आलसेस व लोरेन हे प्रांत आपल्या ताब्यांत घेऊन जर्मनीनें फ्रान्सच्या हृदयांत या पराभवाचें कायमचें शल्य करून ठेविलें. जर्मनीमध्येहि जास्त महत्त्वाकांक्षा उत्पन्न झाली व म्हणून विजयानें फुगून न जातां त्यानें आपली औद्योगिक शिक्षणविषयक व शास्त्रीय प्रगति करून घेण्याचा निश्चय केला व आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याकरितां सक्तीचें लष्करी शिक्षण सुरू केलें, जर्मनीनें तसें केल्याबरोबर फ्रान्सला आत्मसंरक्षणाकरितां तोच मार्ग स्वीकारावा लागला व युरोपमध्ये इंग्लंड खेरीज करून सर्वत्र सक्तीच्या लष्करी शिक्षणाचा क्रम सुरू झाला. जर्मनीला इंग्लंडच्या जगडव्याल साम्राज्याचा व विशेषतः जगद्व्यापी व्यापाराचा हेवा वाटुं लागला व शास्त्रीय शोधांनी जरी जर्मनीने व्यापारांत सावकाशपणे व न कळत बरेच वर्चस्व मिळविलें होतें, तरी हें वर्चस्व कायम रहाण्यास व वाढण्यास आरमाराची जरूरी आहे, असें पाहून जर्मनीनें आरमार बांधण्यास सुरवात केली. ही सुरवात झाल्याबरोबर इंग्लंडाच्या नेहमींच्या धोरणाप्रमाणें त्यानेंहि आपले आरमार वाढविण्यास सुरवात केली. यामुळे फ्रान्सलाहि तेंच करणं प्राप्त झालें. तसंच, जर्मनीनें आपले सामर्थ्य वाढविण्याकरितां व आपल्या बाजूचा पक्ष युरोपांत करण्याकरितां राष्ट्राचे संघ- बनविण्याचा क्रम सुरू करून इटली व आस्ट्रिया हीं दोन राष्ट्र या संघांत सामील करून घेतली. फ्रान्सनें रशियाशी संगनमत केलें. आतां युरोपांतील मोठ्या राष्ट्रांपैकीं रहातां राहिलें इंग्लंड, व त्यालाहि आपण एकटेच एकीकडे पडलों असें वाटलें; फ्रान्सशीं पिढ्यानुपिढ्यांची चढाओढ असतां व रशियाशी तर कित्येक वर्षांची तेढ असतांना हळू हळू त्याने या राष्ट्रांशी मिळतें घेऊन त्यांशीं सख्य संपादन केलें, याप्रमाणें युरोपांत राष्ट्रांचे दोन परस्परविरुद्ध असे डाव तयार झाले. अशा स्थितींत युरोपमध्ये केव्हां तरी प्रचंड युद्ध माजणार असे भाकीत कित्येक वर्षे करण्यांत आलें होतें, व कित्येक प्रसंग अचानकपणे टळले म्हणून नाहीं तर हें युद्ध आधींच सुरू झालें असतें; पण सराजोव्ह येथील खुनानंतर युद्धाचा प्रसंग टळला नाहीं. सारांश, ज्या गोष्टी वरकरणी आकस्मिक भासतात त्या खोल पाहिलें असतां आकस्मिक नसतात; त्या सकारण घडून येतात. असो.
माझ्या सज्जनगडच्या सफरीच्या बाबतींत माझीच गोष्ट ध्याना; बाकी जगद्वव्यापी चळवळीच्या दाखल्यानंतर एका यःकश्चित् व्यक्तीच्या वर्तनाकडे वळणें म्हणजे कोणासहि हास्यास्पदच वाटेल; पण हालचाली लहान असोत किंवा मोठ्या असोत, कार्यकारणाचे धागे सर्वत्र सारखेच असतात, हें तरी त्या वरून दिसून येईल. मला माझ्या सातारच्या मित्राकडून आपण रचलेल्या व आपणच एका नाटक मंडळीकडून बसविलेल्या सामाजिक नाटकाच्या प्रयोगाचें आमंत्रण येतें काय व मी पुण्याहून साताऱ्यास कॉलेज चालू असतां व सुटी नसतां ७० मैलांचा पायगाडीचा प्रवास करण्याचा बेत करतों काय? हें प्रथमदर्शनी किती आकस्मिक वाटतें? पण खरोखरी पहातां तें आकस्मिक नाहीं. या माझ्या बेताची कारणपरंपरा माझ्या पूर्ववर्तनांत व पूर्वप्रवृत्तीत आहे. मला आधीं पायगाडीची हौस फार; रोज पंधरापंधरा मैल चालण्याची संवय; शिवाय मी पायगाडीच्या किती तरी चक्करा मारलेल्या; मी जुन्नरसारख्या लांबलांब ठिकाणच्या पायगाडीचा प्रवास यशस्वी रीतीनें केलेला; तेव्हांपासून लांबचा प्रवास मुळींच न केलेला; बरेच दिवसांत पायगाडीवर पायहि न ठेवलेला; अशा स्थितीत माझ्या मित्राचें पत्र आलें व मला पायगाडीनें जाण्याची हुक्की आली, यांत आश्चर्य काय? पण अशा आयत्या वेळीं केलेल्या बेतांत सामील कोण होतो? माझे नेहेमींचे पायगाडीच्या चक्कराचे सोबती यांनीहि आयत्या वेळीं पाय गाळले. पण मी बेत केला तो केलाच. इतका लांबचा प्रवास एकट्यानें करणें अगदीच त्रासदायक व कंटाळवाणें म्हणून 'प्राप्ते षोडशवर्षे तु पुत्रे मित्रवत् आचरेत्' या न्यायानें मी आपल्या मुलाला बरोबर घेण्याचं ठरविलें व तीन वाजतां कॉलेजचें काम आटोपून तांतडीने बरोबर चार वाजतां साताऱ्यास व तेथून सज्जनगडास पायगाडीनें जाण्यास निघालों.
सातारा हे शहर पुण्याच्या थेट दक्षिणेस आहे व साताऱ्याचे थेट दक्षिणेस कोल्हापुर आहे. पुण्याहून सातारा, कोल्हापुर व पुढे बेळगांव हा जुना रस्ता फारच रहदारीचा होता, व याच जुन्या रस्त्यावर सर्व मोठ-मोठीं गांवें वसलेलीं आहेत. सदर्न मराठा रेलवे ज्या मार्गानें नेली आहे तो स्वाभाविक व नैसर्गिक नाहीं. तो खर्च कमी करण्याकरितां व कृष्णा, वेण्या, कोयना वगैरे सह्याद्रिपर्वतांतून निघणाऱ्या नद्यांवरील वेगवेगळे पूल वांचविण्याच्या बुद्धीनें कांहींसा आडमार्गानें व आडरानांतून नेला आहे. मी तर असें ऐकिलें आहे कीं, ह्या रेलवेचा बेत चालला असतां पांच लाख रुपये दिल्यास कोल्हापुराहून आगगाडी नेऊ असें कोल्हापुर-दरबारला विचारण्यांत आलें होतें. पण कोल्हापुर-दरबारनें अदूरदृष्टीनें तें म्हणणें नाकबूल केलें. रेल्वे रस्ता मिरजेवरून गेला, व मग कोल्हापुर सरकारास मिरजपासून कोल्हापुरच्या फांट्याकरितां तीस लाख रुपये खर्च करावे लागले, हें सांगण्याचें कारण इतकेंच की हल्लीं रेलवेनें प्रवास करणाऱ्या माणसाला या जुन्या रस्त्याची माहिती नसते; पण पुण्याहून साताऱ्यास जाण्यास हाच रस्ता सरळ आहे.
पुणें हें मुळा-मुठा या नद्यांच्या कांठी असल्यामुळे एका प्रकारें दरींत वसलेलें आहे. त्यामुळे पुण्याहून पायगाडीनें जाणारास प्रथमतः बहुधा चढावाचा रस्ता चालावा लागतो. आम्हांला जावयाचें त्या बाजूला तर कातरजचा मोठा घाट होता. पुणे सोडून चार मैल आल्यावर शहराच्या सरहद्दीवर आंबील ओढा लागतो. रावबाजींच्या कारकार्दीत पर्वतीच्या खालीं रमण्यांत दक्षिणेला जमणाऱ्या भटभिक्षुकांची पुराने तुडुंब भरलेल्या याच ओढ्यांतून रात्री अपरात्रीं जातांना कशी फजिती होत असे, याच्या हरदासी कथा मीं ऐकल्या होत्या; त्यांची मला या वेळीं आठवण झाली. पांचपासून सहा मैलांपर्यंत एक मैलभर फार मोठा चढाव लागतो. ही एक लहानशी टेकड्यांची ओळच आहे. हा चढाव चढतांना फार जड जाते. मुख्य कातरजचा डोंगर व या टेकड्या यांचे दरम्यानचे दरीतच जुना पेशव्यांचा कातरजचा तलाव आहे; व तेथून पुण्यांत पाणी आणिलें आहे. सहा मैलांपासून ८ मैलांपर्यंत म्हणण्यासारखा चढाव नाहीं. आठ मैलांपासून अकरा मैलांपर्यंत मात्र सारखा घाटाचा चढाव आहे व कांहीं ठिकाणीं तर तो बराच कठीण आहे. नवव्या मैलाच्या जवळ आम्ही कसेबसे आलों, व तेथून वर चढण्यास एक पाऊलवाट आहे व तिनें गेल्यास एक मैलाचा हिसका वांचतो, हें मला ठाऊक होतें म्हणून आम्ही पायगाड्या हातांत घेऊन ती पाऊलवाट पायीं चाललों. असें करतांना आपलेच वाहन आपल्या खांद्यावर घेण्याचा केव्हां केव्हां प्रसंग येतो; तसा आमच्यावरही आला. हा कातरजचा सर्व घाट उत्तम बांधलेला आहे व यंदा पाऊस खूप पडल्यामुळें जिकडेतिकडे हिरवीगार झाडे व शेतें दृग्गोचर होत होतीं. यामुळे सभोवारचा देखावा दृष्टिमनोहर दिसत होता. १० मैलांपर्यंत आम्ही पायी चाललों, तोंच घाटांतल्या सर्वात उंच टेकडींत असलेला बोगदा दिसूं लागला. येथपासून एक मैल चढाव आहे; पण फार बेताचा आहे. शेवटीं एकदाचे आम्ही बोगद्याशीं आलों; परंतु सर्व घाटाचा चढाव चढून आल्यामुळे फार दम लागला व तहानही फार लागली, म्हणून तेथें असलेल्या पब्लिक वर्कसच्या स्टोअरमध्ये गेलों व तेथील कारकुनाजवळ पाणी मागितले. त्याने बोगद्यांतील टाक्याचें स्वच्छ व गार पाणी आणून दिलें व तें आम्हीं यथेच्छ प्यायलों. या जलपानाने आमचा थकवा पार नाहींसा झाला व आह्मांला पुढे जाण्यास हुरुप व हुशारी आली. आतां आमच्या आजच्या पुढच्या प्रवासांतील पुष्कळ भाग उताराचा व निवळ सपाटीचा होता. यामुळेही मनाला आनंद होत होता. परंतु घड्याळांत पाहतां सहा वाजले. ह्मणजे या दोन तासात आमचा प्रवास ताशीं सहा मैलच पडला व पुढे तर रात्रीपर्यंत आह्मांला आणखी वीसएकवीस मैल जावयाचें होतें, ह्मणून आह्मी पायगाडीवर पाय टाकला व बोगद्यांतून जाऊं लागलों. हा बोगदा जवळजवळ दोन फरलांगांचा आहे. याच्यामध्ये रात्रीचे दिवे लावतात. बोगद्याच्या या टोकापासून दुसऱ्या टोकाचा उजेड दिसतो. पण बोगद्याच्या मध्ये अगदी अंधार असतो व पायगाडीच्या खालींवर कांहींच दिसत नाहीं. यामुळे जातांना जरा भीतीच वाटते. पण लवकरच दुसऱ्या टोकांतून उजेड दिसूं लागतो व मग भीति कमी होते. तरी पण बोगद्यांतून एकंदरींत पायगाडीनें जाण्याची मजा वाटते यांत शंका नाहीं. बोगद्याच्या टोकाला एक टुमदार डाकबंगला आहे. आमच्या पायगाड्या उताराला लागल्यावर अर्थात् वाऱ्यासारख्या वेगाने जाऊं लागल्या. येथून तीस मैलांवर असलेल्या नीरानदीच्या पुलापर्यंत रस्ता सपाट किंवा उतरताच आहे, असें म्हटलें तरी चालेल. आपण एका दरींतून चाललों आहोत असा भास होतो. कारण आपल्या दोन्ही बाजूंस लहानमोठ्या टेकड्यांची रांगचीराग लागते व रस्ता व टेकड्या यांच्या दरम्यानच्या सपाट भागांत हिरवीगार शेतें लागतात. चवदा व पंधरा मैलांच्या सुमारास शिवापूर हे गांव लागतें. हे गांव आंब्यांकरितां फार प्रसिद्ध आहे. पुण्यास शिवापुरचा आंबा फार येतो व आंबाही चांगल्या जातीचा असतो. येथे मैलदीडमैल सारखी आंबराईच लागते. पण ही जुनी आंबराई आतां कमी होत चालली आहे. नवी लागवड विशेष होत नाहीं, यामुळें थोड्या वर्षांनी ही आंबराई पार नाहींशी होण्याची भीति आहे. शिवापुरच्या बाजूनें एक चांगला ओढा वाहात जातो. येथें आह्मांला बराच गारवा वाटू लागला. आमच्या पायगाडीचा प्रवास मात्र आतां झपाट्यानें चालला होता व हां हां म्हणतां म्हणतां मैलावर मैल येत होते. बरोबर सात वाजता आम्ही बावीसाव्या मैलाशीं आलों. येथून उजव्या हातास पंतसचिवांचें नसरापूर ह्मणून एक तालुक्याचें गांव आहे, त्याची वाट फुटते. नसरापुराहून दोनतीन फर्लांगांच्या अंतरावर बनेश्वर ह्मणून एका नदीच्या काठीं महादेवाचें देऊळ आहे. या देवळासमारेच्या बऱ्याच भागांत झाडी फारच दाट आहे. ह्मणूनच या ठिकाणास बनेश्वर ह्मणतात. देऊळ चांगले काळ्या दगडांनी बांधलेलें आहे व देवळासमोर दोन सुंदर कुंडे आहेत. या कुंडांत काळसर निळसर रंगाचे खूप मासे आहेत. पुण्याहून बनेश्वर चोवीस मैल आहे व पायगाडीने एका स्वतंत्र दिवसाची ही सफर आहे. मी हें ठिकाण लहानपणीं पुण्यास शिकण्यास असतांना तर पाहिलेच होतें. पण गेल्याच मे महिन्यांत मी बैलगाडीने सकुटुंबसपरिवार याठिकाणी येऊन दोन दिवस राहिलों होतों. यामुळे या मैलाशीं आल्यावर त्या आमच्या मे महिन्यांतील आनंददायी प्रवासाची मला आठवण झाली. असो.
येथून आमचें रात्रीच्या मुक्कामाचे ठिकाण शिरवळ हें बरोबर दहा मैल होतें. तेव्हां आठांच्या आंत आह्मीं आपलें ठिकाण गांठूं असा आह्माला भरंवसा वाटू लागला, व आहीं आमच्या लोहाश्वावर आरूढ होऊन लीलेनें चालूं लागलों. चोवीस मैलाशीं कामथडी ह्मणून वाटेवरच गांव लागतें. तेथून डाव्या हाताला पुरंदर किल्ल्याची वाट फुटते. पुरंदर किल्ला येथून अकरा मैल आहे व येथूनच जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला भाटघरचें प्रचंड धरण याची व भोरची वाट लागते. कामथडीहून भाटघर सहा मैल आहे व तेथून पुढे भोर चार मैल आहे. आह्मीं आमच्या मे महिन्याच्या बैलगाडीच्या प्रवासांत भाटघर व पुरंदर अशीं दोन्ही स्थळें पाहिलीं होतीं यामुळे हे सर्व रस्ते व हीं सर्व ठिकाण मूर्तिमंत माझ्या डोळ्यासमोर उभीं राहिली. व एकाच प्रवासांत दोन प्रवासांचा अनुभव मला आल्यासारखें वाटलें; आतां साधारण रात्रच झाली होती; पण चांदणं थोडेसें होतें. तरी पण आतां सभोवारचा देखावा दिसेनासा झाला व यामुळे हा प्रवास थोडासा कंटाळवाणा व भयप्रदही वाटूं लागला. इतक्यांत आह्मी थोडे खोलखोल जाऊं लागलों, असें आह्मांस वाटलें व पहातों तो एका लोखंडी कठड्याच्या अरुंद अशा पुलावर आह्मी आलों व हा नीरानदीचाच पूल काय अशी आह्मांस शंका आली. पण पुलावर नांव दिसेना. कदाचित् नांव पुलाच्या प्रारंभींच्या दगडी- कामावर असेल असें समजून आह्मीं थोडेसे परतलों. पण पुलावर कोठेहि नांव दिसेना. घड्याळांत पहातां आठ वाजले. तेव्हां हाच नीरेचा पूल असला पाहिजे असा आम्ही मनाचा निश्चय केला. येथून शिरवळ दोनच मैल होतें. तेव्हां मुक्कामाला आलींच, असें आह्मांस वाटले. शिरवळ गांवाच्या बाहेर रावबहादूर देशपांडे ह्मणून रेव्हेन्यू खात्यांत मोठ्या हुद्यावर असलेले पेनशनर गृहस्थ राहत असत. त्यांची माझी एकदां भेट झाली होती, त्याचा फायदा घेऊन त्यांच्या बंगल्यांत रात्रीची विश्रांति घेण्याचा मी बेत केला होता. माझ्या पायगाडीच्या प्रवासाचा एकाएकीं बेत झाल्यामुळें त्या गृहस्थांना आधी पत्र पाठविणें शक्य नव्हतें. पुण्याहून निघतांना तार करावी असें एकदां मनांत आलें होतें, पण त्या ठिकाणास तार असेल किंवा नाहीं या शंकेनें व इतकें करण्यास स्वस्थपणाही नसल्यामुळें तें तसेंच राहून गेलें होतें. अर्थात् त्या गृहस्थाकडे अनपेक्षितपणानें जाणें आह्मांस भाग होतें. शिरवळ गांवाच्या जवळ आल्यावर आम्हीं रावबहादूरांच्या बंगल्याची चौकशी करूं लागलों, तों त्यांचा बंगला शिरवळाच्या पलीकडे आहे असें कळलें. अशा वेळीं अशी बातमी म्हणजे दुष्काळांत तेराव्या महिन्याप्रमाणें वाटते. कारण, आतां आमचीं घोडीं थकत आलीं होतीं. रात्रीमुळे फार वेगानेही जातां येईना. विचारपूस करीत करीत आह्मी शिरवळ गांवाला फुटणाऱ्या रस्त्याशीं आलों. तेथें समजलें कीं, देशपांड्यांचा बंगला पुणे-साताऱ्याच्या रस्त्यावरच आणखी दोन मैलांवर डाव्या बाजूसच आहे. माझी कल्पना बंगला गांवाच्या आसपास असेल, अशी होती. पण तो दोन मैलांच्या लांबीवर आहे असें ऐकून आमच्या थकलेल्या जीवाचें धाबे दणाणलें, व शिवाय त्या गृहस्थांच्या घरीं जाण्यास अवेळ होणार असें वाटूं लागून त्यांना उगाच आपल्याकरितां त्रास पडणार अशी भीति वाटूं लागली. आतांची वेळ रात्रीची; रस्ताही चढावाचा लागूं लागला; समोर काळा काभिन्न डोंगर दिसूं लागला व सभोवार भयाण ओसाड माळचमाळ लागूं लागले. जवळपास कोठे झोपडीची किंवा वस्तीची खूण दिसेना. यामुळे आपण वाट तर चुकलों नाहीं किंवा त्यांच्या बंगल्याच्या पुढें तर आलों नाहीं अशी शंका येऊ लागली. इतक्यांत उजव्या हाताला एक जुनें देऊळ दृष्टीस पडलें. आतां बंगला सांपडला नाहीं तर या पडक्या जुन्या देवळांत रात्र काढण्याचा आह्मीं बेत केला व तसेच हळुहळू पुढे चाललों, तों डाव्या बाजूस बंगल्यासारखें कांहींतरी दिसूं लागलें, व आमच्या जीवांत जीव आला. थोड्याच अवकाशाने उजव्या बाजूस सडक फुटलेली दिसली. हीच रावबहादूरांच्या बंगल्याची सडक असली पाहिजे, असा आह्मीं तर्क केला. इतक्यांत बंगलाच स्पष्टपणें दिसला व चक्षुर्वै सत्यं या म्हणीचा आम्हांला प्रत्यय आला. आह्मी बंगल्याच्या दाराशीं येऊन रावबहादूरांची चवकशी केली. रावबहादूर आपल्या खोलींत आंथरुणावर जाऊन पडले होते. त्यांना मी आपले नांवगांव सांगून ओळख पटविली व रावबहादुरांनीं आमचें मनापासून स्वागत केलें. बंगल्याचें ठिकाण बरोबर ठाऊक नसल्यामुळे फार विचारपूस करीत यावें लागलें, यामुळे फार रात्र झाली असें आह्मीं रावबहादुरांस सांगितलें, रावबहादुरांचे घरी आमची जेवण्या- निजण्याची उत्तम सोय झाली हें सांगणें नकोच. परत येतांना दिवसा उजेडी यावें म्हणजे आमची शेतवाडी व बागबागाईत पाहण्यास सांपडेल, असें रावबहादुरांनी सांगितले व मीही त्यांचे म्हणण्याप्रमाणें करण्याचें कबूल केलें. इकडल्या तिकडल्या गप्पागोष्टी झाल्यावर आह्मीं झोपी गेलों व चारपांच तासांच्या पायगाडीच्या श्रमानें दमल्यामुळे आंथरुणावर पडल्याबरोबर निद्रादेवीने आमच्यावर अनुग्रह केला.
पुढे जाण्याकरितां आहीं पहांटेस सहांच्या सुमारास उठलों व चहा-पाणी झाल्यावर बरोबर साडेसहा वाजतां रावबहादूरांचा निरोप घेऊन पायगाडीवर पाय ठेवला. आतां सकाळ झाल्यामुळे सभोवरचा प्रदेश स्पष्टपणे दिसूं लागला. ज्याप्रमाणें पुण्यापासून कातरजच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे, तसेंच येथेंहि दृष्टीस पडलें. नीरानदी सोडल्यापासून खंडाळ्याच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे. आह्मी रावबहादुरांच्या बंगल्याहून निघून वाटेला लागलों तोंच पसतिसावा मैल लागला. शिरवळपासून रावबहादुरांचा बंगला तीन मैल दूर आहे. म्हणूनच आदल्या रात्रीं आह्मांला बंगला लागतां लागेना. पण आदल्या दिवशी याप्रमाणें बरेच पुढे आल्यामुळे सातारा बरोबर पसतीस मैलच राहिला. रावबहादुरांचें ठिकाण पुणे व सातारा यांचे मधोमध आहे असे आढळून आलें. आतां पांच मैलानें आह्मांला खंडाळा घाट लागावयाचा होता. हा सर्व भाग अगदीं खडकाळ माळरानी असल्यामुळें दृष्टीला रुक्ष व ओसाड भासे. हिरवीं शेतें कोठें कोठें अगदीं तुरळक दिसत. अर्ध्या तासाने आह्मी ४० व्या मैलाशीं आलों. येथेंच खंडाळें नांवाचें गांव लागतें व येथूनच घाटास सुरुवात होते. आपल्यासमोरच काळीभोर व मध्ये मध्ये हिरवी अशी डोंगरांची रांग दत्त म्हणून उभी राहते. या रांगेच्या मधला एक सुळका तर फारच उंच व भयंकर दिसतो. सडक तर त्या सुळक्याकडे थेट जाते; व हा डोंगर आपण ओलांडणार कोठें, अशाबद्दल शंका उत्पन्न होते. इतक्यांत रस्ता डाव्या बाजूस एकदम वळतो व डाव्या बाजूस डोंगराची रांग बरीच सखल होत गेल्यामुळे इकडून ओलांडण्याची वाट आहे, असें वाटतें. पण डाव्या बाजूस बरेंच गेल्यावर रस्ता पुन्हां एकदम उजव्या बाजूस वळतो व मनुष्य त्या सुळक्याच्या अगदीं थेट खालीं येतो. येथून त्या सुळक्याची उंची, त्याचा प्रचंडपणा व त्याचा बिकटपणा यांची चांगलीच कल्पना मनांत येते. रस्ता उजवीकडे जात जात व वळणे घेत घेत डोंगराच्या माथ्यावर येतो. या घाटाचा चढाव कातरजपेक्षां थोडा जास्त आहे, असें आह्मांस वाटलें. कारण तो साडेतीन मैलांच्यावर आहे. ४३ मैलांचे पलीकडे आह्मी गेलों तो रस्त्याला लागून डाव्या हाताला सुंदर पाण्याचें एक टांकें लागलें. तेथे अर्थात् दगडाला शेंदूर फासून एक ह्मसोबा तयार केलेला होताच. तेव्हां या सुंदर ठिकाणीं बसून फराळ करावा असा आह्मीं बेत केला व त्याप्रमाणें बरोबरचें पाथेय काढले. 'भुकेला कोंडा व निजेला धोंडा' या म्हणीचा प्रत्यय आह्मांला येथे आला. आदल्या दिवशींची साधी व शिळीच झुणकादशमी आह्मांला कितीतरी गोड लागली व त्यावर त्या टांक्यांतील स्वच्छ व गार पाणी पिऊन आमचा आत्माराम गारेगार झाला व पुढच्या प्रवासास आह्मी ताजेतवाने झालों. पण येथेंच आह्मांला साडेआठ झाले. थोड्याच वेळांत घाटमाथा आला व आह्मीं आमच्या पायगाडीवर चढून पायगाडीस टांच मारून भराभर चालूं लागलों व थोड्याच वेळानें सपाटीवर आलों. खंडाळा घाटाच्या अलिकडील भाग रुक्ष आहे, तसा इकडे नाहीं. इकडचा भूमिभाग सुपीक व नयनमनोहर दिसला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंस शाळू, गहू, हरभरा, भुईमूग इत्यादि पिकांचा हिरवागार निळसर किंचित् धूसर रंगाचीं शेतेंच्या शेतें लागलीं. यंदां जिकडे तिकडे पाऊस पुष्कळ पडल्यामुळे पिकें विशेषच जोमांत दिसली. अठ्ठेचाळीस मैलांच्या सुमारास सुकूल नांवाचें गांव लागलें. हें गांव बरेंच मोठे आहे व येथूनच वाईकडे उजव्या बाजूस वाट फुटते. वाई येथून फक्त ८ मैल आहे. आतां आह्मांला पुढे एकवीस मैल जावयाचें होतें व नऊ तर वाजून गेले होते. तेव्हां साताऱ्यास पोंचण्यास अकरा साडेअकरा वाजणार असें वाटलें. हा प्रांत बराच सपाटीचा आहे. यामुळे आमचा प्रवास जोरानें चालला होता. पन्नास मैलांनंतर वाठारकडून वाईला जाणारा रस्ता आह्माला लागला. येथूनहि वांई आठच मैल आहे. पुढे एकदां साताऱ्याकडून वाईचा रस्ता लागला तेथूनहि वाई आठच मैल आहे. यावरून पुणे- सातारा रस्ता या ठिकाणीं कांहींसा वर्तुलाकार असावा म्हणून वाई या तिन्ही रस्त्यांपासून आठच मैल आहे.
पुण्यापासून छपन्न मैलांशीं भुंजगांवाजवळ कृष्णा नदीवरील पूल लागला. या ठिकाणीं नदी फारशी मोठी नाहीं. नीरेच्या पुलापेक्षां हा पूल बराच लहान आहे. सातारारोड स्टेशनापासून साताऱ्यास येतांना कृष्णेवर जेवढा पूल आहे, तेवढाहि हा पूल नाहीं. यामुळें प्रथमतः हा पूल कृष्णेवरचा आहे हें ध्यानांतहि येत नाहीं. येथून पुढे एकसष्टमैलांजवळ असलेल्या लिंबगांवच्या खिंडीपर्यंत चढावाचा रस्ता आहे. आतां ऊनहि झाले होते यामुळे प्रवासाचा फारच त्रास झाला. तहानहि फार लागू लागली. मग वाटेंत एका ठिकाणीं चांगलीं पिकलेली केळीं घेतली व तीं खाल्लीं. त्यामुळे जरा बरें वाटलें. ही लिंबची खिंड व येथला एकंदर देखावा पुणे-लोणावळें रस्त्यावरील वडगांवच्या खिंडीसारखा दिसतो. लिंबच्या खिंडीच्या माथ्यावर कसेबसे आह्मीं आलों व तेथून पुन्हां जी उतारास सुरुवात झाली ती आह्मांस वेण्या नदीच्या पुलापर्यंत पुरली. वेण्येचा पूल पुण्याहून सदुसष्टाव्या मैलाजवळ आहे. आतां सातारा दोन अडीच मैलच राहिला.
एकदांचे मुक्कामाला आलों, असे आह्मांस वाटूं लागलें. पण सातारा उंचावर असल्यामुळे या दोन अडीच मैलांला वाजवीपेक्षां जास्त वेळ लागला. तरी शेवटीं एकदांचे सातारा गांवाकडे जाणाऱ्या रस्त्याशीं आह्मी येऊन पोंचलों व गांवच्या रस्त्याला लागलों. गांव चढत्या किल्ल्याच्या बाजूवरच बसलेला असल्यामुळें आह्मांस गांवातून चालतच जावें लागलें. शेवटीं बाराच्या सुमारास आमच्या मित्राच्या घरीं आह्मीं सुखरूप येऊन पोंचलों. आह्मी पुण्याहून पायगाडीनें आलों, हें पाहून माझ्या मित्राच्या मंडळींना साश्चर्य आनंद वाटला.
रात्रीं आह्मीं आमच्या मित्राचें पुनर्विवाह या सामाजिक विषयावरील नाटक पहावयास गेलों. साताऱ्यासारख्या शहरीं पुनर्विवाहासारख्या सामाजिक विषयावरील एका कर्त्या सुधारकानें लिहिलेले नाटक पाहण्यास पुष्कळ प्रेक्षक जमावे हें स्वाभाविक होतें. मंडळीनें एकंदरींत प्रयोग चांगल्या प्रकारें केला, यांत संशय नाहीं. मात्र नाटक मोठे असल्यामुळे प्रयोग संपण्यास रात्रींचे तीन वाजले.
दुसरे दिवशीं आह्मांला उठण्यास उशीर झाला व सज्जनगडास दोन प्रहरनंतर जाण्याचे ठरलें. या वेळीं माझ्याबरोबर चारजण आणखी पायगाडीवाले होते. साताऱ्याहून सज्जनगड सहासात मैल आहे. तेव्हां चार वाजतां निघून सात साडेसात वाजतां आह्मीं सहज परत येऊ, असा आमचा अंदाज होता. सातारा शहर हे किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, हें वर लिहिलेच आहे. पण हा किल्ल्याचा डोंगर म्हणजे एकटाच सुळका नाहीं, तर ही एक पूर्वपश्चिम जाणारी डोंगराची रांगच आहे व या रांगेत एकीकडे सातारचा किल्ला आहे व दुसरीकडे यवतेश्वराचा डोंगर आहे व सातारच्या किल्ल्यावरून यवतेश्वराच्या डोंगरावरून डोंगरांच्या पठारापठारानें महाबळेश्वरापर्यंत पायवाट जाते. सातारचा किल्ला व यवतेश्वराचा डोंगर यांचेमध्यें डोंगरांची रांग सखल असून खिंडीसारखी तुटली आहे व या खिंडीचे खालीं लहानसा बोगदा केलेला आहे व पुणे-कोल्हापूर रस्ता या बोगद्यांतूनच गेला आहे. बोगद्याच्या डाव्या हातास कोल्हापुरचा रस्ता वळतो व उजव्या हातास सज्जनगडाचा रस्ता फुटतो. साताऱ्याशेजारचा बोगदा टाकल्यावर मात्र मैल दीड मैल खूब उतार लागतो; व येथपर्यंतच रस्ता चांगला खडीचा आहे. पुढला रस्ता नुसत्या मुरमाचा आहे, व त्याला भयंकर चढउतार आहेत. कारण, उजव्या हाताच्या यवतेश्वराच्या डोंगरांतून कितीतरी ओढेनाले खाली येऊन ते उरमोडी या नदीला जाऊन मिळाले आहेत. परळीच्या मैल दीड मैल अलीकडे उरमोडी नदी लागते. या नदीला अगदी अरुंद असा लांकडी साकू बांधलेला आहे. त्यावरून पायगाडी जेमतेम आह्मी नेली. पुढे हा रस्ता परळी गांवाकडे जातो. परळी किल्ल्यास जाण्याकरितां हा रस्ता टाकून अर्धा एक मैल अगदीं खांचखळग्याच्या पाऊलवाटेनेंच जावें लागतें, यामुळे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीशीं येईतों पांच वाजून गेले होते. तेथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यांत आह्मी आपल्या पायगाड्या ठेवल्या व किल्ला चढण्यास लागलो. प्रथम एक लहानशी टेकडी चढून गेल्यावर किल्ल्याचा सुळकाच्या सुळका लागतो. हा किल्ला फार मोठा नाहीं. पण किल्ल्याच्या सभोवारचे काळेकभिन्न खडकच अगदी भिंतीसारखे तुटलेले आहेत. पूर्वी या किल्ल्याला जाण्यास चांगल्या पायऱ्या असाव्यात असें वाटतें. कारण, पायऱ्यांच्या खुणा सारख्या दिसत होत्या. या परळीच्या किल्ल्याची वाट व पायथ्यापर्यंतची वाट या पाहून मला देहूच्या वाटेची आठवण झाली. देहूची तीनचार मैलांची वाट अशीच अगदीं वाईट आहे. या दोन्ही ठिकाणीं मोठमोठ्या यात्रा जमतात. परळीला दासनवमीस सात हजारपर्यंत यात्रा जमते, असें मला समजलें. शिवाय साताऱ्याहून सज्जनगडास वारंवार जाणारे लोक पुष्कळ असतात. असे असून या वाटेची इतकी वाईट स्थिति कां? लोकलफंडाकडून या यात्रेकरूंनी चांगली वाट करण्याबद्दल दाद लावून घेऊं नये काय, असें माझ्या मनांत आलें. निदान किल्ल्याची वाट तरी चांगली कां नसावी? रामदासांच्या समाधीचें ठिकाण हे. रामदासांच्या वडीलबंधूंचे वंशज हयात असून महाराष्ट्रांतले पहिल्या प्रतीचे सरदार आहेत. चाफळकरांना मोठी जहागीर आहे. शिवाय रामदासी पंथाची शिष्यशाखाही मोठी आहे. तेव्हां या सरदारांनीं किंवा त्यांच्या शिष्यांपैकीं संपन्न गृहस्थांनी किल्ल्याचा रस्ता दुरुस्त करून लोकांना चढतांना सुखदायक होईल असा कां करूं नये? अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनांत वारंवार येत होते, इतकी या सर्व रस्त्याची वाईट स्थिति होती. शेवटीं सहा साडे सहाच्या सुमारास आह्मीं एकदांचे सज्जनगडाच्या किल्ल्यावर येऊन पोचलों व पुण्याहून सज्जनगडाची आमची पायगाडीची सफर एकदांची संपली; असें मनांत येऊन मनाला एक प्रकारें आनंद झाला.
म हाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या मुख्य डोंगराच्या ओळीपासून ज्या पुष्कळ पोटओळी सातारा जिल्ह्यांत पसरल्या आहेत; त्यांपैकी एका विस्कळीत ओळींमधील एका स्वतंत्र सुळक्यावर परळीचा किल्ला बांधलेला आहे. सातारच्या आसपासच्या भागाला, सातारचा अजिमतारा व परळीचा नौरसतारा (हीं दोन्ही नांवें औरंगझेबाने दिलेलीं आहेत हें पुढें या लेखाच्या ऐतिहासिक भागांत येईल) हे जयविजयासारखे आहेत. सातारचा अजिमतारा परळीच्या नौरसताऱ्यापेक्षां उंचीनें, मजबुतीनें व विस्तारानें जरा मोठा आहे. सातारचा किल्ला समुद्रसपाटीपासून ३३०० फूट आहे तर परळीचा किल्ला ३०२० फूट उंच आहे. परळीच्या किल्ल्याला दोन वाटा आहेत; एक परळी गांवाच्या अलीकडून उरमोडी नदी ओलांडल्याबरोबर सरळ वर जाते व दुसरी परळी गांवांतून जाते. मी दोनदां परळी पाहिली व दोन्ही वेळां निरनिराळ्या मार्गाने गेलों. दुसऱ्या खेपेस परळी गांवांतील देवळें पाहिलीं त्याची हकीकत पुढें दिली आहे. साताऱ्याकडून जाणाऱ्यास हा दुसरा रस्ता दोन मैलांनीं अधिक लांब पडतो. कारण एका टेकडीला वळसा घालून परळी गांवामधून जावें लागतें. हा रस्ता पहिल्यापेक्षां जास्त बिकट आहे. पण किल्ल्याच्या दरवाज्याखाली दोन्ही रस्ते एके ठिकाणींच मिळतात. किल्ल्याच्या दरवाजाशीं येईपर्यंत किल्ल्याचा दरवाजा अगदी दिसत नाहीं. कारण दरवाज्याचें तोंड पूर्वेस आहे व मनुष्य जरा बाजूनें चढतो. शिवाय दरवाजाच्या वर तुटलेला कडा आलेला आहे. पहिला दरवाजा उत्तम दगडांनी बांधलेला आहे व त्याचे बाजूस बुरूज असून ते मजबूत आहेत. दरवाज्याच्या कमानीच्या वरच परशियन भाषेत लिहिलेला एक शिलालेख आहे. पण या किंवा किल्ल्यांत असलेल्या आणखी एकदोन शिलालेखांचें भाषांतर अझून झालेलें नाहीं. निदान पुष्कळ चौकशी करूनसुद्धां तें मला कोठेंही मिळालें नाहीं. परशियन जाणणाऱ्या वाचकांचें याकडे लक्ष जाईल काय ?
दरवाज्याच्या खालपासून अगदीं दुसऱ्या दरवाज्याच्या वरपर्यंत चांगल्या दगडी बांधीव पायऱ्या आहेत. पहिल्या दरवाज्यांतून जरासें वर गेलें म्हणजे दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा चांगला मजबूत आहे. याच्या देवडीच्या आंत गेल्यावर उजव्या हाताच्या भिंतींत एक परशियन शिलालेख आहे. येथल्या पायऱ्या चढून वर गेलें कीं, किल्ल्याच्या सपाटीवरच मनुष्य येतो. येथे जवळच डाव्या हाताला एक लहानशी मुसलमानी कबर लागते व उजव्या हाताला एक लहानसा तलाव लागतो. याला दगडी पायऱ्या आहेत व हा अगदी अलीकडे बांधलेला - निदान दुरुस्त केलेला - आहे असें तेथल्या संगमरवरी शिलालेखावरून दिसून येतें.
हा किल्ला फार मोठा नाहीं; त्याची रुंदी तर फारच थोडी आहे. एकंदर घेर पंचावनशे फुटांच्या वर नाहीं. तलाव व कबर टाकून जरा पुढें गेलें ह्मणजे डाव्या हाताला राहण्याचीं घरें लागतात व उजव्या हाताला पहिल्यापेक्षांही मोठा तलाव लागतो. हा तलाव चांगल्या बांधकामाचा असून त्याला तीहींकडून आंत जाण्यास चांगल्या घाटवजा पायऱ्या बांधल्या आहेत. एका लहानशा खोपटांत तलावांतून तोटी लावून पंपानें पाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. येथें ही अर्वाचीन यांत्रिक सुधारणा शिरली आहे असें पाहून मला आश्चर्य वाटलें !
पुढें राममंदिराच्या फरशी केलेल्या पटांगणांत शिरतों तों तेथें फूटबॉलचा डाव चालू होता. हा प्रकार पाहून तर आमचें आश्चर्य दुणावलें ! काय अर्वाचीन पाश्चात्य सुधारणेचा व पाश्चात्त्य संस्थांचा जोर आहे पहा ! श्रीसमर्थ रामदासाच्या वसतिस्थानांतसुद्धां इंग्रजी फुटबॉलनें प्रवेश केला ना? यावरून अर्वाचीन सुधारणेच्या अप्रतिहत गतीची चांगली कल्पना माझे मनांत आली. नंतर आम्ही राममंदिराच्या सभामंडपाचे पाय-यांशीं आलों. येथें एक जुना गणपति मंदिराकडे पाठ करून पण मंदिरांत शिरणाराकडे तोंड करून बसविलेला आहे. पायऱ्यांवर पादत्राण वगैरे काढून ठेवून आम्हीं सभामंडपांतून वर देवाकडे गेलों. सभामंडपाचें काम लांकडी आहे, मात्र खालीं पांढऱ्या- काळ्या अलीकडील संगमरवरी विटांची फरशी केलेली आहे. राममंदिर बरेंच जुनें दिसतें. त्याच्या सभोंवार मोठमोठ्या मुसलमानी पद्धतीच्या कमानी असून त्या कमानींवर घुमट केलेला आहे. आंत गाभारा आहे व त्यांत राम, लक्ष्मण, सीता, मारुती व रामदास अशा पांच मूर्ति आहेत. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूकडून गाभाऱ्याचे खाली भुयारांत जाण्यास अगदी काळोखाचा वांकडा जिना आहे. त्यांतून आह्मीं खालीं गेलों. तेथे गाभाऱ्याचे खालीं रामदासस्वामींची समाधि आहे. त्यावर फुलांच्या माळा घातलेल्या दिसल्या. समाधीच्या पलीकडे भिंतींत कोनाड्यांत त्यांच्या पितळी पादुका आहेत. हें सर्व पाहून झाल्यावर आम्ही समोरून पण तळघरवजा गाभाऱ्याचे पुढील प्रशस्त दालनांतून पायऱ्या चढून सभामंडपाशीं आलों.
राममंदिर व रामदासस्वामींची ही समाधि थेट उत्तर हिंदुस्थानांतील मुसलमानी कबरस्थानाप्रमाणेंच आहे. म्हणजे कबरस्थान खालीं तळघरवजा बांधलेल्या भागांत असावयाचें व वर आणखी कबरस्थानाचा आकार असावयाचा; त्याऐवजीं येथें राममूर्ति आहेत. यावरून जुन्नरच्या लेण्याद्रिप्रमाणें हें राममंदिर मूळचें कबरस्थान असून त्याच्याच अवशेष भागावर हें मंदिर बांधलेलें आहे कीं काय असा भास होतो. कदाचित् त्याच धर्तीवर ही समाधि बांधली असेल. राममंदिराचे शिखर चुन्याविटांचे असून त्यावर उत्तम गिलावा करून जागोजाग चित्रें केलेलीं आहेत. एकंदर देऊळ, त्याच्या सभोवारचें पटांगण व त्याचें शिखर याचें काम फार सुबक आहे, यामुळें हे ठिकाण पाहून मनाला आनंद होतो व रामदासाच्या शिष्यांनी रामदासासारख्या विख्यात स्वामीला साजेशीच समाधि व मंदिर बांधलें आहे असें वाटल्याखेरीज रहात नाहीं. समाधियुक्त मंदिर पाहिल्यावर आम्हीं देवळाशेजारी असलेल्या सोप्यावजा लांकडी इमारतीत गेलों. तेथे देवळाचे पुजारी वगैरे रहातात. याच घरांत रामदासस्वामी रहात असत असें आम्हांस सांगण्यांत आलें. आम्हीं समर्थांची निजावयाची खोली, त्यांचा मच्छरदाणीसकट पितळी छप्परपलंग पाहिला. तो लांबीला थोडा कमी भासला, पण रामदासस्वामी त्या पलंगावर निजत नसत तर तेथेंच घातलेल्या विटांच्या ओट्यावर निजत असत असें आम्हांस कळलें, स्वामींची गुप्ती असलेली लांब कुबडी, त्यांची उंच वेताची काठी, त्यांची पाण्याची कळशी, तांब्या, भांडे, पळीपंचपात्री वगैरे सर्व जिनसा आम्ही पाहिल्या. श्रीसमर्थांच्या हयातीतील व त्यांनीं वापरलेल्या जिनसा जितक्या श्रद्धेनें व भक्तिभावानें येथें ठेवण्यांत आल्या आहेत, तितक्या श्रद्धेनें व भक्तिभावानें महाराष्ट्रांतील इतर पूर्वकालीन थोर पुरुषांच्या जिनसा ठेवण्यांत आल्या असत्या तर हल्लींच्या पिढीला त्यांचा बराच उपयोग झाला असता असें माझ्या मनांत आलें. पण परळी हें गांव व हे ठिकाण रामदासांना इनाम असून त्यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या वंशाकडे म्हणजे चाफळकर सरदारांकडे हें इनाम सारखें चालत आल्यामुळे अशा जिनसा व वस्तु राहू शकल्या. इतर थोर पुरुषांच्या बाबतींत अशा तऱ्हेची वंशपरंपरा चालली नसेल म्हणून वस्तु शिल्लक राहिल्या नसतील असें मला वाटलें. इतकें पाहून होत आहे तो साडेसहांचा सुमार होऊन अंधार पडूं लागला म्हणून आम्हांला परतावें लागलें. परत येतांना आम्हांला एक गबाळे पोषाख केलेले गृहस्थ उतरतांना दिसले ते व आम्ही पहिल्या दरवाज्याशी आलो. आमचे जवळ दुर्बीण होती ती त्यांनीं मागितली व तींतून दरवाजावरील शिलालेख पाहूं लागले. आम्हीं जातांना तो लेख पाहिला होता व त्यावर परशियन अक्षरे आहेत असें स्पष्ट दिसत होतें. पण थोडा वेळ दुर्बीणीने पाहून ते गृहस्थ आह्मांला विचारू लागले, "तुम्हांला या लेखांत 'वंदे मातरं' ही अक्षरें दिसत नाहींत? मला तर तीं स्पष्ट दिसतात."
आपल्या काळीं कवन झालेल्या बंकिमचंद्राच्या 'वंदे मातरं' या पद्यांतील अक्षरें परळीच्या शिळापटावर या गृहस्थांना दिसतात हें पाहून त्यांच्या सुलभश्रद्धस्वभावाबद्दल मला कींव आली व डिकिन्सच्या 'पिकविक पेपर्स' मधल्या एका प्रसंगाची आठवण झाली. असो.
दुसऱ्या खेपेस आम्हीं परळीचा किल्ला पाहिला त्या वेळीं आम्हीं परळीगांवाकडून गेलों. इकडून रस्ता थोडा बिकट आहे हें वर सांगितलेंच आहे. परळी हें गांव रामदासांच्या वंशजांना इनाम आहे. येथेंही एक राममंदिर आहे. त्यांत विशेष पाहण्यासारखें कांहीं नाहीं. पण येथें दोन हेमाडपंती जुनीं देवळें आहेत त्यांचें काम मात्र पाहण्यासारखे आहे. त्यांपैकीं एक देऊळ मोडलेंच आहे. दोन्हीही देवळें महादेवाचींच आहेत, त्यांना तेथले लोक विरूपाक्षाचें देऊळ ह्मणतात. दुसरें देऊळ चांगलें शाबूत आहे. ही देवळें पूर्वाभिमुख आहेत. देवळाला गाभारा व सभामंडप आहे. सभामंडप चोवीस फूट औरस चौरस आहे. व खांबांच्या चार चार ओळी आहेत. खांबांचें नक्षीकाम अप्रतिम आहे. या खांबांनी जे लहान लहान चौक पडले आहेत त्यांवर कोपऱ्या कोपऱ्यानें चार पाटथरें टाकून त्याची तक्तपोशी केली आहे. मंडपाच्या मुख्य दरवाजावरही पुष्कळच नक्षी आहे. मंडपाला लागून थोडीशी चिंचोळी जागा असून त्याचे पुढें देवाचा गाभारा आहे. गाभाऱ्याचा दरवाजाही चांगल्या कोरलेल्या दगडाचा आहे. देवळासमोर एक दीपमाळ आहे. ती मोठमोठ्या अखंड दगडांची केलेली आहे. या देवळांचें काम खरोखरीच आश्चर्य करण्यासारखें आहे; मला हीं देवळें पाहून ग्वालेरच्या किल्लयांतील सासबाहु नांवाच्या देवळांची आठवण झाली. ग्वालेरच्या किल्ल्यांतील देवळें याहून मोठीं आहेत व ती या देवळांपेक्षां जास्त चांगल्या स्थितीत आहेत. पण हीं देवळें हेमाडपंती पद्धतीचे उत्तम मासले आहेत यांत कांहींएक शंका नाहीं. पण या देवळांत एक गोम आहे अझून सांगायची आहे. गोम मात्र पठाडी आहे. यामुळे इतकी सुंदर देवळें xxxx (अदर्शनीय?) झालीं आहेत. या देवळांतील उत्तम नक्षीच्या कामाबरोबर या ठिकाणीं अश्लील बीभत्स अशीं पुष्कळ चित्रे आहेत व हीं चित्रे पुढच्या दरवाजाच्या बाजूस जे मोठमोठे एकसंध दगड बसविलेले आहेत त्यांवर आहेत, तसेंच गाभाऱ्याच्या दरवाजावरही आहेत. इतक्या सुंदर नक्षीच्या महादेवाच्या देवळांत अशी चित्रे कोठून आलीं असा प्रश्न माझ्या मनांत उभा राहिला. मी आजपर्यंत बुद्धकालीन व तदनंतरच्या दगडी इमारती व देवळें पुष्कळ पाहिलीं पण अशा प्रकारचीं बीभत्स व अश्लील चित्रे पाहिलीं नव्हती. फार झालें तर वस्त्रहीन अशा मूर्ति व चित्रे पाहण्यांत आलीं होतीं, पण या देवळावरील चित्रे फारच किळसवाणीं यांत शंका नाहीं.
या बाबतींत पुराणसंशोधनांत ज्यांचीं बरींच वर्षे गेलीं आहेत अशा रा. देवदत्तराव भांडारकर यांना विचारतां असें समजलें कीं, हिंदुस्थानांतील कांहीं कांहीं भागांतील देवळांत अशीं बीभत्स चित्रे आहेत खरी. अर्थात् हीं असलीं चित्रे फार क्वचित्च सांपडतात. पण हिंदुस्थानांत शाक्त पंथासारखे जे वाममार्ग होते, त्या वाममार्गी लोकांच्या काळच्या देवळांत अशीं चित्रे असतात असें दिसतें असें रा. भांडारकरांचे मत आहे. पूर्वकाळीं या वाममार्गाचा गुप्तपणें बराच प्रसार असावा असें या चित्रांवरून दिसतें. येथपर्यंत सज्जनगडाच्या सद्यःस्थितीचें वर्णन झालें. आतां थोडेंसें सिंहावलोकन करूं या.
परळी गांवांतील या जुन्या देवळांवरून व परळीच्या किल्ल्याच्या तटबंदीवरून हा किल्ला मोंगलांच्या पूर्वीचा असावा असें दिसतें. पण हा किल्ला कोणी बांधला व केव्हां बांधला हें कळण्यास सध्यां साधन नाहीं. किल्ल्यावर व देवळांत असलेल्या शिलालेखांचा जर कोणी अर्थ लावला तर जास्त माहिती मिळण्याचा संभव आहे. सातारा ग्याझीटीयर तयार करतांना हे लेख लावण्याचा कां प्रयत्न झाला नाहीं हें समजत नाहीं; पण या परळीच्या किल्ल्यांतील शिलालेखांच्या उदाहरणावरून ग्याझीटीयरची माहिती केव्हां केव्हां किती अपुरी असते हे दिसून येतें.
पण वेगळी गोष्ट खास दिसते कीं, सातारचा किल्ला व परळीचा केल्ला हे या प्रांताचे जय विजय असल्यामुळे जोडकिल्ल्या सारखेच आहेत xx ह्मणून बहुधा ते एकाच काळीं बांधलेले असावेत व ते कदाचित् बाहामनी राज्याच्या आधींच्या हिंदुराजाच्या वेळचे असतील किंवा ब्राह्मणी राज्यांत बांधलेले किंवा दुरुस्त केलेले तरी असतील. इतकें निःसंशय आहे कीं, या किल्ल्यांचा उल्लेख चवथा बहामनी राजा महमदशहा (१३५८ ते १३७५) याच्या कारकीर्दीत येतो.
पुढें ब्राह्मणी राज्याचे तुकडे तुकडे झाल्यावर सातारा प्रांत व हे किल्ले वैजापुरकरांच्या ताब्यात आले व ते मराठेशाहीपर्यंत त्यांच्याच ताब्यांत होते. १६७३ मध्ये शिवाजी महाराजानीं प्रथमतः परळीचा किल्ला सर केला; नंतर सातारच्या किल्ल्याला वेढा देऊन तोही किल्ला सर केला.
शिवाजीच्या मरणानंतर औरंगझेबाने मराठ्यांचें राज्य काबीज करण्याकरितां भगीरथ प्रयत्न केले त्यांमध्ये १७८० सालीं त्याने हे किल्ले काबीज केले व त्यांना अजिमतारा व नौरसतारा अशीं नवीं नांवें ठेविलीं. परंतु औरंगझेबाच्या दुसऱ्या नांवाप्रमाणेच तीं त्याच्या पश्चात् लुप्तप्राय झाली. शाहु महाराज महाराष्ट्रांत परत आल्यावर हे दोन्ही किल्ले परत मराठ्यांच्या ताब्यांत आले व मराठेशाहीचा शेवट होईपर्यंत ते त्यांच्याच ताब्यांत होते. १८१८ मध्ये हे दोन्ही किल्ले इंग्रजांच्या ताब्यांत आले.
१६७३ मध्ये शिवाजीमहाराजानी हा किल्ला सर केल्यावर तो सातारा किल्ल्याच्या शेजारी आहे असें जाणून समर्थ रामदासस्वामी यांस रहावयास दिला व १६७३ पासून १६८१ पर्यंत म्हणजे आपल्या आयुष्याची शेवटचीं आठ वर्षे स्वामींनीं परळीच्या किल्ल्यावर काढली. तेव्हांपासून त्याला सज्जनगड असें नांव पडलें. शिवाजीच्या पश्चात् संभाजीला रामदासांनी ज्या एका प्रसिद्ध पत्रानें उपदेश केला तें परळीसच लिहिलें व तेथूनच रवाना झालें. म्हणून व लगेच 'रामदासांचे महत्त्व व त्याचा दासबोधांतील उपदेश' या विषयाचा विचार करावयाचा आहे. त्याला योग्य उपक्रम हें पत्र आहे म्हणून तें पत्र येथे समग्रच देणें वावगे होणार नाहीं.
अखंड सावधान असावें । दुश्चित कदापि नसावें ।
तजवीज करीत बसावें । एकांत स्थळीं ॥ १ ॥
कांहीं उग्र स्थिति सोडावी । कांहीं सौम्यता धरावी
चिंता लागावी परावी । अन्तर्यामीं ॥ २ ॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे ।
सुखी करून सोडावें । कामांकडे ॥ ३ ॥
पाटांतील तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना ।
तैसे जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४ ॥
जनाचा प्रवाहो चालला । म्हणजे कार्यभाग आटोपला ।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटें ॥ ५ ॥
श्रेष्ठीं जें मेळविलें । त्यासाठीं भांडत बैसलें ।
तर मग जाणावें फावलें । गनीमासीं ॥ ६॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसऱ्याचा जय ।
धीर धरून महत्कार्य । समजूनी करावें ॥ ७ ॥
आधींच पडली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ति ।
या कारणें समस्ती । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग ।
ऐसें जाणोनि सांग । समाधान करावें ॥ ९ ॥
सकल लोक एक करावे । गनिम लोटोनि काढावे ।
एणें करितां कीर्ति धावे । दिगंतरीं ॥ १० ॥
आधी गाजवावे तडाखे । तरी मग भूमंडळ धाके ।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ ११ ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून सांडावा ।
आला तरी कळों न द्यावा । जनामध्यें ॥ १२ ॥
राज्यामध्यें सकल लोक । सलगी देऊनि करावे साक ।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजेंचि नये ॥ १३ ॥
बहुत लोक मेळवावे । एक विचारें भरावे ।
कष्ट करोनि घसरावें । म्लेंच्छांवरी ॥ १४ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणीक मेळवावें ।
महाराष्ट्रराज्यचि करावें । जिकडे तिकडे ॥ १५ ॥
लोक हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी ।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १६ ॥
शिवराजास आठवावें । जीवित तृणसमान मानावें ।
इहलोकी परलोकीं तरावें । कीर्तिरूपें ॥ १७ ॥
शिवराजाचें आठवावें रूप । शिवराजाचा आठवावा साक्षेप ।
शिवराजाचा आठवावा प्रताप । भूमंडळीं ॥ १८ ॥
शिवराजाचें कैसें बोलणें । शिवराजाचें कैसें चालणें ।
शिवराजाची सलगी देणें । कैसी असे ॥ १९ ॥
सकळ सुखाचा त्याग । करोनि साधिजे तो योग ।
राज्य साधण्याची लगबग । कैसी केली ॥ २० ॥
याहुनि करावें विशेष । तरिच म्हणावें पुरुष ।
या उपरि आतां विशेष । काय ल्याहावें ॥ २१ ॥
मराठे संतमंडळ व मराठे कविमंडळ यांच्या काव्यग्रंथांचा व त्यांच्या भक्तिपंथाचा मराठेशाईच्या उदयाशीं किती निकट संबंध आहे हें कै० माधवरावजी रानडे
यांनी प्रथमतः दाखविलें. मराठेशाईचे डफ व एलफिन्स्टन यासारखे इतिहासकार यांचें म्हणणें असें होतें कीं, मराठ्यांचा उदय सह्याद्रि पर्वतावरील वाळलेल्या गवतांत अकस्मात् उद्भवणाऱ्या वणव्याप्रमाणे होता. या वणव्याचा ज्याप्रमाणें आधीं कांहीं एक मागमूस नसतो पण तो एकदम पेट घेतो व त्याचा क्षणार्धात जिकडे तिकडे फैलाव होतो व तो वणवा लवकरच विलयास जातो. तीच तऱ्हा मराठ्यांच्या राजकीय उदयाची आहे. शिवाजीपासून या राजकीय उदयास एकाएकीं प्रारंभ झाला व थोड्याच काळांत मराठेशाईचा सर्व हिंदुस्थानभर विस्तार झाला व थोड्याच काळांत त्याचा विलयही झाला. डफ साहेबांचें हें मत सर्व संमत असें समजलें जात असे. पण रा. माधवरावांनी आपल्या 'मराठ्यांच्या सत्तेचा उदय' या ऐतिहासिक ग्रंथांत हें मत खोडून काढलें.
त्यांनी असे सिद्ध केलें कीं, शिवाजीचा उदय आकास्मिक नव्हता. ज्ञानेश्वरापासून रामदासापर्यंतच्या अडीचशे तीनशे वर्षांच्या काळांत महाराष्ट्रांत किती तरी साधुसंत व कवि होऊन गेले. त्यांनीं आपल्या ग्रंथांनी व उपदेशानें महाराष्ट्रांतील बहुजनसमाजाची मनोभूमि उत्तम तऱ्हेनें नांगरून तयार केली. अशा उत्तम मशागत केलेल्या मनोभूमींत शिवाजीनें राजकारणाचें बी पेरलें. म्हणूनच त्या बीजाला लवकर अंकूर फुटून त्याचा प्रचंड वृक्ष बनला व त्याच्या शाखा व पारंब्या सर्व हिंदुस्तानभर पसरल्या. महाराष्ट्रांतील कविमंडळानें व संतमंडळानें ज्या उपदेशानें महाराष्ट्रांतील जनमनाची मशागत केली त्या उपदेशाचे स्वरूप कै. माधवरावानी खालीलप्रमाणे दिले आहे.
प्रथमतः या सर्व मंडळीनीं मराठीची तरफदारी करून ती भाषा ज्ञानदानाची भाषा करून टाकली. त्यापूर्वी सर्व ज्ञान संस्कृत भाषेत सांठविलेलें असे व संस्कृताच्याच द्वारा ज्ञान मिळविण्याची सोय असे. पण या काविमंडळानें संस्कृतांतले ज्ञानभांडार प्राकृतांत आणलें व बहुजनसमाजांत ज्ञानाचा प्रसार केला. संस्कृत म्हणजे देवानें केलली भाषा व प्राकृत म्हणजे हलकी भाषा हा समज त्यांनीं पार खोडून टाकला.
'एक म्हणती मराठें काय । हें तों भल्यानें ऐकों नये ।
तीं मूर्खे नेणती सोय । अर्थान्वयाची'॥ दासबोध.
या कविमंडळानें जातिभेदाचें प्रस्थ पुष्कळच कमी केलें. आधीं महार मांगापासून सर्व जातींत कवि व संत झाले व ते एकमेकांना आदराने व प्रेमानें वागवीत. सर्व मनुष्यें देवाचीं लेंकरें आहेत. देवापुढे सर्व सारखीं आहेत.
सर्वांना देवाची भक्ति करण्याचा सारखाच अधिकार आहे; या गोष्टी त्यांनी प्रतिपादन केल्या व आपल्या भक्तिपंथांत त्या त्यांनी अंमलांतही आणल्या. त्याचप्रमाणे स्त्रिया व कुटुंब यांबद्दलही त्यांनी आदर उत्पन्न केला. धर्म निव्वळ बाह्यविधींत व कर्मकांडांत नाहीं तर तो तनमनधनेंकरून देवाची भक्ति करण्यांत आहे हे त्यांनीं प्रतिपादन केलें व सर्व देव एकच व तो सर्वा आधी आहे असे दाखवून मूर्तिपूजेचा बडीजाव कमी केला.
"कुलाल पात्रापूर्वी आहे । पात्र कांहीं कुलालं नव्हे ।
तैसा देव पूर्वीच आहे । पाषाण सर्वथा ॥ "
सारांश ज्ञानेश्वरापासून रामदासापर्यंतच्या सर्व साधुसंतांनीं व कवींनीं जनसमाजास ज्ञानी करून सोडलें व त्या योगे त्यांच्या मनांत एकोपा दायित्व यांच्या भावना उद्भूत केल्या. या मंडळींनीं जी अशा तऱ्हेने समाजात धार्मिक व सामाजिक सुधारणा घडवून आणली त्यायोगें शिवा-xxx राजकारणास जोर आला व तें राजकारण सिद्ध होऊ शकलें असें दाखवून कै. रानड्यांनीं डफ-एलफिनस्टनचा 'मराठ्यांचा उदय म्हणजे वणवा' हा आक्षेप दूर केला.
कै. माधवरावांचें हें मत महाराष्ट्रांतील कांहीं मराठ्यांच्या इतिहासाच्या अभिमान्यांस पसंत पडलें नाहीं. त्यांचें म्हणणें असें कीं, रानड्यांनीं केलेली मराठ्यांच्या उदयाची मीमांसा बरोबर नाहीं. कै. रानडे हे स्वतः मोठे समाजसुधारक व प्रार्थनासमाजिष्ट असल्यामुळे व हल्लींच्या काळीं राजकीय सुधारणा होण्यापूर्वी सामाजिक व धार्मिक सुधारणा झाली पाहिजे असें त्यांचें मत असल्यामुळे या त्यांच्या मताचा व पूर्वग्रहाचा पगडा मराठ्यांच्या इतिहासाची मीमांसा करतांना त्यांच्या मनावरून दूर झाला नाहीं व म्हणून त्यांनी ही मीमांसा केली. बाकी खरें पाहूं जातां महाराष्ट्रांतील संतमंडळीचा व त्यांच्या धार्मिक सामाजिक व विशेषतः भक्ति विषयक उपदेशाचा राजकीय प्रगतीस फारसा उपयोग झाला नाहीं; उलट त्यांच्या निवृत्तीपर, वैराग्यपर व सात्विक धर्मपर उपदेशाचा परिणाम लोकांना नेभळट व क्षात्रधर्मपराङ्मुख करण्यामध्येच झाला व म्हणून या संतमंडळीची राजकीय प्रगतींत एक प्रकारची आडकाठीच झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं व म्हणून हल्लींच्या काळींसुद्धां सामाजिक x धार्मिक सुधारणेचें घोडें पुढे दामटणें म्हणजे राजकीय प्रगतीस अडxx आणण्यासारखें आहे असें या पक्षाचें म्हणणें आहे. मात्र जरी पूर्वीचे सर्व संत व कवी यांना एकाच माळेंत घालून त्यांच्यावर निरुपयोगीपणाचा छाप मारण्यास हा पक्ष तयार आहे तरी पण त्याचे मतें रामदास मात्र xx गोष्टीला अपवाद आहे; त्याची शिकवण निवृत्तिपर नाहीं; त्यानें वैराग्या xx स्तोम माजविलें नाहीं; त्यानें जातिभेदावर तडाके उडविले नाहीत; उलxx त्याने क्षात्रधर्माचा उपदेश केला; त्यानें राष्ट्रीय भावना उद्भूत केली; त्यानें प्रपंचाचें महत्व दाखविलें; त्यानें दैववादाचा नाश करून प्रयत्नxx वाढविला, त्यानें लोकांत स्वाभिमान व देशाभिमान जागृत केला; xx प्रवृत्तिमार्ग स्थापन केला, त्यानें लोकांचा नेभळटपणा काढून टाक xx त्यांना सामर्थ्यवान् केलें; अर्थात् रामदास हा महाराष्ट्राचा मुत्सद्दी, xx राष्ट्राचा राष्ट्रकर्ता, महाराष्ट्राचा राजकीय गुरू, महाराष्ट्रांत नवxx उत्पन्न करणारा कर्ता पुरुष होता व म्हणून सर्व संतामध्यें व कवींमध्यें अन्वर्थक रीतीनें 'समर्थ' या पदवीस योग्य होता. त्यानेंच शिवाजीस राजकारण शिकावलें; त्यानें शिवाजीमध्यें राजकीय स्फूर्ति उत्पन्न केली, तोच प्रथमपासून शिवाजीचा मसलतगार होता, त्याच्याच प्रयत्नानें आणि शिकवणीनें शिवाजीस इतके मदतगार मिळाले. सारांश मराठ्यांच्या उदयाचें श्रेय कै. रानडे म्हणतात त्याप्रमाणें संतकविमंडळास नाहीं; किंवा डफ एल्फिन्स्टन म्हणतात त्याप्रमाणे शिवाजीस नाहीं तर तें श्रेय रामदासास आहे; व ह्या म्हणण्याचें प्रत्यंतर म्हणजे रामदास शिवाजीचा राजगुरु होता; तो साताऱ्याजवळ परळीस रहात असे, शिवाजीनें आपलें सर्व राज्य रामदासास समर्पण केलें व त्याची खूण म्हणून मराठ्यांनी भगवा झेंडा हें आपले राष्ट्रीय निशाण बनविलें व रामदासाच्या नमस्काराची पद्धति स्वीकारली या गोष्टी होत.
रामदासाचा दासबोध हा बराच मोठा ग्रंथ आहे. त्याचे वीस दशक (पर्वे) असून प्रत्येक दशकांत दहा समास (अध्याय) आहेत व प्रत्येक अध्यायांत सरासरीनें चाळीस ओव्या आहेत म्हणजे एकंदर ग्रंथांत सुमारें आठ हजार ओव्या आहेत. हा ग्रंथ गुरुशिष्यसंवादात्मक आहे. मात्र इंग्रजी जाणणाऱ्यास ठाऊक असलेल्या प्रसिद्ध ग्रीकतत्त्ववेत्या प्लेटोच्या संवादात्मक ग्रंथाप्रमाणें तो नाहीं. प्लेटोचे संवाद म्हणजे भूमितीच्या विचारपद्धतीनें साधक बाधक प्रमाणांचा खल करून दोनतीन माणसांच्या प्रश्नोत्तररूपी संभाषणांतून काढलेल्या सिद्धांताप्रमाणें आहेत. त्यांत विचारसरणींतील युक्तिवाद व सिद्धांत बनविण्याची पद्धति यांकडे विशेष लक्ष दिलेलें आहे. प्रत्यक्ष सिद्धांत सांगण्यांत फार भर नाहीं व म्हणून प्लेटोचे ग्रंथ म्हणजे मनांतील विचाराच्या व विचारपद्धतीच्या पृथक्करणाचे उत्तम मासले आहेत असें समजलें जातें. ज्याप्रमाणें एखादा प्राणिशास्त्रज्ञ निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरांचे छेदन करून त्यांचे निरनिराळे भाग व अवयव स्पष्टपणे दृग्गोचर होतील अशा तऱ्हेनें तीं शरीरें प्रयोगशाळेत जतन करून ठेवतो, त्याचप्रमाणें प्लेटोचे ग्रंथ म्हणजे मानवी मनाच्या व्यापाराचे पृथक्कृत मासले आहेत. रामदासाचा संवादात्मक ग्रंथ अशा तऱ्हेचा नाहीं. तेथे प्रथमारंभीं शिष्याने एकाददुसरा प्रश्न विचारलेला असावयाचा व त्याचें सिद्धांतात्मक उत्तर गुरून द्यावयाचें अशा तऱ्हेची पद्धति या ग्रंथांत आहे. या ग्रंथांतली पद्धति गीतेंतील पद्धतीप्रमाणें आहे असें म्हटलें तरी चालेल.
आठ हजार ओव्यांचा ग्रंथ एकदम किंवा एका सपाट्यासरसा लिहिला असेल असें संभवत नाहीं. तो हळू हळू व सावकाशपणे लिहिला गेला असला पाहिजे हें उघड आहे. तरी पण दासबोधाचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास त्याचे दोन भाग पडतात असें वाटल्यावांचून रहात नाहीं. पहिले सात दशक एकदम व एका सपाट्यानें व कांहींएक व्यवस्थित विचारसरणी मनांत धरून लिहिले आहेत असें दिसतें. त्यांमध्यें विचारांचा एकसूत्रीपणा, विचारांची एक दिशा व निश्चित मांडणी स्पष्टपणें दिसते. बाकीच्या दशकांत हे गुण तितके स्पष्टपणे दृग्गोचर होत नाहींत. तेव्हां प्रथमतः या पहिल्या सात दशकांचा सामान्यपणें विचार करूं.
पहिले दशक प्रस्तावनारूप आहे. त्यांत प्रथम ग्रंथाचा उद्देश भक्तिमार्ग व अध्यात्मविद्या सांगण्याचा असून त्याची फलश्रुति सद्गति व मोक्ष आहे असें म्हटलें आहे. नंतर नेहेमींच्या रिवाजाप्रमाणे गणपति व सरस्वती यांचें स्तवन आणि सद्गुरु व साधुसंत यांना नमन केलें आहे; पुढे सभा, सभासद, मानवी देह यांचें गौरव केलें असून कवींचें वंदन एका सुंदर समासांत खालील तऱ्हेनें केलें आहे.
"आतां वंदू कवीश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नातरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना शब्दांचें भूषण । यथार्थ होय ॥
कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्तसरोवर ।
नानाबुद्धीचें वैरागर । निर्माण जाहले ॥
दुसऱ्या दशकांत सत्व रज तम या सर्वव्यापी तीन तत्त्वांचे वर्णन असून त्या अनुषंगानें उत्तम, विरक्त, सुविद्य, भक्तिमान तसेंच मूर्ख, पढतमूर्ख कुविद्य वगैरे निरनिराळ्या गुणाच्या लोकांचें सविस्तर व मार्मिक वर्णन आहे. तमोगुणाच्या वर्णनांत खालील ओव्या पुढच्या विवेचनासाठीं ध्यानांत ठेवण्यासारख्या आहेत.
युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धचि करावें ।
मरावें कीं मारावें । तो तमोगुण ॥
पीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥
तिसऱ्या दशकांत दुःखमय संसार व त्यांतील त्रिविध ताप यांचें वर्णन आहे; दुखःमय संसाराचें चित्र एका माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कहाणीच्या रूपानें रेखाटलें आहे. एक मनुष्य प्राणी मातेच्या उदरीं नऊ मास राहिला, हा त्याचा एक बंदिवास होता. या बंदिवासांत असतांना त्याला मळमूत्र इत्यादि दुर्गंधीचे पदार्थ व जंत किडे यांच्या सहवासांत व प्रत्यक्ष संघटनांत हे दिवस कंठावे लागले.
ऐसिया कारागृहीं वस्ती । नवमास भोगिल्या बहु विपत्ति ।
नवहि द्वारे निरोधती । वायु कैंचा तेथें ॥
(जन्माच्या व गर्भवासाच्या विपत्तीच्या वर्णनावरून त्या काळी लोकांना-शिकलेल्या लोकांनासुद्धां शारीरशास्त्राचें बिलकुल ज्ञान नव्हतें असें दिसतें.)
नऊ मास पूर्ण झाल्यावर त्याची माता प्रसूत झाली व तो मनुष्य जन्माला आला. आतां त्याच्या पाठीमागें बालपणाचीं दुःखें लागलीं. त्यांतून आईबापांनीं कसेंबसें संरक्षण करून तो मोठा झाला. आतां विद्येकरितां व शिस्तीकरतां त्याला हाणमार सोसावी लागली. आणखी थोडा मोठा झाल्यावर आईबापांनी त्या माणसाचें लग्न करून दिलें. त्याला प्रथम फार आनंद झाला. पण त्या आनंदाच्या भरांत तो आईबापांना
विसरला व त्याला सासुरवाड प्रिय झाली. बायकोखेरीज त्याला चैन पडेनासें झालें. बायकोच्या नादानें तो आईबापापासून वेगळा राहूं लागला. पण दुर्दैवाने बायको एकाएकीं वारली. त्याला अत्यंत दुःख झालें.
म्हणें माझें बुडालें घर । आतां न करीं हा संसार ।
दुःखें आक्रंदे थोर । घोर घोषें ॥
स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटीं ।
विषयलोभे शेवटीं । वोळखी सांडिली ॥
माय बहिणी न विचारी । जाहला पापी परद्वारी ।
दंड पावला राजद्वारीं । तरी पालटेना ॥
अशा वर्तनानें त्याचें शरीर रोगजर्जर झालें; त्यांतच घरांत चोरी झाली; तरीपण मोठ्या रोगांतून शर्तीनें वांचला. पुढे मूल होईना म्हणून हृद्रोग लागला. नवससायास करून शेवटीं मुलें झालीं व त्याला थोडा आनंद वाटला. पण संसाराचा खर्च वाढला. मुली उपवर झाल्या, मुलांना मुली सांगून आल्या. त्यांच्या लग्नाकरितां घरदार जमीनजुमला गहाण टाकून पैसे काढावे लागले. संसाराच्या खर्चास द्रव्य मिळविण्याकरितां परदेशी जाणे भाग पडलें. तिकडे हाल अपेष्टा त्रास व दगदग सोसून थोडेफार पैसे त्याने आणले व घरी परत आला. चार दिवस आनंदांत गेले. पण फिरून घराबाहेर पडणें प्राप्त झालें. पण आतां अशक्तपणामुळे पूर्वीसारखे श्रम होईनासे झाले. चार वर्षांनीं तो परत देशीं येतो तों तेथें दुष्काळ पडलेला! मुलेबाळे व बायको या दुष्काळांत मेलीं. इतके कष्ट करून शेवटीं दुःखाचें ताट वाढलेलें! इतकें उतार वय झालें असतांना लोकांनीं तिसऱ्या लग्नाची भर दिली व या म्हाताऱ्याने सर्व द्रव्य खर्च करून लग्न केलें! व पुन्हा द्रव्य मिळविण्याकरितां विदेशीं गेला व कांहीं काळाने परत आला. तो बायको व मुलगे यांमध्ये तंटे सुरू झालेले. पुढें वेगळे होण्याचें घाटले व वांटणीच्या बाबतींत बापलेकांची मारामारी झाली. शेवटी पंचांनीं मध्ये पडून वांटण्या करून दिल्या व म्हातारा व ती तरुण बायको निराळ्या घरांत राहूं लागलीं. पण इतक्यांत गांवावर शत्रूचें सैन्य आले व त्यानें बायकोस धरून नेलें. म्हाताऱ्यास अतोनात दुःख झालें. त्यांतच बायको वारल्याची बातमी कळली; मग त्या दुःखाला काय पारावार! सारांश त्याची जन्माची कहाणी कष्टमय झाली!
गेलें तारुण्य गेलें बल । गेलें संसाराचें सळ ।
वाताहत झालें सकळ । शरीर आणि संपत्ति ॥
जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाही व्यर्थ गेला ।
कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥
सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी झाला |
पुढें मागुती धोका आला । यमयातनेचा ॥
याप्रमाणें एका कहाणीच्या रूपाने दुःखमय संसाराचें वर्णन केल्यावर, रामदास या संसारांत भोगाव्या लागणाऱ्या तापत्रयाच्या वर्णनास लागले आहेत.
देह इंद्रियें आणि प्राण । याचेनि योगें आपण ।
सुखदुःखें शिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥
आपल्या सभोवारच्या बाह्यसृष्टीतील वस्तुजातानें होणारा त्रास म्हणजे तो आधिभौतिक ताप होय.
सर्व भूतांचेनि संयोगें । ताप होतां मन भंगे ।
सुख दुःख उपजों लागे । या नांव आधिभौतिक ॥
मरणानंतर भोगाव्या लागणाऱ्या सुखदुःखाला आधिदैविक ताप म्हणतात.
शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं यमयातना ।
स्वर्ग नरक भोग नाना । या नांव आधिदैविक ॥
रामदासाच्या मतें वरीलप्रमाणें संसार दुःखमय आहे व तें त्यानीं आडिसनच्याप्रमाणे एका उपमेनें शेवटीं सांगितलें आहे.
डंकूं धावती विखार | काळसर्प ॥
आशा ममता देह बेडी | सुसरी करिताती ताडातोडी ।
नेवोनि दुःखाचे सांगडी । माजी घालिती ॥
अहंकारनक्रे उडविलें । नेऊनि पाताळीं बुडविलें ।
तेथूनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥
काममगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वाहेना । भूली पडली ॥
वासना धामीण पडली गळां । घालोनि वेटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥
माया प्रपंचाचें वोझें । घेऊनि म्हणें माझें माझें ।
बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥
पडिलें भ्रांतीचें अंधारें। नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥
बहुतेक आवर्ती पडले । प्राणि वाहतची गेले ।
जिहीं भगवंतासी बोभाइलें । भावार्थबळें ॥
देवें आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी ।
येर तीं अभाविकें बापुडीं । वाहताच गेलीं ॥
वरील उपमेंत दुःखमय संसाराचें चित्र असून त्यांतून सुटण्याचा उपायही सूचित केला आहे, व याच उपायाचें पुढील चार दशकांत सविस्तर वर्णन केलें आहे. अशा या मायामय व दुःखमय संसारांतून सुटण्यास मार्ग काय?
प्रथमतः मनुष्यानें नवविधा भक्ति करण्यास शिकावें; देवाच्या कथा ऐकाव्या; आपण स्वतः कीर्तन करावें; देवाचें सदोदित नामस्मरण करावें; सद्गुरूची सेवा करावी; देवपूजा नित्य करावी; देवाला नमस्कार घालावे; देवालयांत कामे करावीं, देवाशीं आपल्या प्रेमळ व भाविक वागण्यानें सख्य करावें व शेवटीं देव व आपण यांच्या ऐक्याबद्दल विचार करून तें ज्ञान आत्मसात् करावें. अशा प्रकारचें वर्तन म्हणजे नवविधा भक्ति होय. नंतर चारी मुक्तींचें थोडक्यांत असें वर्णन दिले आहे.
लोकीं रहावें सलोकता । समीप असावें ते समीपता ।
स्वरूपींच व्हावें सरूपता । तिसरी मुक्ति ॥
देवस्वरूप जाहला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।
स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥
सुकृत आहे तें भोगिती । सुकृत सरतां लोटूनि देती ।
आपण देव ते असती । जैसे तैसे ॥
म्हणोनि तीन मुक्ति नाशवंत । सायुज्य मुक्ति ते शाश्वत ।
तीही निरूपिली सावचित्त । ऐक आतां ॥
ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतांसहित जळेल क्षिती ।
तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ति कैंच्या तेथें ॥
तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ ।
सायुज्य मुक्ति ते केवळ । जाणिजे ऐसी ॥
नवविधाभक्ति व मुक्तिचतुष्टय यांचें वर्णन झाल्यावर स्वाभाविकपणें रामदास ही मुक्ति कशी मिळवावयाची या प्रश्नाकडे वळले आहेत व सबंध पांचव्या दशकांत याचेंच विवेचन आले आहे. सद्गुरु कोणास ह्मणावें; भोंदू गुरु तसेंच निरनिराळ्या व्यावहारिक ज्ञानाचे व धंद्याचे गुरु हे मोक्षदायी सद्गुरु नव्हेत खरा सद्गुरु-
जो ब्रह्मज्ञान उपदेशी । अज्ञान अंधार निरसी ।
जीवात्मया शिवात्मयाशीं । ऐक्यता करी ॥
भवव्याघ्रे घालूनि उडी । गोवत्सांस ताडातोडी ।
केली देखोनि शीघ्र सोडी । तो सद्गुरू जाणावा ॥
वासना नदी महापुरीं । प्राणी बुडतां ग्लानि करी ।
तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुरू जाणावा ॥
प्राणी मायाजाळीं पडिले । संसारदुःखें दुखवले ।
ऐसे जेणें मुक्त केले । तो सद्गुरू जाणावा ॥
सद्गुरूच्या लक्षणानंतर एका समासांत रामदासांनी सत् शिष्यांचें लक्षण दिले आहे त्याचें सार खालील ओव्यांत आलें आहे.
मुख्य सत् शिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।
अनन्य भावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥
शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ ।
शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥
शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे शुचिष्मंत |
शिष्य पाहिजे नेमस्त । सर्व प्रकारी ॥
शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष । शिष्य पाहिजे परमदक्ष ।
शिष्य पाहिजे अलक्ष्य । लक्षी ऐसा ॥
शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार ।
शिष्य पाहिजे अतितत्पर । परमार्थाविषयीं ॥
शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी ।
शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥
पुढें निरनिराळ्या प्रकारचें ज्ञान, खरें ब्रह्मज्ञान व उपदेशाचे स्वरूप यांचे वर्णन असून दशकाच्या शेवटच्या चार समासांत बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध अशा मनुष्याच्या पायऱ्यांची माहिती दिली आहे. अर्थात् यांत संसारांत गढून गेलेल्या माणसापासून त्याची ज्ञानाच्या योगें मुक्तता होण्यापर्यंतच्या स्थितीचें वर्णन केलें आहे. सहाव्या आणि सातव्या दशकांत मनुष्यास मुक्त करणारें वेदांतज्ञान सांगितलें आहे. जें वेदांतज्ञान संस्कृतांत सांगितलें आहे त्याचें सार आपण प्राकृतांत ग्रथित केलें आहे व त्यायोगें हे ज्ञान बहुजनास सुगम झालेलें आहे असें आहे. अर्थात् हें वेदांतज्ञान म्हणजे परब्रह्मनिरूपण, त्यापासून मायेचा उद्भव, मायेपासून उत्पन्न झालेल्या सर्व सृष्टीचें वर्णन, जीवात्मा व परमात्मा यांचें ऐक्य इत्यादि शंकराचार्यांनीं प्रचलित केलेल्या अद्वैत मताचें प्रतिपादन आहे.
नंतर हे ज्ञान होण्यास भक्ति पाहिजे व ती भक्ति श्रीरामाची करावी, असा रामदासांनी उपदेश केला आहे. रामाचीच भक्ति आपण कां करतों याचें उत्तर खालील उताऱ्यांत त्यांनी दिले आहे.
आमुचे कुळीं रघुनाथ । रघुनाथ आमुचा परमार्थ ।
जो समर्थांचाहि समर्थ । देवां सोडविता ॥
त्याचे आम्ही सेवकजन । सेवा करितां झालें ज्ञान ।
तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल कीं ॥
आतां हें ज्ञान व ही भक्ति प्रथमतः अप्राप्यच असते; तेव्हां तें प्राप्त करून घेण्याची किल्ली काय असा प्रश्न करून रामदासांनीं त्याचें खालील उत्तर दिलें आहे.
आतां मनासि जें अप्राप्त । तें कैसेनि होईल प्राप्त ।
ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाहीं ॥
भांडारगृहें भरलीं । परि असती अडकलीं ।
हातास न येता किल्ली । सर्वही अप्राप्त ।
तरी ते किल्ली कवण । मज करावी निरूपण ।
ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी ।
सद्गुरुकृपा तेचि किल्ली । जेणें बुद्धि प्रकाशली ।
द्वैत कपादें उघडलीं । एकसरां ॥
"मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ॥
देहबुद्धीचें थोरपण । परब्रह्मीं नचले जाण ।
तेथे होतसे निर्वाण । अहंभावासी ॥
उंच नीच नाहीं परी । राया रंका एकच सरी ।
झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ॥
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचि ना ॥
उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी ।
ऐसा भेद तयापासीं । मुळींच नाहीं ॥
सकळांस मिळोनि ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ॥
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकांचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोनि एकचि स्थळ । विश्रांतीचें ।
गुरुशिष्या एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥
देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती ।
एक ब्रह्म द्वितीय नास्ति । हें श्रुतीचें वचन ॥
याप्रमाणें सातव्या दशकांत ब्रह्माच्या स्वरूपाचे सविस्तर विवेचन करून रामदास गुरुभक्तीच्या पालुपदावर येतात. तेथेच त्यांनीं प्रथमतः दासबोध समाप्त केला होता असे स्पष्ट दिसतें. सातव्या दशकाचा शेवटचा भाग येथे अवतरितों.
सद्गुरुविण समाधान । आणिक नाहीं ॥
सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।
तेथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥
सद्गगुरुभजना परतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं ।
जयास न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥
तेथें निरूपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें ।
याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥
जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक ।
तयास सांपडे एक । निश्चय ज्ञानाचा ॥
ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत ॥
सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥
प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्री पाहतां मिळे ।
आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥
तें प्राकृत म्हणो नये । तेथें ज्ञानाचा उपाय ।
मूर्खासि हें कळे काय । मर्कटा नारिकेळ जैसें ॥
आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें ।
शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥
जेथें नेतिनेति श्रुति । तेथें न चले भाषाव्युत्पत्ति ।
परब्रह्म आदि अंतीं । अनिर्वाच्य ॥
हा शेवटचा उतारा अगदीं स्पष्ट आहे. यावरून रामदासांनी प्रथमतः येवढाच दासबोध लिहिला असावा व पुढचा भाग पुढे मागाहून लिहिला असावा ही गोष्ट निर्विवाद आहे. तसेंच सात दशकांचा जो थोडक्यांत सारांश दिला आहे व रामदासांचे विचार त्यांच्याच शब्दांनी सांगितले आहेत त्यांवरून त्यांच्या ग्रंथामध्यें एक व्यवस्थित विचारसरणी दिसते. तुकारामाच्याप्रमाणें त्यांचा ग्रंथ केवळ स्फुट काव्यमय नाहीं. आतांपर्यंत दिलेल्या विचारांच्या धोरणाविषयीही शंका राहणार नाहीं असें वाटतें. या सर्व उपदेशामध्ये राजकीय व्यावहारिक किंवा सांसारिक उपदेशाचा मागमूसही नाहीं. हा उपदेश म्हणजे ज्ञानेश्वरापासून सर्व साधुसंतांनीं व कवींनीं केलेलाच वेदांतपर निवृत्तिपर व भक्तिपर उपदेश आहे. इतर साधु- संतांप्रमाणें हा उपदेश प्राकृतांत केलेला आहे व प्राकृतांत केल्यामुळे त्याची योग्यता कमी होत नाहीं असे इतर कवींप्रमाणेंच रामदासांनी प्राकृताचे समर्थन केलें आहे. यांत निवळ कर्ममार्ग मूर्तिपूजा व व्रतवैकल्ये यांचेवर तडाके मारले आहेत. यांत संसाराच्या दुःखमयत्याबद्दल इतर कवींप्रमाणें वर्णन आहे. यांत अद्वैतवेदांताची संस्कृतांतील सर्व मतें प्रतिपादन केलेली आहेत. यांत जातिभेदाचें गौणत्व दाखविले आहे; देवापुढे सर्व मनुष्यें सारखींच आहेत; देवाला भक्त प्रिय आहेत; असें सांगितले आहे. यांत ज्ञान व भक्ति यांचा विरोध नाहींसा करून दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न इतर कवींप्रमाणेच केलेला आहे. सारांश आतांपर्यंतच्या दासबोधांतील उपदेशांत व इतर साधुसंतांच्या उपदेशांत मुळींच फरक नाहीं असें म्हणणें प्राप्त आहे. व म्हणूनच इतक्या भागावरून पाहतां रामदास व महाराष्ट्रांतील इतर साधुसंत यांच्यामध्ये जमीनअस्मानाचें अंतर आहे असे जें कांहीं लोक म्हणतात त्यांत अर्थ नाहीं हें स्पष्ट होत आहे. व कै. माधवरावजी रानडे म्हणतात त्याप्रमाणे सर्व महाराष्ट्रीय साधुसंतांचा उपदेश धार्मिक व सामाजिकच होता; तो प्रत्यक्ष राजकीय नव्हता तरी पण त्या उपदेशाचा जनमनावर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊन समाजांतील व्यक्तींमध्ये एकोपा व एक प्रकारची राष्ट्रीय भावना उद्भूत होऊं लागली; सारांश महाराष्ट्रांतील मराठ्यांची त्या उपदेशानें मनोभूमि नांगरून पेरणीस तयार झाली होती व म्हणूनच शिवाजीमहाराजांच्या राजकीय खटाटोपास इतक्या लवकर स्वरूप आलें.
यावरून कांहीं इतिहासभक्त म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरादि साधुसंतांनीं व टाळकुट्यांनी समाजांत नेभळटपणा वाढविला, त्यांनी क्षात्रतेज कमी केले व त्यांच्या उपदेशानें शिवाजीच्या कार्यास मदत होण्याऐवजी उलट अडथळा झाला हें जर खरें असेल तर हे सर्व आक्षेप रामदासांच्या निदान आतांपर्यंतच्या उपदेशालाही लागू आहेत असे म्हणणें प्राप्त आहे. रामदासांच्या दासबोधांतील पुढील भागाचा सारांश व त्यावरून निघणारी अनुमानें यांच्या विचारास आतां लागू.
सात दशकरूपी दासबोध पुरा झाल्यावर कांहीं काळानें रामदासांनी पुन्हां लिहिण्यास सुरवात केली व हा आठवा दशक स्वतंत्रपणे लिहिला असावा असे त्याच्या प्रारंभींच्या नमनावरून दिसतें. या दशकांत प्रथम समासांत देवाचें स्वरूप सांगितले आहे. ज्यानें चंद्र सूर्यादि तारे केले; ज्यानें सर्व प्राणिमात्र निर्माण केलें, ज्यानें स्वर्ग पृथ्वी पाताळ हे तीन्ही लोक घडविले; सारांश ज्याने सर्व चराचर जग केले तोच खरा देव होय; त्याला जन्म मरण नाहीं; त्याला विकार नाहीं; तो जगापासून वेगळा आहे व म्हणूनच मूर्तिपूजा करणें, मूर्तीलाच देव समजणें हा अविवेक होय असें रामदास सांगतात. दुसऱ्या व तिसऱ्या समासांत मायेचें व तिच्या निरनिराळ्या स्वरूपांचें वर्णन आहे. चवथ्या व पांचव्या समासांत मायेपासून सत्व रज तम हे गुण कसे होतात हे सांगितले आहे व तमापासून सूक्ष्म पंचतत्वें कशीं निर्माण होतात याचें विवेचन केले आहे. व या सूक्ष्म तत्त्वांची स्थूल स्वरूपें व त्यांपासून होणारे प्रत्यक्ष पदार्थ यांचें निदर्शन केलें आहे.
साहाव्या समासांत मोक्ष कोणाला व कसा मिळेल याचें विवेचन केलें आहे व तें करतांना दुश्चित्तता व आळशीपणा यांचें व्यावहारिक उपदेशपर विवरण केले आहे.
दुश्चितपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥
दुश्चितपणें कार्य नासे । दुश्चितपणें चिंता वसे ।
दुश्चितपणें स्मरण नसे । क्षण एक पाहतां ॥
दुश्चितपणा पासून सुटला । तरी तो सवेंचि आळस आला ।
आळसा हाती प्राणियाला । उसंतचि नाहीं ॥
आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार ।
आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्या ॥
आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण ।
आळसे परमार्थाची खूण । मलिन जाहली ॥
आळसें नित्य नेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य ।
आळसें गेली धारणाधृति । आळसें मलिन झाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गति । मंद जाहली ॥
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली ।
आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥
दुश्चितपणा सवे आळस । आळसे निद्राविलास ।
निद्रा विलासें केवळ नाश । आयुष्याचा ॥
निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण ।
येणें करितां निरूपण । उमजेचिना ॥”
सातव्या व आठव्या समासांत रामदासानीं पुनः बद्ध मोक्ष, परमात्मा व जीवात्मा, नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन व सायुज्यमुक्ति वगैरेबद्दल निरूपण केले आहे. त्यांत राज्याची व सैन्याची उपमा ध्यानांत धरण्यासारखी आहे.
एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥
मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईस अंत ।
ते काळी पावेन निवांत । परब्रह्म मी ॥
हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान ।
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥
सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥
माया असोनीच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान काहीं । वोळखावें ॥
राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवार देखतां राज्य गेलें । हें तो घडेना ॥
नवव्या समासांत सिद्ध व साधु यांचें लक्षण सांगितले आहे व त्या समासाचे शेवटीं तुकारामाप्रमाणें आपल्या नांवाचा ओवीचे शेवटीं उल्लेख केला आहे.
दहाव्या समासांत सद्गतीकरितां व मोक्षाकरितां लोक नाना उपाय व मार्ग सांगतात त्यांचा उल्लेख असून शेवटीं स्वानुभवानें मिळविलेला ज्ञानमार्गच खरा असा रामदासांनीं निश्चय केला आहे. हा आठवा दशक स्वतंत्र म्हणून लिहिल्यासारखा दिसतो व त्याला ज्ञानदशक असें नांव दिलेले असावें असें खालील उपसंहारावरून वाटतें.
आपण वस्तु मुळीं एक । ऐसा ज्ञानाचा विवेक ।
येथून ज्ञानदशक । संपूर्ण जाहला ॥
आत्मज्ञान निरूपिलें । यथामतीनें बोलिलें।
न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥
नवव्या दशकाच्या पहिल्या समासांत ब्रह्माला जी गुणरहित्वासंबंधीं नकारार्थी विशेषणें- जसे निराभास अतर्क्य, निरंजन, निःसंग- लावतात त्यांचा अर्थ काय असा शिष्यानें प्रश्न विचारला असून त्याची व्युत्पत्तीरूपाने उत्तरें दिली आहेत. पुन्हां दुसऱ्या तिसऱ्या समासांत रामदासांनी देवाच्या स्वरूपाचें व ज्ञान्याच्या स्थितीचें विवरण केले आहे व तसें करतांना लोकांच्या प्रचालित कल्पनेवर तडाका मारला आहे.
'देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।
पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥
देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध झाला । हें तों घडेना ॥'
चवथ्या समासांत मनुष्याच्या उत्तमाधम स्थितीचे कारण काय असा प्रश्न काढण्यांत आला आहे व त्याचें उत्तर ह्मणून विद्या, ज्ञान व जाणतेपण या कारणानें उत्तम अवस्था मनुष्य आपल्याला प्राप्त करून घेतो हें व्यावहारिक व प्रवृत्तिपर तत्त्व मोठ्या मार्मिकतेने सांगितले आहे. येथें रामदासाच्या उपदेशाची नवी छटा दृग्गोचर होते. याच समासांत प्रथमतः राजकारण शब्द आला आहे.
नेणतां कांहीं राजकारण । अपमान करूनि घेति प्राण ।
नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ॥
समासांत नेहमींचा वेदांती उपदेश टाकला आहे अशांतला भाग नाहीं कारण तोही उपदेश या समासांतसुद्धा आहे.
पांचव्या समासांत 'पिंडीं तें ब्रह्मांडीं' या तात्त्विक म्हणीचा अर्थ काय व या म्हणींत किती तथ्यांश आहे याचा निर्णय केला आहे.
सहाव्या समासाचे प्रारंभी ज्ञानदशकाचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरून पहिला सात दशकांचा दासबोध पुरा झाल्यावर आठवा दशक ज्ञानदशक म्हणून लहानशा निबंधाप्रमाणे स्वतंत्र केलेला असावा. ह्मणून दासबोधांत त्याचा मागे पुढे असा दुहेरी उल्लेख सांपडतो. या समासांत ब्रह्मापासून मूळमाया मूळमायेपासून गुणमाया-गुणमायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून वायु, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी असा महाभूतांचा उत्पत्तिक्रम सांगितला आहे. मात्र आकाश हे गुणांपासून होत नाहीं तर निरुपाधि आकाश म्हणजेच ब्रह्म व उपाधिसहित ब्रह्म तेंच आकाश असें तत्त्व प्रतिपादन केले आहे.
उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें ।
इतुक्यासाठी आकाश झालें । भूतरूप ॥
भूतांत जाणीव किंवा ज्ञान केव्हां दृग्गोचर होतें असाही प्रश्न येथें केला आहे व जाणीव वायूचेंच लक्षण आहे असे सांगितले आहे.
वायुअंगीं सकल गुण । मागां निरूपिले ॥
ह्मणोन जाणीव नेणीव मिश्रित । अवघें चालतें पंचभूत ।
ह्मणोनियां भूतांत । जाणीव असे ॥
कोठें दिसे कोठें न दिसे । परि तें भूतीं व्यापून असे ।
तीक्ष्ण बुद्धि करितां भासे । स्थूल सूक्ष्म ॥
सातव्या समासांत मनुष्याला जन्मकाळ कसा आला व निव्वळ मरणानें मनुष्य मुक्त होतो किंवा नाही याचा विवाद करून ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीं असें रामदासांनीं प्रतिपादन केले आहे.
आठ, नऊ व दहा या समासांत वायु, आकाश, परब्रह्म व ज्ञानी वगैरे वेदांत तत्त्वांचें पुन्हां विवरण करून दशक संपविला आहे.
दहाव्या दशकाच्या पहिल्या समासांत सर्वत्रांचें अंतःकरण एक की अनेक हा प्रश्न काढून अंतःकरण म्हणजे जाणीव किंवा ज्ञान असें सांगून तें ज्ञान सर्वत्र कमी अधिक प्रमाणानें पण एकच आहे असे प्रतिपादन केलें आहे.
दुसऱ्या तिसऱ्या, चवथ्या व पांचव्या समासांत जगाची उत्पत्ति, स्थिति व लय करणारे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचें वर्णन आहे; व तें करतांना ब्रह्मदेवानें सृष्टि इच्छामात्रेकरून कशी केली, त्यानें प्रत्येक जातीच्या प्राण्याचें जोडपें कसें निर्माण केले व त्या प्रत्येक जोडप्यापासून पुढे मग हजारों प्राणी कसे निर्माण झाले याची हकीगत दिली आहे व नंतर पांच प्रकारच्या प्राण्यांची माहिती सांगितली आहे.
साहाव्या समासांत भ्रमाचें स्वरूप पुष्कळ व्यावहारिक दृष्टांतांनी दाखविले आहे व तसे करतांना समाजांतील पुष्कळ वेडगळ समजुतीचे दाखले दिले आहेत.
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥
आतां जें जें देइजेते । तें तें पुढें पाविजेते ।
मेलें मनुष्य भोजना येतें । या नांव भ्रम ॥
मेलें माणूस स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥
प्रचीतिविण औषध घेणें । प्रचीत नसतां पथ्य करणें ।
प्रचीतिविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं । आणि वाचून जाते सटी ।
ऐशा प्रकारांच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥
सातव्या समासांत ज्ञान्याच्या सामर्थ्याचें वर्णन केले आहे व ज्ञानी झाला तरी त्यानें सगुण भक्ति करण्यास व निष्काम कार्य करण्यास हरकत नाहीं असे प्रतिपादन केले आहे.
आठव्या समासांत प्रचीतीचे स्वरूप सांगितले आहे व तसें करतांना सुद्धां व्यावहारिक दृष्टांत दिले आहेत. उदाहरणार्थ हा पहा:-
वैद्य पाहिला कच्चा । तरी प्राण गेला पोराचा ।
येथें उपाय दुसऱ्याचा । काय चाले ॥
स्वदुःखें अंतरीं झिजे । आणि वैद्य पुसतां लाजे ।
तरी मग तयासि साजे । आत्महत्यारेपण ॥
अकराव्या दशकाच्या पहिल्या समासांत आकाशापासून वायु, वायूच्या जोराच्या घर्षणानें वन्हि व मंदवायुपासून पाणी व पाण्यापासून नाना बीजरूप पृथ्वी व त्यापासून पदार्थमात्राची उत्पत्ति असा सृष्टिक्रम देऊन सर्व जग कल्पनामय आहे व ती परमात्म्याची कल्पना आहे व त्या पुरुषापासून पंचभूतात्मक व त्रिगुणात्मक अशी अष्टधाप्रकृति होते व त्यापासून सर्व जग होतें अशी विकल्पानें सृष्टिरचना सांगून मग उलटकमानें सृष्टीचा नाश होतो व त्याला प्रारंभ सूर्य तापापासून होतो असे सांगितले आहे. व त्यानंतर आत्म्याचे निरनिराळे प्रकार सांगून निर्गुण व निराकार परमात्म्याच्या प्रतिपादनानें समासाची समाप्ति केली आहे.
दुसऱ्या समासांत मायेच्या चंचलपणाचें वर्णन केले असून प्रतिमारूप देव; अवताररूप देव, अन्तरात्मरूपी देव व निर्विकार देव असे चार प्रकारचे देव वर्णिले आहेत व भावाप्रमाणें देव पावेल असे म्हटले आहे.
जो निर्मळास ध्यायील । तो निर्मळाचे होईल ।
जो जयास भजेल | तो तद्रूप जाणावा ॥
तिसरा समास व्यावहारिक उपदेशपर आहे. येथें नरदेहाचें महत्व सांगितले असून मनुष्यानें व्यवहारांत कसे वागावें हें दाखविले आहे.
बहुतां जन्माचा शेवट । नरदेह सांपडे अवचट ।
येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ॥
प्रपंच करावा नेमक । पहावा परमार्थ विवेक ।
जेणें करितां उभय लोक । संतुष्ट होती ॥
तरी आतां ऐसें न करावें । बहुत विवेकें वर्तावें ।
इहलोक परत्र साधावे । दोहींकडे ॥
आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे ।
सुख म्हणोन आवडे । आळसी लोकां ॥
साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढे सुरवाडती ।
खाती जेवती सुखी होती । यत्नेंकरूनी ॥
आळस उदास नागवणा । आळस प्रयत्न बुडवणा ।
आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट होती ॥
म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा ।
अरत्रीं परत्रीं जीवा । समाधान ॥
चवथ्या समासांत पुनः नेहमीच्या वेदांती पालुपदावर रामदास आले आहेत. पण शेवटीं तिसऱ्या समासाप्रमाणें विवेकानें वागण्याचा उपदेश केला आहे.
पांचव्या व सहाव्या समासांत पुन्हां राजकारण हा शब्द आला आहे व राजकारण करणें हे मनुष्याच्या कर्तव्यापैकी एक कर्तव्य आहे असे म्हटले आहे व राजकारण करतांना कसे वागले पाहिजे कोणते धोरण स्वीकारलें पाहिजे याचें विवरण केले आहे. म्हणून हे दोन्ही समास बहुतेक जसेच्या तसे येथे उतरून घेणे इष्ट आहे.
तिसरें तें सावधपण । सर्व विषयीं ॥
चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ।
अन्याय थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥
जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर ।
नीति न्यायास अंतर । पडोंच न द्यावें ॥
संकेतें लोक वेधावा । एकून एक बोधावा ।
प्रपंचहि सांवरावा । यथानुशक्त्या ॥
प्रसंगसमय वोळखावा । धीर बहुत असावा ।
संबंध पडो न द्यावा । अति परिचयाचा ॥
उपाधीस विस्तारावें । उपाधीत न सांपडावें ।
नीचत्व पहिले घ्यावें । आणि मूर्खपण ॥
दोष देखोन झांकावे । अवगुण अखंड न बोलावे ।
दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥
तऱ्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाय ।
नव्हे तेंचि करावें कार्य । दीर्घ प्रयत्नें ॥
फड नासोंच न द्यावा । पडिला प्रसंग सांवरावा ।
अतिवाद न करावा । कोणी एकासी ॥
दुसऱ्याचें अभीष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें ।
न सोसे तरी जावें । दिगंतरासी ॥
दुःख दुसऱ्याचें जाणावें । ऐकोन तरी वाटोन घ्यावें ।
बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥
अपार असावें पाठांतर । सन्निध असावा विचार ।
सर्वदा सर्वतत्पर । परोपकारासी ॥
शांति धरून धरवावी । तऱ्हे सांडून सांडवावी ।
क्रिया करून करवावी । बहुतां करवीं ॥
करणे असला उपाय । तरी बोलोन दाखऊं नये ।
परस्परेंचि प्रत्यय । प्रचीतीस आणावा ॥
जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना ।
बहुत सोसितां उरेना । महत्त्व आपुलें ॥
राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच न द्यावें ।
परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥
लोक पारखून सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे ।
पुनः मेळवूनि घ्यावे । दुरिल्या दोरें ॥
हिरवटासि दूरी धरावें । कचरटासि न बोलावें ।
संबंध पडतां सांडूनि जावें । एकीकडे ॥
ऐसें असे राजकारण । सांगतां तें असाधारण ।
सुचित असतां अंतःकरण । राजकारण जाणिजे ॥
वृक्षारूढास उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें ।
कारभाराचें सांगावें । अंग कैसें म्हणोनि ॥
पाहतां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना ।
आलें वैभव अभिलापिना । कांहीं केल्या ॥
एकाची पाठी राखणें । एकास देखों न शकणें ।
ऐसी नव्हत की लक्षणें । चातुर्याची ॥
न्यायें बोलतांहि मानेना । हित तेंचि नये मना ।
येथें कांहींच चालेना । त्यागाविण ॥
शुद्ध नेटकें ल्याहावें । लिहोनि शुद्ध शोधावें ।
शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ॥
विस्कळित मातृका नेमस्त कराव्या ।
धाष्टर्य जाणोनि सदृढ धराव्या ।
रंग राखोन भराव्या । नानाकथा ॥
जाणावयाचें सांगतां नये । सांगायाचें नेमस्त नये ।
समजल्याविण कांहींच नये । कोणी एक ॥
हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण ।
वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ॥
पुसों जाणें सांगों जाणे । अर्थांतर करूं जाणे ।
सकळिकांचें राखों जाणें । समाधान ॥
दीर्घ सूचना आधींच कळे । सावधपणें तर्क प्रबळे ।
जाण जाणोनि वळे । यथायोग्य ॥
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत ।
या वेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥
तालवेळ तानमानें । प्रबंध कविता जाड वचनें ।
मजालसी नाना चिन्हें । सुचत जावीं ॥
जो एकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर ।
अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भींचें ॥
आधींच शिकोन जो शिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी ।
गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥
अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर ।
भक्तिज्ञान वैराग्य सुंदर । करूनि दावी ॥
जयास प्रयत्नचि आवडे । नाना प्रसंगी पवाडे ।
धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥
सांकडींमध्ये वर्तो जाणे । उपाधीमध्ये मिळों जाणे ।
अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥
आहे तरी सर्वांठायीं । पाहों जातां कोठेंचि नाहीं ।
जैसा अंतरात्मा ठायींचा ठायीं । गुप्त जाहला ॥
त्या वेगळे कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे ।
न दिसोन वर्तवीतसे । प्राणी मात्रासीं ॥
तैसाचि हाहि नानापरी । बहुत जनांसी शाहणें करी ।
नानाविद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्म ॥
आपणाकरितां शाहणे होती । ते सहजचि सोय धरिती ।
जाणतेपणाची महती । ऐसी असे ॥
राखों जाणें नीति न्याय । न करी न करवी अन्याय ।
कठिण प्रसंगी उपाय । करूं जाणे ॥
ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा ।
दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥
सातव्या समासांत संसाराला चंचल नदीची उपमा देऊन तिचें स्पष्टीकरण केलें आहे, व ज्ञानी लोकच ही नदी तरून जाऊं शकतात असे सांगितले आहे.
आठव्या समासाचा प्रारंभ नवीन ग्रंथाच्या किंवा प्रकरणाच्या सुरुवाती सारखा आहे.
आधी वंदू सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥
तेणेंविण कार्य न चले । पडिलें पूर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्याचे चाले । जयाचेनि ॥
दहाव्या समासांत पुन्हां व्यावहारिक उपदेश आहे. तो बहुतेक समास येथें अवतरणरूपानें घेणें बरें.
जैसा बहुधा होऊनि भोगितो । नाना सुखें ॥
तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणतां समस्त । विख्यात योगी ॥
कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्या वेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवण ॥
ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधूनि घ्यावें ।
पाहों जातां न सांपडावें । एकाएकीं ॥
कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त ।
वेष पाहतां शाश्वत । एकहि नाहीं ॥
प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनांस कळेना ।
पाहों जातां आढळेना । काय कैसें ॥
वेषभूषण तें दूषण । कीर्तिभूषण तें भूषण ।
चालणेविण एक क्षण । जाऊंच नेदी ॥
त्यागी ओळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन ।
लोक शोधून पाहती मन । परी इच्छा दिसेना ॥
पुर्ते कोणाकडे पाहेना । पुर्ते कोणासी बोलेना ।
पुर्तें एके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥
जातो स्थळ तें सांगेना । सांगितलें तरी तेथें जाईना ।
आपली स्थिति अनुमाना | येऊंच नेदी ॥
लोकीं केलें तें चुकवी । लोकीं भाविलें तें उलथवी ।
लोकीं तर्किलें तें दावी | निष्फळ करूनी ॥
लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर ।
लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिच्छा ॥
एवं कल्पितां कळेना । तर्कितांहि तर्केना ।
कदापि भावितां भावेना । योगेश्वर ॥
ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठायीं पडेना ।
क्षण एक विसंवेना । कथाकीर्तन ॥
लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेच निष्फळ होती ।
जनाची जना लाजवी वृत्ती । तेव्हां योगेश्वर ॥
बहुत शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें ।
तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥
अखंड एकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा ।
काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥
उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास शिकवावे ।
उदंड समुदाय करावे । परी गुप्तरूपें ॥
अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग ।
लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ॥
आधीं कष्ट मग सुफळ । कष्टचि नाहीं तें निष्फळ ।
साक्षेपेंविण केवळ । वृथा पुष्ट ॥
लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे ।
जाणजाणोनि धरावे । जवळी दुरी ॥
अधिकारपरत्वे कार्य होतें । अधिकार नसतां व्यर्थ जातें ।
जाणून शोधावीं चित्तें । नानाप्रकारें ॥
अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें ।
आपला मगज राखणें । कांहीं तरी ॥
हें प्रचीतीनें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी एकें ॥
महंतें महंत करावे । युक्ति बुद्धीनें भरावे ।
जाणते करीत विचरावे । नाना देशीं ॥
बाराव्या दशकाच्या पहिल्या समासांत रामदासांनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली आहे; व प्रपंचाशिवाय परमार्थ साधणार नाहीं असेंहि म्हटले आहे. प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे वाटतें. रामदासांच्या अभिमान्यांच्या मतें संसार व प्रपंच यांत रामदासांनी अत्यंत भेद मानला आहे. प्रपंच म्हणजे राष्ट्रप्रपंच किंवा व्यक्तिप्रपंच व संसार म्हणजे बायकामुलें. अशा तऱ्हेचा हा फरक आहे असें त्यांचे म्हणणे आहे पण ती या समासावरून उगाच क्लिष्ट कल्पना आहे असें म्हणावें लागतें.
आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥
प्रपंच सोडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥
प्रपंच सोडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।
मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥
संसारी असतां मुक्त । तोचि जाणावा सुयुक्त |
आखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥
प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ॥
ह्मणोन सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालविणें ।
ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ॥
परनारी पाहोन उचंबळे । जीव सृष्टि विवेकें चाले ।
आणि पुरुष होऊन भ्रमले । यासि काय म्हणावें ॥
जगदीशा परता लोभ नाहीं । कार्य कारण सर्व कांहीं ।
संसार करीत असतांही । समाधान ॥
यत्नाप्रपंचाच्या वाढी । नानासंकटें सांकडीं ।
संसार सांडून देश घडी । होय तेणें ॥
उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणे करीत जावा । संसार आपुला ॥
वरील उताऱ्यावरून प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे दिसतें.
दुसऱ्या समासांत प्रयत्नवाद सांगितला आहे. मनुष्यानें आपले अंगीं असलेले गुण बाहेर आणले पाहिजेत तरच त्याचें चीज होणार; नाहींतर सर्व सारखे.
जंववरी चंदन झिजेना । तंववरी सुगंध कळेना ।
चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती ॥
समासाचे शेवटीं हरिकथा व राजकारण या दोन पुरुषार्थीचा मागल्या एका समासाप्रमाणें उल्लेख केला आहे.
याप्रमाणे या दशकांतले पहिले दोन समास व्यावहारिक उपदेशपर आहेत व त्यांत मनुष्यानें प्रयत्न करून आपला संसार-प्रपंच करून मग परमार्थ साधावा असा सामान्य जनाला उपदेश केला आहे.
तीन समासापासून आठ समासापर्यंत पुनः निवळ पारमार्थिक निरूपण आहे. त्यांत पूर्वी पुष्कळ वेळां आलेले निरूपण निराळ्या शब्दांनी व निराळ्या उपमांनी सांगितलें आहे. पण सर्व समासांचें सार म्हणजे सृष्टिरचना, ब्रह्म व माया, ब्रह्म व भक्त, विवेक व वैराग्य वगैरे वेदांतपर व निवृत्तिपर विषयांचें विवरण रामदासांनी केले आहे. त्यांत एका ओवीत तत्कालीन हिंदुराजाचा उल्लेख आहे पण ते कित्येक आहेत; असे म्हटलें आहे. यावरून तो फक्त शिवाजी महाराजांबद्दलचा आहे असे खात्रीने म्हणतां येत नाहीं.
मागां होते जनकादिक । राज्य करितही अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्लोक । कित्येक असती ॥
या दशकाचे शेवटचे दोन समास पहिल्या दोहोंप्रमाणें प्रवृत्तिपर व व्यवहारविषयक आहेत. नवव्या समासांत मनुष्यानें रोजचें वर्तन कशा तऱ्हेनें ठेवावें हें सांगितले आहे व शेवटल्या समासांत मनुष्यानें दुसऱ्यावर परोपकार करावा, त्याच्याशीं सलोख्यानें वागावें; त्याला दुरुत्तरें देऊं नयेत, व नेहमी चांगले काम करीत रहावे असे सांगितले आहे व 'बोले तैसा चाले त्याचीं वंदावीं पाऊलें' या तुकारामाच्या प्रसिद्ध उक्तीचा अनुवाद केला आहे.
बोलण्यासारखें चालणें । स्वयें करून बोलणें ।
तयांचीं वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥
दुसऱ्या समासांत या आत्म्यानें सारासार विचार केला म्हणजे 'सोहं तत्वमसि' या तत्वाचें ज्ञान आत्म्यास होते असे सांगितले आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत ब्रह्मापासून मायेच्या द्वारें, सृष्टीची रचना कशी होते ती वर्णिली आहे व पुढे ती सृष्टि प्रलयकाळ कशी नाश पावते तें निवेदन केले आहे.
मागें ज्याप्रमाणें सबंध दशकांत एका माणसाचा जीवनवृत्तांत निवेदन केला आहे त्या सारखीच पांचव्या एका समासांत लहानशी कहाणी सांगितली आहे. मात्र मानवी आयुष्याची दुःखरूप काळी बाजू येथें भडक रंगांत रंगविली नाहीं.
साहाव्या समासांत थोडक्यांत पंच महाभूतें यांच्या व्याख्या, त्यांचा नाशवंतपणा, आत्म्याचा शाश्वतपणा, विवेकानें परमात्म्याचें व जीवात्म्याचें समजणारें ऐक्य व शेवटीं ज्ञानी माणसाची थोरवी इतक्या गोष्टी वर्णिल्या आहेत व म्हणून या समासास लघुबोध असें अन्वर्थक नांव दिले आहे. शिवाजीमहाराजास शिंगणवाडी येथें समर्थ रामदासांनी हा लघुबोध केला अशी आख्यायिका आहे.
सातव्या समासापासून दशकाच्या शेवटपर्यंत निवळ आध्यात्मिक विषयांचें प्रतिपादन रामदासांनी केले आहे. सातव्यांत विवेकानें खऱ्या कर्त्यास ओळखावे असे सांगून आठव्यांत खरा कर्ता कोण या प्रश्नाचे उत्तर दिलें आहे, व तें देतांना लोकांमध्यें प्रचलित असलेल्या हजारों देवांच्या कल्पनांचा उल्लेख केला आहे; व खरा कर्ता म्हणजे कोणीच नाहीं; परब्रह्म हें निर्गुण आहे असे विवरण केले आहे. नवव्या समासांत देहाच्या ठिकाणी सुखदुःख भोक्ता म्हणजे आत्मा होय असे सांगितले आहे. शेवटच्या समासांत जरी सर्व वस्तुजात परब्रह्मापासून झालेली आहे तरी व्यावहारिक रीतीनें चांगले वाईट असा फरक आहे व तसा फरक केला पाहिजे व म्हणूनच मनुष्यानें आपल्यामध्ये गुण आणण्याचा प्रयत्न करावा व निंद्य असेल तें टाकून द्यावे असे सांगून समास व दशक संपविला आहे.
सगट अवघेंचि सेविलें । तरी तें मूर्खपण ॥
जीवनाचें झालें अन्न । अन्नाचें झालें वमन ।
परी वमनाचें भोजन । करितां नये ॥
तैसें निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदयीं धरावें ।
सत्कीर्तीने भरावें । भूमंडळ ॥
उत्तमास उत्तम माने । कनिष्ठास तें न माने ।
म्हणोन करंटे देवानें । करून ठेविले ॥
सांडा अवघें करंटपण । धरावें उत्तम लक्षण ।
हरिकथा पुराण श्रवण । नीतिन्यायें ॥
वर्तायाचा विवेक । राजी राखणें सकळ लोक ।
हळुहळु पुण्यश्लोक । करित जावें ॥
मुलांचे चालीनें चालावें । मुलांच्या मनोगतें बोलावें ।
तैसें जनास शिकवावें । हळुहळू ॥
मुख्य मनोगत राखणें । ही चातुर्याची लक्षणें ।
चतुर तो चतुरंग जाणें । इतर ते वेडे ॥
वेड्यास वेडे म्हणूं नये । वर्म कदापि बोलूं नये ।
तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥
उदंड स्थळी उदंड प्रसंग । जाणोनि करणें यथासांग ।
प्राणिमात्राचा अंतरंग । होऊन जावें ॥
मनोगत राखों न जातां । परस्परें होय अवस्था ।
मनोगत तोडितां व्यवस्था । बरी नाहीं ॥
याकारणें मनोगत । राखेल तो मोठा महंत ।
मनोगत राखतां समस्त । वोढोन येती ॥
चवदावा दशक आतांपर्यंत वर्णिलेल्या दशकांपेक्षां अगदीं निराळा आहे. पूर्वीच्या बऱ्याच दशकांत वेदांत मताचा उल्लेख वारंवार आलेला आहे व पुष्कळ ठिकाणी तर पुनरुक्तीचा दोष त्या दशकांवर आल्याखेरीज रहात नाहीं. पण या चवदाव्या दशकांत शेवटच्या दोन समासांत फक्त ब्रह्म व माया हे शब्द आले असून त्यांचें विवेचन केले आहे. बाकीच्या आठी समासांत धड व्यावहारिक नाहीं धड आध्यात्मिक नाहीं अशा तऱ्हेचा उपदेश आहे. या समासांतील कित्येक विचार मागील समासांतील विचारांशी विसंगत आहेत. यावरून हा उपदेश सर्वसामान्य जनांना केलेला दिसत नाहीं तर रामदासांनी आपला स्वतंत्र रामदासी पंथ केल्यानंतर या रामदासी पंथांतील लोकांना केल्यासारखा दिसतो.
कारण रामदासी पंथाच्या लोकांचे भिक्षा, कीर्तन, हरिकथा, कवित्व, वगैरे व्यवसाय होते व त्यांचेंच पहिल्या समासांतून वर्णन आले आहे. या दशकांतच तत्कालीन सामाजिक गोष्टींचा उल्लेख जास्त प्रमाणांत आला आहे. आतांपर्यंत ठराविक व नेहमींचा वेदांतपर किंवा व्यावहारिक उपदेश या पलीकडे तत्कालीन गोष्टींचा उल्लेख क्वचितच आला आहे. पण या दशकाची तशी गोष्ट नाहीं. तेव्हां हा दशक रामदासांनी निराळ्याच एका मनःस्थितीत लिहिला असावा असे दिसतें. अशी मनःस्थिति जर इतर दशके लिहितांना राहिली असती तर दासबोध या मोठ्या ग्रंथावरून किती तरी सामाजिक तत्कालीन गोष्टी कळल्या असत्या असे वाटतें असो.
पहिल्या समासांत निस्पृह मनुष्याचें स्वरूपवर्णन बरेंच सविस्तरपणे केलें आहे. या समासाच्या ओव्याही इतर बहुतेक सर्व समासांपेक्षा संख्येनें जास्त आहेत. निस्पृहाच्या या वर्णनावरून निस्पृह म्हणजे आपल्या पंथानें चालणारा विरक्त मनुष्य असाच अर्थ रामदासांनीं केल्यासारखा दिसतो. एकदां निस्पृहता धरली म्हणजे ती सोडूं नये; नेहमी फिरत राहावें; भिक्षा मागावी, देवाची पूजा अर्चा करावी; मनोविकार आंवरावे; दुर्गुण लागूं देऊं नयेत, गर्विष्ठ असूं नये; द्रव्याकरितां कीर्तन करूं नये; राजाच्या येथे कारभारी किंवा कामगार होऊं नये; प्रपंच करूं नये, मोलानें पुजारी होऊं नये; वगैरे तऱ्हेचा उपदेश रामदासांनी केला आहे. अशा कृत्यांनी महंतपणा अंगी येतो असें रामदासानीं शेवटी म्हटले आहे. या समासांत मठ असा शब्द आला आहे व निस्पृहानें मठ स्थापूं नये; स्थापल्यास आपण तरी मठपति होऊं नये असा उपदेश केला आहे. महंत व मठपति या दोन शब्दांवरून व एकंदर उपदेशावरून सर्व दशक रामदासी पंथाच्या लोकांकरितां लिहिलेला आहे अशी खातरी होते व ही खातरी दुसऱ्या समासांतील विषयानें दृढतरच होते. कारण दुसऱ्या समासांत भिक्षेचें महत्त्व गाइले आहे. तिसऱ्या समासांत कवित्वाचें लक्षण दिले आहे व त्यावरून दासबोधाच्या प्रारंभीच्या कविवर्णनाच्या समासाची आठवण होते. कारण दोन्ही ठिकाणी पुष्कळ विचारैक्य दिसून येतें.
चवथ्या समासांत कलियुगी कीर्तन करावें असे प्रतिपादन केले आहे व यांत अनुप्रास व त्याच त्याच शब्दांची मालिका ओव्यांत आणण्याचा प्रयत्न केला आहे, यामुळे ओव्या केव्हां केव्हां अर्थहीन झाल्या आहेत. दासबोधासारख्या गंभीर ग्रंथाला शोभण्यासारखी या समासाची कवन पद्धती दिसत नाहीं. पण अशा तऱ्हेच्या कविता रामदासांचीं स्फुट प्रकरणें म्हणून जी कविता छापली आहे त्यांत पुष्कळ आहेत.
नाना नाटक नेटकें । नाना मानें तुकें कौतुकें ।
नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥
करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान ।
तेणें धरूनिया मन । स्वरामागें लाविलें ॥
भेटों जातां राजद्वारीं । मध्यें धरिला बेगारीं ।
कवळतां तैशी परी । कळेनें केली ॥
मन ठेवून ईश्वरीं । कोणी हरिकथा करी ।
तोचि एक संसारी । धन्य जाणावा ॥
सातव्या समासांत रामदास पुनः सामान्य व्यावहारिक उपदेशाकडे वळले आहेत. मनुष्याला आपल्यांतील नैसर्गिक दोष कदाचित् नाहींसे करतां येणार नाहींत. पण मनुष्यानें श्रमाने मिळणारे गुण तरी आपल्याठायीं आणण्याची खटपट केली पाहिजे असे मोठ्या कळकळीनें सांगितले आहे.
सहाव्या समासांत रामदास गृहस्थाश्रमाचा उत्तमपणा वर्णन करतात. ज्याप्रमाणें आजारी माणसाला आरोग्याचे महत्त्व जास्त चांगले कळते त्यांतला तर हा प्रकार नाहीं ना अशी शंका येते. यावरून मागें उल्लेख केलेल्या एका मताचा फोलपणाही दिसून येतो. प्रपंच, संसार व आतांच्या समासांतील गृहस्थाश्रम हे तिन्ही शब्द रामदासांनी एकाच अर्थाने वापरले आहेत असे म्हणणें प्राप्त आहे.
नाना वेष नाना आश्रम । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम ।
जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥
देव ऋषि मुनी योगी । नाना तापसी वीतरागी ।
पितृ आदि करूनि विभागी । अतीत अभ्यागत ॥
गृहस्थाश्रमी निर्माण झाले । आपुला आश्रम टाकून गेले ।
परंतु गृहस्थागृहीं हिंडों लागले । कीर्तिरूपें ॥
या कारणें गृहस्थाश्रम । सकळांमध्ये उत्तमोत्तम ।
परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया ॥
जो दुसऱ्याचें अंतर जाणें । देशकाळ प्रसंग जाणें ।
तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥
नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला ।
वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥
ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु ।
'वर्णाना ब्राह्मणो गुरुः' । ऐसें हें वचन ॥
ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।
गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे ॥
कित्येक दावलमलकास जाती । कित्येक पिरासी भजती ।
कित्येक तुरुक होती । आपुले इच्छेनें ॥
ऐसा कलीयुगीं आचार । कोठें राहिला विचार ।
पुढें पुढें वर्णसंस्कार । होणार आहे ॥
गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती ।
शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥
हें ब्राह्मणांस कळेना । त्याची वृत्ति च वळेना ।
मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥
राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं ।
आपण अरत्रींना परत्रीं । कांहींच नाहीं ॥
ब्राह्मणांस ग्रामण्यानें बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरवलें ।
त्याच विष्णूनें शापिलें । परशुरामा ॥
आम्हीही तेचि ब्राह्मण । दुःखें बोलिलों हें वचन ।
वडील गेले ग्रामणी करून । आम्हां भोंवते ॥
आतांच्या ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें ।
तुम्हां बहुतांचे प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥
बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचें अदृष्ट जाणावें ।
प्रसंग बोलिलों स्वभावें । क्षमा कीजे ॥
या दशकाचे शेवटचे तीन अध्याय मात्र पुनः अध्यात्मपर आहेत व त्यांत रामदासांनी ध्यान, परब्रह्म व माया या तिहींचें स्वरूपवर्णन दिलें आहे. त्यांत मायेचें स्वरूप वर्णन करतांना खालील ओवी आहे.
मुळीं बालविधवा नारी । तिचे नांव जन्मसावित्री ।
कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥
पंधराव्या दशकांत सामान्यतः रामदास आपल्या वेदांती तत्वाचेंच पुनः विवरण करण्यास लागले आहेत असे दिसतें. मात्र पहिले तीन समास व सहावा समास यांमध्यें चातुर्यलक्षण, निस्पृहलक्षण व आत्मनिरीक्षण या नांवाखालीं व्यावहारिक उपदेश केला आहे व तो संबंध चवदाव्या समासाप्रमाणे आपल्या रामदासी पंथांतील लोकांना केल्यासारखा दिसतो. त्यांत पुष्कळ गोष्टी गुप्तपणे कराव्या व केल्याचा लोकांना सुगावा लागूं देऊं नये व राजकारण करावें, लोकांची मनें राजी राखावीं वगैरे प्रकारचे उद्गार आले आहेत व बहुधा अशासारख्या उद्गारांवरून रामदास मोठे मुत्सद्दी असले पाहिजेत, त्यांच्याच स्फूर्तीने सर्व महाराष्ट्रांत राजकारण सुरु झाले असले पाहिजे; रामदासी पंथ म्हणजे एक राजकीय पंथ असला पाहिजे वगैरे कल्पना निघाल्या असाव्यात असे वाटतें. पण या अपवादात्मक व संशयात्मक उद्गारांवरून इतकीं खोल खोल अनुमानें काढणें रास्त आहे किंवा नाहीं हें ठरविणे कठीण आहे. कांहीं उद्गारांवरून तर त्यांना हें राजकारण पसंत नसावें की काय असाही भास होतो. या चार समासांतले मुद्द्याचे व मासलेवाईक उतारे एकत्र येथें देतो. त्यांवरून निघणाऱ्या अनुमानांचे विवेचन दासबोधाच्या सारसमाप्तीनंतर करावयाचें आहे.
येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥
धूर्तासि धूर्ताचि आवडे । धूर्त धूर्तीच पवाडे ।
उगीच हिंडती वेडे । कार्येविण ॥
धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मानसीं मन मिळालें ।
परि हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥
समर्थाचें राखितां मन । तेथें येती उदंड जन ।
जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥
वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूंच नये ॥
जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती । सारिख्याच नसती आदिअंती ।
नेमचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनि ॥
कित्येक म्लेच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांत आटले ।
देशभाषेनें रोधिले । कितीएक ॥
महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ॥
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले ।
रात्रंदिवस करू लागले । युद्धचर्चा ॥
उदम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोट धंदा लागला । निरंतर ॥
कुग्रामें अथवा नगरें । पाहावी घरांची घरें ।
भिक्षामिषे लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥
सात, आठ, नऊ व दहा या समासांत निरनिराळ्या रूपकांनी मायेपासून, अगदी सूक्ष्मजन्तूपासून तो थेट मनुष्यापर्यंत सर्व प्राणिमात्र पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या व्यापारानें कसें झाले आहे व मायेपूर्वी परब्रह्म आहे तें ओळखून ज्ञानानें उपासना व भजन करून आपल्या आयुष्याचें सार्थक करावें असे सांगून दशक संपविला आहे.
सोळावा दशक चवदाव्याप्रमाणेंच अपूर्व आहे. यामध्यें पंचमहाभूतांचें- प्रत्येक समासांत एकएका भूताचें याप्रमाणें- स्तवन केलेले आहे. यामधल्या कांहीं कांही कल्पना कविकल्पकतेला अनुरूप अशा आहेत. यामध्यें रामदासांचा नेहमीचा वेदांतही फारसा आला नाहीं; किंवा नैतिक व्यावहारिक उपदेशही फारसा दृष्टीस पडत नाहीं. तर यांत कविप्रतिभेनें केलेले सृष्टीतत्त्वांचें निरपेक्ष वर्णन आहे. यामुळे काव्यमय कवितेच्या तोडीला बसविण्यास योग्य अशा या दशकांतल्या पुष्कळ कविता आहेत. यामुळे हा सर्व दशक वाचनीय झालेला आहे.
पहिल्या समासांत वाल्मीकी कवीचें स्तुतीपर नमन आहे. रामदासाचा प्रिय देव राम याचें चरित्र गाणारा वाल्मीकी कवी महाभारताच्या कर्त्या व्यास कवीपेक्षां रामदासाला जास्त सन्मानार्ह वाटावा हें स्वाभाविक आहे. या समासांत वाल्मीकी ऋषि प्रथमतः वाल्ह्या कोळी असून तपोबलानें वाल्मीकी ऋषी झाला. त्यानें रामचरित्र रामाच्या बालपणीच कसे पुरे केलें, तो तप करीत असतांना त्याच्या आसनावर मुंग्यांनीं वारुळ केल्यामुळे त्याला वाल्मीकी असें नांव कसें पड़लें, वाल्मीकी रामनामानें पापापासून कसा तरला वगैरे सर्व दंतकथा या समासांत रामदासांनी एकत्र गोंविल्या आहेत.
दुसऱ्या समासांत सूर्याची स्तुति आहे. त्यांत सूर्यप्रकाशावर सर्व जगाचे व्यवहार कसे अवलंबून आहेत हे चांगल्या तऱ्हेनें सांगितले आहे. त्याचप्रमाणें रामाचा वंश सूर्यापासून झाला आहे या पुराणांतील दंतकथेचाही उल्लेख केला आहे.
तिसऱ्या समासांत पृथ्वीचें स्तवन केले आहे. सर्व प्राणिमात्राचा आधार पृथ्वीच होय; पृथ्वीवरच माणसें 'गड कोट पुरे पट्टणें' करतात; पृथ्वीवर सर्व पर्वत समुद्र व दऱ्या खोरीं असतात, पृथ्वीपासून सर्व धातु मनुष्यास मिळतात; पृथ्वीलाच 'बहुरत्ना वसुंधरा' असें अन्वर्थकपणें ह्यणतात; 'मी-माझें करणारे' सर्व अभिमानी पुरुष यांचा जन्मापासून मरणापर्यंत सर्व व्यवहार पृथ्वीवरच होतो; इतका पृथ्वीचा महिमा आहे हें रामदासांनी या समासांत दाखविले आहे.
चवथ्या समासांत पाण्याची स्तुति केली आहे. पृथ्वीवर समुद्र, नद्या, सरोवरें, झरें, पाझर अशा नानारूपानें सर्वत्र पाणी आहे; सर्व द्रवरूप पदार्थात पाणीच आहे; मुक्ताफळाचें पाणी; रत्नाचें पाणी व शस्त्रांचें पाणी (येथे पाणी शब्दांच्या संदिग्धपणाकडे दुर्लक्ष झाले आहे) हें पाण्याचेंच रूप आहे वगैरे तऱ्हेचे पाण्याचे प्रकार वर्णिले आहेत.
{{gap}पांचव्या समासांत अग्नीचें स्तवन केले आहे. जठराग्नि, वडवाग्नि वगैरे अग्नीचे प्रकार येथे सांगितले आहेत; व त्यांचें
'अंत्यजगृहींचा अग्नि आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला'।
सकळ गृहीं पवित्र झाला । वैश्वानरू ॥
अग्निहोत्र नाना याग । अग्निकरितां होतां सांग ।
अग्नि तृप्त होतां मग । प्रसन्न होय ।
या तऱ्हेनें वर्णन केले आहे.
साहाव्या समासांत वायूची प्रार्थना केली आहे व त्यांत वायूचा पुत्र हनुमान ही कथा देऊन हनुमानाच्या पराक्रमाचें वर्णन केले आहे.
सातव्या समासांत महाभूतांचें मूळ अन्तरात्मा होय असे सांगून तो अन्तरात्मा सर्वाचें ठायीं आहे व तो पुरुषप्रकृती या जोडीनें प्रकट होतो असे सांगितले आहे.
आठ, नऊ व दहा हे समास पुनः नेहमींच्या वेदांती विचारांनीं भरलेले असून पंचमहाभूतांची उत्पत्ती आत्म्यापासून कशी झाली; या जगांत निरनिराळे ऋतु, दिवसरात्र वगैरे व्यवस्था कशा अस्तित्वांत आल्या व या सर्व व्यवस्थेचें मूळ सर्वशक्तिमान्, सर्वज्ञ असा अन्तरात्मा कसा आहे याचें विवेचन करून हा सोळावा दशक संपविला आहे.
सतरावा दशक पुनः वेदांतपर आहे. पहिल्या तीन समासांत परब्रह्म व त्याच्या मायेनें उत्पन्न झालेले भेद व भेदानें भरलेला संसार याचें वर्णन केले आहे. चवथ्या समासांत ज्ञाता व तें ज्ञान दुसऱ्यास सांगणारा यांचें गौरव केले आहे.
मूळ एका स्वरापासून 'सारिगमपघनिधसा' हें स्वरसप्तक बनले व स्वरामध्यें तार, मंद्र, घोर वगैरे भेद झाले, त्याचप्रमाणें परब्रह्माची गोष्ट आहे; मनुष्य एकांतांत असला व एकाग्र चित्त करून बसला म्हणजे त्याला 'सोहं सोहं' चा भास आपोआप होतो; याप्रमाणे साहजिक क्रियांनीं सुद्धां परमात्मप्राप्ति होते; मात्र त्याला ज्ञान पाहिजे; नाहीं तर घरांत पुरलेलें धन असून त्या गोष्टीच्या अज्ञानामुळें मनुष्य दारिद्र्य भोगतो, त्याप्रमाणें आत्मा आपल्याजवळच असतांना मनुष्य दुःख क्लेश भोगतो; इत्यादि निरूपण पांचव्या समासांत केले आहे.
सहाव्या समासांत दासबोधाच्या दुसऱ्या अर्ध्यात क्वचित् दृग्गोचर होणाऱ्या मानवी आयुष्याच्या दुःखमय स्थितीचें वर्णन आहे; जन्मापासून मरणापर्यंत कशा नाना यातना व नाना संकटें मनुष्यास भोगावी लागतात याचें भडक रंगांत चित्र काढले आहे.
सातव्या समासांत पुनः व्यावहारिक उपदेशाच्या पालुपदावर रामदास आले आहेत व या समासाचा प्रारंभ एका सुंदर उपमेनें केला आहे. ज्या प्रमाणे पाणी निवळ असतें व तें नाना वल्लींमध्यें जाते व त्या वल्लीच्या स्वभावाप्रमाणें तीक्ष्ण, कडवट, गोड वगैरे रुचि त्याला येते त्याप्रमाणें आत्मा, देहसंगानें विकार पावतो. याकरितांच मनुष्यानें सत्संगति धरावी म्हणजे त्याला सद्गुण लाभतात. यावरून मनुष्याचें हितानहित त्याच्या कृतीवरच अवलंबून आहे; मनुष्य आपलाच शत्रु होईल किंवा आपला मित्र होईल म्हणून खालीलप्रमाणें मनुष्यानें वागले पाहिजे.
बाळपण तारुण्य आपलें । वृद्धपणीं प्रचीतीस आलें ।
ऐसे जाणोन सार्थक केलें । पाहिजे कोणे एकें ॥
देहें जैसे केले तैसें होतें । यत्न केल्या कार्य साधतें ।
तरी मग कष्टावें तें । काय निमित्त ॥
आठव्या व नवव्या समासांमध्ये फारच द्विरुक्ति झाली आहे. इतक्या एका पुढे एक असलेल्या समासांत इतकी द्विरुक्ति व एकाच विषयाची गुंतागुंत पूर्वीच्या समासांत दिसून येत नाहीं. या दोन समासांत रामदासांनीं वेदांती पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या दिल्या आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार प्रकारच्या देहांच्या अवयवांचें वर्णन केले आहे. स्थूल देह पांच पांच स्वरूपाच्या पंचमहाभूतांनीं झाला आहे; अन्तःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार मिळून अन्तःकरणपंचक, पंचप्राण; पांच ज्ञानेंद्रियें; पांच कर्मेन्द्रिय व शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पांच विषयपंचक, अशा पंचवीसां मिळून सूक्ष्म देह झाला आहे. कारणदेह अज्ञानानें झाला आहे; व महाकारणदेह ज्ञानानें झाला आहे; व या देहाच्या निरासानें जें विशेष ज्ञान होतें तेंच परब्रह्म होय, असें या दोन समासांत निरूपण केले आहे. दहाव्या समासांत रामदासांनी ज्ञान मिळविण्याकरितां सत्संगति धरावी व उत्तम गुण अंगीं आणावे असा उपदेश करून दशक संपविला आहे.
अठरावे दशकाच्या पहिल्या समासांत निरनिराळ्या देवांच्या स्तुतीनें प्रारंभ करून शेवटी सर्व देवांचा देवेश्वर म्हणजे अंतरात्माच केवळ आहे व त्याच्याच निष्ठेनें मानव भवसागर तरून जातात असे सांगितलें आहे.
दुसऱ्या समासांत उत्तम पुरुषलक्षणाप्रमाणे जाणत्या माणसाचें सविस्तर वर्णन केलें आहे, त्यांत व्यावहारिक उपदेशाचा भाग पुष्कळ आहे व शेवटीं खरा जाणता म्हणजे अन्तरात्माच होय असें सांगून त्याची भक्ति करण्याचा उपदेश केला आहे.
तिसऱ्या व चवथ्या समासाचा विषय एकच आहे. त्यांत मनुष्य देहाची महति वर्णन केली आहे. मनुष्यदेह दुर्लभ आहे; त्या देहाकरितांच सर्वव्याप मनुष्यांना करावा लागतो; देहामुळेच मनुष्याच्या हातून कांहीं तरी कर्तबगारी होते; म्हणून मनुष्यानें सर्व प्रकारचे उत्तम गुण या देहांत असतांना मिळवावे तरच देहाचें सार्थक केल्यासारखे होईल असें प्रतिपादन केलें आहे.
पाचव्या समासांत सार आणि असार यांतला भेद ओळखून तदनुरूप वर्तन करावें म्हणजे मनुष्याला समाधान प्राप्त होतें, असें सांगितलें आहे.
अफजूलखानाचा वध करून महाराज श्रीसमर्थांच्या दर्शनास आले असतां हा सहावा समास सांगितला असे म्हणतात. हा समास सर्वच येथे उतरून घेणें बरें. भवानी देवी, राजकारण व धर्मस्थापना वगैरेंचा उल्लेख विशेष ध्यानांत ठेवण्यासारखा आहे यांत शंका नाहीं.
विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंगारिजे ॥
शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केलें सज्ज ।
अंतरीं नसतां चातुर्य बीज । कदापि शोभा न पाविजे ॥
तुंद हेंकाड कठोरवचनी । अखंड तोले साभिमानीं ।
न्याय नीति अंतःकरणीं । घेणार नाहीं ॥
तरी शीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा ।
राजकारणें संवादा । मिळोंच नेणें ॥
ऐसे लौंद बेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।
पापी अपस्मार जनीं । राक्षस जाणावे ॥
समयासारिखा समय येइना । नेम सहसा चालेना ।
नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥
अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें ।
हटनिग्रहीं न पडावें । विवेकी पुरुषे ॥
बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडेल तट ।
कोणी ऐकाचा सेवट । झाला पाहिजे ॥
बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजा भवानी ।
परंतु विचार पाहोनी । कार्य करणें ॥
अखंडचि सावधाना । बहुत काय करावी सूचना ।
परंतु कांहीं एक अनुमाना । आणिलें पाहिजे ॥
समर्थापाशीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान ।
निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥
म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचें माजलें बंड ।
याकारणें अखंड । सावधान असावें ॥
सकळकर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकार ।
तया पुरुषाचा विचार । विरळा जाणे ॥
न्याय नीति विवेक विचार । नाना प्रसंग प्रकार ।
परीक्षणें परांतर । देणें ईश्वराचें ॥
महायत्न सावधपणें । समयीं धारिष्ट धरणें ।
अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्वराचे ॥
यश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणांसि नाहीं सीमा ।
नाहीं दुसरी उपमा । देणें ईश्वराचें ॥
देव ब्राह्मण आचारविचार । कितीक जनास आधार ।
सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥
इहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणें राहणें ।
बहुतजनाचें साहाणें । देणें ईश्वराचें ॥
देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहणें ।
बहु जनांस पाळणें । देणें ईश्वराचें ॥
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
झाले आहेत पुढे होणार । देणें ईश्वराचें ॥
उत्तम गुणाचा ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक ।
धर्मस्थापना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचें ॥
सकल गुणांमध्ये सार । तजविजा विवेक विचार ।
जेणें पाविजे पैलपार | अरत्रपरत्रींचा ॥
सातव्या समासांत मनुष्याच्या लोभी, आळशी, करंट्या स्वभावाचें वर्णन असून श्रमावांचून कांहींही होणार नाही असे प्रतिपादन केले आहे.
म्हणजे मजला कांहीं देईल देव । ऐशी वासना ॥
कांहीं भक्ति केली नसतां । आणि इच्छिती प्रसन्नता ।
जैसे कांहींच सेवा न करितां । स्वामीस मागती ॥
कष्टेंविण फळ नाहीं । कष्टाविण राज्य नाहीं ।
केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥
आळसें कार्य नासतें । हें तो प्रत्ययास येतें ।
कष्टाकडे चुकविते । हीन जन ॥
आधीं कष्टाचें दुःख सोसिती । ते सुखाचें फळ भोगिती ।
आधीं आळसें सुखावती । त्यांसि पुढें दुःख ॥
आठव्या समासांत निराकार ब्रह्म व सगुण ब्रह्म यांचा भेद सांगून लोक पाषाणाचे अनेक देव शोधतात व प्रतिमेस भजतात; पण त्यांना 'मूर्खास प्रतिमा देव' हे कळत नाहीं असें म्हटले आहे.
नवव्या व दहाव्या समासांत हरिकीर्तनाचे वेळीं लोक आळस व राग लोभ इत्यादि मनोवृत्तींच्या अंमलामुळे कसे वागतात याचें हास्यकारक वर्णन करून दशक संपविण्यांत आला आहे.
एकुणीसाव्या दशकाची रचना चवदाव्या दशकासारखी आहे. चवदाव्यांत दोन समास पारमार्थिक व वेदांतमतप्रतिपादी आहेत, इतकेही या दशकांत नाहींत. यांत व्यवहारपरिप्लुत असा उपदेश फार आहे; तसेंच रामदासीपंथाच्या लोकांना उपदेश केल्याप्रमाणें येथेंहि भास होतो. चवदाव्या दशकाप्रमाणें हा दशकहि अर्वाचीन काळाच्या मनुष्याचेंसुद्धां मन वेधणारा आहे. चवदाव्याप्रमाणे या दशकांतहि राजकारणाचा दोनचारदां उल्लेख आला आहे व रामदासांनी राजकारणाचें ध्येय लोकांपुढें अनुकरणीय म्हणून ठेविलें आहे; तसेंच या दशकांत म्लेंच्छ अंमलाचा उल्लेख आला आहे व शेवटी सार्वत्रिक शिक्षणाचें ध्येय रामदासांनी उच्च स्वराने प्रतिपादन केले आहे.
पहिल्या समासांत ब्राह्मणानें आपले अक्षर उत्तम घटवावें व चांगल्या पोथ्या लिहून त्यांची जतन करावी म्हणून सांगितले आहे. दुसऱ्या समासांत अक्षराप्रमाणें मनुष्यानें उत्तम ज्ञान मिळवावें व चातुर्य संपादन करावें असा उपदेश केला आहे. तिसऱ्या व चवथ्या समासांत अनुक्रमें करंट लक्षण व सदैव (दैववान्) लक्षण सांगितले आहे. यांमध्ये पूर्वीच्या मूर्ख लक्षण व उत्तम लक्षण या समासांची बरीच झाक मारते.
पाचव्या समासांत मनुष्यें हजारों प्रकारच्या देवाच्या प्रतिमा करून त्याचें भजन पूजन करतात असे सांगितले आहे. पण खरा देव एकच आहे व तो प्रत्येकाच्या अन्तर्यामीं आहे असे म्हणून अशा प्रकारचें ज्ञान सत्संगानें लाभतें व मग तें अनुभवासही येतें व त्या योगें सद्गति मिळते असें सांगितले आहे.
पांच ते दहा या सर्व समासांत अर्धवट व्यावहारिक व अर्धवट पारमार्थिक उपदेश आहे. हा उपदेश रामदासीपंथाच्या लोकांना किंवा रामदासांकडे वारंवार येणाऱ्या संसारी व प्रापंचिक माणसांना केलेला दिसतो; कथाकीर्तन करावें; ज्ञानी आणि विवेकी व्हावें; कथाकीर्तन विषयाचें ज्ञान चांगले मिळवावें; लोकांना राजी राखावें; जशास तसें वागावें वगैरे राजकारणी व व्यावहारिक भासणारे नियम दिले आहेत. या पांचही समासां-
तील कांहीं उतारे देऊन हा दशक संपवूं.
नीच यातीनें नासला । समुदाय ॥
ब्राह्मण मंडळ्या मेळवाव्या । भक्त मंडळ्या मानाव्या ।
संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥
उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें ।
निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥
अक्षर बरें वाचणें । अर्थातर सांगणें बरें ।
गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥
दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी ।
आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥
अखंड हरिकथेचा छंद । सकळांस लागे नामवेध ।
प्रगट जयाचा प्रबोध । सूर्य जैसा ॥
दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निववूं जाणे ।
सकळांचे मनींचें जाणे । ज्याचें त्यापरी ॥
संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे ।
अखंड अभ्यासी लगटे । समुदाय ॥
जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥
अवघ्यांस अवघेंचि कळलें । तेव्हां तें रितें पडलें ।
याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥
मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें ।
कित्येक खल्लक उगवावे । राजकारणामध्यें ॥
बोलके पहिलवान् कळकटे । तयांसींच घ्यावे झटे ।
दुर्जन राजकारणें दाटे । ऐसें न करावें ॥
ग्रामण्या वर्मी सांपडावें । रगडून पीठच करावें ।
करून मागुति सांवरावें बुडवूं नये ॥
खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें ।
तेणें अवघें प्रगट झालें । बरें वाईट ॥
समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा असावा बळकट ।
मठ करून ताठा । धरूं नये ॥
दुर्जन प्राणी समजवावे । परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरी आळवावे । महत्व देउनी ॥
जनामध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटपट ।
या कारणें ते वाट । बुझवूनि टाकावी ॥
गलिमाच्या देखतां फौजा । रणशूराच्या फुरफुरती भुजा ।
ऐसा पाहिजे की राजा । कैंपक्षी परमार्थी ॥
तयास देखतां दुर्जन धाके । बैसावे प्रचीतीचे तडाखे ।
बंड पाषांडाचे वाखे । सहजचि होती ॥
हीं धूर्तपणाची कामें । राजकारण करावें नेमें ।
ढिलेपणाच्या संभ्रमे । जाऊं नये ॥
फड समजावणी करणें । गद्य पद्य सांगणें ।
परांतरासि राखणें । सर्वकाळ ॥
ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहणें विवेक ।
सावधापुढें अविवेक । येईल कैंचा ॥
जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें हळुहळू शिकवावें ।
शाहणे करून सोडावे । बहुत जन ॥
परोपरी शिकविणें । अडणुकां सांगत जाणें ।
निवळ करून सोडणें । निस्पृहासी ॥
होईल तें आपण करावे । न होतां जना करवावें ।
भगवद्भजनेंविण राहावें । हा धर्म नव्हे ॥
आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें ।
आपण धरावें धरवावें । भजन मार्गासी ॥
विसावा दशक सर्व पारमार्थिक विवेचनाचा आहे व त्यांत थोडक्यांत वेदांततत्त्वाचें सार सांगितले आहे.
पहिल्या समासांत प्राण, मन, पृथ्वी, आप, तेज, वायु आकाश इत्यादि तत्वें व परब्रह्म हीं सर्व व्यापक आहेत तर ती एक आहेत की काय असा प्रश्न करून त्याचें समाधान केले आहे. परब्रह्माखेरीज बाकीचीं तत्त्वें खरीं व्यापक नव्हेत; कारण तीं एकदेशी आहेत; परब्रह्म व पर्वत या दोहोंस अचळ म्हणतात म्हणून ते एक होणार नाहींत; तर खरें व्यापकत्व व अचळत्व परब्रह्माचे ठायींच आहे असें विवेचन केले आहे.
दुसऱ्या समासांत परब्रह्माच्या स्वरूपाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. दृश्य आणि परब्रह्म यांचा विरोध खालील ओव्यांत दाखविला आहे.
अधोर्ध्व पाहतां चहूंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे ।
मन धांवेल कोणीकडे । अंत पाहावया ॥
दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना ।
दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥
तिसऱ्या समासांत मायेपासून पृथ्वी व पृथ्वीपासून सर्व चराचर प्राणि कसे झाले याचें निरूपण करून साधूला खरें ज्ञान प्रत्ययानें होतें व प्रपंचांत काय किंवा परमार्थात काय प्रचीति वांचून बडबड व्यर्थ आहे असें म्हटले आहे.
प्रपंच अथवा परमार्थ । प्रचीतीवीण अवघे व्यर्थ ।
प्रत्ययज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥
चवथ्या समासांत प्रत्यय ज्ञानाचेंच निरूपण पुढे चालविले आहे.
सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करवेना ।
निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥
प्रत्यय राहिला एकीकडे । आपण धांवतो भलतीकडे ।
तरी मग संसाराचे निवाडे । कैसे होती ॥
उगीच पाहतां सृष्टी । गलबला दिसतो दृष्टी ।
परी राजसत्तेची गोष्टी । वेगळीच ॥
पृथ्वीमध्यें जितुकी शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें ।
नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥
त्याचा महिमा कळेल कोणाला । मातेवांचून कृपाळू झाला ।
प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षीतसे ॥
वनावरी वनचरांची सत्ता । जलावरी चलचरांची सत्ता ।
भूमंडळीं भूपाळाची सत्ता । येणेंचि न्यायें ॥
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥
पांचव्या समासांत निर्गुण परब्रह्म हा एक जिन्नस त्रिगुण व माया यांची करणी हा दुसरा जिन्नस पंचमहाभूतें हा तिसरा जिन्नस व सजीव प्राणी हा चवथा जिन्नस अशी चार जिनसी पायऱ्यांनीं सृष्टीची उभारणी झाली आहे असे सांगितले आहे; व नंतर नरदेहाची दुर्लभता व त्या देहाला होणारें विशेष ज्ञान याचें गौरव करून या देहाचें सार्थक आळस टाकून विवेकानें वागण्यांत आहे, असे प्रतिपादन केले आहे.
सहाव्या समासांत चार लक्ष माणसें तीस लक्ष पशू व अकरा लक्ष कृमि दहा लक्ष पक्षी नऊ लक्ष जलचर प्राणी आणि वीस लक्ष स्थावर मिळून चवऱ्यायशी लक्ष जीवयोनी शास्त्रकारांनी मानल्या आहेत असे सांगितले आहे व पुढे मागील समासांत ज्याप्रमाणें मनुष्य देहाचे विशेष गुण सांगितले आहेत त्याप्रमाणे येथे आत्म्याचे गुण सांगितले आहेत.
सातव्या समासांत आत्म्याच्या गुणाचें निरूपणच पुढे चालवून समासाचे शेवटीं पुन्हां अनुमानापेक्षां प्रत्ययज्ञान विशेष आहे व म्हणूनच प्रत्ययज्ञानाला जाणते पुरुष अधिक चाहतात असे म्हटले आहे.
आठव्या समासांत प्रपंचाला झाडाची उपमा देऊन त्या रूपकानें सर्व प्रपंचाचें मानवी देहाचें व सृष्टीरचनेचें वर्णन करून हा सर्व प्रपंच म्हणजे आत्म्याचे भेद आहेत असे सांगून अशा आत्म्याचें भेदरूप वर्णन करणें ही एक उपासना आहे असे प्रतिपादन केले आहे.
नवव्या समासाच्या प्रारंभ मूर्तीपूजेच्या प्राकृत जनाच्या प्रवृत्तीचा उल्लेख करून खरा देव पूजन विसर्जन करण्यासारखा नाहीं खरा देव विवेकानेंच ओळखला पाहिजे व असा देव म्हणजे निर्गुण निर्विकारी सर्वव्यापी निष्कलंक असें परब्रह्मच आहे व म्हणून परब्रह्मच मनीं दृढ धरावें असा उपदेश केला आहे.
दहाव्या समासांत परब्रह्माच्या स्वरूप वर्णनापासून प्रारंभ करून हे परब्रह्म मनांत बिंबलें म्हणजे जन्माचें व संसाराचें सार्थक झाले असे ह्मणून ग्रंथाची समाप्ति केली आहे. हा सर्व समासच येथें देणें इष्ट आहे.
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥
जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख तें ।
सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥
बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें ।
आकाश चहूंकडे पाहिलें । तरी सन्मुखाचे आहे ॥
जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशची भोवतें ।
बळें आकाशाबाहेरी तें । कैचें जावें ॥
जिकडे तिकडे प्राणी आहे । तिकडे तें सन्मुखाचि आहे ।
समस्तांचे मस्तकीं राहे । मध्यान्हींचा मार्तंड जैसा ।
परि तो आहे एक देशी । दृष्टांत न घडे वस्तूसी ।
कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिला ॥
नाना तीर्थें नाना देशीं । कष्टत जावें पहावयासी ।
तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं ॥
प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां ।
परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥
पक्षी अंतराळी गेला । भोवतें आकाशचि तयाला ।
तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥
ब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म शेवटाचा शेवट ।
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्व काळ ॥
दृश्या सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं ।
अरे त्या निर्मळाची सरी । कोणास द्यावी ॥
वेकुंठ कैलास सत्यलोकीं । इन्द्रलोकीं चौदालोकीं ।
पन्नगादि पाताळलोकीं । तेथेंही आहे ॥
काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें अपार ।
पाहों जातां पारावार । त्यासी नाहीं ॥
परब्रह्म तें एकलें । एकदांचि सकळासि व्यापिलें ।
सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं ॥
परब्रह्म पाऊसें भिजेना । अथवा चिखलानें भरना ।
पुरामध्यें परी वाहेना । पुरा समागमें ॥
एक सरें सन्मुख विन्मुख । वामसव्य दोहींकडे एक ।
अधरूर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥
आकाशाचा डोहो भरला । कदापि नाहीं उचंबळला ।
असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥
एक जिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास ।
भासेंवीण निराभास । परब्रह्म जाणावें ॥
संत साधु महानुभावां । देवदानवां मानवां ।
परब्रह्म सकळांस विसावा । विश्रांतिठाव ॥
कोणीकडे शेवटास जावें । कोणी काय पहावें ।
असंभाव्य तें नेमावें । काय म्हणोनि ॥
स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एकासारिखें नव्हे ।
ज्ञान दृष्टीविण नव्हे । समाधान ॥
पिंड ब्रह्मांड निरास । मन तें ब्रह्म निराभास ।
येथून तेथवरी आकाश । भकाश रूपें ॥
ब्रह्मव्यापक हें तो खरें । दृश्य आहे तो उत्तरें ।
व्याप्येवीण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥
ब्रह्मीं शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ।
कल्पनातीत निरंजना | विवेकें ओळखावें ॥
शुद्ध सार तें श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन ।
विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें ॥
झालें समाधानाचें फळ । संसार झाला सफळ ।
निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥
हिशेब झाला मायेचा । झाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनांचा । ठाव नाहीं ॥
स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनिर्वाच्य झालें । बोलतां नये ॥
ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेसी बाणावें ।
जन्ममृत्यूच्या नांवें । शून्याकर ॥
भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें ।
समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥
वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध ।
मननकर्त्यास विशद । परमार्थ हो तो ॥
वीस दशक दोनशें समास । साधकें पहावे सावकाश ।
विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥
ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काय प्रयोजन ।
तेथें प्रत्ययास कारण | प्रत्यया पहावा ॥
देह तव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा ।
आणि कवित्व प्रकार मनुष्याचा । कशावरूनी ॥
सकळ करणें जगदीशाचें । आणि कवित्वचि काय मनुष्याचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें । काय घ्यावें ॥
सकळ देहांचा झाडा झाला । तत्वसमुदाय उडाला ।
तेथें कोण्या पदार्थाला । आपलें म्हणावें ॥
ऐशीं ही विवेकाची कामें । उगेंचि भ्रमों नये भ्रमें ।
जगदीश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥
दासबोधरूपी कावितार्णवाच्या पार पडलों. मधून पोहत पोहत जात असतांना जेवढीं संग्राह्य रत्नें हातीं आली तेवढी वाचकांस सादर केलीं. आतां एकंदर दासबोधांतील विषयाचें व उपदेशाचें पर्यालोचन करूं. उपक्रमोपसंहारावरून एखाद्या ग्रंथाचा आशय व इत्यर्थ काढण्याची रीत आहे. दासबोधाचा उपक्रम पूर्णपणें आध्यात्मिक आहे हें पहिल्या दशकाच्या पहिल्या समासावरून स्पष्टच आहे. आतां सातव्या दशकाच्या शेवटचा उपसंहारच्या किंवा विसाव्या दशकाच्या शेवटचा समास घ्या, दोन्ही उपसंहारांवरून दासबोधाचा आध्यात्मिक आशय उघड दिसून येतो. त्याचप्रमाणे ग्रंथाच्या एकंदर विवेचनाकडे व आध्यात्मिक व व्यावहारिक उपदेशाच्या जास्त कमी प्रमाणाकडे पाहिलें तरी दासबोधाचा आशय आध्यात्मिक आहे असेंच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक विषय दासबोधांत वारंवार आलेले आहेत; त्याच त्याच विषयाची किती तरी वेळां पुनरुक्ति झालेली आहे; एक विषय निरनिराळ्या उपमांनीं निरनिराळ्या शब्दांनीं व निरनिराळ्या प्रकाराने वाचकांच्या मनांत ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून रामदासाच्या मनांत हाच आध्यात्मिक विषय सारखा घोळत होता असे म्हटल्यावांचून गत्यंतर नाहीं.
आध्यात्मिक विषय म्हणजे संस्कृतांतील वेदातांचें मराठी भाषेत निरूपण होय. जें धार्मिक जागृतीचें काम ज्ञानेश्वरापासून महाराष्ट्र साधुसंतांनी केलें व ज्यामुळे मराठी भाषेंत सामान्य जनांस समजे असें आध्यात्मिक वाङ्मय तयार झालें तेंच काम रामदासांनीं आपल्या दासबोधानें पुढे चालविले यांत शंका नाहीं. रामदासांनी या वेदांताचें एक तत्वपंचकच आपल्या दासबोधांत बनविलें असे म्हटले तरी चालेल. जग हें मिथ्या आहे. त्यांत सत्य किंवा सार मुळींच नाहीं; हे जग म्हणजे मायेनें उत्पन्न केलेला आभास आहे; अर्थात् जगांतील कोणत्याही गोष्टीच्या पाठीस लागणें; त्याची इच्छा करणें; ती मिळविण्याचा प्रयत्न करणें या गोष्टी मृगजळाच्या शोधार्थ धावण्यासारखा वृथा आहेत हें रामदासी वेदांताचें पहिलें तत्व होय. मानवी आयुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत क्लेशमय आहे; हा संसार दुःखमय आहे; मनुष्याला तापत्रयापासून नेहमीं पीडा होते; हें रामदासी वेदांताचें दुसरें तत्व होय. या जगांत एकच शाश्वत नित्य सत्य अविनाशी व अनंत अशी जिनस आहे व ती परब्रह्म किंवा परमात्मा होय. या परब्रह्माच्या मायेच्या योगानेंच सृष्टि उदयास येते व विलयास जाते. अर्थात् ही सर्व सृष्टी विनाशी व अनित्य आहे; परब्रह्म मात्र अक्षय व टिकाऊ आहे व म्हणून तेंच खरें साध्य आहे; हें रामदासी वेदांताचें तिसरें तत्व होय.
मनुष्याचा आत्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे. देहामुळे प्रत्येक जीवात्मा निराळा भासतो, पण सर्व भूतांचेठायीं अन्तरात्मा एक आहे व तो परमात्माच होय. जीवात्मे निरनिराळे वास्तवीकपणें नाहींत; परमात्मा व जीवात्मा हे एकच आहेत; हें रामदासी वेदांताचें चवथें तत्व होय.
परमात्म्याची प्राप्ती करून घेणें, आपल्याला मोक्ष मिळविणे म्हणजे परमात्म्याचें व जीवात्म्याचें ऐक्य किंवा अद्वैत जाणणें होय. ज्याच्या हें ऐक्य अनुभवास आलें त्याला मुक्ति मिळालीच; हें ऐक्यभावाचें ज्ञान मिळविण्यास नवविधा भक्ति व विशेषतः गुरुभक्ति व गुरुसेवा पाहिजे हेच रामदासी वेदांताचें शेवटलें तत्व होय.
सारांश, दासबोधांत महाराष्ट्र साधुसंतांनी महाराष्ट्र भाषेत वारंवार प्रतिपादन केलेला वेदांत; त्यांनी पुष्कळदां प्रतिपादन केलेली ज्ञान व भक्ति यांची जोड व संगति यांचेंच विवरण आहे व म्हणूनच रामदास व इतर मराठी साधुसंत मंडळी यांमध्यें आध्यात्मिक बाबतीत म्हणण्यासारखा फरक नाहीं, मराठी साधुसंतांचीच परंपरा त्यांनी चालविली; व ती परंपरा पूर्वीच्या साधुसंतांप्रमाणे हरिकथा कीर्तनाचे व कवनाचेद्वारेंच चालविली. मात्र पूर्वीचे बरेच साधु पंढरीचे वारकरी होते व पांडुरंगभक्ति त्यानीं उपदेशिली होती. रामदासांनी मात्र नवा पंथ काढण्याचा प्रयत्न केला व तो पारहि पाडला. म्हणजे रामभक्ति त्यांनीं नवी उत्पन्न केली असें नाहीं. रामदासांनींच दासबोधांत म्हटल्याप्रमाणें राम हें रामदासांच्या कुळाचें कुळदैवत होतें; त्यांचे पूर्वज मोठे रामभक्त होते व ही पिढीजात रामभक्ति रामदासांत उतरली व म्हणूनच त्यांनीं 'रामदास' हें नांव धारण केले व रामायणातील रामाचा अत्यंत विश्वासु सेवक जो मारुती- रामदासांना पुढे पुढें लोक व त्यांचे शिष्य मारुतीचाच अवतार मानूं लागले- त्यांच्या देवालयाची जागोजाग स्थापना केली. ही एक नवी भक्ति उत्पन्न करण्याचा प्रयत्न; एक नवा पंथ काढण्याचा प्रयत्न व लोकांना पंढरीच्या वारकरी पंथापासून परावृत्त करून रामभक्त व मारुतिभक्त करण्याचा प्रयत्न हा रामदासांच्या भक्तिमार्गाचा विशेष होता असें दिसतें. पंढरीच्या वारकरीपंथाचे प्रवर्तक निरनिराळ्या जातीचे साधु होते व त्यांच्यामध्यें जातिभेद- निदान देवापुढे तरी- न मानण्याचा सांप्रदाय
होता व जातिभेदावर ते आपल्या कवनांत सारखे कोरडे मारीत असत. रामदासाला आपल्या ब्राह्मण्यत्वाचा मोठा अभिमान होता व त्यांच्या हीन स्थितीबद्दल वाईट वाटत असे ही गोष्ट चवदाव्या दशकाच्या आठव्या समासाच्या शेवटच्या त्यांच्या कळवळ्याचे उद्गारांवरून दिसून येते; व जातिभेदाबद्दल दासबोधांत फारच क्वचित् उल्लेख आहेत व जे आहेत ते ह्या भेदाचे समर्थनपरच आहेत असे वाटतें. यावरून रामदासानीं रामदासी पंथ काढला तो ब्राह्मण मंडळींना वारकरी पंथापासून परावृत्त करण्याकरितां काढला की काय अशी केव्हां केव्हां शंका येते. पण त्याबद्दल दासबोधावरून कांहींच ठरवितां येत नाहीं. आध्यात्मिक दृष्टीने विचार करितां या रामभक्ति भेदाखेरीज दुसऱ्या बाबतींत पूर्वीचे साधुसंत व रामदास यांचेमध्यें फरक नाहीं असे म्हणणें प्राप्त आहे.
पण ही गोष्ट दासबोधाच्या पहिल्या सात दशकांनाच लागू आहे; पुढल्या दशकांत व्यावहारिक व वेदांत मताशी कांहींसा विरोधी असा उपदेश आहे हें खरें आहे. तेव्हां त्या उपदेशाच्या स्वरूपाकडे आपण आतां वळू.
हल्लींचा वीस दशकी दासबोध हा रामदासांनीं प्रथमतः एकदम मनांत कल्पिलेल्या संकल्पाचें दृश्य स्वरूप नाहीं; तर पाहले सात दशक एकदम एका कल्पनेनें एकसूत्री धोरणाने लिहिलेले आहेत; प्रथमतः येवढाच दासबोध रामदासांनी लिहिला असावा; नंतर कांहीं कालानें आठवा दशक स्वतंत्र ज्ञानदशक म्हणून लिहिला असावा व पुढले पुढले दशक प्रसंगानुसार रचले गेले असावे व मग ते मूळच्या दासबोधाला जोडले गेले असावे व म्हणूनच सातांनतरच्या दशकांत कितीतरी विचारांची व उपदेशांची द्विरुक्ति झालेली आहे; पहिल्या सातांप्रमाणे या दशकांत एकसूत्री संगत विचारसरणी दिसून येत नाहीं. या वरून हल्ली उपलब्ध असलेला दासबोध रामदासांनीं निरनिराळ्या मनःस्थितींत लिहिला असावा असे दिसतें. अर्वाचीन काळचें रामदासीपंथाचें सर्व वाङ्मय प्रसिद्ध करणारे सत्कार्योत्तेजकसभेचे उत्साही प्रवर्तक रा. देव यानींही आपल्या दासबोधाच्या प्रस्तावनेंत ही कल्पना काढून त्याला आपल्या पुराव्यासकट पाठिंबा दिला आहे. तेव्हां याबद्दल अधिक विवेचन न करतां मागें सांगितल्याप्रमाणे या मागाहून लिहिलेल्या दासबोधातील उपदेशाच्या विशेष स्वरूपाचें निरीक्षण करूं.
हें विशेष स्वरूप म्हणजे उपदेशाचा व्यावहारिकपणा हे होय. हा व्यावहारिकपणा आणण्याकरितां रामदासांना आपल्या आध्यात्मिक पंचतत्वांपैकी दोन तत्वें टाकावीं लागली आहेत. ती तत्वें म्हणजे संसाराचें असारत्व व मानवी जीविताचें क्लेशमयत्व; हीं दोन्हीं तत्वें पुढल्या दासबोधांत फारच क्वचित् दृष्टीस पडतात. उलट आतां रामदास मानवी जीविताची थोरवी गाऊं लागतात; तसेच आयुष्यांतील दुःखपीडा इत्यादींची बभक चित्रेही ते पुढल्या भागांत काढीत नाहींत; तर मनुष्यानें प्रथमतः संसार नीटनेटका करावा, प्रपंच साधल्याशिवाय परमार्थाला लागणें व्यर्थ आहे, या जगांतील आपली कर्तव्यकर्में नीतिन्यायानें करणें हेंच परमार्थाचें खरें साधन आहे; मनुष्यानें दैवावर हवाला ठेवून बसतां कामा नये; तर आळस टाकून प्रयत्नाची कास धरावी तरच प्रपंच व संसार नेटका होऊन परलोकींही सद्गति मिळेल. सारांश नेहमींचा निवृत्तिपर वेदांत न शिकवितां रामदासांनी पुढल्या दासबोधांत प्रवृत्तिपर वेदांत शिकविला आहे. हाच त्यांच्या दुसऱ्या भागांतील उपदेशाचा एक विशेष आहे. यामुळेच त्याकाळाला अनुरूप अशा एकीचा सहकार्याचा, लोकसेवेचा समुदायकार्याचा स्वार्थत्यागाचा लोकसंग्रहाचा उपदेश दासबोधांत वारंवार केलेला दिसतो व हाच उपदेश हल्लीच्या काळीही आपल्या देशाला पाहिजे असल्यामुळे रामदासांची असली किती वचनें तरी अर्वाचीन लेखांतून दृष्टीस पडतात. रामदासांच्या काळी शिवाजी महाराजांचा स्वराज्यस्थापनेचा उद्योग चालू होता. अर्थात् रामदासांच्या व्यावहारिक उपदेशाचा कल राजकीय बाबतींकडे वळला यांत नवल नाहीं व म्हणूनच दासबोधांत राजकारण हें एक आयुष्याचें ध्येय आहे असे सांगितलेले आहे. पुढे पुढे रामदासांनीं आपला दासपंथ काढला व त्यांचा शिष्यसांप्रदाय फार वाढला; त्यानीं जागोजाग दासपंथाचे मठ स्थापन केले. यामुळे मागें उल्लेख केलेला व त्या त्या ठिकाणी उद्धत केलेला व्यावहारिक उपदेश हा दासपंथी लोकांना व त्यांच्या मठ पतींना केलेला दिसतो व त्यातही राजधोरणी व राजकारणी असा उपदेश बराच आहे. या उपदेशावरून रामदासांचे शिष्य म्हणजे सर्व शिवाजीचे हेर होते; शिवाजी व रामदास यांचा राजकीय हेतु स्वराज्यस्थापनेचा होता इतकेच नव्हे तर शिवाजीला राजकीय ध्येयाची स्फूर्ती रामदासांनी करून दिली व म्हणून रामदास म्हणजे एक राजकीय साधु होते; ते धार्मिक साधु नव्हते; वगैरे कल्पना निघालेल्या दिसतात. पण थोड्याशा समासांतील थोड्याशा वाक्यांवरून इतके व्यापक सिद्धांत काढणें बरोबर आहे किंवा नाहीं हा मोठा प्रश्न आहे.
दासबोधांतील उपदेशाच्या येथपर्यंतच्या सिंहावलोकनावरून इतकी गोष्ट स्पष्ट दिसून येईल कीं, दासबोध या ग्रंथांत एकमुखी आध्यात्मिक उपदेश नाहीं. तर त्यांत उपदेशभेद आहे; पहिला उपदेश आध्यात्मिक
व निवृत्तिपर आहे तर दुसरा उपदेश व्यावहारिक व प्रवृत्तिपर आहे. आतां असा उपदेश भेद होण्याचें कारण काय याचा जर आपण विचार करूं लागलों तर असे दिसतें कीं, रामदासांनी दासबोध निरनिराळ्या मनःस्थितींत लिहिलेला आहे. पहिला भाग त्यांच्या आयुष्यांतील एका परिस्थितीनुरूप लिहिलेला आहे; व दुसरा भाग महाराष्ट्रांत कायमचे राहू लागल्यानंतर त्यांच्या पहाण्यांत आलेल्या लोकस्थितीनुरूप लिहिलेला आहे असे वाटतें. अर्थात् या उपदेशभेदाची उपपत्ति रामदासांच्या आयुष्यक्रमावरून लागणारी आहे. तेव्हां हा आयुष्यक्रम समजण्याकरितां रामदासांचें चरित्र येथें देणें अवश्य आहे.
पण हें चरित्रकथनाचें काम फार कठीण झाले आहे. रामदासांच्या चरित्र कथानाला लागणाऱ्या माहितीच्या अभावी हें काम कठीण झाले आहे असें मात्र नाहीं. सत्कार्यात्तेजक सभेनें रामदासी पंथाबद्दलचे कागदपत्र छापून काढले आहेत व आणखी आणखी कागदपत्र छापले जात आहेत. पण हे सर्व कागदपत्र रामदांसाच्या शिष्यांनीं श्रद्धाबुद्धीनें लिहिलेले आहेत; त्यांत ऐतिहासिक व विचिकत्सक बुद्धि कमी आहे. शिवाय रामदासांच्या चरित्राची साग्र बखर म्हणून जें पुस्तक आहे व अलीकडे लिहिलेलीं रामदासांचीं चरित्रें या बखरीवरून प्रायः लिहिलेली आहेत- तेंच मुळीं रामदासांच्या ज्येष्ठ बंधूच्या वंशांतील हनुमानस्वामी यानी रामदासांच्या मरणानंतर सवाशे वर्षांनी लिहिलेले आहे. या बखरींत रामदासांसंबंधी दैवी चमत्कार असमंजस गोष्टी व भाकडकथा इतक्या आहेत कीं 'उडदामाजी काळें गोरें काय निवडावें निवडणारें' असें प्रथमतः वाटतें. ही बखर मी दोनतीनदां वाचली. या बखरीचे तीन उद्देश अगदी स्पष्ट दिसून येतात. पहिला रामदास हे अवतारी पुरुष आहेत व ते मारुतीचा अवतार आहेत हें मनावर ठसविणें हा होय. हे दाखविण्याकरितां लेखकाच्या समजुतीप्रमाणें जितक्या गोष्टी घालतां आल्या तितक्या घातल्या आहेत; रामदासांचें वानरासारख्या या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणें; आपल्या खोलींत जेवतांना गुप्तपणें वानरें बरोबर घेणें; मारुतीबरोबर लंकेंत बिभीषणास जाऊन भेटणें; केव्हां केव्हां मारुतीचें रूप घेणें. पण या गोष्टी विचिकत्सक बुद्धीस पटत नाहींत व त्या भाकडकथांपैकी आहेत असे म्हणणें प्राप्त होतें. या बखरीचा दुसरा उद्देश रामदास व शिवाजी यांचा निकट गुरुशिष्यसंबंध होता व रामदासांचा अवतार शिवाजीला त्याच्या राज्यस्थापनेंत मदत करण्याचा होता हे दाखविणें हा होय. उ०- या बखरींत शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीचे तीसबत्तीस तरी प्रसंग वर्णिलेले आहेत; शिवाय शिवाजी प्रत्येक गुरुवारी रामदासांस भेटावयास जात असत व त्यांची प्रत्येक बाबतींत सल्लामसलत घेत असत असें प्रतिपादन केले आहे. या बखरीचा तिसरा उद्देश म्हणजे रामदास हे इतर तत्कालीन व पूर्वकालीन साधूंपेक्षां श्रेष्ठ होते हे प्रतिपादन करणें हा होय. हे दाखविण्याकरितां बहुतेक सर्व साधूंच्या रामदासांशीं भेटी झाल्या व त्या सर्वांनी रामदासांना जास्त मान दिला असे सांगितले आहे.
वरील विवेचनावरून ही रामदासांची बखर निरनिराळ्या व्रतांचें महात्म्य सांगणारी किंवा निरनिराळ्या देवांचें महात्म्य सांगणारी पुराणें आहेत त्या तऱ्हेचा ग्रंथ आहे असे दिसते. अर्थात् आपल्या आराध्यदैवताच्या महतीकरितां घातलेला यांत अतिशयोक्तीचा व असत्योक्तीचा भाग फार आहे. पण ज्याप्रमाणें पुराणांतून सुद्धां ऐतिहासिक दृष्टीनें भूतार्थ कोणता व कल्पितार्थ कोणता हें निवडून काढणे शक्य आहे त्याचप्रमाणें या बखरींतूनही भूतार्थाची व कल्पितार्थाची निवडानिवड करणे शक्य आहे.
रामदासांनी आपल्या आयुष्यक्रमांत ज्या अलौकिक गोष्टी केल्या- त्यांचें आद्वतीय ब्रह्मचर्य, त्यांची ओजस्वी कविता, त्यांची खडतर तपश्चर्या व तीर्थाटन, मोठ्या प्रमाणावर त्यांची मठस्थापना— त्या योगें त्यांना साधु व अवतारी पुरुष मानण्यांत येऊं लागलें व साधूंना ऋद्धिसिद्धि साध्य असतात; अवतारी पुरुषांना असंभवनीय व अशक्य गोष्टीहि करतां येतात अशी सामान्य जनांत समजूत असल्यामुळे रामदासांना साधुत्व व अवतारीपणा मिळाल्यावर असल्या दैवीचमत्कारांच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यक्रमासंबंधीं श्रद्धेनें प्रचालित झाल्या किंवा शिष्यांनी गुरूची महती व थोरवी वाढविण्याकरितां मुद्दाम प्रसृत केल्या. हीच रामदासांच्या बखरींतींत भाकडकथांची उपपत्ति आहे असें या लेखकास वाटतें. कारण असल्या दंतकथा व भाकडकथा महाराष्ट्रांतील दुसऱ्याहि साधूंच्या बाबतीत प्रचलित आहेत. मात्र त्या रामदासांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाहींत इतकेंच!
तेव्हां अगदींच अशक्य व असंमजस असा बखरींतील कथाभाग सोडून भूतार्थ व संभाव्य भासणाऱ्या व दासपंथी सांप्रदायांत परंपरागत आलेल्या कथाभागासकट रामदासांचें चरित्र प्रथमतः संक्षेपतः देतों. मग या परंपरागत चरित्रांतील कथांचें ऐतिहासिक पुराव्यानें कितपत समर्थन होतें ते पाहूं.
रामदासांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे एक प्रतिष्ठित संभावीत व सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना बारा गांवच्या कुळकर्णीपणाचें वतन होतें. ते औरंगाबाद जिल्ह्यांतील आंबेड पेट्यांतील जांब या गांवीं रहात असत. हें गांव गोदावरीच्या उत्तर तीराला आहे. सूर्याजीपंताच्या बायकोचें नांव राणूबाई असें होतें. या दांपत्याला बऱ्याच काळपर्यंत संतान नव्हतें. पण नवससायास करून त्यांना उतारवयांत गंगाधर व नारायण (हेंच रामदासाचें मूळचें नांव) नांवाचे दोन पुत्र झाले. गंगाधराचा जन्म सन १६०५ मध्ये झाला; व नारायणाचा जन्म सन १६०८ मध्ये झाला. दोन्ही मुलांची मुंज त्यांच्या पांचव्या वर्षी झाली. गंगाधराचें लग्न वयाच्या सातव्या वर्षी झाले व तो जांब गांवींच आपला संसार करून राहिला. तो रामभक्त होता व पुढे त्याचें श्रेष्ठ असें नांव पडलें. सन १६१५ मध्यें म्हणजे नारायणाचें वय सात वर्षांचें असतांना सूर्याजीपंत वारले. यामुळे नारायणाचें लग्न लांबले असावें. नंतर थोडे दिवसांनीं नारायणाच्या आईनें त्याच्या लग्नाचा विचार ठरविला. पण नारायणाला तो पसंत नव्हता. तो रुसून एका झाडावर गेला व तेथून त्यानें ओढ्यांत उडी टाकली; त्यामुळे खालच्या खडकाला लागून नारायणाच्या कपाळावर टेंगूळ आले; तें मग मरेपर्यंत तसेच राहिले; त्यालाच आवाळू ह्मणत.
नारायण घर सोडून निघाला तो गोदावरीचें उगमस्थान व रामाच्या वनवासांतील निवासस्थान जे नाशिक-पंचवटी तेथे आला व नाशकाजवळ असलेल्या टाकळी गांवच्या गुहेत राहू लागला. तो ब्रह्मचारीच होता. तेव्हां त्या आश्रमाला अनुरूप अशी भिक्षावृत्ति ठेवून तो तपश्चर्या व पुरश्चरण करूं लागला. रामदासांच्या (आतां यापुढे त्यांचा रामदास या नावानें निर्देश करणे योग्य आहे) आध्यात्मिक ज्ञानाचा; त्यांच्या काव्य शक्तीचा व एकंदर भावी साधूपणाचा पाया येथें घातला गेला असला पाहिजे. पण या संबंधाची माहिती बखरींत मुळींच नाहीं. उलट एका सतीचा मृत पति जीवंत केल्याचा दैवी चमत्कार मात्र सविस्तर सांगितला आहे. पण येथें रामदासांनी बारा वर्षे वास करून अध्यात्म ज्ञान मिळविलें असें दिसतें. नंतर तें तीर्थाटनास निघाले व या तीर्थाटनांतही त्यांनी बारा वर्षे घालविलीं. या प्रवासांत त्यांना खरोखरीच पुष्कळ व्यावहारिक ज्ञान व अनुभव मिळाला असला पाहिजे; त्याचप्रमाणें निरनिराळ्या ठिकाणचें साधूसंत भेटून त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानांत भर पडली असली पाहिजे. विद्याभ्यासाच्या काळाप्रमाणे याहि त्यांच्या आयुष्यांतील काळाची विश्वसनीय माहिती मिळाली असती तर ती किती तरी मनोरंजक झाली असती. पण या बखरींत तसली माहिती मुळींच नाहीं. रामदासांची महती व अवतारीपणा दाखविणाऱ्या असंभवनीय गोष्टी मात्र सांगितल्या आहेत. त्यांतल्या एक दोन मासल्याकरितां देतों.
रामदास उत्तरेकडच्या प्रवासांत काश्मीरास गेले होते. तेथे त्यांना नानक पंथाचा उत्पादक गुरुनानक भेटला (गुरुनानकाचा काळ सन १४६९ असा इतिहासांत दिला आहे) व त्याच्या आध्यात्मिक प्रश्नांना रामदासांनीं सयुक्तिक व अनुभवसिद्ध अशी उत्तरें देऊन त्याचें समाधान केलें. तेव्हां त्यानें रामदासांपाशीं अनुग्रह मागितला व रामदासांनीं तुम्हांस पूर्वीच अनुग्रह झालेला आहे नवा नको; पण वाटल्यास रामचंद्राची पूजा करीत जा, असें हाटलें. त्याप्रमाणें गुरुनानकानें कबूल केलें!
रामदास दक्षिणेकडच्या तीर्थयात्रेस जात असतां प्रत्यक्ष मारुती त्यांचे सोबतीस होता. रामदास व मारुती हे दोघेजण लंकेस गेले. तेथे त्यांना बिभीषण (रावणाचा भाऊ) भेटला. बिभीषणानें रामदासांचा फार सत्कार केला. व त्यानें मारुतीस प्रार्थना केली, "पूर्वी ज्ञानेश्वर असतांना नामदेव येथे येऊन कीर्तन श्रवण करवीत होते त्या दिवसापासून आजपर्यत कीर्तन श्रवण झाले नाही. यास्तव रामदास यांचे कीर्तन श्रवण करवावें" तेव्हां मारुतीच्या आज्ञेप्रमाणे रामदासांनी कीर्तन केलें व लंकेंत असेपर्यंत ते रोज कीर्तन करीत असत!
रामदासांनी बारा वर्षे तीर्थाटन केलें; मग ते सन १६४४ मध्ये आपल्या आईला व भावाला भेटण्यास जांब गावी आले. या वेळी आपला विद्याभ्यास व तीर्थाटन पुरे करून रामदास आपल्या पुढल्या आयुष्यांतील कामाला लागण्यास तयार झाले होते. व या काळींच एकादा भक्तिपंथ काढून त्या द्वारें लोकशिक्षणाचें काम करावें असा त्यांनीं निश्चय केला असावा व योग्य ठिकाण ठरविण्यांत त्यांचा कांहीं काल गेला असावा. कारण ते जांबांत कांहीं दिवस राहून पुनः घराबाहेर पडले व कृष्णेचें उगम स्थान जें महाबळेश्वर तेथें आले व कांहीं दिवस तेथे राहिले असें दिसते. नंतर कांहीं दिवस साताऱ्याजवळील माहुलीस व केव्हां केव्हां जऱ्हांड्याच्या डोंगरावर राहूं लागले. पुढे त्यांनीं चाफळ हें गांव पसंत करून तेथें रामाचें देऊळ बांधून रामोत्सव सुरू करण्याचा निश्चय केला असे दिसतें व तदनुरूप त्यांनीं चाफळास सन १६४८ मध्यें राममंदिर बांधून उत्साह सुरू केला व त्यामुळे त्यांच्या भोंवतीं शिष्यसमुदाय जमूं लागला. तेव्हां रामदासांनीं दासपंथ काढून शिष्यसांप्रदायाला प्रारंभ केला.
याच सुमारास कऱ्हाडच्या देशपांड्याची बाळविधवा कन्या अकाबाई, तसेंच मिरजेच्या देशपांड्याची बाळविधवा कन्या वेणूबाई या रामदासांच्या शिष्यिणी झाल्या व लवकरच कोल्हापुरास अंबाजी नांवाचा एक फार हुशार मुलगा रामदासांनी पाहिला व त्याला आपला शिष्य केला व तो पुढें कल्याण स्वामी म्हणून रामदासांचा पट्टशिष्य झाला.
याप्रमाणें रामदासांच्या पंथाचा व त्यांच्या शिष्यसांप्रदायाचा प्रसार होऊन रामदासांची कीर्ति शिवाजीच्या कानावर गेली व त्याला रामदासांच्या भेटीचा निजध्यास लागला. व शेवटी शिवाजीची व रामदासांची भेट चाफळ जवळील शिंगणवाडीच्या बागेत झाली व तेथें रामदासांनीं शिवाजीला गुरुमंत्र देऊन त्यावर अनुग्रह सन १६४९ मध्ये केला वगैरे या प्रसंगाचें सविस्तर वर्णन रामदासांच्या बखरींत दिले आहे. या बखरीचा या पुढचा भाग शिवाजीच्या व रामदासांच्या भेटींच्या प्रसंगाच्या वर्णनांनीं व शिवाजीस आपले सामर्थ्य दाखविण्याकरितां रामदासांनी केलेल्या दैवी चमत्कारांच्या वर्णनांनी भरलेला आहे. असे तीस बत्तीस प्रसंग या बखरींत दिलेले आहेत; शिवाय शिवाजीचा दर गुरुवारी रामदास स्वामी असतील तेथे जाऊन त्यांचें दर्शन घेऊन त्यांची राजकीय कामांत सल्ला मसलत घेण्याचा नेम असे असेंहि बखरींत सांगितले आहे. पण या नेमामुळे जागच्याजागीं व तातडीनें करावयाच्या कामांत अडचणी येऊं लागल्या असें जाणून रामदासांनीं अशा एका प्रसंगीं एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हटलें, "शिवबा, तूं हा राज्यकारभार करितोस यांत कोण समय कसा प्रसंग येईल यांचा नेम नाहीं. आम्ही तर सतत तुम्हांपाशीं नाहीं आणि तुमचा नेम तर असा आहे तो चालणार नाहीं. या करितां जसा प्रसंग येईल तशी मसलत करून काम करीत असावें." अशी समर्थांची आज्ञा होतांच साष्टांग प्रणिपात करून हस्त जोडून आनंदाश्रुयुक्त व अष्टभावेंकरून पूर्ण होत्साते परम नम्रतेनें शिवाजीमहाराज बोलले कीं, "हा प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती, आज्ञेवांचून पाऊलहि पुढे पडावयाचें नाहीं." अशी विनंति करतांच समर्थांनी हास्यवदन करून राजास पोटाशी धरून भाषण केलें कीं, "शिवाजी! तूं धन्य आहेस. या कलिकालीं तूं केवळ जनकराजाच आहेस. असो आतां आम्ही सांगतों याप्रमाणें वर्तावें. परमार्थदृष्टीनें पाहिले असतां आम्हीं सतत तुझांपाशीं नाहीं असा अर्थ नाहीं. परंतु लौकिकदृष्टीने पाहिले असतां जवळ नाहीं हाही भाव खरा. यास्तव जें समय कार्य प्राप्त होईल ते समयी श्रीदेवीस विनंति करून आज्ञा होईल त्याप्रमाणे करीत जावें." हे ऐकून शिवाजी म्हणाला, “स्वामीमहाराज! देवी तर प्रत्यक्ष नाहीं. तेव्हां विनंति कोठें करावी आणि ही आज्ञा होईल कशी येविषयीं आज्ञा करावी." असे म्हणतांच समर्थ बोलले, "हे राजा! शुचिर्भूत होऊन तूं व आप्त वर्गापैकी चांगला लिहिणारा एक व प्रश्न करणारा एक असे त्रिवर्गानीं एकांती बसून ज्या कार्याचा उद्देश असेल तो प्रश्न प्रश्न करणानें करावा म्हणजे तुमचे अंगीं देवी संचारून तुमच्या मुखेकरून बोलेल. त्याप्रमाणें लिहिणारानें लिहावें, नंतर त्या लेखाचें तुम्ही अवलोकन करून त्यांत जशी आज्ञा झाली असेल त्याप्रमाणें करीत जावें."
ही गोष्ट काय किंवा बखरींत वर्णिलेल्या दुसऱ्या गोष्टी काय एकाच मासल्याच्या आहेत. शिवाजी आला असतां व त्याला तहान लागली असतां त्याच्याकरितां कुबडीच्या आघातानें जमीनींत झरा उत्पन्न करून कुबडीतीर्थ निर्माण कर; दुसऱ्या खेपेस शिवाजीच्या दोन हजार सैन्यासकट त्याला डोंगरांत दगडा आड असलेल्या प्रचंड गुहेत पंचपक्कानांचें भोजन घालं; तिसऱ्यांदा शिवाजी भेटण्यास आला असतां त्याच्याशीं स्वस्थपणें बोलण्याकरितां आपल्या अंगांतील शीतज्वर आपल्या शेजारी असलेल्या छाटीत ठेवून ती छाटी हालत ठेव; असल्या तऱ्हेच्या दैवीचमत्कारांच्या या सर्व गोष्टी आहेत. शिवाजी व रामदास यांच्या संबंधाच्या आणखी दोन तीन दंतकथा येथे देणें आवश्यक आहे.
रामदासाकडे चाफळास दूर जाण्याचा वारंवार त्रास होऊं नये म्हणून शिवाजीनें सन १६५० मध्ये रामदासांस परळीच्या किल्ल्यावर राहण्यास येण्यास विनंति केली व तदनुरूप अका, वेणू, व आणखी एक दोघे शिष्य यांसह रामदास परळीच्या किल्ल्यावर राहण्यास आले; बाकीचे शिष्य चाफळास राहिले; याचवेळी शिवाजीनें चाफळाच्या मठास व परळीच्या मठास कित्येक गावें इनाम करून दिली.
शिवाजी प्रत्येक वेळी रामदासांस भेटण्यास गेला म्हणजे स्वामींची सेवा कोणत्या तऱ्हेने करूं असें विचारीत असे. एका वेळी शिवाजीचें राज्य जिकडे नाहीं तिकडील गांवांची नावें घेऊन सनद करून द्यावी म्हणून रामदासानी आज्ञा केली. तेव्हां शिवाजीनें विनंति केली कीं 'महाराज, तिकडे राज्य आपलें नाहीं; सबब तिकडील सनदा पत्रे कशी करून देऊं.' तेव्हां समर्थ बोलले की तुला या विचाराचें कारण काय. आम्ही सांगितल्याप्रमाणें सनदा पत्रे करून देणें. असें म्हटल्यावरून शिवाजीनें सनदा पत्र लिहून ठेवलीं. तीं पत्रें समर्थानीं घेऊन शिष्यांचे स्वाधीन करून त्या त्या गांवांस जावें, म्हणून आज्ञा केली, त्याप्रमाणें तेथें तेथे जाऊन शिष्य राहिले. ज्या ज्या गांवीं शिष्य जाऊन राहिले, त्या त्या गांवांपर्यंत शिवाजीमहाराजांचें राज्य होऊन त्यानें त्या त्या संस्थानाचा बंदोबस्त करून दिला.
या गोष्टीचा मतलब इतकाच कीं रामदास अवतारी पुरुष. त्यांच्या इच्छेप्रमाणें आपोआप गोष्टी घडून येत असत. पण हें जर खरें तर सर्वच राज्य शिवाजीला रामदासांनीं एकदमच कां दिलें नाहीं. शिवाजीला खटपट करण्याचा त्रास कशास ठेवला. एका प्रसंगी शिवाजी रामदासांस भेटण्यास आला असतां रामदासांनी म्हटले, 'हल्लीं यवनी राज्य नसतां जोहार म्हणण्याचा पाठ आहे. हा ठीक नाहीं, तर इतःपर सर्वत्रांनीं एकमेकांस रामराम म्हणत जावें.' तेव्हांपासून शिवाजीनें आपल्या सर्व राज्यांत ही रामरामाची पद्धति सुरू केली.
एकदां शिवाजी सातारच्या किल्ल्यावर असतांना रामदासस्वामी माहुलीहून सातारच्या माचीस भिक्षा मागावयास आले होते. शिवाजी किल्ल्यावरून खालीं राजवाड्यांत येतात तोंच रामदासस्वामीही राजवाड्यांत येऊन भिक्षा मागूं लागले. हे ऐकून शिवाजीनें स्वामींस नमस्कार करून बाळाजी आवजी चिटणीस यांचें हस्तें चिठ्ठी लिहून तिचेवर आपले हातची धाकटी मुद्रा करून ती चिठ्ठी स्वामींच्या झोळींत टाकली. वाचून पहातां राज्याची भिक्षा शिवाजीनें स्वामींस अर्पण केली आहे असे कळलें. तेव्हां स्वामींनी शिवाजीस 'पुढे काय करणार' असा प्रश्न विचारला व त्यानें स्वामीसेवा करणार असें उत्तर दिलें. तेव्हां रामदास स्वामींनी आपली झोळी शिवाजीच्या खांद्यावर टाकली व पुढे आपण व मागें शिवाजी असे भिक्षेस निघाले व दोन प्रहरपर्यंत घरोघर भिक्षा मागून वेण्येचे कांठीं जाऊन तेथे शिष्यांकडून पानगे करवून ते सर्वत्रांनी खाल्ले. व मग स्वामीनीं शिवाजीस आज्ञा केली की, 'जरी तूं मला राज्य अर्पण केले आहेस तरी माझे राज्य तूं चालव' असें म्हणून स्वामी सकाळी झोळींत घातलेली राज्यदानाची चिठ्ठी परत करूं लागले. परंतु शिवाजी ती चिठ्ठी परत घेईना. तेव्हां रामदासांनी ती चिठ्ठी दिवाकर गोसावी याजपाशीं दिली व शिवाजीच्या विनंतिवरून आपल्या पादुका शिवाजीस दिल्या व मग शिवाजीनें राज्य चालविण्याचे कबूल करून त्याप्रमाणें तो वागूं लागला.
येथपर्यंत शिवाजी व रामदास यांच्या भेटीच्या प्रसंगांपैकीं मुख्य प्रसंगांचे वर्णन केलें. आणखी एकच दंतकथा सांगून हा बखरींतील दंतकथा भाग आटपूं. ही दंतकथा बखरकारांच्या हेतूंपैकी दोन हेतु– रामदासांचें सर्वतोपरी श्रेष्ठत्व व त्यांचा हनुमानावतारीपणा- सिद्ध करण्याकरितां लिहिलेली आहे. शिवाय ज्याला इंग्रजी तर्कशास्त्रांत 'दंडुकेशाईचें प्रमाण' म्हणतात त्याचेंहि ही दंतकथा एक मजेदार उदाहरण आहे असे दिसून येईल.
मराठीतील प्रसिद्ध कवि वामन पंडित यानें काशीस बारा वर्षे अध्ययन करून उत्तम शास्त्रज्ञान संपादन केलें; व गुरूचाहि शास्त्रज्ञानांत पराभव केला. नंतर तो आपल्या स्त्रीसह आपल्या गांवीं येण्यास निघाला. वाटेत जीं जीं क्षेत्रे लागत त्या त्या ठिकाणच्या विद्वानांशी वादविवाद करून तो विजय पत्रे मिळवीत इंद्रायणीच्या तीरीं आला. तेव्हां एक ब्रह्मराक्षस ब्राह्मणाचें रूप घेऊन वामन पंडिताकडे आला व त्याला त्यानें एकांती सांगितलें कीं, विद्यामदानें व अहंपणाने मला ब्रह्मराक्षसत्व आलें; आपल्यलाहि तीच स्थिति येणार आहे व आपली येथल्या अश्वत्थवृक्षाच्या एका फांदीवर जागा नेमलेली आहे; ती आपण तेथें येईपर्यंत मला द्यावी; वामनानें ती जागा त्यास दिली व हें ब्रह्मराक्षसत्व चुकवावयास उपाय विचारला. त्या ब्राह्मणानें सांगितले कीं साधुकृपेवांचून हे होणे शक्य नाहीं. व तुम्ही देहूस तुकारामांकडे जा. तेव्हां वामन पंडितानें आपली सर्व संपत्ति बायकोच्या अनुमतीनें ब्राह्मणांस वांटून देऊन ती दोघें विनीत वेशानें तुकारामबाबांकडे- त्या वेळीं तुकारामबाबा आळंदीस होते- गेलीं. ते कीर्तन करीत असतां त्यांना प्रणिपात करून वामनपंडित म्हणाले, तुम्ही साधु व आम्ही मुमुक्षु यास्तव कृपा करावी. तुकारामबाबा बोलले, "मी शूद्र वर्ण आहे व तुम्ही ब्राह्मण वर्ण आहांत व वर्णाश्रम धर्म रक्षावा अशी ईश्वरी आज्ञा आहे. तेव्हां तुम्ही मारुती अवतार व प्रत्यक्ष ब्राह्मण असे रामदास त्यांना शरण जा." तदनुरूप वामनपंडित चाफळास रामदासांकडे आले. रामदासांनीं 'तुम्ही बदरिकाश्रमीं जाऊन बारा वर्षे तपश्चर्या करावी म्हणजे ईश्वर साक्षात् दर्शन देईल' असे सांगितले. त्याप्रमाणें वामन पंडित बदरिकाश्रमी जाऊन त्यांनी बारा वर्षे तप केलें. पण ईश्वर साक्षात्कार झाला नाहीं. तेव्हां भागीरथीचे कांठीं येऊन पतिपत्नीनी भागीरथींत जीव देण्याचा बेत केला व डोळे बांधून उडी टाकणार तोंच विष्णूनें साक्षात् दर्शन देऊन वामनपंडितास वर मागण्यास आज्ञा केली. वामनपंडितानें 'साधूस जें सुख प्राप्त होतें तें द्यावें' असें मागणें मागितलें. तेव्हां विष्णूनें म्हटले, 'आम्हीं वैकुंठ लोक देऊं. पण साधूचें सुख साधूस शरण गेल्याखेरीज मिळणार नाहीं तरी रामदासांस शरण जावें." या विष्णूच्या आज्ञेप्रमाणें वामनपंडित पत्नीसह पुन्हां रामदासांकडे आले. रामदासांनी त्यांना परत श्रीशैलपर्वती असलेल्या अवधूत महाराजांकडे पाठविले. तेथें त्या महाराजांची सेवा करीत असतां त्यांची समाधीची वेळ जवळ आली म्हणून त्यांनी रामदासांकडे जाऊन आपली संशयनिवृत्ति करून घ्यावी म्हणून वामनपंडितास सांगितले. म्हणून वामन पंडित तिसऱ्यांदां रामदासांकडे आले व या खेपेस मात्र रामदासांच्या सहवासांत वामनपंडित ज्ञानपूर्ण व निःसंशय झाले. तरी पण दासबोधांतील सातव्या दशकांतील चवदा ब्रह्मांच्या प्रश्नाचा उलगडा त्यांच्या मनाला बरोबर झाला नाहीं. म्हणून त्यांनीं 'दासबोधाचें मी स्वतः पारायण करतों व स्वामीनीं स्वमुखें त्यांचा अर्थ सांगावा' अशी विनंति केली. तेव्हां चवदा ब्रह्मांविषयीं वामनानीं प्रश्न केला व त्याचें उत्तर स्वामीनीं दिले पण त्यानें पंडिताचें समाधान झाले नाहीं; असें एकदोनदां झालें तरी वामन पंडिताची संशयनिवृत्ति होईना. तेव्हां समर्थ भुभुःकार करून शेपटाचा मोठा तडाखा देऊन बोल बोल असें वामनास म्हणूं लागले. तो त्यांच्या त्या स्वरूपाकडे पाहून वामनपंडित भयभीत होऊन 'स्वामी माझी समस्या पूर्ण झाली' असें बोलला. याप्रमाणें स्वामींनीं त्रिवार विचारलें व पंडितांनीं त्रिवार पूर्वी प्रमाणें उत्तर दिले. नंतर स्वामींनी पूर्वरूप धारण करून वामनपंडितास विचारले, 'तुझी समस्या पूर्ण झाली किंवा नाहीं.' वामनांनीं नाहीं असें उत्तर करतांच स्वामी म्हणाले. 'इतक्यांत कबूल करून आतां कां फिरतोस.' वामनपंडित ह्मणालें, आपण आद्यरुद्ररूप धारण केले त्याबरोबर बोलण्याचें सामर्थ्य कोणाचें आहे.' नंतर स्वामी हास्य करून बोलले, 'तुम्ही इतके ग्रंथ वाचले असतां चवदा ब्रह्मांचा प्रश्न कोणत्याही ग्रंथी पाहिला नाहीं म्हणतां याचें आश्चर्य वाटतें. 'आतां बृहदारण्यांत चवदा ब्रह्मांची स्थापना करून उडविण्याचा प्रकार आहे तो पहा. त्यांत असल्यास आमच्या ग्रंथांत असूं द्यावा नाहीं तर काढून टाकावा! वामनपंडितांनी स्वामींनी सांगितल्या ठिकाणीं तें प्रकरण पाहून त्यांचें पूर्ण समाधान झालें. नंतर वामनपंडितांनीं स्वामींच्या सांगीवरून मराठींत बहुत ग्रंथ केले व त्यांतील सुंदर यमकें पाहून रामदासांनी वामनपंडिताचें 'यमक्या वामन' असें नांव ठेविलें.
आतां रामदासांच्या चरित्रांतील इतर बाबींकडे वळू. चाफळास व
परळीस मठ स्थापन करून जागजागीं मारुतीचीं देवळें बांधल्यानंतर पुन्हां एकदां रामदास रामेश्वराच्या यात्रेस जाऊन आले. नंतर जांबास घरच्या मंडळीस भेटण्यास गेले. व त्यावेळी दोन वर्षे इकडे तिकडे हिंडून पुन्हां एकदां जांबास येऊन मग चाफळास परत आले.
रामदासांची आई सन १६५५ मध्ये वारली. तेव्हां रामदास भावास भेटण्यास गेले व आईचें औध्वर्दोहक झाल्यावर पंधरा दिवसांनी परत परळीस आले.
सन १६५९ मध्ये शिवाजीनें अफजूलखानास मारलें व त्यानंतर शिवाजी परळीस रामदासांस भेटण्यास गेला व रामदासांनी दासबोधाच्या अठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील बोध त्यास केला. त्या प्रसंगी शिवाजीनेंही रामदासानी स्थापन केलेल्या अकरा मारुतींस इनाम गांव करून दिले.
पुढें एकदां रामदास पंढरपुरास गेले व तेथे विठ्ठलाची मूर्ति रामदासांच्या प्रभावानें कांहीं वेळ रामरूप झाली.
कर्नाटकाच्या स्वारीहून परत आल्यावर रामदासांच्या सल्ल्यानें आपत्याला राज्याभिषेक करवून घेण्याचा शिवाजीनें निश्चय केला. व तदनंतर गागाभट्टाच्या हस्ते सन १६७४ मध्ये हा समारंभ रायगडीं मोठ्या थाटाने साजरा करण्यांत आला. या निमित्तानें शिवाजीनें परळीच्या मठास आणखी कांहीं गांव इनाम करून दिले.
रामदासांचे थोरले बंधु श्रेष्ठ हे सन १६७७ मध्यें परधामास गेले. त्यांना रामजीबाबा व श्यामजीबाबा असे दोन पुत्र होते. रामदासांनी आपल्या शिष्यांकडून या दोन मुलांना आपल्यापाशीं परळीस आणून वर्षभर ठेऊन मग जांबास आपल्या घरी परत पाठविलें.
सन १६७८ मध्ये शिवाजीनें चाफळमठास पुन्हां एकदां बरेच गांव इनाम करून दिले व त्याच्या सनदा दिवाकर गोसावी यांजपाशीं दिल्या.
शिवाजीमहाराज सन १६८० सालीं रायगडावर मयत झाले. ही वार्ता ऐकून रामदासस्वामींस अत्यंत दुःख झालें. तेव्हांपासून स्वामींनी फारसें कोठें जाण्याचें सोडले व त्यांनीं अन्नही वर्जिले व निवळ दुधावर राहू लागले. तेव्हां स्वामींचाही काळ जवळ आला असे शिष्यमंडळींनी ताडलें. म्हणून चाफळच्या मठाची व एकंदर पंथाची व्यवस्था व कारभार कोणी करावयाचा याबद्दल स्वामींनीं आज्ञा करावी म्हणून शिष्यांनी वारंवार विनंति केली. तेव्हां एकदां स्वामींनी सांगितलें कीं, जांबेहून श्रेष्ठांचा ज्येष्ठ पुत्र रामचंद्रबाबा यांना आणवून त्यांचे आज्ञेनें सर्व कारभार चालवावा. खरोखरी रामदासांची हीच आज्ञा होती किंवा शिष्यापैकी योग्य शिष्यानें मठाधिपति व्हावें अशी होती हे समजणें कठीण आहे. इतकें खरें कीं, रामदासांच्या पश्चात् रामचंद्रबाबा या संस्थानाकडे आले नाहीत व मठाची सर्व व्यवस्था कांहीं काळपर्यंत तरी शिष्यांकडे होती. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रामचंद्रबाबांचे चिरंजीव गंगाधरबाबा यांना परळी व चाफळ येथील अधिकार देण्यांत आला व पुढें तो अधिकार गंगाधरबाबांच्या वंशजाकडे कायमचा आला, हें खरें; परंतु ही व्यवस्था शिष्यमंडळींतील व्यवस्थेसंबंधाचा तंटा कायमचा नाहींसा करण्याकरितां शाहू महाराजांनीं रामदासांच्या शिष्यांच्याच मदतीनें घडवून आणलेली दिसते.
शिवाजीमहाराजांच्या मरणानंतर संभाजी राजे राज्यावर बसले. त्यांनीं चालविलेली अनन्वित कृत्ये ऐकून व शिष्यमंडळीच्या आग्रहावरून स्वामींनी संभाजीमहाराजांस उपदेशपर एक पत्र लिहिलें व आपल्या शिष्याबरोबर तें त्यांजकडे पाठवून दिलें, हें पत्र या पुस्तकाच्या कलम दोन याचें शेवटीं समग्र दिले आहे. त्यावरून रामदासांची शिवाजीबद्दल केवढी आदरबुद्धि होती हे व्यक्त होतें.
याच सुमारास परळीच्या देवालयाकारतां चंदावराहून चार मूर्ति आल्या होत्या. त्या रामदासांनी सिंहासनावर बसवून घेतल्याने त्यांना फार समाधान झालें. पुढें रामदासांनीं या मूर्तीची व चाफळच्या श्रीची पूजाअर्चा करून संस्थान संभाळून उपासनामार्ग चालवावा अशी अक्कास व इतर शिष्यमंडळीस आज्ञा केली. यानंतरं रामदास फार दिवस राहिले नाहींत. त्यांचें देहावसान सन १६८१ माघ वद्य नवमी रोजी झालें. स्वामींच्या देहाचें यथाविधि दहन करून उत्तर कार्य उद्धव गोसावी यांनी केलें. व त्या जागीं स्वामींची समाधि बांधून त्यावर लहानसें देवालय बांधून त्यांत रघुपतीच्या मूर्ति स्थापून त्यांची पूजाअर्चा सुरू केली व संस्थानचा कारभार आक्का व दिवाकर गोसावी पाहू लागले.
नंतर त्यांनी कृष्णाकांठीं दोनचार वर्षे घालवून आपला रामदासीपंथ काढण्याचा विचार करून तदनुरूप १६४८ मध्यें चाफळास रामाचें देवालय बांधून उत्साहास सुरवात केली. येथून त्यांच्या आयुष्यांतील दुसऱ्या भागास प्रारंभ झाला. ही बत्तीसतेहतीस वर्षे त्यांनी आपल्या पंथाचा प्रासार करण्यांत, त्या पंथाची शिष्यशाखा वाढविण्यांत, हरिकथाकीर्तनांत, व सर्वजनांना उपदेश करण्यांत घालविलीं असे दिसतें. रामदासांच्या बद्दल त्यांच्या शिष्यसमुदायांत विलक्षण आदरबुद्धि वसत होती व त्यांच्या या उद्योगामुळे व आयुष्यांतील इतर अलौकिक गोष्टींमुळे त्यांना लोक अवतार मानूं लागले होते असे दिसतें. रामदासांची शिष्यशाखा फार मोठी होती; त्यांनी जागोजाग आपल्या पंथाचे मठ स्थापन केले होते; तसेंच राम व मारुती यांची पुष्कळ देवळें बांधलीं होतीं; या गोष्टी सत्कार्योत्तेजक सभेच्या उद्योगानें व त्यांनी छापलेल्या कागदपत्रांनी शाबीत झाल्या आहेत येवढें खरें. पण त्यायोगें रामदासांच्या चरित्रांतील हकीकतीवर व शिवाजी-रामदास यांच्या संबंधावर फारसा प्रकाश पडला आहे असें मात्र वाटत नाहीं. शिवाजीचा व रामदासांचा संबंध केव्हां आला व तो कशा प्रकारचा होता या वादग्रस्त प्रश्नाचा विचार या पुस्तकाच्या शेवटच्या कलमांत स्वतंत्रपणे करावयाचा आहे. तेव्हां तूर्त रामदासांच्या चरित्रांतील परंपरया आलेली हकीकत ऐतिहासिक पुराव्याशी कितपत जुळते व या परंपरागत हकीकतींत धडधडीत खोट्या व बनावट गोष्टी कोणत्या आहेत त्या आतां पाहूं.
हनुमानस्वामींच्या बखरींत शिवाजीचा व रामदासांचा अत्यंत निकट संबंध होता व शिवाजी वारंवार रामदासांची सल्लामसलत विचारीत असे असें वर्णन आहे. आतां याचें प्रत्यंतर शिवाजीच्या बखरींत कितपत आहे असे पाहूं लागलें म्हणजे या हकीकतीच्या सत्यतेबद्दल संशय उत्पन्न होऊं लागतो.
शिवाजीच्या पूर्व काळी लिहिलेल्या तीन चार बखरी आहेत. पहिली सभासदाची, दुसरी चित्रगुप्ताची तिसरी शिवदिग्विजय नांवाची बखर व चवथी चिटणिसाची; या कालानुक्रमानें एकामागून एक झालेल्या आहेत व आश्चर्याची गोष्ट अशी कीं, सभासदाच्या बखरींत- जी बखर शिवाजीच्या मरणानंतर १४च वर्षांनी लिहिलेली आहे- रामदासांचा नुसता नामनिर्देशही नाही! मग त्यांच्या भेटीच्या किंवा गुरुशिष्यपणाच्या गोष्टींचा उल्लेख नाहीं हें सांगावयास नको. यानंतर लिहिलेली बखर म्हणजे चित्रगुप्त-विरचित बखर. या बखरींत रामदासांचें नांव दोनदांच आले आहे. पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे.
"या कलियुगी श्री ईश्वराच्या विभूति श्री रामदासस्वामी व महाराज औरंगझेब पादशाहास ज्ञानवंत जाणविलें." येथें शिवाजी व रामदासांच्या निकट संबंधाचा उल्लेख मुळींच नाहीं.
दुसरा उल्लेख खालील वाक्यांत आहे.
"जैशी श्री रामदासस्वामींनी महाराज सिंहासनाधीश्वर जहालिया नंतर कृपा करून राज्यनीति स्वतः मजसाठी शास्त्रसंमतें कृता त्रेता द्वापारीं जे जे धर्मपरायण पुण्यश्लोक सोमसूर्यवंशींचे राजे वर्तत आले त्याप्रमाणें राज्याधिकार या कलियुगी करणे."
येथें रामदासांनी शिवाजीस राज्याभिषेकानंतर राजनीति सांगितली असें म्हटले आहे. यापेक्षां चित्रगुप्ताच्या बखरींत रामदासांच्या व शिवाजीच्या संबंधाबद्दलचा उल्लेख नाहीं. शिवदिग्विजय या बखरींत पहिला उल्लेख खालील वाक्यांत आहे.
"ब्रह्म विद्या आध्यात्मज्ञान प्रौढपणीं श्रीमत् सज्जनगड निवासी श्रीरामदासस्वामी यांजपासोन (शिवाजीमहाराज) अधीत झाले."
पुढें या बखरीत शिवाजीच्या व रामदासांच्या प्रथम भेटीची व अनुग्रहाची सविस्तर हकीगत दिली आहे. ती बहुतेक शब्दशः हनुमानस्वामींच्या हकीकतीशीं जुळतें. यावरून ती हकीकत त्या बखरींतून उतरून घेतली असावी असे वाटतें. पुढें सज्जनगडीं राहण्यास येण्याबद्दल शिवाजीनें रामदासांस विनंति केली, व त्यावेळी रामदासांनीं शिवाजीस नीतीचा उपदेश केला यासंबंधाचें पाल्हाळानें वर्णन केले आहे. आणखीही दोन ठिकाणी रामदासांचे उल्लेख आले आहेत.
चिटणिसांच्या बखरींत मात्र रामदासाबद्दल बराच मजकूर आहे. शिवाजी व रामदास यांचा गुरु-शिष्यपणाचा संबंध होता व शिवाजीमहाराज रामदासांस केव्हां केव्हां सल्ला मसलत विचारीत असत असे म्हटले आहे. पण याचा उलगडा सहज होतो. मल्हार रामराव चिटणीस मराठीशाहीचे प्रसिद्ध बखरकार हे रामदासस्वामींची बखर करणारे हनुमानस्वामी यांचे समकालीन होते इतकेंच नव्हे तर हनुमानस्वामींनी चिटणिसांची मदत रामदासांची बखर लिहितांना घेतली होती असे हनुमानस्वामींच्या बखरींच्या उपलब्ध प्रतींची हकीकत देतांना सत्कार्योत्तेजक सभेच्या मासिकांत कबूल केले आहे. या वरून इतकें होतें कीं, रामदासांची शिष्यपरंपरागत हकीकत आतां समाजांत बरीच प्रचलित झाली होती. तरी पण मराठीतील ऐतिहासिक बखरकाराला शोभेल अशा तऱ्हेची चिकित्सक बुद्धि थोड्या तरी प्रमाणांत चिटणीस यांनी दाखविलेली आहे. कारण रामदासांच्या बखरींत असलेल्या सर्वच दंतकथांना चिटणीसांनीं शिवाजीच्या बखरींत जागा दिली नाहीं. शिवाजीनें राज्यस्थापनेला प्रारंभ १६४० मध्ये केला व त्याच्या मनांत राजकीय महत्वाकांक्षेच्या कल्पना दहाबारा वर्षीपासून येऊ लागल्या होत्या असे सांगितले आहे.
पुढें रामदासांची कुळकथा सांगून शिवाजीची व रामदासांची भेट व रामदासांनीं शिवाजीला केलेल्या अनुग्रहाचें वर्णन हनुमानस्वामींच्या बखरी इतक्या पाल्हाळानें नसले तरी त्यांतल्या प्रमाणे केले आहे.
नंतर शिवाजीनें दिल्लीस जाण्यापूर्वी रामदासांचें दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता असे सांगितले आहे.
शिवाजीनें आपल्याला राज्याभिषेक करवून घेण्याचा निश्चय केल्यानंतर महाराष्ट्रांतील मोरया देव व इतर साधुसंत यांची ज्याप्रमाणें या बाबतींत अनुमति घेतली त्याप्रमाणें रामदासांचीहि घेतली होती असें वर्णन केले आहे.
१६७८ मध्ये शिवाजी रामदासास भेटावयास गेले होते. तेव्हां रामदासांनी महाराजांस लोक जो 'जोहार' करतात त्या ऐवज 'राम राम' म्हणत जावें असें म्हटलें. तेव्हांपासून रामरामाची पद्धति सुरू झाली. याच प्रसंगी शिवाजीनें रामदासांस परळी किल्ल्यावर रहाण्यास येण्यास विनंति केली. त्या वेळी रामदासांनीं चाफळचे रामजीचे उत्साहाचा बंदोबस्त करावा असें शिवाजीस सांगितले व त्यानें चाफळच्या मठास गांव इनाम करून दिलें.
इतक्याच दोन तीन प्रसंगाचें चिटणिसांनी आपल्या बखरींत वर्णन केले आहे. हनुमान स्वामीच्या बखरींत रामदास शिवाजीच्या विनंतीवरून १६५० मध्यें परळीस राहावयास गेले असे वर्णन आहे. अर्थात् हे विधान ऐतिहासिकदृष्टया खोटें (कारण शिवाजीच्या सर्व बखरींप्रमाणें परळी किल्ला चंदनवंदन व साताऱ्या किल्याबरोबरच १६७३ मध्ये शिवाजीच्या ताब्यात आला) म्हणून चिटणीसानीं आपल्या बखरींतून वगळले आहे व ऐतिहासिक गोष्टींशी जुळे अशा तऱ्हेनेंच रामदासांच्या सज्जनगडनिवासाची हकीकत दिली आहे.
अफजूलखानाच्या वधानंतर शिवाजीमहाराज रामदासांस परळीस भेटावयास गेले व त्या वेळी त्यांनीं कांहीं गांव इनाम करून दिले ही आख्यायिका; त्याचप्रमाणें शिवाजीनें रामदासांस राज्यदान केल्याची आख्यायिका या विश्वसनीय नाहीत म्हणून चिटणिसांना सोडून दिल्या असाव्यात. यावरून चिटणिसांनीं शिवाजीची बखर लिहितांना बरीच ऐतिहासिक दृष्टि ठेविली होती असे दिसतें. अर्थात् अशी दृष्टि आपल्या आराध्य दैवताचें देव्हारें माजविण्याकरितां लिहिलेल्या हनुमानस्वामींच्या बखरींत नाहीं हे उघड आहे. त्यांतील किती तरी गोष्टी अशक्य असंभाव्य व ऐतिहासिक सत्यास न जुळणाऱ्या अशा आहेत. त्यांची येथें चर्चा करण्याचें प्रयोजन नाहीं. पण त्या गोष्टी रामदासांचें महत्त्व वाढविण्याकरितां बनावट केलेल्या आहेत व शिवाजीच्या चरित्रांतील गोष्टी समाजांत प्रचलित झाल्यानंतर त्यांना जुळतील अशा तऱ्हेनें त्या बनविलेल्या आहेत हे मागें दिलेल्या रामदासांनीं भवानी देवीस शिवाजीच्या अंगांत येण्यास सांगितल्याबद्दलच्या आख्यायिकेच्या खालील विवेचनावरून दिसून येईल.
शिवाजीवर भवानी देवीची कृपादृष्टि होती व बिकट प्रसंगी ती शिवाजीच्या अंगांत येऊन त्याला सल्लामसलत देत असे व शिवाजी तदनुरूप वर्तन करीत असे ही गोष्ट शिवाजीच्या आयुष्यांतील एक अलौकिक गोष्ट होती. तिचें वर्णन शिवाजीच्या सर्व बखरकारांनी सारख्याच तऱ्हेनें केलेले आहे. ही शिवाजी बद्दलची गोष्ट शिवाजीच्या काळापासून समाजांत प्रचलित असावी. शिवाजीचा व रामदासस्वामींचा गुरुशिष्यसंबंध होता व त्या संबंधाप्रमाणें शिवाजी रामदासांस सर्व बाबतीत सल्लामसलत विचारी व त्यांची आज्ञा पाळी अशा प्रकारची दंतकथा रामदासांच्या पंथांत प्रचलित झाली किंवा प्रचलित केली गेली; तेव्हां शिवाजीच्या आयुष्यांतील भवानीच्या आख्यायिकेशीं तिचा विरोध येऊं लागला. बरें जनमनांत मुरलेली भवानीच्याबद्दलची आख्यायिका बदलणे शक्य नव्हते. तेव्हां या जुन्या आख्यायिकेला बाध न येई अशा तऱ्हेनेंच रामदासांना महत्त्व देणारी आख्यायिका रचण्यांत आली असे म्हणणें प्राप्त आहे. कारण अशी कल्पना करा की शिवाजीच्या आयुष्यांत अशी आख्यायिका नव्हती व शिवाजीची निस्सीम शिष्यभक्ति व रामदासांचें महत्त्व दाखविण्याकरितांच ही आख्यायिका रचावयाची असती तर ती खालीलप्रमाणें रचणें स्वाभाविक व कल्पकतेला अनुरूप होतें.
शिवाजीचा निश्चय कीं, स्वामींची आज्ञा झाल्याखेरीज कोणतेंहि काम सर्वथैव कर्तव्य नाहीं. गलीम लढाई करून आला असें तर संकट प्राप्त झालें. शिवाजी तर कारभाऱ्याचें ऐकेना; तेव्हां रामदास एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हणाले, "तूं हा राज्यकारभार करतोस, यांत कोणेंसमयी कसा प्रसंग येईल याचा नेम नाहीं. आम्हीं तर तुम्हांपाशीं सतत नसणार व तुमचा नेम तर असा आहे; तो चालणार नाहीं. या करितां जसा प्रसंग येईल तशी मसलत करून काम करीत असावें." यावर शिवाजी महाराज बोलले कीं प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती आज्ञेवांचून पाऊल हीं पुढें पडावयाचें नाहीं.
शिवाजीचा याप्रमाणें निश्चय पाहून रामदासांनी म्हटलें, "माझें परम दैवत राम किंवा हनुमान हा तुझ्या अंगांत येऊन तुझ्या अडचणीच्या प्रसंगी तुला सल्लामसलत देईल ती माझीच आज्ञा समजून तूं तदनुरूप वर्तन कर."
स्वतंत्रपणे आख्यायिका रचावयाची असती तर ती अशा तऱ्हेची नसती काय? या आख्यायिकेंत शिवाजीची शिष्यभक्ति व रामदासांची महती दिसून आली नसती काय? शिवाय बखरींप्रमाणे पहातां रामदासांला आपल्या आराध्य दैवताचा फार अभिमान असे, इतका कीं तो पंढरपुर/ सारख्या तीर्थास राम नाहीं म्हणून कित्येक काळपर्यंत गेला नाहीं. या एकाच गोष्टींत रामदासांस भवानी देवीचाच उमाळा कां आला तर याचा अर्थ इतकाच कीं शिवाजीच्या जुन्या आख्यायिकेस टाकून देणें शक्य नव्हतं म्हणून त्या आख्यायिकेला धरून ही रामदासांच्या महत्त्वाबद्दलची आख्यायिका रचावी लागली. असो.
वरील विवेचनावरून हनुमानस्वामींची बखर ऐतिहासिकदृष्ट्या ग्राह्य नाहीं; ती व्रतमाहात्म्य किंवा देवतामाहात्म्य याप्रमाणें दंतकथांनी व भाकडकथानीं भरलेली आहे. तेव्हां अवांतर ऐतिहासिक पुराव्यावांचून त्यांतील हकीकतीवर विश्वास ठेवणें रास्त नाहीं हें उघड आहे. तरी शिवाजीचा व रामदासांचा संबंध खरोखरी कशा प्रकारचा होता व तो केव्हांपासून घडून आला या वादग्रस्त प्रश्नाचा ऐतिहासिकदृष्ट्या आतां ऊहापोह करूं.
शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध कशा प्रकारचा होता-म्हणजे रामदास हे शिवाजीचे स्फूर्तिदाते राजकारण गुरु होते किंवा निव्वळ गुरुमंत्र देणारे मोक्षगुरु होते, हा पहिला वादग्रस्त प्रश्न आहे व तो संबंध केव्हां घडला हा दुसरा वादग्रस्त प्रश्न आहे. पण पहिल्या प्रश्नाचा आस्तिकपक्षी निकाल केला म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा निर्विकार मनानें विचार करणे कठीण जाते. कारण मग शिवाजी व रामदास यांची भेट पूर्ववयांतच झाली असली पाहिजे असे मानण्याकडे मनाचा ओढा होतो; इतकेच नव्हे तर दुसऱ्या प्रश्नाच्या पुराव्याची ओढाताण करून व क्लिष्ट कल्पना काढून तो पहिल्या प्रश्नाच्या निकालाशी जुळता करून घेण्याचा मोह उत्पन्न होतो. म्हणून या दोन्ही प्रश्नांच्या समाधानकारक निकालाकरितां दुसऱ्या प्रश्नाची चर्चा आधी करणें इष्ट आहे. ती निर्विकार मनानें झाल्यावर मग पहिला प्रश्न सोडविण्याचें काम कठीण नाहीं. करितां रामदास व शिवाजी यांच्या प्रथमभेटीच्या कालाच्या प्रश्नाकडे वळू.
रामदासाच्या शिष्यसांप्रदायाच्या श्रद्धाळू दृष्टीनेंच पहावयाचे असल्यास हा प्रश्न वादग्रस्तच नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं शिवाजीची व रामदासांची शिंगणवाडीस शके १५७१ विरोधीनाम संवत्सरे (सन १६४९) वैशाख शु० नवमी गुरुवार रोजीं भेट झाली व तेव्हांच त्यांनी शिवाजी महाराजांना त्रयोदशाक्षरी मंत्र दिला असे विधान केलें आहे. पण ऐतिहासिक दृष्टीनें हनुमानस्वामींची बखर असत्योक्ति व अतिशयोक्ति या दोषद्वयानें दूषित असल्यामुळे या निव्वळ सांप्रदायी पुराव्यावर भरंवसा ठेवून भेटीचा काल निश्चित आहे असें म्हणणे बरोबर नाहीं. पण हा कालनिर्णय रामदास शिवाजीचा राजकारण गुरु होता या मतास अनुकूल असल्यामुळे सत्कार्योत्तेजक सभेचे उत्साही चिटणीस रा. देव व प्रसिद्ध इतिहास संशोधक रा. राजवाडे यानीं तो स्वीकारून त्या निर्णयाच्या पुष्टीकरितां ऐतिहासिक पुरावा पुढे आणण्याचा किंवा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुराव्याचा भर मुख्यतः चार कागदपत्रांवर आहे; त्यापैकी एक पत्र जुनें सांप्रदायिक आहे; व दुसरीं तीन ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध करतांना अलीकडे सांपडलेली आहेत. पहिले तुकारामाचें शिवाजीस ओवीबद्ध पत्र; दुसरें शिवाजीचें सनदवजा रामदासांस पत्र; तिसरें शिवाजीच्या रामदासांशीं रायगडीं एकांतांत झालेल्या भेटीच्या उल्लेखाचें पत्र व शेवटचें व रा. राजवाडे यांच्या मती या वादाचें निर्णायक असे रामदासांच्या मरणानंतर लिहिलेले चाफळ मठांतील एक कच्चे टिपण. आतां या पत्रांचा क्रमानें विचार करूं.
तुकारामानें शिवाजीस लिहिलेले हें पत्र हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणें शिवाजीस रामदासांचा अनुग्रह झाल्यानंतर बऱ्याच काळानें लिहिलेले आहे, असे बखरीवरून दिसतें. पत्रांतील खालील ओव्यांवरूनही ही गोष्ट स्पष्ट दिसते.
सद्गुरु श्रीरामदासाचें भूषण । तेथें घाली मन चळो नको ॥
बहतां ठायीं वृत्ति चाळविली जेव्हां। रामदास्य तेव्हां घडे कैचें ॥
राया छत्रपति ऐकावें वचन । रामदासी मन लावी वेगें ॥
रामदासस्वामी सोयरा सज्जन । त्याशीं तनमन अर्पी बापा ॥
मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुज लागी ॥
आतां शिवाजीच्या सनदवजा पत्राकडे वळूं. त्यांतील या वादासंबंधाचा मजकूर असा आहे.
"चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करूनु सनाथ केलें आज्ञा केली कीं तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करुनु धर्म स्थापना देव-ब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून पाळण रक्षण करावें हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा तुम्हीं जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशीं स्थळे दुर्घट करावी ऐसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केलें या उपरि राज्य संपादिलें तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावे तीच सेवा होय ऐसें आज्ञापिलें यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची स्थापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऐशी प्रार्थना केली तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करुनु चाफळी श्री ची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली."
हें पत्र सन १६७९ मधलें आहे हे ध्यानांत ठेविले म्हणजे या पत्राचा पुरावा प्रथम भेटीच्या प्रश्नासंबंधानें शून्य आहे हें सहज समजेल. कारण शिवाजीसारखा शिष्य रामदासांची भेट केव्हांही झाली असली तरी आपल्याच आशीर्वादाने सर्व झालें असें सौजन्यानें म्हणेल हे उघड आहे. शिवाजीनें राज्य अर्पण केल्यावर रामदासांनी राज्य करण्याचाच उपदेश केला हा उल्लेखही पुढल्या गोष्टीला लागू आहे. निकटवासाचा उल्लेख परळीकडे स्वाभाविकपणें जातो. कारण चाफळच्या मानानें परळी प्रतापगडास जवळ आहे. पुढल्या वाक्यांत रामदासांनी चाफळीं श्रीची स्थापना करून शिष्य सांप्रदाय वाढविल्याचें विधान आहे. निकट-वासाची विनंति आहे व चाफळबद्दलचें विधान आहे. पण रा. देव यानीं या पत्राचा अर्थ करतांना या दोन वाक्यांत कार्यकारणभावाचा अर्थ लावला आहे. व असा अर्थ लावण्याकरितां पत्रांतील 'तेही' या शब्दाचा 'तेव्हां म्हणून' असा अर्थ घरला आहे. पण 'तेही' याचा खरा अर्थ 'त्यांनी' असा आहे. व हा खरा अर्थ घेतला म्हणजे निकटवासाची विनंति व मठस्थापनेचें विधान असा सरळ अर्थ लागतो. पण 'तेही' चा 'तेव्हां' असा अर्थ करून निकटवास घडण्याकरितां चाफळास रामदासस्वामींनीं शिवाजीच्या विनंतिवरून मठ स्थापना केली असा रा. देव अर्थ करतात. परंतु असा अर्थ केल्यास 'निकट' या सापेक्ष शब्दाला अन्वर्थकत्व राहत नाहीं. व चाफळचा मठ स्थापन होण्यापूर्वी शिवाजीची व रामदासांची भेट झाली होती व त्यानें रामदासांस आपले सर्व राज्य अर्पण केलें होतें असा सांप्रदायिक हकीकतीचेही पलीकडे जाणारा विचित्र अर्थ निष्पन्न होतो. सारांश या पत्राचा शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या कालनिर्णयाला काडीचाही उपयोग नाहीं.
रा. राजवाडे यांनी प्रसिद्ध केलेले तिसरें पत्र याची हीच अवस्था आहे. शिवाजी व रामदासाची रायगडी राज्याभिषेक झाल्यावर एकांतीं भेट होते या उल्लेखावरून त्यांच्या प्रथम भेटीच्या कालनिर्णयाच्या प्रश्नावर कांहींच उजेड पडत नाहीं.
रा. राजवाडे यांनी रामदासांच्या चरित्रांतील प्रसंगाचें जें टिपण छापले आहे तें अनुक्रमणिका वजा आहे. ती हकीकत हनुमानस्वामींनीं वर्णिलेल्या दंतकथांच्या हकीकतीशीं बहुतेक तंतोतंत जुळते. यावरून हनुमानस्वामींनी आपले रामदासांचें चरित्र लिहितांना ज्या पूर्व चरित्रांचा उपयोग केला होता अशा एखाद्या चरित्राची हें टिपण अनुक्रमणिका असावें. रा. राजवाडे यांनी हें टिपण रामदासांच्या मरणानंतर थोड्याच दिवसांनी लिहिलेले आहे या गोष्टीवर बराच जोर दिला आहे. शिवाय ज्या अर्थी तें टिपण इतके जुनें आहे त्याअर्थी त्यांत दिलेले शक खरेच असले पाहिजेत व ज्या अर्थी हनुमानस्वामीनी दिलेला व या टिपणांत दिलेला काल अगदी तंतोतंत जमतो त्या अर्थी हनुमानस्वामींच्या बखरींतील काल हा ऐतिहासिक सत्य ठरतो; असें रा. राजवाडे यांनी कंठरवानें सांगितलें आहे. पण हें टिपण चाफळ मठांतले आहे व त्यांत समर्थ सांप्रदायांत रामदासासंबंधी प्रचलित असलेल्या सर्व दैवी चमत्कारांच्या अशक्य व असंभाव्य गोष्टींचा हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणेंच उल्लेख आहे. म्हणजे असत्योक्ति व अतिशयोक्ति हे दोष या टिपणावरही येतात. सारांश, हें टिपण सांप्रदायिक पुराव्यांतील आहे. त्याला स्वतंत्र ऐतिहासिक कागदोपत्री पुरावा मानतां येणार नाहीं. शिवाय हनुमानस्वामींच्या बखरीतील भेटीच्या कालनिर्देशाला जे ऐतिहासिक आक्षेप आहेत ते या टिपणांतील कालनिर्देशालाही तितकेच लागू आहेत. तेव्हां आतां सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा कां व कसा आहे याच्या विचारास लागूं.
हनुमानस्वामींच्या बखरींत या भेटीच्या प्रसंगाचें सविस्तर वर्णन दिलें आहे तें असें.
शिवाजी महाराज रायगडाखालीं असतां त्यांनी एका साधूचें कीर्तनांत 'सद्गुरुवांचून सद्गति नाहीं' हें तत्व ऐकलें. तेव्हांपासून त्यांना सद्गुरुं शोधण्याचा नाद लागला. तेथून प्रतापगडावर आल्यावर श्रीभवानी देवी शिवाजीच्या स्वप्नांत येऊन तिनें रामदासाला शरण जा अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे महाराज चाफळास गेले. पण रामदासांची भेट झाली नाहीं. मात्र तेथल्या शिष्यांनी देवस्थापनेची हकीगत सांगतांना महाराजांकडून तीनशें होन मिळाळे आहेत असे सांगितलें, महाराजांनी देवळाशेजारचा ओढा देवळास इजा करण्यासारखा आहे असे पाहून सातशें होन तो ओढा वळवून देण्याकरितां तेथल्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले व प्रतापगडास सचिंत मानसें परत आले. पण त्यांना रामदासांचा निजध्यास लागला. तेव्हां एकदां रामदासांनी शिवाजीला स्वप्नांत दर्शन देऊन प्रसाद म्हणून नारळ अर्पण केला. पुन्हां भेटीचा प्रयत्न करण्याचा निश्चय करून शिवाजी प्रतापगडाहून महाबळेश्वरीं आले. तेथून वांईस येऊन माहुलीस त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. इतक्यांत रामदासांकडून खालील आशयाचें ओवीबद्ध पत्र शिवाजीस आलें:-
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयाशी ।
जयाचे गुण महत्त्वाशी । तुलना कैंची ॥
नरपती, गजपती, हयपती । गडपती, भूपती, जलपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणें सुशील । सर्वांठायी ॥
धीर उदार सुंदर । शूर क्रियेशि तत्पर ।
सावधपणेंचि नृपवर । तुच्छ केले ॥
तीर्थक्षेत्रें तीं मोडिलीं । ब्राह्मणस्थानें बिघडिली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥
देवधर्म गोब्राह्मण । करावयासी रक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठायीं ॥
या भूमंडळाचे ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं ।
महाराष्ट्र धर्म राहिला कांहीं । तुम्हांकरितां ॥
आणखी कांहीं धर्म चालती । श्रीमंत होऊनि कितेक असति ।
धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥
कितेक दुष्ट संहारिला । कितेकांस धाक सुटला ।
कितेकांसि आश्रय जाहला । शिव कल्याण राजा ॥
तुमचे देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें ।
ऋणानुबंधे विस्मरण जहालें । बा काय नेणुं ॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । सांगणें काय तुम्हां प्रती ।
घर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥
उदंड राजकारण नटलें । तेथें चित्त विभागले ।
प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥
या पत्राचें उत्तर त्याच शिष्याबरोबर पाठवून शिवाजी चाफळास आले. व तेथून शिंगणवाडीचे मारुतीजवळ गेले. शिवाजीचें पत्र आणि शिवाजी बहुतेक बरोबरच पोंचले. शिवाजीची व रामदासांची तेथे भेट झाली व शिवाजीनें अनुग्रह मागितला. कल्याण गोसाव्याच्या सम्मतीनें रामदासांनीअनुग्रह देण्याचे ठरविलें. शिवाजी महाराजांस दिवाकर गोसावी यानें पूजा सांगितली. रामदासांनी महाराजांस त्रयोदशाक्षरी मंत्रानुग्रह केला व दासबोधांतील तेराव्या दशकांतील सहाव्या समासांत सांगितलेला लघुबोध केला. नंतर शिवाजीनें रामदासांस पुष्कळ गुरुदक्षिणा दिली आणि रामदासांनी शिवाजी महाराजांस मेजवानी दिली. ही भेट शके १५७१ (सन १६४९) विरोधीनाम संवत्सरे वैशाख शुद्ध ९, गुरुवारी झाली.
याप्रमाणे बखरींतील वर्णन आहे. यावरून भेटीच्या वेळी शिवाजीनें प्रतापगड बांधून तेथें श्रीभवानीची स्थापना केली होती, त्याच्या ताब्यांत कोंकणपट्टी आली होती; तसेच सातारा-माहुली-वाई हा प्रांतही त्याच्या ताब्यांत आला होता, असे म्हणणें सहजच प्राप्त आहे. पण या सर्व गोष्टी शके १५८३|८४ म्हणजे सन १६६२ नंतरच्या आहेत. रामदासांनी शिवाजीस लिहिलेले पत्रही विचार करण्यासारखे आहे. त्यांत विशेषतः शिवाजीला जलपति असे म्हटले आहे. हें विशेषण शिवाजीनें समुद्रकांठी किल्ले बांधून आरमार तयार केल्यानंतर त्याला अन्वर्थक होईल. इतिहासाप्रमाणे शिवाजीने किल्ले व आरमार शके १५८५|८६ म्हणजे सन १६६३/६४ त बांधलें हेंहि निर्विवाद आहे.
तेव्हां शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या वेळची बखरींत लिहिलेली परिस्थिति व सन १६४९ हा भेटीचा काळ यांचा मेळ मुळींच बसत नाहीं व म्हणून हा सांप्रदायिक कालनिर्देश चुकीचा आहे असे म्हणणें प्राप्त आहे.
हीच गोष्ट दासबोधावरूनही सिद्ध होते. समग्र दासबोधाचें जें मागें सिंहावलोकन केले आहे, त्यांत असे दाखविले आहे कीं, रामदासांनीं प्रथमतः आठच दशक दासबोध लिहिला असावा व या आठ दशकांत केवळ आध्यात्मिक उपदेश असल्यामुळे या ग्रंथाचे पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झाली असेल हें शक्य दिसत नाहीं. कारण अशी भेट जर खरोखरी झाली असती तर त्यांच्या भेटीचा रामदासांच्या मनावर परिणाम झाला असता. निदान शिवाजीच्या राजकारणाच्या उद्योगाची रामदासांस महती वाटूं लागून त्यांच्या उपदेशांत या उद्योगाची छटा अवश्यमेव उमटली असती. व ती दासबोधांत प्रथमपासूनच दिसली असती. पण दासबोधावरून तसें दिसत नाहीं. आतां दासबोधाचा रचनाकाल आनुषंगिक रीतीनें दासबोधांत आला आहे.
दासबोधाच्या सहाव्या दशकाच्या चवथ्या समासाचे प्रारंभी युगाची कालगणना सांगितली आहे त्यांत खालील ओवी आहे:-
चार सहस्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहाटी ।
उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥
बखरीतील कालनिर्देश चुकीचा आहे हे म्हणणे आणखी एका ऐतिहासिक गोष्टीनें सिद्ध होतें. शिवाजी व रामदास यांची भेट जर सन १६४९ मध्ये खरोखरी झाली असती व त्यावेळी शिवाजीने जर अनुग्रह घेतला असता तर आपल्या गुरूच्या देवळास व मठास कांहीं तरी कायमचें उत्पन्न त्यानें हटकून करून दिले असते. पण शिवाजीनें चाफळच्या मठास किंवा परळीच्या मठास सन १६७४ पूर्वी नक्त किंवा गांवें इनाम दिल्याचा दाखला सांपडत नाहीं. सर्व सनदा १६७४ पासून १६८० पर्यंतच्या व पुढे संभाजी महाराजांच्या वेळच्या आहेत. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन व सातशें होन दिले ही बखरींतील हकीगत स्वतंत्र सनदांसारखा पुरावा नव्हे हे उघड आहे.
भेटीचा सांप्रदायिक शक चुकीचा आहे असें अर्वाचीन इतिहासकारास दिसून येऊं लागल्यामुळे व हनुमानस्वामींच्या बखरींत एका ठिकाणी संवत्सराचें नांव 'विकारी' असें दिल्यामुळे व बखरांतील तीथ व वार ही या 'विकारी' संवत्सराशीं जुळत असल्यामुळे शक १५८१ हा भेटीचा खरा शक असला पाहिजे अशी कांहीं जणांनी कल्पना काढली. कारण शक १५८१ सन १६५९ याच वर्षी शिवाजीनें (या सालाचा संवत्सर 'विकारी' नांवाचा आहे.) अफजूलखानास मारिलें व अफजूलखानास मारल्यावर शिवाजी रामदासांस भेटावयास गेला व त्या वेळीं शिवाजीला उद्देशून आठराव्या दशकांतील सहाव्या समासांतील उत्तम पुरुषलक्षणाचा समास रामदासांनी सांगितला अशी दंतकथा आहे. तेव्हां सन १६५९ हाच भेटीचा काळ असला पाहिजे असे प्रतिपादन करण्यांत येऊं लागलें. पण या म्हणण्याला खरोखरी जुना कोणताच पुरावा नाहीं. अफझुलखानाच्या वधानंतर लागलीच शिवाजीमहाराज रामदासांस भेटले ही दंतकथा मागें दिलेल्या रचनाकालावरून उघड खोटी ठरते. कारण याच साली रामदास दासबोधाचा साहावा दशक लिहीत होते ही गोष्ट निर्विवाद आहे. साहांपासून अठरा दशक त्यांनी पांचसात महिन्यांत लिहिले असतील असे संभवत नाहीं. तेव्हां हा उत्तम पुरुषलक्षण समास रामदासांनी शिवाजीच्या त्या प्रसंगाला अनुसरून मागून केव्हां तरी लिहिलेला असावा व तो पुढे मोठ्या दासबोधांत अन्तर्भूत केला गेला असावा. शिवाय 'विकारी' हें नांव हनुमानस्वामींच्या बखरींत अगदी नजरचुकीनें पडलें आहे यांत शंका नाहीं. कारण हनुमानस्वामींनीं प्रथम भेटीचा शक १५७१ धरून पुढील सर्व विवेचन केले आहे. म्हणजे रामदास परळीस १५७२ शकांत आले असे म्हटले आहे. खेरीज प्रथम भेटीचा काळ शके १६८१ धरला तरी भेटीच्या वेळीं बखरींत वर्णिलेल्या शिवाजीच्या परिस्थितीशीं या शकाचाही मेळ बसत नाहीं. तेव्हां सन १६५९ हा भेटीचा खरा काळ असे मानतां येत नाहीं. कारण त्याला सांप्रदायिक किंवा ऐतिहासिक कोणताच पुरावा नाहीं.
तेव्हां शिवाजी महाराजांची व समर्थ रामदासांची प्रथम भेट खरोखरी केव्हां झाली हा प्रश्न शिल्लक राहतोच.
या प्रश्नावर प्रकाश पाडणारा व या प्रश्नाचें निश्चित उत्तर देणारा पुरावा महाराष्ट्र इतिहासाचा व महाराष्ट्रीय जुन्या वाङ्मयाचा मोठ्या आस्थेनें व कळकळीनें शोध करणारे व त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणारे धुळ्यांचे रा. चांदोरकर[१] यांना सांपडल्यावर त्यांनीं तो अंशतः केसरींत प्रसिद्ध केला आहे. या पुराव्याचा निर्विकार व शांत मनानें विचार केला असतां रामदासांच्या व शिवाजीच्या भेटीच्या कालाचा वाद शिल्लक रहातच नाहीं. पण रामदास व शिवाजी यांचा संबंध कशा प्रकारचा होता याबद्दल आधच एक ठाम मत बनविल्यामुळे रा. देव व रा. राजवाडे यांनी हा वाद चालू ठेवला आहे किंवा आपल्या पहिल्या प्रश्नावरील मताला अनुरूप असा पुरावा पुढें सांपडेल अशा भरंवशावर ते सांप्रदायिक कालालाच चिकटून राहिले आहेत.
रा. चांदोरकरांना या कागदपत्रांचा शोध कसा लागला ही हकीकत मनोरंजक असल्यामुळे ती येथे देणें अप्रस्तुत होणार नाहीं.
रा. चांदोरकरांच्या मालेगांवच्या एका एंजिनीयर मित्राची त्यांना एकाएकीं मालेगांवास ताबडतोब निघून या ह्मणून तार आली. त्याप्रमाणें ते मालेगांवास गेले. तेथे त्यांच्या मित्राने सांगितलें कीं, माझ्या कचेरीतील उपाध्ये नांवाच्या कारकुनाच्या घरीं जुने कागद आहेत व ते आपल्याला कागदपत्र देण्यास तयार आहेत. पण आपणास त्यांचे घरी रात्रीं बारा वाजतां गेलें पाहिजे. कारण हे कागदपत्र एका जस्ती पेटींत असून ती पेटी जमिनीत पुरलेली आहे. मागें हे कागद हाती लागण्याची कै. रानड्यांनी खटपट केली होती. पण त्यांना त्या वेळीं यश आलें नाहीं व पुन्हां आपले कागदपत्र बाहेर जाऊं नयेत म्हणून आमचे कारकुनाचे वृद्ध वडिलांनी याप्रमाणें ते बंदोबस्तांत ठेविले. आमचे कारकुनाचे मातोश्रीस वाईट वाटूं नये म्हणून अशा गुप्त रीतीनें ते कागदपत्र देण्यास ते गृहस्थ तयार आहेत." अर्थात् ठरल्याप्रमाणें चांदोरकरांनीं रातोरात तो कागदपत्रांचा संग्रह घेऊन ते धुळ्यास परत आले. या संग्रहांत दोनअडीचशें कागदपत्रे आहेत. मालेगांवचे उपाध्ये हे रामदासस्वामींच्या हयातीपासून व त्यांचे पश्चात् चाफळ व सज्जनगड या मठांची व्यवस्था पाहणारे दिवाकर गोसावी यांचे वंशज होत. तेव्हां या कागदांच्या अस्सलपणाबद्दल शंका घेण्याचे कारण नाहीं. या लेखकानें हे अस्सल कागदपत्र स्वतः काळजीपूर्वक पाहिले आहेत व या कागदपत्रांत कोठेंही मागाहून दुरुस्त्या किंवा संशयास्पद आकडे वगैरे नाहींत; कागदपत्रांतील मजकूर स्पष्ट व सुवाच्य आहे. या कागदपत्रांवरून या वादावर कसा प्रकाश पडतो तें पाहू.
प्रकृत विषयास लागू अशीं पत्र दिवाकर गोसावी यांना त्यांच्या आप्तांकडून किंवा शिष्यशाखेतील बंधुवर्गाकडून आलेली किंवा त्यांनीं दुसऱ्यांस पाठविलेलीं आहेत.
या पत्रांवरून रामदासांनीं दिवाकर गोसावी यांस आपल्या हयातीत चाफळ संस्थानची सर्व व्यवस्था करण्यास व राजदरबारचें काम करण्यास अधिकार दिला होता व आपल्या पश्चातही हा अधिकार त्यांजकडे असावा अशी समर्थांची आज्ञा होती असे दिसते. पण रामदासांच्या पश्चात् उद्धव गोसावी यांना आपल्या हातांत सत्ता असावी अशी महत्वाकांक्षा उत्पन्न होऊन उद्धव गोसावी व दिवाकर गोसावी यांचेमध्यें कटकट उत्पन्न झाली व ती कटकट संभाजी महाराजांकडे जाऊन त्यांनी दिवाकर गोसाव्यासारखा निकाल दिला. याला कल्याणस्वामींची अनुमती होती. या बाबतींतील कल्याणस्वामींचें एक पत्र परिशिष्टांत छापले आहे. रामदासांच्या शिष्यांमध्यें संस्थानच्या व्यवस्थेसंबंधी पुनरपि तंटे उत्पन्न होऊं नयेत म्हणून शाहूच्या कारकीर्दीत रामदासांच्या शिष्यमंडळीच्या अनुमतीनें रामदासांच्या वडील बंधूंच्या घराण्यांतील पुरुषाकडे संस्थानची व्यवस्था वंशपरंपरेनें देण्यांत आली. दिवाकर गोसाव्यांच्या घराण्यांत हीं अस्सल पत्रे कां राहिली हे कळण्याकरितां ही माहिती सांगितली.
या लेखकाच्या बुद्धीप्रमाणें रा. चांदोरकर यांना सांपडलेले कागदपत्र म्हणजे रामदासस्वामींच्या चरित्रासंबंधींच्या अंधारांत वाटोवाट लावलेल्या कंदिलाप्रमाणे आहेत. या पत्राच्या अनुरोधानें रामदासांच्या चरित्राची
वाट न ठेचळतां चालून जाणें शक्य झाले आहे. तरी आतां आपण ही वाट पुन्हां एकदां चालूं.
रामदासांनीं चाफळीस राम व मारुती यांचें देऊळ बांधून आपल्या दासपंथी सांप्रदायास सन १६४८ मध्ये सुरुवात केली ही गोष्ट निर्विवाद असून सर्व पक्षांस कबूल आहे.
या पंथाचा व सांप्रदायाचा प्रसार करण्यास रामदासांस पांच सहा वर्षे तरी लागलीं. पंथाचा प्रसार झाल्यावर या पंथाला कायमचें व निश्चित स्वरूप येण्याकरितां रामदासांनी आपल्या पंथाच्या तत्वांचें अधिकारवाणीनें विवेचन करणारा ग्रंथ लिहिण्याचें मनांत आणिलें व मठासारख्या गडबडीच्या व शिष्यांनी गजबजलेल्या ठिकाणीं ग्रंथ लिहिण्यास लागणारी शांतता मिळणार नाहीं म्हणून रामदास ग्रंथ लिहिण्याकरितां शिवतरच्या घळींत राहण्यास गेले. ते केव्हां गेले व तेथें ते किती दिवस होते या गोष्टी दिवाकर गोसाव्याच्या खालील पत्रावरून स्पष्ट दिसून येतात.
चिरंजीव राजेश्री बहिरंभट गोसावी यासि प्रति दिवाकर गोसावी मु॥ चाफल अनेक आसीर्वाद.
तुम्ही पत्र पाठविल्ले ते वाचोन लेखनार्थ अवगत झाले तुम्ही अम्हास येण्याविशी लिहिले तर श्रीसमर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंभ केला आणि सांगितले की श्रीकडिल हरयेक विशि बोभाट येउ नये म्हणुन आम्हा सांगितले आणी सर्व मडळीस आज्ञा की तुम्ही श्रीचे उत्सवाची भी(क्षा) करून आमचे स्वाधीन करावी म्हणून सर्वास सांगीतले त्याप्रमाणे सर्व मंडळी निघोन गेली आणि अपण व कल्याण गो॥ व चिमणाबाई अका व अनंत कवी यास बराबर घेऊन एकांत स्थानि शिवथरचे घळीत जाउन बसले तुम्ही श्री महालेश्वरचे देवालयाचे काम चांगले रीतीनें करवावे भास्कर गो। आल्ले म्हणजे मी येक दीवसाचे अवकाशे येतो कळावे मिति मार्गशीर्ष वद्य ५ शके १५७६ लोभ करावा हे आसीर्वाद. (१८ डिसेंबर १६५४ सोमवार.)
हें पत्र सन १६५४ सालांत लिहिलेले आहे. समर्थ दहा वर्षे चाफळीं येणार नाहींत व मठाची व देवस्थानाची व्यवस्था त्यानीं शिष्यांवर व विशेषतः दिवाकर गोसाव्यावर सोपविली होती; या काळीं मठाचा खर्च निवळ भिक्षेवर चालू होता; त्याला कांहीं इनाम किंवा नेमणूक नव्हती या गोष्टी निर्विवाद सिद्ध होतात. यावरून रामदास सन १६५४ पासून १६६४ पर्यंत ग्रंथ लिहिण्यांत गुंतले होते असे सिद्ध होतें. व या दिवाकर गोसाव्याच्या पत्राला प्रत्यंतर पुरावा दासबोधांत आहे. कारण सन १६५९ मध्ये म्हणजे ग्रंथ लिहिण्यास एकांतांत राहण्यास गेल्यावर चार वर्षांनी सहाव्या दशकापर्यंत ग्रंथ आला होता; ही गोष्ट मागें दाखविली आहे.
दहा वर्षात रामदास केव्हांही बाहेर गेले नसतील असें नाहीं. तेव्हां जरी पुढें मागें रामदास दुसरीकडे होते अशा आशयाचें पत्र पुढे आले तरी त्यानें दिवाकर गोसाव्याच्या या पत्रांतील मजकूर खोटा ठरणार नाहीं. कारण दिवाकर गोसाव्याच्या पत्राचा अर्थ इतकाच कीं, मठाकडे व त्याचे व्यवस्थेकडे ग्रंथ पुरा होईपर्यंत लक्ष द्यावयाचें नाहीं, असें रामदासांनी ठरविलें होतें. अर्थात् रामदासांच्या या एकांतवासाचे काळांत मठाच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी शिष्यमंडळीवर पडली व त्याकरितां शिष्यमंडळी त्या प्रांतांत फिरून भिक्षेवर मठाचा खर्च चालवीत असत. ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास आलेल्या भास्कर गोसाव्याच्या पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते.
श्रीगुरुभक्तपरायण मोक्षश्रीया विराजित दिवाकर गोसावि या प्रती
भास्कर गोसावि नमस्कार विनंती उपरि श्रीचे उछाहा * होनु पनास भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावि बराबर पाठविले पावतील शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो त्यानी **रिले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता त्यावरून आम्ही बोललो की आम्ही रामदासी श्रीसमर्थाचे शिष्य चाफळास हों मग ते बोलले कीं ते कोठें राहतात व मुळ गांव कोण त्याजवरून मी सांगितले की गंगातिरिचें जांबचे राहणो प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उत्साव मोहोत्सव चालु करून आम्हा सर्वास आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उत्साह करीत जावा सांगितल्यावरून अम्ही हिंडत आहो असे बोलता राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिविस यास प्रतिवर्षि श्री उत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते हो * * स येतील कळावे फालगुन शु० २ शके १५८०. हे विनंति. (१३ फेब्रुवारी रविवार १६५८.)
हे पत्र सन १६५८ मधलें आहे. म्हणजे या पत्राचा मेळ पूर्वीच्या दिवाकर गोसाव्याच्या पत्राशी पूर्णपणें मिळतो. रामदासांच्या एकांतवासाच्या काळी शिष्य भिक्षा मागून संस्थानचा खर्च चालवीत होते. अशी भिक्षा मागत असतां भास्कर गोसावी हे शिवाजीराजे भोसले यांचे कडे भिक्षेकरितां गेले असतां शिवाजी मठाची हकीकत त्यांस विचारतात. त्या मठाबद्दल व रामदास साधूबद्दल त्यांचा अनुकूल ग्रह होऊन ते वर्षास दोनशें होन देऊं करतात. या गोष्टी किती सरळ व स्वाभाविक रीतीने या पत्रांत आल्या आहेत, हे पहा. या पत्रावरून रामदासांची माहिती शिवाजीला या सालापूर्वी नव्हती असे निःसंशयपणें ठरतें व म्हणून भेटीचा सांप्रदायिक काल खोटा ठरतो.
या पत्राची एक नक्कल रा. देव यांना रा. चांदोरकर यांचे आधींच सांपडली होती व नंतर अस्सल पत्र रा. चांदोरकरांना सांपडलेल्या कागदपत्रांत सांपडलें. यावरून या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका रहात नाहीं. या पत्राचा शांतपणे विचार करणारास त्यांत संदिग्धपणा कोठेंच दिसणार नाहीं. त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे.
पण आपल्या आवडत्या भावनेला धक्का बसतो ह्मणून रा. राजवाडे व रा. देव या पत्रांत व्यंग्यार्थ काढतात! त्यांचे म्हणणें हें कीं, शिवाजीनें भास्कर गोसाव्यास जे रामदासांसंबंधी अनोळख्यासारखे प्रश्न विचारले ते भास्कर गोसाव्याची परीक्षा पाहण्याकरितां व जाणून बुजून खोटे विचारले. पण या पत्राचा असा अर्थ करण्यापासून किती विपरीत कल्पना मानाव्या लागतात? शिवाजी महाराजांची व रामदासांची भेट सन १६४९ मध्यें झाली होती असे धरलें तर १६४९ पासून १६५८ म्हणजे नऊ वर्षेपर्यंत शिवाजीनें या मठास कांहींच मदत केली नाहीं असें होतें. कारण अशी मदत चालू असती तर ती भिक्षा मागावयास जाणाऱ्या शिष्यास अवश्य ठाऊक असती, व हें ठाऊक असतां, तो शिष्य शिवाजीकडे भिक्षा मागण्यास गेला असता कसा? शिवाय दुसराही एक असंभवनीय प्रकार या व्यंग्यार्था वरून निघतो. शिवाजी प्रत्यक्ष रामदासाला भेटल्यावर व त्याजपासून अनुग्रह घेतल्यावर मठास कांहीं नेमणूक करून देत नाहीं व भास्कर गोसाव्या सारख्या शिष्याच्या तोंडी माहितीवरून वार्षिक दोनशें होनांची भिक्षा देतो, हें किती विचित्र वर्तन आहे! यावरून रामदासांपेक्षां भास्कर गोसावीच जास्त अलौकिक कर्तबगारीचा पुरुष दिसतो! सारांश, हा व्यंग्यार्थाचा खटाटोप बुडत्या माणसानें काडीचा आश्रय करण्यासारखा आहे.
या पत्रावरून भेटीचा सांप्रदायिक कालनिर्णय पार ढांसळतो हे उघड आहे व म्हणून व्यंग्यार्थाचा व्यर्थ खटाटोप सांप्रदायिक काळाच्या पुरस्कर्त्यांना करावा लागतो.
सन १६६४ मध्ये ग्रंथ समाप्त करून रामदास परत चाफळी आले त्या वेळी किंवा शिष्यांच्या सांगीवरून आधीसुद्धां त्यांना शिवाजीच्या दोनशे होनांच्या नेमणुकीची हकीगत कळली असली पाहिजे. तेव्हांपासूनच रामदासांचें लक्ष शिवाजीच्या चरित्राकडे, त्याच्या उद्योगाकडे व त्याच्या उद्योगानें लोकांच्या स्थितीत पडलेल्या फरकाकडे लागले असावें.
या गोष्टीकडे एकदां लक्ष लागल्यापासून त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीला व्यावहारिक व राजकारणी दृष्टीची जोड झाली असावी व त्या दृष्टीची छटा त्यांच्या पुढील कवनांत उमटली असावी. दासबोधांतील उपदेशभेदाची हीच उपपत्ति या लेखकास पटते. उपदेशभेदाचा व त्याच्या उपपत्तीचा विषय हा अमूर्त असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष कागदोपत्रीं पुरावा सांपडणें अशक्य आहे. असो.
रामदास चाफळास परत आले, तो काळ शिवाजीच्या आयुष्यांतील अत्यंत आणीबाणीचा व अत्यंत संकटाचा होता. औरंगजेब बादशहानें शिवाजीचा बीमोड करण्याकरितां भगीरथ प्रयत्न सुरू केले होते व त्यावेळी शिवाजीला माघार खाऊन औरंगजेबाशीं तह करून दिल्लीस जावें लागलें. दिल्लीहून सुटका होऊन देशीं परत येण्यास शिवाजीस २।२॥ वर्षे लागलीं. परत आल्यावर शिवाजीनें गेलेलें राज्य पुन्हां परत मिळविण्याचा अटोकाट प्रयत्न केला व त्याच्या प्रयत्नाला यशही आलें. पण या धांदलीच्या गडबडीच्या व मानसिक अस्वस्थतेच्या काळीं रामदासांची हकीगत सन १६५८ सालीं कानांवर गेली असतांना रामदासांस भेटावयास शिवाजी महाराजांस सवड झाली नसावी हे उघड आहे.
पण १६७२ मध्ये शिवाजी सातारा व कऱ्हाड या प्रांतांत येऊन हा मुलुख त्याच्या ताब्यांत आला तेव्हां रामदासांची भेट घ्यावी अशी त्यालाही इच्छा झाली असावी व शिवाजी आता आपल्या मठाच्या आसपास आलेला आहे असें पाहून रामदासांनींही बखरींतील प्रसिद्ध पत्र शिवाजीस पाठविले असावें. कारण १६७२ या सालीं या पत्रांत दिलेली सर्व विशेषणें व शिवाजीचा केलेला गौरव व विशेषतः 'नृपवर तुच्छ केले' हे म्हणणें योग्य होतें. तेव्हां रामदासांचें असें पत्र आल्यावर शिवाजीनें रामदासांस भेटण्याचा निश्चय केला; ही गोष्ट दिवाकर गोसाव्यास केशव गोसाव्यांनीं लिहिलेल्या खालील पत्रावरून स्पष्ट होतें.
श्रीरामदासस्वामी.
प्रतिपूर्वक के + (श) व गोसावि नमस्कार उपरि येथील कुशल + (आ) पण पत्र पाठविले ते पावले मजकूर समजला राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले मी येणार होतो परंतु माझी प्रकृति फार बिघडली येणें होत नाहीं मी इकडून अकास येणेसाठी लिहिले परंतु अकाचेही येणे व्हावयाचे नाही गावी भानजी गोसावी तेथे असतील राजे यांची पहिलीच भेट आहे वाडीचे लोकास खटपटेस अणावे उपयोग होईल झाडी बहुत आहे इकडून उदईक त्रिंबक गो। व विट्टल गो। व दत्तात्रय गो। उदइक पाठउन देतो श्रीचे उत्सवास भीक्षेचे धान्य जे मिळाले ते अश्वत्थ भट मसुरकर या समागमे पाठविले दत्ताजीपंताकडु x (न) दोनशे होनु उत्सावास पाठविले ते अले असतील लोभ करावा मीती चैत्र व॥ १ शके १५९४ हे विज्ञप्ति. (४ एप्रिल बुधवार १६७२.)
हे पत्र या लेखकानें दोनतीन वेळां लक्षपूर्वक पाहिले आहे. तें अस्सल पत्र आहे यांत शंका नाहीं. त्या पत्रावरील शक अगदीं स्पष्ट आहे. रा. देव नवांच्या आंकड्याबद्दल संशय व्यक्त करतात. पण त्यांत मुळींच हंशील नाहीं. नऊ मोडी लिहितांना एक टांकी लिहितात तसा हा नवांचा आंकडा न लिहितां पूज्य काढून त्याला नवांचा रफार जोडला आहे इतकाच फरक आहे. पण अशा तऱ्हेची नऊ काढण्याची रीत या लेखकानें कित्येक पत्रांत पाहिली आहे. तेव्हां या पत्रासंबंधी असले कुतर्क व्यर्थ आहेत. या पत्रांतील अर्थही स्पष्ट व सरळ आहे. शिवाजीराजे भोसले हे रामदासास प्रथमच भेटावयाचे असल्यामुळे दिवाकर गोसाव्याने सर्व शिष्यमंडळीस त्या समारंभास आग्रहानें बोलावावें हें रास्त आहे. केशवगोसावी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आपणाला व आकास येण्यास होत नाहीं असे लिहितात. दुसऱ्या शिष्यास पाठवून देण्याचेंही लिहितात, व शिवराजाची ही समर्थांशी पहिली भेट असल्यामुळे गांवकरी बोलावून सर्व व्यवस्था उत्तम तऱ्हेची करण्यास दिवाकर गोसाव्यास सांगतात. शिवाय ज्याप्रमाणें दिवाकर गोसाव्याचे समर्थांच्या एकांतवासाबद्दलच्या पत्राचा व भास्कर गोसाव्याच्या पत्राचा मेळ बसतो त्याचप्रमाणें या केशव गोसाव्याच्या पत्राचा भास्कर गोसाव्याच्या पत्राशीं पूर्ण मेळ बसतो. कारण शिवाजीनें रामदासाबद्दलच्या व मठाबद्दलच्या भास्कर गोसाव्याच्या तोंडी हकीकतीवरून दर वर्षास दोनशें होन देण्याची जी नेमणूक केली होती ती सारखी चालू होती व चाफळच्या मठाची व्यवस्था अजूनही भिक्षेवरच चालू होती; हें या केशव गोसाव्याच्या पत्रावरून दिसतें, या पत्रांतील मजकुराचा विचार केला व मागे दिलेल्या पत्रांचा विचार केला तर शिवाजीची प्रथम भेट याच सालांत झाली याबद्दल मनाची बालंबाल खात्री होते. पण रा. देव व रा. राजवाडे या पत्रांतही भास्कर गोसाव्याच्या पत्राप्रमाणे क्लिष्ट कल्पना व व्यंग्यार्थ काढतात. राजवाड्यांच्या मतें प्रथम भेट याच्या आधीं 'या मुलाखतीतील' असे शब्द गृहीत धरावे म्हणजे झालें! मग या पत्राचा असा अर्थ होतो कीं, महाराजांच्या व समर्थांच्या पूर्वी किती तरी मुलाखती झाल्या होत्या व अशा एका मुलाखतींतील ही प्रथम भेट होय. रा. राजवाडे यांची ही कल्पना वाचून या लेखकास पुनर्विवाहाच्या वेळच्या वादाची आठवण झाली. त्या वादाचे वेळीं 'नष्टेमृते' या प्रसिद्ध श्लोकाचा पुनर्विवाहपर अर्थ खोडण्याकरितां 'पतीच्या' ठिकाणी 'अपति' असें रूप धरावें म्हणजे झाले अशी क्लिष्ट कल्पना जुन्याच्या अभिमान्यांनी काढली होती त्यासारखीच रा. राजवाडे यांचीहि कल्पना आहे. त्या वादाची त्यांना माहिती नसल्यामुळे त्या वेळची सोपी युक्ति त्यांना सुचली नसावी व म्हणून 'या मुलाखतीतील' इतकें लांबलचक पद गृहीत धरण्याची कल्पना त्यांना काढावी लागली! नाहींतर इतके जास्त शब्द घालण्या ऐवजी 'समर्थांचे' पाठीमागें 'अ' असें अक्षर आहे व म्हणून हें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीबद्दल मुळींच नाहीं; व अर्थात् या पत्रावरून भेटीचा काल मुळींच शाबीत होत नाहीं असें त्यांना म्हणतां आलें असतें! मन एकदां पूर्वग्रहदूषित झाले म्हणजे तें अर्थ लावण्यांत काय काय मौज करूं शकतें याचा या पत्राचा वरील प्रकारचा व्यंग्यार्थ हा उत्तम मासला आहे.
पण पूर्वग्रहविरहित माणसास हें केशव गोसाव्याचें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या कालाचा प्रत्यक्ष पुरावा आहे हे उघड आहे. तेव्हां आतां हातच्या कांकणाला आरसा कशाला! पण रा. चांदोरकरांच्या कागदपत्रांत असलीं आरसेवजाही पत्रे आहेत; त्यावरून या प्रश्नावर कायमचा उजेड पडून त्याचा निकाल झाला आहे असे म्हणावे लागेल असे वाटतें. पण पुढे जाण्यापूर्वी या पत्राच्या अनुरोधानें शिवाजीमहाराजांच्या व रामदासांच्या प्रथम भेटीचा नक्की काल ठरवू या.
केशव गोसाव्याच्या पत्राची तिथि चैत्र व॥ १ शके १५९४ (सन १६७२) अशी आहे. या सालाच्या संवत्सराचें नांव 'परिधावी' असे आहे. सांप्रदायिक कथेप्रमाणे शिवाजीला गुरुमंत्र गुरुवारी झाला असे आहे. या पत्राच्या मितीला बुधवार होता; तेव्हां दुसरेच दिवशीं भेटीचा दिवस नसला पाहिजे. कारण दूरच्या शिष्यांना येण्यास सवड सांपडे अशा तऱ्हेनें आगाऊ पत्र दिवाकर गोसाव्यानें पाठविली असली पाहिजेत. व केशव गोसावी याच पत्रांत दुसऱ्या शिष्यांस उदईक पाठवितों असे म्हणतात तेव्हां दुसऱ्या दिवशींचा भेटीचा दिवस नसावा. पण तो चैत्र वद्य प्रतिपदेपासून फारसा लांबही नसावा. अर्थात् तो चैत्र वद्य नवमी हा दिवस असावा हे उघड होतें. वैशाख शुद्ध नवमी हा या पत्राच्या तिथीपासून फार दूर आहे. शिवाय रा. चांदोरकर यांनी पंचांगावरून असे काढले आहे कीं, चैत्र वद्य नवमी परिधावीनाम संवत्सरे हा फार चांगल्या मुहूर्ताचा दिवस आहे. त्या दिवशीं अमृतसिद्धियोग आहे व उत्तराषाढा नक्षत्र आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असला पाहिजे. (या मुहूर्ती महाराजांस अनुग्रह झाला असें कित्येक बखरींतून विधान आहे.) तेव्हां १२ एप्रिल सन १६७२ या दिवशीं शिवाजीची व रामदासांची प्रथम भेट झाली व बखरींत वर्णन केल्याप्रमाणे त्याच दिवशीं रामदासांनी महाराजांवर अनुग्रह केला व रामदासांनी त्यांना मेजवानी दिली असे निर्विवाद सिद्ध होते. या वेळीं रामदासांचें वय चौसष्ट वर्षंंचे होतें. अशा वयोवृद्ध, तपोनिष्ठ, पंथसंस्थापक, प्रासादिक कविसंताची ती भव्य, गंभीर व तेजःपुंज ब्रह्मचारी मूर्ति पाहून शिवाजी महाराजांची विलक्षण भक्ति रामदासांवर बसली यांत नवल काय? तेव्हांपासून त्यांचा गुरुशिष्यसंबंध झाला व तो दृढभक्तीचा व दृढ आदराचा झाला यांत शंका नाहीं. व याचें प्रत्यंतर पुढील हकीगतीवरून पटते.
शिवाजी व रामदास यांची प्रथमभेट त्या सालच्या उत्सवानंतर पंधरा दिवसांनींच झाली. तेव्हां उत्सवांत आपल्याला काय काय अडचणी येतात, लोक कसा त्रास देतात, चोरांचा कसा उपद्रव होतो आणि दोनशें होन कसे पुरत नाहींत, वगैरे हकीगत शिवाजी राजास रामदासांकडून कळली असावी आणि म्हणूनच परत गेल्यावर शिवाजीनें कऱ्हाड प्रांतीच्या आपल्या अधिकाऱ्यांस उत्सवाचे वेळी योग्य व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्याविषयी आज्ञापत्र पाठविले आहे. (परिशिष्ट पहा.) दोनशें होन पुरत नाहींत म्हणून शिवाजी महाराजांनीं चाफळच्या मठाचा कच्चा खर्च संभाळला व त्याप्रमाणें तिकडील अधिकाऱ्यास तिजोरींतून सर्व खर्च देण्याचे आज्ञापत्र सन १६७४ मध्ये काढलें. (परिशिष्ट पहा.) नंतर दोन वर्षांनी इनाम गांव करून दिले. रामदासांचा निकटवास घडण्याकरितां त्यांना नुकत्याच घेतलेल्या परळी किल्ल्यावर रहावयास बोलाविलें.
अशा प्रकारें रामदासांचा व शिवाजीचा निकट संबंध सन १६७२ त सुरू झाला. अर्थात् शिवाजीनें आपल्या राज्यारोहणाच्या बाबतीत बखरींत लिहिल्याप्रमाणें रामदासांची सल्ला मसलत व अनुमति घेतली असलीच पाहिजे. पुढे निरनिराळ्या वेळी चाफळ व सज्जनगड येथील मठांस गांव इनाम करून दिले आहेत. शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानांसकट परळीच्या रामोत्सवांत भाग घेत असत अशाबद्दल सातारच्या राजाच्या दफ्तरांतील सन १६८० मधील एक यादी इतिहाससंग्रहांत रा. ब. पारसनीस यानी प्रसिद्ध केली आहे. तिचा या हकीगतीशी मेळ बसतो. शिवाजीच्या मरणानंतर संभाजी महाराजांनीं चाफळच्या व परळीच्या मठाला पुन्हां इनामाच्या सनदा करून दिल्या आहेत. त्यांवरून रामदासांच्या मठाचा व शिवाजीच्या घराण्याचा गुरुशिष्यसंबंध चालू राहिला असे होतें. यावरून रामदासांनी संभाजीला उपदेशपर लिहिलेले पत्र खरें असावें असे दिसतें. त्या पत्रांत रामदासांच्या मनांत शिवाजीबद्दल किती आदरबुद्धि वसत होती हे व्यक्त झाले आहे. शिवाजीलाही रामदासांबद्दल किती आदर व पूज्यभाव वाटत होता हे त्याच्या सन १६७२ पासून १६८० पर्यंतच्या म्हणजे मरेपर्यंतच्या वर्तनावरून व त्यानें रामदासांच्या संस्थानांस केलेल्या कायमच्या मदतीवरून दिसून येतें.
शिवाजी व रामदास यांच्या पश्चात् दिवाकर गोसावी हा रामदासांच्या दोन्ही मठांची व्यवस्था पहात होता. त्याच्या वृद्धापकाळानंतर त्यांचा मुलगा बाहिरंभट हा कारभार पाहूं लागला. त्या वृद्धापकाळी लिहिलेली दोन पत्रे परिशिष्टांत छापलीं आहेत. त्या दोन्ही पत्रांत शिवाजीच्या प्रथम भेटीच्या सालाचा उल्लेख आहे. परिधावीनाम संवत्सरी शिवाजी महाराजांस रामदासांनीं परमार्थ सांगून अनुग्रह केला; तेव्हांपासून आपल्याकडे संस्थानचा कारभार रामदासस्वामींनी दिला आहे, याची आठवण सर्वास देण्यास पहिल्या पत्रांत आपल्या मुलाला लिहिले आहे व दुसऱ्या पत्रांत तीच आठवण देऊन आपल्या पश्चात् हा कारभार आपल्या मुलाकडे ठेवावा अशाबद्दल शिष्यवृंदाला दिवाकर गोसाव्यांनीं विनंति केली आहे. हीं दोन्हीं पत्र केशव गोसाव्याच्या पत्रांतील भेटीच्या कालाचा प्रत्यंतर पुरावा होत यांत शंका नाहीं.
वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, रा. चांदोरकर यांना अचानकपणे सांपडलेल्या कागदपत्रांनी रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या वादग्रस्त प्रश्नाचा कायमचा व समाधानकारक रीतीनें निकाल लागतो. या पत्रव्यवहारानें रामदासांच्या अंधुक चरित्रावर इतका उत्तम प्रकाश पडतो कीं, तें चरित्र ढळढळीत डोळ्यापुढे दिसूं लागतें. मात्र अंधश्रद्धा किंवा पूर्वग्रह यांची डोळ्यांवर आलेली झापडें दूर सारून डोळे उघडून त्या प्रकाशाच्या साहाय्यानें रामदासचरित्राकडे पाहिले पाहिजे. पण झापडें न काढण्याचा हट्ट धरल्यास कितीही प्रकाश पडला तरी त्याचा काय उपयोग होणार!
आतां रामदास शिवाजीचे राजकारण गुरू होते किंवा मोक्षगुरु होते हा वादग्रस्त प्रश्न राहिला. व त्याचा निकालही सहज करतां येतो. शिवाजीच्या आयुष्यांतील राज्यस्थापनेचें जें मुख्य काम तें बहुतेक संपेपर्यंत जर शिवाजीची व रामदासांची भेटच मुळी झाली नव्हती तर रामदासानें शिवाजीस राज्यस्थापनेला स्फूर्ति दिली व रामदास शिवाजीस राजकारणांत सल्लामसलत देत असे हे म्हणणें फोलच होतें. तेव्हां रामदास शिवाजीचे मोक्षगुरु किंवा धर्मगुरु होते असेच म्हणणे प्राप्त आहे. अर्थात् सन १६७२ पासून म्हणजे शिवाजीमहाराजांच्या आयुष्याच्या शेवटल्या आठ वर्षांत त्यांनी रामदासांची राजकीय कामांतही सल्लामसलत घेतली असेल, राज्यारोहाणाच्या बाबतीत तर अशी सल्लामसलत घेतली होती याला स्पष्ट दाखलाच आहे; तेव्हां ऐतिहासिक दृष्ट्या शिवाजीमहाराजांचा व समर्थ रामदासांचा प्रत्यक्ष संबंध दोघांच्या उतार वयांत घडून आला हें उघड आहे. प्रत्यक्ष भेटीपूर्वी या दोघांनाही एकमेकांची ऐकून माहिती सन १६५८ पासून झाली होती हेंही तितकेंच उघड आहे. कारण १६५८ पासून शिवाजीनें चाफळच्या मठास दरसाल दोनशें होनांची भिक्षा दिली होती व ही गोष्ट समर्थांना त्यांच्या शिष्याकडून कळली असलीच पाहिजे. एव्हांपासून रामदासांच्या आध्यात्मिक कल्पनांना राजकीय कल्पनांची जोड झाली असावी व त्याची छटा त्यांच्या कवनांत दिसूं येऊं लागली असावी हें पूर्वी दाखविले आहे.
याप्रमाणे या वादाचा निकाल लागतो. व त्यांत असमाधान वाटण्यासारखें कांहीं नाहीं. पण रामदास शिवाजीपेक्षां मोठे होते; रामदासांवांचून शिवाजीच्या हातून जें राष्ट्रीय कार्य झालें तें झालें नसतें अशी मनाची दृढ समजूत ज्यांनी करून घेतली आहे त्यांना हा निकाल पसंत पडत नाहीं. हल्लींच्या निकालावरून शिवाजीनें किंवा निदान शिवाजीच्या यशस्वी कार्याने रामदासांना राजकीय व व्यावहारिक कल्पना सुचल्या निदान त्यांचा कंठरवानें उपदेश करण्याची स्फूर्ति झाली व ह्मणून शिवाजी रामदासांपेक्षा मोठे असे विधान कोणी केलें तर तें अगदींच चुकीचे ठरणार नाहीं.
पण निरनिराळ्या व्यवसायांत आयुष्य घालविलेल्या विख्यात विभूतीबद्दल एकापेक्षां दुसरा मोठा अशी तारतम्याची तुलना करणेंच चुकीचे आहे. त्या दोन्हीही विभूति आपआपल्या परी मोठ्याच होत असे म्हणणेंच रास्त आहे.
रामदास शिवाजीपेक्षा मोठे किंवा शिवाजी रामदासांपेक्षां मोठे हा वाद गंगा यमुनेपेक्षा जास्त पवित्र किंवा यमुना गंगेपेक्षा जास्त पवित्र या उत्तर हिंदुस्थानांतील या नद्यांच्या महत्त्वासंबंधींच्या वादासारखा आहे. (दूरदूरच्या प्रांतांत गंगेस महत्त्व दिले गेलें आहे म्हणजे या पक्षापैकी एकाचा अंगीकार करण्यांत आला आहे.) पण हिंदुस्थानाच्या नकाशाकडे पाहणारास हा वाद चुकीचा वाटतो. या दोन्हीही नद्या एकाच हिमालयाला भेदून हिंदुस्थानच्या सपाट प्रदेशावर वाहात येतात; त्या दोन्ही नद्या आपआपल्या बाजूच्या हजारों मैलांच्या प्रदेशास आपल्या प्रवाहानें आपल्या पुरानें व पुरा बरोबर उत्तम वनस्पतींच्या खताच्या गाळानें सुपीकता आणतात व बऱ्याच प्रदेशापर्यंत जवळ जवळ समांतर वाहात जाऊन मग प्रयागास एकमेकींशीं संगत होऊन एकजीव बनून एकरूपानें आपला पुढला मार्ग आक्रमण करतात. त्याप्रमाणे शिवाजी व रामदास या दोन विभूति एकाच उदयोन्मुख महाराष्ट्रांत समकाळी जन्म घेतात व आपआपल्या परीनें- एक प्रत्यक्ष राज्यस्थापनेच्या उद्योगास सुरवात करून व तो यशस्वी करून, दुसरी आध्यात्मिक व व्यावहारिक उपदेशानें जनमनाची सुधारणा करून- राष्ट्रकार्य बऱ्याच काळपर्यंत एकमेकांस न कळतां व स्वतंत्रपणे करीत राहतात व आयुष्याच्या शेवटल्या भागांत गुरुशिष्य या नात्याने त्यांचा संगम होतो. तेव्हां अशा दोन विभूतींसंबंधीं तारतम्यानें मोठेपणाचा वाद करणें हें संकुचित बुद्धीचें लक्षण आहे. तरी असल्या शुष्क वादांत न पडतां महाराष्ट्रांत समकालीन उदयास आलेल्या या दोन विख्यात विभूतींच्या चरित्रापासून हल्लींच्या परिस्थितीला अनुरूप अशा तऱ्हेची देशसेवा करण्याची स्फूर्ति महाराष्ट्रीयांस होवो अशी आशा प्रदर्शित करून वाचकांची रजा घेतों.
लेख नं. १
लेख नं. २
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ७ रौद्रसवत्सर कार्तीक शस्टी इंदुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्रीराजाशंभू छत्रपती यांणी राजेश्री कासी रंगनाथ देशाधिकारी व देशलेखक प्रांत जाउळी यांस आज्ञा केली यैसा जे राजेश्री--- -गोसावी.
- यांस श्री-- देव वास्तव्ये कसबे चांफल यास प्रतीहि पूजेनिमित्य व नवेदास व देवाच्या सेवकास मोईन इ॥। (इस्तकबिल) सनद राजेश्री कैलासवासी स्वामी छ. २९ जिल्हेज सन खमससनैन (मंगळवार १६ मार्च सन १६७४.)
| येकूण मोईन | |
| मुशाहिरे देवाच्या सेवकास | देवाच्या नवेदास प्रतिही सामग्री |
| दर माहे होनु पातशाही | वजन टकबंदी |
| ३ पारपत्यगार १ | σσ६।. तांदुळ बारीक सडीक |
| ४ पुराणीक २ दर २ पुराणीक १ उपाध्या १ |
σσ६।. कणीक σσ२॥. दाळी |
| ५ हरिदास ४ दर १।. | σσ१।. तूप |
| ७ वाजंत्रीस दर १ यक | σσ.॥. तूप रु॥ मीठ |
| ४ पूजारे २ बी ता॥ | _______ |
| श्रीरघुनाथ १ श्रीहणुमंतास १ | σ। ६॥। ९ |
| १ माली १ यक. | दीपास तेल श्रीहनुमतास |
| १ झाडी फेडी करावयास १ यक | प्रतिही वजन टक σσ ॥।. |
| __ २५ |
देवाच्या पंचामृतास व परिमलद्रव्या- कारणें दररोज नक्थ खुर्दा १ टका. |
येकूण दरमाहे होनु पातशाही पंचवीस व दरोज मोईन वजन टकबंदी साडेसात पासरे नवटांक व नक्थ खुर्दा टका येक रास येणेप्रमाणें पेशजी पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ॥ (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे. तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी या पासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.
| रवाना छ २४ मास | मार्गशीर्ष वद्य ११ | लेखनालंकार |
| तेरीख ४ | माहे सौवाल | |
| सौवाल सन इहिदे | सुरुसुदवार | मर्यादेयं |
| समानीन बारसुद | छ २९ जिल्काद | विजयते |
| लेखन सीमा | रुजू सुरु नीवीस. | |
| समुल्लसति |
लेख नं. ३
मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तरि तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता॥ मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप यात्रा भरे ते करणे तुरकाचा अगर अगर हर कोण्हाचा उपद्रव न लगे यैसे करून व रामदास गोसावी याचा हि हरयेक विसी परामृश करीत जाणे देवाकरितां व गोसावियाकरिता ब्राम्हण येउनु तेथे घरे नवी बांधुनु राहताती त्याचा हि परामर्श करीत अंतर पडो ने दणे बहुत लिहीणे तरी तुम्ही सूज्ञ असा छ ७ रविलाखर शुहुर सन सला सबैन व अलफ प हुजुर
मर्यादेयं
विराजते
लेख नं. ४
- राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला
निये ताा तपे कोले गोसावी यास
- राजमान्य राजेश्री वेकाजी रुद्र सुभेदार व कारकूनानी महाला
सेवक दत्ताजी त्रिमल नमस्कार शहुर सन समान सबैन अलफ राजेश्री छत्रपति साहेबी सनद सति सबैनमध्ये लिहिली ती पैवस्ता (?) छ ११ माहे रविलावल सन सबामध्यें पावली तेथें अज्ञा केली होती की आपण श्री सिवतरी असतां त्याचे भेटीस गेलो होतों ते समई ते हि अज्ञा केली कीं श्री देव यास अकरा गाव इनाम देणें त्यावरून आम्ही त्याचे आज्ञेप्रमाणें ती गोष्टी मान्य केली मागुती यानें स्वामीने चि आज्ञा केली ते गाउ इनामी ह्मणोन देवाचे नावे लिहोन त्या गावीचे उत्पन्न होईल ते देवाचा प्रसाद ह्मणोन तुम्ही राजग्रहीं जमा करणें तुम्ही राजे तुम्हास देवाचा प्रसाद असावा या करितां दिल्हें आहे त्यापैकी दर गावासी अकरा बिघेप्रमाणें इनाम बागा करविल्या त्यामध्यें कांहीं बाग व काही बागा माडावियास खर्च लागेल त्या कारणे सेत यैसे करावे त्यास अवल जमीन पाणिया खालील यैसी पाहोन देवणे वरकड गावांतील प्रज राज राहोन गांव महामूर करावा आणि या अकरा बिघियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिघे बितपसील॥
| मौजे डेरवण | मौजे जाजगांव | मौजे चरेगांव |
| σ११ | σ११ | σ११ |
| मौजे सुदन | मौजे तांबवे | मौजे साल्हे |
| σ११ | σ११ | σ११ |
येकून अर्ध चावर साहा बिघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर बिघे ०।१३
| कसबे चाफल देखील | मौजे सींगणवाडी |
| बि ॥ σ१८ | σ१ |
| वाडी कारवजे चासई | मौजे चरथोडी |
| चाफल σ१ | माजगाउ σ५ १५ |
येकूण पाव चावर बारा बिघे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर बारमाला ताजे सनदेचा उजुर न करणे छ १५ माहे रजवु सदरहू इनामाचे खटपटे करणे येक ब्राह्मण राजेश्री साहेबी हुजुरुन दिला आहे त्याचे सनद आलाहिदा चालिलि आहे तेणे प्रमाणे त्याचे वेतन सालायाचे सालायास निवळ पाठवित जाणे प॥ हुजुर
मातेर्ब सुद
लेख नं. ५
सहस्रायु चिरंजीव भैरव भटासि प्रि (ति) पूर्वक दिवाकर गोसावी आसिर्वाद * चे (ते) थेचें वर्तमान ऐकिलें तेणें करून व्याकुलता बहुतचि जालों उपाय तो कर्तव्य आमचे हातीं ये समई कांहींच नाहीं क्लेशी मात्र जालों क्षेम जालें ऐसे वर्तमान ये ** (ईल) तेव्हां स्वस्थता वाटेल आमचे शरीर * (तो) गळीत जाले आहे परंत आल्प मात्र वेथा बरि जाली आणी आह्मासाठी येऊ म्हणाल तरी वेथा बदल होईल ऐसें न करणे पुरते बरे होउ देणे हे आसिर्वाद
हेच पत्री अनंत गोसावी याचा अनेक आसीर्वाद पूर्वी कैलासवासी सीवाजी राजे भोसले यासी परिधावी संवत्सरी शिंगणवाडीचे मटी श्री हनुमंतासमोर परमार्थ झाला ते समई मंडळी होती ते स (म) ई रामचंद्र पंत अमात्य व दत्ताजी पंत वाकेनिवीस यानी सर्वास जो सांगीतला त्याचें स्मरण सर्वास देत जाणे उत्धव गोसावी यानी समर्था अज्ञेची अवज्ञा केली (ह्म) णुन कलो अलें तुझी समयी अज्ञेप्रमाणे राहटी करणे हे
असिर्वाद
लेख नं. ६
श्री रामदासस्वामी
श्री रघुनाथ भक्तिपरायण उत्तम गुणालंकरण स्वधर्मैक निरत सात्विकभाव भूषित समस्त श्रीसमुदाइ बंधुवर्ग यां प्रति
प्रीतिपूर्वक दिवाकर गोसांविं कृतानेक नमस्कार विज्ञप्ति उपरि आमचे शरिर बहुता आसक्त जाहलें श्रीच्या दर्शनास यावें ऐसे होते व तुमचें समस्तांचे दर्शन होतें तुमचा व आमचा कित्येक प्रकारें पुढें श्रीचा कार्यभाग अल्पमात्र स्वबुधीनसार समर्थाच्या दयेकरून संपादिला होता व श्रीनी सर्व पारपत्य दया करून मज दीनास दिलेह तें आज पावेतों चालिलें व राजेश्री शिवाजी राजे भोसले याणी श्रीस पुजा समर्पिली तो काभार माझे स्वाधीन केला तोहि आज पावेतों चालिला पुढे काळगति प्रधान आहे परंतु समस्ताप्रति विनति कीं श्रीच्या इमारती चाफळी व गडीं लागल्या आहेत त्यांस ऐवज नाहीं स ऐसे ऐकिलें माझें शरीर तो परम अशक्त जाहलें कांहीं यत्न न चले तरि तेथे चिरंजीव भैरवभट आहे त्यास (विनं) ती केलि आहे जे जो श्रीचे उत्पन्न होईल तें निमे ऐवज चाफलीच्या इमारतीस नीमे गडिच्या इमारतीस देवविला आहे तो लाविल त्यास (तो) स्ताली दोघे व्यापारी बरे लिणार व दोघे आफराद त्याचें वेतन (व) ऐवज पैकीं पावेल उभयताची व भैरवभट व गोपाळ वृदोस्त दि * दूरील ते प्रत्यह श्री चा नैवेद्य व नित्य दिपास तेल आ छ ** च शक्तीनें बाहेरून मेळउन आणिली व रुद्राभिषेक करून मंत्रयुक्त पुजा करिलिल तरि श्री चे आहे ते दोन वर्षे इमारतीस ऐवज दिल्हा आहे तो दो स्तळीं लावितील त्यास जो समर्थानि नेमुन वृति दिली आ (से) ते खेरीज करून देवाचा रूका शिवस्व व समुदाइ यास हि शिवस्व व ते च्छळी पूर्वी समुदाय होता त्यास हि शिवश्व ऐसे आहे तरि चिरंजीव आमचे सर्व पारपत्य करितिल ते ऐवज आणून इमारतीस लावितील त्यांशी द्रव्यलोभे करून अथवा सर्व पारपत्यबळेच करूं ह्मणतील न्याय सोडुन अन्याई प्रवर्ततिल व आमचे निशाण व शेवक लोक ठेवणें व काढणें व गा (वा) ची देखरेख व खर्च व दास्तान कोण्ही करूं ह्मणतील त्यास करून दिल्हे पाहिजे पूर्वापार चालत आले आहे सर्वास विदितचि आहे राजग्रह संमधी जे येइल व व श्री समुदाइ जे आणितिल त्याचा खर्च चिरंजीव च करितिल दो स्छि (दो स्थलि) चा इमारतीस दोनी वर्षे सर्व ऐवज निमेनिम नेमुन दिल्हा आहे ते लावितिल आमचा परत्यात (पारपत्यांत) कोण्हा संमध नाही आतां आधिक नवें देऊन दिल्हे न पाहिजे आमचा ये समईचा संकल्प सर्वानि सिधीस पाविला पाहिजे दोनी वर्षे जालिया वरि जो ऐवज येल (येईल) त्याणे नित्य नैमित्य व महोछव होतिल तो वरि देवाचा एैवज स्तळिचा, निव बाहेर जे श्रीचे लोक आहेत त्ये यांत लोक घरिल उदरासाठी त्यांस तुही समस्तानि निष्ठुरतेनें सांगावे व वंशपरंपरेने आमचे सर्व पा***(रिपत्य) आहे तें चालविले पालि (हि) जे आमचे शरीर अशक्त जाहले ह्मणउन लेखन करविले देशकाळ वर्तमान कलत नाहीं रुणानुबंध प्रमाण समस्त हरिभक्ताप्रति दिवाकराचा नमस्कार पूर्वी सहवासे बरे अथवा वाइट बोलिलो आसेन कारभार मुळें बोलावे लागतें शरीरें वेगळाली प्रकृति भिन्न भिन्न आहेत आत्मा येकाचे आहे सुज्ञाप्रति विशेष काय ल्याहवें, धर्म मोडून अधर्म स्छापू नये ह ज्ञप्ति (विज्ञति)
हेंच पत्रीं राजश्री भानजी गोसावीस नमस्कार चिमाआकाचा सांगावा तुम्हांस दत्ताजीपंतांनी मजकुर पूर्वी सांगितला तो ध्यानांत असेल सुचनार्थ लिहिले आहे, परिधावी संवत्सरी राजेश्रीनी पवला? त्या समइ परमार्थ घेतला ते समइ चे द्रवय (द्रव्य) अश्वथ टपौरे मसुरकर यांचे जवळ आहे, त्यातले अर्ध द्रव्य देवाच्या इमारतीकडे घ्यावे व अरधेचे दीपमाला कराव्या ह्मणुन कैलासवासी समर्थाची अदना (आज्ञा) अहे, रामचंद्रपंता अमात्य यास कळउ नये.
- ↑ रा. चांदोरकर यांच्या जवळचे सर्व अस्सल कागदपत्र व त्यांनीं जमविलेली सर्व माहिती या लेखकाला त्यांनी मोठ्या आनंदानें दिली व त्या कागदपत्राचा व माहितीचा या पुस्तकांत उपयोग करण्याची परवानगी दिली याबद्दल लेखक त्यांचा फार ऋणी आहे. या कागदपत्रांचें व माहितीचे अभावीं या लेखांतलें हें शेवटचें कलम इतक्या निश्चित स्वरूपांत लिहितां आलेंच नसतें.